ती काळरात्र - भाग ४
शब्दांकन : तुषार खांबल
समोरचे दृश्य पाहून दोघेही स्तब्ध झाले. जुन्या धाटणीचे गावदेवाचे मंदिर होते. सभोवताली गर्द झाडी. मंदिराचा संपूर्ण परिसर हा चंद्रप्रकाशाने आणि पणत्यांच्या उजेडाने न्हाऊन निघाला होता. एकही विजेचा दिवा त्याठिकाणी नव्हता. वीज फक्त लाऊडस्पिकर आणि माईकसाठी वापरण्यात आली होती. तशी परंपराच होती त्या देवळाची. संपूर्ण गाव त्याठिकाणी जमा झाला होतं. देवळाच्या मागील बाजूस जेवणाची तयारी सुरू होती. फुलांच्या माळांनी देऊळ आणि आतील गाभारा सजविण्यात आला होता. भक्तिगीते तेथील वातावरण मंत्रमुग्ध करीत होतं. एखादा पारंपारीक सोहळा आपण याची देही याची डोळा पाहतोय याचे समाधान रुपेश आणि रेवतीच्या चेहऱ्यावर दिसत होते. हर्षलने आणि त्याचे मित्र रुपेश आणि रेवतीची उत्तमरित्या सरबराई करत होते. थोड्या वेळाने महाप्रसादाची सुरवात झाली. सर्वजण मंदिरात जाऊन दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत होते.
रुपेश आणि रेवतीने देखील दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेतला. एव्हाना रात्रीचे १०:३० वाजले होते. गावातील प्रसिद्ध भजनांचा डबलबारीचा सामना ठेवण्यात आला होता. सर्व कार्यक्रम संपेपर्यंत पहाटेचे ४:०० वाजले. हर्षल नंतर दोघांना हॉटेलवर नेऊन सोडले आणि तो आपल्या घरी आला. आज दोघेही आराम करणार होते. त्यानंतर संध्याकाळी बाहेर जाण्याचा प्लान त्यांनी हर्षलला सांगितला. त्यानुसार संध्याकाळी ४:०० वाजता हर्षल त्यांना नेण्यासाठी येणार होता.
रात्रभराच्या जागरणामुळे दोघेही थकले होते. गरम पाण्याने अंघोळ करून दोघेही बेडवर आडवे झाले. दोघांनाही झोप अनावर झाली होती. परंतु डोळ्यासमोरून ते गावदेवाचे मंदिर काही केल्या जात नव्हते. एक अनामिक ओढ त्या दोघांना त्या देवळाकडे आकर्षित करीत होती. जणू काही त्या देवळात त्यांचा सर्व समस्यांची उत्तरे दडली असावीत असा भास सतत त्या दोघांना होत होता. कसेबसे त्यांनी तो विचार बाजूला ठेऊन झोपी गेले. रेवतीला जाग आली ती हर्षलच्या कॉलने. तिने घड्याळाकडे पाहिलं. ४:३० वाजले होते. लगेच तिने रुपेशला उठवले. २० मिनिटांमध्ये बाहेर येतो असा मेसेज तिने हर्षलला दिला. दोघांनीही पटापट आवरले. जागरणाची सवय नसल्याने दोघांचेही डोकं जड झाले होते. बाहेर आल्यावर गरमागरम चहा प्यायल्यानंतर त्यांना थोडं बरं वाटलं. इतक्यात हर्षलने आज कुठेकुठे जायचं याची माहिती देण्यास सुरुवात केली. त्याला मधेच अडवून रुपेशने आपल्याला पुन्हा त्या देवळात जायचं आहे असं त्याला सांगितलं.
हर्षलने एकदा दोघांकडे नीट निरखून पाहिलं. त्यांचा चेहऱ्यावरील हावभाव पाहून हर्षलला काहीसं वेगळं जाणवलं. ते देवस्थान खूप जागृत होत. तिथे अनेकांच्या समस्यांचं निवारण झालं होत. यांचीदेखील काहीतरी समस्या असणार याची हर्षलला शंका आली. त्याने लगेच रुपेशला विचारलं "सर तुम्ही कोणत्या प्रश्नाचे उत्तर शोधात आहात का?" यावर दोघांनीही होकारार्थी मान हलविली.
जन्मापासूनच गावात वाढला असल्याने हर्षलला अश्या परिस्थितीची संपूर्ण कल्पना होती. त्यामळे त्याने आता तिकडे न जात रात्री ८:०० नंतर जाण्याचे दोघांना सांगितले. तो स्वतः त्यांना तिथे घेऊन जाईल असे देखील त्याने कबूल केले. याचे कारण विचारले असता संध्याकाळी आरती झाल्यानंतर त्याठिकाणी असणाऱ्या पुजाऱ्याकडून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची अचूक उत्तरे मिळू शकतील असे त्याने सांगितले. आता त्यादोघांना फक्त ते देऊळ डोळ्यासमोर दिसत होते. इतर कुठेही फिरण्याची त्यांची इच्छा होत नव्हती. हर्षलने त्यांना आपल्या घरी जेवायला येण्याची विनंती केली. त्यामुळे त्यांना लवकरात लवकर देवळात पोहचता येणार होते. त्यांना देखील ते योग्य वाटत असले तरी आता त्यांची कोणतीही इच्छा नव्हती. त्यामुळे घरी येण्यास ते तयार झाले परंतु त्यांनी जेवण्यासाठी नकार दिला. सर्व ठरल्यावर ते तिघे गाडीत बसले. गाडी हर्षलच्या घराच्या दिशेने निघाली.
घरी पोहचल्यावर हर्षलने त्याच्या मित्राला नितीनला कॉल केला. त्याने त्याला पूजेसाठी लागणारे साहित्य घेऊन ८:०० वाजता देवळाच्या रस्त्यापाशी येण्यास सांगितले. इकडे हर्षलच्या आईने त्यांना चहा आणि घावणे खाण्यास दिले. सकाळपासून काही खाल्ले नसल्याने रुपेश आणि रेवतीला काहीशी मरगळ आली होती. थोडे अन्न पोटात गेल्यानंतर थोडीशी तरतरी जाणवली. ७:३० वाजता ते तिघे देवळात जाण्यास निघाले. कालप्रमाणेच त्यांना आजदेखील पायी प्रवास करायचा होता.
टेकडीच्या मध्यावर गाडी उभी करून ते तिघे बाहेर आले. नितीन देखील तिथे पोहचला होता. आता चौघांनी त्या रानातून चालायला सुरुवात केली. कालचीच वाट, तितकाच उजेड आज मात्र रुपेश आणि रेवतीला भयाण आणि लांब वाटत होती. हळूहळू करीत ते देवळापाशी पोहचले. चंद्राचा प्रकाश जरी असला तरी ते मंदिर आज भकास वाटत होते. मंदिरावरील फुलांच्या माळा सुकल्या होत्या. परिसरात सर्वत्र पालापाचोळा पडला होता. गाभाऱ्यात एक पिवळसर प्रकाश देणारा मंद उजेडाचा बल्ब पेटत होता. देवाच्या मूर्तीच्या बाजूला भल्यामोठ्या समया तेवत होत्या. नुकतीच आरती संपली असल्याने धूप-कापराचा सुगंध त्या वातावरणात जाणवत होता. चौघांनी देवळात प्रवेश केला. रुपेश आणि रेवतीने नीट निरखून सर्वत्र पहिले. कालचे मन प्रसन्न करणारे देऊळ आज खूप उदास भासत होते. नंतर त्यांनी समोरील मूर्तीला नमस्कार केला. त्याक्षणी ती काळ्या पाषाणातील मूर्ती सजीव असल्याचा भास त्यांना झाला. दोघांनी दचकून एकमेकांकडे पहिले. इतक्यात पुजारी बाहेर आले. रुपेश आणि रेवतीकडे पाहून त्यांनी स्मितहास्य केले. हर्षलने पूजेचे साहित्य पुजाऱ्यांकडे सुपूर्द केले आणि त्यांची माहिती देण्यासाठी पुढे झाला. यावर पुजाऱ्यांनी हातानेच त्याला थांबण्याचा इशारा केला आणि बोलण्यास सुरुवात केली.
"रुपेश आणि रेवती किर्तीकर." आपले नाव यांना कसे माहित हे भाव आता दोघांच्या चेहऱ्यावर दिसत होते. पुजाऱ्यांनी पुन्हा पुढे बोलण्यास सुरुवात केली. "पुण्यातील नामांकित बांधकाम व्यायसायिक.पुण्याहून कोकण फिरण्यास आले आहेत. ते फिरायला आलेत असं त्यांना वाटतंय. परंतु सत्य मात्र वेगळेच आहे. काय ते मी तुम्हाला सांगेन. तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे येथे मिळतील. तुमची जी इतक्या वर्षापासूनची इच्छा आहे ती देखील पूर्ण होईल. त्यासाठी जे काही करावे लागेल ते करण्याची तयारी असेल तर तुम्ही थांबा अन्यथा गेलात तरी चालेल."
रुपेश आणि रेवतीला हे सर्व अनाकलनीय होत. परंतु संतती प्राप्तीसाठी काहीही करण्याची त्यांची तयारी होती. जास्तीतजास्त काय तर उपास / होम / अभिषेक इत्यादी पैकी काहीतरी करावे लागेल असे त्यांना वाटले. त्यामुळे त्यांनी मागच्यापुढचा विचार न करता होकारार्थी मान हलवली. पुजाऱ्याने त्यांना पुन्हा एकदा विचार करण्यास सांगितले. आणि जर का एकदा या शेवटचा होकार दिला तर पुन्हा माघारी फिरता येणार नाही याची कल्पना दिली. रुपेशने रेवतीकडे पहिले. तिच्या मनातील मातृत्व आता तिच्या नजरेत त्याला स्पष्ट जाणवत होते. त्याने पुजाऱ्यांना दोघांची संमती कळविली. यावर पुजाऱ्याने दोघांना गाभार्याच्या आत देवाच्या मूर्तीसमोर बसण्यास सांगितले. पुढे काय असेल याची आता दोघांनाही उत्सुकता लागून राहिली होती.
उत्कंठा वाढली आहे. लवकर पुढचा
उत्कंठा वाढली आहे. लवकर पुढचा भाग टाका प्लीज.
कथेने वेग पकडला आहे.
कथेने वेग पकडला आहे. उत्सुकता वाढली आहे.
धन्यवाद RMD धन्यवाद केशवकुल
धन्यवाद RMD
धन्यवाद केशवकुल
आता उत्सुकता वाढली!
आता उत्सुकता वाढली!
धन्यवाद आबा
धन्यवाद आबा
आता उत्सुकता वाढली!+१
आता उत्सुकता वाढली!+१
धन्यवाद वावे
धन्यवाद वावे