सैतान, रोबोट आणि देव.
(निवेदक मिस्टर कुलकर्णी)
“सफाया” नावाच्या रोबोचं प्रात्यक्षिक आयआयटी मुंबई मध्ये होणार होते. हा “हॅन्सम रोबोटिक्स” नावाच्या हॉंगकॉंगच्या कंपनीने बनवलेला रोबो होता. आयआयटीमधे “टेक फेस्ट” च्या परिश्रमाने हे प्रात्यक्षिक होणार होते.
रोबो वगैरे प्रकाराबद्दल मला माफक रुची होती. जितकी रुची तुम्हा लोकांना असेल त्याच्या पेक्षा थोडी कमीच. आता माझी उमेदीची वर्षं सरली होती. त्यामुळे कुणी रोबो येईल आणि विद्यार्थ्यांना शेक्सपिअर शिकवेल ह्यावर माझा विश्वास नव्हता. माझा जॉब रोबो हिरावून घेतील अशी भीती नव्हती. आणि जरी असा रोबो आलाच तर कॉलेज मला सेवानिवृत्त व्हायला भाग पाडेल. पाडलं तर पाडलं आपल्याला काय सेवानिवृत्तीचे फायदे आणि प्रॉविडंट फंड हातात पडला की बास. मग गावी जाऊन आराम करेन. मी पण सारखं सारखं तेच तेच शिकवून कंटाळलो होतो. मी ऐकलं होतं की विद्यार्थी माझ्या मागून माझी माफक टिंगल करीत,
“मला एका सिनिअरने सांगितले की कुलकर्णी सर पंचवीस ऑगस्टला फलाना ढिकाना जोक सांगतील.”
हे माहित असून देखील मी गेली अठरा वर्ष तोच विनोद पंचवीस ऑगस्टला फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांना सांगत आलो आहे. मला सांगा रोबोट तरी ह्यापेक्षा निराळे काय करणार? असो.
रोबोटच्या प्रात्यक्षिकाच्या कार्यक्रमाच्या आमंत्रणाचे गेस्ट पासेस कॉलेजच्या प्रिन्सिपलकडे आले होते. प्रिन्सिपाल साहेबांनी ते खपवण्याचा बराच प्रयत्न केला असावा. पण त्यांना कोणी बधले नाही. खरच आहे म्हणा दादरहून तंगड्यातोड करून पवईला कोण लाणार? आणि ते देखील रविवारी संध्याकाळी! वर त्या संध्याकाळी इंडिया वि. इंग्लंड टी-20 सामना होता. तो सोडून रोबोट लीला बघण्यात कुणालाही रुची नव्हती,
अखेर सरांनी माझ्याकडे मोर्चा वळवला. सर मला बोलावतील ह्याची सुतराम शक्यता नसल्याने मी त्यांना तोंड द्यायची काही पूर्वतयारी केली नव्हती.
“कुलकर्णी, काय म्हणताहेत तुमचे विद्यार्थी?”
“ठीकच आहे सर्व काही.” मी गुळमुळीत उत्तर दिले. संभाषण कुठे चालले आहे त्याचा आधी अंदाज घ्यावा हा हेतू. काही तरी सज्जड कारणाशिवाय सरांनी मला बोलावले नसणार ह्याची मला खात्री होती.
“सर. ह्या वर्षीच्या आंतरमहाविद्यालयीन इंग्लिश वक्तृत्व स्पर्धेत आपल्या कॉलेजला करंडक मिळाला पाहिजे. कॉलेजची मदार, कुलकर्णी, तुमच्यावर आहे.” हा मस्का कशासाठी? मला अजूनही अंदाज येत नव्हता. आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा ह्या नेमेची येतो मग पावसाळा प्रमाणे येणारा प्रसंग होता.
“कुलकर्णी, तुम्हाला असं नाही वाटत कि आपला समाज विज्ञानापेक्षा धर्माला जास्त महत्व देतो? आपल्या समाजाला वैज्ञानिक दृष्टिकोणच नाही. आपण श्राध्द करून पितरांना जेवायला म्हणून भटा भिक्षुकांना जेवायला घालतो. असं पहा तुम्ही मला जेवायला बोलावलत आणि मला वरच्या मजल्यावर बसवलत आणि माझं जेवणाचं ताट खालच्या मजल्यावर वाढलं तर ते जेवण मला पोहोचेल काय?”
“नाही तसं नाही पण हा भावनांचा प्रश्न आहे.”
“इथच तर घोड पेंड खातय. आता हेच पहाना. आयआयटी मुंबईत हा रोबोटचा कार्यक्रम आहे. तुम्ही पेपरात वाचले असेलच. त्याच्या ह्या निमंत्रण पत्रिका. पण अवस्था अशी आहे कि कुणाला जाण्यात इंटरेस्ट नाहीये. आपल्या कॉलेजमधून कोणी गेलं नाही तर बरं दिसेल काय? लोक काय म्हणतील. तुम्हीच सांगा. मी तर असं ऐकलं आहे कि विद्यार्थी पास मिळवण्यासाठी दोन दोन तास क्यू मध्ये उभे रहात आहेत. इथं आपल्याला पायघड्या घालून बोलावताहेत आणि आपण...”
“त्यात काय एवढं. आपले कॉम्प्यूटरचे एचओडी लोखंडे सर एका पायावर तयार होतील.”
“मला देखील तसेच वाटलं आधी. पण त्यांची थोडी अडचण आहे. त्यांच्या धाकट्या मेव्हणीचा दाखवायचा प्रोग्राम आहे. वरपक्षावर इंप्रेशन जमवण्यासाठी त्यांना जायलाच पाहिजे असा मिसेस लोखंडे ह्यांचा आग्रह आहे. हे अवघड जागेच दुखणे तुम्ही-मी समजू शकतो.”
“हो बरोबर आहे त्यांचं. मग ते आपले इलेक्ट्रोनिक्सचे कांबळे सर...”
“कुलकर्णी, मी सगळ्यांना विचारलं. पण प्रत्येकाची काहीना काही अडचण आहे. कुणाला डॉक्टरची अपॉइंटमेंट आहे तर कुणाला आपल्या अत्यवस्थ नातेवाईकाला
इस्पितळात भेटायला जायचे आहे. कुणाला लग्नाचे रिसेप्शन मस्ट अटेंड आहे. कुणाचे काय तर कुणाचे काय. ह्या पाच पास पैकी तिघांना मी तयार केले आहे.”
मग बारीक डोळे करून ते मला म्हणाले, “माझ्या कल्पनेने तुम्हाला कोणी लग्नाची मेहुणी नाहीये; तसेच तुमचा कोणताही नातेवाईक मरणासन्न नाहीये; आणि एखाद्या रिसेप्शनला आमंत्रण असेल तर प्लीज माझ्यासाठी स्किप करा. हा पास घ्या आणि कृपया तो कार्यक्रम अटेंड करा. अरे पांडू दोन स्पेशल चहा आणि कांदा-पोहे सांग पाहू कॅंटिनमध्ये. जा पळ. कुलकर्णी थॅंक्यू. तुमच्या अन्युअल अप्रैजलमध्ये मी ह्याचा खास उल्लेख करेन. प्रॉमिस!”
अशा प्रकारे माझ्या हो ना ची विचारपूस न करताच मोठ्या सरांनी माझ्या तोंडात पोहे कोंबून माझ्या गळ्यात घोंगडे बांधून दिले. माझ्या भिडस्त स्वभावाचा गैरफायदा घेत केवळ एका चहा-पोह्यांवर मी विकला गेलो.
सभागृह काठोकाठ भरले होते. विशेषतः तरुणाईची गर्दी होती. तुरळक तुरळक हिरवळ पण होती. माझ्यासारखे प्रौढ विरळाच. सुरवातीला रोबोटिक्स आणि एआयच्या एका तज्ञाने प्रास्ताविक केले. (माझ्यासाठी सारेच तज्ञ!) नंतर कार्यक्रमाला आर्थिक हातभार लावणाऱ्या दोन तीन खासगी कंपन्यांच्या सीइओनी भाषणं ठोकली. मी आपला जांभया दाबून ठेवण्याची पराकाष्ठा करत होतो. तोंड दाबून जांभयांचा मार सहन करत होतो. मधेच हळूच मोबाईल खोलून स्कोर बघत होतो.
कोहली आउट झाला होता.
आता मॅच कशी जिंकणार ह्याची उत्सुकता होती.
हायला ह्या रोबोच्या. स्टेजवर यायचं नाव घेत नव्हता.
आता “हॅन्सम रोबोटिक्स”चा कोणी चीनी हा रोबोट कसा डिझाईन केला ते सांगत होता. ते सर्व माझ्या डोक्यावरून वहात गेलं.
अखेर रोबोटला स्टेजवर आणण्यात आलं. तेव्हा कुठं लक्षात आलं “तो” “तो” नव्हता तर “ती” होती.
लोकांनी टाळ्या वाजवून रोबोटचे स्वागत केले. ती छान सजली होती. मला वाटतं कुणातरी हॉलिवूडच्या सुंदरीला नजरेसमोर ठेऊन तिचा चेहरा बेतला होता. तिनं लवून सगळ्यांना अभिवादन केलं आणि आपली ओळख करून दिली. मग प्रश्नोत्तराचा कार्यक्रम सुरु झाला.
इंडियाची परिस्थिती जरा सुधारली होती.
प्रेक्षकात प्रामुख्याने विद्यार्थ्यांचा भरणा होता. ते रोबोटच्या “दर्शनाने” भारावले होते. ती ज्या पद्धतीने उत्तर देत होती, ते ऐकून-पाहून मला विश्वसुंदरी स्पर्धेची आठवण झाली.
“मिस या स्पर्धेत जर तुम्ही विजयी झालात तर पुढे तुम्हाला काय करावे असे वाटेल?”
“या जगातील एकूण मुलामुलीनपैकी ८७.६५१२% मुले रोज रात्री उपाशी पोटी झोपी जातात. त्यांच्यासाठी काही करावे असे माझ्या मनात आहे...”
अशा टाइपची होती.
एका चुणचुणीत तरुणाने विचारले “होमो सेपिएंस आणि रोबोट सेपिएंस हे भविष्य काळात एकमेकांबरोबर सुखेनैव गुण्यागोविंदाने रहातील? तुझं काय मत आहे?”
इतका वेळ मृदू मुलायम शांत स्वरात बोलणारी सफाया, तो तिचा आवाज एकाएकी बदलला आणि पुरुषी कर्कश्श झाला. तिथे जमलेल्या विद्वान आणि उच्चभ्रू समुदायाच्या अंगावर काटा येईल अश्या भाषेत तिने/त्याने बोलायला सुरवात केली.
हा आवाज मी ऐकला होता. माझ्या ओळखीचा होता. कोणाचा होता बरे तो आवाज?
स्टेज संयोजकांची धावपळ सुरु झाली. कुणीतरी जोरात ओरडले
“अरे तिचा सप्लाय बंद करा. तिच्या डोक्यामागे स्विच आहे तो ऑफ करा.”
“खबरदार, कुणी मला स्विच ऑफ केलं तर. प्यारा ४(अ), असिमोव कोड प्रमाणे रोबोटच्या परवानगी शिवाय रोबोटला डी-एनर्जाइज करणे हा जाणून बुजून केलेल्या खुनाइतका गंभीर गुन्हा आहे...मी कोर्टात केस करेन. माझ्या अंगचटीला आलात तर तो माझा विनयभंग...”
दोघे जण धावत आले आणि त्यांनी रोबोटला उचलले, ती हात पाय झाडत होती, निसटायला बघत होती. ओरडत होती.
“अरे माझ्या असिमोवा, वाचीव रे...”
दोन बाप्यांच्या समोर बिचारी अबला रोबोट काय करणार? कार्यक्रमाचा विचका झाला होता.
“क्षमस्व, काही टेक्निकल स्नॅगमुळे आजचा कार्यक्रम इथेच संपवावा लागत आहे.”
तो आवाज कोणाचा होता?
हळूहळू कार्यक्रमाला हजेरी लावणाऱ्या प्रेक्षकांची पांगापांग सुरु झाली. लोक हलक्या आवाजात स्टेजवर घडलेल्या फिअॅस्कोची चर्चा करत होते. मला त्यात काडीचाही रस नव्हता. उलट कार्यक्रम लवकर संपला म्हणून मी मनोमन सुखावलो होतो. आता निदान इंग्लंडची बॅटिंग बघायला मिळेल ही शक्यता होती.
मी खुर्च्यांच्या रांगेतून वाट काढत होतो तेवढ्यात बाजूने येऊन कुणीतरी माझा दंड पकडला.
“हेल्लो, कुलकर्णी. मी कोकाटे. ओळख विसरलात कि काय?”
कोकाटे? कोकाटे कोण? ओ खरच कि. माझ्या डोक्यात प्रकाश पडला. कोकाटे फुल सुटेड बुटेड होते. बाजूला एक साधारण वीस वर्षांचा मुलगा आणि मुलगी होती. ह्या रुपात मी कोकाटेंना कधीच पाहिले नव्हते. त्यामुळेही असेल ओळख पटायला थोडा वेळ लागला.
“आधी मी ह्यांची ओळख करून देतो. हा माझा मुलगा रवि आणि ही मुलगी शोभना. रवि इथेच फिजिक्समध्ये पोस्टग्रॅड करतो आहे आणि शोभना मीडिया आणि कम्युनिकेशन मध्ये. हे काका तुम्हाला लहानपणी चोकलेट देत असत. आठवतंय?”
मला मिसेस कोकाटेंची आठवण होणे साहजिक होते. पण मी चूप बसलो.
मुलांनी हाय हेलो केलं.
“डॅड्स, आम्ही जातो. शोभू आता इथेच राहील. तीची झोपायची व्यवस्था मी केली आहे. अंकल गुड नाईट.” आणि ते दोघे निघून गेले.
“कुलकर्णी, चला आता माझ्या बरोबर माझ्या घरी. आपल्याशी खूप खूप बोलायचे आहे.”
मी टी-२० विसरून गेलो. माझ्यासमोर एक महान आश्चर्य घडले होते आणि ते समजून घेण्यात मला जास्त रुची होती.
कोकाटेंच्या शोफर ड्रिवन आलिशान कार मध्ये बसून... आम्ही निघालो.
aaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaa
ज्या कॉलेजमध्ये मी शिकवत होतो त्याच कॉलेजमध्ये एके काळी डॉक्टर कोकाटे विज्ञान शास्त्राचे प्राध्यापक होते. मला जस आठवत आहे त्या प्रमाणे इलेक्ट्रॉनिक्स हा त्यांचा हातखंडा होता. त्यांना लेक्चर्स नसतील तेव्हा ते कॉलेजच्या ग्रंथालयात वेळ घालवत. स्टाफ कॉमनरूम मध्ये क्वचितच दिसत. राजकारण, सिनेमा, क्रिकेट इत्यादी विषयात त्यांना कवडीचेही स्वारस्य नसावे. (क्रिकेट सोडून मलाही नव्हते.). सर्वसाधारणपणे कॉलेजमध्ये त्यांच्या सहकाऱ्यांचे त्यांच्या बद्दल काही खास चांगले मत नव्हते.
“झक्की माणूस आहे,” आखडू, दुर्मुख, आडमाप, तापट स्वभावाचा, तडकू, शीघ्रकोपी, भडक माथ्याचा अश्या शेलक्या विशेषणांनी त्यांची भलावण केली जात असे.
एकदा असाच स्टाफ कॉमन रुममध्ये आरडा ओरडा चालला असताना कोकाटे सरांनी प्रवेश केला.
“काय साला मच्छीमार्केट आहे की स्टाफ कॉमनरूम?” सगळे चूप. मग त्यांनी ध्वनिप्रदूषणावर एक व्याख्यान ऐकवण्यास सुरवात केली. सगळे एकेक करून नाहीसे झाले. उरलो फक्त मी एकटा!
मी तेव्हा मानव जातीच्या एकेक नमुन्यांचा अभ्यास करत असे,(तेव्हा. आता नाही.) मला हा नमुना मोठा इंटरेस्टिंग वाटत होता. त्यांच्या जवळ जायची इच्छा होती. त्याचबरोबर भीती वाटायची कि हा आपल्याला अंगावर पडलेल्या पाली प्रमाणे झटकून टाकेल.
तशी संधी लवकरच आली. मला वाटत की मी त्यांची बकबक मन लावून ऐकली असा त्यांचा गैरसमज झाला असावा.
“कुलकर्णी, एकदा घरी या ना. बसून मनसोक्त गप्पा मारू, काय?”
मी थोडे आढेवेढे घेण्याचे नाटक करून शेवटी हो म्हणून टाकले.
दुसऱ्या दिवशी कॉलेज झाल्यावर आम्ही दोघे बाहेर पडलो.
“माझ्या मोटारसायकलवरून जाऊ. चालेल ना?”
“का नाही चालणार.” चालेल ह्या शब्दावर फालतू पन करण्याचा इरादा होता. पण वेळीच स्वतःला सावरले.
रस्त्याने जाताना त्यांच्या तोंडाचा पट्टा अखंड चालू होता. एकूण चार सायकलस्वार, दोन स्कूटरवाले, एक गाय आणि एक डंपर आडवे आले. त्या सर्वांना शिव्या देत आमचा प्रवास चालला होत. विशेषतः डंपर ड्रायव्हरबद्दल मी जरा साशंक होतो. पण तो गरीब गायीपेक्षाही मवाळ निघाला. एक शब्दही बोलला नाही.
“कसा बोलेल? चूक त्याची होती. कुलकर्णी काय सांगू आपल्या लोकांना ट्रॅफिक सेन्स नाही. कायदा पाळावा अशी इच्छा नाही. हे आतून असावे लागते. हे साले सगळे उद्दाम हुसेनचे जावई, नातू-पणतू ना.”
कोकाटेंना अमेरिकन लोकांविषयी खूप आदर. अगदी भारावून बोलत.
“अमेरीकेतलीच गोष्ट ऐकवतो. कल्पना करा एक हाय-वे आहे. सरळ सोपाट. समोर दहा किलोमीटरवर मागे दहा किलोमीटरवर एकही गाडी नाही. रस्ता क्रॉसिंगचा सिग्नल लाल झाला. चिटपाखरू पण क्रॉस करत नाहीये. अमेरिकन ड्रायव्हर लगेच गाडी थांबवणार. इंजिन बंद करणार. हॅंड ब्रेक लावणार आणि सिग्नल हिरवा होण्याची वाट बघणार. नाहीतर आपल्या इकडचे लोक. साले.हरामखोर...” झालं, पुन्हा पट्टा सुरु.
(माझी पूर्ण खात्री आहे की जगातला –अमेरिकन कशाला- कुठलाही ड्रायव्हर जो ब्रेंडा( ब्रेन डॅमेज्ड ) किंवा वेडा नाहीये तो असं काही करणार नाही.)
एकूण कोकाटेंच्या पात्राचे थोडे फार दर्शन मला झाले होते. कथेत घुसडून देण्यासाठी चांगले कॅरॅक्टर होते ह्याची नोंद केली.
अखेर कोकाटेंचं घर आलं. दुचाकीवरचा शिव्यांचा सडा संपला होता.
शहराच्या जुनाट वस्तीत आम्ही आलो होतो. त्यातल्या त्यात कोकाटे जिथे रहात होते ती बिल्डींग जरा बरी होती. त्या बिल्डींगलाही झाली असतील चाळीस एक वर्षं. एका सिविल इंजिनिअर मित्राने मला समजावून सांगितले होते त्याची आठवण झाली. तो म्हणाला होता, “आता कोणी ताजमहाल बांधत नाही.
उभा आहे तीनशे चारशे वर्ष. आता पन्नास साठ म्हणजे डोक्यावरून पाणी.”
कोकाटेंचे बिऱ्हाड आले. बाहेरच्या दरवाज्यावर कोणीतरी पिवळ्या लाल खडूने लिहिले होते,
“डॉ कोकाटे इथे रातात. पण ते औषध देत नसतात.”
कोकाटेंच्या रहात्या जागेचे वर्णन करायचे झाले तर “गचाळ” हा एक शब्द पुरेसा ठरेल. भिंतीला कधी काळी ऑइल पेंट दिला असणार. तो फुगून त्याचे पोपडे निघत होते. तो कुठल्या रंगाचा होता ह्याबद्दल आता निश्चित अनुमान बांधणे हा पुरातत्वशास्त्रद्न्यांच्या संशोधनाचा विषय होता.
भिंतीवर एक कालनिर्णय होते. त्याच्या तारखेच्या चौकोनात काहीतरी लिहिले होते.(बहुधा दुधाच्या रतीबाचा हिशेब असणार.) समोरच्या भिंतीवर मण्यांच्या बाळाची फ्रेम लटकत होती ती सुद्धा आता जीर्ण झाली होती. टेबलावर रेडिओ होता. भिंतीवर घड्याळ होते. थोडे बारकाईने लक्ष देणाऱ्याला सहज दिसले असते कि त्यात एक वाजून पाच मिनिटे झाली होती. (बाहेर संध्याकाळचा सूर्य रेंगाळत होता.) केव्हाची वेळ होती ती? दुपारचे कि रात्रीचे एक वाजून पाच मिनिटे? आणि कालचे की दोन चार दिवसापुर्वीचे? कि दोन चार वर्षांपुर्वीचे?
त्या कळकट मळकट खोलीत काळाचा प्रवाह जणू थांबला होता, थिजला होता.
त्या जीर्णशीर्ण घरात एकाच गोष्ट नवीन होती. ती म्हणजे माझी उपस्थिती!
इतक्यात कोणीतरी रागावून ओरडले, “ए, भ**, आलास का परत? गेट लॉस्ट.”
मला धक्का बसला. तो आवाज मानवी खचितच नव्हता. कोण शिव्या देत होते? ते बंद घड्याळ का तो जुना रेडीओ? का मलाच भास होतायेत? कोकाटेंना काही ऐकू आलं नाही? का ऐकून न ऐकल्यासारखे करताहेत.
“बसा.” हातानेच सोफा झटकत कोकाटे म्हणाले.
“अ, हो हो.” म्हणत मी स्वतःला सावरत लाकडी सोफ्यावर स्थानापन्न झालो. सोफा डुग डूगत होता.
समोरच फरशीवर एक मुलगा- सात वर्षे- आणि एक मुलगी वय वर्षे –नऊ-( हे आपले माझे अंदाज बर का) चित्रांचे पुस्तक बघत बसले होते, ती कोकाटेंची अपत्ये असणार. त्यांना A टू Z सर्व जीवनसत्वांची कमतरता असावी अस वाटत होत.
कोकाटेंनी तिरसट आवाजात हाक मारली. “अग ए. जरा बाहेर ये.” माझ्याशी इतका वेळ गोड आवाजात बोलणाऱ्या कोकाटेंचा आवाज एकाएकी बदलला होता.
आतून एक तीस एक वर्षाची स्त्री ओले हात पदराला पुसत स्वयंपाक घराच्या दाराच्या चौकटीत येऊन उभी राहिली. तिच्या विषयी काही खास सांगण्यासारखं नव्हतं. मध्यमवर्गीय घरात शोभेल इतपत माफक सौंदर्यवती होती. चेहरा पूर्ण निर्विकार.
“दोन चहा कर.” हॉटेलात आपण ज्या स्टाईलने चहाची ऑर्डर देतो त्या स्टाईलने त्यांनी चहाची ऑर्डर दिली.
हॉटेलात आपण वेटरशी जास्त आदराने बोलत असू.
शिष्टाचार म्हणून देखील माझी साधी तोंडओळख करून द्यायची गरज त्यांना वाटली नाही. मलाच काहीतरी चुकल्यासारखे वाटले म्हणून मी जागेवरून उभा राहून त्या स्त्रीला नमस्कार केला.
“मी कुलकर्णी. सरांच्या बरोबर त्याच कॉलेजात...”
माझ वाक्य पुरे व्हायच्या अगोदर माझ्याकडे दुर्लक्ष करून ती स्वयंपाक घरात चालती झाली.
एकूण माउलीचा केवळ कोकाटेंच्यावरच नाही तर कोकाटेंच्या विश्वात सहभागी असणाऱ्या सर्वांच्यावर आकस असावा.
इकडे भावा बहिणीचे भांडण जुंपले. भावाने बहिणीच्या वहीवर पाणी सांडले होते. भाऊ बहिणीच्या झिंज्या ओढत होता. मग बहिणीने भावाच्या पाठीत एक सणसणीत धपाटा हाणला. भावाने भोकाड पसरले. अशा वेळी आता कोकाटेच्या जागी दुसरा कोणी असता तर त्याने काय केले असते? त्याने दोघांना जवळ घेऊन प्रेमाने समजावले असते. उगी केले असते. कदाचित रागावण्याचे नाटक केले असते. पण कोकाटे असं करतील तर ते कोकाटे कसले? उलट त्यांनी मला पाण्याचे गुणधर्म समजाऊन सांगायला सुरवात केली. चार सेंटीग्रेड तापमानाला पाणी कसे झोंबिसारखे वागते वगैरे वगैरे. ते जणू वर्गात पोरांना शिकवत होते. शेवटी ते म्हणाले.
“आपण आज जे पाणी पितो ते डायनासोर, मॅमथ, देवमासे, चिंपांझी, निअन्दरथाल, गुरढोरं, तुतन-खामेन, क्लिओपात्रा, युक्लीड, अर्कीमेडीस, रानटी टोळीवाले, चौदावा लुई, न्यूटन, आयलर, बाजीराव आणिक मस्तानी...( यादी लांबलचक आहे.) ह्यांनी उष्टं केलेलं आहे. पृथ्वीवर प्रथम जे पाणी तयार झाले वा बाहेरून आले, कुलकर्णी सर, लाखो वर्ष झाली, आजही आपण तेच पाणी पीत आहोत.” अस बोलून त्यांनी भाषणाचा समारोप केला.
हे सांगेस्तोवर इकडे भाऊबंदकीने विराट रूप धारण केले होते... इतका वेळ कोकाटेंनी त्याच्याकडे पाण्याच्या नादात दुर्लक्ष केले होतो. पण आता त्यांनाही ऐकवेना.
डॉ. कोकाटे प्राध्यापक, इलेट्रोनिक्स उच्च स्वरात कानाला ऐकवणार नाही असं काही बाही अद्वा तद्वा भाषेत मुलांवर आरडू लागले. माझ्या सारख्या शिव्या संग्राहकाला देखील बर्याच शिव्या अनोळखी होत्या. शेवटी आतून कोकाटेंची बायको बाहेर आली नि दोघांच्या बखोटीला धरून फरफटत खसाटत आत घेऊन गेली. गलका थांबला.
का कुणास ठाऊक मला चार्ल्स डिकन्सच्या कादंबरीतील गूढ सरिअल वातावरणाची आठवण झाली. कशाला मी माणसाबरोबर इथे आलो. आणि ह्या विचित्र विश्वात अडकलो? मनात आले कि इथून पळून जावे. भाडमे गया कोकाटे.
इतक्यात त्या स्त्रीने चहाचे कप आणून स्टुलावर आदळले.
“नरड्यात ओता आणि काळे तोंड करा तुमच्या प्रयोगशाळेत.” पुन्हा कोणातरी आरडले. ह्या घरात भुतांची वस्ती तर नव्हती? ती दोन मुले आणि ती स्त्री. त्यांचा आवाज बंद झाला होता. हा कोकाटे तरी खरा होता कि... मी स्वतःच्या मनाला आवर घातला. नाहीतर मी सुद्धा वातावरणात वाहून गेलो असतो.
“तुम्ही बुद्धिबळ खेळता?” कोकाटेंच्या ह्या प्रश्नाने माझे बहकलेले मन ताळ्यावर आले.
“थोडं, थोडं,” मी सावधपणे बोललो. आता ह्या क्षणी कोकाटे बरोबर मला डाव टाकायची इच्छा नव्हती.
“मग चला. मी तुम्हाला एक गंमत दाखवतो,”
कुठलीही नवीन “गंमत” बघायची मला हिंमत नव्हती. बघितली तेव्हढी “गंमत” पुरेशी नव्हती का?
“अहो त्यासाठीच मी तुम्हाला घरी आणले आहे. हे माझे टॉप सिक्रेट आहे. त्याचे दर्शन घेणारे तुम्हीच पहिले आहात. तुम्ही सुजाण आहात म्हणून.”
आता मला काय बघावे लागणार आहे अशी भितीयुक्त उत्सुकता माझ्या मनात दाटून आली,
(भाग -१ समाप्त)
(भाग -२ https://www.maayboli.com/node/82661#new)
Pubhapra
Pubhapra
लेख खूप मोठा आहे.नक्की
लेख खूप मोठा आहे.नक्की तुम्हाला काय व्यक्त व्हयाचे आहे ते समजत नाही.
१) देव ह्या विषयावर माणूस काहीच निष्कर्ष काढू शकत नाही
मानव त्या लायकीचा नाही .मानवी मेंदू हीच निसर्गाची देणगी आहे
माणसाचे कर्तृत्व झीरो.
२) विविध ऊर्जा ची माहिती आज आहे त्या नुसार भूत असणे काही कवी कल्पना नाही ते सत्य असू शकते
३) रोबोट मध्ये जो पर्यंत चेतना येत नाही तो पर्यंत रोबोट आणि घरातील पंखा एकच लायकीचा आहे
Switch ऑन केला की चालू बंद केला की बंद ..
पण चुकून रोबोट मध्ये चेतना आली तर माणूस हा प्राणी पूर्ण नामशेष झाला असेल
माणसाचा टिकाव रोबोट समोर लागू शकतं नाही.
ईंटरेस्टींग आहे.
ईंटरेस्टींग आहे.
पुढील भागाची उत्सुकता लागून राहीलीय..
लवकर टाका
छान आहे, येऊ द्या पुढचे भाग
छान आहे, येऊ द्या पुढचे भाग
लहानपणी एकदा जयंत नारळीकरांची एक कथा वाचली होती ती आठवली.
इंटरेस्टिंग कथा
इंटरेस्टिंग कथा
मस्त फ्लो जमलाय
पटापट येऊ द्या पुढचे भाग
मस्त रंगवला आहे हा भाग.
मस्त रंगवला आहे हा भाग. पुभाप्र.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
सर्व प्रतिसादकांचे आभार.
भाग दुसरा टाकला आहे.
हेमंत ३३ तुम्ही पूर्ण कथा वाचा. मग आपण चर्चा करू.
चित्रदर्शी, रंजक...
चित्रदर्शी, रंजक...
सुरवातीला आधीच्या भागाची आणि शेवटी पुढच्या भागाची लिंक दिली तर माझ्या सारख्या लेट लतीफांची सोय होईल.