बाहुली – कुट्टीची गोष्ट

Submitted by SharmilaR on 26 September, 2022 - 00:55

बाहुली – कुट्टीची गोष्ट

"अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होता बत्ता |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा दत्ता ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होता गिलास |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा विलास ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होत्या पिना |
भुलोजीला लेक झाली , नाव ठेवा मीना ||
अडकित जाऊ , खिडकीत जाऊ खिडकीत होतं कॅलेंडर |
भुलोजीला लेक झाला , नाव ठेवा अलेक्झांडर ||

स्मिता कडे सगळ्या मुली रंगात येऊन हसत - खिदळत भुलाबाईची गाणी म्हणत असल्या तरी सगळ्यांचं लक्ष होतं ते मात्र उभ्या असलेल्या स्मिताच्या हातातल्या खिरापतीच्या डब्याकडे. आता हे गाणं संपलं कि स्मिता डब्बा हलवणार. मग सगळ्यांनी खिरापत ओळखायची. काय असेल बरं ? गुळ - दाणे काल झाले. साखर - खोबरं पण होऊन गेलं.....

कुट्टी आणि साधना हातांचा झोका करून भुलाबाईचं बाळ, म्हणजे बाहुली जोजवत गात होत्या. आज त्या दोघींना पाळणा करण्याची संधी मिळाली होती. कुट्टीचं पूर्ण लक्ष हातातल्या बाहुलीकडे होतं.

'बरोबर आहे, स्मिता सांगत होती ते..... तिची पण बाहुली जुनी झालीय माझ्या बाहुलीसारखीच.' कोजागिरी पर्यंत दोघीनींही नवीन बाहुली मिळवायचं ठरवलं होतं. कुट्टीकडे आई पाचच दिवसांची भुलाबाई बसवणार होती. भुलाबाई बसवायच्या आत नवीन बाहुली आणायला हवी होती.

'आज तरी आणलीय कि नाही नवीन बाहुली बाबांनी..... घरी जाऊन बघायला हवं....' .

कुट्टी रोज सकाळी शाळेत जायच्या आधी बाबांना आठवण करून देत होती. आणि रोज बाबा सांगत होते, ' आज नक्की आणीन ऑफिस मधून येतांना......'

"बाणा बाई बाणा सुरेख बाणा
गाणे संपले खिरापत आणा............"

स्मिताने डबा हलवायला सुरवात केली. सगळ्या एकच गिलका करून खिरापत ओळखायला लागल्या.
"फुटाणे...."
"नाही...."
"खोबर....."
"नाही......"
काय बरं ...........
"हरल्या?"
"..........."
"भिजवलेले हरबरे......."

खिरापत खाऊन कुट्टी पळत आपल्या घरी आली.
"बाबा, माझी बाहुली आणली?" नुकत्याच ऑफिस मधून आलेल्या बाबांना कुट्टीनं विचारलं.
"अरे!!! बेटा अजून माझा पगार नाही झाला. पगार झाला कि लगेच आणीन." बाबांच्या उत्तरावर कुट्टी हिरमुसली. आज पण नाही........

दुसऱ्या दिवशी सकाळची शाळा आटपून कुट्टी घरी आली आणि जेवण होतंय तोवर स्मिता धावत आली.
"काकू, आज दुपारी मी देवीला जाणार आहे. आमच्या पाहुण्यांना घेऊन. आई म्हणाली येत असेल, तर कुट्टीला पण घेऊन जा बरोबर. घेऊन जाऊ?" धापा टाकत स्मिताने विचारलं.
"अगंबाई , आलेत का तुमचे पाहुणे?....... दोघंच आलीत कि आणखी कुणी आलं बरोबर ?" आईनं चौकशी केली.
"नाही. विजूदादा आणि वाहिनी दोघंच आहेत." स्मितानं सांगितलं .
विजूदादा म्हणजे स्मिताच्या कुठल्यातरी लांबच्या काकांचा मुलगा. नवरात्र चालू झालं कि देवीच्या दर्शनाला म्हणून सगळ्यांकडेच असे कुणी कुणी पाहुणे कुठून कुठून यायचे.
"काय गं कुट्टी, जाणार का देवीला ?" आईनं कुट्टीला विचारलं.
"हो......." कुट्टीनं मान डोलावली.
देवीला जायला जग्गात कुणाला आवडणार नाही? एरवीही तिथे जायला मज्जा येते. आतातर काय नवरात्रच चालू आहे. सगळीकडे मज्जाच मज्जा. सगळीकडे रंगीबेरंगी दिवे......आकाशपाळणे ....... आई शेजारच्या सगळ्या काकू वगैरे पहाटेच जाऊन येतात दर्शनाला.
"बरं ...मग मी तुला आवाज देईन. आज देवीहुन आल्यावर मग भुलाबाई करू." स्मिता तशीच पळत गेली.

कुट्टीच्या डोळयासमोर देवीच्या रस्त्यावरची दुकानं अन गम्मत यायला लागली. देऊळ खूपच लांब होतं , पण नेहमी सगळे पायीच जाणंयेणं करायचे देवीला. अगदीच कध्धीतरी येतांना बस मध्ये बसायला मिळायचं. पण पायी चालायला कुणाचीच तक्रार नसायची. जायला मिळणं महत्वाचं. मुली रेंगाळतात म्हणून बरेचदा मोठ्या बायका त्यांना चुकवून जायच्या देवीला.

रेल्वे लाईनच्या या बाजूला राहणाऱ्यांना देवीचे दोन रस्ते होते. एक जायचा अन एक यायचा. म्हणजे जायच्या रस्त्यानी आलं..... नाहीतर मग यायच्या रस्त्यानी गेलं तरी चाललं असतं. पण तसं कुणीच करत नव्हतं. खालच्या रस्त्यानी जायचं अन वरच्या रस्त्यानी परत यायचं.

खालचा रस्ता म्हणजे...... मुख्य चौकाकडून थोडा उतार असलेला रस्ता. सगळे म्हणायचे तो शॉर्टकट आहे. तो रस्ता खरंतर खूपच बोअर होता. अजिबात गर्दी नसायची त्या रस्त्यावर. थोडी जुनीपानी घरं ...... एका कायम बंद असलेल्या कार्यालयाची लांब, उदास भिंत..... आजूबाजूला बघण्यासारखं काहीच नव्हतं त्या रस्त्यावर. मग सगळेच पटपट चालायचे आणि देऊळ पण पटकन यायचं. म्हणून तो शॉर्टकट असेल का?.....
पण येतांना मात्र तो शॉर्टकट कुणालाच नको असायचा. आधी अंबादेवीचं दर्शन घ्यायचं, तिला लहान देवी म्हणायचे. मग एक प्रदक्षिणा मारून थोड्या चढावावर असलेल्या एकविरा देवीच्या दर्शनाला जायचं. तिला मोठी देवी म्हणायचे. दर्शनाचा क्रम अस्साच ठेवायचा नाहीतर देवी रागावते म्हणे. दर्शन झालं कि मिनिटभर टेकायचं तिथे, नवरात्र नसेल तेव्हा. नवरात्रीत कसली गर्दी अन ढकलाढकली असते...... तेव्हा कुठे जागाच नसते बसायला.
पटापट दर्शन करून झालं कि हुश्श! आता खरी गम्मत. या मज्जेकरता तर देवीला यायचं. परत येतांना खणानारळाची छोटी छोटी दुकानं पार केली कि, आधी लोखंडी भांड्यांची अन लाकडी वस्तूंची दुकानं लागायची. बायका जरा तिथे रेंगाळायच्या. कुणाला कढया , तवे बघायचे असायचे तर कुणाला लाकडी झारा .... लाटणं ......

मग छान छान काचेची कपाटं असलेली दुकानं होती. लाईटच्या उजेडात तिथल्या वस्तू चमकत असायच्या नुसत्या. कानातले..... बांगड्या...... रंगीबेरंगी गळ्यातले.....खेळणी...... अगदी कुठे बघू नि कुठे नाही असं व्हायचं. तिथे घ्यायचं कुणीच काही नाही पण नुसतं बघायला पण छान वाटायचं. मग रेंगाळत तिथून पुढे आलं कि रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी खाली बसलेल्या बायकांच्या समोर चादरीवर मांडलेले कानातले... माळा ..... कुणाला काही घ्यायचच असलं तर ते इथूनच घेतल्या जायचं. सगळ्याच खूप घासाघिशी करायच्या. पण घ्यायच्या ते इथेच. मग गाड्यांवर मांडलेली खेळणी.....फुगे......पिपाण्या....... बराच मोठा रस्ता कसा संपायचा ते कळायचं पण नाही. वरच्या रस्त्याने घरी पोचेपर्यंत झगमगाट डोळ्यात साठून राहायचा. पायी चालण्याचं कुणालाच काही वाटायचं नाही.

दुपारी स्मिताने आवाज दिला तेव्हा कुट्टी तयार होऊनच बसली होती. रस्त्याने स्मिता आणि कुट्टी जोडीने गप्पा मारत चालल्या होत्या अन त्यांच्या मागे स्मिताचे दादा - वाहिनी होते. नवरात्र असल्यामुळे आज खालच्या रस्त्याला पण नेहमीपेक्षा जरा जास्त गर्दी होती. गप्पांमध्ये देऊळ केव्हा आलं ते कळलंच नाही.

पुरुषांच्या अन बायकांच्या रांगा वेगवेगळ्या असतात नवरात्रात. वाहिनीने ओटीच ताट घेतलं तिथेच सगळ्यांनी चपला ठेवल्या अन दर्शन झाल्यावर सगळ्यांनी तिथेच भेटायचं ठरवलं. एकमेकींचा हात पकडला तरी गर्दीत हमखास सगळ्यांची चुकामुक होतेच. मग दर्शन झाल्यावरच सगळे एकत्र भेटतात.

दर्शनाची रांग फक्त म्हणायचे पण एका रांगेत कुणीच उभं राहत नाही. सगळ्याच एकमेकींना ढकलत असतात.... लहान बाळाना उंच करून देवी दाखवतात, म्हणजे देवीला बाळ दाखवतात. कारण बाळ आपली जोरानं रडत असतात, त्यांना तिथून बाहेर जायचं असतं .

स्मिता वहिनीला ताट सांभाळायला मदत करायचा प्रयत्न करत होती. अन कुट्टी शक्यतो त्या दोघींच्या आसपास राहायचा प्रयत्न करत होती. नवरात्रात देवी नेहमीपेक्षा सुंदर दिसते. देवीचे सगळे दागिने कसे लखलखत असतात. पण धड एक सेकंद पण बघता येत नाही कि पुढे ढकलल्या जातो. आज पण तसंच झालं. पुजाऱ्याने खसकन ओटीच ताट घेतलं अन ओटी काढून पटकन नारळ अन ताट परत केलं. दोन्ही देवींची दर्शनं अशीच रेटारेटीत आटपली अन तिघी चपला घालायला गेल्या. विजूदादा तिथे वाट पाहत उभाच होता. सगळेच पुरुष अन मुलं नेहमीच आधी येऊन उभे राहतात तिथे.

चपला घालून अन नारळ पिशवीत टाकून सगळे मोठ्या रस्त्याकडे वळले. सगळ्याच बायका करतात तशी स्मिता वहिनीनेही तिच्याकरता लाकडी झारे वगैरे घेतले. काचेची दुकानं लखलखत होती. आज तिथे नेहमीपेक्षा जरा जास्तच रेंगाळता आलं. कारण आज स्मितावहिनी बरोबर होती अन तिलाही सगळं बघायचं होतं , दुकानांच्या बाहेरूनच. खूप गर्दी होती तरी सावकाश सगळं डोळ्यात साठवून त्या जरा बाहेरच्या रस्त्यावर आल्या.
खाली बसलेल्या बायकांजवळ खूपच मोठं कोंडाळं होतं सगळ्या ठिकाणी. मग तिथे त्या थांबल्याच नाही. तिथे लागूनच असलेल्या हातगाड्यांजवळ सगळे आले. दादा वाहिनीची वाट न पाहता स्मिता आणि कुट्टी बाहुल्यांच्या गाडीवरच्या गर्दीत घुसल्याच. त्यांना बाहुल्या हातात घेऊन बघायच्या होत्या. आता त्या तिथे गर्दीत पुढे गेल्या म्हंटल्यावर दादा वहिनीला मागून यावंच लागलं.

गर्दी खूप होती तरी उत्साहाने कुट्टी आणि स्मिता आवडलेल्या बाहुल्या हातात घेत होत्या, एकमेकींना दाखवत होत्या. गाडी वर इतर लोकं पण असच करत होते. गाडीवाल्याला किंमत विचारत होते, परत ठेऊन दुसरं काहीतरी उचलत होते.....

कुट्टीची नजर एका सोनेरी केसांच्या छोट्याशा बाहुलीवर गेली. तिने ती पटकन उचलली तर बाहुलीने डोळे उघडले. किती गम्मत. तिने ती स्मिताला दाखवली. मग दोघीही ती मुठीत मावणारी बाहुली उभी अन आडवी करून बघायला लागल्या. आडवं केलं कि बाहुली डोळे बंद करायची अन उभी केली की उघडायची. मज्जा. भुलाबाईचा पाळणा करायला तर एकदमच मस्त!

'दादा वहिनीला काही घेऊन मागायचं नाही .' असं आईनं बजावून सांगितलेलं स्मिता विसरली अन तिने ती बाहुली वहिनीला दाखवलीच.
'व्वा! छान. छान आहे गं ......अहो बघा नं ...... ' असं म्हणत वाहिनीने ती बाहुली दादाच्या हातात दिली.
'हो..हो.... छान आहे..... इथे नको......पुढे बघू अजून.......भैय्या.......ये लो तुम्हारी गुडिया.......' असं म्हणत विजूदादाने सगळ्यांना तिथून बाहेर काढलं. तो इतका भराभर चालायला लागला कि तो चिडलाय असं वाटून तिघीही लगेच त्याच्या मागे आल्या.

सोनेरी केसांच्या निळ्या डोळ्यांच्या बाहुलीत गुंतलेलं मन मागेच ठेऊन रस्ताभर बाहुलीबद्दलच बोलत त्या घरी पोचल्या ते पुढच्या वेळी येऊन ती घ्यायचीच असं ठरवूनच.

घरी येऊन पाणी वैगेरे पिऊन आईला सांगून कुट्टी भुलाबाईला स्मिताकडे गेली.
"अडकित जाऊ , खिडकीत जाऊ .........' सुरु झालं.

आज सोना आणि कुट्टीने हातांचा पाळणा केला. त्यांच्या हातात बाहुली आली. तीच ती नवीन. सोनेरी केसांची.
विजूदादाने पैसे दिले बाहुलीचे?............ केव्हा?......... तो तर म्हणाला होता........
'पुढे बघू अजून.......भैय्या.......ये लो तुम्हारी गुडिया......????????' .

नाही नाही दिलेत त्याने पैसे.. त्याने ती तशीच खिशात घातली.. गर्दीत कुणाचं लक्ष नाहीये बघून.. म्हणूनच तो तिथून भराभरा चालत सुटला..

दुसऱ्या दिवशी सकाळी शाळेत जातांना कुट्टीने बाबांना आठवण नाही केली आज बाहुलीची.

Group content visibility: 
Use group defaults

धन्यवाद कुमार, अमीत, फुलराणी, ऋन्मेऽऽष.
नक्की कुणी दिली मग ती बाहुली ? >> पैसे नं देता त्याने बाहुली घेतली. आणी हे कुट्टीच्या लक्षात आलं.

पैसे नं देता त्याने बाहुली घेतली.>> अरे.. असं का बरं ? मुलींच्या नकळत त्याने विकत घेतली असं मी समजले होते!

गोष्ट खूपच छान आहे. वर्णन अगदी डोळ्यासमोर उभं राहिलं.

प्रतिसादा बद्दल धन्यवाद सगळ्यांचे.

पैसे नं देता त्याने बाहुली घेतली.>> अरे.. असं का बरं ? मुलींच्या नकळत त्याने विकत घेतली असं मी समजले होते!>> ह्यात जो काळ मी वर्णन केलाय तो काळ छोटया छोटया गोष्टी पण नं परवडणारा होता.
म्हणूनच देवीला पायी जाणं... बायकांनी घासाघिस करून कानातले वैगेरे विकत घेणं... कुट्टीच्या वडिलांनी बाहुली करता पगाराची वाट पहाण आलंय.

छान गोष्ट कुट्टीची...

मुलींच्या नकळत त्याने विकत घेतली असं मी समजले होते!
>>> मी पण असेच समजलो

खूप छान फुलवता तुम्ही कथा!
कथेत रंगवलेल्या काळात अमरावतीला हिंदी भाषक दुकानदार होते हे जरा नवलाचं वाटलं.

धन्यवाद आबा, भरत.
कथेत रंगवलेल्या काळात अमरावतीला हिंदी भाषक दुकानदार होते हे जरा नवलाचं वाटलं.>> नागपूर, अमरावती ह्या विदर्भातील शहरां मध्ये घराबाहेर.. परक्या लोकांशी बोलण्याची सुरवात कायम हिंदीनेच व्हायची. शाळा कॉलेज मध्येही हिंदीचा जास्त वापर व्हायचा. पुढे मी नाशिकला आल्यावर एवढे मराठी बोलणारे ऐकून खूपच चुकल्या सारखं व्हायच.

कथा छान आहे आणि कुट्टी सिरीज माझी आवडती आहे.

माझीही कथा समजण्यात गडबड झाली होती. मला वाटलं, दादाने न कळत बाहुली विकत घेऊन दोघी मुलींना सरप्राइज दिलं.

धन्यवाद सामो, राधानिशा.

एकदम जुन्या काळात गेल्यासारखं वाटतं .>> हो त्याच काळातली आहे... जेव्हा आपण गरीब असायचो... आणी आपले नातेवाईक, शेजारी पण गरीबच असायचे. सगळ्याच गोष्टींचा अभाव असायचा....