आत्मजा
In this world,she is our world..
ती झाली तेंव्हा तिच्या बाबाच्या म्हणण्याप्रमाणे ती जगातली सगळ्यात सुंदर मुलगी होती, untouched beauty!
ह्या आमच्या पहिल्या बेटीनं ,धनाच्या पेटीनं आम्हाला किती आणि कसं श्रीमंत केलं ह्याची मोजदाद करता येणार नाही.
तिची जन्मापासूनची सगळी रुपं अगदी ताजी आहेत मनात, "कधी मोठी झाली कळलंच नाही"हे फिल्मी वाक्य मनातसुद्धा न येता , तिच्या वाढीचे,विकासाचे सगळे टप्पे वेगवेगळ्या गतीनं आम्ही अनुभवले, जगले, त्याचा मनसोक्त आनंद घेतला आणि तिच्याबरोबर आम्हीही आमचं बालपण,किशोरपण, तरुणपण पुन्हा अनुभवलं असं म्हणणं जास्त खरं ठरेल!
तिच्यासाठी खेळणी आणताना,त्यावर हात फिरवून कुठे टोचणार नाहीत हे बघताना, कपडे अगदी मऊ मऊ असतील हे बघताना, तिला खायला देताना, अंघोळीचं पाणी काढताना त्याचं तापमान योग्य तेवढं असेल हे जीवापोटी बघताना,तिला अंघोळ घालणारे हात तिला खरबरीत लागत तर नाहीत ना हे बघताना,
कुकर किंवा मिक्सर लावताना तिची झोप मोडणार नाही हे बघताना, तिला पक्ष्यांचे प्राण्यांचे आवाज ऐकवताना,वेगवेगळी गाणी, नाद तिच्या कानावर पडावे ह्यासाठी धडपडताना, जगातला कोलाहल शक्यतोवर तिच्याप्रति पोहोचू नये ह्यासाठी आटोकाट प्रयत्न करताना,तिचे बोल कानात आणि मनात प्राणपणाने साठवताना,अगदी लहान असताना डाळिंबाचा दाणा तिच्या जिभेवर पिळताना,
तिला वेगवेगळ्या चवी करुन घालताना,मोठी झाल्यावर तिनं वेगवेगळ्या चवी आमच्या रसनेला शिकवताना,तिच्या भातुकलीमधले पदार्थ मिटक्या मारत खाताना, नंतर तिनं केलेल्या पोळ्यांना मान डोलावताना आणि माझ्या नवीन पदार्थाना ती दाद किंवा प्रोत्साहन देताना!
तिला अगदी लहानपणी कोवळं ऊन दाखवताना, ढगांचे वेगवेगळे रंग आणि आकार दाखवताना,पुस्तकातली चित्रं दाखवताना,अक्षर वाचून तिच्याकडे बघताना, नंतर ती अभ्यास करताना तिच्याकडे बघताना,तिच्या नजरेतून तिच्या पिढीकडे आणि समाजाकडे बघताना आम्ही किती मोठे झालो...
तिचं नकटं नाक कौतुकानं निरखताना, वेगवेगळ्या गंधांची तिची ओळख करुन देताना,तिच्या बेबी पावडरचा सुवास,नंतर perfume चा रेंगाळत राहणारा गंध उरात साठवताना,
तिचं कधी शाळेतून मुसमुसत किंवा तर कधी खळखळून हसणं अनुभवताना,तिचं कधी लंबकाप्रमाणे असणं तर कधी अगदी स्थिर असणं दोन्ही अनुभवलं
ती अगदी अगदी प्रामाणिक आहे हे जाणवताना,तिच्या योग्यतेपेक्षा कमी यश मिळालेलं बघताना,तिला पुन्हा बळ देताना, तिच्या वेगवेगळ्या यश आणि अपयशातून ती आणि आम्ही शिकताना,तिनं निवडलेल्या वेदनामुक्तीच्या अनवट वाटा कौतुकानं बघताना,तिच्या यशानं उर भरुन येताना त्यामागचे कष्ट धडपड हे जाणवताना..तिचं रस्त्यावरच्या प्रत्येक मांजर कुत्रा इतकंच नव्हे तर मटारमधल्या अळीशीसुद्धा प्रेमानं बोलताना कौतुकानं बघणं ,तिची त्याबद्दल कधी चेष्टा केल्यावर तिचं खळखळून हसणं हे सगळं बघताना आपण एक चांगलं सहृदय माणूस उभं करायचा चांगला प्रयत्न केला ही खूणगाठ मनाशी बांधताना..आपल्या माणसांचीच नव्हे तर प्राण्यांचीही आजारपणं काढताना तिच्या जीवाची होणारी काहिली जवळून पाहताना..तिची समजूत घालता घालता हळुहळू आपल्याला समजून घेणारी,प्रोत्साहन देणारी ती बघताना, तिला समुद्रात पहिल्यांदा नेल्यावर,नेलं असतानाचा तिचा चेहरा आणि धुकं पहिल्यांदा अनुभवतानाचा चेहरा कुठल्याही कॅमेऱ्यात नाही तर मनात साठवताना,
तिला कसलीही तोशीष लागू नये म्हणून धडपडताना,ती कधीतरी, कधी कळत कधी नकळत तिला लागलीच ह्याबद्दल खंत वाटताना, घरच्या अडचणींमध्ये तिला आमच्याबरोबर खंबीर उभं राहताना बघणं आणि तिचं विलक्षण भावनाप्रधान असणं हेही समजून घेताना,तिच्या सर्व आनंदाच्या क्षणांत तिनं आम्हाला संपूर्णपणे सामील करुन घेताना, तिच्या वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळ्या समस्या,अडचणी ह्यांचा सामना करताना तिनं घेतलेले सल्ले,कधी मानलेले कधी सपशेल अमान्य असलेले, तिच्याबरोबरच्या खरेदीत पूर्व पश्चिम इतकं मतांतर असताना तिनं थोडं पूर्वेकडे आणि आम्ही थोडं पश्चिमेकडे जातानाचे मनःपूर्वक प्रयत्न आणि काही विशिष्ट प्रत्येक जण आपापल्या ठिकाणी तळ ठोकून राहताना किती किती समृद्ध झालो आम्ही !पालक म्हणून स्वामित्वाची भावना बाळगायची नाही हे ठरवूनही कधी ती आली तर मोडून काढताना ,तिचं लहानपणापासूनचं वर्चस्व शिरोधार्य मानताना(थोडक्यात तिची दादागिरी सर आँखोंपर मानताना) तिच्याबरोबरचा प्रत्येक क्षण आम्ही अगदी खरंखुरं आयुष्य जगलो, सुखदुःखाच्या अडचणीच्या आनंदाच्या अगणित वाटा आम्ही बरोबर चाललो,हात हातात घेऊन चाललो हे आमचं खूप मोठं सुदैव..तिचे रेशमी हात तिनं आमच्या हातात खुशाल बिनधास्त दिले आणि आमचे निबर खरखरीत झालेले हात तिच्या मऊ हातात प्रेमानं घेतले..
ह्या सगळ्यांतून आम्ही किती श्रीमंत झालो हे सांगता येणार नाही..घरातली तिची अखंड बडबड ,तिचा वावर, खेळणी, विखुरलेली पुस्तकं,तिच्या अभ्यासाची आयुधं, अगदी अभ्यासासाठी घरी आणलेला सांगाडा, कपडे,लेहेंगे, कानातली, चपला,तिच्या वेण्या, केसांचे चिमटे,चपला, पेनं ,सुंदर अक्षरातल्या तिच्या नोट्स,तिचं वेगवेगळ्या कलांमध्ये पाऊल टाकून बघणं, तिचं ते पाणीही हलणार नाही इतकं सुंदर शांत पोहणं, कथक करताना तिच्या चेहऱ्यावरचे विभ्रम सगळं सगळं आमच्या पोतडीत भरुन घेतलंय आम्ही..समृद्धपणाच्या व्याख्या आणि व्याप्ती वाढवणारं आमचं सहजीवन..खरोखर आमच्या छोट्याश्या जगात तिनं इतक्या आनंदाच्या तेजाळ असंख्य समया लावल्या आहेत!
अशी आमची लेक नुकतीच लग्न होऊन सासरी गेलीये, तिच्या सुविद्य, गुणी आणि सत्प्रवृत्त अशा जोडीदाराबरोबर तिनं सुखानं संसार सुरु केला आहे.कधी चुकली तर आम्ही आहोतच तिच्याबरोबर पण तिच्या उद्देशाबद्दल नखभरसुद्धा शंका कधीही असणार नाही आमच्या मनात..तिनं पंख पसरुन भरपूर उंच भरारी घ्यावी,आतला प्रामाणिक आवाज कायम ऐकत रहावा,यशस्वी अयशस्वी ह्या झमेल्यात न पडता, खूप चांगलं काम करावं आणि आयुष्य समरसून आनंदानं जगावं ह्या कामना मनात आहेतच.
तिच्या सर्व जबाबदाऱ्या ती उत्तम पार पाडेल ह्याची खात्री आहे पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे माणूसपणाची, मानली तर जबाबदारी जी जन्मानं, जन्माबरोबर येते ती पार पाडायला ती सक्षम आहे ह्याचा खूप अभिमान आहे.
नुकतीच तिच्या नवीन आयुष्याला सुरुवात केलेल्या आमच्या लेकीने तिचे सतरा इंच केस कापून हे कॅन्सर पेशंटसाठी टोप बनवायला दान केले तेंव्हा मनातून किती भरुन आलं ,मनात किती वेगवेगळ्या भावनांचे तरंग उठले हे शब्दांत सांगता येणं अशक्य आहे..
लग्नानंतर तिला निरोप देताना आमच्या आणि तिच्या जीवाची जी तगमग झाली ती मात्र फार फार अवघड होती पेलायला. वरकरणी हसत असलो तरी वियोगाची खोल सुरी पोटात होतीच. हृषीकेश मुखर्जी ह्यांच्या मिली सिनेमात एक संवाद आहे, मिलीचे वडिल तिच्याशी लग्न करु इच्छिणाऱ्या तरुणाला म्हणतात की मैं उसका बाप हूँ, मेरा उसके साथ रिशता कमी ज्या़दा हो नहीं सकता। ह्या संवादाची खोली त्यावेळी समजली नव्हती, ती समजली स्वतःचं लग्न झाल्यावर,नंतर समजली ती आईवडिलांचा प्रवास संपताना आणि आता आणखी प्रखरपणे समजली पण तेंव्हा माझी भूमिका वेगळी होती. आता मी आई असल्यानं हा संवाद मनात आला तरी इतका आत भिजवून जातोय!'दाटून कंठ येतो' ह्या गाण्याचं एक कडवंसुद्धा डोळ्यातल्या पाण्याशिवाय ऐकता आलेलं नाही.पण आमच्या आयुष्याचं तिच्या आयुष्यात पडलेलं प्रतिबिंब बघताना ते किती हृद्य आहे हे पुन्हा एकदा जाणवलं."लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते"ह्या ओळी किती किती जवळ वाटताहेत.. लेक,मुलगी, तनया,तनुजा, दुहिता हे सगळे समानार्थी शब्द असले तरी आत्मजा हाच शब्द ऋचासाठी अगदी योग्य चपखल आहे हे नक्की.आमचं आणि तिचं " हे हृदयीचे ते हृदयी " असणारं नातं शुभममुळे छान फुलत राहणार आहे..
Someday when the pages of my life end,I know you will be one of the most beautiful chapters..Unknown..
आत्मजा.....
ज्येष्ठागौरी
तरल, मनोवेधी लिहिलेत.
तरल, मनोवेधी लिहिलेत.
आत्मजेच्या आगमनापासून ते आताच्या फुलपाखरी वयापर्यंतचे टप्पे अनुभवले-अनुभवतो आहोत त्यामुळे लेखन खूप रिलेट झाले.
सुरेख.
सुरेख.
नेहेमीप्रमाणे उत्तम, बरेच
नेहेमीप्रमाणे उत्तम, बरेच दिवसांनी वाचायला मिळाल तुमच लिखाण. शीर्षकावरून हेच गाणं आणि त्याच ओळी आठवल्या. खूप छान.
सुंदर
सुंदर
सुरेख लिहिलं आहे.
सुरेख लिहिलं आहे.
सुरेख!
सुरेख!
सुंदर लिहिलं आहे.
सुंदर लिहिलं आहे.
किती सुंदर….
किती सुंदर….
खुप छान!
खुप छान!
मस्त
मस्त
अशा लेखांमुळे मायबोली लॉगिन
अशा लेखांमुळे मायबोली लॉगिन करण्याचे सार्थक होते... किती सहज सुंदर लिहिलंय... आवडले...
सुंदर लिहिलं आहे.
सुंदर लिहिलं आहे.
आत्मजा आवडलेल्या सगळ्यांना
आत्मजा आवडलेल्या सगळ्यांना खूप खूप धन्यवाद, पुष्कळ दिवसांनी लिहिलं,तुमचे प्रतिसाद वाचून उत्साह आला!
खूप सुंदर.....
खूप सुंदर.....
छान लिहिलेय.
छान लिहिलेय.
तुमच्या 'आत्मजे'ला नूतन वैवाहिक जीवनासाठी हार्दिक शुभेच्छा.
अतिशय भावस्पर्शी लेखन!
अतिशय भावस्पर्शी लेखन!
च्रप्स ... खरंच आहे तुमचं !
हम साथ साथ है मधलं एक वाक्य माझ्या कानात नेहमी घुमत असतं !
"ये बेटियाॅ होती बडी प्यारी है! "
मला ते खूप खूप आवडतं ....
त्या वाक्यात दडलेल्या इतक्या सगळ्या छटा जणू तुम्ही अगदी नेमक्या शब्दबद्ध केल्या आहेत!
चिंगी अस्मिता पशुपत मनःपूर्वक
चिंगी अस्मिता पशुपत मनःपूर्वक धन्यवाद! मुलगा किंवा मुलगी भावना सारख्याच असतात पण मुलगी जास्त हळवं करुन सोडते हे खरं!
छान लिहिले आहे.
छान लिहिले आहे.
आहा हृदयस्पर्शी लिहितेस तू ..
आहा...
हृदयस्पर्शी लिहितेस तू ...
मुलगी.....त्यातही बहीण
मुलगी.....त्यातही बहीण नसलेल्या आईची मुलगी...आपलंच प्रतिबिंब....काय बोलू, काय लिहू? न बोलताच जाणवतंय. भावनांना शब्दात इतकं सुंदर गुंफणं तुलाच जमतं.
छान लिहीलय, एक लय जाणवली
छान लिहीलय, एक लय जाणवली वाचताना.
सुंदर!!!
सुंदर!!!
सुरेख मनोगतपर लेख आवडलाच ...
सुरेख मनोगतपर लेख आवडलाच ... लेकीचा नुकताच साखरपुडा झाल्याने लेखातील अनेक वाक्यांना 'अगदी अगदी' वाटलं.
लग्नानंतर तिला निरोप देताना आमच्या आणि तिच्या जीवाची जी तगमग झाली ती मात्र फार फार अवघड होती पेलायला. >> खरंय त्या भावना शब्दबद्ध करणे शक्यच नाही... काही वर्षांपूर्वी देशाच्या दुसऱ्या टोकाला असलेल्या कॉलेजमध्ये लेकीला सोडून येतांना ज्या काही भावना होत्या, त्यापेक्षा तिच्या साखरपुड्याच्या दिवशी (अगदी अजूनही ) मन कितीतरी जास्त हळवं झालं होतं.
तुमच्या आत्मजेचे अभिनंदन... Wishing her a lifetime of love and happiness.
राधिका खूप खूप धन्यवाद!
राधिका खूप खूप धन्यवाद!