लेह लडाख वारी भाग आठ

Submitted by pravintherider on 20 September, 2022 - 22:21

लेह दर्शन

आज सकाळी निवांतपणे उठलो कारण आज आम्ही लेह मध्ये फिरणार होतो त्यामुळे काहीही घाई नव्हती. सकाळ पासून समीर ला पण थोड ठीक वाटत होत.  आम्ही साधारण नऊ पर्यंत आवरून बाहेर निघालो. पहिले जावून नवीन टायर घेतला आणि एका ठिकाणी गाडी पण धुवायला लावून दिली. लेह मध्ये आज खुप गरम वातावरण होत.
आज आमचा पूर्ण दिवस लेह शहर आणि तेथील प्रसिद्ध जागा पाहण्यासाठी ठेवला होता.

प्रथम आम्ही गेलो ते थिकसे मॉनेस्ट्री ला, लेह मधील प्रसिद्ध आणि भव्य अशी मॉनेस्ट्री. खरंच खूप सुंदर आणि शांत जागा आहे. मनसोक्त फोटो आणि व्हिडिओ घेतले. बुद्ध मूर्ती समोर काही वेळ शांत बसून होतो तो अनुभव शब्दात नाही सांगू शकत. तेथून जवळच शे पॅलेस आहे. शे पॅलेस ला थोड चालावं लागतं आणि लेह मध्ये थोड चाललं तरी दम लागतो. शे पॅलेस मध्ये जास्त वेळ ना घालवता आम्ही खाली पायथ्याजवळच असणाऱ्या एका हॉटेल मध्ये गेलो. काल चा जेवणाचा अनुभव पाहता आम्ही सकाळी नाष्टा केलाच नव्हता पण हॉटेल बाहेर गर्दी पाहून अंदाज लावला की जेवण छान असेल. आज आम्ही वेगवेगळ्या डिशेस मागवल्या जेणेकरून एक तरी पदार्थ छान मिळेल आणि सर्वच छान मिळालं मग काय पोट भर जेवून आम्ही पुढे निघालो. एक दोन ठिकाणी विचारल की, गाडी थोडं पॉवर लॉस दाखवत आहे पण मनाजोग उत्तर मिळालं नाही. एअर फिल्टर मी नवीन टाकले होते. शेवटी मग तो नाद सोडला नी आम्ही शांती स्तूप आणि लेह पॅलेस कडे निघालो. लेह मधील स्रीया पण लहान लहान गल्ली मधून जोरात गाडी चालवतात त्यामुळे आपण आपलं आरामात चाललो होतो.

एका ठिकाणी तिबेटीयन लोकांनी त्यांच्या काही गोष्टी विक्रीस ठेवल्या होत्या मग गाडी साईड ला लावून त्या खरेदी केल्या. मी तर पहिले लडाखी पताका गाडी ला लावल्या होत्या. शांती स्तूप वगैरे फिरून आम्ही लेह मार्केट ला आलो. आज आम्हाला सर्वांना सारखेच टी शर्ट घेतले. ग्रूप फोटो आणि एक आठवण म्हणून. 

एकदम उजवीकडे मी आहे.
लेह मार्केट मध्ये आज फक्त समीर चा बोलबाला होता. भाऊ ने इतकी खरेदी केली की आम्ही तिघे मिळून त्याच्या एकूण खर्चा पर्यंत पोहचलो नाही. तिकडेच मग विचारून एका छान हॉटेल मध्ये जेवायला गेलो. मोमोज तर खूप छान मिळाले. बाकी जेवण पण मस्त होत. उद्या आम्हाला खार्दुंग ला पास, नुब्रा व्हॅली, डिस्किट, हुंडर आणि तिकडून पंगोंग लेक कडे जायचं ठरवलं होतं. गणेश आणि बुरहान ची भाड्याने बाइक घेण्याची इच्छा होती. मग ठरवलं की एक दिवस बाइक घेवून जावू नुब्रा व्हॅली आणि खरदुंग ला आणि नंतर कार ने पंगोंग ला. मग जवळच एका ठिकाणी जावून चौकशी केली अन् तिकडे समजलं, एका दिवसासाठी बाइक भाडयाने देत नाही कारण अंतर खुप आहे आणि गाडी गरम होते. तसेच चांग ला पास येथे काम चालू आहे आणि पॅंगॉन्ग कडे जाणारा रस्ता पण वाहून गेला आहे. त्यामुळे रस्ता खुप खराब आहे. त्यांना सांगितल की, आमची गाडी पण थोड त्रास देत आहे तर ते बोलले की सर्वच गाड्यांना विरळ हवे चा त्रास होतो. गाडी विचारली तर बोललो इकोस्पोर्ट आहे तर बोलले जा मग. पण मग आम्ही विचार केला की, तिकडे जर त्रास दिला तर आपण अडकून जावू त्या पेक्षा एक दिवस गाडी आणि एक दिवस बाइक असा प्लॅन करू. त्यांनी सांगितलं की, आमची गाडी घेवून जा, खार्दुंग ला, नुब्रा व्हॅली, हुंडर, श्योक, पांगोंग लेक, चांग ला पास इत्यादी. एक दिवस हूंडर मध्ये मुक्काम करा. बोललो आमची गाडी काय करू, तर बोलला माझ्या घरी लावतो काळजी करू नका. मग सर्वांनी असं ठरवलं की, जर खरंच परिस्थिती खराब असेल तर आपल्याला त्रास होईल, त्यापेक्षा पैसे जातील थोडे पण मला पण आराम मिळेल आणि चौघांना एकत्र एन्जॉय पण करता येईल. आधिक बजेट चा विचार करता आम्ही गाडी करून नाही गेलो तरी डिझेल, मुक्काम आणि जेवण हा खर्च होतोच मग ते पैसे वजा करून थोडे पैसे जास्त जात होते पण आराम आणि अर्थातच विना टेन्शन मजा करायला मिळणार होती. त्यांनी आम्हाला झायलो आणि इनोवा क्रिस्टा चा पर्याय दिला अर्थातच आम्ही इनोवा ने जाणार होतो. त्यांना सांगितलं की,ड्रायव्हर चांगला द्या, काहीवेळेस ड्रायव्हर खुप नाटक करतात. त्यांनी सांगितलं की निश्चिंत जा. हवं तर फक्त दोन हजार आता द्या आणि काही त्रास झाला तर पैसे कमी द्या. (चारधाम यात्रेत ड्रायव्हर ने खूप त्रास दिला होता) आम्ही मग हॉटेल वर आलो तर हॉटेल वाला बोलतो गाडी इथेच ठेवा पार्किंग मध्ये परत येणार तर तुम्ही इकडेच थांबा. मग सर्व सामान आम्ही गाडी मध्ये लावून फक्त गरजे पुरते सामान सोबत ठेवलं. पूर्ण लडाख मध्ये आम्हाला कुठे हि वाईट अनुभव आला नाही. सर्व लोकं आपली मदत करतात. मी एका ठिकाणी चुकीच वळण घेतलं होत पण पोलिसांनी बाहेरची गाडी आहे पाहून नजरांदाज केलं... असो. रूम वर येवून आज पर्यंतचा केलेला खर्च आणि शिल्लक याचा अंदाज घेतला. पुर्ण प्रवासात गणेश कडे खर्चाची जबाबदारी होती. बुरहान कडे हॉटेल आणि समीर कडे फोटोंची...

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users