माल्कम ग्लॅडवेलच ‘आउटलायर्स’
प्रसिद्ध कॅनेडियन लेखक माल्कम ग्लॅडवेलच ‘आउटलायर्स’ नुकतंच वाचनात आल. जगात यशस्वी ठरलेल्या व्यक्तींच्या यशामागची कारण आणि त्यांच विश्लेषण एका वेगळ्याच अंगाने करणारं हे पुस्तक. अनेक प्रसिद्ध व्यक्तींच्या यशामागे त्यांची हुशारी आणि कठोर मेहनत या बरोबरच या यशाची पायरी चढताना त्यांना मदत करणाऱ्या इतरही काही सुप्त गोष्टी असतात याच विवेचन ग्लॅडवेलने या पुस्तकात केल आहे.
ज्या लोकांकडे आपण आदर्श म्हणून पहातो असे जगभर गाजलेले खेळाडू, व्यावसायिक, शिक्षक, शास्त्रज्ञ, राजकारणी लोक हे ग्लॅडवेलचे ‘आउटलायर्स’. त्यांनी मिळवलेल यश हे निव्वळ त्यांची बुद्धिमत्ता, कौशल्य, त्यांचे अथक परिश्रम यामुळेच असाव हा सर्वसाधारण समज. पण याही व्यतिरिक्त नशीब, त्यांच्या जन्माच्या वेळी असलेली सामाजिक आणि आर्थिक परिस्थिति, त्यांना मिळालेल्या संधी आणि कुटुंबसंस्था यासारख्या इतर अनेक गोष्टी त्यांच्या यशाला कारणीभूत ठरतात. एखाद्या व्यक्तीला जर लहान वयातच त्याच्या समवयस्क मित्रांपेक्षा काही पूरक बाबींचा लाभ झाला तर पुढे जाता त्याच्या कार्यक्षमतेमध्ये इतरांपेक्षा निश्चित फरक पडतो. याला मॅथ्यू इफेक्ट असं नाव आहे. ज्यांना अशा संधी मिळत नाहीत त्या व्यक्ति कायमच मागे राहतात. यशस्वी व्यक्तींच्या वाटचालीचा बारकाईने अभ्यास केला असता या बहुतेक लोकांच्या यशात या मॅथ्यू इफेक्टची महत्वाची भूमिका दिसून येते.
कोणत्याही विषयात तज्ञ बनण्यासाठी सराव महत्वाचा हे तर सर्वश्रुत तत्व. पण त्यासाठी कमीत कमी किती वेळ द्यावा लागतो? ग्लॅडवेल म्हणतो की अभ्यासकांच्या मतांप्रमाणे कोणत्याही गोष्टीत तज्ञ होण्यासाठी कमीतकमी 10,000 तासांचा सराव जरुरी असतो हे जरी खर मानल तरी त्याचबरोबर नशीब आणि संधी मिळण हेही गरजेच असत. जगातील सर्वात मोठ्या मायक्रोसॉफ्ट कंपनीचा कर्ताकरविता बिल गेट्सला लहान वयातच संगणकावर अमर्याद वेळ काम करण्याची संधी मिळाली जी त्याच्या समवयस्क आणि त्याच्या सारखीच बुद्धिमत्ता असणाऱ्या त्याच्या मित्रांना मिळू शकली नाही. त्याचप्रमाणे संगणक क्रांती सुरू झाली तेव्हा बहुतेक सिलिकॉन व्हॅली अब्जाधीश त्या संधीचा लाभ घेण्यासाठी अगदी योग्य वयात म्हणजे 20 ते 30 वर्षांचे होते (जन्म 1955 च्या आसपास).
ग्लॅडवेलच्या म्हणण्यानुसार आयुष्यात यशस्वी होण्यासाठी नुसती उच्च बुद्धिमत्ता (IQ) पुरेशी नाही. एका ठराविक स्तराची जरूरीपुरती बुद्धिमता असल्यावर यशस्वी होण्यासाठी इतर गोष्टी महत्वाच्या ठरतात ज्यांचा बुद्धिमत्तेशी काहीही संबंध नसतो. जसं बास्केटबॉल खेळामध्ये खेळाडूकडे पुरेशा ऊंचीनंतर कोर्ट सेन्स, वेग, चपळाई, चेंडू हाताळण्याचे कौशल्य आणि नेमबाजी या गोष्टी असण जरूरी असत. या संदर्भात ग्लॅडवेलने मांडलेला महत्वाचा मुद्दा म्हणजे यशस्वी होण्यासाठी बुद्धिमत्ता असून भागत नाही तर ती जोपासावी लागते आणि त्यासाठी व्यक्तीच संगोपन झालेल वातावरण आणि बालपणात झालेले संस्कार महत्वाची भूमिका बजावतात. उच्च-मध्यम वर्गीय कुटुंबात वाढलेल्या मुलांना आपल मत स्पष्टपणे व्यक्त करण, स्वतः निर्णय घेणं आणि त्याच समर्थन करण या गोष्टी लहान वयातच शिकवल्या जातात आणि त्यामुळेच ही मुलं पुढे यशस्वी होतात. या मुलांना सतत वेगवेगळ्या परिस्थितीत कठीण प्रसंगाला सामोर जायच, प्रौढ व्यक्तीशी संवाद साधायच आणि गरज पडेल तर आपला आवाज उठवायच शिक्षण घरातूनच मिळालेल असत. दुसरीकडे, गरीब पार्श्वभूमीतील मुलांकडे पालकांकडून तितकस लक्ष दिल जात नाही. परिणामी, ही मुलं समाजात वावरताना काहीशी भित्री आणि प्रौढ किंवा अधिकारी व्यक्तींसमोर दबूनच असतात.
पण, योग्य संधी किंवा परिस्थिती न मिळणं हे काही आउटलायर्सच्या यशाला पूरकहि ठरू शकत. अनेक ‘रॅग्स-टू रिच’ कथामधून नायकाला ज्या अडचणींवर मात करावी लागली तेच दाखवल जात; पण या अडचणी त्याला भविष्यातील संकटांवर मात करण्यासाठी सक्षम बनवतात हे दाखवल जात नाही. कठीण परिस्थितीत पण योग्य वेळी जन्म घेतलेल्या व्यक्तीच्या बाबतीत हे प्रकर्षाने दिसून येत. 1930 च्या महामंदीच्या दशकातल्या युवा पिढीपेक्षा नंतरच्या काळात जेव्हा अर्थव्यवस्था तेजीत होती त्या काळातल्या युवा पिढीला जीवनात यशस्वी होण्यासाठी जास्त संधी मिळाली हे जरी खर असल तरी मंदीच्या काळात काही लोकांनी केलेल्या योग्य मेहनतीचा लाभ पुढे तेजीच्या काळात त्यांच्या युवा पिढीला झाला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत केलेलं कोणतही योग्य काम कितीही कमी दर्जाच असल तरी ते शिकण्याची आणि मोठ होण्याची संधी समजून करणं हे भावी पिढीच्या यशाची पायरी ठरू शकत.
आउटलायर्सच यश निश्चित करण्यात सांस्कृतिक वारशाचीहि महत्त्वाची भूमिका असते. परिस्थितीला तोंड कस द्याव, किती मेहनत करावी, आलेल्या संधीला कस सामोर जाव, अधिकार आणि अधिकारी व्यक्तीला किती आणि कसा आदर द्यावा या गोष्टी व्यक्तीच्या सांस्कृतिक वारशावर अवलंबून असतात. काही संस्कृतीमध्ये अधिकार आणि अधिकारी व्यक्तीला एवढं आदराच स्थान दिलं जात की ते अशा संस्कृतीत वाढलेल्या व्यक्तीच्या कामगिरीत आणि वैयक्तिक वाढीत बाधा ठरू शकत. त्यापेक्षा व्यक्तिस्वातंत्र्याला महत्व देणाऱ्या संस्कृतीत वाढलेली व्यक्ति अधिक स्वतंत्र असते आणि वेळ पडल्यास जोखीम घेऊन पुढे जायला तयार असते. व्यक्तीच्या जडणघडणीत सांस्कृतिक वारशाची भूमिका स्पष्ट करताना ग्लॅडवेल आशियाई, पाश्चिमात्य आणि जपान आणि कोरियन संस्कृतीची उदाहरणं देतो. पाश्चिमात्य पद्धतीपेक्षा आशियाई पद्धतीने गणिती अंक मोजणी सोपी आहे त्यामुळे पाश्चिमात्यांपेक्षा आशियाई लोक गणितात हुशार असतात. चीन, कोरिया आणि जपान या देशात तांदूळ हे मुख्य अन्न आहे आणि इतर प्रकारच्या शेतीच्या तुलनेत तांदूळाच्या शेतीमध्ये जास्त श्रम घ्यावे लागतात. यामुळे या संस्कृतीत वाढलेल्या लोकांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन भिन्न असतो.
यासारखी अनेक उदाहरणं देत यशाच्या शिखरावर चढण्यासाठी बुद्धिमत्ता आणि मेहनत याचबरोबर नशिबाची साथ आणि योग्य वेळी योग्य संधी मिळणं गरजेच असत हे दाखवून देत ग्लॅडवेल या निष्कर्षांपर्यंत पोहोचतो की जगात यशस्वी ठरलेले आउटलायर्स आपली अंगभूत हुशारी आणि स्वकर्तृत्व याच गुणांच्या बळावर यशस्वी झाले हे एक मिथक आहे.
जगभरातल्या प्रसिद्ध लोकांच्या यशोगाथाच विश्लेषण करून त्यांच्या यशामागच्या कारणांच एका वेगळ्या अंगान विश्लेषण करणार हे पुस्तक वाचनीय. ग्लॅडवेलच्या ओघवत्या शैलीत ते वाचताना केवळ कठोर परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली असू शकते का याचा विचार करण्यास ग्लॅडवेल आपणास भाग पाडतो, तरीही मुळात अंगभूत हुशारी आणि परिस्थिति आणि संधीचा फायदा घेऊन पुढे जाण्याची वृत्ती नसेल तर या बाकी सर्व पूरक गोष्टी असल्या तरी जीवनात यशस्वी होता येईल का हा विचार मनात रेंगाळत रहातोच.
या पुस्तकाचा श्रीमती स्मिता आवळगांवकर आणि पुष्पा ठक्कर यांनी केलेला मराठी अनुवाद ‘असामान्य व्यक्तींच्या यशाची गुपिते’ या नावाने उपलब्ध आहे. (प्रशांत मठकर मोबाइल 9619036406)
परिचय आवडला.
परिचय आवडला.
मायबोलीवर स्वागत.
छान परिचय.
छान परिचय.
मी पण मागच्याच आठवड्यात हे पुस्तक वाचले.
सांस्कृतिक वारसा या विषयावरील भाग जरा लांबल्यासारखा वाटला, पण मलाही हे पुस्तक आवडले.
आवडला परिचय.
आवडला परिचय.
आवडला परिचय.
आवडला परिचय.