झोका...!! (भाग - २)
_______________________________
पंधरा वर्षापूर्वी जीव मुठीत घेऊन आजोळचे गाव सोडत पहाटेच्या एस्टीने चित्रूने जवळचे स्टेशन गाठले.
एस्टीने गाव सोडलं. .. आणि तिला हायसे वाटले. खिडकीतून येणाऱ्या हवेच्या झुळकेने तिने मोकळा श्वास घेतला. एस्टीतून उतरल्यावर धावतच ती स्टेशनच्या दिशेने निघाली. कुठलाही विचार न करता फलाटाला जी गाडी लागलेली होती त्यात जाऊन ती बसली. तिला जराही कल्पना नव्हती की, ह्या गाडीचा प्रवास तिला कुठवर नेणार आहे.??
तिला वेळ वाया दवडायलाही मुळीच वेळ नव्हता. पुढे काय हा विचार करायलासुद्धा तिने वेळ वाया घालवला नाही.
तिला खूप दूर जायचं होतं. आपल्या भाडखाऊ मामापासून, गुडघ्याला बाशिंग बांधून उभ्या राहिलेल्या म्हाताऱ्या शेठजीपासून दूर...अगदी दूर ...!!
गाडी सुटली. तना-मनाने थकलेल्या चित्रूला वाऱ्याच्या झुळकेने झोप लागली. जेव्हा तिला जाग आली तेव्हा गाडी शेवटच्या स्थानकात उभी होती. तिने खिडकीतून नजर फिरवली. माणसांच्या गर्दीने फुललेला फलाट पाहून तिचा जीव दडपून गेला.
ह्या गर्दीत आपला निभाव कसा काय लागणार हे प्रश्नचिन्ह कपाळावर घेऊन ती पूर्ण दिवस फलाटावरच्या बाकावर बसून राहिली. मात्र नियतीने चित्रूसाठी काही वेगळेच योजले होते. तिने कधी स्वप्नांतही कल्पना केली नव्हती की, ह्या मुंबापुरीत , स्वप्नांच्या मायानगरीत तिची भाग्यरेषा फळफळणार आहे म्हणून...!!
पोटी दोनाऐवजी चार घास पडतील पण पसरायला ओटी मात्र मिळणार नाही अशी ही मुंबईची ख्याती..!!
अशी ख्याती असलेल्या मुंबईत कित्येक रात्री तिने रस्त्यावर काढल्या.. एकटीने..! पहिल्यांदा तर ती एवढे मोठे शहर, त्यातली माणसे पाहून बावरून गेली. मात्र जेवढे हे शहर चकाचक माणसांनी गजबजलेले आहे तेवढेच ते आपल्यासारख्या गरीब , बकाल आणि कष्टकरी माणसांचे सुद्धा आहे हे तिच्या चाणाक्ष नजरेने चटकन् हेरले.
अवती-भवतीच्या परिस्थितीचा अंदाज घेत राहण्यासाठी तिने एका मंदिराचा आसरा घेतला. मंदिर लहानसे होते मात्र त्या भागातले प्रसिद्ध असे मंदिर होते. मंदिरात नेहमीच भक्ताळू लोकांची गर्दी असे. लहान- थोरांपासून सगळेच त्या जागृत देवस्थानाचे आशिर्वाद घेण्यासाठी कायम येत.
मंदिराच्या आवारात बरेचजण नारळ, हार- फुलं विकत असत. ते पाहून चित्रूने सुद्धा मंदिराच्या आवारात फुलं विकायला सुरुवात केली.
असंच एके दिवशी मंदिराच्या आवारात एक पॉश गाडी येऊन उभी राहिली. गाडीतून एक स्त्री उतरली. ती स्त्री गाडीतून उतरताच तिच्याभोवती लोकांचा गराडा पडला. तिच्यासोबत असणारे सुरक्षा रक्षक तिच्या आजूबाजूची गर्दी हटवू लागले. मात्र तिने तसं करण्यास त्यांना रोखलं. चित्रू अचंबित होऊन ते दृश्य पाहू लागली.
त्या स्त्रीला पाहून तिला वाटले, आकाशातून एखादी अप्सरा पृथ्वीतलावर अवतरली की कोण जाणे...!!
अस्सल मूर्तीमंत सौदर्यांची खाण असणारी ती स्त्री म्हणजे दुसरं- तिसरं कुणी नसून ख्यातनाम सिने अभिनेत्री ' देवयानी ' होती. ती नेहमीच त्या मंदिरात देवदर्शनाला येत असे.
तिच्या आजूबाजूला सुरक्षारक्षक असले तरी देवयानी स्वतःहून सगळ्या माणसांत मिसळून जात असे. एवढी मोठी अभिनेत्री होती तरी तिचे पाय मात्र जमिनीवर घट्ट रोवलेले होते. स्वतःच्या प्रसिद्धीचा, वैभवाचा कुठलाही रुबाब तिच्या चेहऱ्यावर तसेच देहबोलीत जाणवत नसे. चित्रपटसृष्टीसारख्या मायानगरीत असूनही तिच्या वागण्यात कुठेही अभिनय, नाटकीपणा नव्हता. शुद्ध, सात्विक भाव असलेला तिचा चेहरा एका वेगळ्याच तेजाने उजळलेला असे. सेवाभावी वृत्तीच्या देवयानीच्या दानशूरपणाच्या बऱ्याच गोष्टी चित्रूच्या कानावर आल्या.
आपल्या बकाल आयुष्याला देवयानीसारखी दयाळू स्त्री नक्कीच कलाटणी देऊ शकेल अशी आशा चित्रूला वाटू लागली.
जेव्हा- जेव्हा देवयानी मंदिरात येत असे, त्यावेळी चित्रू तिच्या नजरेस पडण्यासाठी जीवाचं रान करी. मात्र देवयानीची गाडी मंदिराच्या आवारात येताक्षणीच लोकांची झुंबड तिच्या भवताली उडत असे. बरेच प्रयत्न करूनसुद्धा देवयानीच्या दृष्टीस चित्रू काही पडेना. शेवटी चित्रूने चिवटपणा न सोडता देवयानीच्या बंगल्याचा माग काढला.
देवयानीच्या जुहूच्या बंगल्याच्या फाटकाजवळ चित्रू तास न् तास उभी राहू लागली ... न कंटाळता...!!
कधी - कधी सुरक्षारक्षक तिला हाकलून लावीत मात्र कधीतरी देवयानी मॅडमची आपल्यावर नजर पडेल आणि ती कनवाळू स्त्री आपल्याला मदत करेल असा दुर्दम आशावाद तिला वाटत होता.
__ आणि शेवटी घडलंही तसंच...!
एके दिवशी गाडीतून परतणाऱ्या देवयानीची नजर चित्रूवर पडली. तिने सुरक्षारक्षकांजवळ चित्रूची चौकशी करत तिला आपल्या बंगल्यात बोलावून घेतले.
देवयानीच्या आमंत्रणाने चित्रूला स्वर्ग दोन बोटेच वर उरला. देवयानीने तिची आपुलकीने चौकशी केली. चित्रूची संपूर्ण जीवनकहाणी तिने एकचित्ताने ऐकून घेतली.
चित्रूची कहाणी ऐकल्यावर देवयानीसारख्या स्त्रीच्या हृदयाला पाझर फुटल्याशिवाय राहिला असेल काय ..??
देवयानीने लागलीच चित्रूला आपल्या बंगल्यात कामाला ठेवून घेतले. देवयानीसारख्या धनाने आणि मनाने दोहोंनी श्रीमंत असणाऱ्या स्त्रीच्या आश्रयाचे कोंदण लाभल्यावर चित्रूच्या आयुष्याला हिर्यासारखे पैलू निश्चित पडणार हे विधिलिखित होतं.
थोड्याच दिवसात आपल्या वागण्याने - बोलण्याने छाप पाडत चित्रूने देवयानीचा पूर्ण विश्वास जिंकला. देवयानीच्या ओठातून बाहेर पडलेला कुठलाही शब्द चित्रू कधीही खाली पडू देत नसे. देवयानीला सुद्धा चित्रूच्या रूपाने एक विश्वासू सहकारी मिळाली.
कधी - कधी देवयानी चित्रूला आपल्यासोबत चित्रपटाच्या सेटवर नेत असे. देवयानी ज्या चित्रपटात अभिनय करत असे, त्या चित्रपटाचे दिग्दर्शक - निर्माते बहुतेक वेळेस देवदत्तसाहेबच असत.
देवदत्तसाहेब आणि देवयानीच्या प्रेमप्रकरणाची खमंग चर्चा चित्रपटाच्या सेटवर आणि चित्रपटसृष्टीत नेहमीच रंगत असे. वृत्तपत्राची रंगीत पानं तर दोघांच्या कथित प्रेमप्रणयाच्या लेखांनी भरलेली असत. मात्र त्या दोघांनीही आपलं नातं जगासमोर कधीही कबूल केलं नव्हतं. ' मौनं सर्वार्थ साधनम्' ह्या उक्तीप्रमाणे दोघेही त्याबाबतीत मौन राखून होते. चित्रपटसृष्टीत अश्या कंड्या नेहमीच पिकवल्या जातात असं म्हणत दोघेही सगळ्या बातम्यांकडे कानाडोळा करत. व्यावसायिक आणि खाजगी जीवनात तसं वागणं शहाणपणाचं आहे हे ते दोघेही जाणून होते.
चित्रूला मात्र आतल्या गोटातलं सगळं ठाऊक होतं. देवयानी आणि देवदत्तसाहेबांचं एकमेकांवर खूप प्रेम होतं. निदान ते तसं तिच्या दृष्टीस पडत होतं.
देवदत्तसाहेबांवर देवयानी जीव ओवाळून टाकत असे. त्यांच्याबाबतीत ती अतिशय संवेदनशील होती. देवदत्त साहेबांचा सहवास अखंड लाभावा , त्यांच्या नजरे समोरून दूर होऊ लागू नये म्हणून ती इतर निर्मात्यांचे चित्रपट बऱ्याचदा नाकारत असे.
मात्र चित्रूच्या मनात नेहमी शंका येई की, जेवढी ओढ देवयानीला देवदत्तसाहेबांबद्दल वाटते तेवढीच ओढ त्यांना तिच्याबद्दल वाटते की नाही कोण जाणे...!!
चित्रूला देवयानीने देवदत्तसाहेबांसोबतच्या नात्यात एवढं भावनिक होऊन गुंतून पडणं, त्यांच्यासोबतच्या नाजूक नातेसंबंधात अती संवेदनशील राहून डोळ्यांना झापड लावून इतर संधी नाकारून आपलं वैयक्तिक आणि व्यावसायिक नुकसान करून घेणं म्हणजे अगदी मूर्खपणाचं लक्षण वाटे. सरड्याच्या रंगासारखं सतत रंग बदलणाऱ्या चित्रपटसृष्टीत देवयानी आपलं वेगळेपण टिकवून असली आणि त्याबद्दल तिचं सर्वत्र कौतुक होत असलं तरीही चित्रूला मात्र ती मूर्ख आहे असंच वाटे.
कालचक्र एक - एक पावलाने पुढे निघालं होतं.
__ आणि एक दिवस असा उजाडला जो चित्रूच्या आयुष्याला पूर्णपणे कलाटणी देणारा ठरला.
नेहमीप्रमाणे चित्रू देवयानीसोबत फिल्मसिटीत लागलेल्या चित्रपटाच्या सेटवर गेली होती.
देवदत्तसाहेबांच्या चित्रपटातल्या एका गाण्याचे शूटिंग तिथे सुरू होते आणि एक एक्स्ट्रा कलाकार नेमकी त्यादिवशी गैरहजर राहिली.
आता काय करावं असा प्रश्न पडला असतानाच देवदत्त साहेबांची नजर चित्रूवर पडली. देवयानीच्या बंगल्यावर सतत ये-जा करत असल्यामुळे तसे ते चित्रूला चांगले ओळखत होते. देवयानीला सांगून त्यांनी तिला एक्स्ट्राचा रोल देऊ केला. मुळात चित्रू एखाद्या नटीपेक्षा कमी सुंदर नव्हती. देवयानीचा वरदहस्त लाभल्यामुळे तिचं रूप अजूनच खुललं होतं. तिने पहिल्यांदा थोडेसे नाटकी आढेवेढे घेतले. मात्र आपण चित्रपटाचा इवलासा का होईना , पण हिस्सा बनतोय् ह्या कल्पनेनेच ती हरखून गेली.
तसंपण देवयानीसोबत राहून तिला ग्लॅमरची ओढ वाटत होती आणि मग एक्स्ट्रा कलाकाराचे त्यादिवशी नेमकं गैरहजर राहणं तिच्या पथ्यावरच् पडलं.
देवदत्तसाहेब म्हणजे चित्रपटसृष्टीतला एकदम कर्तबगार माणूस..!! हात लावील तिथे सोनं करणारा.. त्यांच्या परिस्पर्शाने देवयानी यशाच्या शिखरावर दिमाखात उभी होती.
देवदत्तसाहेबांचा परिसस्पर्श जर आपल्याला झाला तर ...??
नुसत्या कल्पनेनेच् चित्रूच्या तना-मनावर रोमांच फुलले.
आपल्या आयुष्याला त्यांचा परिसस्पर्श व्हावा म्हणून काय करायला हवं..??
चित्रूच्या डोक्यात विचारांचे वारू बेफामपणे उधळू लागले.
पुढे कधीतरी सेटवर जाणारी चित्रू देवयानीला मदत करण्याच्या बहाण्याने नियमित सेटवर जाऊ लागली. सेटवर देवदत्तसाहेबांच्या नजरेत भरून त्यांच्याशी सलगी वाढवून त्यांच्या कृपेचा स्पर्श आपल्याला व्हावा म्हणून ती जंग- जंग पछाडू लागली.
देवयानीला हाताशी धरून देवदत्तसाहेबांशी गोड - गोड बोलत ती चित्रपटात, मालिकेत लहान-सहान रोल मिळवू लागली.
यशाची शिडी जर चढायची असेल तर देवदत्तसाहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही हे तिने कधीच ताडले होते.
देवदत्तसाहेबांना गळाला लावायचे असेल तर अजून काय करायला हवं..??
देवदत्तसाहेबांना...?? ... नाही... एका नराला जिंकायचे असेल तर...?? .....
देवयानीच्या प्रेमतपश्चर्येत मश्गुल झालेल्या ह्या आधुनिक विश्वामित्राला गळाला लावायचे असेल तर...??
__तर मेनकेचे रूप आपल्याला घ्यायलाच लागेल ... झटक्यात जर यश पदरात पाडून घ्यायचे असले तर नेहमीची वहीवाट सोडून ह्या आडवाटेचा मार्ग आपल्याला चोखाळायलाच् लागेल.
__ आणि मग मनाशी पक्की खूणगाठ बांधत आपल्या ह्या कल्पनेवर चित्रू स्वतःशीच हसली... मनमुरादपणे..!!
हाताखालच्या अभिनेत्रीवर ' हात' आजमावणारे म्हणून देवदत्तसाहेब तसे प्रख्यात होतेच.
त्यांच्या मागावर असलेल्या चित्रूच्या डोळ्यांत आमंत्रणाचे लाखो दीप प्रकटत होते. तिच्या डोळ्यांच्या उघडझाप करणाऱ्या मासोळ्यांत देवदत्तसाहेब अडकू लागले होते.. की ते तसं जाणूनबुजून दर्शवित होते देव जाणे...!! ते सुद्धा ह्या खेळातले माहिर खेळाडू होते.
हुरहूर वाढवणारे निसटते क्षण आणि अजाणता झाल्यागत भासविणारे उडते, चोरटे स्पर्श दोघाच्यांही तनावर अनोखा रोमांच फुलवित होते. देवयानीच्या सच्च्या प्रेमाच्या चिलखताला भेदत चित्रूच्या मतलबी प्रेमाचा तीर देवदत्तसाहेबांच्या कमकुवत हृदयात आरपार घुसला आणि मग देवयानीच्या नकळत अनाहूतपणे चालून आलेली संधी आणि मिळालेला एकांत चित्रूने बिल्कुल दडवला नाही.
वाटेत भेटणाऱ्या आणि गळ्यात पडू पाहणाऱ्या फुलपाखराचे पंख अलगद चिमटीत धरण्याचे कसब देवदत्तसाहेबांना होतेच, मात्र आता मिठीत विसावू पाहणारे नविन फुलपाखरू त्यांच्या जख्खड मुठीत देवयानीसारखे बंदिस्त होणारे नव्हते. त्या फुलपाखराचे पंख देवयानीसारखे नाजूक आणि कोमल मुळीच नव्हते.
देवदत्तसाहेबांना काय हवं आणि त्याबदल्यात ते आपल्याला काय देऊ शकतात ह्या विचारांचे बरेच दिवस न सुटलेले गणित चित्रूला आता सुटले होते.
__ आणि पुढे जे घडलं ते सगळ्यांसाठी अनपेक्षित होतं. देवदत्तसाहेबांच्या आगामी चित्रपटातली प्रमुख नायिका म्हणून चित्रूची निवड पक्की झाली.
नायिकेचं नाव चित्रू हे चित्रपटसृष्टीत शोभून दिसणार नाही म्हणून देवदत्तसाहेबांनी तिचं नावच बदललं..
आता चित्रूची ' अभिनेत्री चित्रगंधा ' झाली.
खरंतर त्यांच्या आगामी चित्रपटात देवयानी प्रमुख भूमिका साकारणार होती. मात्र तिचा पत्ता कट करत चित्रूने बाजी मारली आणि देवदत्तसाहेबांची आवडती नवोदित अभिनेत्री म्हणून चित्रपटसृष्टीत दाखल झाली.
" बाजारबसवी, निर्लज्ज स्त्री, चालती हो माझ्या घरातून..!!" देवयानीच्या डोळ्यांत गारगोटी आपटून ठिणग्या पडाव्या तश्या ठिणग्या पडू लागल्या.
आज ना उद्या हा प्रसंग आपल्यावर येणारच ह्याची पूर्ण खात्री असल्याने कुठलंही स्पष्टीकरण न देता चित्रूने देवयानीच्या बंगल्यातला आपला बाड- बिस्तरा आवरून घेत देवदत्तसाहेबांचा स्टुडिओ गाठला.
देवयानीप्रती देवदत्तसाहेबांचं प्रेम कच्च्या धाग्यात ओवलेले होते .. ते टचकन् तुटायला वेळ लागला नाही. त्यांच्या खांद्यावर मान टाकून रडणाऱ्या चित्रूला ते आपल्या घरी घेऊन गेले.
घडल्या प्रकाराने देवयानीवर प्रचंड आघात झाला. आपल्यासोबत झालेल्या विश्वासघाताने ती प्रचंड दुखावली गेली. संतप्त झाली.
तसंही चित्रपटसृष्टीतली बरीचशी नाती ही पक्क्या धाग्यात काही ओवलेली नसतात. मतलबापुरती नाती जोडली जातात. एकमेकांवर प्रेम असल्याचं नाटक केलं जाते. चित्रपट चालावा आणि आपल्याला अमाप प्रसिद्धी लाभावी हे मतलबी हेतू त्यामागे असतात.
मात्र चित्रपटसृष्टीत एवढी वर्ष राहूनसुद्धा देवयानी ह्या सगळ्यांना अपवाद होती. छक्के-पंजे तिला कधीच खेळता आले नाहीत.
देवदत्तसाहेबांवर तिचं खरंखुरं प्रेम होतं. त्याचा सहवास लाभावा , दोघांचं नातं वृद्धिगत व्हावं म्हणून इतर निर्मात्यांच्या चित्रपटांना तिने नकार देऊन आपल्याच पायावर धोंडा मारून घेतला होता.
पण रस्त्यावरून उचलून जिला घरात सन्मानाने राहायला दिलं.. जिच्याशी धाकट्या बहिणीसारखं नातं जोडलं .. तिने आपल्याला अशाप्रकारे दगा द्यावा हेच देवयानीच्या पचनी पडत नव्हतं.
देवयानीचं अभिनयातलं लक्ष उडलं. तिचं चित्त थार्यावर राहीना. ती मानसिकदृष्ट्या पूर्णपणे कोलमडली.
तर एकीकडे अभिनयातला 'ओ का ठो' ठाऊक नसणाऱ्या चित्रूसारख्या मुलीला देवदत्तसाहेबांसारख्या हुशार दिग्दर्शकाचा परिसस्पर्श झाल्याने तिच्या आयुष्याचे सोने होण्यास वेळ लागला नाही.
नवोदित अभिनेत्री चित्रगंधाचा पहिला- वहिलाच चित्रपट सुपरहिट झाला. त्यावर्षीचा सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार चित्रगंधाला मिळाला.
चित्रपटसृष्टीत तर कुजबूज ही होती की, नवोदित अभिनेत्रीचा तो पुरस्कार देवदत्तसाहेबांनी स्वतः विकत घेऊन चित्रगंधाला त्यांच्या ' प्रेमाची भेट' म्हणून मिळवून दिला.
पुढे ग्लॅमरची चव चाखत - चाखत चित्रगंधा यशाची एक - एक पायरी वर चढू लागली, तर जवळच्या माणसांनी केलेल्या विश्वासघाताने नैराश्याकडे वाटचाल करत देवयानी यशाची एक - एक पायरी खाली उतरू लागली.
पुढे तर तिचं नैराश्य एवढे वाढले की, तिला मानसोपचार तज्ञाची मदत घ्यावी लागली.
संवेदनशील मनाच्या देवयानीला हा धक्का पचवता आला नाही. मानसिक कोंडमारा सहन न झाल्याने नैराश्याच्या खोल गर्तेत जाणाऱ्या देवयानीला एके दिवशी वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावे लागले.
__आणि देवयानीच्या ह्या अवस्थेला बऱ्याच अंशी चित्रगंधा जबाबदार होती.
अपराधीपणाची जाणीव झाल्याने चित्रगंधा एके दिवशी देवयानीला भेटायला इस्पितळात गेली. देवयानीला औषधांमुळे झोप लागली होती. ती उठण्याची वाट पाहत चित्रगंधा खिडकीजवळच्या खुर्चीत बसून राहिली.
बऱ्याच वेळाने देवयानी झोपेतून जागी झाली. तिचे निस्तेज, वैफल्यग्रस्त डोळे पाहून चित्रगंधाला वाईट वाटलं.
चित्रगंधाला समोर पाहताच देवयानीच्या डोळ्यांत ओळखीचं हसू उमटलं.
देवयानीच्या बेडजवळ जाण्यासाठी चित्रगंधा खुर्चीतून उठू लागली.
" नको उठू बस तिथेच..!!" देवयानीने असे म्हणताच चित्रगंधा अवघडून तिथेच खिडकीत बसली.
देवयानीचे डोळे तिच्यावर रोखलेले होते.. खोलीत ताण निर्माण करणारी शांतता होती.. अवघडून खुर्चीत बसलेली चित्रगंधा परत उठू लागताच ___
"बस तिथेच खिडकीत... नको येऊ माझ्याजवळ, तुझी लायकी खरंतर खिडकीत बसायचीच आहे... छिनाल, कपटी स्त्री कुठली..!" देवयानी चित्रगंधावर तारस्वरात ओरडू लागली.
" माझ्या आयुष्याला कीड लावून नाक वर करून उपटसुंभासारखी भेटायला आलीस इथे मला.. , सगळीच लाज सोडलीस का..?? बेशरम, चालती हो इथून..!!"
देवयानीसारख्या सात्विक स्त्रीच्या तोंडून हे विषयुक्त शब्द बाहेर पडण्यास आणि तिच्या ह्या परिस्थितीला आपणच कारणीभूत आहोत ह्या विचारांनी चित्रगंधा पुतळ्यासारखी जागीच थिजली.
आतला गोंगाट ऐकून नर्स धावत आत आली.
चित्रगंधाला समोर पाहून देवयानीला पुन्हा वेडाचे झटके येऊ लागले. देवयानी तिच्या अंगावर धावत जाऊ लागली. नर्सने कशीबशी परिस्थिती हाताळली.
"मॅडम, तुम्ही पुन्हा इथे येऊ नका.. !" असं सांगून नर्सने चित्रगंधाला जवळ-जवळ तिथून पिटाळून लावलं.
इस्पितळातला देवयानीचा केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर तरळताच आज प्रथमच चित्रगंधाच्या डोळ्यात अश्रू तरळले. देवयानीला तिच्या जागेवरून खेचून आपण तिची जागा घेऊन तिचा विश्वास पार धुळीस मिळवला , याबद्दल तिला आज प्रथमच विषाद वाटला.
मात्र देवयानीने एवढं मनाला लावून घेण्यासारखं काय अघटीत घडलं होतं..??
' तो मी नव्हेच ' ह्या विश्वामित्र पवित्र्याने चालणाऱ्या ह्या चित्रपटसृष्टीत देवदत्तसाहेबांच्या गळ्यात चारुलतासारखी कोवळी मुलगी पडली.. त्यानंतर त्यांनी आपल्याला दुधात पडलेल्या माशीसारखं त्यांच्या चित्रपटातून आणि आयुष्यातूनही फेकून दिलं. मात्र आपल्याला त्याने काहीच फरक पडला नाही. अनिकेतनेही आपल्याशी असणारे त्याचे सर्व पाश तोडून टाकले , तेव्हा थोडं - फार वाईट वाटलं पण तेवढयापुरतचं...! गेला तर गेला सोडून..काय फरक पडतो आपल्याला...??
खरंतर चित्रगंधाला जास्त वेळ कुणात मन गुंतवून ठेवणं जमत नव्हतं. मनापासून प्रेम - बीम काही नाही.. स्वार्थापुरतं आणि गरजेपुरतं नातं जोडणं .. बस्स.. यापलीकडे काही नाही आणि त्यामुळे तिचं काहीच बिघडत नव्हतं.
कशाला हवी मनाची गुंतवणूक..??
तिने आधीच ठरवलं होते की , माणसांमध्ये जास्त गुंतायचं नाही. ते धोक्याचं, मनस्तापाचं असतं. अनिकेतवर थोडंफार प्रेम केलं तिने..! पण तो जेव्हा तिच्यापासून दुरावला, तेव्हा त्याने मला फसवलं वगैरे तक्रारी ती कुठेही करत बसली नाही. आपलं मानसिक स्वास्थ तिने जराही हरवू दिलं नाही. खरंतर गेल्या एक वर्षात ती साफ विसरून गेली होती अनिकेतला..!! देवयानीसारखी ज्याच्या त्याच्याकडे दाद मागत ती कुणाकडे फिरली नाही. तिला वाटलं, देवयानी स्वतःच्या आयुष्यात खरं तर निर्बुद्धपणेच वागली.
हे असं चालायचंच् ..!!
चित्रपटसृष्टीत हे नेहमीच चालतं. त्यात नवीन आणि वेगळं काही नाही. त्याबद्दल आपण दुःखी होण्याचे काहीच कारण नाही. ती स्वतःला समजावू लागली. मात्र मनाची कितीही समजूत घातली तरी गेल्या आठ दिवसांपासून तिला वाटणारी अस्वस्थता जराही कमी झाली नाही.
एवढं सगळं आपल्याला कळतंय् तरी आज अचानक मनाचा तळ का ढवळला जातोयं..??
चित्रगंधा डोळे मिटून खुर्चीवर मान टाकून मागे रेलली.
" मॅडम..!"
"" अं.. कोण..?"
कानावर पडलेल्या आवाजाने चित्रगंधा दचकून भानावर आली.
क्रमशः
__________________ XXX________________
जमलाय हा भाग पण..
जमलाय हा भाग पण..
इतक्या पटापट भाग टाकून आम्हा वाचकांना सुखद अनुभव देताय.
उत्सुकता वाढलीय... पुभाप्र...
उत्सुकता वाढलीय... पुभाप्र...
छान चालली आहे कथा.
छान चालली आहे कथा.
हा भाग सुद्धा छान आहे.
हा भाग सुद्धा छान आहे.
खुपच उत्सुकतावर्धक.....
खुपच उत्सुकतावर्धक.....
धन्यवाद धनवन्ती , अज्ञातवासी,
धन्यवाद धनवन्ती , अज्ञातवासी, रमड, दिपक, हर्षदा..!!
छान...
छान...