प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा: २५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण

Submitted by मार्गी on 19 October, 2022 - 07:08

२५ ऑक्टोबर रोजीचे खंडग्रास सूर्यग्रहण

पूर्ण भारतात दिसू शकेल

नमस्कार. प्रकाशाचा सोहळा असलेली दिवाळी लवकरच येते आहे. प्रकाशाच्या ह्या सोहळ्यासोबत ह्यावेळी प्रकाश आणि सावलीचा दुर्मिळ सोहळा म्हणजे खंडग्रास सूर्यग्रहणही बघता येणार आहे. २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी चंद्र सूर्याच्या काही भागाला झाकणार आहे आणि हे बघायची संधी आपण सर्वांना आहे. अगदी दिवाळीतच मला स्वत:ला एक रमणीय असं सूर्यग्रहण बघितल्याचं आठवतं. पण ते वर्ष १९९५ होतं आणि तेव्हा मी लहान होतो. त्यामुळे मुलांसाठी ही संधी किती वेगळी असते ह्याची कल्पना आहे. मुलांसाठी नवीन आणि दुर्मिळ गोष्ट बघण्याची ही संधी आहे.

कसं बघता येईल?

नुसत्या डोळ्यांनी सूर्याकडे बघणे डोळ्यांसाठी घातक आहे. त्यामुळे आपण थेट सूर्याकडे बघू शकत नाही. परंतु आपण ह्या सोहळ्याचा आनंद नक्कीच घेऊ शकतो. हे बघण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे सौर चष्मे. अद्याप काही दिवस आहेत, हे सौर चष्मे विकत घेता येऊ शकतात. ते ऑनलाईनही उपलब्ध असतात. अजून एक सोपा आणि सुरक्षित मार्ग म्हणजे पिनहोल कॅमेरा प्रोजेक्टर बनवायचा- ही एका खोक्याची अगदी सोपी व्यवस्था असते. त्यावर एक छोटं छिद्र (अगदी टाचणीने होणारं छिद्र- पिनहोल) केलेलं असतं आणि एका बाजूने बघण्य़ाची जागा असते. आपण हे युट्युबवर सहज शोधू शकता. असा पिनहोल कॅमेरा बनवताना मुलांना गंमत वाटू शकते. थोडी माहिती गूगलवर शोधा, काही युट्युब व्हिडिओज बघा आणि तुमच्या जवळच्या मुलांना हे बनवायला सांगा. स्वत: काही तरी करण्याची आणि स्वत: अनुभव घेण्याची संधी त्यांना देऊया. असा प्रोजेक्टर कसा दिसतो, हे माझ्या ब्लॉगवर बघता येईल- http://niranjan-vichar.blogspot.com/2022/10/a-rare-show-of-light-and-sha... माझ्या ब्लॉगवर मी घेतलेले चंद्र, सूर्य, ग्रह आणि तारकागुच्छांचेही फोटो बघता येतील.

अजून एक अगदी सोपा पर्याय म्हणजे एक चेंडू घ्यायचा. त्यावर एक छोटा आरसा चिकटवायचा. ह्या आरशाच्या पृष्ठभागावर जाड पुठ्ठा किंवा काळा कागद लावता येईल (फॉईल पेपर असेल तर उत्तम). मग ह्या कागदावर एक अगदी लहान ३ मिमीचं छिद्र करा. हे छिद्र लहान असतं व म्हणूनच त्याला पिन होल म्हणतात. आता तुम्ही हा चेंडू एखाद्या भांड्यावर किंवा एखाद्या बॉक्सवर ठेवू शकता. त्याला अशा स्थितीत ठेवा ज्यामुळे ह्या छिद्रावर सूर्याचा प्रकाश पडेल व त्याचं प्रतिबिंब तुम्ही दूर एखाद्या सावलीतल्या भिंतीवर घेऊ शकाल. अशी भिंत सावलीत व सुमारे ३० फूट दूर असली तर उत्तम. हे करताना सूर्याकडे पाठ करायची आहे. कधीही सूर्याकडे थेट बघू नका! चेंडू व आरसा योग्य त्या दिशेने ठेवल्यावर सावलीतल्या भिंतीवर तुम्हांला सूर्याची प्रतिमा घेता येईल. पांढरी भिंत असेल तर अजून चांगलं.

इथे हे छोटं छिद्र एका भिंगाचं काम करतं आणि आपल्याला काही अंतरावर सूर्याची एक मोठी पण उलटी प्रतिमा मिळते. आपण थेट सूर्याकडे बघू शकत नाही, परंतु अशी सूर्याची प्रतिमा सहजपणे बघू शकतो. ग्रहणामध्ये सूर्याच्या चकतीमध्ये चंद्र आल्याचं आपण सहजपणे बघू शकतो. आरसा चेंडूवर लावलेला असल्यामुळे आपण सहजपणे त्याची दिशा बदलू‌ शकतो व तो स्थिरही ठेवू शकतो.

हा आनंद कधी घेता येईल?

आपल्या ठिकाणानुसार २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या साधारण दोन तास आधीपासून हे बघता येईल. आपण त्याची नेमकी वेळ व आपल्याकडे दिसणारी ग्रहण टक्केवारी इथे बघू शकता: https://in-the-sky.org/news.php?id=20221025_09_100 तेव्हा ही संधी चुकवू नका आणि आपल्या ओळखीतल्या मुलांना एक चांगला अनुभव घेऊ द्या! ह्या आरशाच्या प्रयोगाचाही ते आनंद घेऊ शकतील. त्यासाठी केवळ एक चेंडू, छोटा आरसा, पुठ्ठा आणि छोटी टाचणी लागेल. ही सगळी तयारी करून आपण २५ ऑक्टोबरच्या सायंकाळी सज्ज राहू शकता. साधारण ४.३० पासून सूर्याची प्रतिमा घ्यायला तयार राहू शकता. जर तुम्ही उत्तर भारतात असाल तर त्याआधी तयार राहावं लागेल. हा अनुभव कसा वाटला व मुलांची प्रतिक्रिया कशी होती, हेही कळवा.

(निरंजन वेलणकर- आकाश दर्शन सत्र व मुलांसाठी फन- लर्न सत्र. तसेच मोठ्यांसाठी फिटनेस व ध्यान सत्र. अधिक माहितीसाठी- 09422108376, niranjanwelankar@gmail.com)

Group content visibility: 
Use group defaults

मस्त..
सध्याच्या पावसाळी वातावरणात दिसेल का पण ..

छान माहिती.
ऋन्मेष, तीच अडचण आहे. पण दिसेल अशी आशा करूया!

चेंडुऐवजी एका छोट्या आरशावर छोटे छिद्र पाडलेला काळा कागद चिकटवून तो आरसा तांदुळात किंवा वाळूत खोवून भिंतीवर सूर्याची प्रतिमा बघता येते. दुसरी सोपी आणि सुरक्षित पद्धत म्हणजे चाळणीतून जमिनीवर सूर्याची प्रतिमा बघणे. चाळणीच्या असंख्य छिद्रातून जमिनीवर सूर्याच्या असंख्य प्रतिमा दिसतात.

छान माहिती.
१९९५ चं सूर्यग्रहण मला world Trade centre च्या एकोणतिसाव्या मजल्यावरून बघता आलं असतं. पण डोळ्यांची काळजी वाटल्याने नाही पाहिलं.

ऋन्मेऽऽष जी व सर्वांंना धन्यवाद!

बहुतेक तरी तेव्हा आकाश स्वच्छ असेल. त्यामुळे पश्चिम क्षितिज जिथून दिसतंय अशा जागेवरून दिसायला हवं.

@ आग्या जी, अच्छा! ऐकलं होतं, आपण परत आठवण करून दिलीत!

@ भरत जी, ओहह!!!

भारी फोटो विबि

अमच्याइथ काही दिसलाच नाही
ढग आलेले निस्ते

मस्त!

आग्या, भारी! व्हीबी, तुम्ही कसा काढला हा फोटो? काळी काच न लावता काढला तर लेन्सला (कॅमेराच्या आणि/किंवा डोळ्याच्या) अपाय होऊ शकतो का?

सूर्यास्त असल्यामुळे डायरेक्ट काढला... नाहीतरी आपण सूर्यास्त नुसत्या डोळ्यांनी बघतोच.

46dd4d29533c44e1b0b1042cab22cafd.jpg

हपा माझ्या मते ग्रहण असो नसो सूर्याकडे बघणे डोळ्यास घातक ठरू शकते. उगवत्या अथवा मावळत्या सूर्याकडे बघताना मात्र धोका नाही, आपण पाहतोच. तेव्हा तवेढ्याच उगवत्या अथवा मावळत्या सूर्याकडे ग्रहण लागले असताना, ग्रहण नसताना बघतो तसे, आणि तेवढा वेळ बघण्यास धोका नसावा.

एरव्ही तळपता सूर्य आपण पाहत नाही, कधी पाहिलाच चुकून तर क्षणभरात डोळे गच्च मिटावे लागतात. ग्रहण पहायचे म्हटले तर ते काही क्षण तरी बघावे लागेल. तेवढा वेळ पुरेसा आहे डोळ्यांना इजा पोहोचवण्यास.
म्हणुन केवळ काळा चष्मा नव्हे तर योग्य तो चष्मा जसे वेल्डिंग ग्लासचा वगैरे वापरावा.

मी कधी ऑनलाईन ग्रहण बघण्याचा चष्मा वगैरे मागवला नाही, पण मागवला तर अगदी काळजीपूर्वक तो नक्की योग्य आहे ना याची खात्रीकरून मागवेन. कारण ग्रहण बघण्याचा आहे म्हटले की त्यातून जास्त वेळ बघितल्या जाईल.

कॅमेरा लेन्स बद्दल माहिती नाही पण तेच लॉजिक असेल. एरव्ही त्याला सूर्याला एक्स्पोज केल्यास त्याचे लाईफ कमी होत असेल तर ग्रहणावेळी एक्सपोज केल्यास सुद्धा होईल.

----
कुंतल +१. मी टंके पर्यंत तुमची पोस्ट आली.
फोटो छान आलाय.

<< कसा काढला हा फोटो? >>
फोनच्या लेन्समधून सूर्याकडे बघायचं, मग आपल्या डोळ्यांनी फोनच्या स्क्रीनकडे बघायचं आणि काढायचा फोटो. थेट सूर्याकडे बघायची आवश्यकता नाही.

उ बो, ते कळलं होतं, पण मग सेन्सर सॅचुरेट होऊन तापेल / पिक्सेल्स जळू शकतात असं वाटलं होतं. वरती मानव यांनी उपयुक्त माहिती दिली आहे.

वेल्डिंग ग्लास ( १४ नं ) ही सूर्याकडे थेट बघण्यासाठी सुरक्षित समजली जाते. तरीही त्यातून सतत सूर्यग्रहण बघणे डोळ्यांसाठी सुरक्षित नसते. अधिक वेळ थेट सूर्याकडे बघण्यासाठी १४ नं आणि ८ नं ची वेल्डिंग ग्लास एकत्रित ठेवून बघू शकता,परंतु अशावेळी डोळ्याची बाहुली पूर्ण उघडल्यामुळे वातावरणातील परावर्तीत अतिनील किरणे अधिक प्रमाणात डोळ्यात गेल्याने डोळ्याचे आरोग्य बिघडू शकते. सूर्याची परावर्तीत प्रतिमा बघणे सर्वात सुरक्षित आहे . मी जुना टच स्क्रीन खराब झालेला मोबाईल वापरतो लाईव्ह बघायला.

Pages