गोंधळ ...एक कुळाचार

Submitted by मनीमोहोर on 17 November, 2022 - 04:01
 Devicha Gondhal , jagran,

गोंधळ ...एक कुळाचार

प्रत्येक कुटुंबाचे कुळाचार ठरलेले असतात. लग्न मुंज किंवा कोणत्याही शुभकार्यानंतर सत्यनारायणाची पूजा केली तरी जनरली कोकणस्थ ब्राह्मण समाजात बोडण हा कुलाचार ही प्रत्येक शुभकार्यानंतर केला जातो. आम्ही कोकणस्थ असून ही आमच्याकडे मात्र बोडण न भरता जनरली देशस्थ किंवा मराठा समाजात घातला जाणारा गोंधळ हा विधी केला जातो. आमच्या किमान साताठ पिढया तरी इथे तळकोकणात वास्तव्यास आहेत. तरी ही आमच्या घरी हा देशावर केला जाणारा कुलाचार कसा हे मला नेहमीच विचारात पाडतं. तसेच पूर्वीच्या काळी दळण वळणाची, प्रवासाची साधनं फारच मर्यादित असताना देशावरून गोंधळी आणणं वैगेरे कसं जमवत असतील ह्याची कल्पनाच केलेली बरी.

गोंधळ घालण्यासाठी लागणारे गोंधळी कोकणात मिळत नाहीत. ते सांगली / कोल्हापूर इकडून पाचारण करावे लागतात. तसेच हा विधी तसा खूप मोठा आहे. मुंबई , पुणे किंवा परदेशात राहाणाऱ्यांचे गोंधळ ही कोकणातल्या आमच्या मूळ घरातच घातले जात असल्यामुळे जनरली चार पाच गोंधळ तरी एका वेळेस घातले जातातच. एकदा मात्र घालू घालू म्हणून राहून गेल्यामूळे एका वेळेस सतरा गोंधळ घातले गेले होते. त्या ऐतिहासिक गोंधळांची आठवण म्हणजे खळं कसं भरून गेलं होतं वगैरे आता प्रत्येक गोंधळाच्या वेळी निघतेच.

ज्यांचा गोंधळ घालायचा आहे अश्या जोडप्यांच्या आणि मुंज मुलांच्या सोयीने एखादा दिवस नक्की केला जातो. अर्थात कोणाला त्यातून ही जमले नाही तर तडजोड म्हणून दुसऱ्या कोणी तरी पूजा केलेली ही चालते. शहरात देवीच्या देवळात जो गोंधळ घातला जातो तो पंधरा मिनटात आटोपतो पण आमच्याकडे गोंधळ चांगला सात आठ तास चालतो. तसेच गोंधळाला म्हणून मुंबईची भरपूर पाव्हणे मंडळी ही घरी येतात . त्यामुळे एखादं कार्यच वाटत गोंधळ म्हणजे.

गोंधळाची पूजा आमच्या खळ्यातच संपन्न होते. पूजेची तयारी, खळ्याची सजावट आणि रोषणाई , बैठक व्यवस्था वगैरे दिवसभर चालू असतंच पण संध्याकाळी सांगली / कोल्हापूरहुन गोंधळी टीम ( एक मुख्य गोंधळी आणि बाकी तीन चार त्यांचे साथीदार ) घरी आली की खरा माहोल बनायला सुरवात होते. त्या दिवशी घरच्या माणसांसाठी जेवणाचा बेत साधाच असतो. फक्त नेवैद्याची पानं मात्र साग्रसंगीत सोवळ्यात वाढली जातात.

संध्याकाळी घरातले सगळेजण नवीन कपडे घालून, नटून थटून तयार होतात. मग जोगवा मागायला संबळ तुणतुण्याच्या गजरात मंडळी शेजारच्या पाच घरी जातात. तिथे आदराने आणि भक्तिभावाने जोगवा घातला जातो . हे जोगव्याचे तांदूळ म्हणजे एक प्रकारचा प्रसादच वाटतो देवीचा म्हणून दुसऱ्या दिवशी त्याचा आवर्जून भात ही केला जातो.

कवड्यांच्या माळा, संबळ, तुणतुण, पलिता, त्यावर तेल घालण्यासाठी घालण्यासाठी एक तेली ( जनरली घरातल्याच एखाद्या मुलाला काजळीच्या मोठ्या मोठ्या मिश्या वैगरे काढून गोंधळीच तयार करतात हा तेली ) आणि मुख्य गोंधळी व त्यांचे तीन चार साथीदार या शिवाय आपलं नेहमीच पुजेचं साहित्य लागतं गोंधळाला. गोंधळ म्हणजे साधारण आपण कलशाची पूजा करतो तशीच असते. कोकणात वईला दिंड नावाची झुडपं लावलेली असतात. तिची पानं चवीला कडू असतात म्हणून गुरं ही त्यांना तोंड लावत नाहीत. तर ह्या झुडपाच्या फक्त वरची पानं ठेवलेल्या बारीक फांद्यांचा मांडव घालतात पूजेच्या पाटावर. ते नाही मिळालं तर ऊसाचा ही चालतो. पाटावर तांदूळ पसरून त्यावर कलश, पाच फळं, सुपाऱ्या, वस्त्र, निरांजन समई, उदबत्त्या अश्या साहित्याने यजमान देवीची पूजा करतात. ती करताना देवीचा जागर सुरू असतोच. संबळ, तुणतुणे ही वाजत असतातच. “उदे ग अंबे उदे," “कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची भवानी आई, गोंधळाला या” अश्या गजरात देवीला आवताण दिलं जातं. पूजा झाली की तिथे हजर असलेली अन्य मंडळी ही दर्शन घेतात. मनोभावे नमस्कार करतात, कोणी देवीची ओटी वगैरे ही भरतात. इथे पूजा विधी संपतो.

IMG-20221029-WA0011~3.jpg

( फोटो , व्हिडीओ खूप आहेत पण त्यात घरची माणसं असल्याने दाखवू शकत नाहीये. वर दिलेला फोटो ही क्रॉपच केलेला आहे.)

कोकणात आमच्याकडे अगदी लहानशी पूजा असली किंवा आम्ही देवळात जरी दर्शनाला गेलो तरी प्रत्येक वेळी “बा देवा म्हाराजा” अशी सुरवात करून कोकणातलं टिपिकल गाऱ्हाणं यजमानाच्या सुख शांती साठी घातलं जातंच पण गोंधळ हा देशावरचा विधी असल्याने गाऱ्हाणं घातलं जात नाही जे मी फार मिस करते. नमस्कार करताना मग मनातल्या मनातच मीच स्वतः गाऱ्हाणं घालते आणि मनाचं समाधान करून घेते.

त्या नंतर गोंधळाच्या खेळाला सुरवात होते. घरातली सगळी पुरुष मंडळी पूजेच्या भोवती फेर धरतात. गोंधळी देवीची गाणी म्हणत असतात. डफ ,संबळ , तुणतूण्याची जोडीला साथ असतेच. गोंधळी खेळाच्या म्हणजे फेर धरताना करायच्या एकेक स्टेप सांगत असतात, त्या कोणाला जमतात कोणाला नाही. त्यामुळे कधी कधी मजा मजा निर्माण होऊन हास्याची कारंजी फुटतात. नंतर बायकांचा ही फेर होतो , भजनं होतात. देवीचा जागर सुरूच असतो.

गोंधळ ही एक लोककला ही आहे. गोंधळाच्या माध्यमातून ज्ञान,मनोरंजन, प्रबोधन, थोडासा विनोद, संगीत, भक्ती हे सगळंच साध्य होतं. जागर झाला की गोंधळी एखाद आख्यान / कथा लावतात. विनोदाची पेरणी करत पुराणातली कथा सांगत थोडं प्रबोधन सुद्धा करतात. अश्या तऱ्हेने संध्याकाळी पाच सहा ला सुरू झालेला कार्यक्रम रात्री बाराच्या सुमारास संपतो. कार्यक्रम झाला की आलेल्या सगळ्या मंडळींना लाडू आणि चहा दिला जातो अल्पोपहार म्हणून. गोंधळी टीमला ही मानधन दिले जाते.

पूर्वी आमच्याकडे गोंधळाला गावातली इतकी लोकं येत असत की खळ्यात बसायला जागा नसे. आम्ही घरची माणसं तर ओटीवर बसूनच पहात असू सगळा कार्यक्रम. आता काळ बदलला आहे. टिव्ही च्या प्रभावामुळे अश्या तऱ्हेच्या मनोरंजनाकडे लोकांनी जणू पाठच फिरवली आहे. तसेच शेवटी मिळणाऱ्या लाडू आणि चहाचं अप्रूप ही कोणाला वाटेनासं झालं आहे. त्यामुळे हल्ली गोंधळाला फक्त घरची आणि फार फार तर शेजार घरची माणसंच हजर असतात. खळं निम्मं ही भरत नाही. ते रिकामं खळं बघताना निश्चितच वाटत वाईट पण शेवट बदल हाच स्थायीभाव आहे ह्या विचाराने मनाची समजूत घातली जाते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोंधळ ही एक लोककला ही आहे. गोंधळाच्या माध्यमातून ज्ञान,मनोरंजन, प्रबोधन, थोडासा विनोद, संगीत, भक्ती हे सगळंच साध्य होतं. जागर झाला की गोंधळी एखाद आख्यान / कथा लावतात . विनोदाची पेरणी करत पुराणातली कथा सांगत थोडं प्रबोधन ही करतात.>>>>> नणंदेकडे गोंधळ घातला होता मुलाच्या लग्नानंतर त्यात हे सगळे प्रकार होते. दिवट्या असतो ना ... जो दिवलीत तेल घालत असतो.. एखाद्या लहान मुलाला बसवतात ...बरीच वर्षे झाली अंधुकसं आठवतंय.... आजीकडची देवी कोल्हापूरची महालक्ष्मी तिच्याकडे होता हा कुळाचार. आमच्याकडे बोडण फक्त.
छान लिहलंय हेवेसांन ..

आमच्या घरी हा देशावर केला जाणारा हा कुलाचार कसा हे मला नेहमीच विचारात पाडतं. >> सेम मला पण. माहेरी गोंधळ कसा ? पण आईने एकदा सांगितलेले की ज्यांचे कुलदैवत खंडोबा असतो त्यांच्या घरी प्रामुख्याने बोडण न करता गोंधळ असतो म्हणे. पुसटसे आठवतेय.

सासरीही गोंधळ आहेच, खुप मजा येते, घरचे सगळे नाचतात. देव नाचवतात. अबाल वृद्ध अगदी एक होऊन जातात.

मी सुद्धा कन्फ्यूज झालो शीर्षक वाचून... तुमच्याकडे गोंधळ कसा हाच विचार मनात आला

बा देवा म्हाराजा” अशी सुरवात असणार कोकणातलं टिपिकल गाऱ्हाणं >>> हे गाऱ्हाणं आणि त्याचा तो टिपिकल टोन माझ्याही आवडीचा Happy

खूप छान लेख नेहमीप्रमाणे मनीमोहोर. देशस्थ असून माहेरी गोंधळ नाही पण इकडे सासरी आहे. जोगव्याच्या तांदळाचा आणि ओटीत नारळ देतात त्याचा असा नारळीभात दुसऱ्या दिवशी करतात इकडे. डफ, सम्बळ, तुणतूण याचा आवाज ही आठवला. आता त्यातल्या विनोदाला वगरे हसू येत नाही खरं. पण लोककला टिकून आहे ते छान वाटतं.
इथं नवरात्रीत पण येतात दर वर्षी गोंधळी पण फार वेळ नाही. अर्ध्या तासात जातात.
आमच्या लग्नाच्या वेळी रात्री 10 ला आलेले गोंधळी ते 1 ला गेले असतील. सिझनला जाम डिमांड असतो त्याना. लवकरची वेळ मागितली होती तर म्हणलेले मुंजा मुलांकडे संध्याकाळ पर्यंत आवरतो ,मुलं झोपतात नाहीतर. लग्नांचे गोंधळ रात्री घेतो. मुलाच्या मुंजीच्या वेळी मात्र 5 ला आलेले संध्याकाळी.

आमच्या लग्नानंतर घातला होता गोंधळ. ऊसाचे दांडे बांधले होते. दिवटी ला फेर धरून तेल घालायचे होते. हातात पण ज्योत पेटवून फेर धरून गोंधळी बुवांच्या मागोमाग नाचायचे होते.
ज्यांची कुलस्वामिनी अंबाबाई, भवानी किंवा कदाचित कुठलिही देवी असेल तर त्यांच्यात गोंधळ घालतात असं ऐकलंय. ज्योतिबा सुद्धा कुलदैवत असेल तर करतात.
इकडे एका घरात ३ सख्खे भाऊ असतील तर पहिल्याचा आणि तिसर् याचा गोंधळ घालतात. दुसर्या नंबर वाल्याचा नाही.

खूप छान लेख हेमाताई.

आमच्याकडे सासरी अतिपूर्वी गोंधळ होता, कोणी सुरू केलेला माहिती नाही पण तो साधारण 80 वर्षांपूर्वी बंद पडला तो पडलाच. बोडणही नवसाचे आहे एरवी नाही.

छान माहिती. ऐकुन आणि चित्रपटांतुनच माहित आहे. प्रत्यक्ष कधी बघितलेला नाही. गोंधळ का बरं म्हणतात याला?

बाकी बोडण प्रकार अन्नाची फारच नासाडी होते म्हणून बंद पडला आमच्याकडे. किंवा नैवेद्याची वाटीभर प्रत्येक गोष्ट घ्यायची असं ठरलंय मला वाटतं.
त्या गाईला शोधणे हा एक डोक्याला ताप असायचा. ठाण्यात रस्त्यावर बेवारस गायी हल्ली दिसत नाहीत, आणि गोठ्याचा मालक कशाला त्याच्या दुभत्या गाईंना हे असलं काही खायला द्यायची परवागगी देईल? मग मी तलावपाळीच्या गणपती विसर्जन भागात एकदा विसर्जित केलं पण ते करणं function at() { [native code] }यंत पर्यावरण घातक आहे हे माहित असल्याने परत बोडण केलंत तर संडास मध्ये टाकूया असं सांगितलं. त्या प्रथांत शून्य अर्थ आहे हे उमगल्याने ते आता बंदच पडेल. दर वेळी अमक्याचं राहिलंय आणि तमक्याचं करायचं आहे इतकी बोलणी होऊन पुढे काहीच होत नाही. त्यानिमित्ताने जेवायला आणि जीटीजीला चार लोक येणार असतील तर मात्र परंपरा जपली पाहिजे! Wink

काही वर्षांपूर्वी इथे डोंबिवलीत गोग्रासवाडीत गाईंना खायला घालायची परवानगी द्यायचे, हल्ली माहिती नाही. वैयक्तिक अनुभव नाही, कारण इथे कधी बोडण केलं नाही, जवळच्या नातेवाईकांकडे होतं तेव्हा बघितलं.

गोठ्याचा मालक कशाला त्याच्या दुभत्या गाईंना हे असलं काही खायला द्यायची परवागगी देईल? >>>> हे मालकांनी सांगितलं का ? Happy आम्ही गोठ्यात दिलं होतं मागे कोणी काही म्हणत नाही.

परत बोडण केलंत तर संडास मध्ये टाकूया असं सांगितलं >>>> मधले काही उपाय नाहीत का? शिवाय संडासात टाकून ते शेवटी "पर्यावरणातच" जाणार आहे.
झाडांमध्ये वगैरे घालता येणं ही शक्य आहे ? त्यात सगळे खायचे पदार्थच असतात.

सॉरी मुळ लेखावर प्रसिसाद द्यायचा राहिलाच. गोंधळ कधी प्रत्यक्ष पाहिलेला नाही. फक्त टीव्ही किंवा मालिकांत बघितलाय. ह्यात जरा जास्त माहिती मिळाली.

आमच्याकडे मुलाचे लग्न झाल कि गोंधळ आणि जागरण करावेच लागते.
माझ्या सासुरवाडीला - सातारला मुलीच लग्न झाल तरी गोंधळ घालण्याची प्रथा आहे. नवरा मुलगा मुलीकडचे ग्रामदैवत , कुलदैवत ई. दर्शन घेतो आणि मग संध्याकाळी गोंधळ.

आमच्याकडे तिखटाचा तर सासुरवाडीचा गोडाचा.

या कार्यक्रमात लंगर तोडणे, पाच देव पुजन वगैरे इतर विधी असतात.

धन्यवाद सर्वांना.

मंजू तू दिवट्या म्हणतेयेस त्याला आम्ही त्याला तेली म्हणतो. जनरली घरातल्या मुलालाच काजळी च्या मोठ्या मोठ्या मिश्या काढून जरा गंमत करतात. ती मुलं फार गोड दिसतात.

ज्यांचे कुलदैवत खंडोबा असतो त्यांच्या घरी प्रामुख्याने बोडण न करता गोंधळ असतो म्हणे. पुसटसे आठवतेय. >> निकु, आमच्याकडे खंडोबा नाहीये दैवत तरी गोंधळ आहे , कधी कधी लॉजीकच्या पलीकडे जातात ह्या प्रथा. असो.

इकडे एका घरात ३ सख्खे भाऊ असतील तर पहिल्याचा आणि तिसर् याचा गोंधळ घालतात. दुसर्या नंबर वाल्याचा नाही. >> मी चिन्मयी, हे नवीन आहे माझ्यासाठी.

वर्णिता , पुढच्या वेळी नारळीभातच करू, मस्त आहे आयडिया. आम्हाला नारळाचं काहीतरी वेगळं वड्या वैगेरे करावं लागतं.

आमच्याकडे सासरी अतिपूर्वी गोंधळ होता, कोणी सुरू केलेला माहिती नाही पण तो साधारण 80 वर्षांपूर्वी बंद पडला तो >> हे भारी आहे अंजू. आमच्या माहेरी ही गोंधळ बोडण वैगेरे काही नाहीये. लग्नानंतर पूजा वैगेरे ही मस्ट नाही , केली तर करा. आमचे वडील सुधारक होते , त्यानी सगळं सोडून दिलं असण्याची ही शक्यता आहे. असो.

कोणत्या तरी दोन दैत्यांनी म्हणे धुमाकूळ घातला होता , सगळे जण हैराण झाले होते. आमची ह्यातून सुटका कर अस म्हणून देवीकडे सगळ्यांनी साकडं घातलं, गोंधळ घातला म्हणून हा गोंधळ ... अर्थात हे ही कपोलकल्पितच वाटत. असो.

अमितव बोडणाच, श्राद्धपक्षादी विधींच्या साहित्याच , गणेशमूर्तींचं विसर्जन हा वाढलेली लोकसंख्या आणि त्यामुळे फुगलेली शहरं ह्यांचा इशू आहे. त्यात तारतम्य बाळगून , आपल्याला पटतील, रुचतील असे बदल करणे केव्हा ही इष्टच.

बाकी आमच्याकडे कोकणात गोंधळ म्हणजे एक कार्यच असतं , त्यामुळे एवढया मोठ्या कुटुंबातील माणसं जी हल्ली एकत्र भेटणं ही कठीण आहे ती चार दिवस एका घरात राहतात , पुढच्या पिढीतली मुलं ही येतात त्यामुळे त्यांचं ही bonding होतं हे मात्र खरं आहे.

सातारला मुलीच लग्न झाल तरी गोंधळ घालण्याची प्रथा आहे " >> आबा, आमच्या कडे ही मुलींच्या लग्नाचा ही घालतात गोंधळ.

हेमाताई, नेहमीप्रमाणेच उत्तम लेख.

आमच्याकडेही लग्नात हळदीच्या रात्री किंवा त्याच्या आदल्या रात्री गोंधळ घातला जातो. आमच्या काही नातेवाईकांकडे बंधनकारक असला तरी माझ्या घरी तो ऐच्छिक आहे (जसे माझ्या चुलतबहिणीच्या लग्नात केला होता, पण माझ्या सख्ख्या बहिणीच्या लग्नात नव्हता). नागपूरकडे (निदान आमच्याकडे तरी) गोंधळाला डहाका (अगदी ग्रामीण भाषेत 'डायका') म्हणतात, आणि लेखात लिहिल्याप्रमाणे गोंधळ घालणारे (डहाका म्हणणारे) विशिष्ट लोक असतात. विशेषतः लग्नसराईत त्यांची आगाऊ बुकिंग करावी लागते, ते बऱ्यापैकी मानधनही आकारतात. खरं खोटं देवच जाणे पण गोंधळा (डहाका) दरम्यान काही मंडळी घरातील पूर्वज अंगात आल्यासारखे करतात आणि त्यांच्या अपूर्ण ईच्छा सांगतात. मग घरातील इतर मंडळी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तथापि ह्याच भीतीने अनेक लोक लग्नात गोंधळ टाळतात.

मंजू तू दिवट्या म्हणतेयेस त्याला आम्ही त्याला तेली म्हणतो.

>>>> आमच्याकडेही दिवट्याच म्हणतात आणि दिवट्या नेहमी पाहुण्याला बसवतात.... जनरली घरातील सुनेचा भाऊ किंवा घराचा जावई दिवट्या असतो.
आणि कार्यक्रमादरम्यान वाघ्या त्याची खूप खेचत असतो Lol

छान लेख!

अवांतर...... एकदा मैत्रीण बोडणाचा किस्सा रंगवून सांगत होती."मग आम्ही पाचजणींनी ते पदार्थ एकत्र कालवले इ.".मला वाटले हा काला प्रसाद म्हणून पानात वाढत असतील.म्हणून तिला विचारले म हे कोण खाते? तर म्हणाली गायीला देतो.मला विनाकारण सुटल्यासारखे वाटले.

छान लेख!
आजोळी आणि सासरी गोंधळाची प्रथा आहे किंवा होती म्हणायचे. ४५ वर्षंपूर्वी पहिला आणि शेवटचा गोंधळ बघितला तो धाकट्या मामाच्या लग्ना नंतर! आम्हा मुलांना प्रत्यक्ष लग्नापेक्षा नंतरच्या गोंधळाचीच प्रचंड उत्सुकता होती. गोंधळी मंडळी आल्यावर त्यांची वाद्यं वाजवून बघायची होती, पण मोठ्यांनी तसे होवू दिले नाही. आता तो दिवट्यांचा उजेड आणि फेर धरणे एवढेच आठवतेय. मोठ्या आणि धाकत्या मुलाच्या लग्नाचा गोंधळ घालतात. आमच्या लग्नानंतर पपा(सासरे) म्हणायचे की गोंधळ घालायचे राहून जात आहे वगैरे. तसेही देशात ५-६ वर्षांतून एकदा जाणे होई मग ते मागेच पडले.

हेमाताई खूप छान लेख.. मी हल्लीच दोन गोंधळ पहिले..रात्रभर चाललेले..त्याची आठवण झाली.. त्यातला देवकार्याचा भाग सोडला तर वगनाट्यच ते..गोंधळी मंडळी कसं रंगवतात त्यावर त्याची रंगत अवलंबून..चांगली गोंधळी मंडळी आता मिळतही नाहीत.. त्यामुळे दिवट्याची अनिर्बंध मस्करी आणि मुरळया नाचवण्यालाच प्राधान्य दिलं जात..

नेहेमीप्रमाणे छान लेख. आमच्याकडे पण दिवट्याच म्हणतात, आबा म्हणतो तसं त्याची खूप खेचत असतो वाघ्या. पूजाच किती छान मांडतात ते लोक, नारळावर हळद आणि मोठं कुंकू आणि त्यावर फुलांची वेणी. नाचायला लावतात सगळ्यांना घरातल्या. अन सम्पताना तो वाघ्या एक प्रश्न विचारतो ज्याचं नवरा बायकोनं लगेच उत्तर द्यायचं असतं (हे तो आधीच बजावतो मी प्रश्न विचारला की लगेच हो उत्तर द्यायचं). आता लग्नसराई सुरू आहे, एखादं जागरण गोंधळ नक्कीच ऐकायला मिळेल रात्री Happy वर्णितानी लिहिल्याप्रमाणे इकडे पण हल्ली नवरात्रात अर्धा तास येतात गोंधळी 600/700 रु घेतात. गणपती, देवीची आरती आणि नंतर तुमची जी कुलस्वामिनी आहे तिचा आटोपशीर गोंधळ. ते भुते पण आत्ताच येतात ना ह्या दिवसात? वंशावळ असते बहुदा त्यांच्याकडे.

आमच्याकडे खंडोबा नाहीये दैवत >>> सेम.

सासरचे केळकर कुटुंब फणसे इथे आल्याला साडेतीनशी चारशे वर्ष झाली. त्यानंतर साधारण दीड दोनशे वर्षांपूर्वी कोणीतरी कुटुंबाचा लिहिलेला कागद आहे, तो आमच्याकडे इथे होता पण मोठ्या दिरांनी सध्या तो गावाला नेला त्यात कुळाचार लिहिले होते त्यात गोंधळ उल्लेख नव्हता आणि बोडण नवसाचे, मुळ बोडण नाही आमच्याकडे. त्यात कुलदेव, कुलदेवी उल्लेख आहे. दरवर्षी समाराधना करावी हा उल्लेख आहे. लग्न कार्याचे बारा विडे ठेवायचे वेगवेगळ्या देवतांना हा उल्लेख आहे. गोंधळ उल्लेख अजिबात नसल्याने तो कोणीतरी मध्येच सुरू केलेला असावा, कदाचित नवसाचाही तात्पुरता असावा, त्यामुळे नंतर तो बंद पडला असावा. बरेच वर्ष लग्न मुंज गोंधळ होत होता ही ऐकीव माहिती आहे.

तो कागद मोठा असल्याने जंबो झेरॉक्स काढावी लागेल. नवऱ्याला मी कोकणात जाशील तेव्हा मोबाईल वर फोटो तरी काढून आण सांगितलं आहे, मस्त वाटतं वाचायला.

कुणीतरी जरा बोडणाबद्दलही सविस्तर लिहा. कदाचित आमच्या नागपूरकडेही भिन्न नावाने ही प्रथा असावी; सखोल वाचल्यावर उलगडा होईल.

चांगला लेख ममो.
आमच्या लग्नानंतर घातला होता(लग्नात झाले, भरपूर पाऊस पडला, घरातून निघताना लाईट पाणी दोन्ही गेलं होतं तयार होताना, ते पुरले नाहीत का Happy )
मला थोडा नॉइजी वाटला प्रकार, आणि दिवट्या मुलाची मस्करी पण खटकणारी वाटली.अर्थात ते पलिते लावून नाचणं मात्र आवडलं पब्लिक ला.
अरे हो बोडण बद्दल ऐकलं आहे आणि संपूर्ण चातुर्मास मध्ये एक कहाणी वाचलीय.
त्याबद्दल पण लिहा.

(संडासात टाकणं मनाला झेपणार नाही.आमचे गुरुजी अति चिकित्सक आणि अति नॉन फ्लेक्झिबल असल्याने ते गाईलाच द्या, नदीतच टाका म्हणतात.मग प्रत्येक वेळी मंडळी पत्रावळ्या घेऊन जातात, आणि गोठ्यात गाईला देऊ दिलं नाही, सर्व नद्यांना उंच कुंपण आहे म्हणून घेऊन परत येतात
मग मी कंपोस्ट बिन मध्ये टाकते.)

कंपोस्ट मध्ये टाकण्याची आयडिया चांगली, वर पराग यांनी झाडात टाकण्याचे सुचवलं तेही आवडलं . अमितव यांची अल्प प्रमाण त्यातले जिन्नस वापरण्याची आयडियाही चांगली आहे.

बोडण करायचे असल्यास गावाला येऊन करावे हे सा बा नी सांगितल्यामुळे आणि असा नवस कधी न केल्याने इथे करायची वेळ आली नाही. गावाला गाई गुरे असतात शेजारी पाजारी त्यामुळे प्रश्न येत नाही.

माहेरीही नवसाचे बोडण होतं, त्यामुळे आधीही इथे झालं नव्हतं. ते ही माहेरी कोकणात बघितलं.

धन्यवाद सगळ्यांना .. सगळे प्रतिसाद ही माहितीत भर घालणारे. तुम्ही सगळेजण दिवट्या म्हणताय तर माझीच चूक झाली असेल, आमच्याकडे ही दिवट्याच म्हणत असतील एखाद वेळी.

खरं खोटं देवच जाणे पण गोंधळा (डहाका) दरम्यान काही मंडळी घरातील पूर्वज अंगात आल्यासारखे करतात आणि त्यांच्या अपूर्ण ईच्छा सांगतात. मग घरातील इतर मंडळी त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. तथापि ह्याच भीतीने अनेक लोक लग्नात गोंधळ टाळतात. >> काय टेन्शन येत असेल ह्याच त्यापेक्षा न केलेला बरा असच म्हणत असतील.

त्यानंतर साधारण दीड दोनशे वर्षांपूर्वी कोणीतरी कुटुंबाचा लिहिलेला कागद आहे, तो आमच्याकडे इथे होता >> अंजू, केवढा मोठा ऐतिहासिक ऐवज आहे हा ..कागद पण ठिसूळ झाला असेल आता. निदान आता झेरॉक्स तरी काढून जपून ठेवा.

लंपन मस्त माहिती.

त्यातला देवकार्याचा भाग सोडला तर वगनाट्यच ते..गोंधळी मंडळी कसं रंगवतात त्यावर त्याची रंगत अवलंबून.. >> प्रशांत सर, अगदी अगदी.

मग आम्ही पाचजणींनी ते पदार्थ एकत्र कालवले इ.". >> लहान मुलांनी जेवताना काला केला की म्हणतातच "काय बोडण भरते आहेस, कोण खाणार हे आता" वगैरे वगैरे

आमच्या लग्नानंतर घातला होता(लग्नात झाले, भरपूर पाऊस पडला, घरातून निघताना लाईट पाणी दोन्ही गेलं होतं तयार होताना, ते पुरले नाहीत का Happy ) हाहाहा अनु, नॉयजी वाटला कारण नावच गोंधळ आहे , आवाज कल्ला असणारच

कंपोस्ट मध्ये टाकण्याची आयडिया चांगली, वर पराग यांनी झाडात टाकण्याचे सुचवलं तेही आवडलं . अमितव यांची अल्प प्रमाण त्यातले जिन्नस वापरण्याची आयडियाही चांगली आहे. >> अंजू +१११

छान माहिती. मी हे बोडण, गोंधळ वगैरे काहीही बघितले नाहीत कधी. पहिल्यांदा गोंधळ हा शब्द ऐकलेला तेव्हा आश्चर्य वाटले होते, गोंधळ घालायलाबाहेरुन लोक का बोलवायचे, घरातले घालतात तो कमी आहे का म्हणुन.. Happy नंतर कळले काहीतरी धार्मिक प्रकरण आहे.

साधना भारी कमेंट. नंतर गोंधळ होऊ नये, अडचणी येऊ नयेत म्हणून आधी हा धार्मिक गोंधळ घालतात, असं मला कोणीतरी सांगितलं. जागरण गोंधळ देवतांच्या धार्मिक परंपरेतच येतं.

मस्त लेख! माझ्या माहेरी आणि सासरी दोन्हीकडे कार्याचं बोडण पण माझे आजोबा डॉक्टर आणि सुधारकी त्यामुळे ते कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत दूध दही योजना होती तिथे पैसे/दूध दही द्यायचे (बोडण ही पंचामृती पूजा असते देवीची म्हणून)सासरी मात्र आहे आणि मी केलंय ,अवडंबर न करता केलं तर फार छान होतं, गोंधळ मात्र बघितलेला नाही त्यामुळे वाचून मस्त वाटलं! नवऱ्याच्या आजोळी असतो त्यामुळे त्याला फार छान आठवणी आहेत.

ग्रेट आजोबा.

इथे डोंबिवलीत चित्पावन ब्राह्मण संघातर्फे सामुहिक बोडणही असतं. मी वाचलं आहे, बघितलं नाही. त्यांचं त्रैमासिक येतं आमच्याकडे.

छान लेख आहे. खूप संदर्भ जागे झाले. इकडे ठाणे रायगड जिल्ह्यात गोंधळ घालतात. त्यासाठी गोड्या एरंडाची तिकाटणी उभी करतात. गोडा एरंड म्हणजे जो उकिरड्यावर वाढतो तो. निरस्त पादपे देशे जो वाढतो तो. ज्याची पाने पपई सारखी असतात आणि ती काविळीवरच्या घरगुती औषधात वापरतात तो.
लेख आणि प्रतिसादांनी आठवणींचे मोहोळ उठवले.
तुमचे लेख असेच असतात. मनात कुठेतरी तळाशी रुतलेल्या, कितीतरी वर्षांपूर्वीच्या आठवणी तरंगत वर येतात, हलक्याशा सुखद लहरी उठवतात.

घरी काय कमी आहे का गोंधळ >> साधना हाहाहा
जेष्ठगौरी थॅंक्यु. आजोबा काळाच्या पुढे पहाणारे होते.
हीराखूप छान प्रतिसाद थॅंक्यु सो much. तिकाटनी वाचला शब्द तेव्हा एकदम हायस वाटलं. ह्याला मांडव म्हणत नाहीत माहित होतं पण काय ते आठवतच नव्हतं म्हणून शेवट मांडवावर मांडवली केली Happy आता लिहिते हेडर मध्ये ही.
अंजू सामुदायिक बोडण कल्पना खुपच आवडली आहे.
इथे बोडणाबद्दल खूप जणींनी विचारलं आहे फेसबुकवरची एक लिंक खूप चांगली वाटली म्हणून शेअर करतेय. नक्की वाचा. पण माबो वर लिंक दिलेली चालत नसेल तर काढून ही टाकता येईल म्हणून हेडर मध्ये लिंक देतेय. प्रतिसाद चार तासांनी edit करता येत नाहीत म्हणून इथे नाही.

Pages