ही गोष्ट मी जेव्हा ओब्र्याला काम करत होतो त्या काळातली आहे. ओब्र्याच्या जवळपास आमच्या कंपनीच्या चार पाच साईट्स होत्या. रेणूसागर, सागरकता, चुर्क, चुनार, डाला, रापटगंज, चोपन आणि ओब्रा अशी त्या साईट्सची नावं होती. माझी मॅनेजरची पोस्ट होती आणि ह्या सर्व साईट्स माझ्या अखत्यारीत होत्या. ओब्रा साईट त्यातल्या त्यात महत्वाची होती. शिवाय ओब्रा टाऊनशिप मोठी होती. स्पोर्ट्स क्लब होता, तोडकं मोडकं का होईना इंटरनेट मिळत होते, बऱ्यापैकी हॉटेल होतं. मग काय मी ओब्रा हेच माझे एचक्यू केलं.
मी सागरकताला जाऊन बरेच दिवस झाले होते. क्लाएंट समाधानी नव्हता. काहीना काही तक्रारी सततच्या होत्या. सारखी किच किच चालू होती. आमचा साईट इंजिनिअर माझ्या माहितीतला बेबी नावाचा केरलाईट होता. विश्वासू होता, कष्टाळू होता. त्याच्या मनात काही खदखदत होते. पण बिचारा बोलायला काचकूच करत होता. आता मी पण बारा गावचं पाणी पिऊन आलेलो होतो. असे छप्पन क्लाएंट हाताळून झाले होते. अशा वेळी घोडे कुठं पेंड खाते हे न समजण्या इतका खुळा खासच नव्हतो. शेवटी ठरवले कि स्वतः जाऊन एकदा कायमचा इलाज करायचा.
सागरकताहून परत यायला बराच उशीर झाला. प्रकरण एकूण समाधानकारकरित्या निपटले गेले होते. यायच्या आधी बेबीला चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या. माफक रित्या सेलेब्रेशन करून माघारी फिरलो. तेव्हा रात्रीचे जवळ जवळ बारा साडे बारा वाजले होते.
गुडनाईट करताना बेबी म्हणाला, “जरा जपून जा.”
माझ्याबरोबर माझा सेथू नावाचा ड्रायव्हर होता. त्याच्याकडे पाहून मी बेबीला हसून म्हणालो, “तू काळजी करू नकोस. हा सेथू माझ्याबरोबर आहे.”
“जरा जपून जा.” अस बेबी का म्हणाला त्याला कारण होते. ह्या रस्त्यावर वाटमारी प्रकार सर्रास चालत. रस्ता जंगलातून जात असल्यामुळे जंगली श्वापदांचा वावर होताच. काही जण छातीठोकपणे सांगत कि ह्या रस्त्यावर भुतेही भेटतात म्हणून. भुतांच्याही कथा प्रचलित होत्या.
एक मिनिट, तुम्हाला जर वाटत असेल की ही भुतांची, दरवडेखोर वा वाघ सिंहांची कथा असेल तर तुमचा विरस करताना मला वाईट वाटतंय. ही कथा त्या प्रकारातली नाहीये. सॉरी.
आम्ही रेणूसागर धरण पास करून थोड पुढे आलो असणार. मी अर्थातच पेंगत होतो. इतक्यात जीप आचके देत बंद पडली.
“सेथू, काय झाल बाबा. का बंद पडली? बघ बाबा जरा.”
सेथू म्हणजे शब्द राखून बोलणारा माणूस. उत्तर न देता तो गाडीबाहेर पडला. आणि गाडीचे बॉनेट खोलून खाडखुड करू लागला.
“साहेबजी, मेरी समझमे नाही आता.”
“मग आता?” सारी रात्र जीपमध्ये कुडकुडत बसावे लागणार ह्या विचाराने माझ्या डोळ्यावरची झापड उडाली.
मनगटी घड्याळात रात्रीचे दीड वाजले होते.
“बघतो लिफ्ट मिळाली तर रेणूकुटला जाऊन मेकॅनिक पकडून आणावा लागेल.”
मग त्याने एका हाताने स्टिअरिंग पकडले आणि मी मागून जोर लाऊन जीप रस्त्याच्या बाजूला काढली. आम्ही दोघे लिफ्ट मिळायची वाट बघत बसलो. पण त्या रस्त्यावर एकटी दुकटी गाडी येणं मुश्कील होते.
ह्या रस्त्यावर रात्री ट्रक कारवान करून एस्कॉर्ट घेऊन ये जा करत. तसा एखादा कारवान भेटेल अशी फोल आशा करत गाडीत बसून राहिलो. एक कारवान आम्हाला आधीच क्रॉस झाला होता. म्हणजे दुसरा यायची शक्यता तशी कमीच.
“सेथू, मी झोपतो गाडीत आणि तू पण झोप. उगा वाट बघता बघतच रात्र सरेल. त्या पेक्षा एक झोप तरी होईल. तू काळजी करू नकोस. माझी झोप हलकी आहे. आलेच ट्रक तर मी त्या आवाजाने जागा होईन आणि लिफ्ट मिळते का बघेन.”
असा एक दुसऱ्यांना दिलासा देत झोपी गेलो.
रात्री केव्हातरी माझी झोपमोड झाली. जवळपास कुठेतरी आगगाडी जात असल्यासारखा आवाज होता. आगगाडी? ह्या अरण्यात ह्या वेळी? इकडे कुठे आगगाडीची लाईन असावी ह्याची कल्पना नव्हती. बाटलीतले पाणी तोंडावर मारले तेव्हा व्यवस्थित जाग आली.
सव्वा दोन वाजले होते.
सेथू गाढ झोपला होता. म्हटले झोपू दे बिचाऱ्याला.
जरा बाजूला झाडीत गेलो. पायवाट होती. वनवासी लोक फिरतात त्यावरून. जरापुढे गेलो बघतो तर काय तर जंगलात साफ सफाई करून फुटबालच्या मैदानाएवढी जागा होती. विजेच्या दिव्यांच्या लखलखाटाने आसमंत उजळला होता. मध्ये एक कारंजे थुई थुई नाचत होते. त्याच्या चहो बाजूला हिरवळ होती. मध्ये संत्री, मोसंबी, पेरू, डाळींब, सफरचंद अशी फळझाडे होती. सगळ्या झाडांना हाताच्या उंचीवर फळे डवरली होती.
माझी झोप अर्धवट झाली होती, आजूबाजूचे वातावरण प्रसन्न होते. मग काय दिली ताणून मखमली हिरवळीवर.
जेव्हा जागा झालो तेव्हा मी एक निराळाच माणूस होतो. किती वेळ झोपलो होतो? किती तास? किती दिवस? किती महिने? का किती वर्षं?
हर्षखेद ते मावळले,
हास्य निवालें
अश्रु पळाले;
कण्टकशल्यें बोंथटलीं, अशी माझी स्थिती झाली असणार.
माझ्या क्लायंटचे आणि एकूण मानव जातीचे आलेले कटू अनुभव, त्यांच्या घृणास्पद, लोचट, चालबाझीच्या वागणुकीचा आलेला वीट सर्व काही माझ्या स्मरणातून पुसले गेले.
जाग आल्यावर मी पुन्हा एकदा फलाहार केला, कारंज्याचे “अमृताहुनी गोड” पाणी प्यालो.
आणि उत्साहाने परिसराचा शोध घ्यावा म्हणून भटकंतीला सुरवात केली. थोडं चालून गेलो असेन नसेन तर मला एक रेल्वे स्टेशन दिसले. स्टेशनात शुकशुकाट होता. चेकर नव्हते. लाल डगलेवाले हमाल नव्हते. चहाचे ठेले नव्हते. पर्तमानपत्र आणि मासिक पुस्तक विकणारे नव्हते. मला मुंबईचे माणसांनी खचाखच भरलेले ते प्लॅटफार्म, त्या लोकल आठवल्या.
प्लॅटफार्मला गाडी लागली होती. विजेचे इंजिन लावले गेले होते. पण आत ड्रायव्हर नव्हता. मागच्या डब्यात गार्ड नव्हता.
आता मला वाटतय की मी इथूनच ट्रेनला टाटा बाय बाय करून परत फिरायला पाहिजे होते. पहिल्यांदा मला जाणीव झाली की सेथू तिकडे जीप मध्ये झोपला होता. त्याला सोडून मी इथे भटकंती करत होतो. हे बरोबर नाही. त्याला माझी काळजी वाटत असेल का? त्या जगात काय चालले असेल? काहीही असो पण मी मॅनेजर होतो. सेथूची जबाबदारी माझ्यावर होती.
पण माणसाची जिज्ञासू वृत्ति त्याला स्वस्थ बसू देणार नाही. तसं असत तर आज देखील माणूस नागडा उघडा जंगली बैलाचे कच्चे मास खात गुहेत बसला असता. माणसाला “पलीकडे काय आहे” ते समजल्या शिवाय झोप येत नाही. पलीकडे काय आहे हे समजल्यावर “त्याही पलीकडे काय आहे” ह्याची उत्कंठा असते.
त्या उत्कंठेने मी एका डब्यात जाऊन बसलो.
गाडी सुरु झाली. मात्र जेव्हा गाडीने वेग पकडला तेव्हा माझं अवसान गळून पडले. अनामिक भीतीने माझा ताबा घेतला. त्या जगाशी माझा संबंध संपला होता. माझे कुटुंब, माझे नातेवाईक, माझे मित्र आता त्यांचे पुन्हा दर्शन होणे नाही. आफ्रिकेतून जगभर पसरलेले होमो सेपिअन्स, अग्नीचा शोध लावणारे, चाकाचा शोध लावणारे, गॅलिलिओ केप्लर न्यूटन कोपर्निकस कोलंबस लीविन्गस्टन कुक मॅक्सवेल प्लॅंक आईनस्टाइन स्क्रोजींडर हायझेनबर्ग फाईनमन एवेरेट गागारीन मानवाचे मोठे पाउल अस बडबडणारा कोण तो? त्या सर्वांच्या आया बहिणींची आठवण काढून झाली. हे लोक झाले नसते तर आज आपण किती सुखात असतो नाही? आपल्या क्षुद्रपणाची उजळणी झाली. वाघाचे कातडे पांघरून वाघ होता येत नाही. हे ही उमजले. मला त्या गुहेत राहणाऱ्या माझ्या नागड्या उघड्या पुर्वाजाविषयी प्रेमाचे भरते आले. मी तरी कुठे सूट बूट घालून हातात डिग्री घेऊन जन्माला आलो होतो काय? मी पण असाच नागडा उघडाच जन्माला आलो. ह्या समाजानेच मला लाज लज्जा शिकवली. मला कपडे घातले. मला अहमभाव दिला. थोडा फार अहंगंड दिला. बराचसा न्यूनगंड दिला. मनात एक आत्मा नावाचे जनावर जन्माला घातले.
असे अनेक उलट सुलट विचार माझ्या मनात थैमान घालत होते.
गाडी थांबली. उतरणे भाग होते, मला कळून चुकले होते कि परत जायचे दोर कापले गेले होते. एकदा वाटले कि गाडीत बसून राहावे. कधी न कधी ही गाडी परत जाईलच. कधी? डोक्यात प्रकाश पडला. मी असाच गाडीत बसून राहिलो तर चाळीस पन्नास वर्षांनी माझा जनाजा घेऊनच गाडी परतीची यात्रा सुरु करेल.
त्या पेक्षा आहे ते गोड मानून आयुष्य उपभोगावे. हे ठीक राहील. ह्या विचाराने गाडीतून उतरलो. त्याच क्षणी गाडी सुरु झाली आणि माझ्यासारख्या कुणा हतभाग्याच्या शोधात निघून गेली.
एकदा वाटल कि अरेरे आपली गाडी चुकली. चला जे होणे नव्हते त्याची खंत कशाला?
स्टेशन बाकी भव्य दिव्य होते. एखाद्या एअरपोर्ट प्रमाणे सजवलेले होते. सप्तरंगी दिव्यांच्या प्रकाशात उजळले होते. त्या झगझगाटात एकच उणीव होती ती म्हणजे माणसांची.
शहरात एक फेरफटका मारावा ह्या इराद्याने स्टेशन मधून बाहेर पडलो.
त्या शहराचे वर्णन करायचा प्रयत्नही मी करणार नाहीये. कारण वर्णन करायला माझे शब्द तोकडे पडतील. आणि वर्णन करून उपयोगही नाही.
मी जर म्हणालो की ह्या शहरातल्या रस्त्यांवर प्लास्टिकची एकही पिशवी नव्हती, किंवा कोपऱ्यात पान खाऊन टाकलेल्या पिकेचे डीझाइन नव्हते, किंवा कोंबडीच्या तुटक्या पायासाठी झडप टाकून भांडणारे कावळे नव्हते. शहरी संस्कृतीचे प्रतिक असणाऱ्या पारव्यांनी केलेले पांढरे डाग नव्हते. रस्त्याच्या कडेने दुतर्फा झाडे होती पण रस्त्यावर एकही वाळकं पान नव्हते. ( इथल्या झाडांनाही शिस्त होती!) रस्त्याच्या कडेला टाकून दिलेली सिगारेटची थोटकं नव्हती. इथले कुत्रेही शिस्तीचे असणार कारण...
ह्या स्वच्छतेची गोम अशी होती कि शहरात अजून तरी एकही माणूस मला दिसला नाही. माणूस सोडा हो; चिटपाखरू पण नव्हते. एव्हढेच काय पण कुठल्याही गल्लीत मोटार गाडीला दानव समजून भुंकणारी कुत्री असतात. त्यांच्यासाठी गाडी हे त्यांच्या राज्यावर आक्रमण असते. तशी कुत्रीही नव्हती.
प्रथमच मला एकटेपणाची टोकदार जाणीव झाली. अर्थात मुंबईच्या खेचाखेच गर्दीतही तुम्ही एकटे असता. पण ते एकटेपण निराळे असते. आणि हे निराळे.
मी जे शहर पाहत होतो त्याचे ह्यापेक्षा जास्त वर्णन करत नाही. जणू काही स्वप्नाची दुनिया साकार झाली होती.
हे स्वप्न त्याचे वेळ झाली की आपोआप विरून जाईल, मी पुन्हा एकदा माझ्या कंपनीचा मॅनेजर होईन, पुन्हा आपल्या जगाच्या सुरक्षिततेत परत जाईन, अशी अंधुक आशा होती. तीही विरून जायला लागली.
एक समजेना की हे सगळे कुणासाठी होतं? ह्या नितांतसुंदर शहरात माणूस नावाची चीज अजून पर्यंत दिसली नव्हती. मग हे शहर कुणी कोणासाठी उभारले होते. का ते अमानवीय जीव माझ्या सभोवता वावरत होते पण मला त्याची जाणीव नव्हती? डोक्यात अश्या विचारांचे काहूर माजले असतांना मी एका इमारती समोर आलो.
ह्या बिल्डींगवर लफ्फेदार निळी निऑन साईन होती. “हॉटेल!”
हॉटेलात देखील माणस नव्हती, मी एका टेबलापाशी जाऊन बसलो. वेटर विचारायला येईल अशी अपेक्षा नव्हतीच. टेबलावर एक संगणक होता. त्याच्या पटलावर मेनू होता. मी गंमत म्हणून वाचायला लागलो. त्यावर दृग्गोचर झालेले काही पदार्थ माझ्या ओळखीचे, बहुतेक मात्र अनोळखी होती. त्यांची अगम्य नावे वाचून हसू येत होते. Cheese Fondue, Broccoli Bake, Baked Mushrooms & Spinach, Chilly Garlic Wings, Honey & Whole Grain Mustard Chicken, Asparagus Bruschetta, Aubergine Au Gratin...
पण वडा पाव, कांदा भजी, इडली सांबार हे आपले देसी पदार्थ कुठे आहेत? मनात असा विचार आला आणि संगणकाचा प्रकाश पडदा खालीवर झाला आणि आपले अस्सल देसी पदार्थ दिसू लागले.
कुठल्याही डिश समोर किंमत लिहिली नव्हती. इथे पैशाला किंमत नव्हती. पैसे देणार कोण आणि घेणार कोण. “ग्राहकाचे समाधान हाच आमचा आनंद,” अशी ध्येयवाक्ये नसल्याने समाधान वाटले. एव्हढेच नव्हेतर वाश बेसिनवर पुण्याच्या हाटेलात नेहमी दिसणारी “देवानंद, यहॉ कंगी मत करना.” असे सुविचार नव्हते. “इथल्या नोकरांना रोजच्या रोज पगार दिला जातो,” “इथले सर्व पदार्थ साजूक तुपात बनवले जातात,” “चहाचे कप आणि खाण्याच्या प्लेटा खुर्चीवर न ठेवणे,” “बाहेरचे खाद्यपदार्थ खाण्यास मनाई आहे,” “कृपया सुट्टे पैसे द्या.” “कृपया कॅरी बॅग मागू नये” नाही, अश्या काहीही पाट्या नव्हत्या. असो, सर्वच शहरे थोडीच पुण्यामुंबई सारखी “मॉडेल सिटी” वा “स्मार्ट सिटी” असणार. एकदा सहज, चुकून मूर्खासारखे एका पुणेकराला विचारले, “कायहो तुम्ही रॉंग साईडने गाड्या चालवणे, फुटपाथवर गाड्या घालणे, लाल सिग्नल तोडणे, असे ट्रॅफिक रुल्सचे पदोपदी उल्लंघन का करता?”
त्या बेरकी पुणेकराने काय उत्तर द्यावे? “अहो ते नियम वगैरे तुम्हा मूर्ख, अज्ञानी मर्त्य मानवांसाठी. आम्हा “देवानां प्रिय, प्रियदर्शी पुणेकरांसाठी” नाहीत,” आता बोला.
तर ह्या शहरात सिग्नल होते पण तोडणारे नव्हते,
वर्तमानपत्रे होती पण वाचणारे नव्हते,
टीवी होते पण बघे नव्हते,
असे बरेच काही होते पण ज्यांच्यासाठी होते ते मानव कुठे दिसत नव्हते.
मेनूकार्डवर पदार्थाच्या समोर बटणे होती, आपल्याला पाहिजे त्या पदार्थाचे बटन दाबले कि तो पदार्थ समोर हजार! पैसे द्यायचा प्रश्न नसल्यामुळे( भूकही लागली होती) यथेच्छ खाऊन घेतले.
जेवण झाल्यावर शहर बघण्यासाठी म्हणून बाहेर पडलो. रस्त्यावर पब्लिक ट्रान्सपोर्टच्या बसेस आणि टॅक्सी यांची ये जा होती. जरा सामोरं जाऊन हात दाखवला तशी एक बस थांबली.
शोध एका अदृश्य "यन्त्रपुर" चा- १
Submitted by केशवकूल on 6 November, 2022 - 05:15
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आता भाग भाग करून टाकतो.
आता भाग भाग करून टाकतो.
मूळ कथा Miguel de Unamuno नावाच्या स्पॅॅनिश लेखकाची आहे. मी त्याच्या "मेकॅॅनोपोलीस" या कथेचे हे स्वैर मराठीकरण केले आहे.
पुढच्या भागात जास्त माहिती देईन.
उत्सुकता आहे पुढच्या भागाची..
उत्सुकता आहे पुढच्या भागाची....
माणसे नसलेलं शहर, रेल्वे, बगीचा, हाॅटेल कुणासाठी जाणण्याची....
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
पुढील भागाच्या प्रतिक्षेत.
दत्तात्रय साळुंके
दत्तात्रय साळुंके
हा जो स्वर्ग आहे तो त्या यंत्रांच्या साठीच. निवेदक बिचारा ह्या "स्वर्गात" एकटा पडतो. आपल्या जवळ जर आपली प्रिय व्यक्ती नसेल तर स्वर्ग सुखाचा काय उपयोग?
“Mechanopolis” illustrates a loss of faith in science, and a suspicion of technology