आमची अमेरिका वारी….. भाग 5 (प्रशांत जयानंद मठकर मोबाइल 9619036406 ) सीएटल शहर

Submitted by Prashant Mathkar on 24 December, 2022 - 07:52

आमची अमेरिका वारी….. भाग 5 (प्रशांत जयानंद मठकर मोबाइल 9619036406 )
सीएटल शहर

आतापर्यंत सीएटल आणि आसपासच्या मुख्य प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन झाल्या. खुद्द सीएटल शहरातही अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. त्यापैकी सीएटल स्पेस सेंटर मधला 1962 साली बांधलेला 605 फूट उंच ‘स्पेस निडल ऑब्झरवेशन टॉवर’ हा सीएटलचा लॅंडमार्क वायव्य अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षण. IMG-20220711-WA0082.jpgदरवर्षी इथे एक दशलक्षाहून अधिक पर्यटक येतात. हा टॉवर अवघ्या 400 दिवसांत बांधला गेला त्यामुळे त्याला ‘400 Day Wonder’ म्हणूनही ओळखल जात. ताशी 10 मैल किंवा 16 किमी वेगाने चालणाऱ्या लिफ्टने या 605 फूट (184 मीटर) उंच इमारतीच्या प्रवासाला फक्त 41 सेकंद लागतात. टॉवरमधे 500 फूट (152 मीटर) ऊंचीवर एक फिरत रेस्टॉरंट आहे जे पूर्ण 360 अंशात फिरत. रेस्टॉरंट आणि त्यावरच्या निरीक्षण सज्जामधून, सिएटल शहर, आजूबाजूचे पर्वत, खाडी आणि आसपासच्या बेटांचा मंत्रमुग्ध करणारा नजारा दिसतो. रेस्टॉरंटच्या फिरत्या आणि पायाखाली पारदर्शक काच असलेल्या डेकवरून चालत बाहेरची आणि पायाखालच्या काचेतून दिसणारी दृश्य पहाण हा एक चित्तथरारक अनुभव. हा टॉवर जगातील सर्वात जास्त छायाचित्रित इमारतीपैकी एक आहे. आम्ही येथे रात्री आठ वाजता प्रवेश केला आणि अकरा वाजले तरी पण तिथून पाय काढवत नव्हता.

याच सीएटल स्पेस सेंटरमधल्या ‘चिहुली गार्डन अँड ग्लास’ प्रदर्शनात जगप्रसिद्ध अमेरिकन कलाकार डेल चिहुली याची काचेची चित्रशिल्प (Glass Sculptures) मांडलेली आहेत. या प्रदर्शनाची मांडणी चिहुलीने स्वत: केली. एक प्रदर्शन हॉल, आठ दालनं, ग्लासहाऊस आणि बागेत ही चित्रशिल्प अतिशय कलात्मक रीत्या मांडली आहेत. Chihuli II.jpgप्रदर्शनाचा केंद्रबिंदू म्हणजे 40-फूट उंच, काच आणि स्टीलपासून बनवलेल ग्लासहाउस आणि त्यात मांडलेली चिहुलीची चित्रशिल्प. ग्लासहाऊसमधील लाल, नारंगी, पिवळ्या रंगातल्या काचेच्या अनेक कलाकृतीनी बनलेल 100 फूट लांब शिल्प चिहुलीच्या सर्वात मोठ्या लटकणाऱ्या (Suspended) शिल्पांपैकी एक. Chihuli.jpgहॉलच्या बाहेर बागेत विविध रंगी फुलांच्या आणि झाडांच्या हिरव्या पार्श्वभूमीवर प्रदर्शित केलेल्या चिहुलीच्या इतर कलाकृतीही अप्रतिम. A Chihuli III.jpgकाचेपासून बनवलेली ही चित्रशिल्प, त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण आकार, डोळे दीपवणारी अद्भुत रंगसंगती पहाताना ती काचेपासून बनली आहेत यावर विश्वास बसत नाही.
Chihuli Va .jpg
सीएटल मधली 76 मजली कोलंबिया सेंटर ही वॉशिंग्टन राज्यातली सर्वात उंच इमारत. स्पेस निडल प्रमाणे याही सेंटरच्या 73 व्या मजल्यावर स्काय वह्यू ऑब्झरवेटरी आहे. 900 फूट उंचीवरुन दिसणार सीएटल शहर, हार्बर फ्रंट,खाडीतल्या बोटी आणि आसपासचा नजारा अविस्मरणीय.... पण स्पेस निडलच्या फिरत्या आणि पारदर्शक डेकची मजा इथे नाही.
Columbia A.jpg
इथलं वूडलँड पार्क झू हे प्राणी संग्रहालय जगभरातील लयाला जात असलेल्या किंवा धोक्यात असणाऱ्या (Extinct / Endangered) वन्यप्राणी प्रजातींच्या संवर्धनासाठी प्रसिद्ध. 92 एकराच्या हिरव्या गर्द जंगलात पसरलेल्या या प्राणी संग्रहालयातल्या जगभरातील 250 प्रजातींच्या जवळपास 900 प्राण्यांपैकी 35 प्राणी हे लयाला जात असलेल्या किंवा धोक्यातील प्रजातीपैकी आहेत. गोरिलाच्या संवर्धनावर इथे खास भर दिला जातो. 92 एकरांचा हा परिसर एशिया, आफ्रिका, उष्णकटिबंधीय पर्जन्यवन, समशीतोष्ण पर्जन्यवन, वाळवंट, यासारख्या जैविक वातावरणात विभागुन सर्व प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात ठेवल आहे. त्यामुळे इथे फिरताना आपण त्या भागात आणि त्या प्राण्यांच्या सहवासात असल्याचाच आभास होतो. प्राणी संग्रहालय पाहायला जाताना ‘अशी बरीच प्राणी संग्रहालय पाहिली.. इथे वेगळ काय असणार’ हाच विचार मनात होता..पण दुपारी 12 वाजता प्रवेश केल्यानंतर पाच वाजता झू बंद होईपर्यंतचा वेळ कसा गेला ते कळलच नाही...
IMG_20220626_153518.jpg
24 जुलैला आम्हाला अमेरिकेत सीएटलला येऊन दोन महीने झाले. या दोन महिन्यात खूप फिरलो..पाहिल.. वेळ मजेत गेला. माझ्या मुलीच्या घरासमोरच सीएटल बंदराची किनारपट्टी. हे बंदर अमेरिकेतल्या मोठ्या कंटेनर बंदरांपैकी एक आणि अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच महत्त्वपूर्ण प्रवेशद्वार. बंदरात मालवाहू, प्रवासी बोटी आणि छोट्या शिडाच्या खाजगी बोटीची सतत येजा. बंदरावर अनेक मोठमोठे धक्के(Piers), त्यातले काही पर्यटकांच्या मनोरंजनासाठी. आमच्या बऱ्याच संध्याकाळी या धक्क्यांवरची गजबज आणि मावळत्या सूर्याची विविध रूपं न्याहाळण्यात गेल्या. Boat II.jpg
या बंदरासमोरचा अल्की बीच आणि तिथल्या सूर्यास्त दर्शनाविषयी इथे आल्यापासून खूप ऐकल होत. एका संध्याकाळी फेरी बोट पकडून 15 मिनिटांत अल्कीला पोहोचलो. या बीचच वैशिष्ट्य म्हणजे त्याचा अडीच किलोमीटर लांबीचा वाळूचा विस्तीर्ण किनारा. इथून किनाऱ्याच्या कडेने जाणाऱ्या पायवाटेने चालत अनुभवलेला सूर्यास्त अगदी अविस्मरणीय. असच एकदा सीएटल बंदरापासून फेरी बोटीने अर्ध्या तासाच्या अंतरावरच बेनब्रिज आयलंड हे छोटस सुंदर गांव पहाण्याचा योग साधला. अगदी इंग्रजी सिनेमात दाखवतात तसा गांव..IMG_20220611_130829.jpg
सुंदर बैठी घरं, बागा, शेतं, आठवडा बाजार, हायकिंग ट्रेल्स, स्थानिक कलाकृतींची दुकानं आणि निसर्गसौंदर्य पहात पहात परतीची शेवटची फेरी धावतपळत गाठण्याची वेळ आली.
IMG_20220608_191045.jpg
सीएटलमध्ये आबालवृद्धाना इलेक्ट्रिक सायकल्सवर मजेत फिरताना पाहून आपणही या सायकलवर पाय चालवायच पहिल्या दिवसापासूनच पक्क मनात बसल होत. शेवटी एका संध्याकाळी तो योग साधला आणि या सायकलवर मनसोक्त भटकण्याची मजाही अनुभवली. खूप मजेदार अनुभव..लहानपणी गावी भाड्याच्या सायकलवर मारलेल्या राऊंडसची आठवण करून देणारा. इथल्या सर्व रस्त्यांवर वेगळा सायकल ट्रॅक आहे. तीन-चार प्रकारच्या बॅटरी वर चालणाऱ्या आणि इतर सायकली भाड्यावर मिळतात. सर्व कारभार मोबाईल अॅपमधून. अॅप डाउनलोड करून क्रेडिट/डेबिट कार्ड लिंक करून सायकल वरचा कोड स्कॅन केला की सायकल आपल्या ताब्यात. सायकल सोडताना अॅपवर नोंद केली की भाड्याचे पैसे अकाऊंटमधून वळते होतात. सर्वात सोईस्कर म्हणजे सायकल घेण्यासाठी किंवा परत करण्यासाठी दुकानात जाव लागत नाही. गर्दीच्या भागात, नाक्यानाक्यावर कंपनीने सायकल्स ठेवलेल्या असतात. शिवाय कोणीही कुठेही सोडलेली सायकल घेता येते. Cycle.jpg
एकंदरीतच अमेरिकन लोकांना फिरण्याची आवड. वीकएंड शक्यतो घराबाहेर घालवावा हा अलिखित नियम. शुक्रवार संध्याकाळपासूनच इथली हॉटेल्स,पार्कस आणि पिकनिक स्पॉट्स गजबजू लागतात. डोंगरात, जंगलात तंबूत रात्र घालवण (Camping) आणि सकाळी उठून ट्रेकिंग, हायकिंग करण हा लोकांच्या आवडीचा छंद. त्याला पूरक अशा सुविधाहि इथे आहेत. समुद्रकिनाऱ्याने, सरोवरांच्या सभोवती, जंगलात वसवलेल्या मोठमोठया पार्कस् आणि पिकनिक स्पॉट्समध्ये पिकनिक एरिया, कॅम्प एरिया, आर व्ही पार्क, सायकल ट्रॅक्स, ट्रेकिंग किंवा हायकिंगसाठी ट्रेल्स सर्व काही व्यवस्थित आखलेलं असत. ठराविक अंतरावर खानपान आणि विश्रांतीगृहांची व्यवस्था आणि जागोजागी त्याची सूचना आणि पार्कमधल्या खास गोष्टींची माहिती देणारे फलक, यामुळे पार्क किंवा ट्रेल कितीही मोठा असला तरी फिरण हा सुखद अनुभव ठरतो.

इथे बरेच लोक फिरण्यासाठी आर व्ही (Recreational Vehicle) वापरतात. हे म्हणजे किचन, बाथरूम, झोपण्यासाठी बेडस् अशा सर्व सुविधायुक्त चाकांवरच घरच...आपल्याकडे दिसणाऱ्या नट-नटयांच्या व्हॅनिटी व्हॅनसारखं. सर्व पार्क, जंगलं आणि प्रसिद्ध प्रेक्षणीय स्थळांच्या जवळच्या आर व्ही पार्किंग एरिया मध्ये वीज, पाण्याची सोय असते. तिथे भाड भरून आर व्ही पार्क करायची, दिवसभर भटकून रात्र आर व्ही मध्ये घालवून सकाळी पुढच्या प्रवासाला निघायच. बस, ट्रेन,प्लेन, हॉटेल बुकिंगची गरज नाही आणि त्या मानाने कमी खर्चीक.. त्यामुळे बऱ्याच लोकांकडे कारबरोबर आर व्ही पण असते, शिवाय रेंटल कंपन्यांकडून त्या भाड्यावरही मिळतात. मनात आल की उठा आणि आर व्ही मध्ये बसून सुटा..इथल्या जीवनशैलीला साजेसा पर्यटनाचा हा प्रकार खूप लोकप्रिय.
best-washington-rv-parks_t5.jpg
अमेरिकेतल ‘सदाहरित’ म्हणून ओळखल जाणाऱ्या वॉशिंग्टन राज्यातल सीएटल हे सर्वात मोठ शहर. इथे पाहण्यासारखी मानवनिर्मित अनेक ठिकाण आहेतच पण या शहराला निसर्गाची मोठी देणगी लाभली आहे. त्याचा थोडाफार आस्वाद आम्हाला घेत आला. आता इथला मुक्काम हलवायची वेळ झाली. आमचं पुढच ठिकाण अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातल लॉस एन्जेलस शहर. 25 जुलैच्या सायंकाळी मुलीच्या किचन विंडोमधून माऊंट रेनीयरच दर्शन घेत सीएटलला अलविदा करून आम्ही लॉस एन्जेलसला जाणाऱ्या विमानात बसलो. विमानाने उड्डाण केल्यावर खिडकीतून बाहेर बघितल तर संधिप्रकाशात न्हाऊन निघालेल्या माऊंट रेनीयरच अद्भुत रूप परत येण्यासाठी खुणवत होत. IMG_20220724_090304 BB_0.jpg
(क्रमश:)

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडलं पर्यटन. आर.वी. पसंत.
फोटो छान. तुम्ही पुरेपूर आनंद घेता आहात. कविता वगैरे केल्यात काय? सिएटलमध्ये बालकवी. (गंमत करतोय)

छान लेख आणि फोटो.

तो बंदराचा फोटो पाहूल इथे अनेकदा जाणवलेली गोष्ट आठवली. वापरात नसलेल्या गोष्टी किंवा एरव्ही लागणार्‍या पण तात्पुरत्या बाजूला ठेवलेल्या गोष्टी सुबकपणे रचून ऑर्गनाइज्ड रीतीने ठेवायची पद्धत. कंपन्या व इव्हन सामान्य माणसे आपल्या बॅक/फ्रंट यार्ड मधे गोष्टी सहसा अस्ताव्यस्त ठेवत नाहीत. अशा रचून ठेवतात. कमर्शियल बंदरांमधे तर त्याची गरज असतेच पण जेथे ती नसते तेथेही हे चित्र दिसते. भारतात नैसर्गिक सौंदर्य भरपूर आहे, पण अशी मानवनिर्मित सुबकता क्वचित दिसते.

अगदी इंग्रजी सिनेमात दाखवतात तसा गांव.. >>> तो फोटो बघूनच शंका आली की "डिस्क्लोजर" मधे मायकेल डग्लस चे घर व ती फेरी दाखवली आहे ती तिथलीच असावी. विकिवर पाहिले तर तर ते तसेच आहे.
https://en.wikipedia.org/wiki/Disclosure_(1994_film)

फारएन्ड.. आपल्याकडे निसर्गसंपदा भरपूर आहे.. पण त्याचा आनंद घेण्यासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधाची कमी आहे..

वाह मस्त फोटो आणि लेख..
ते फिरते रेस्टॉरंट फिरायचा वेग काय असावा.. कधी अनुभव घेतला नाही असा