समांतर विश्वात पक्की.

Submitted by केशवकूल on 4 November, 2022 - 04:41

Two roads diverged in a yellow wood,
And sorry I could not travel both
long I stood And be one traveler
-------Robert Frost
"So many worlds, so much to do, so little done, such things to be."
—Alfred Lord Tennyson
Everything that can possibly happen does happen.
माझे नाव पक्की. माझ्या बाबांचे नाव पक्कीचे बाबा. आईचे नाव पक्कीची आई. असे आमचे आटोपशीर कुटुंब आहे. आई आणि बाबा गणित आणि विज्ञान शास्त्रांत अत्युच्च शिक्षण घेतलेले आहेत. त्यांना कुठल्याही जगप्रसिद्ध विश्वविद्यालयांत प्राध्यापकाची नोकरी मिळाली असती. पण असं म्हणतात ना, “ जे काही करू शकतात ते काहीतरी करतात. बाकीचे विश्वविद्यालय, महाविद्यालय, शाळा कॉलेज, खाजगी शिक्षण वर्ग इत्यादी ठिकाणी शिकवतात.” त्यामुळे उच्चशिक्षित असूनही आई घराचा व्याप संभाळते आणि बाबा उपकरणे दुरुस्तीचे काम करून चार पैसे कमावतात. हे त्यांना कुणी करायला सांगितले हे कोडे मला सुटलेले नाही. पण ज्या कुणी त्यांना असे करायची सुचना/ हुकुम/ रिक्वेस्ट केली, ते आमची काळजी घेतात. त्यामुळे आम्हाला कधीही कशाचीही कमतरता भासत नाही. पण काही वेळा मात्र वरून “ मिशन मे बी पॉसिबल ” टाईप काम करायची सुचना/ हुकुम/ रिक्वेस्ट येतात, तेव्हा खूप टेन्शन असते. मी ह्यापेक्षा जास्त बोलत नाही. कारण तसे करणे म्हणजे “अनऑफ़िशिअल सिक्रेट अॅक्ट” चा भंग करणे होईल.

मी एकदा मार्केट मध्ये फिरत असताना एक चीनी माणूस बघितला. हा माणूस रस्त्याच्या बाजूला ,फुटपाथवर आपली पथारी पसरून बसला होता. आणि तो काय काय वस्तू विकत होता. त्या त्याने आपल्या पथारीवर मांडल्या होत्या. त्यांत काय होते ते विचारण्यापेक्षा काय काय नव्हते ते विचारा! ती यादी करणे सोप होते. चीनी मातीची कितीतरी चित्रे तिथे मांडून ठेवली होती. गिटार वाजवणारा मुलगा, त्याला साथ देणारी त्याची बहीण, पाण्यात डुबकी मारणारी बेडकांची जोडी, शाळेला दांडी मारून झाडाखाली निवांत पुस्तक वाचत पडलेला उडाणटप्पू मुलगा, परीकथेतील राजकुमार, वाऱ्याशी शर्यत लावून धावणारा पंखवाला घोडा, नक्षीकाम केलेली फुलदाणी. आणि ह्या सगळ्यांवर मात करणारे एका मिश्कील मुलाचे चित्र ! तो मुलगा वयाने लहान दिसत होता खरा पण त्याने पोषाख मात्र मोठ्या माणसासारखा केला होता. म्हणजे टाय सूट बूट आणि वर बेरी छापाची कॅप! अगदी जोकर दिसत होता. मला मित्र म्हणून एकदम पसंत पडला.

तिथे अजूनही गोष्टी होत्या. माझ्या आकाराचा कापूस भरलेला अस्वल होता. मोठ्या अस्वलाची छोटी बाळं होती. लांबच लांब शेपटाचे माकड. टिचकी मारली की हां हां हो हो असं तोंड हलवत म्हणणारी कुत्री आणि पट्ट्या वाघ. तशीच ती भरत नाट्यम करणारी भावली. जरा वाऱ्याची झुळूख आली की हिचा नाच सुरु! मला सर्वच खेळणी आवडली. हे घ्यावे की ते घ्यावे? काही सुचेनासे झाले. पण पैसे ? खिशांत एक पैसा पण नव्हता. मला स्वतःचाच राग आला. बाबांचा धाक होता नाहीतर हवेत नुसता झटका मारून हात फिरवला तर माझ्या हातांत पाहिजे तेव्हढे पैसे आले असते. बाबांनी हजार वेळा सांगितले होते. “ पब्लिक के सामने जादू नही दिखाना.” पण एखादे वेळी पब्लिकच्या नजरेआड त्या बोळांत जाऊन पैसे काढून आणले तर काय बिघडले?

मी चिन्याला मान हलवणाऱ्या वाघाची किंमत विच्रारली.

“ किंमत विच्रारतोस? खिशांत पैसे आहेत का?” हा माझा चक्क अपमान होता. रस्त्याच्या कडेला बूड टेकवून धंदा करणाऱ्या चीन्याने मला असे विचारावे? बाबांची परवानगी असती तर त्याने इथेच ह्या रस्त्यावर नोटांचा पाउस पाडून पैशाचा महापूर आणला असता.

“ किंमत सांगा, म्हणजे मी बाबांच्या कडून पैसे घेऊन येतो.” मी पण त्याला टेचांत उत्तर दिले.
“शंभर रुपये. आता जा पळ आणि आण पैसे.” चीनी हसून बोलला.
मी बाजूच्या गल्लीत गेलो. अंधारांत कोणी बघत नाही असे बघून हवेत झटका देऊन हात फिरवला. हातांत शंभर रुपायची नव्वी कोरी नोट आली होती.
चीन्याने नोट हातांत घेऊन नीट बघितली. उलटीसुलटी करून दोन्ही बाजूची चित्रे अगदी जवळून बघितली. मग मला नीट न्याहाळून तो बोलला, “ कुठून आणलीस बाळा? ही जादूची नोट आहे. कुणी शिकवली ही जादू तुला?”

त्याने नोट परत केली. “ आपण जादूचे पैसे घेत नाही. तुझ्याकडे कष्ट करून मिळवलेले पैसे असतील तर दे. नाहीतर फूट इथून.”

मला असा राग आला त्या चीन्याचा. खेळणे मिळाले नाही त्याचा राग होताच. त्याही पेक्षा जास्त अपमानाचा. काम करून आईला पैश्याची मदत करायची माझी केव्हापासूनची इच्छा आहे. पण माझ्या सारख्या लहान मुलाला कोण काम देणार? जादूने पैसे काढायला काय कमी कष्ट लागतात? मी बाबांवर नेहमी रागवायचो. हवेतून कुठलाही जिन्नस काढायला केव्हढा शक्तिपात करावा लागतो हे त्या चिन्याला कोण समजावून सांगणार? आणि शिवाय बाबा रागावणार ते वेगळेच. बाबांनी मला सक्त ताकीद देऊन ठेवली होती. “ एक तर सर्व लोकांच्या समोर जादू करायची नाही. आणि स्वतःच्या फायद्यासाठी तर नाहीच नाही.” मी बाबांना एकदा विचारले देखील होते, “ का नाही ?”

“ तू अजून लहान आहेस.तुला काही समजत नाही. थोडे टक्के टोणपे खाल्लेस की मग अक्कल येईल.” बाबांनी मला समजावले, “ तुला जादू करताना सैतानाने पाहिले तर तो तुला पळवून नेईल आणि आपला गुलाम करेल. अजून मी तुला सैतानापासून स्वतःचा बचाव करायचे तंत्र शिकवलेले नाही. सैतान केव्हा, कुठे कोणाच्या रूपांत येईल त्याचा नेम नाही. जेव्हा तुला सैतानाची सर्व रूपे दिसतील, समजतील, ओळखता येतील तेव्हा तुला जादू करायचा मोह होणार नाही.”

पण त्या चिन्याला समजले कसे की मी ती शंभराची नोट जादूने काढली होती? तो काय सैतानाचा माणूस होता? बाबांनी मला सैतान ओळखण्याची साधी युक्ति शिकवली होती. “ तुला संशय आला तर काय करायचे तर समोरच्या माणसाच्या डोळ्यांत झाकून बघायचे. तिथे त्या माणसाचे सत्व तुला दिसेल.” मी त्या चिन्याच्या डोळ्यांत डोकावण्याचा प्रयत्न केला होता पण त्याच्या डोळ्याच्या जागी फक्त दोन खाचा होत्या. त्यातून मला प्रवेश करता येईना. मी मग त्याचा नाद सोडला.

आजचा दिवस माझ्या साठी हा असा वैतागवाडीचा होता.

मी घरी आलो तर आईचा मूड नेहमीप्रमाणे ऑफ होता. हे नेहमीचेच असल्यामुळे मला त्याची सवय झाली होती. मी स्वतःला त्रास करून घेतला नाही. शांतपणे हात पाय धुवून तो पाटावर जाऊन बसलो. आई जेवायला वाढेल म्हणून.

“ अजून झाले नाही. जा बाहेर बाबांच्या जवळ,” आई करवादली.

आता तिथे घुटमळण्यात काही अर्थ नव्हता. भूक मारून मी बाहेरच्या खोलीत आलो. नेहमीप्रमाणे बाबांची समाधी लागली होती. पण मी आल्याची चाहूल लागल्यावर त्यांनी डोळे उघडले.

“ ये पक्की, बैस इथे. काय म्हणत होता तो चीनी तुला?”

बाबांच्या पासून काही लपवणे शक्य नव्ह्ते. “ तो म्हणाला जादूचे पैसे घेत नाही म्हणून. त्याला कसे समजले की ते जादूचे पैसे होते?”

बाबा हसले. “ अरे पक्की, खूप चिन्यांना जादू येते बरका. एक लक्षांत ठेव जादूने पैसे काढलेस तर नेहमी जुन्या नोटा काढायच्या. नव्या कोऱ्या करकरीत नोटा बघितल्या की लोकांना संशय येतो. नवीन काही असेल तर लोकांना संशय येतो. लोकांचा विश्वास बसायला थोडा वेळ लागतो. तुला गॅलिलीओ माहिती आहे ना. त्याची लोकांनी काय हालत करून ठेवली होती.”

“तसं पहिले तर सर्व लोकं जादू करूनच पैसे कमावतात. घरची कामवाली. ती काय करते ? घराच्या बाईसाहेब तिकडे बेडरूम मध्ये आराम करत असतात. नाहीतर फेसबुकवरचे लाईक बघत बसलेल्या असतात. तिकडे कामवाली बाई जादू करते. खरकट्या भांड्यांचा ढीग लागलेला असतो. बाईसाहेब अर्ध्या तासाने येऊन बघतात तो काय भांडी लख्ख स्वच्छ होऊन जागेवर बसलेली असतात. अॅमझानची जादू बघ. इकडे आपण आपल्याला पाहिजे त्या गोष्टीचे नाव आपल्या संगणकावर लिहितो आणि बटण दाबतो.तिकडे लगेच आपल्या दारावरची घंटी वाजते. अलादिनच्या जिनपेक्षाही वेगाने कुरिअर आपले पॅकेट घेऊन हजर! तिकडे आर बी आय चा गवर्नर लेखणीच्या एका फटकाऱ्याने सरकरच्या खात्यात करोडो रुपये टाकतो. एक रुपयांची मेणबत्ती! ती इलेक्ट्रो मॅग्नेटिक लहरी ट्रॅन्समिट करते! काडेपेटीतली प्रत्येक काडी इलेक्ट्रो मॅग्नेटिक ट्रॅन्समिटर असते! अशी असते जादू पक्की. तेव्हा तू चिन्याचं बोलणं मनावर घेऊ नकोस, ”

माझे बाबा मला असे ज्ञान देत असतात. आता ओघानेच आर बी आय आणि गॅलिलीओ वाचणे आलेच. आर बी आय वाचल्यावर माझ्या डोक्यांत एक आयडिया आली. मी माझ्या पेनने बाबांच्या पासबुक मध्ये एक कोटी रुपयांची एन्ट्री टाकली. बाबांची जमा कोटी रुपयांनी वाढवली! मला वाटले होते, आई बाबा खूष होतील. पण ते बघून दोघेही पोट धरधरून तुम्ही काय म्हणता ते आरओएफएल करू लागले. बाबा म्हणाले, “ पक्की बेटा, ही जादू फक्त सायबर ल्युनॅटिक्स, मिथिकल हॅकर्स आणि गवर्नर्स ऑफ बॅंक ऑफ लास्ट रिसार्ट करू शकतात. आपले काम नाही ते बाळा.”

इतक्यांत बाबांचे अंग थरथरायला लागले. म्हणजे बाबा व्हायब्रेशन मोड वर होते. बाबांनी कॉल घेतला तेव्हा थरथर थांबली. बाबानी काही जुजबी बोलणे केले आणि ‘मी आलोच ’ असे म्हणून कॉल संपवला. पक्कीकडे पाहून ते म्हणाले. “ अरे तात्यांनी आठवण काढली आहे. त्यांच्या घराचे लाईट गेले आहेत. ताबडतोब जायला पाहिजे.” मी म्हणालो, “ एवढी घाई काय आहे. आईचा सैपाक झाला असेल किंवा होईलच आता. जेवू आणि निघू.” बाबा घाईत होते, “ अरे पक्की, तुला समजत नाही. आपल्या इकडे दिवस आहे पण तात्याच्या तिकडे रात्र झाली आहे. त्याची मुलं बिचारी जेवायची थांबली आहेत. आपण आत्ता जाऊ आणि अर्धा तास आधी परत येऊ. हे बघ आत्ता साडे अकरा वाजले आहेत. आपण अकराच्या आधीच परत येऊ.”

हे बाबांचे “ लवकर परत येऊ” हे नेहमीचे होते. एकदा बाबा आज गेले आणि काल परत आले. घरांत दोन दोन बाबा ! एक कालचे आणि एक आत्ताचे !!! सगळा सावळा गोंधळ. आईने बाबांना सॉलिड फायर दिले. “ अहो तुम्ही परत येताना वेळेचा सांधा जमवून मग “आत्ता” मध्ये प्रवेश करत जा.”

मग काय, निघालो आम्ही , मी आणि बाबा. आमची जुनी पुराणी सुझुकी गाडी काढली आणि एक एक वर्ष मागे टाकत तात्यांच्या काळात पोहोचलो.

तात्या जिथे राहायचे त्या जगताप आळीत लगेच पोहोचलो. त्याला काय वेळ लागतो? आळीत इलेक्ट्रिकच्या खांबावर मिणमिणते दिवे लागले होते. खांबावर इलेक्ट्रिकच्या तारांचे जंजाळ पसरले होते. ते पाहून माझी तर छाती दडपून गेली. बाबा तात्यांचे घर बघत बघत चालले होते, पण जास्त बघावे लागले नाही. तात्या बाहेरच उभे होते.

“ अरे किती वेळ तुझी वाट बघायची?” तात्यानी तक्रारीचा सूर लावला. मी आणि बाबा घरात गेलो. बाबांनी टेस्ट लॅम्प लाऊन फेज चेक केली.

“ तात्या तुमच्या घरांत काहीही फॉल्ट नाहीये. खांबावर सर्विसचा फ्युज बघावा लागेल.”

“अरे बापरे. म्हणजे आता कंपनीच्या गाडीला बोलवावे लागणार. सायकल हाणत रास्ता पेठेतल्या पॉवर हाउसला जाणे आले.” तात्या निराश झाले होते.

“ तात्यानू , तुम्ही काही काळजी करू नका. कंपनीची गाडी बोलवायची गरज नाही. मी आहे न. तुम्ही जा घरात. मला माझे काम करू द्या.”

“ अरे पण तुझ्याकडे शिडी -- .” बाबांनी त्यांना पुढे बोलूच दिले नाही. तात्यांना घरांत ढकलून बाबा झरझर खांबावर चढले. तिथला फ्यूज काढून वायर भरली.

घरांत लखलखाट झाला. बाबा खाली उतरले. आणि तात्या घरातून बाहेर आले.

“ कसा देवासारखा धावून आलास बघ. किती पैसे झाले तुझे?”

मला वाटले की बाबा आता दीडशे दोनशे रुपये घेणार. हाच रेट चालू होता ना. पण बाबा म्हणजे काय.

“ आता तुम्हीच विचार करून द्या.” बाबा.

तात्या घरांत गेले. थोडा खुडबुडीचा आवाज झाला. बाहेर येऊन त्यांनी एक बंदा रुपये बाबांच्या हातावर ठेवला. पैसे खिशांत टाकून आम्ही दोघांनी तात्यांचा निरोप घेतला.

म्हणतो काय ‘कसा देवासारखा धावून आलास बघ ’ म्हणजे देव देव म्हणतात तो मीच आहे ना. लोकांना “ देव तेथेची जाणावा ” हे समजत नाही त्याला मी काय करणार? बाबा स्वतःशी बडबडत होते.

“ आता आलोच आहोत तर शनिवारवाड्यावर सभा चालली आहे ती बघून जाऊ. “ बाबांनी माझा हात धरून मला शनिवारवाड्याकडे ओढून नेले. तिथे हजारो लोक मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.

“ आता बोलत आहेत ते एस एम जोशी. बाजूला बसले आहेत ते भाई डांगे, पलीकडे भाई चितळे, हे विराटकाय आहेत ते आचार्य अत्रे, इकडे ना ग गोरे.” बाबा मला हलक्या आवाजांत माहिती देत होते.

मी आणि बाबा तेथे किती वेळ ऐकत बसलो असू कुणास ठाऊक. शेवटी मीच बाबांना आठवण करून दिली. “ बाबा आई आपली वाट बघत असेल. चला आता.” बाबा भानावर आले.

आम्ही घरी आलो तेव्हा बाबांनी मला त्यांचे मनगटी घड्याळ दाखवले. “ पहा पक्की अजून अकरा वाजायचे आहेत.” बाबा टाईम असा उलटा सुलटा कसा मॅनेज करतात ते त्यांनाच माहीत! म्हणजे आज जायचे आणि काल परत यायचे! पण आई असल्या भूल भुलैयाला फसणारी नव्हती. “ कुठे गेला होता दिवे लावायला?” तिने कठोरपणे विचारले.

“ आम्ही साडे अकराला गेलो आणि अकराच्या आधीच परत आलो. दिवे लावायलाच गेलो होतो. तात्यांच्या घरचे दिवे गेले होते.”

“ म्हणजे तुम्ही एकोणीसशे अठ्ठावन सालात गेला होतात! तात्यांनी किती पैसे दिले?”

बाबांनी खिशातून दीडशे रुपये काढून आईच्या हातात ठेवले. कमाल आहे तात्यांनी तर फक्त एक रुपया दिला होता. जेवण झाल्यावर मी हळूच बाबांना विचारले. “ पक्की तो एकोणीसशे अठ्ठावन साली त्यांनी दिलेला रुपया होता. आत्ता वीसशे वीस साल चालू आहे.” म्हणून काय झाले? एक रुपयाचे दीडशे रुपये? ही चक्रावून टाकणारी जादू होती.

तुम्हाला जर वाटत असेल की माझे बाबा इलेक्ट्रीशिअन आहेत तर ते तसं चूक नाही. खूप लोकांचा तसा गैरसमज आहे. ते तितकस बरोबर पण नाही. मला स्वतःला माहिती नाही की ते कोण आहेत. काही वेळा ते टीवी दुरुस्त करतात तर कधी वॉशिंग मशीन, कधी फ्रीज ,कधी मोबाइल, कधी मेनफ्रेम! मी आईला विचारले तर ती पण उडवा उडवीची उत्तरे देते.

एकदा बाबा खूप उशिरा घरी परत आले. आईशी हलक्या आवाजांत बोलत बसले. पुन्हा बाहेर निघून गेले. दुसऱ्या दिवशी परत आले तेव्हा खूप थकले होते. आईने हलक्या आवाजांत विचारले,” सक्सेस? ”

“ हा, लॉंन्च सक्सेसफुल! महादेवी, यू आर द ग्रेटेस्ट विझार्ड ऑन द अर्थ! ”

आई लाजली पण खूष झाली. “ मी तुम्हाला सांगितल्रे होते ना कि क्वाटर्निआन वापरा म्हणून. माझा डॉक्टरेटचा थिसीस आहे त्याच्यावर! ”

आईने मग सगळ्यांसाठी कडॅक चहा बनवला. कडक नाही कडॅकच. बाबा बूबान बिस्कीट घेऊन आले होते. मग काय आम्ही पण खूष!!

असे माझे दिवस मजेत जात होते. सुख दुःख कमी नाही की जास्त नाही. सगळे काही कसे प्रमाणात!

अशाच एके दिवशी लॅंडलाईनच्या फोनची घंटी वाजली. म्हणजे बाबांना कॉल आला होता. मी फोन उचलला, “ हलो, पक्की हिअर.”

“ छोटा पक्की बेटा, बाबांना फोन दे. सांग डॉक्टर काकांचा फोन आहे म्हणून.”

मी फोन बाबांच्याकडे देत म्हणालो, “ डॉक्टर काकांचा फोन आहे. ”

“ हॅलो डॉक्टर, मी एकदम ठीक ठाक आहे, माझा बीपी, माझी शुगर, माझी नाडी सर्व काही जिथल्या तिथे व्यवस्थित आहे. छातीत, पोटांत, पाठीत कुठेही दुखत नाहीये. मूत्रपिंड, स्वादुपिंड, यकृत, हृदय, फुफ्फुस ह्यांनी आत्ताच मला संदेश दिला आहे की त्यांचे काम व्यवस्थित चालले आहे. मग तुम्हाला माझी आठवण का झाली? घरातले लाईट गेले आहेत की तुमचे वॉशिंग मशीन चालू होत नाही? हा माझा तर्क असा आहे की तुमचे इ सी जी मशीन बिघडले असणार. काय बरोबर आहे नं.” बाबा थांबायला तयार नव्हते. डॉक्टर काय बोलणार त्याची आपण कल्पना करू शकतो. पण बाबा आता गंभीरपणे डॉक्टरांचे बोलणे ऐकत होते. बोलणे झाल्यावर बाबा म्हणाले, “ चल, पक्की बेटा काम आले आहे.”

These are the days of miracle and wonder.

—Paul Simon

आम्ही जेव्हा डॉक्टरांच्या दवाखान्यांत पोहोचलो तेव्हा त्यांच्या अघाव रिसेप्शनिस्टने मला आणि बाबांना नेहमीची रेकॉर्ड ऐकवली, “ आज खूप गर्दी आहे. एक तासापेक्षा जास्त वेळ थांबावे लागेल. तुम्ही लोक आधी अपॉइंटमेन्ट का नाही घेत? बसा तिकडे. काय नाव सांगा.”

बाबा पण काय कमी नाहीत, “ मॅडम, आपण खूप टेंशन घेता. एक काम करा. डॉक्टरांना सांगा की पक्की आणि पक्कीचे बाबा आले आहेत.” अर्थात मॅडमने तिकडे पूर्ण दुर्लक्ष केले. मग बाबा वैतागले. त्यांनी आपल्या शर्टाची बटणे दाबली आणि डॉक्टर काकांना कॉल लावला. डॉक्टरांनी लगेच कॉल घेतला बाबांनी सरळ तक्रार करायला सुरुवात केली. “ अरे भल्या माणसा आम्ही इथे तुझ्या रिसेप्शनमध्ये बसलो आहोत. आणि तुझी ही सुंदरी ------ ”

एका मिनिटांत डॉक्टरांच्या केबिन मधून एक मलूल आणि दुःखी चेहऱ्याचा माणूस बाहेर पडला, आणि रिसेप्शनिस्टचा फोन खणाणला. पूर्ण गोची झाल्यामुळे त्या पेशंट इतकाच मलूल आणि दुःखी चेहरा करून तिने बाबांना आणि मला आतला रस्ता दाखवला. “ जा. डॉक्टर आत तुमची वाट बघताहेत.”

आम्ही दोघे आत गेलो. डॉक्टरांनी बोलायला सुरुवात केली. “ अशी विचित्र केस आली आहे की मला वाटले की यांत तुम्ही योगदान देउ शकाल.” योगदान! मी हा शब्द मेमरीत टाकून ठेवला. आज काल हा शब्द खूप लोक खूप वेळा वापरतात. कधीतरी उपयोगी पडेल असा विचार करून मी शब्द साठवून ठेवला. अर्थ? आता आम्ही योगदान केल्यावर तुम्हाला समजेलच!

लगेचच डॉक्टरांच्या केबिनमध्ये तो विचित्र पेशंट आला. हा पेशंट नेहमीच्या इतर पेशंट प्रमाणे रोगट, थकलेला, निराश किंवा हताश दिसत नव्हता. उलट तो खूप उत्साही, आनंदी वाटत होता. किंबहुना हा ‘ रुग्ण ’ आहे असे अजिबात वाटत नव्हते. मग ह्याचा काय प्रॉब्लेम होता?

डॉक्टरकाकांनी आमची ओळख करून दिली, “ हा पक्की आणि हे पक्कीचे बाबा. हे दोघे वैश्विक तज्ञ आहेत. आणि हे रामभाऊ आमभाऊ. पक्कीचे बाबा, रामभाऊ आमभाऊ हे सध्याच्या जमान्यातले सुप्रसिद्ध रहस्यकथाकार आहेत. ”

“ नमस्कार रामभाऊ आमभाऊ. आपल्याला भेटून आनंद झाला.” बाबा.

रामभाऊंनी लवून अभिवादन केले, “ मला नुसते राम म्हणा. आता कुणालाही ‘राम म्हणा’ असे सांगितलेले आवडणार नाही. ( हा विनोद कुणालाही समजला नाही म्हणून बिच्रारा वाया गेला. ) मग तुम्ही मला रामराव म्हणा. वैश्विक तज्ञ म्हणजे काय प्रकार असतो ते मला माहीत आहे. त्यामुळे तुम्ही आल्यामुळे मला थोडा धीर आला. वाटले की आपला प्रॉब्लेम समजणारा कोणीतरी भेटला. ”

“ काय आहे तरी काय तुमचा प्रॉब्लेम?” बाबांनी रामभाउंना विचारले.

“ सांगतो, आधी मला सांगा तुमच्या मते दोन अधिक दोन किती होतात?” रामभाउंनी विचारले.

बाबांनी विचारांत गढून गेले. मला चांगले माहीत होते की अतिप्रगत गणितशास्त्रामध्ये पारंगत असलेल्या बाबांना ह्या साध्या गणिताचे उत्तर माहीत नसणार. बाबांना उत्तर शोधायला बराच वेळ लागणार होता तो पर्यंत आपण उत्तर देऊन टाकू म्हणजे गाडी पुढे सरकेल.

“ दोन अधिक दोन चार !” मी रामभाउंचा प्रॉब्लेम सोडवला.

“ दोन अधिक दोन चार !” बाबा पण विजयी मुद्रेने ओरडले. ते अतिप्रगत गणितातून दुसरीच्या अभ्यासक्रमांत पोहोचले होते.

“ मला वाटलेच होते की तुम्ही पण असेच बोलणार. तरी बरं स्वतःला काय ते,वैश्विक

तज्ञ म्हणवून घेता. कालपासून ही असली भन्नाट उत्तरे ऐकून ऐकून माझे डोके फिरायची वेळ आली आहे. मी स्वतःची तपासणी करून घ्यायला म्हणून मी डॉक्टर काकांकडे आलो. बघतो तर काय तुम्ही पण मला तेच सांगताय.”

“प्राथमिक शाळेपासून मी हे घोकत आलो आहे. दोन अधिक दोन चार, इंकम टॅक्स आणि मृत्यू ही जीवनातली शाश्वत तत्वे आहेत! मग काय तुमच्या मते दोन अधिक दोन बरोबर पाच होतात काय ? ” बाबाच्या बोलण्यात थोडा सार्कॅस्टिक टोन होता.

रामराव एकदम खुश झाले. त्यांनी बाबांच्या टोन कडे दुर्लक्ष केले, “ अगदी बरोबर बोलतात तुम्ही. आता तुम्ही वैश्विक तज्ञ म्हणवून घ्यायच्या लायकीचे आहात. काल मी हॉटेल मध्ये एक चहा आणि एक सिंगल वडापाव घेतला, त्या शेट्टीने मला चाळीस रुपये बिल लावले. माझ्या मते पन्नास रुपये व्हायला पाहिजेत. मी त्याला भलेपणाने त्याची चूक काढून दाखवली. तर उलट त्याने मलाच वेड्यांत काढले. आणि वर कॅल्क्युलेटर करून दाखवले वीस वड्याचे आणि वीस चहाचे , झाले चाळीस रुपये! आता मी तरी काय बोलणार ? इथले कॅल्क्युलेटर पण मला वेडे करतील. काय करणार चूपचाप घरी परत आलो.”

बाबा पुन्हा विचारात दंग झाले. मीच मग पुढाकार घेऊन प्रश्न केला, “ पण आपण वस्तुमानाच्या अक्षय्यतेच्या नियमाचे उल्लंघन करू शकत नाही. म्हणजे असे की दोन किलो लोखंड अधिक दोन किलो लोखंड पाच किलो झाले तर हे वाढीव वस्तुमान आले कुठून?”

“ अगदी बरोबर, पक्की वस्तुमान वाढत नाही, ते चार किलोच रहाते. फक्त समान वस्तुमानाचे म्हणजे थोड्या कमी वस्तुमानाचे पाच तुकडे तयार होतात. ही साधी गणिती पद्धत वापरून आपण वस्तूचे विभाजन करत करत अणु पर्यंत जाऊ शकतो. इतकेच नाही तर अणूचे विभाजन करून---------”

` डॉक्टरकाकांना ती चर्चा असह्य झाली असावी, म्हणून त्यांनी रामभाऊंना मधेच थांबवले, “ ते डीडीएलजेचं सांगा ना त्यांना.” मला दोन किलो लोखंड अधिक दोन किलो श्रीखंड मिळून किती होतात ते विच्रारायचे होते ते राहून गेले.

रामभाऊ नव्या उत्साहाने सांगू लागले, “डीडीएलजे कालच टीवीवर पुन्हा लागला होता. त्याचा शेवटचा सीन बघताना मला शॉक बसला. गाडीच्या दारात रक्ताने माखलेला राज उभा आहे. गाडी हळू हळू वेग पकडत आहे. सिमरन फलाटावरून धावत धावत येत आहे. शेवटच्या क्षणी राज तिला हात देऊन गाडीत अलगद उचलून घेतो. असे त्यांचे गोड मीलन होते असे दाखवले आहे. पण पूर्वी मी जितक्या वेळा तो सिनेमा बघितला तितक्या वेळा त्याचा शेवट काहीतरी निराळाच होता. सिमरनला मेकप करायला थोडा वेळ लागतो, पण ती मनांत विचार करते की नाहीतरी गाडी थोडीच वेळेवर येणार आहे? दुर्दैवाने नेमकी त्याच दिवशी गाडी टाईमात आली नि येऊन गेली पण. राजने तिची किती आतुरतेने आणि आशेने तिची वाट बघत होता! वाट पाहून पाहून निराशेने तो निघून गेला. सिमरनने खऱ्या प्रेमाला झिडकारले होते असाच त्याचा समज झाला. गाडी आली थोडा वेळ थांबली आणि निघून गेली. सिमरन मिस्ड द ट्रेन!! बिचारी सिमरन फलाटावर एकाकी! सनईचे किंवा वायोलीनचे करुण संगीत. असा खरा त्या सिनेमाचा ट्रॅजिक शेवट आहे. अश्या त्या क्लासिक ट्रॅजेडीची ही अशी कॉमिक कॉमेडी कुणी आणि केव्हा केली? जीओके! ”

ते ऐकून डॉक्टरकाका भयानक अस्वस्थ झाले होते. डीडीएलजे हा त्यांचा अत्यंत आवडीचा सिनेमा होता. त्यांना हा तमाशा बंद करावासा वाटला असावा यांत नवल ते काय? पण ते काही बोलायच्या आधी बाबांनी रामभाउंना विचारले, “ सूर्य कुठल्या दिशेला उगवतो? ”

रामभाऊंची नाराजगी त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. “ ह्या तुमच्या छोट्या मुलाला सुद्धा माहीत आहे ते. अहो सरळ आहे ,सूर्य उत्तर दिशेला उगवतो, डोक्यावर येतो, मग नव्वद अंशांत वळतो आणि पूर्व दिशेला मावळतो.”

आता मात्र डॉक्टरकाकांनी चपळाई करून मुलाखत तिथेच संपवली, “ रामभाऊ आपण जरा बाहेर थांबाल का? मी जरा ह्यांच्याशी चर्चा करतो. प्लीज हं.”

पण बाबा थांबायच्या मूड मध्ये नसावेत. “ आपल्याला भेटायचे असेल तर आपला पत्ता द्याल का? ”

“ हो घ्या ना. १८.५०७४ डिग्रीज उत्तर, ७३.८०७७ डिग्रीज पूर्व. समुद्र सपाटी पासून उंची ५५४ मीटर्स.” रामभाऊ उत्तरले.

“ रामभाऊ, तुम्ही अकौंटंट आहात का हो ? नाही म्हणजे इतकी अचूक आणि तितकीच निरुपयोगी माहिती दुसरा कोण देणार? आम्हा सर्वसाधारण लोकांना समजेल असा पत्ता द्या ना.”

“ जैसी जिसकी कुवत! माझंच चुकलं. कर्वे नगर मधल्या कर्वे रोड वरील कर्वे पुतळयाच्या बाजूने असण्याऱ्या कर्वे लेन नंबर सातच्या कर्वे कोपऱ्यावर एक हॉटेल आहे. तिथे संध्याकाळी पाच ते सात मी चहा पीत बसलेला असतो. बाकीच्या वेळी मी कुठे असतो ,काय करतो ते माझे मलाच माहीत नसते तेव्हा तुम्हाला मी काय सांगणार?” इतके बोलून रामभाऊ आमभाऊ डॉक्टरांच्या केबिन मधून बाहेर पडले. रामभाऊ बाहेर गेल्यावर डॉक्टरकाकांनी हुश्श केले. “ आता मला सांगा. ह्या पेशंट बद्दल तुमचे काय मत आहे. हा खर तर माझा नेहमीच्या ओळखीतला माणूस आहे. आज अचानक ह्याला काय झाले कुणास ठाऊक? माझ्या मते ह्याच्या मनावर काहीतरी आघात झाला आहे. पण हा त्याचा थांगपत्ता लागू देत नाहीये. मी त्याचे ब्रेन मॅपिंग करवून घेतले आहे. पण ते तर नॉर्मल दिसते आहे. मी ह्याला सध्यातरी माईल्ड ट्रँक्विलायझरवर ठेवायचा विचार करतो आहे. दोन तीन दिवसानंतर बघू काही फरक पडला तर. आता तुमचे निरीक्षण काय आहे ते सांगा. ”

बाबांनी सुरवात केली, “ हा माणूस रहस्यकथा लिहितो ना पण हा स्वतःच एक रहस्यकथा आहे. हा एक रहस्य जगतो आहे.तो वेड पांघरून पेडगावला चालला आहे. कुणालातरी कात्रज दाखवतो आहे. पक्की तुला काय वाटते. मी म्हणतो ते बरोबर आहे ना?”

“ बाबा, आपण आईशी बोलायला पाहिजे. माझ्या मताने हा माणूस पूर्ण शुद्धीवर आहे. त्याला काही भ्रम झालेला नाही. तो सोंग पांघरलेला सुद्धा नाही. का कुणाला घुमवत नाहीये. तो मनोरुग्ण पण नाही. मला असे वाटते की तो कुठल्यातरी दुसऱ्या विश्वातून चुकून, भरकटून इकडे आला आहे. तो परग्रहावरचा एलिअन पण नाही. कारण आपल्या विश्वातल्या कुठल्याही एलिअन संस्कृतीत दोन अधिक दोन चारच असायला पाहिजेत.”

“ पक्की बेटा, तू हे असे का म्हणतोस? “

“ बाबा , तुम्ही बघितले का तो बोलत होता तेव्हा त्याचे ओठ हलत नव्हते. तो सरळ मेंदूतून बोलत होता. मी खूप एलीअन्स बघितले पण -----------”

“ आमच्या लक्षांत कसे काही आले नाही? ”

“ तुम्ही मोठी माणसे सगळ्या गोष्टी गृहीत धरून चालता. त्यामुळे तुमचा मेंदू, माणूस जसा बोलतो आहे तसेच त्याचे ओठ हलत आहेत, असे गृहीत धरून चालतो. आपल्या डोक्यातल्या कल्पना त्याच्या ओठांवर सुपारइंपोज करता. बाबा तुम्हाला ती राजाच्या तलम अंगरख्याची गोष्ट माहीत आहे ना. तसेच. आम्हा लहान मुलांची अशी पूर्वग्रहदूषित दृष्टी नसते. त्यामुळे अशा गोष्टी आमच्या चटकन लक्षांत येतात.” मी माझे आपले मत नोंदवले.

“ डॉक्टर, मी मिसेस बरोबर चर्चा करून एक दोन दिवसांत माझा रिपोर्ट देईन. तो पर्यंत राहूदे त्याला ट्रँक्विलायझरवर तुम्ही म्हणता आहात तसं. नंतर बघू आपण त्याचे काय करायचे ते.” एवढे सांगून आम्ही डॉक्टरांच्या केबिनमधून बाहेर पडलो.

घरी येऊन बाबांनी आईला सर्व वृतांत कथन केला, “ डॉक्टरांनी आम्हाला पेशंटच्या मेंदूचे दिव्य दृष्टीने काढलेले नकाशे दाखवले. मी ते काळजीपूर्वक बघितले. त्याचा मेंदू कुठेही कललेला नाही. मेंदूचे डोंगर आणि दऱ्या जागच्या जागी आहेत. सुरकुत्या पण साधारण माणसापेक्षा जरा जास्तच आहेत. कुठल्याही भागावर सूज नाही.असं म्हणतात की मेंदू सगळी रहस्ये उघडी करून दाखवतो. पण ह्या महाभागाच्या केस मध्ये मेंदू जेव्हढे सांगतो त्यापेक्षा जास्त लपवत होता. तेव्हा त्याच्यावर वेडेपणाचा आरोप आपल्याला करता येणार नाही.”

आईचा मेंदू मात्र आता विद्युत वेगाने काम करू लागला. “ आधी तुम्ही जेवून घ्या. मग आपण बोलू.”

जेवण झाल्यावर आईने जे आम्हाला समजाउन सांगायचा प्रयत्न केला त्यातला सैद्धांतिक भाग आम्हाला समजणे कठीण होते, पण व्यावहारिक भाग मात्र समजला. तिने काय सांगितले ते मी थोडक्यात इथे सांगायचा प्रयत्न करून बघतो. हुशार लोकांना ते लगेच समजेल! मी ते तिच्याच शब्दांत सांगतो.

आपण सर्वांनी आत्ताच झालेली इंग्लंड विरुद्ध भारत ही टेस्ट बघितली असणारच. त्यांत भारताचा कप्तान नाणेफेक हरतो त्याच्या बरोबर सामना ही. कारण सामन्याच्या पाचव्या दिवशी खराब झालेल्या खेळपट्टीवर भारातला दुसरा डाव खेळावा लागला. ह्या खेळपट्टीवर स्टीव वॉच्या अजिंक्य ऑसी टीमची पण वाट लागली असती. कारण का तर भारत नाणेफेक हरला. समांतर विश्वाच्या सिद्धांतानुसार जेव्हा नाणेफेक झाली, आणि भारत नाणेफेक हरला तेव्हा विश्वाला अजून एक फाटा फुटला. त्या विश्वांत भारत नाणेफेक जिंकला आणि सामनाही! दुर्दैवाने त्या विश्वांत आपल्याला प्रवेश करता येत नाही. हे मी अगदी सोप्पं करून सांगितले. आता समजा भारताने नाणेफेक जिंकली पण अलिस्टर कुकचा स्लिप मधला झेल सोडला असेल तर? अजून एक फाटा फुटून अजून एक विश्व निर्माण झाले असेल. जश्या अनेक शक्यता तशी अनेक विश्वं. हा सगळा पसारा म्हणजे महाविशाल अश्वत्थ वृक्षासारखा आहे. त्याच्या खोडापासून सुरुवात होते. नंतर मोठ्या फांद्या, त्यानंतर छोट्या फांद्या. मग डहाळ्या, शेवटी पाने! त्या अनेक पानांपैकी एक पान म्हणजे आपण ज्या विश्वांत राहतो ते विश्व! तुमच्या पेशंट रामभाऊंचे विश्व असेच एक पान कुठेतरी दूर असलेले!

एवेरेट नावाच्या महान वैज्ञानिकाने हा सिद्धांत मांडला. मी ( म्हाणजे माझ्या आईने ) ह्यावर संशोधन करून निरनिराळ्या विश्वांत संचार करायची प्रणाली शोधून काढली. पण “ वरच्या लोकांनी ” मला ती प्रसिद्ध करण्यापासून परावृत्त केले. ह्यामुळे विश्वाचे स्थैर्य ढळेल अशी बॉस लोकांना भीती वाटली. माझे( म्हणजे आईचे) नोबल प्राईज मात्र गेले.

आता हे तुमचे पेशंट रामभाऊ आणि आपले इकडचे रामभाऊ ह्यांची अदलाबदल झाली आहे असे दिसते. असे अक्सिडेंट होतात मधून मधून. त्या माणसांना आपण वेडी माणसे म्हणतो. मला अश्या काही केसेस माहीत आहेत. ही माणसे स्वतःला हरवून अशा अनेक विश्वातून भटकत फिरत असतात. अश्या माणसांचा छडा लावून त्यांना स्वगृही आणण्यासाठी एक खास खाते “वरच्या लोकांनी” उघडले आहे. सध्या ते फक्त आपल्या विश्वांत काम करतात. लग्नाआधी मी तिथे इंटर कॉसमॉस मध्ये काम करत होते. तिकडे सारखे फिरतीवर जावे लागायचे म्हणून लग्न ठरल्यावर ती नोकरी मी सोडली. आता इंटर कॉसमॉस मध्ये काम करायला लायक कॅंडिडेट त्यांना मिळत नाहीये. म्हणून त्यांनी तो विभाग बंद केला आहे सध्या. जाऊ द्या त्या जुन्या आठवणी! ( इथे माझी आई थोडी भावुक झाली. तिने लगेच स्वतःला सावरले.)

भुते दिसतात म्हणजे काय? जेव्हा समांतर विश्वाचे आपल्याला ओझरते दर्शन होते तेव्हा आपल्याला माहितीतले, जे मृत झाले आहेत असे आपण मानतो पण जे दुसऱ्या विश्वांत जिवंत असतात त्यांचे दर्शन!

आपले पेशंट रामभाऊ त्यांच्या विश्वातल्या अनुभवांची इथल्या विश्वातल्या अनुभवांशी तुलना करत आहेत. असेच काही दिवस गेले तर डॉक्टरकाका त्यांची वेड्यांच्या इस्पितळांत भरती करून मोकळे होतील.

आपण सैद्धांतिक भाग सोडून आता व्यावहारिक भागाकडे लक्ष देऊया, “ महादेवी तू हे सगळे सांगितले ते ठीक आहे पण आता आम्ही काय करावे ते सांग.”

“ ते अगदी सरळ साधे आहे. तुम्ही त्या २+२=५ विश्वांत जाऊन त्या २+२=४ वाल्या रामभाउंना शोधून काढा आणि त्यांना इकडे गेऊन या. बिचाऱ्याची अगदी वेड्यासारखी अवस्था झाली असेल त्या विश्वांत. आता उशीर करू नका. जा माझ्या माहेरच्यांनी लग्नांत आहेर केलेली सुझुकी गाडी घेऊन जा.”

“ अहो बाईसाहेब, तू असे बोलतेस की मी जणू लग्नांत गाडीसाठी अडून बसलो होतो. तुझ्या भावाने विचारले तेव्हा मी सांगितले काही द्यायचे असेल तर एक कार द्या. आता तुझ्या भावाला ते ऐकून झीट आली त्याला मी काय करणार ?जमत नसेल तर नव्हती द्यायची.”

“ अहो महाशय, माझ्या भावाला वाटले होते की मागून मागून हा माणूस काय मागणार? एक चार पाच हजाराचा आयटेम मागेल. आता तुम्ही कार मागितल्यावर त्याला झीट आली त्यांत नवल ते काय. ”

“ हा माणूस ?” बाबा एकदम खवळले, “ तुझा भाऊ मला ‘ हा माणूस ‘ म्हणतो काय?”

असा माझ्या आई बाबांचा एजओल्ड सुख-संवाद सुरु झाल्यावर मलाच मध्ये पडावे लागणार.

“ अग आई, त्या गाडीने आम्ही टाईम ट्रॅवल केला आहे बऱ्याच वेळा पण हा तर स्पेस ट्रॅवल आहे.एका विश्वातून, दुसऱ्या विश्वांत, तिथून तिसऱ्या -------” मी माझी अडचण उघड केली.

“ चला तुम्ही पार्किंग लॉट मध्ये. मी तुम्हाला दाखवते.” आई आम्हाला घेऊन खाली आली, “ ही डायल आता T वर आहे ना ती S वर अशी टाका. ST वर नका टाकू. मी अजून ते डेवलप नाही केलेलं. S विकल्प घेतला म्हणजे तुम्ही स्पेस ट्रॅवल करू शकाल. आणि प्रत्येक नवीन विश्वांत प्रवेश केला की आधी कॅल्क्युलेटरवर २+२ = ? असे टाकून खात्री करून घ्या. जर पाच असे उत्तर आले तर मग पुढे त्या विश्वात प्रवेश करून त्या हॉटेलमध्ये जाऊन पहा. तिथे रामभाऊ भेटतीलच. विचारा त्यांना डीडीएलजे बद्दल.”

बाबा आता बरेच निवळले होते. त्यांनी हळूच आईला विचारले, “ तू चल ना आमच्याबरोबर.”

“ नाही रे बाबा. मला माझी कामे काय कमी आहेत? ” तिला काहीतरी आठवले, “ तो मोबाइल इकडे द्या. आणि थांबा इथेच जरा. मी आलेच इतक्यांत.”

इतक्यांत म्हणजे जवळ जवळ पंचवीस तीस मिनिटांनी आई परत आली. तो पर्यंत आम्ही माशा मारत बसलो होतो.

हे पहा, मी पोस्ट-डॉक्टरल संशोधन करत असताना गंमत म्हणून एक प्रोग्रॅम लिहिला होता. तो मोबाइल मध्ये टाकला आहे. बीटा व्हर्शन आहे. पण चालायला पाहिजे. ह्या सुझुकीमध्ये जो आयनिक वार्प ड्राईव मी बसवला आहे त्याची मार्गदर्शक प्रणाली आहे. त्या ‘ दोन अधिक दोन पाच ’ विश्वांत झॅप झालेल्या तुमच्या रामभाऊंचा वैश्विक पत्ता त्याच्या वैशिष्ट्यांसह इथे एन्टर केला आहे. आता ही गाडी तुम्हाला विनासायास तिकडे घेऊन जाईल. तुम्ही त्या रामभाऊंना घेऊन या. तो पर्यंत मी इकडे गरमागरम कोबी पोहे तयार ठेवते.”

आम्हाला दोनतीन विश्वांत थोडे भटकायला लागले. त्या त्या विश्वांतल्या त्या त्या पुण्याच्या कर्वे रोडच्या त्या हॉटेलांत निरनिराळे रामभाऊ आम्हाला भेटले. पण ते आम्हाला पाहिजे होते ते रामभाऊ नव्हते. ते तिथले मूळ रहिवासी म्हणजे ओरिजिनल रामभाऊ होते. आम्हाला पाहिजे होते रस्ता भटकलेले रामभाऊ. शेवटी एकदाचे भेटले.

त्या हॉटेलांत ते एकटेच बसले होते. ते आपल्या ( नसलेल्या ) विश्वांत हरवले होते. एकाकी. उदास. आम्ही होतो म्हणून त्यांना आशा होती. नाहीतर त्यांची रवानगी वेड्यांच्या इस्पितळांतच झाली असती. ( असे त्यांनीच आम्हाला सांगीतले.)

त्यांना भेटताच बाबांनी परवलीचे संभाषण सुरु केले, “ रामभाऊ आमभाऊ, दोन अधिक दोन किती?” खर तर हा प्रश्न विचारायची गरज नव्हती कारण आम्ही ती टेस्ट आधीच केली होती. पण बाबा म्हणजे अगदी पद्धतशीर प्रमाणे वागणारे होते.

रामभाऊंनी बाबांच्याकडे संशयाने पाहिले, “ तुम्ही येरवड्याच्या वेड्यांच्या इस्पितळांतले डॉक्टर आहात ना. मला घेऊन जायला आला आहात का ?”

“ अहो, आमचा ड्रेस पहा. रंगी बेरंगी चट्ट्यापट्ट्यांचा बुश शर्ट घालून कधी डॉक्टर येतात का? आमचे चेहरे पहा. आम्ही गोड गोड बोलून खिसा कापणारे दिसतो आहोत का? तुम्हाला आमच्या गळ्यांत लटकवलेला ट्रेडमार्क स्टेथोस्कोप दिसतो आहे का ? नाही ना. आम्ही रुग्णवाहिका आणली आहे का? आमची ही सुझुकी रुग्ण दिसत असेल खरी पण ती रुग्णवाहिका निश्चितच नाही.”

बाबांच्या बोलण्याचा रामभाऊंवर बरा परिणाम झाला असावा. ते जरा आश्वस्त झालेले दिसत होते. त्यांनी आजूबाजूला बघितले. कुणी बघत नाही अशी खात्री झाल्यावर ते बाबांच्या जवळ आले आणि अगदी हळू आवाजांत बोलले, “ कुणाला सांगणार नाही ना? मग ऐका, दोन अधिक दोन बरोबर चार.” एवढे सांगून झाल्यावर रामभाऊ एकदम रिलॅक्स झाले. जणू का त्यांच्या डोक्यावरचे मणामणाचे ओझे उतरले होते.

मला त्या ग्रीक पौराणिक कथेची आठवण झाली. मिडास राजाला गाढवाचे कान! त्या गोष्टीतला केशकलाकार जंगलात जाऊन खड्डा खणतो आणि त्या खड्ड्यांत तोंड घालून जेव्हा जोरांत ओरडतो, “मिडास राजाला गाढवाचे कान.” तेव्हा त्याला सुखाची झोप लागते. मला वाटते, आम्ही वेळेवर पोहोचलो नसतो तर आमच्या रामभाऊंनी पण एक्झॅक्ट्ली तेच केले असते.

बाबांनी त्याला प्रेमाने जवळ बसवून घेतले आणि विचरले, “ डीडीएलजे सिनेमाचा शेवटचा सीन आठवतो? वर्णन करून सांगा बरं.”

“ ही काय विचारायची गोष्ट आहे? राज आणि सिमरन यांचे गोड मीलन होते. त्याचे असे होते--------“

बाबांनी उठून रामभाऊंना घट्ट मिठी मारली. हेच आपले रामभाऊ आहेत ह्याची त्यांना पूर्ण खात्री पटली होती. तरीपण शेवटची कन्फर्मेटरी टेस्ट म्हणून बाबांनी विचारले, “ सूर्य कुठे उगवतो?”

“ अहो पक्कीचे बाबा, सूर्य पूर्वेला उगवून पश्चिमेला मावळायला पाहिजे ना ? पण ह्या मूर्ख आणि विचित्र देशांत सूर्य उत्तरेला उगवतो. अर्थात खरं म्हणजे उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, मागे, पुढे, वर, खाली, हे सगळे मानवाने आपल्या सोयीसाठी निर्माण केले आहेत. त्याला वैज्ञानिक परिभाषेत काहीही अर्थ नाही. तेव्हा ते एक सोडून द्या. पण हा महान सूर्य माथ्यावर आला की ‘बाये मुड’ करून सरळ पूर्वेला मावळतो. आपल्या सूर्यासारखे पूर्वेकडून पश्चिमेला मार्गक्रमण करत नाही. त्यामुळे हा सूर्य आपला वाटत नाही.”

“ चला रामभाऊ, आता इथे थांबायचे काम नाही. आपण आता टकाटक मायविश्वी परतूया.”

असा एका विश्वातून दुज्या विश्वाला चालला चालला आमचा हा तांडा.

हे रामभाऊ इकडे आल्यामुळे ते रामभाऊ सहाजिकच तिकडे पोहोचले.

घरी परत येऊन गरमा गरम कोबी पोह्यावर ताव मारताना रामभाऊ झालेला सर्व प्रकार विसरून गेले. चहा पिताना त्यांना एकदम आठवण झाली, “ अरे बापरे, आज तारीख किती? मला आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. जायलाच पाहिजे. नाहीतर त्या द्वाड रिसेप्शनिस्टची बकबक ऐकावी लागेल. पक्की, पक्कीचे बाबा आणि वैनी, छान झाला प्रोग्रॅम. पुन्हा असे पोहे केले तर मात्र मला बोलवायला विसरू नका. पुढच्या वेळी मी माझ्या नव्या “ तेहेतिसावा खून ” या पुस्तकाची प्रत भेट द्यायाला घेऊन येईन.”

दुसऱ्या दिवशी डॉक्टरकाकांचा फोन आला. आपला पेशंट नॉर्मल झाला अशी बातमी त्यांनी दिली. आपली ट्रँक्विलायझरची ट्रिटमेंट यशस्वी झाली ह्याचा त्यांना अभिमान वाटला. “ गंमत म्हणजे ह्या पेशंटला झाला प्रकार अजिबात आठवत नाही. तो म्हणतो की मला कुठे काय झाले होते? आहे की नाही गंमत! ज्याचे करावे भले –------ जाऊद्यात झाले. मी आता इंडिअन जर्नल ऑफ सायकॉलॉजीकल मेडिसिन मध्ये शोध निबंध प्रकाशित करायचा विचार करतो आहे. आणि हो, तुमची फी तुमच्या खात्यांत जमा केली आहे.”

बाबांच्या कानाला ते शेवटचे वाक्य खूप भावले.

ssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssssss

ह्या कथेची श्राव्य फाईल इथे आहे

AUDIO LINK

https://soundcloud.com/iucaa-scipop/scifienterprise-marathi-story

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही अजुन किती विश्वात लिहीता देव जाणे. मी कुठल्या विश्वात असताना कुठली कथा वाचली याची मेंदूतली नोंद त्या विश्वाबाहेर पाऊल टाकले की बहूधा पुसली जाते पण अक्शराचे ठसे मात्र राहतात. त्यामुळे दुसऱया विश्वात आल्यावर परत ती वाचायला मिळाली तर हे कुठेतरी वाचलेय ही जाणिव छळत राहते पण आठवत मात्र काहीच नाही..

असो. जबरदस्त कथा… आधीच्या कथांसारखी ही पण आवडलीच.

साधना, सहमत.
केकू, तुमच्या सध्याच्या पोस्ट केलेल्या कथा वाचताना माझी खात्री पटत चालली आहे की मी अनेक समांतर विश्वांत वावरत असणार त्यामुळे कथा आधी वाचलेली आहे हा अनुभव येत रहातो. Happy

साधना, एस
इथे कुणीतरी इतिहासात इसवी सना पूर्वी आणि इसवी सना नंतर असत तस ...
नवीन कथा वाचायची आहे?
ऐसी अक्षरे चा दिवाळी अंक प्रसिद्ध झाला आहे. त्यात माझी कथा आहे.
नाव "क्रॉसओवर आणि परत"
https://aisiakshare.com/node/8573
तिथे ती दिवाळी अंकात आहे म्हणून इथे टाकता येत नाही ह्या वर्षी तरी.

अहो तीही वाचल्यासारखी वाटली पण जाउदे.. परत दहा वेळा वाचली तरी मला चालते. तुमची कल्पना शक्ती भारी आहे आणि त्यात अधुन मधुन जे पंचेस मारता तेही भारीच असतात.

या कल्पना कुठुन येतात असे विचारावेसे वाटते पण उगीच शंका घेतल्यसरखे वाटेल म्हणुन नकोच. अशाच कथा लिहित राहा.

अहो तीही वाचल्यासारखी वाटली पण जाउदे.>>> क्रोसववेर आणि परत?
नाही. ही प्रथमच प्रकाशित केली आहे. कदाचित माझ्या ब्लॉग वर काही वेळ होती. तेव्हा वाचली असेल तर...
या कल्पना कुठुन येतात असे विचारावेसे वाटते पण उगीच शंका घेतल्यसरखे वाटेल म्हणुन नकोच>>
रोख समजला. असच असतंं. दहावी पास आणि बारावी नापास लोअर मिडल क्लास कोथरूड मध्ये राहणाऱ्या लेखकाचे नशीब. घ्या शंका घ्या आणि दिवे पण घ्या.
या कल्पना कुठुन येतात? रात्री झोप येत नाही तेव्हा मग मी सेकंड लाईफ मध्ये जगतो तेव्हा हे लोक भेटतात, माझ्याशी गप्पागोष्टी करतात ते आयडीआ देतात.
मागे एकदा एक शून्य शून्य रोबो नावाची कथा लिहिली होती. मायबोलीवरच. तेव्हा एका वजनदार व्यक्तीने प्रतिसाद दिला होता, "ही कथा निश्चितच भाषांतरीत नाही. कारण ... की अस फक्त मराठीतच लिहिता येइल."
म्हणजे माझ्या दुसऱ्या कथा जणू काय ...
आहे किनई मज्जा ...

म्हणुनच….

तुमच्यावर शंका घेणे म्हणजे अपमान करणे… लिहित राहा…

क्रॉस ओवर सारखीच कल्पना तुमच्या दुसर्‍या एखाद्या कथेत वाचली असेल कदाचित.. त्यामुळे वाचल्यासारखी वाटली असावी.

काल वाचायला घेतली होती. खूपच लांबलचक आहे. दमायला झालं. टाइम टर्नर , समांतर विश्व या कल्पना बऱ्यापैकी ओळखीच्या असल्याने त्या कशा वापरता हेच काय ते बघायचं. त्यात आज जाऊन काल परत येतणे वगैरे विनोद केलेत. पण लेम वाटले.
डोळ्यात झाकून बघणे असं एके ठिकाणी लिहिल़ंय ( चिनी माणूस)
हिंदीतलं झॉंकना आणि मराठीतलं झाकणे वेगळं आहे.
पहिल्यांदाच लेखन आवडलं नाही. कथा वाचून पूर्ण होईतो माझं मत बदलेल अशी आशा आहे.

समांतर विश्वाची कल्पना हि केवळ कपोल कल्पित नाहीये. parallel dimension, alternate universe, or alternate reality, is a hypothetical self-contained plane of existence, co-existing with one's own .Hugh Everett III ह्या शास्त्रद्नयाने संशोधन करून ह्यावर डॉक्टरेट मिळवली. तेव्हा त्याची खूप चेष्टा मस्करी करण्यात आली. इतकी की त्याने क्वांंटम फिजिक्स चा नाद सोडला. पण नंतर अनेक शास्त्रज्ञांनी ह्या संकल्पनेचा पाठपुरावा केला.
How many parallel universes are there?
One obvious question that arises, then, is exactly how many of these parallel universes might there be. In a new study, Stanford physicists Andrei Linde and Vitaly Vanchurin have calculated the number of all possible universes, coming up with an answer of 10^10^16.
@भरत Its OK with me..

@भरत
मी पण किती सहज लिहून गेलो पहा. एक डाव समजून ह्या ना, सर. किंवा मराठीत सामावून घ्या ना हा शब्द. पुन्हा गलती करणार नाही.

समांतर विश्व या संकल्पनेवर "गंगाधरपंतांचे पानिपत" ही द पां खांबेटेंची डॉ जयंत नारळीकर (केकू यांची योग्य टिपणी) कथा फार सुंदर आहे.
ही कथा पूर्ण वाचू शकले नाही, फार मोठी झालीय. स्टाईल चांगली आहे पण ही कथा फार लांबलीय का? समहौ कंटाळा आला मध्यात...
हो, भरत मी ही अडखळले तिथे.
सॉरी स्पष्ट लिहिलय. सांगण्याचा उद्देश नाराज करणे, दोष देणे नसून पुढील लेखन पूर्ण वाचायला आवडेल म्हणून आहे. कृ गै न.
पुढील लेखनाला शुभेच्छा.

समांतर विश्व या संकल्पनेवर "गंगाधरपंतांचे पानिपत" ही द पां खांबेटेंची कथा फार सुंदर आहे.>.>?
मला वाटत डॉ नारळीकर.
त्याला alternate history म्हणूयात,
फार मोठी झालीय. स्टाईल चांगली आहे पण ही कथा फार लांबलीय का? समहौ कंटाळा आला मध्यात.>>
हा internate चा परिणाम. वेळ मिळाला कि ह्यावर लिहीणार आहे.

ही चर्चा वाचून मला माधव जुलिअन आणि अनंत काणेकर ह्यांची जुगलबंदी आठवली.
"बेगमेचे महाराजांंस पत्र" आणि "छत्रपति शिवाजी महाराजांचे बेगमेस पत्र."
छत्रपति शिवाजी महाराजांस हे ओरिजिनल नव्हते.
चू,भू.दे.घे.

इंटरनेटचा परिणाम किंवा छापील लेखन आणि दिलीय लेखन यांकडे पाहण्याची वेगळी मानसिकता हे असू शकेल

ही कथा छापील असती तर मी नेटाने वाचली असती बहुतेक.
तेच मायबोलीवरच आवडलेल्या प्रकारचं आणि लेखकाचं हलकंफुलकं लेखन छापलेले वाचायला आवडलं नव्हतं.
हे मला बदलायला हवं.

THE SHALLOWS
What the Internet Is Doing to Our Brains BY NICHOLAS CARR
हे ते पुस्तक आहे. अवश्य वाचा.
आपले स्वतःचे विश्लेषण वाचून धक्का बसेल.
आपण "आपण" आहोत की Internet आपले programmimg करून आपल्याला रोबोट बनवत आहे?

विडंबन
Permalink Submitted by अरविंद कोल्हटकर on गुरुवार, 03/01/2013 - 10:41.
ऐसी अक्षरे वरून साभार
माधव जूलियन नंतरच्या काळात भाषाशुद्धीचे खंदे पुरस्कर्ते होण्यापूर्वी फारसी-प्रचुर मराठी लिहीत असत. ते सुरुवातीच्या काळात फारसीचेच प्राध्यापक होते. त्यांनी 'बेगमेचे शिवाजीस पत्र' अशा अथवा अशा प्रकारच्या नावाची काही कविता रचिली होती असे मला वाटते. (ती मी स्वतः पाहिलेली वा वाचलेली नाही.) शिवाजी आग्र्यास दरबारात गेला असता बादशहाची मुलगी त्याच्यावर फिदा झाली आणि तिने त्यास प्रेमपत्र पाठविले असा तिचा विषय असावा. ते पत्र फारसी शब्दांनी फार भरलेले असावे. ('झेंडूची फुले' मध्ये ह्या त्यांच्या फारसीप्रेमाची खिल्ली उडविणारी एक कविता आहे. त्या संग्रहाच्या प्रस्तावनेमध्येहि माधव जूलियन, रविकिरण मंडळ - माधव जूलियन हे एकच रवि, बाकी सर्व किरणे - त्यांच्या भावुक कविता ह्यांची यथेच्छ टिंगलटवाळी केली आहे.)

वर उल्लेखिलेल्या कवितेस उत्तर म्हणून अनंत काणेकरांनी पुढील कविता जुलै ३,१९२८ ह्या दिवशी केली.

मज पाहुनी तुवा गे । लिहिलेस बेगमे, ते
अडखळत वाचुनीया । आनंद होइ माते
ते ’नाथ’ आणि ’स्वामी’ । मज सर्व काहि उमजे
इश्की, दमिष्कि, दिल्नूर । काहीच गे, न समजे !
जरि या मराठमोळ्या । शिवबास बोध व्हावा,
तरि फारशी-मराठी । मज कोश पाठवावा

मस्त जमलीय कथा खुप आवडली. समांतर विश्व आणि त्या अनुषंगाने येणारे बाकी विषय ह्यावर तुमचे बरेच वाचन आहे हे प्रतिसादांतुन जाणवले. ही कथा विनोदी म्हणून चांगली आहेच पण संकल्पना स्पष्ट करणार्या ज्याला निखळ विज्ञान कथा म्हणता येईल अशा कथा पण लिहायचा विचार करा असं नक्की सुचविन.

हे माझ्यासाठी खूप अवघड आहे. HARD SCI-FI लिहिणे कठीण आणि वाचणारे मिळणे हि कठीण. मी माझ्या गोम ह्या कथेत तसा प्रयोग केला. Retro Causality. नाही आवडला/सनजला लोकांना.
"दोबारा" ह्या सुंदर sci- fi मुवीचे बॉक्स ऑफिस वर काय हाल झाले बघितलेत काय?

१)पाचवी ते आठवी (वय १० ते १३ ) यांच्यासाठी...
हे खरोखर सर्वात कठीण काम आहे.
सायन्स फिक्शन ? हे तर सगळ्यात सोप्प!
पाचवी ते आठवी (वय १० ते १३ ) यांच्यासाठी... माझा आदर्श आहे एनिड ब्लायटन. सीीक्रेट सेवेन, फाईव फाईंड औटर्स् आणि फेमस फाईव! ही मराठीत कोणी का आणत नाहीत?
सगळ्यात कठीण फेअरवेल टू आर्म्स, फार्महाउस फाईव,ग्रेट एक्स्पेक्तेशन्स्, डेविड कॉपरफिल्ड
इतक सहज सुंदर काळजाला भिडणारे ...फार्महाउस फाईव हे सायन्स फिक्शन आहे!
अजून एक सायन्स फिक्शन आणि क्लासिक "रोडसाईड पिकनिक" by स्तृगाट्स्की् ब्रदर्स.

ही मराठीत कोणी का आणत नाहीत?
धाडसी विचार आणि कृत्ये करणे यावर लहानपणापासूनच पाण्याचे हबके मारून भिजवून टाकण्यात येतं. अशी पुस्तके वाचून आनंद घेणे दूरच राहिलं. प्रकाशक वाचकांची नाडी ओळखून आहेत.