अमिताभ - टॉप टेन

Submitted by स्वाती_आंबोळे on 6 October, 2022 - 13:56

बच्चन ऐंशी वर्षांचा होणार यंदा?!
सोशल मीडियावर बच्चन मेनिया कशाबद्दल सुरू आहे ते शोधल्यावर कळलं!

इथे बरेच (सगळेच?) बच्चन फॅन्स आहेत. तुम्हाला पहिली लागण कशी झाली बच्चनची ते आठवतं का? म्हणजे प्रथम कुठला चित्रपट पाहिला असं नव्हे, प्रथम 'अरे, हे भारी प्रकरण आहे' असं कधी वाटलं?

मला प्रयत्न करूनही आठवत नाही, जणू ते कायमच माहीत होतं.

आमच्या चाळीत दिवाळीच्या शेवटी प्रोजेक्टर वगैरे आणून सिनेमा बघायचा कार्यक्रम असायचा. तो सिनेमा कायम अमिताभचाच असायचा. (बहुधा 'डॉन'च असायचा नेहमी वाटतं! Proud ) . त्यात बहुधा प्रथम पाहिलं असावं बच्चनला. 'डॉन का इंतजार', 'नीचे तुम्हारी आँटी बहुत सारे अंकल्स को लेकर आयी है' वगैरेवर क्राउडबरोबर नेमाने टाळ्या पिटल्याचंही आठवतं.

पण अमिताभ ही व्याधी कधी जडली ते काही आठवत नाही.

तुम्हाला आठवत असेल तर सांगा - वाचायला आवडेल. Happy

त्याबरोबरच तुमच्या टॉप टेन फेव्हरिट अमिताभ मोमेन्ट्सही लिहा. डायलॉग, एक्स्प्रेशन, अ‍ॅक्शन, काहीही.

या माझ्या (नॉट इन एनी पर्टिक्युलर ऑर्डर) :

१. चुपके चुपके : परिमल बनून असरानीच्या घरी राहायला जातो आणि जया भादुरीला बघताच प्रेमात पडतो. जात्या सत्प्रवृत्त माणूस, सोंग उघडं पडेल या भीतीने सतत टेन्शनमध्ये असतो. ते एक फार प्रचंड भारी सुंदर पंक्चरलेलं हसू हसत 'हॅ हॅ हॅ, गाना तो आप को सुनाना ही पडेगा' म्हणतो ते बघून मला दर वेळी फुटायला होतं! सिनेमा भाषेच्या गमतीजमतींचा आहे, आणि नखशिखांत गुलजारचाच आहे, पण अमिताभ हा प्रसंग खिशात घालतो!

२. नमक हराम : यूनियन लीडरने अपमान केला त्याबद्दल राजेश खन्नाला सांगताना संतापाने अक्षरश: डोळ्यांत पाणी आलेला बच्चन. तो रोलच खराखुरा अ‍ॅन्ग्री यंग मॅनचाच आहे. त्याच किंवा बापाला हार्ट अटॅक आल्याचं कळतं त्या प्रसंगात त्याबद्दल बोलताना 'ही इज अ ब्लडी… ही इज अ ब्लडी…' याच्यापुढे त्याच्या तोंडातून शब्दच फुटत नाही रागाने!

३. त्रिशूल : तो 'एक सेकंद के लिये लगा मेरा अपना खून है'वाला सगळाच प्रसंग! बापाबद्दलचा राग, सूडबुद्धी एकीकडे आणि त्याने आणि गीता सिद्धार्थने सहज कौटुंबिक जिव्हाळ्याने त्याच्या जखमी हाताची शुश्रुषा केल्यावर एकदम डिसार्म होणं दुसरीकडे! त्या सगळ्या संमिश्र भावना एकाच वेळी चर्येवर दिसत असतात! अफाट!

४. शोले : कितीतरीच प्रसंग - लिस्ट करणं अवघड होईल. 'बहुतों को इन्होंने दो घंटों में सिखा दिया है', 'तो शादी के बाद तेरे घर मुझे आया की नौकरी मिलनेवाली है' हे नेहमी आठवल्या जाणार्‍या 'तो मैं ये रिश्ता पक्का समझूँ?' किंवा 'पहली बार सुना है ये नाम'वगैरेंव्यतिरिक्त. प्रत्येक संभाषणात जी 'पते की बात' असते ती तो बोलतो किंवा विचारतो! त्या अनुराधा चोप्राच्या पुस्तकात वाचलं होतं की सेटवर बसून सलीम जावेद डायलॉग्ज ऑन द फ्लाय लिहीत होते. तसं असेल तर हे कॅरेक्टर बिल्डिंग किती भारी आहे ते आणखीनच जाणवतं.

५. शक्ती : तो स्मिता पाटीलच्या घरी राहात असताना राखी त्याला 'घरी चल' म्हणून भेटायला येते तो सगळाच प्रसंग. तो आपण एका मुलीबरोबर राहातो हे आईला कसं सांगायचं म्हणून इतका अवघडून जातो की ज्याचं नाव ते! 'वो वहाँ उस का कमरा - वहाँ वो जाने, उस का काम जाने; मैं यहाँ ये अपना… अलग…'

६. दीवार : मारामारीत कशाला पडलास म्हणून निरुपा रॉय त्याला ओरडत असते तेव्हा तिच्याकडे रोखून बघत फक्त 'तो क्या मैं भी भाग जाता?' इतकंच विचारतो! ते 'भी' ठासूनसुद्धा म्हणत नाही, गरजच नसते! ती त्या संपूर्ण कुटुंबाची सगळ्यात दुखरी नस असतेच. ऐकून तिच्या वर्मावर आघात होतोच, पण ते म्हणताना त्यालाही तितकाच त्रास होत असतो!

७. पुन्हा दीवार : शशी कपूरला पोलिस ट्रेनिंगसाठी सोडायला स्टेशनवर जातात तेव्हा तिथे नंतर नीतू सिंग येते. शशी कपूर दोस्त म्हणून ओळख करून देतो, पण अमिताभ काय ते समजतो आणि आईला घेऊन शिस्तीत तिथून कटतो. मग हळूच मागे येऊन शशी कपूरच्या कानात 'अच्छी है' म्हणून सांगून जातो.

८. डॉन : लता चांगली गाते हे आपल्याला माहीत असतंच, पण इतर कोणी तिची गाणी गायलेली ऐकली की ती चांगली म्हणजे किती चांगली होती ते नीटच कळतं तसं माझं शाखाचा डॉन बघताना झालं! 'मुझे उसके जूते पसंद नहीं'चं 'हॅहॅहॅहॅ शूज' झालेलं ऐकवेना!

९. काला पत्थर : राखी काहीतरी बॅन्डेज वगैरे आणायला दुसर्‍या खोलीत जाते तेव्हा तिच्या टेबलावर उपडं घातलेलं पुस्तक न राहवून उचलून बघतो तो सीन.

१०. त्याच्या आवाजात ऐकलेल्या नज्म/कविता! 'कल नयी कोपलें फूटेंगी', 'मैं और मेरी तनहाई', इ.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सला मे इश्क का विसरलात का का. अमिताभ रेखा हीच खरी जोडी आहे. बाकी सब कॉ़ंप्रमाइज. काल रेखीचा पण बड्डे होता.

नमक हलाल मधील पग घुं गरु च्या आधीची तुफान विनोदी दहा मिनिटे.
विजय मर्चंट विजय हजारे.
पार्टीत लग्नाचा ड्रेस करून जाणे.
तुम मेरे दद्दु नही हो सकते.

तुम्ही कुठे होत्या @अश्विनीमामी? बर्याच दिवसांत कोणत्याही धाग्यावर तुमचे प्रतिसाद न दिसले नाहीत, म्हणून काळजी वाटत होती (दरम्यान एखाद्या धाग्यावर कदाचित तुमचा प्रतिसाद असेलही पण मी नजरचुकीने वाचला नसेल).
ताजा कलम: गेल्या काही दिवसांपासून तुम्ही मायबोलीवर 'अमा (अश्विनीमामी)' ऐवजी 'अश्विनीमावशी' नावाने वावरत आहात, पण मी तुम्हाला 'मामीच' म्हणणार.

मी तुम्हाला 'मामीच' म्हणणार.>> मला पण अश्विनीमामीच आवडते. मै इदरिच थी रोमामे. पर अमीतनें खिंचके लाया.

मेरे पास आओ मेरे दोसतो एक किस्सा सुनो मध्ये शेवटाला अमित व रेखा एकमेकांना बघत असतात तेव्हा काय मस्त पियानो म्युझिक आहे. येही है असली प्यार. बाकी सब काँप्रमाइज.

हॅप्पी बर्थडे, मिस्टर बच्चन!

इथे भरभरून लिहिणार्‍या सगळ्या अमिताभ-चाहत्यांचे आभार.

आज सकाळी मला 'स्लमडॉग मिलिअनेअर'मधल्या त्याच्या नॉन-कॅमिओची आठवण झाली होती.
तो कसा कल्चरल आयकॉन झाला आहे आता याची एक छोटीशी पावती.

बच्चन ऑल टाईम फेवरीटे. त्यामुळे धागा आवडला. प्रतिसाद तर एक से एक आहेत. _/\_

वरती रानभुली ह्यांनी ज्या लिंक्स दिल्यात, त्यातली ३ नंबरची लिंक. 'मजबूर'. त्यात बच्चन फिश टॅंक घेऊन रस्ता ओलांडतानाचा एक सीन आहे.. त्या सीनचं खतरनाक रसग्रहण प्रशान्त बागड यांनी 'नवल' या कादंबरीत केलं आहे, हे एक यानिमित्ताने आठवलं.

https://youtu.be/Sl1ap3W3bGw?t=121

थोडॅ टँजंट अहे ... प्रकाश मेहराच्या मुलाखतीवर आधारीटत ....
जंजीरची मूळ कथा सलिम जावेद कडून धर्मेंद्राने विकत घेतलेली नि तो त्यात इंटरेस्टेड होता. कमीत कमी त्याचे प्रॉडक्शन हवे असा त्याचा आग्रह होता. त्याला डेटस चा काँफ्लिक्ट आला म्हणून त्याने कुठल्या तरी स्क्रिप्ट ची अदलाबदल करून जंजीर प्रकाश मेहरा ला दिला . देव आनंद ला जंजीर नवकेतन बॅनर खाली करायचा होता नि त्यात गाणी हवी होती. हे मेहरा ने करायला नकार दिला म्हणून देव आनंद बारगळला. राजकुमार ला जंजीरचे स्क्रीप्ट्स आवडले होते फक्त मद्रास मधे शूट करायचे होते कारण तो तिथे सहा महिन्यांसाठी बुक्ड होता म्हणून तो उडाला.
राजेश खन्ना चा ह्यात उल्लेख नाही कारण प्रकाश मेहरा च्या मुलाखती मधे उल्लेख नाहीये.
गमतीची गोष्ट म्हणजे मुमताझ लग्न करून बाहेर निघाली म्हणून जया आली. मेहराला संशय होता कि तिचा अमिताभबरोबरच आधीचा सिनेमा दणकून आपटल्यामूळे तिथे हा इझी मार्ग घेतला असावा.
प्राण मात्र सुरूवातीपासून कायम होता नि त्याने अमिताभचे नाव बॅक्ड केले म्हणून मेहराने अमिताभला कंसिडर केले. ' 'यारी है इमान मेरा' Happy बुवा उवाच "शेवटी भवती न भवती होऊन अँग्री यंग अमिताभ जन्माला यायचा होता एव्हढेच खरे"

तळटीप : प्रकाश मेहराच्या मते 'अँग्री यंग' हा टॅग जंजीर बद्दल टॅबलॉइड मधून आला नि वैयक्तिक रित्या त्याला तो आवडला नव्हता.

प्राणला विशेष धन्यवाद. जंजीरमधे अमिताभच्या जागी वरच्या इतर कोणाला बघू शकले नसते आणि जयाच्या जागीही नाही. देवाची योजना (देव आनंद नाही ईश्वर) .

मस्त माहिती असामी. काही लेखांमधे "तुझ्या (प्रकाश मेहराच्या) डोक्याच्या तेलाचा वास आवडला नाही" असे कारण देऊन राजकुमारने हा रोल नाकारला होता असे वाचले होते Happy

बाय द वे, "यंग" अमिताभ तेव्हा ३१ वर्षांचा व दीवार नंतर ती इमेज फिट्ट झाली तेव्हा ३३-३४ वर्षांचा होता. ऑल्मोस्ट २८-२९ वर्षांचा असेपर्यंत तो फारसा कोणाला माहीतही नव्हता हे आता वाचायला आश्चर्य वाटते Happy

गाण्यांवरून आठवले. अमिताभच्या या सुरूवातीच्या गाजलेल्या पिक्चर्स मधे त्याला फार कमी गाणी असत. कभी कभी मधले एक गाणे, शोले मधले एक, त्रिशूल मधले एक कडवे. बास. जंजीर, दीवार, काला पत्थर मधे तर नाहीतच. आणि त्या तीन गाण्यांत मुकेश, मन्ना डे आणि येसुदास चा आवाज Happy किशोरचा आवाज काही पिक्चर्स मधे तोपर्यंत होता त्याला - एक नजर, अभिमान, बॉम्बे टू गोवा वगैरे. पण खर्‍या अर्थाने तो त्याचा प्लेबॅक झाला असावा तो "अँथनी" पासून. या रोल ने अमिताभची एक दुसरी इमेज लोकप्रिय केली. आता तो कॉमेडी करू लागला. हीरॉइन्स बरोबर गाणी वगैरे गाऊ लागला Happy Happy

(नंतर पुढे नाचूही लागला आणि स्वतःही गाऊ लागला. नशीब देव आनंद प्रमाणे आता मी दिग्दर्शनही करतो अशा हट्टाला पेटला नाही)

नशीब देव आनंद प्रमाणे आता मी दिग्दर्शनही करतो अशा हट्टाला पेटला नाही) >> पुन्हा हा ऐकिव किस्सा आहे. बहुधा बंटी और बबली अच्याच वेळी अभिषेक चे दिग्दर्शन अमिताभ ने केले होते नि बराच गरम माहोल असायचा सेट वर त्यावेळी अभिषेक ला झेपू शकत नसल्यामूळे.

तेलाच्या वासाचा किस्सा कणेकरांनी लोकप्रिय केला (तो राजकुमार च्या अतरंगी इमेज शी फिट बसतो म्हणून हिट झाला) खर तर राजकुमारच्या सिनेमांच्याअ स्क्रिप्ट्स ची निवड इतरांपेक्षा वेगळी असे तोवर जर बघितलेस तर. नंतर तो पण इमेजमधे अडकला.

>>> अमिताभच्या या सुरूवातीच्या गाजलेल्या पिक्चर्स मधे त्याला फार कमी गाणी असत
'अभिमान'मध्ये प्रोफेशनल पॉप सिंगर असतो ना! Proud
आणि 'रिमझिम गिरे सावन'तर हार्मोनियम वाजवत गातो की! ती गाण्यात कुठेही ऐकू येत नाही ते सोडून सोडा! Proud

ती गाण्यात कुठेही ऐकू येत नाही ते सोडून सोडा! >>> लोल. गाण्यांमधे नसलेली वाद्ये ऐकू येतात. हे उलटेच आहे.

अभिमान मधे आहेत गाणी. बॉम्बे टू गोवामधेही आहेत. मी त्याची अँग्री यंग मॅन इमेज बनवणारे पिक्चर्स होते त्याबद्दल म्हणतोय. मे बी कभी कभी जरा ग्रे एरिया आहे. अगदी त्यातला नाही.

अमिताभ, बहुतेक कलकत्त्याला असताना ऑल इंडिया रेडियोने
त्याला "तुमचा आवाज प्रसारणयोग्य नाही" असा शंकर दिला होता.
हे त्यांचे आपल्यावर मोठेच उपकार म्हणायला हवेत.

स्रोत - अमीन सयानींना दिलेली मुलाखत. सारेगम कारवॉंं गीतमाला.

अरे सत्तेपे सत्ता मधील तो हेमामालिनीला पटवायच्या प्रयत्नात असतो. व तिच्या खोलीवर एकदम एक मोठे कलिंगड घेउन जातो तो सीनही फार विनोदी आहे. ती वैतागून ते कलिंग ड फेकून देते. पण अमित हेमा हे काहीतरी मोहरीची फोडणी दिलेली साखी असे वाटायचे. समथिन्ग नॉट राइट. ती धर्मां ण्णा बरोबरच शोभते.

लेख आणी सगळे प्रतिसाद एकदम भारी! आवडणारे बहुतेक पिक्चर आणी सीन्स वरच्या प्रतिसादांत आलेच आहेत.

माझी एक लहानपणीची आठवण, पहिली किंवा दुसरीत असतानाची. मे महीन्याच्या सुट्ट्या संपून शाळा सुरु झालेली. एकजण सुट्टीत एक कुठलातरी पिक्चर थिएटरला बघितल्याचं रंगवून सांगत होता. तो भाव खाउन सांगत होता, आणी बाकीचे असूयेने बघत असतानाच दुसरा एकजण त्याच्याकडे तु. क. टाकत म्हणाला, "पण त्यात बच्चन नाहीये!"
केवळ एका वाक्याने त्याच्या किस्स्यातली सगळी हवाच निघून गेली Happy

बाकी माझा एक आवडता सीन बहुदा वर आला नाहीये अजून. पिक्चर हम. बच्चन हा बच्चन नसल्याची अ‍ॅक्टींग करत शांत आयुष्य जगत असतो. मग रजनीकांतची बायको आणी मुलगी बेपत्ता झाल्यावर एसटी स्टँडवर त्यांचे फोटो दाखवत चौकशी करत असतो. तेव्हा एक बस ड्रायव्हर बेकार कॉमेंट करतो. तरीही बच्चन बच्चन नसल्याची अ‍ॅक्टींग कंटीन्यू करत एकदा त्याला शिस्तीत - "भाईसाहब जरा तमीज से बात किजीये ना!" म्हणतो. त्याच्या अ‍ॅक्टींगला गंडलेला ड्रायव्हर तोर्‍यात म्हणतो, "वरना क्या करलेगा तू?"
बास! चष्मिश बच्चन मान खाली करुन चष्मा काढतो, आणी वर बघतो तेव्हा त्या एका सेकंदात अ‍ॅक्टींग बंद, बच्चन सुरू! त्या क्षणी त्याचे फक्त बदललेले डोळे पाहून थिएटरमधे काय उसळलं होतं पब्लीक, ते अजून लख्ख आठवतंय Happy

काला पत्थरही पाहिला काल. तशीच मजा आली थिएटरमध्ये.
चित्रपट परत पाहून आलेली एक आठवण:
शत्रू खाणीतून लोकांना वाचवताना "घबरा मत बेटा. शाब्बास. आ जा बेटा, आ जा!" म्हणतो. हे लहानपणी आमच्यात फारच फेमस झाले होते. झाडावर चढणे, उड्या मारणे, किंवा अजून कुठले खेळ खेळताना कोणी घाबरले की मग असेच "डर मत बेटा! आ जा बेटा, आ जा, शाबास!" म्हणत असू. हे बरंच वर्षे चालले होते.

फारेन्ड ने म्हटलेला, ट्रक मध्ये अमिताभ शत्रू कडे बघतो तो सीन आज ही तेवढाच जबरदस्त वाटला.

जुन्या आंतरजालीय लेखकांपैकी संजोपराव हे माझे सर्वात आवडते लेखक. त्यांनी अमिताभच्या ठरावीक चित्रपटांमधल्या सुंदररीत्या चित्रित केलेल्या सीन्सचे कोलाज केलेला हा लेख मला फार आवडतो. इच्छुकांनी लाभ घ्यावा.

https://sanjopraav.wordpress.com/2007/10/14/%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%a4%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%a1/

बच्चन हा बच्चन नसल्याची अ‍ॅक्टींग करत शांत आयुष्य जगत असतो >>> Lol हे सुपर आवडलेले आहे. तो सीन तर लक्षात आहेच. आम्ही "हम" बंगलोर मधे पाहिला होता. तेथे या सीनला आणि त्याच्या आसपास रजनीकांत बहुधा कन्नडमधे तेथील ड्रायव्हरशी बोलतो तेव्हा आख्खे थिएटर उसळले होते. साउथ फॅन्स हा काय प्रकार आहे हे तेव्हा पहिल्यांदा समजले होते. पुण्यात मंगला वर हम चा नेहमीप्रमाणे वरच्या भिंतीवर आपली पायरी सांभाळत असलेला पिक्चरबोर्ड होता. बंगलोरच्या च्या थिएटरच्या बाहेर दोन तीन मजली बच्चन उभा होता कट आउट स्वरूपात Happy

अजून कुठले खेळ खेळताना कोणी घाबरले की मग असेच "डर मत बेटा! आ जा बेटा, आ जा, शाबास!" म्हणत असू. हे बरंच वर्षे चालले होते. >>> Lol

केवळ एका वाक्याने त्याच्या किस्स्यातली सगळी हवाच निघून गेली >>> Lol

पण अमित हेमा हे काहीतरी मोहरीची फोडणी दिलेली साखी असे वाटायचे. समथिन्ग नॉट राइट. >>> टोटली अमा. मलाही ती पेअर तेव्हा अजिबात आवडली नाही. काहीतरी अवघडल्यासारखे वाटायचे स्क्रीनवर बघताना. मात्र बर्‍याच नंतर बाघबान मधे ऑड वाटले नाही ते पेअरिंग.

बाघबान मधे ऑड वाटले नाही ते पेअरिंग.>> हाउ दोनो इच बुड्ढे हो गये ना अब बात चली गयी. इट कुड हॅव बीन एनी ओल्ड कपल

“अ‍ॅक्टिंग बंद, बच्चन सुरू!" >> हे भारी Happy तो सीनही लक्षात राहिलेला आहे. तरी हम त्याच्या प्राइम मधला सिनेमा नाही त्यामुळे टुकार पणा बराच आहे त्यात. अग्निपथ पण बर्‍याच जणांना फारसा आवडत नाही पण हातखंडा अँग्री यंग मॅन रोल मधला (बहुतेक शेवटचा) सिनेमा म्हणून मला आवडला होता तो. त्यातली त्याची स्टाइल पण. बरेच सीन्स आणि डायलॉग्ज लक्षात आहेत त्यातले. टोपी सम्हालो दिनकर राव, कांचा चीना ये तेरा कपडा पहननेका स्टाइल अपुन को अच्छा लगा, ए साला क्या देखता है वगैरे. Happy

अग्नीपथ : एखादा कोणता प्रसंग सांगावा ? आख्खा सिनेमाच . मी पहिल्या दोन दिवसात बिगबी च्या "त्या" स्पेशल खर्ज आवाजातला पहिला. ज्याम आवडून गेला. नंतर लोक ओरडले म्हणून आवाज कमी खर्जाचा केला ! दहा पंधरा वर्षे अंडरवर्ल्ड मध्ये मॅचुर डॉन ! क्लासिक जणू दिवारचा पुढचा भागच ! हा मला इतका भावला कि मी ह्रितिक चा अग्नीपथ पहिलाच नाही !

अग्निपथ पण बर्‍याच जणांना फारसा आवडत नाही >>> मला आवडत नाही असे म्हणणार नाही पण सलीम-जावेद लीग मधला नाही. लिहीलेले कॅरेक्टर अमिताभने चांगले उभे केले आहे पण ते कॅरेक्टर आणि त्याचे संवाद फार बटबटीत आणि डम्ब्ड डाउन आहेत - काही सीन्स वगळता. उदा: तो विक्रम गोखलेबरोबरचा सीन. एकतर अमिताभचे "हाँय" मला इरिटेट होते. ते नंतर कधीतरी आले ९०ज मधे. आधी फारसे नव्हते. पहिल्या इनिंग मधे आठवत नाही. पुढे पुढे चित्रपटांत त्याच्या तोंडी गंगाकिनारेवाली भाषा आली ती अजिबात आवडत नसे.

अमिताभच्या संवादफेकीची खरी ताकद कृत्रिम नाट्यमयता न आणता त्याच्या नैसर्गिक आवाजात आणि चिडून पण तरीही शांतपणे म्हंटलेल्या संवादांत होती. आवाजच भारी असल्याने त्याला ओरडायला लागत नसे. अगदी प्राण समोर खुर्ची लाथाडूनही तो अगदी साध्या आवाजात त्याला ऐकवतो. दीवार मधेही संवादात उगाच नाटकी आरडाओरडा नाही. "अगर किसीने हिलने की कोशिश की तो भून के रख दूँंगा" हे वरतून खाली गब्बर व त्याच्या पब्लिकला ऐकू जायला ओरडायलाच हवे. पण एरव्ही सहसा तो ओरडला नाही. त्यामानाने अग्नीपथ वगैरे मधे खूप वेगळी संवादफेक आहे. ती मला फारशी आवडली नाही.

>>> ऑल इंडिया रेडियोने त्याला "तुमचा आवाज प्रसारणयोग्य नाही"
अरे देवा!

>>> “अ‍ॅक्टिंग बंद, बच्चन सुरू!"
>>> "पण त्यात बच्चन नाहीये!"
>>> अमित हेमा हे काहीतरी मोहरीची फोडणी दिलेली साखी
Lol

यावर एक चर्चा ऐकलीये ती अशी -

अमिताभ सुपरस्टार अगदी मिलेनियम स्टार वगैरे झाल्यावर हा ऑल इंडिया रेडिओचा रिमार्क पुन्हा चर्चेत आला होता. ज्यांनी अमिताभच्या आवाजावर असा अभिप्राय दिला होता त्यांनी पुन्हा एकदा ठामपणे सांगितलं की आमचा आजही तोच अभिप्राय आहे - लोकांचं बातम्या, उद्घोषणा वगैरेंवर लक्ष जायला हवं, आवाजावर नव्हे. अमिताभचा आवाज रेडिओवरच्या बातम्या वाचण्याकरिता नाहीच.

विचारांती हे पटतंय.

धरम हेमाचं लग्न होण्याआधी सिनेमे जोरात चालायचे पण लग्नानंतर ही जोडी फारशी यशस्वी झाली नाही. याउलट हेमाचे जितेंद्र, राजेश खन्ना आणि अमिताभ सोबतचे चित्रपट जास्त गाजले.

धरम पाजींनी अर्थातच हरकत घेतली आणि काही सिनेमांमधून मग हेमाने बॅक आऊट केले. असाच एक म्हणजे खुद्दार. यामुळे अमिताभ धरम यांच्या मैत्रीत दुरावा आला. अमिताभनेही याचा बदला घेतला. सिनेमात टॅक्सीचे नाव ठेवले बसंती. पुढे एका दृश्यात तो त्या टॅक्सीची चांगलीच तोडफोड करतो असे दाखविले आहे.

अमिताभ हेमा ही जोडी पब्लिकला किती आवडते हे सिद्ध करायला एकटा बागबान पुरेसा आहे.

बागबानवरुन आठवलं..

अमिताभने म्हातारपणी कसं यशस्वी व्हायचं त्याची तयारी फार आधीच करुन ठेवली होती असं दिसत आहे.

https://www.youtube.com/watch?v=RscsV4uuetw

https://youtu.be/himlbsMN4g8

करवा चौथच्या अ‍ॅडव्हान्स्मध्ये शुभेच्छा!

डिस्क्लेमर - वरील गाणी पाहताना गंगा जमुना सरस्वती वाहू लागल्यास भाटवडेकर जबाबदार नाहीत.

"मै आज भी फेके हुये पैसे नहि उठाता .... "! jabaree scene aahe haa... 9-10 veles baghitlaa asel Deewar...

नास्तिक : "भग्वान के नाम का sahara lene wale bhikaree hote hai"

अमिताभवरचा भाऊ पाध्ये यांनी लिहीलेला एक मस्त लेख
https://www.aksharnama.com/client/article_detail/6363

एका प्रसिद्ध लेखकाने लिहीलेला आहे हे एक आणि दुसरे म्हणजे १९७९ साली लिहीलेला आहे. त्यामुळे आता मागे वळून पाहताना लिहीले जाणारे लेख व तेव्हा हे सगळे "करंट" होते तेव्हा लिहीलेला यातला फरक जाणवेल.

बाय द वे, सलीम-जावेद चा अमिताभ वि. अमर अकबर अँथनी मधला अमिताभ याबद्दलचे माझे निरीक्षण आणि यांचे एकदम मॅच झाले Happy

Pages