गोंधळ ...एक कुळाचार
प्रत्येक कुटुंबाचे कुळाचार ठरलेले असतात. लग्न मुंज किंवा कोणत्याही शुभकार्यानंतर सत्यनारायणाची पूजा केली तरी जनरली कोकणस्थ ब्राह्मण समाजात बोडण हा कुलाचार ही प्रत्येक शुभकार्यानंतर केला जातो. आम्ही कोकणस्थ असून ही आमच्याकडे मात्र बोडण न भरता जनरली देशस्थ किंवा मराठा समाजात घातला जाणारा गोंधळ हा विधी केला जातो. आमच्या किमान साताठ पिढया तरी इथे तळकोकणात वास्तव्यास आहेत. तरी ही आमच्या घरी हा देशावर केला जाणारा कुलाचार कसा हे मला नेहमीच विचारात पाडतं. तसेच पूर्वीच्या काळी दळण वळणाची, प्रवासाची साधनं फारच मर्यादित असताना देशावरून गोंधळी आणणं वैगेरे कसं जमवत असतील ह्याची कल्पनाच केलेली बरी.
गोंधळ घालण्यासाठी लागणारे गोंधळी कोकणात मिळत नाहीत. ते सांगली / कोल्हापूर इकडून पाचारण करावे लागतात. तसेच हा विधी तसा खूप मोठा आहे. मुंबई , पुणे किंवा परदेशात राहाणाऱ्यांचे गोंधळ ही कोकणातल्या आमच्या मूळ घरातच घातले जात असल्यामुळे जनरली चार पाच गोंधळ तरी एका वेळेस घातले जातातच. एकदा मात्र घालू घालू म्हणून राहून गेल्यामूळे एका वेळेस सतरा गोंधळ घातले गेले होते. त्या ऐतिहासिक गोंधळांची आठवण म्हणजे खळं कसं भरून गेलं होतं वगैरे आता प्रत्येक गोंधळाच्या वेळी निघतेच.
ज्यांचा गोंधळ घालायचा आहे अश्या जोडप्यांच्या आणि मुंज मुलांच्या सोयीने एखादा दिवस नक्की केला जातो. अर्थात कोणाला त्यातून ही जमले नाही तर तडजोड म्हणून दुसऱ्या कोणी तरी पूजा केलेली ही चालते. शहरात देवीच्या देवळात जो गोंधळ घातला जातो तो पंधरा मिनटात आटोपतो पण आमच्याकडे गोंधळ चांगला सात आठ तास चालतो. तसेच गोंधळाला म्हणून मुंबईची भरपूर पाव्हणे मंडळी ही घरी येतात . त्यामुळे एखादं कार्यच वाटत गोंधळ म्हणजे.
गोंधळाची पूजा आमच्या खळ्यातच संपन्न होते. पूजेची तयारी, खळ्याची सजावट आणि रोषणाई , बैठक व्यवस्था वगैरे दिवसभर चालू असतंच पण संध्याकाळी सांगली / कोल्हापूरहुन गोंधळी टीम ( एक मुख्य गोंधळी आणि बाकी तीन चार त्यांचे साथीदार ) घरी आली की खरा माहोल बनायला सुरवात होते. त्या दिवशी घरच्या माणसांसाठी जेवणाचा बेत साधाच असतो. फक्त नेवैद्याची पानं मात्र साग्रसंगीत सोवळ्यात वाढली जातात.
संध्याकाळी घरातले सगळेजण नवीन कपडे घालून, नटून थटून तयार होतात. मग जोगवा मागायला संबळ तुणतुण्याच्या गजरात मंडळी शेजारच्या पाच घरी जातात. तिथे आदराने आणि भक्तिभावाने जोगवा घातला जातो . हे जोगव्याचे तांदूळ म्हणजे एक प्रकारचा प्रसादच वाटतो देवीचा म्हणून दुसऱ्या दिवशी त्याचा आवर्जून भात ही केला जातो.
कवड्यांच्या माळा, संबळ, तुणतुण, पलिता, त्यावर तेल घालण्यासाठी घालण्यासाठी एक तेली ( जनरली घरातल्याच एखाद्या मुलाला काजळीच्या मोठ्या मोठ्या मिश्या वैगरे काढून गोंधळीच तयार करतात हा तेली ) आणि मुख्य गोंधळी व त्यांचे तीन चार साथीदार या शिवाय आपलं नेहमीच पुजेचं साहित्य लागतं गोंधळाला. गोंधळ म्हणजे साधारण आपण कलशाची पूजा करतो तशीच असते. कोकणात वईला दिंड नावाची झुडपं लावलेली असतात. तिची पानं चवीला कडू असतात म्हणून गुरं ही त्यांना तोंड लावत नाहीत. तर ह्या झुडपाच्या फक्त वरची पानं ठेवलेल्या बारीक फांद्यांचा मांडव घालतात पूजेच्या पाटावर. ते नाही मिळालं तर ऊसाचा ही चालतो. पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश, पाच फळं, सुपाऱ्या, वस्त्र, निरांजन समई, उदबत्त्या अश्या साहित्याने यजमान देवीची पूजा करतात. ती करताना देवीचा जागर सुरू असतोच. संबळ, तुणतुणे ही वाजत असतातच. “उदे ग अंबे उदे," “कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आई, गोंधळाला या” अश्या गजरात देवीला आवताण दिलं जातं. पूजा झाली की तिथे हजर असलेली अन्य मंडळी ही दर्शन घेतात. मनोभावे नमस्कार करतात, कोणी देवीची ओटी वगैरे ही भरतात. इथे पूजा विधी संपतो.
( फोटो , व्हिडीओ खूप आहेत पण त्यात घरची माणसं असल्याने दाखवू शकत नाहीये. वर दिलेला फोटो ही क्रॉपच केलेला आहे.)
कोकणात आमच्याकडे अगदी लहानशी पूजा असली किंवा आम्ही देवळात जरी दर्शनाला गेलो तरी प्रत्येक वेळी “बा देवा म्हाराजा” अशी सुरवात करून कोकणातलं टिपिकल गाऱ्हाणं यजमानाच्या सुख शांती साठी घातलं जातंच पण गोंधळ हा देशावरचा विधी असल्याने गाऱ्हाणं घातलं जात नाही जे मी फार मिस करते. नमस्कार करताना मग मनातल्या मनातच मीच स्वतः गाऱ्हाणं घालते आणि मनाचं समाधान करून घेते.
त्या नंतर गोंधळाच्या खेळाला सुरवात होते. घरातली सगळी पुरुष मंडळी पूजेच्या भोवती फेर धरतात. गोंधळी देवीची गाणी म्हणत असतात. डफ ,संबळ , तुणतूण्याची जोडीला साथ असतेच. गोंधळी खेळाच्या म्हणजे फेर धरताना करायच्या एकेक स्टेप सांगत असतात, त्या कोणाला जमतात कोणाला नाही. त्यामुळे कधी कधी मजा मजा निर्माण होऊन हास्याची कारंजी फुटतात. नंतर बायकांचा ही फेर होतो , भजनं होतात. देवीचा जागर सुरूच असतो.
गोंधळ ही एक लोककला ही आहे. गोंधळाच्या माध्यमातून ज्ञान,मनोरंजन, प्रबोधन, थोडासा विनोद, संगीत, भक्ती हे सगळंच साध्य होतं. जागर झाला की गोंधळी एखाद आख्यान / कथा लावतात. विनोदाची पेरणी करत पुराणातली कथा सांगत थोडं प्रबोधन सुद्धा करतात. अश्या तऱ्हेने संध्याकाळी पाच सहा ला सुरू झालेला कार्यक्रम रात्री बाराच्या सुमारास संपतो. कार्यक्रम झाला की आलेल्या सगळ्या मंडळींना लाडू आणि चहा दिला जातो अल्पोपहार म्हणून. गोंधळी टीमला ही मानधन दिले जाते.
पूर्वी आमच्याकडे गोंधळाला गावातली इतकी लोकं येत असत की खळ्यात बसायला जागा नसे. आम्ही घरची माणसं तर ओटीवर बसूनच पहात असू सगळा कार्यक्रम. आता काळ बदलला आहे. टिव्ही च्या प्रभावामुळे अश्या तऱ्हेच्या मनोरंजनाकडे लोकांनी जणू पाठच फिरवली आहे. तसेच शेवटी मिळणाऱ्या लाडू आणि चहाचं अप्रूप ही कोणाला वाटेनासं झालं आहे. त्यामुळे हल्ली गोंधळाला फक्त घरची आणि फार फार तर शेजार घरची माणसंच हजर असतात. खळं निम्मं ही भरत नाही. ते रिकामं खळं बघताना निश्चितच वाटत वाईट पण शेवट बदल हाच स्थायीभाव आहे ह्या विचाराने मनाची समजूत घातली जाते.
किती गोंधळ घातलाय या धाग्यावर
किती गोंधळ घातलाय या धाग्यावर! मस्तच लेख (हे वेगळे सांगणे न लगे)
आमच्याकडे खंडोबा नाहीये दैवत तरी गोंधळ आहे >>> तरीच. समस्त कोकणस्थांचे कुलदैवत व्याडेश्वर असते ना? आणखी एक प्रश्न म्हणजे, कोकणात राहणार्यांची कुलदेवी बीडला एवढ्या दूर कशी? का काही कारणामुळे देवीचे स्थलांतर झाले होते?
आणखी एक मला पडणारा प्रश्न - देशस्थांकडे उभ्या महालक्ष्म्या असतात, कोकणास्थांच्यात खड्याच्या गौरी. कर्हाड्यांच्यात बहुतेकांकडे गौरी नसतात आणि 'वाघाने पळवल्या' असं कारण सांगितलं जातं. त्या मागची कारणमिमांसा माहीत आहे का?
काही कऱ्हाड्यांच्यात गौरी
काही कऱ्हाड्यांच्यात गौरी असतात, खड्याच्या. काहींच्यात नसतात, त्या "वाघाने पळवल्या " म्हणतात.
नेहमी प्रमाणे मस्त.
नेहमी प्रमाणे मस्त.
मी माहेरची कोकणस्थ. त्यामुळे बोडण माहिती होतं. गोंधळ फक्त सिनेमात पाहिलेला. मग मुद्दाम ओळखीच्या एका घरी लग्नाचा गोंधळ बघायला गेलं होते.
समस्त कोकणस्थांचे कुलदैवत व्याडेश्वर असते ना? >>> आंबेजोगाई
माधव धन्यवाद.
माधव नताशा, प्रज्ञा धन्यवाद.
समस्त कोकणस्थांचे कुलदैवत व्याडेश्वर असते ना? >> कुलदैवत वेगवेगळे असते (आमचं कुलदैवत वेळणेश्वर आहे. त्यावरूनच आमचं हे आडनाव पडलं असेल असा माझा कयास आहे. ) पण कुलदेवी ( योगेश्वरीदेवी , अंबाजोगाई ) एकच आहे सगळ्या कोब्रांची
काही कारणामुळे देवीचे स्थलांतर झाले होते? >> देवीच्या वडिलांनी म्हणजे परशुरामानी तिच्या साठी निवडलेला वर म्हणे तिला पसंत नव्हता म्हणून ती लांब अंबाजोगाईला गेली अस वाचल्यासारखं आठवतंय.
पण एवढया लांब असल्याने आमच्या मागच्या कित्येक पिढ्या कुलदेवतेच्या दर्शनाला जाऊ शकल्या नाहीयेत. कोकणातून मराठवाड्यात जायला साधनं कुठे होती तेव्हा आणि पैसे तरी कुठे होते? एवढंच काय वेळणेशवर ला ही कोणी जाऊ शकलं नाही. घरातूनच नमस्कार.
कुलदेवतेच्या दर्शनाला हल्लीच लोकं फार जायला लागली आहेत. धार्मिक पर्यटनच हे.
काही कऱ्हाड्यांच्यात गौरी असतात, खड्याच्या. काहींच्यात नसतात, त्या "वाघाने पळवल्या " म्हणतात. >> बरोबर प्रज्ञा. कोब्रां मध्ये खड्याच्या असतात त्यामागे ही त्यांची बिकट आर्थिक परिस्थिती आणि खडतर भौगोलिक रचना हे असावे. जास्त डाम डौल करणे अशक्य असावे त्याना.
कुलदेवी ही वेगळी असावी. आमची
कुलदेवी ही वेगळी असावी. आमची कोल्हापूरची अंबाबाई आहे.
माझ्या माहेरी एकच गौरी आहे.
माझ्या माहेरी एकच गौरी आहे. एक वाघाने पळवली.
कुलदेवी ही वेगळी असावी. आमची
कुलदेवी ही वेगळी असावी. आमची कोल्हापूरची अंबाबाई आहे >> तुमची अंबाबाई आहे होय ? अमितव मग असेल असेल वेगवेगळी कुलदेवी ही.
माहितीपूर्ण लेख आवडला
माहितीपूर्ण लेख आवडला
आंबेजोगाईच्या गुरुजींनी
आंबेजोगाईच्या गुरुजींनी आम्हाला सांगितलं की ती देवी मुळ राजापूरजवळच्या आडीवरे येथील, ती मराठवाड्यात आली.
ती आंबेजोगाईला गेल्यावर तिचं लग्न वैजनाथशी ठरवलं, तिला वयस्क नवरा पसंत नव्हता. त्यामुळे तिने अट घातली की कोंबडा आरवायच्या आत लग्न व्हायला हवं, नाहीतर मी करणार नाही, ती मुद्दाम वेळ घालवत राहिली. वऱ्हाड परळीपर्यंत आलं आणि कोंबडा आरवला. त्यामुळे ते वैजनाथ पुढे येऊ शकले नाहीत. ते तिथेच राहिले आणि देवीच्या मनासारखं झालं. अशी कथा मी ऐकली.
माहेरची कुलदेवी आंबेजोगाई आहे, सासरची कोणी म्हणतात सोमेश्वरची बंदीजाई, कोणी म्हणतात ढोकमळे येथील बंदीजाई त्यामुळे काही नीट समजत नाही. मी आपली देव्हाऱ्यात दोघींचा फोटो ठेवलाय आणि माहेरच्या देवीचाही. सगळ्यांनी आशीर्वाद द्या म्हणते. कुलदेव सोमेश्वर आहे आणि माहेरचा कोळेश्वर.
आमची फक्त कुलदेवीच आहे. आम्ही
आमची फक्त कुलदेवीच आहे. आम्ही कुलस्वामिनी म्हणतो. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या 'पार' गावाची रामवरदायिनी देवी.
आम्हीही कुलस्वामिनीच म्हणतो,
आम्हीही कुलस्वामिनीच म्हणतो, इथे लिहिताना कुलदेवी लिहिलं. कुलदेवालाही कुलस्वामी म्हणतो.
सर्वांना थॅंक्यु पुन्हा एकदा.
सर्वांना थॅंक्यु पुन्हा एकदा. चांगली माहिती मिळतेय इथे.
अंजू , ही गोष्ट ही ऐकलीय मी. सगळ्यांनी आशीर्वाद द्या म्हणते. >+111
वावे, अंजू, आम्ही ही म्हणतो कुलस्वामी आणि कुलस्वामिनीच
लेख मस्त जमला आहे. तुमचे लेख
लेख मस्त जमला आहे. तुमचे लेख म्हणजे पुढच्या पिढीसाठी खजिना ठरणार आहे.
मी माहेरून देशस्थ आणि सासरहून कोकणस्थ!
माहेरी गावाकडच्या घरी नवरात्रात साग्रसंगीत सगळं होतं. गोंधळ, पालखी, घागर फुंकणे इत्यादी. आई बाबांच्या घरी फक्त कार्याचा गोंधळ असतो पण मला आवडतो म्हणून आम्ही वार्षिक घालतो.पण खुप मिनीमल. गोंधळी येऊन तासभर गोंधळाची गाणी म्हणून, संबळ वाजवून, घरातल्या सगळ्यांना दिवट्या नाचवायला देतात. घरी पुरणाचा नैवेद्य होतो. मित्रमंडळी, आप्त यांच्यात तो पोहचवला जातो. त्या दिवशी घरात येणाऱ्या कोणत्याही गरीब स्त्रीला आम्ही जेवायला वाढतो.
सासरी वार्षिक बोडण असतं. अन्नाची नासाडी हा माझा मोठा मुद्दा होता त्यामुळे सासूबाईंनी सांगितलं मुलाची मुंज होईपर्यंत व्यवस्थतीत बोडण करूया (म्हणजे आमचं आम्ही करतो असं म्हणाल्या त्या) नंतर कुलस्वामिनी दुर्गादेवीला 50000 ची देणगी देऊन टाका वार्षिक बोडणाची पावती फाडली म्हणून. वर्षातून एकदा ते आपल्या नावाने करतील बोडण देवी आहे तिथे तोपर्यंत.
पण माझं देवीवर विशेष प्रेम असल्याने मला देवीशी रिलेटेड पारंपारिक गोष्टी बंद कराव्या वाटत नाहीत त्यामुळे या दोन गोष्टी दोन्ही आई बाबांकडे होत आहेत त्या दिवशी आम्ही त्यांच्याकडे जाऊन त्याचा आनंद घेऊ पण त्यांच्याकडे बंद झाल्या तर आमच्याकडे सुरू करू अशी माझी इच्छा आहे. बघूया जमेल तसं.
यात मी नावापुरतं पुरण (गोंधळाच्या दिवशी) , वाटीभर पंचामृताने देवीचा अभिषेक असा बदल करून जमेल तेवढी डाळ, गूळ / दूध, तूप, दही, मध, साखर दान करेन .बाकी सगळं मनापासून करेन.
कुणीतरी बोडण यावरही लिहा ना
कुणीतरी बोडण यावरही लिहा ना असा लेख.
इथली मंडळी मग अन्न वाया जाऊ नये म्हणून काही उपाय पण सुचवतील.
रिया थॅंक्यु , किती सुंदर
रिया थॅंक्यु , किती सुंदर लिहिलं आहेस.
खरंच लिहा कोणीतरी बोडणाबद्दल ही .
आमची फक्त कुलदेवीच आहे. आम्ही
आमची फक्त कुलदेवीच आहे. आम्ही कुलस्वामिनी म्हणतो. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या 'पार' गावाची रामवरदायिनी देवी.>>> तुम्हाला विपू केलं आहे ..प्लीज बघा
मी पुर्वीच्या पध्दतीने नाही
मी पुर्वीच्या पध्दतीने नाही करत बोडण.दही दूध साखर लोणी मध छोटे छोटे आणून माझी व आजूबाजूला काम करणार्या ५ मदतनिसांना देते, बरोबर दोन दोन पुरणपोल्या .
Pages