झोका.....!! (भाग १)
__________________________________________
मधाच्या पोळ्यावर दगड पडावा आणि शेकडो मधमाश्या चोहो दिशांना घोंघावत उडाव्या तसे चित्रगंधाच्या बाबतीत आज घडत होते.
मागील आठ दिवसांपासून अनेक विचारांच्या शेकडो मधमाश्या तिच्या डोक्यात घोंघावू लागत.
तेच ...तेच.. हजारो प्रश्न..!!
गेल्या आठ दिवसांपासून येणारा प्रत्येक दिवस तिला चमत्कारिक भासत होता. चमत्कारिक म्हणजे खूपच चमत्कारिक ..!
चित्रगंधाने हातातला कॉफीचा मग बाजूला ठेवला. नेहमीपेक्षा कॉफीची चव आज तिला जास्तच कडवट जाणवली.
आजकाल चमत्कारिक असं काय घडतयं आपल्या बाबतीत..?? गेले आठ दिवस आपली झोप , तहान - भूक हरवली आहे. कशाने ..?? नक्की होतंय् तरी काय आपल्याला ...??
आठ दिवसांपासून आपण असं बेचैन झालोयं. मनात अस्वस्थता वाढलीयं. कुणीतरी आपल्याला संदेश धाडतेय् असं का वाटतेय् मनाला....?? खोल दरीत आवाज घुमावा तशी आपल्या नावाने कुणीतरी साद घालत असावं असं का जाणवतयं आपल्याला..?? भास होताहेत का आपल्या मनाला..??
स्वप्नांत, झोपेतसुद्धा तेच्.. तेच्...!!
अनिकेत... अनिकेत असू शकेल ...?? तो आपली आठवण काढत असेल....??
अनिकेतला अजून आपण विसरू शकलो नाहीयेत का..?? हे कारण असू शकेल..?? एवढे भावनिक केव्हापासून झालो आपण ..?? एखाद्या नात्यात भावनिक होऊन गुंतून पडणं केव्हापास्नं जमायला लागलं आपल्याला..??
नाही , आपण एवढे मूर्ख नक्कीच नाही आहोत ... भावनिक गुंतवणूक करत आयुष्यभर एखाद्या नात्यात अडकून पडत, मनस्ताप सहन करत, रडत - रखडत जगणारी माणसं मूर्ख असतात... अगदी देवयानीसारखीच्.... ह्या आपल्या मतावर आपण आजही ठाम आहोत.
__ पण मग गेल्या काही दिवसांपासून आपले चित्त थार्यावर का नाहीये..??
आपल्या डोक्यात वाढलेली ही बैचेनी , अस्वस्थता कशामुळे असेल..??
ह्या बैचेनीला कारणीभूत आपला कडवट भूतकाळ तर नसेल.. जो अजूनही विचांरातून, स्वप्नांतून आपला पाठलाग करतोय्..??
विस्मरणात जाऊ पाहणाऱ्या भूतकाळाच्या सावल्या अजूनच गडद होऊ पाहताहेत का..??
गेल्या काही दिवसांपासून जरासा डोळा लागला की एकच स्वप्नं पडतेय् आपल्याला , माणसाला झोपेत स्वप्नं पडणं अगदी सामान्य बाब आहे, मात्र आपल्याला पडणारे स्वप्नं काही सामान्य नाही; तर काहीसे विचित्र आणि चमत्कारिकसुद्धा आहे ...!!
माणसाला विसंगत, ओंगळवाणी , असंबद्ध कशीही स्वप्नं पडू शकतात पण रोज एकच स्वप्नं.. तेही मनाला हुरहूर लावणारे.. मनाची उदासीनता वाढवणारे!!
झाडाच्या फांदीला टांगलेल्या झुल्यावर आपण आनंदाने झोके घेतोय् आणि अचानक झुल्याची दोरी तुटून आपण जमिनीवर आदळतोयं ... हे असलं भीषण दुस्वप्नं गेले आठ दिवस आपल्याला झोपेत पडतेय् ...
तेच् .. तेच् एकच स्वप्नं ...??
असं स्वप्नं तरी का पडावं आपल्याला.??
लहानपणी सवंगड्यांसोबत कितीतरी वेळा झुल्यावर झोके घेण्याचा खेळ खेळलोयं आपण, पण त्याला तर आता बराच काळ उलटलायं , इतक्या वर्षात असं स्वप्नं कधी पडलं नाही आणि आत्ताच इतकं सविस्तर स्वप्नं कसं पाहिलं आपल्या मनानं ...??
का पडतेय् एकच स्वप्नं रोज...??
तिने मानसशास्त्राचे सगळे सिद्धांत येथे लागू करून पाहिले.
सबकॉन्शस् माईंड..??
आपल्या अंतर्मनात आपला भूतकाळ अजूनही इतका दडी मारून बसलाय की , स्वप्नांतसुद्धा तो आपला पाठलाग करण्याचे सोडत नाहीये.
आपल्या बदलत्या मन:स्थितीमागे हे कारण असू शकेल ??
-- की मग आपण केलेला देवयानीचा विश्वासघात आणि त्याबद्दल मनात दाटून येणारी पश्चातापदग्ध भावना नकळतपणे अशा रुपाने स्वप्नांत उफाळून येऊ पाहतेय्....??
देवयानीसारख्या कनवाळू, प्रेमळ स्त्रीला आपण दगा दिला. ज्या स्त्रीने एका दरिद्री मुलीला रस्त्यावरून उचलून आपल्या घरात आसरा दिला.. पाठच्या बहिणीची माया दिली... त्या देवतेसमान स्त्रीच्या पाठीत आपण कुणाचीही तमा न बाळगता विश्वासघाताचा खंजीर खुपसला... अगदी बेमालूमपणे..!!
हा अपराध आपण केला..
का..?? कशासाठी..??
ज्या देवदत्तसाहेबांवर देवयानीचे जीवापाड प्रेम होते त्या
देवदत्तसाहेबांशी देवयानीच्या नकळत आपण चोरून संधान बांधले. त्यांच्याशी चोरटे प्रेमसंबध ठेवत सामाजिक नीतीमूल्ये, नैतिकतेच्या साऱ्या चौकटी आपण पार मोडून काढल्या.
का...??
का वागलो आपण असे देवयानीशी....???
प्रसिद्धी, पैसा, यशस्वी, सुखासीन आयुष्यासाठी..??
मग देवयानीकडे भोगत असलेल्या सुखासीन आयुष्यात आपण संतुष्ट नव्हतो का...??
__की मग आपल्या आत दडी मारून बसलेल्या राक्षसी महत्वकांक्षेने ह्या सगळ्या चौकटी मोडून काढण्यास आपल्याला भाग पाडले...??
सामाजिक नीती, अनिती, नैतिकताच्या चौकटी...??
चुलीत गेल्या त्या सगळ्या नितिमत्तेच्या चौकटी...!
चित्रगंधाने हाताच्या मुठी अनावर झालेल्या संतापाने आवळल्या.
एका कोवळ्या, निरागस मुलीला एका म्हातारचळ लागलेल्या बिजवराला, तिच्या सख्ख्या मामाने विकायला काढले तेव्हा कुठे गेला होता समाज आणि त्या सामाजिक नीतिमत्तेच्या चौकटी ...??
एका कोवळ्या मनाच्या स्वप्नांची निघालेली अंत्ययात्रा अंगणात बसून पाहत, पानसुपारी खात, सारा समाज दात काढत खिदळत होता, तेव्हा कुणालाही त्या दोन निष्पाप डोळ्यांतले अश्रू दिसले नाहीत की त्या निरागस जीवाचे मूक आक्रंदन जाणवले नाही...??
सामाजिक नीती आणि नैतिकतेच्या चौकटी !!
कथा - कादंबऱ्या आणि चित्रपटात हे फसवे शब्द शोभून दिसतात, वास्तवात नाही..!!!
चित्रगंधाने आपले जड झालेले कपाळ दोन्ही हातांनी गच्च आवळले.
जरासे शांत वाटल्यावर तिने मान वर करून आकाशाकडे पाहत दीर्घ श्वास घेतला. वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्याला हळुवार स्पर्श करून गेली. डोक्यात उठलेला विचारांचा डोंब थोडा वेळ का होईना पण विझला.
तेवढ्याश्या झुळकेने तिला शांत वाटले.
पण छे, एवढ्या सहजासहजी नकोशा विचारांचे चक्र कुणाला थांबवता येणे शक्य आहे का..??
पुन्हा तेच्....ये रे माझ्या मागल्या...!!
तेच् तेच् विचार तिच्या डोक्याचा पार भुगा करू लागले.
म्हाताऱ्या घोडनवऱ्याची शेज सजवण्यापेक्षा देवदत्त साहेबांशी केलेला घरोबा मुळीच वाईट नव्हता. ज्याला देवयानी काळी कृष्णकृत्ये म्हणून हिणवत असे त्या कृत्याचे आपल्या मनाशी समर्थन करत चित्रगंधा स्वतःचेच मानसिक समाधान करू लागली.
देवदत्तसाहेबांसोबत जोडलेलं आपलं नातं व्यवहारिक होतं. दोघांच्याही मर्जीचं आणि फायद्याचंही..!!
देवदत्तसाहेबांना जे हवं होतं ते आपण दिलं , मात्र फुकट नाही. त्या बदल्यात देवदत्तसाहेबांनी काय दिलं नाही आपल्याला..???
पैसा ,प्रसिद्धी , नाव...!!
हो, नाव दिलं त्यांनी आपल्याला ..!
चित्रगंधा ...!!
कोण होतो आपण..?
खेडेगावातली एक दरिद्री मुलगी ' चित्रू' आज ' नटी चित्रगंधा' या नावाने ग्लॅमरच्या दुनियेत प्रसिद्ध होती.
__आणि तिला तिथे पोहचवणारे होते प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक देवदत्तसाहेब ..!
'सिनेमा नटी... चित्रगंधा..!'
चित्रगंधाने पुन्हा एकदा दीर्घ श्वास घेतला.
आपण भूतकाळात चाललोय्..?? कोण ओढतयं आपल्याला भूतकाळात ..??
डोक्यात सुसाट वेगाने धावणाऱ्या विचारांवर का ताबा ठेवू शकत नाहीयेत आपण ..??
तिची नजर खिडकीतून दूरवर पोहोचली. सूर्यास्ताच्या पिवळट प्रकाशात लांबवर दिसणारे निळे अस्मानी डोंगर उठून दिसत होते. तिची नजर त्या डोंगरांकडे लागली.
__ आणि त्याक्षणी चित्रगंधा पंधरा वर्षे मागे गेली.
पंधरा वर्षे ..!!
ह्या पंधरा वर्षाच्या काळात कितीतरी बदल घडले आहेत आपल्या आयुष्यात ...!!
___आणि आपल्या मनात ..??
ते तर पार बदलून गेलेयं मागील पंधरा वर्षात...!!
______________ XXX_________________
डोक्यावरचं माता-पित्यांचं मायेचं छत्र हरवलेली अजाण चित्रू आपल्या म्हाताऱ्या आजी आणि दिवस-रात्र नशेच्या अंमलाखाली राहणाऱ्या मामाच्या आश्रयाला आजोळी आली.
मामा..?? नुसता मामा नाहीतर कंस मामाच म्हणायला हवं त्याला..!
चित्रगंधाचा संताप पुन्हा एकदा उफाळून आला.
घरातल्या सगळ्या चीजवस्तू विकून नशेच्या पूर्णपणे अंमलाखाली गेलेल्या तिच्या मामाने एके दिवशी म्हातार्या बिजवर शेठजीला तिला विकायला काढले. चित्रूने आणि तिच्या आजीने ह्या सगळ्या प्रकाराला अर्थातच विरोध केला पण त्या विरोधाला काहीही अर्थ नव्हता. शेठजीच्या सोबतीने आजी आणि चित्रूचा विरोध तिच्या मामाने पूर्णपणे मोडून काढला.
आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात दोघींनींही गावातील मान्यवरांकडे मदत मागितली , पण दोघींचीही मदत करण्यात कोणीही पुढाकार घेतला नाही.
दुसऱ्या दिवशी तिच्या आणि म्हातार्या शेठजीच्या साखरपुड्याला मात्र झाडून संपूर्णं गाव हजर होतं... पानसुपारी आणि पेढा खायला...!!
तिच्या मामाला तर आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या.. भाचीचा सौदा बिजवर असलेल्या शेठजीसोबत करून..!
म्हाताऱ्या शेठजीच्या गळ्यात चित्रूला एकदा का अडकवलं की , त्याची आयुष्यभराची दारूची सोय फुकटात होणार होती.. तसा अलिखित करार शेठजीत आणि त्याच्यात झाला होता.
चित्रू ह्या सगळ्या प्रकाराने बधीर झाली. सैरभैर झाली.
कुणाचा आधार नाही की कुणाची मदत नाही..
संपलं सारं म्हणतां तिच्या मनाचा अशरण पैलू मात्र हे सारं स्वीकाराला तयार नव्हता.
यापुढे कुणापुढेही मदतीसाठी मान तुकवू द्यायची नाही, हे तिने ठरविले. डोळ्यांसमोर अंधार दाटला होता हेही सत्य होते तरीही..!!
निराशा , हतबलतेच्या अंधाऱ्या खाईत कोसळत असताना तिचं मन आक्रंदून उठलं.
नजरेसमोर अंधार दाटलेला असला तरी क्षणार्धात त्या अंधाराला नजर सरावू लागते. काळोखाचा वेध घेणाऱ्या नजरेला अंधुक का होईना पण दिसू लागतं.. हे तिला जाणवलं.
रात्रभर विचार करून तिच्या मेंदूच्या पार ठिकऱ्या झाल्या होत्या.
परिस्थिती आणि मन याच्या द्वंदांत अडकलेलं मन कधी कसं वागेल याचे आडाखे कुणालाही बांधता येत नाही हेच खरं..!!
रात्र सरल्यावर भल्या पहाटे तिने आजोळचे गाव सोडले. कुठल्या वाटेला जायचं ते माहीत नसतानाही..!!
ओसरीत खाटेवर झोपलेल्या आजीच्या तळव्यांना हळुवार स्पर्श करत तिने नमस्कार केला. आजीच्या भेगाळलेल्या, खरखरीत तळव्यांना स्पर्श करताच तिला भडभडून आलं. आई-वडिलांच्या माघारी आजीनेच तिला मायेने वाढवलं होतं. ओट्यावर दारू पिऊन पडलेल्या मामाला पाहून क्षणभर तिला वाटलं की, कोपऱ्यातली काठी उचलावी आणि हाणावी ह्या नशेडीच्या डोक्यात ...मात्र त्याक्षणी तिने आपल्या विचारांना ताब्यात ठेवलं.
कुणालाही कसलीही चाहूल न लागू देता गावात येणाऱ्या पहाटेच्या एस्टीने तिने गाव सोडलं... पुन्हा माघारी न परतण्याची शपथ घेऊनच..!!
तिला आपल्या आजीबद्दल अपार करुणा वाटत होती पण याक्षणी निर्णय घेणे तिला भागचं होते नाहीतर तिच्या व्यसनी मामाने तिच्या आयुष्याचे पार मातेरे करून टाकले असते.
आजची एक रात्र जरी आपण इथे थांबलो तरी या पुढचं आपलं आयुष्य म्हणजे नुसता अंधार... गर्द अंधार असेल.. ह्या नुसत्या विचारानेच ती हबकून गेली.
पहाटेच्या अंधारातून जात असताना तिला जाणवत होतं की , कोणीतरी आपल्या मागावर असावं ...!
कोण असेल...??
__ की भीतीमुळे आपल्याला तसा भास त्यावेळेस होत होता...?
कोण असेल बरं ....??
तिने मेंदूला ताण दिला.
सुन्या असेल का...?
कदाचित सुनिलच असेल तो..!! विस्मरणात जाऊ पाहत असलेला एक चेहरा हळूहळू तिच्या मनात आकार घ्यायला लागला. तिने मेंदूला ताण दिला तितका तो अधिकाअधिक स्पष्ट व्हायला लागला.
सुनिलचा चेहरा..!!
सुनिल ... तिचा बालमित्र..!!
घरातून पळून येण्याआधी एकमेकांना भेटल्याशिवाय राहणं दोघांनाही कठीण वाटायचं. मात्र तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाने आजोळ सोडते वेळी सुनिलचा निरोप सुद्धा तिला घेता आला नाही कारण तिचावर गुदरलेला प्रसंगच तसा बाका होता... मात्र याक्षणी तिला खूप अपराधी वाटलं.
सुनील तिचा समवयस्क ...लांबट नाक , सावळा रंग , सदा न् कदा कपाळावर केसांची झुलपं आलेली... गोड गळ्याचा एक गुणी मुलगा....!!
विस्मरणात जाऊ पाहणारा चेहरा डोळ्यांसमोर आता स्पष्ट होऊ लागला.
__ तिच्या मनात विचार आला, जर त्याच्या गोड आवाजाला मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळालं असतं तर कदाचित चित्रपटसृष्टीत आघाडीचा गायक म्हणून तो नावाजला सुद्धा गेला असता..!
सुनिलची सख्खी आई नव्हती. इथे चित्रूला मामाचा जाच तर तिथे सुन्याला सावत्र आईचा त्रास....!!
दोघेही आईच्या मायेला लहानपणापासून पारखे झालेले.. समदुःखी असल्याकारणाने एकमेकांशी त्यांचं चांगलं पटत असे. त्यामुळेच ते एकमेकांच्या अधिकच जवळ आले. वेळ मिळेल तेव्हा इतर मुला-मुलींपासून दूर राहून एकमेकांतच अधिक रमून जायला लागले.
घरापासून काही अंतरावर असलेला आमराईतल्या आंब्यांच्या वृक्षांना झुला बांधून त्यावर झोके घेणे हा दोघांच्याही आवडीचा खेळ ..!
आमराईत आंब्याची झाडे जवळजवळ होती. त्यातल्या एका झाडाला झुला टांगलेला असायचा. त्यावर झोके घेताना समोरच्या आंब्याच्या झाडाच्या फांदीला पायाने धक्का देऊन पुन्हा मागे येत झोके घेण्यात दोघांनाही धमाल यायची. झोके घेताना सुनिल गोड गळ्याने गाणं म्हणायचा... त्या शांत आमराईत त्याचे स्वर मंदिरातल्या घंटेसारखे निनादत.
झुल्यावरचा तो खेळ खेळताना दोघांनाही भलतीच मजा यायची. झोका उंच जाताना त्यात वेगळाच थरारपट त्यांना जाणवत असे. झोके घेताना पोटात भीतीचा गोळा येई पण त्या झुल्यावर उंच झोके घेताना जी काय स्वर्गीय भीती होती तिच्यातला आनंद नुसता सांगून समजण्यासारखा मुळीच नाही.
__मात्र अचानक एके दिवशी हा झोक्यांचा खेळ खेळताना भयंकर प्रकार घडला. झुला झुलत असताना झुल्याची दोरी तुटली आणि क्षणार्धात सुनिल जमिनीच्या दिशेने येऊ लागला. ते पाहून चित्रू भीतीने डोळे बंद करून किंचाळू लागली. तिच्या डोळ्यांतून पाण्याची लोट वाहू लागले.
मात्र तिने जेव्हा डोळे उघडले, तेव्हा सुनिल हसत- हसत तिच्यासमोर उभा राहिला.
तिला कळेचना की , झुल्यातून खाली पडूनसुद्धा हा समोर हसत उभा कसा राहिला. चित्रू त्याच्याकडे विस्मयाने पाहू लागली.
सुनीलच्या हाताला आणि पायांना झाडाच्या फांदीमुळे खरचटलं होतं. तिथून रक्त फुटायला लागलं होतं.
जेव्हा झुल्याची दोरी तुटत असल्याची जाणीव सुनिलला झाली, तेव्हा त्याने चपळाईने समोरच्या झाडाची फांदी धरली आणि जमिनीवर आदळण्यापासून स्वतःचा बचाव केला.
सुनिलला डोळ्यासमोर सुखरूप पाहून चित्रूला इतका आनंद झाला की , तिने त्याला घट्ट मिठी मारली.
काय बोलायचं ते दोघांनाही कळत नव्हतं, पण वाटत होतं की , आपण जसं ह्या क्षणी एकमेकांना घट्ट धरून ठेवले आहे तसंच एकमेकांना आयूष्यभर कायम धरून ठेवावं. कधी म्हणजे कध्धीच एकमेकांपासून वेगळे होऊ देऊ नये.
' सुन्या, पुन्हा ह्या झुल्यावर खेळायचं नाही..!" चित्रू रडवेली झाली .
सुनिलच्या गळ्यात आवंढा अडकला.
" तू कध्धीच मला सोडून जायचं नाही चित्रू..! आपण दोघेही कायम एकत्र राहू..!"
" हो...!"
कापऱ्या स्वरात चित्रूने संमती दिली.
" खरंच्...?" त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले.
" तुझी शप्पथ..!!" डोळे पुसत गळ्याला चिमटा घेत चित्रू हसत- हसत उद्गारली.
___ त्या दिवसानंतर मात्र आमराईतल्या झुल्यावर झोके घेण्याचा दोघांचा खेळ कायमचाच संपला.... त्यांच्या बालपणाच्या सोबतीनेच..!!
__ आणि मग त्यानंतर पुढे दोघांच्याही अजाण विश्वात अबोध प्रेमभावनेचा उदय होऊ लागला.
भूतकाळातल्या आठवणींनी डोळ्यात कुसपट शिरावं तसं चित्रगंधाचं मन एकदम कसकसलं.
आपला हाच भूतकाळ स्वप्नांत उसळी मारून आपल्याला अस्वस्थेतेच्या , बैचैनीच्या घाटावर उभा करत असावा .. हेच कारण त्यामागे असावं असा निष्कर्ष तिने काढला.
आजोळचं गाव कायमचं सुटलं आणि त्यानंतर मात्र चित्रू आणि सुनिलची गाठ पुन्हा पडलीच नाही.
काळाच्या ओघात त्याचं काय झालं हेही चित्रगंधाला समजलं नाही. स्वतःला मोठे करण्याच्या नादात कधी तिने देवदत्तसाहेब तर कधी अनिकेतमध्ये जीव रंगवला आणि प्रसिद्धी, यश, वैभवाशी जन्मभराची सांगड घालून घेतली.
तिच्या चंदेरी दुनियेत सुन्याला अर्थातच स्थान नव्हते. कधीतरी कातरवेळी जुन्या भूतकाळात ती फिरून येई अगदीच नाही असं नाही , अंधुकश्या आठवणी तिच्या डोळ्यासमोर येत ...पण तेवढ्यापुरत्याचं ...अगदी दुरून पाहिल्यासारख्या ..!
आत्ताच्या तिच्या झगमगत्या आयुष्याशी आजोळचा कुणाशी काहीही संबंध नव्हता. ते दळीद्री, विपरीत दिवस आठवण्याची तिला गरजच काय होती..??
मात्र आज अचानक सगळ्या जुन्या स्मृती अशा रितीने मनाचा तळ ढवळून बाहेर का येऊ पाहताहेत..??
आपण नैराश्याच्या दिशेने कूच तर करत नाही आहोत..??
मनात असंख्य प्रश्न ...फक्त प्रश्नच..!!
विचार करावा तसं - तसं ती अधिकच् घायाळ होत गेली.
क्रमशः
_____________ XXX____________
चांगली सुरुवात...
चांगली सुरुवात...
खूप दिवसांनी तुमचे लिखाण आले.
छान... पुभाप्र.
छान...
पुभाप्र.
सुंदर रहस्यमय कथा.
सुंदर रहस्यमय कथा.
खूप छान
खूप छान
सुरूवात छान झालीय.
सुरूवात छान झालीय.
छान सुरुवात.
छान सुरुवात.
धन्यवाद .. धनवन्ती, दिपक,
धन्यवाद .. धनवन्ती, दिपक, किशोरजी, उर्मिला, आबा, रश्मीजी..!!
धनवन्ती..>> हो, थोडा खंड पडला खरा लेखनात.. डोक्यात कथा होत्या पण लिहायचा उत्साह नव्हता.. आता जमेल तसं लिहायचा प्रयत्न करेन..!
मस्त जमलीय. उत्कंठावर्धक!
मस्त जमलीय. उत्कंठावर्धक!
छान रंगत भरतेय...
छान रंगत भरतेय...
धन्यवाद दत्तात्रयजी..!
धन्यवाद दत्तात्रयजी..!