सायकलचे दिवस

Submitted by shabdamitra on 8 November, 2022 - 21:17

सॅनफ्रान्सिस्कोमध्ये काही वर्षांपासून share the bike उपक्रम सुरु झाला. ठराविक रक्कम दिली की दिवसभर, अथवा काही तास सायकल वापरायची.

आताच समजले की पुण्यातही ही योजना सुरु झालीय. फॅशनच्या बाबतीत -कपड्यांची, दागिन्यांची किंवा सदऱ्याच्या कॅालरची असो- पुन्हा त्याच जुन्या फॅशन नव्याने येतात असे म्हटले जाते. ते खरेही आहे. त्याची आठवण share the bike ऐकल्यावर झाली. मी शाळा कॅालेजात असतानाच नव्हे तर नोकरीच्या काळातही आमच्या गावात व इतरत्रही ही योजना होती. त्यावेळी योजना, उपक्रम , नाविन्यपूर्ण कल्पना किंवा 'किती कल्पक असतात लोक 'असले भारदस्त किंवा गौरवाचे शब्द नव्हते ह्यासाठी. साध्या बाळबोध,स्पष्ट शब्दांत, ' सायकली भाड्याने मिळण्याचे दुकान' म्हणत. स्वत: दुकानदार,"चौंडे सायकल मार्ट' किंवा " गोन्यल बंधू सायकल मार्ट" नाव लावून व्यवसाय करत.

चौंडेअण्णांच्या सायकली नव्या कोऱ्या दिसत. सायकलीचे भाडे दोन आणे तास. दुसरे काही दुकानदार एक आणा तास लावत. पण सायकली जुन्या असत. क्वचित कोणी दिवसाचे भाडे ठरवून सायकल नेत. पण बहुतेक जण तासावर सायकल नेत. जितके तास तितक्या तासाचे भाडे द्यायचे. सरळ व्यवहार.

हां, गोष्टी इतक्या सरळ नव्हत्या आणि नसतातही! आम्हाला पहिला झटका बसायचा तो दहा पंधरा मिनिटे जास्त झाली तरी किमान अर्ध्या तासाचे भाडे भरावे लागे. " पण मालक मी पावणे तीन वाजता नेली होती. तुमच्या दशरथला विचारा!" त्यावेळी दशरथ नेमका पंप घेऊन बाहेर कुणाच्या तरी सायकलीत हवा भरायला पळायचा! दशरथच तो, मालकापुढे तो ‘धैर्यधर’ थोडाच होणार ! मग मुकाटपणे पैसे भरायचे पण ते देताना "मी तर ३:५०लाच सायकल आणली" असे पुटपुटलो तर "घड्याळ हाये का तुझ्याकडं?दुकानातल्या घडाळ्याकडे पाहात मालक विचारणार! "नाही. पण तुमचं घड्याळ पुढं आहे." मालक म्हणणार, "अब्ये सायकल नेताना ह्येच होतं की." चला जाऊ दे असे मनात म्हणत घाम पुसत बाहेर पडायचो.

नंतर त्या दुकानात न जाता रस्यासमोरच्या साळुंखेच्या दुकानातून घ्यायची. निघताना आठवण ठेवून," किती वाजले?" विचारून घ्यायची. हापिंग करत चार चाकं पुढे गेल्यावर समजायचे की अरे मागच्या चाकात हवाच नाही! दुकानात जाऊन सांगितले हवा नाही म्हणून. “पंम्च्यर केला काय तू, आं?" दोन नोकरांकडे बघून मालक म्णायचे. नोकरही तेच त्यांनाही पुन्हा सांगणार. एक नोकर लगेच म्हणणार "अरे! मी तर आताच पंप मारून ठेवलो की!" दुसरा नोकर लगेच ," आणि हा बाद्दर हंपिंग करत करत मस्त गेला होता की!" मी गोरामोरा होऊन,"अहो मी इथुनच परत आलो की. हापिंग करत करत काय मी बाळ्याच्या ओढ्याला गेलोतो का? बाळ्याच्या ओढ्याला आमच्या गावचे स्मशान आहे!

मग कुरकरत म्हंम्हद का ज्यालिंदर हवा भरून द्यायचे. सायकल परत द्यायला आलो. सायकलचा प्रत्येक पार्ट तपासून त्यांनी ती घेतली. आणि नोकर मालकाकडे पाहून म्हणाला," मालक पुढचा ब्र्येक नाही. माझ्या पोटात गोळा आला. दोन आणे तासाचे आणि दोन आणे ब्रेकच्या रबराचे. "चार आणे झाले." मालकाने जाहीर केले. कुठले चार आणे देणार मी. तासाच्या वर होऊ नये म्हणून सगळ्या चढांवर जीव खाऊन खाऊन पायडल मारत मारत घामेघुम होऊन आलो होतो. टॅालस्टॅायच्या, निघण्याच्या ठिकाणी सूर्य मावळायच्या आत पोचले पाहिजे म्हणून जणू रक्त ओकत पळत येणाऱ्या, शेतकऱ्याप्रमाणे मीही एक तास व्हायच्या आत धापा टाकत आलो होतो. मालकाला म्हणालो," मी ब्रेक कुठेही लावला नाही. पुढचा तर नाहीच नाही. तो तर कुणी लावतच नाही."" नाही, मीच तो पाडला हिथं दुकानात बसून."मालक तिरके बोलत होता.बरीच बौद्धिक चर्चा आणि परिसंवाद व्हायचे. “लहान हायेस म्हणून सोडला. पण पुना न्येताना सगळी सायकल तपासून न्येत जा, काय?" हे ऐकून घरी यावे लागे.

त्यानंतर पुन्हा दुकान बदलायचे. आता गोन्यल कडून घ्यायची. सायकली जुन्या असायच्या पण ही सर्व माणसे राजा आदमी वाटायची. शिवाय एक गोन्यल आमच्या भावाच्या वर्गात होता. तरीही किती वाजता घेतली, ब्रेक ची सगळी रबरं आहेत ना, सायकलची साखळी आहे ना पाहून घेतले. चाकं दिसत होती म्हणून ती पाहिली नाहीत! दोन्ही पायडलची एकेक रबर नव्हते. पण पायडल होती. जाऊ दे,असू दे म्हणत हापिंग करत सायकल वर टांग मारून निघालो.

आज लांब जायचे होते. तरी पण अर्ध्या तासात परतायचेच ह्या निश्चयाने I can do, I can doघोकत निघालो. काय झाले कुणास ठाऊक. पायडल छान फिरू लागले पण सायकल पुढे जाईना. सायकलची साखळी घसरली होती. "अर्धा तास, अर्धा तास" स्वत:लाच बजावत साखळी बसवायला लागलो. पण मला काय ते जमते?! पुढच्या चक्रावर बसवली की मागच्या लहान चक्रावरून घसरायची. दोन तीन वेळा ‘प्रयत्नांती परमेश्वर’ म्हणत म्हणत प्रयत्न करत राहिलो.पण ते फक्त प्रयत्नच झाले.

माझ्याच बरोबरीच्या एका पोराने माझी खटपट पाहिली. काय केलं कुणास ठाऊक त्याने. पण दोन्ही चक्रांवर हात ठेवून बोटे सफाईदार फिरवून चेन बसवली. फार आनंद झाला. तरी पण तो आनंद त्याने फार काळ टिकू दिला नाही." चेन बशिवता न्हाही येत; सायकल चालिवतो म्हणे." असे म्हणत माझी किडा-मुंगी करत तो माझ्यातली हवा काढून गेला.

मी निघालो. अर्धा तास, अर्धा तास असे बजावत चालवत होतो सायकल. थोड्याच वेळात एक चाक फुसफुसू लागले. पुन्हा धसका. पंक्चर नक्की. घाम पुसायचेही सुचत नव्हते. तशीच ढकलत रस्त्याकडेला एका खोक्यावर पंक्चरच्या औषधोपचाराची सर्व औषधे नीट ठेवून, शेजारी मळकट पाणी भरलेली पाटी , असा साधारणत: माझ्याच वयाचा छोटा शिलेदार होता. त्याला काय झाले ते सांगितले. त्याने चाक वगैरे काही न काढता फक्त हवा भरतात ते नाकाडे आट्या फिरवुन काढले. लाल रबराची लहानशी गुंडाळी पाहिली. ती गेल्याचे सांगितले.

“पंक्चर नाही ? पंक्चर नाही?”ह्या आनंदात बेहोश होऊन, दोन तीन वेळा हेच विचारून त्याला सतावल्यावर तो म्हणाला, "ते माहित नाही. ही व्हालटूब गेलीय." त्याने ती बसवली. हवा भरली. मी निघणार तेव्हा म्हणाला, "थोडं थांब." त्याने दोन तीन ठिकाणी कान लावून हात वरून फिरवून हवा भरतात त्या नाकाड्यावर थुंकी लावून पाहिले. आणि मला जायला परवानगी दिली. एक आणा घेतला त्याने पण मला चेन बसवून देणाऱ्या पोराप्रमाणे नामोहरम केले नाही.

पुन्हा दात ओठ खात सायकल दामटत निघालो. दुकानात आल्यावर इकडे न पाहता घड्याळाकडे पाहिले. आता माझी हवा पूर्ण गेली ! दोन आणे होते.एक आणा दुरुस्तीला गेला. अर्धा तासच काय त्याहून पंधरा वीस मिनिटे जास्तच झाली होती. पण गोन्यल बंधू दिलदार होते. मी एक आणा दिल्यावर,” हरकत नाही म्हणाले;पुढे बघू “.

सायकल दुरुस्तीचीही अशी लहान-मोठी, टपऱ्या, रस्त्यावर केवळ एक पंप घेऊन हवाभरून देणारी मुलेही असत. तशीच पंक्चर काढून देणारी,खोक्यासह बसलेलीही मुले असत. त्यामुळे रस्त्यावर सायकल बिघडली तरी चिंता नसे. बरे दुरुस्त्या करणारे सर्व वयाचे होते. पण त्यातही दहाबारा वर्षांपासूनची मुले बरीच असत. दुरुस्ती म्हणजे पंक्चर काढणे, हीच जास्त असे. त्यामुळे " पंम्चर काढून मिळेल" ही पाटी सगळीकडे दिसत असे.

पंक्चर काढताना पाहणे हा एक कार्यक्रमच असायचा आमच्यासाठी. पण आता माझ्यावरच बेतल्यामुळे धसका होता. एक जाडसर पाना, टायर आणि चाकाच्या खाचेत घालून दुसरीकडे कानशीसारखे पसरट हत्यार घालून आलटून पालटून ती हलवत, टायर चाका पासून थोडे सैल करून दोन्ही हातांनी आतली ट्यूब बाहेर यायची.ती निघाली की आमच्या चेहऱ्यावर अरे व्वा! असे भाव दिसायचे. मग तो मुलगा संपूर्ण टायरच्या आतून डॅाक्टर घेतात तितक्या काळजीने हाताची बोटे फिरवायचा. चुक, तारेचा तुकडा,खडा वगैरे नाही ह्याची खात्री झाली की मग तो ट्यूबकडे वळायचा. दुसऱ्या घराण्याचा कलावंत ही क्रिया पंक्चर वगैरे काढून पुन्हा ट्यूब आत बसवण्यापूर्वी करायचा. पण हात की सफाई तशीच ! आता मुख्य कारवाईची सुरवात. प्रथम ट्यूब मध्ये हवा भरायची. की लगेच ती ट्यूब थोडीशी हवेत, रूमाली रोटी सारखी फिरवल्यासारखी करत पाण्याच्या पाटीत दोन्ही हातानी तिचा प्रत्येक भाग दाबत दाबत पाहत जायची. आम्ही त्यावेळे पासून जे मान पुढे करून त्या पाटीमध्ये पाहायचो की अर्जुनानेही मस्त्यवेध करताना इतक्या एकाग्रतेने, पाण्यातल्या फिरत्या माशाकडे पाहिले नसेल!

आणि पंक्चर सापडले की तो आम्हाला ती ट्यूब पु्न्हा पुन्हा दाबून त्या ट्यूबमधून वेगाने येणारे बुडबुडे दाखवायचा. लगेच तिथे मास्तरांप्रमाणे कार्बनच्या पेन्सिलीने सुरेख जांभळा गोल करायचा. पण तो कसबी कारागिर तिथेच थांबत नसे. सर्व ट्यूब त्या पाण्यात पोहल्याशिवाय आणि दुसरे पंक्चर नाही समजल्यावर तो निराशेने पाणी झटकायचा. आम्ही मात्र एकच पंक्चर म्हणत सुटकेचा निश्वास सोडायचो.ह्यानंतर तो cosmetic शल्यचिकित्सक व्हायचा. कानस काढून त्या गोलावर घासायला लागायचा.जोर अति नाही की वरवरचा नाही. ती ट्यूब पुरेशी खरखरीत झाली की ते छिद्र पुरेसे झाकले जाईल येव्हढा रबराचा तुकडा कापायला लागायचा. ही कलाकारी पाहण्यासारखी असते.

काही ‘पंक्चरवाले- सर्जन ‘ चौकोनी कापतात तर काही गोल.पण तो चौकोनही अगदी काटकोन चौकोन नसायचा. त्याच्या चारी कोपऱ्यांना तो इतक्या सहजतेने गोलाई द्यायचा. कात्री एकदाही न थांबवता! सिनेमाच्या पडद्यासारखा दिसणारा तो तुकडा पाहात राहावा असा दिसे. आणखी दुसरी कौतुकाची गोष्ट म्हणजे त्याची कात्री. काय तिची धार असेल. ना मध्ये तिचे अडखळणे की दबकत बिचकत जाणे. हा कारागिर ती फिरवतोय का ती कात्री त्याचा हात धरून फिरवतेय समजत नसे! तसाच गोलाकार कापताना, तो तुकडा पहिल्याच प्रयत्नात गोल व्हायचा.तो तुकडा त्या ट्युबवर चिकटवणे म्हणजे जिभेला चाटून पोस्टाचे तिकीट चिकटवण्याइतके गद्य काम नव्हते.

बरेचसे पारदर्शक असणारे ते द्रव तो बोटाने थोडेसे ट्युबच्या त्वचेला लावायचा. आणि थोडे त्या कापून घेतलेल्या रबराच्या तुकड्याला बोट फिरवून लावायचा. आणि त्यावर फुंकर घालून त्या छिद्रावर पटकन चिकटावयाचा. एकदा दोनदा बोटाने दाबायचा. पण ते grafting इकडे तिकडे सरकू न देता! अजून शस्त्रक्रिया पूर्ण झाली नाही. आता cosmetic सर्जनचे काम संपले. आता orthopedic सर्जनची भूमिका तो वठवायचा. वईसाचे हॅंडल एका फिरकीत तो वर न्यायचा; मधल्या ऐरणीवर तो त्या ट्युबचा भाग ठेवून वईसाच्या हॅंडलला अशी शैलीदार गिरकी द्यायचा की वईसाने त्या ट्युबला आपल्या तावडीत कधी घट्ट धरून ठेवले ते तिलाही समजायचे नाही. लगेच दुसऱ्या गिऱ्हाईकाच्या सायकलकडे वळायचा. पुन्हा तो मोठा पाना व लोखंडी पट्टी आत बाहेर करत त्या टायरचे आतडे तो मोकळे करायचा. तोपर्यंत आमच्या ट्युबची सौदर्यशस्त्रक्रिया संपलेली असे. पुन्हा ट्युबचे आतडे जागी जायचे. हवा भरण्यासाठी दुसऱ्या कुणाला सांगितलेले असायचे.

हवा भरणारा कसरतपटू असे. साधा पंप तो काय आणि हवा भरणे असे किती तांत्रिक असते! पण नाही, हा त्यात आपले अभिनय कौशल्य, नृत्यकलेची ओझरती झलकही दाखवायचा. पंप मोठा. हा त्या पंपापेक्षा थोडासाच जाड!

पंपाच्या पायावर आपला पाय दाबून हा त्या पंपाचे हॅंडल धरून पंप पुढे मागे हलवत एक पाय मागे थोडा उंचावून दट्या दाबायचा. त्यावेळी मान खाली करून पुन्हा पटकन वर झटकवत, दट्ट्यावर रेलून, तो वरच्या हॅंडलसह पंप मागे पुढे करत दट्ट्या दाबणार. पाय मागे किंचित लंगडी घातल्या सारखा करत पुढे झुकणार आणि मागे येताना म्हंमद असेल तर केसाला झटका देऊन हसणार ; गजा असेल तर मान इकडे तिकडे फिरवत हसणार. पण हे दहा बारा वेळा इतके शिस्तीत चालायचे की पहात राहावे. मग आमच्यापैकी कुणीतरी मी मारु का पंप म्हटल्यावर हां म्हणायची ती पोरे. आम्हाला काय जमते त्यांचे भरतनाट्यम! ते नाट्य तर नाहीच पण पंपाचा तो दट्ट्याही खाली जायला दहा मिनिटे लागायची! थांबत थांबत तो खाली नेत असू. पंपातली हवाही हलायची नाही! ती मुले हसायची. ही विद्या तरी त्यांचीच,असे त्यांना वाटत असावे.

सायकली म्हणजे त्यावेळचे सर्वांचे वाहन होते. रिक्षा अजून आल्या नव्हत्या. बसचेही काही खरे नव्हते. बराच काळ त्या नव्हत्याही. त्यामुळे सायकल भूषण होते. ही सायकली भाड्याने देणारी दुकाने होती म्हणून अनेकांची मोठी सोय होती. लहान पोरांसाठीही एखाद्या दुकानात कमी उंचीच्या एक दोन सायकली दिसत.

नविन सायकल घ्यायची ठरले तर घरात कितीतरी अगोदर दिवस-रात्र चर्चा,वादविवाद,चिडाचिड, चालत असे. कुठल्या कंपनीची घ्यायची ह्यावर दोन तीन दिवस गुऱ्हाळ चालायचे. पण सायकल काही एक दोन वर्षे यायची नाही. तरी तिच्या गप्पा मात्र चवीने व्हायच्या!

रॅले, फिलिप्स आणि त्यानंतर हर्क्युलिस. तीन ब्रॅंड जोरात होते. रॅले नंबर एक. त्यातही तिच्यातील हिरव्या रंगाची सर्वांची आवडती. पण त्या फारशा मिळत नव्हत्या लवकर. बरं नुसती सायकल घेऊन चालायची नाही. त्याला दिवा पाहिजे. कायद्याने रात्री दिवा लावणे भागच होते. लहान कंदिलासारखे दिवे बहुतेकांचे असत. कायद्यापुरता प्रकाश पडे. पुढच्या चाकाच्या मर्डगार्डवर मिणमिणता पडला तरी "लै पावरफुल्ल" म्हणायला लागायचे. त्यानंतर आली चौकोनी लहान डब्याची बॅटरी. हॅंडलच्या खालच्या बाजूला हुकासारखी पट्टी असते त्यात ती अडकवायची. त्याचा उजेड बरा पडायचा. पण बॅटरी संपत आली तरी लोक वापरायचे. सिगरेटचे थोटुक किंवा उदबत्तीचा विस्तव जास्त प्रकाशमान असेल. पण पोलिसाला दाखवायला पुरेसा वाटे. "आता बॅटरीचाच मसाला आणायला चाललोय" इतके सांगून सटकायला तो निखारा कामाला यायचा. काही खमके पोलिस मात्र," अब्ये कुणाला ववाळायला निघाला तू ह्ये अगरबत्ती घ्येवून आं? कानफटात हानल्यावर मग लाईटी चमकेल तुझा." म्हणत पावती पुस्तक काढायचा.लगेच आमची खरी तत पप,तत पप ची भाषा सुरु व्हायची.

मागच्या चाकापाशी लावलेला डायनामो आणि पुढचा हेडलाईट ही खरी शान असायची. आणि त्यातही हिरवी रॅले! मग काय! हायस्कूल कॅालेजात तो सायकलवाला सगळ्याजणींचा स्वप्नातील राजकुमारच असायचा.

सायकलची निगा राखणारे शौकिनही होते.त्यांची ती 'जीवाची सखी'च असे. तिला रोज पिवळ्या मऊ फडक्याने(च) पुसायची. इतकेच काय मागचे लोंबते रबरही साबणाने धुवून टॅावेलने पुसून ठेवायचे. दर रविवारी,पिटपिट आवाज करणाऱ्या डबीच्या नळीतून तेल पाजायचे. त्या जागांची तांत्रिक नावे घेऊन गप्पा मारायच्या.

"पायडल, हॅंडवेल,सीट, बिरेक" येव्हढा शब्दसंग्रह असला की सायकल चालवता येत असे. विशेष म्हणजे हे शब्द ह्याच पद्धतीने म्हणणारेच सायकल चालवण्यात तरबेज होते. दोन्ही हात सोडून भर गर्दीत शिटी वाजवत सायकल दडपून नेणे, किंवा मधल्या दांडीवरून 'हॅंडवेलवर' पाय टाकून आरामात उतारावरून जाणे,एकाच वेळी तिघांना घेऊन जाणे असले कसरतीचे प्रयोग हीच मंडळी करत. बाकी आम्ही फक्त सायकल या विषयावर दिवसभर बोलू शकत असू ! एखादा फार हुषार सायकलीत कुत्रे कशाला म्हणतात असा रहस्यमय प्रश्न विचारून तोंडी परीक्षा घ्यायचा. आम्ही त्याला हड् हड् करत टाळत असू. त्याचबरोबर सीटला 'सॅडल' किंवा मध्येच 'हब' वापरून इंप्रेशन मारणारेही असत!

दिवा असूनही तेव्हढा रुबाब येत नसे.तो डायनॅमोचाच हवा. साखळीला गार्डची खोळ पाहिजे. तिही फक्त एका झाकणासारखी असली तरी लक्ष देत नसत मुले. पूर्ण दोन्ही बाजूनी चमकदार, चकचकीत, आणि चेनला पूर्ण झाकणाऱ्या,तिला कुलवंत घराण्यातली करणारे गार्ड असले की लोक सायकलकडे जरा दबून आदराने पाहायचे.

आता डोळ्यापुढे ती कायम नवी दिसणारी हिरवी रॅले, खटका दाबला की मागच्या टायरला डायनॅमो चिकटून चाक फिरले की मोठा लांब झोत टाकणारा मोटरच्या हेडलाईटसारखा दिवा, ते अंगभरून आणि डोईवरून चेनने पदर घेतलेले शाही गार्ड, मागच्या चाकावर बसवलेले कॅरिअर, चिखल उडू नये म्हणून लावलेले मागच्या बाजूचे रबराचे झुलते पदक, टेल लॅम्प च्या तांबड्या चकतीचा कुंकवाचा टिळा लावलेले मागचे बाकदार मडगार्ड आणि इतरांच्या घंटीपेक्षा वेगळाच आवाज काढणारी घंटी, सायकल उभी करायची तीही शैलीदार पद्धतीनेच आणि त्यासाठी तिला एक मुडपुन ठेवता येईल असा पाय जोडलेला; बेफिकिरपणे पण सहज,दिला न दिला,अशा झटक्याने तो खाली आणून त्यावर, पुढचे चाक मान वेळावून पाहते अशी ठेवलेली सायकल असल्यावर जगाचे राज्यही त्यापुढे तुच्छ असायचे.पण अशी सकलगुणमंडित,सालंकृत सायकल पहायला मिळण्यासाठी सुद्धा कुंडलीत योग लागत.

माझा मित्र, बंडूने चौडेअण्णांच्या दुकानातून नवी कोरी सायकल विकत घेतली. त्या सायकलचे हॅंडल एकदम नव्या पद्धतीचे. त्याच्या दोन्ही मुठी मधल्या दांड्यापेक्षा वरती आणि बाकदार होत्या. बसणाऱ्या स्वाराच्या दोन्ही हातांची गणितातल्या कंसासारखी नक्षी व्हायची. सायकल चालवणारा रुबाबदार दिसायचा! सायकल नवीन आणि हॅंडल त्याहूनही नवीन! त्यामुळे सायकलवर बसलेला बंडूही स्टायलिश दिसायचा; दोघांकडेही मुले टकमक पाहायचे. प्रत्येक जण त्याला 'एक चक्कर मारु दे रे' म्हणत विनवणी करायचे. बंडूनेही सगळ्यांना ती फिरवायला दिली. नव्या सायकलमुळे एक दोन दिवस बंडूकडेच सगळ्यांची वर्दळ असायची!

गावात अजून मोटारी दिसत नव्हत्या. संपूर्ण गावात चार पाच असतील. त्याही सारख्या फिरत नसत. म्युनसिपालिटीचे दोन चार ट्रक असतील. पण त्या काही मोटारी नव्हेत. ते सायकलचे दिवस होते. त्याही अति झाल्या नव्हत्या. तसे म्हणायचे तर दोनच प्रकारचे लोक.चालणारे आणि सायकलवाले.

नोकरीत असतानाही मी सायकल भाड्याने घेउन काम करीत असे. जळगावला आमच्या घराजवळ असलेल्या नाईकांच्या दुकानातून सायकल घेत असे. मी त्यांच्याच गल्लीतला. आणि टाय बूट वगैरे घातलेला त्यामुळे नाईक बंधू मला नवी सायकल देत. असे मला वाटत असे! ती देण्याअगोदर चांगली स्वच्छ पुसून, हवापाणी तपासून देत. आणि खरंच तशी कसलीही कुकरकु न करणारी सायकल चालवताना एक निराळेच सुख उपभोगतोय असे वाटत होते. कधीतरी माझ्यातला शाळकरी जागा व्हायचा. नाईकांना विचारायचा, "हिरवी सायकल नाही ठेवत तुम्ही?" त्या सज्जन भावांनी, " नाही; पण आणणार आहोत आम्ही," असे सांगितले. महिना दोन महिने उलटून गेल्यावर त्यांनी मला थांबायला सांगितले. दहा पंधरा मिनिटांनी त्यांच्यातील एकजण,एक डौलदार वळण घेत हिरव्या सायकलवरून आला.पुन्हा एकदा फडक्याने पुसत ती मला दिली. त्या तरूण मुलांचा एव्हढा चांगुलपणा दिलदारपणा पाहून मन खरेच भरून आले होते त्या दिवशी.

चाळीसगावलासुद्धा मी सायकलवरून काम करत असे. स्टेशनच्या समोरच सायकलींची दुकाने होती. तो सिंधीही चांगली सायकल काढून द्यायचा. बामणोदहून भालोदला जायला त्या दिवसांत फार एसटी नव्हत्या. पण त्याबदली सायकलीचे दुकान होते. विशेष म्हणजे त्याकाळचे सायकलींचे ते u-Haul किंवा Enterprise, Herstz होते. बामणोदची सायकल भालोदला देता येत होती! पाच सहा मैल अंतर होते. तो दुकानदारही मला त्यातली बरी सायकल काढून द्यायचा. म्हणजे दोन्ही मडगार्ड थडथड करण्या ऐवजी एकच मडगार्ड आवाज करायचे ! तसाच एक तरी ब्रेक लागत असे. रस्ता बरा होता. पण पावसाळ्यात उखडला जायचा. त्यामुळे घोड्यावर बसून चालल्यासारखे वाटायचे. मध्ये मध्ये सीटवर न बसता उंच होऊन चालवावी लागे. परतताना भालोदहून पन्हा सायकल घ्यायची आणि बामणोदला परत करायची. किती सोय होती!

आजही अनेक गावात त्यांची त्यांची चौडे सायकल मार्ट, गोन्यल बंधू,नाईक सायकल्स, इंडिया सायकल डेपो सारखी लोकोपयोगी दुकाने असतीलच.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले.सायकलवाल्यांमधीलही बहुसंख्यांसाठी, -Share the bike चे मूळ रूप असलेली- "सायकली भाड्याने मिळतील" ही दुकाने म्हणजे केव्हढी सोय होती!

[You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog ]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय.
भाड्याची सायकल घेऊन शिकण्याची धडपड आठवली.
शिकाउ मेंबर खास मधला दांडा नसलेली सायकल साठी वाट बघायचे.
सायकल चालवायला जमलं त्या दिवशी जगावर राज्य केल्याची भावना होती मनात.
मी कॉलेजात जायला लागलो तेव्हा सायकल घेउन येणारे विद्यार्थी 90 टक्के जवळपास.
तेव्हा हिरो आणि अटलास दोन ब्रँड फेमस.
मला मात्र वडलांनी जुनी रॅली कंपनीची सायकल विकत घेऊन चकाचक रंगरंगोटी सहित दुरुस्त करून दिलेली.
निम्या किमतीत हे काम व्हायचे म्हणून असे करणारे देखील खूप जण होते. छोटया शहरातील कमी पैशातील जुगाड.
खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

<<छान लिहिलंय. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. >>+१

<<शिकाउ मेंबर खास मधला दांडा नसलेली सायकल साठी वाट बघायचे.>> हो ना. पण लहानपणी लहान सायकल, मग मधला दांडा असो नसो, चालायची. त्यातली सगळ्यात चांगली आणि चांगल्या रंगाची सायकल मिळाली की स्वर्ग गाठल्या सारखा आनंद व्हायचा.

लेख आवडला.

अनेक आठवणी जाग्या झाल्या.
एक गंमतीदार आठवण म्हणजे आम्ही गोव्यात बिचोलीला भाड्याने सायकली घेतलेल्या करमळी म्हणून एक गाव आहे तिथे जाण्याकरता. त्या गावात ब्रह्मदेवाचे देऊळ आहे. गोव्यात रवीवारी आणि इतक्या आडवाटेला बससेवा उपलब्ध असेल नसेल म्हणून भाड्याच्या सायकली घेऊन ते मंदीर बघायला गेलो होतो. आम्ही घेतल्या त्या सायकलींना ब्रेकच नव्हते त्यामुळे उतारावर, आणि चढणीच्या रस्त्यांवर चढामुळे असे जवळपास अर्धेअधीक अंतर सायकल हातात घेऊनच पार केलेले.

अर्थात परत आल्यावर आम्हीच दुकानदाराला 'अशी कशी विना ब्रेकची सायकल दिली' म्हणून प्रश्न विचारलेले.

मस्त, जुन्या आठवणी जाग्या झाल्या
हेच संवाद होत असत

भाड्याने घ्यायच्या सगळ्या सायकली खडखड वाजत
त्यातच कधीतरी एखादी चांगली असायची आणि तीच मिळावी म्हणून दुकानातल्या पोऱ्याला घोळात घ्यावं लागायचं
तोही बेरकी पणे सगळ्यांना हो हो तुलाच देणार म्हणून शेंड्या लावायचा
आम्ही तर अक्षरशः दोन दोन दिवस आधीच जाऊन नंबर लावत असू त्या सायकल साठी

बाकी लेख पण मस्त, पण खूप मोठा झालाय
दोन भागात हवा होता

वा, मस्त लेख. तुमचा लेख वाचून मला माझ्या वडिलांची आठवण झाली. ते सुद्धा भोसरीला पेठेतून सायकलवर जात असत. त्यांच्या आठवणीही अश्याच असतील का असे वाटले.
आमच्या लहानपणी सायकली भाड्याने मिळायची दुकाने होती. आम्ही लहान मुले ती घेऊनच सायकल शिकायचो. शनिवार वाड्याच्या पटांगणावर तर ही गर्दी असे तेंव्हा. समोरूनच नवग्रह मंदिराशेजारी २/३ दुकाने होती तिथुन भाड्याने आणायची आपल्या उंचीची सायकल मग तासभर फिरवायची. आधी मला वाटते आठ आण्याला तास होता. नंतर एक रुपयाला तास. मी सायकल अशीच शिकले आहे माझी माझी. सुट्टीत मामाकडे जायचो तेंव्हा मामा घरी असला की त्याची सायकल मिळायची. मामाची सायकल दणकट आणि उंच खरतर. पण माझी उंची फार नसल्याने मधून मला चालवता यायची. काय पाडापाडी झाली असेल सुरुवातीची ती मामाच्यसायकलवर(नंतर सायकल चालावताना एकदाही पडले नाही.) त्यामुळे पडलो तर मायाच मिळायची, सायकल मामा घरीच दुरुस्त करे त्यामुळे ती पण चिंता नव्हती. तसे दोनदाच पडले आहे सायकलवरून. सायकलने खुप आनंद दिला तो नंतर कुठल्याही वाहनाने नाही मिळाला. अजूनही सायकलवर तितकेच प्रेम आहे. मध्यंतरी एकीची चालवून बघीतली आणि तसेच पंख फुटल्यासारखे वाटले Happy पण आता नियमीत सायकल चालवणे नाही जमणार हेही खरे.

ते सायकलचे दिवस होते. दोनच प्रकारचे लोक होते. चालणारे आणि सायकलवाले >> हे मी लहानपणी बघीतले आहे. त्यामुळे मस्त वाटले.

रच्याकने हिरवी सायकल कोणती ?

निम्या किमतीत हे काम व्हायचे म्हणून असे करणारे देखील खूप जण होते >> हे पण मी केले आहे. आर्टीकलशिप चालू असताना, इन्स्टीट्युटमधे रोज क्लास असे, पर्वतीला जावे लागे त्यासाठी. मग मी मैत्रिणीची जुनीच सायकल घेऊन नवीन करून वापरली होती. बरोबरच्या लोकांकडे त्यावेळी सनी, स्कुटी अश्या गाड्या आलेल्या.. पण मला माझ्या सायकलीचेच कौतुक.

मस्तच लिहिलं आहे!
पंक्चर काढण्याचं वर्णन अगदी तंतोतंत डोळ्यासमोर आलं.

गेल्या आठवड्यात माझ्या स्वयंचलित दुचाकीचं चाक पहिल्यांदाच पंक्चर झालं. जवळच्या पेट्रोल पंपावर नेली. तिथे त्याने टायर तपासून त्यात स्क्रूड्रायव्हरसदृश वस्तू घुसवून दाखवली तेव्हा मला धस्स झालं. Proud दुसऱ्या क्षणी आठवण झाली की हे ट्यूबलेस टायर आहे.
अशा टायरचं पंक्चर काढताना पहिल्यांदाच बघितलं.

छान लेख आणि आठवणी
स्वतः सायकल कधी चालवली नसली तरी रिलेट झाल्या काही गोष्टी

बाई दवे,
पंक्चर, की पंच्चर, की पम्चर? नेमका शब्द काय आहे मराठीत Happy

लेख खूप छान, आवडला. जुन्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या बाबांची हर्क्युलस कंपनीची मोठी सायकल होती, ती उंचीमुळे मला चालवता येत नसे. तेव्हा सुट्टीत ३० पैसे तास या दराने भाड्याची सायकल चालवत असे.

सर ओरडले किंवा त्यांनी मारले की काही व्रात्य मुले शाळेत त्यांच्या सायकलला करकटकने भोकं पाडत किंवा हवा भरायचा वॉल्व काढून नेत असत, ते पण आठवले.

कॉलेजमध्ये गाडगीळ सर आणि सरलष्कर सर हे सायकलवर यायचे. आता तर कॉलेजच्या आवारात शोधूनपण सायकल दिसत नाही अजिबात.

puncture
pŭngk′chər

intransitive verb
To pierce with a pointed object.
To make (a hole) by piercing.
To depreciate or deflate.

मराठीत तुम्ही उच्चार करून बघा.

छान लेख . आठवणीतल्या सायकली.
माझ्या लहानपणी आठ आणे एक तासासाठी होता. आठवी पर्यंत मला सायकल येत नव्हती. शाळेसाठी स्कुलबस असायची. नवीनच भाड्याने सायकल देण्याचं साईड दुकान सुरू केलं होतं घराजवळ. सरकारी वसाहती असल्याने वसाहतीची लोकसंख्या कमी होती. त्यामुळं गम्मत अशी की सकाळी मला त्या दुकान वाल्या काकांची मुलगी सायकल शिकवायची फ्री मध्ये. कारण घरात म्हणायचे सायकल चालवायला येत नाही तर पैसे कुठले द्यायचे. आणि थोड्या दिवसांनी मग मी नियमित ग्राहक झाले त्यांची . दर शनी रवी एक तास गरागरा कॉलनीत फिरायचं सायकलवरून. नंतर नववी ला बदली झाली चिपळूण ला . तेव्हा शाळेत जायला हर्क्युलस घेतली होती. आणि त्यावर मराठीत माझं नाव , गावाचं नाव पण घातलं होत. बरेच जण घालायचे तेव्हा. बरीच वर्षे होती ती.

गोन्यल बंधू सायकल मार्ट, हॅन्डवेल, वईस आदी शब्दप्रयोग पाहता तुमचे हे सायकलदिवस सोलापुरात घालवलेले आहेत हे कळले.
रॅलीची हिरवी सायकल म्हणजे मस्त शेवाळी मॉस्स ग्रीन कलर असायचा. त्यावर सोनेरी बारीक काड्यांची लायनिंग दिलेली असायची. हा शेवाळी आणि एक चेस्टनट रेड (जावा, बुलेट असायच्या ह्या रंगात, अलिकडे रॉयल एन्फिल्ड ने क्लासिक मॉडेल मध्ये आणला होता.) हे दोन रंग म्हणजे रेगुलर काळ्या रंगापेक्षा जरा प्रिमियम समजले जायचे.
डायनामो डिटेल आला पण सायकल सजवायच्या अ‍ॅक्सेसेरीज राह्यल्या जरा. हॅन्डवेल पासून सुरुवात करायची म्हणले तरी सायकल घेतल्या घेतल्या, भांडे गल्लीत भांड्यावर नाव टाकणार्‍याकडून छिन्नीने (त्या काळी ते टॅटू मशीन नसायचे) हॅण्डलवर आणि साठ्यावर (साठा म्हणजे फ्रेम) पायडलपाशी नाव टाकून घ्यायचे. काहीजण चेनकव्हर वर पेंटरकडून नाव गाव टाकून घेत. घंटी, हॅडलच्या मुठी त्याही काटेरी रबराच्या. त्यातून सोडलेल्या झिरमिळ्या. ब्रेकचे लिव्हर हॅन्डलपाशी असत तिथे सेंटरला कोयरीच्या आकाराच्या स्टील स्टोपर असायचे. त्यात दिवाळीची टिकली ठेवून ब्रेकवर मारले की मस्त आवाज द्यायची. काही संसारिक पुढच्या आडव्या दांडीवर छोटे सीट बसवत. बरोबर त्याच्याच खाली तिरप्या दांडीवर कुलदिपकास वा कुलसमईस पाय ठेवण्यासाठी छोट्या फोल्डेबल दांड्याचे पायडल असायचे. मडगार्डच्या मागे शेवटास रबरी मडफ्लॅप लावायची सिस्टिम असायची. लाईटच्या बल्ब च्या आकाराचे ते मडफ्लॅप सायकल विक्रेता लावुन दिला तर त्यावर त्याची जाहिरात फ्लुरोसेंट ग्रीन वा पिंक रंगात असायची,. काहीजण कस्टमाइज्ड मडफ्लॅप लावायचे. आवडते चित्रपट डॉन, लावारिस, याराना असले दिव्य मेसेज त्यावर असायचे. मागचे कॅरीयर गरजेप्रमाणे असायचे. साईडस्टॅन्ड पेक्षा सेंटर स्टॅन्ड असलेली सायकल ऑथेंटिक समजली जायची. मागचे मडगार्ड जिथे संपते तिथे पांढरा रंग असायचा तो सायलक भाड्याने देणार्‍या दुकानदारांसाठी मार्टचे नाव लिहिण्यासाठीच असायचा. त्याच्या वरच्या भागात रिफ्लेक्टर चा गोल असायचा. ह्या बेसिक सायकलीत पहिली क्रांती अ‍ॅटलास गोल्डलाईन आणि बीएसए एसएलार ने केली. बीएसए नाजुक चणीची. अ‍ॅटलाच्या पुढच्या मडगार्डवर स्टीलचा गोलात इंग्रजी ए लिहिलेला लोगो अगदी रोल्स रॉयस्स च्या लोगोची शान मिरवायचा. पण आडव्या हॅन्डलची हिरो रेंजर आणि मग स्ट्रीट कॅट आली तशी सायकलची परिभाषाच बदलली. कदाचित हाच काळ सायकलींचा घरघरीचा काळ होता कारण घरोघरी लुना ,सुवेगा, बजाज येऊ लागल्या होत्या. पाचदाहा वरषात इंड सुझुकी, हिरो होंडा आल्या मग सायकलींचा सुवर्ण काळ परत यायला १५ वर्षे परत जायला लागली. गाड्या चालवून सुटलेल्या ढेर्‍या कमी होण्यासाठी का होईना घरात सायकल येऊ लागली.

मस्तच लेख! सुरुवातीला वाटला होता टिपिकल असेल, पण खूपच वेगळे तपशील दिले आहेत! धन्यवाद! आणि प्रतिसादही तितकेच सुंदर आहेत!

अभ्या, अगदी त्या काळातील सायकल उभी केलीत. सायकलीला पुधे बास्केटपण असे, त्यातही मी बसलेली आहे लहानपणी Happy
आणि मागे कॅरिअरवर बसून डबल सीट जाणे म्हणजे अगदी दुचाकीवरून जाण्याइतके नॉर्मल होते.