एक चुकार क्षण

Submitted by SharmilaR on 16 October, 2022 - 23:10

एक चुकार क्षण

दीप ने काहीतरी नेहमीचा पिजे मारला आणि सगळ्यांचा हसण्याचा धबधबा उसळला. ती पाणी पीत होती. कसा बसा तोंडावर हात ठेवून हसता हसता तिने ठसका आवरला. डोळ्यात अर्धवट पाणी असतांनाच तिचं लक्ष सुनील कडे गेलं. नेमकं तेव्हाच त्याचही लक्ष तिच्याकडे गेलं. अगदी एकच क्षण. त्या एका क्षणात त्याच्या नजरेत काहीतरी हळुवार उमटलं होतं, आणी तो नेमका क्षण तिने अलगद झेलला होता. तिच्या अंगावर रोमांच उठले. एक मोरपिस अलगद अंगावरून फिरल्यासारखं वाटलं. त्यालाही तिचं काहीतरी वेगळं वाटणं जाणवलं असावं. त्याने पटकन दुसरीकडे नजर वळवली. काहीतरी आणण्याचं निमित्त करून, स्वत:ला सावरायला पटकन ती आतल्या खोलीत गेली.

इतक्या वर्षात आज पहिल्यांदाच काहीतरी वेगळं घडलं होतं. दीप, सुनील, अजय आणि तिचा नवरा अन्या, अगदी पूर्वीपासूनचे म्हणजे शाळा कॉलेज पासूनचे एकमेकांचे जिवाभावाचे मित्र. सगळ्यांची लग्ने थोड्या फार फरकाने बरोबरच झाली. मग सगळ्यांच्या बायकाही एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या. आधी नवरे मित्र म्हणून एकत्र आलेल्या त्या चौघी आता अगदी घनिष्ठ मैत्रिणी झाल्या होत्या. अडल्या पडल्याला संगळ्यानाच एकमेकांचा आधार होता. सगळे जण आठ पंधरा दिवसांनी तरी एकत्र जमायचे. फिरणं, नाटक, सिनेमे ,पिकनिक सगळं एकत्रच असायचं. सगळ्यांची मुलं पण साधारण एकसारख्या वयाचीच होती. त्यामुळे नेहमी होणारं त्यांच फॅमिली गेट टू गेदर म्हणजे सगळ्यांकरताच नुसती धमाल मजा असायची.
आज असेच नेहमीसारखे सगळे अजय कडे जमले होते. मुलं एकीकडे कार्टून बघत मस्ती करत, खिदळत बसली होती. बाकी सगळे हॉल मध्ये, जागा मिळेल तिथे खाली, वर बसून गप्पा मारत होते.

एवढ्या वर्षात आजच्या सारखा अवघडलेपणाचा क्षण कधीच आला नव्हता. कित्येकदा काही कामामुळे एखाद दूसरा मित्र किंवा एखाद्याची बायको नाही आली, तरी त्या कुटुंबातली बाकी सगळी मंडळी यायची. कधी कधी तर कुणीतरी ‘ती’ एकटी, किंवा ‘तो’ एकटा, असं पण असायचं. पण सगळे लोकं एकमेकात छान सामावून जायचे. एकट्या ‘ती’ ला कुणी तरी मित्र अगदी सहजपणे आणणं सोडणं करायचा. तेवढा मोकळेपणा इतक्या वर्षांत सहजपणे आला होता. सगळेच एक दुसऱ्यांची जबाबदारी घ्यायचे. पण आजच काहीतरी वेगळं घडलं होतं. तिला काहीतरी नवीन नवीन वाटत होतं. पाणी पिऊन जरा सावरून ती बाहेर आली. पण नंतर पूर्ण वेळ ती दोघं एकमेकांची नजर चुकवत राहिले.

खरं तर ती दोघंही आपापल्या संसारात सुखी होती. तिचे तिच्या नवऱ्यावर तर त्याचे त्याच्या बायकोवर प्रेम होते. ती चांगली दोन मुलांची आई होती तर तो पण एका मुलीचा बाप होता. दोघांनाही आपापली घरं प्यारी होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर पण तिला काहीतरी छान वाटत राहिलं. पण गंमत म्हणजे तिला त्यात चोरटेपणा अजिबात वाटत नव्हता. काहीतरी नवीन घडलं होतं. तिच्या अंगावर तरल रोमांच उठले होते. स्वत:शी हलकेच गुणगुणत ती रोजची कामं करत होती. आज ऑफिस करता तयार होतांना तिने जरा रोजच्या पेक्षा जास्त वेळ आरशात बघितलं. ती स्वत:लाच रोजच्या पेक्षा जास्तच सुंदर दिसत होती. रेडियो वर गाणं लागलं होतं,

हमने देखी है ऊन आखों की मेहकती खुशबू
हाथ से छुके इसे रिशतो का इलजाम ना दो
सिर्फ एहसास है ये रूह से मेहसुस करो
प्यार को प्यार ही रेहने दो कोई नाम ना दो.....

घरात तिच्याकडे कुणाचंच लक्ष नव्हतं. मुलं त्यांच्या त्यांच्या उद्योगात आणि नवरा नेहमीप्रमाणे फक्त स्वत:मध्ये गर्क. त्याला त्याच्या गोष्टी वेळेवर मिळाल्या म्हणजे झालं.

तिच्या ऑफिस मध्ये, तिची जवळची मैत्रीण मात्र म्हणाली, “वेगळी दिसतेस. काय, फेशीअल वैगेरे करून आलीस की काय? केवढा ग्लो आलाय चेहऱ्यावर!” तिने अर्थातच ताकास तूर लागू दिला नाही. पण मग तिच्या मात्र लक्षात आलं, घरात कुणाचंच आपल्याकडे लक्ष नसणं आणि आता खूप दिवसांनी अचानक दुसऱ्या कुणाकडून प्रशंसेची नजर मिळणं हेच आपल्या ‘ग्लो’ चं कारण आहे की.

एरवी घरात आपल्या रूपाला, हुशारीला गृहितच धरल्या गेलंय. त्यामुळे घरातून कधी कौतुकाची दाद अशी ती मिळतच नाही. शब्दाने तर नाही आणि नजरेनेही नाही. पण तरीही पुढचे आठ दहा दिवस तिचे असेच हलके तरंगत असल्या सारखे गेले.

पुढच्या फॅमिली गेट टू गेदर ची वेळ आली, तो पर्यंत ती बऱ्यापैकी सावरलेली होती. तिचं मन तिच्या ताब्यात आलं होतं. मनाच्या ह्या वेड्या खेळाला वेळीच सावरायला पाहिजे, ह्याचं भान तिला आलं होतं. आता तिने जाणीव पूर्वक तसे प्रयत्न करायचे ठरवलं.

सुनीललाही नेमकी तीच जाणीव झाली असावी. ते दीप च्या घरी भेटले तेव्हा सुनील स्वत:हुन तिच्याजवळ येऊंन बसला आणि त्याने तिच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पांना सुरवात केली. ती ही मोकळी होत गेली मग. बोलता बोलता परत दोघंही पूर्वीच्या, मैत्रीच्या पातळीवर आले. दोघां मधले अवघडलेले क्षण संपले होते.

मुस्कराहट सी खिली रहती है आँखों में कहीं
और पलकों पे उजाले से छुपे रहते हैं
होंठ कुछ कहते नहीं कांपते होंठों पे मगर
कितने खामोश से अफसाने रूके रहते हैं..
सिर्फ एहसास है ये रूह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो
हम ने देखी है इन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्ज़ाम न दो हम ने देखी है......

गेल्या आठ दहा दिवसातल्या भावना मोरपीसासारख्या मनाच्या पानांत मिटल्या होत्या. बाहेर निरभ्र चांदणं पडलं होतं. एक चुकार क्षण, आठवणींच्या कुपीत खोल लपला होता.
***************************

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

खूप छान लिहिलेय.
असे क्षण येतात आयुष्यात. आणि हलकीशी आनंदाची झुळूक असल्यासारखे निघूनही जातात. पण यातून जो एक नवा उत्साह मिळतो तो मात्र पुढेही कायम राहतो.

खूप सुंदर.. विक्षिप्त मनाच्या अंतरंगाचा मागोवा ..
आणि "त्या क्षणा"च्या मोरपिशी स्पर्शाला भूतकाळात जेरबंद करण्याचा सुवर्ण सूज्ञपणा.. सारेच देखणे !

आणि हो , या गाण्यालाही नवा अर्थ दिलात !

खूप सुंदर.. विक्षिप्त मनाच्या अंतरंगाचा मागोवा ..
आणि "त्या क्षणा"च्या मोरपिशी स्पर्शाला भूतकाळात जेरबंद करण्याचा सुवर्ण सूज्ञपणा.. सारेच देखणे ! >> +१

छान लिहिलंय.

<एकट्या ‘ती’ ला कुणी तरी मित्र अगदी सहजपणे आणणं सोडणं करायचा.> वाचताना इथे किंचित थबकलो. ती एकटीच येजा करू शकली असती असं वाटलं.

तसंच कथा संपताना "चलो इक बार फिरसे अजनबी बन जाए हे " गाणं आठवलं

येस भरत., 'वो अफसाना जिसे अंजाम तक लाना न हो मुमकिन उसे एक खूबसूरत मोड़ देकर छोडना अच्छा' Happy

Lovely

सुरेख लिहिलय. अचूक पकडलेत सगळे भाव. गाण्याच्या ओळी नसत्या तरीही चालले असते एव्हढे नीट उमटलय सगळे.

सुरेख लिहिलय. अचूक पकडलेत सगळे भाव. गाण्याच्या ओळी नसत्या तरीही चालले असते एव्हढे नीट उमटलय सगळे. >>> +१

खूप छान लिहिली आहे कथा, गाणही छान बसलय, नेमका शेवट काय होणार ह्याची उत्कंठा वाढत होती, पण शेवटही छान झाला, व. पू. आठवले कुठेतरी.

पण काही गोष्टी नीट उलगडल्या नाहीत
--- सुनीलने तिच्या कडे पाहिलं तेंव्हा त्याच्या मनात नेमक काय होत? त्या घटने नंतर त्याचे विचार काय होते, "पुढच्या भेटीत तो ही सावरला होता" ...मग त्या दरम्यान त्याला काय वाटतं होत?

मुळातच त्या वेळी नेमक काय घडलं ....त्याला प्यार तरी म्हणायचं का?
प्रत्येकाला कुठेतरी आपल्या कडे कुणी पाहावं, कोतुक करावं, शब्दाने नाही तरी नजरेने अस वाटत असतं, आणि तसच काहीस घडलं त्या प्रसंगात अस वाटल.
मुल संसार आणि नोकरी अशा चाकोरीबद्ध नेहमीच्या जीवनात एखादा प्रसंग असाच घडून जातो आणि म्हणून ह्या कथेचं शिर्षक अतिशय योग्य वाटलं.

धन्यवाद मनमोहन, मन्या, दीपक पवार.
आपल्या प्रतिसादामुळे प्रोत्साहन मिळालं.
सुनीलने तिच्या कडे पाहिलं तेंव्हा त्याच्या मनात नेमक काय होत? त्या घटने नंतर त्याचे विचार काय होते, "पुढच्या भेटीत तो ही सावरला होता" ...मग त्या दरम्यान त्याला काय वाटतं होत? >>
कधीतरी एखाद्या व्यक्तीबद्दल कौतुक.. थोडं आकर्षणही वाटून जातं.. आणी त्या व्यक्तीला सुद्धा तसच वाटलं आहे हे फक्त नजरेतून जाणवतं.
हे सगळे मनाचे खेळ असू शकतात. ते मोरपीसा सारखे असतात.. अलगद पकडण्याचे.. रोजच्या जगण्यातून थोडं वेगळं काहीतरी वाटायला लावणारे.. आणी अर्थात सुज्ञपणे तसेच जपून बंद करून ठेवण्याचे..

Pages