मनाली ते सर्चू दिनांक १६-०८-२०२२ अंतर २१० किमी
आज मात्र आम्ही आरामात उठलो कारण वातावरण छान वाटत होत. कदाचित पॅराग्लायडिंग करायला मिळेल अशी आशा होती. आम्ही मग तयारी करून सोलन व्हॅली कडे निघालो. तसं पण आज नाही झालं तर परत आम्ही मनाली येणार होतो (?). आम्ही नाष्टा केला नी मनाली ला टाटा केलं. सोलन व्हॅली मनाली पासून एक तासा च्या अंतरावर आहे नी रोड एकदम भारी... आज आम्ही लेह मनाली हायवे वर होतो. खरंच इतका छान रस्ता अशा प्रतिकूल परिस्थितीत पण बनवता येतो याचं सुंदर उदाहरण आहे. आम्ही सोलन व्हॅली मध्ये पोहचलो नी एक दोघे जण पॅराग्लायडिंग साठी गळ घालत होते पण पैसे अव्वाच्या सव्वा मागत होते. बुरहान ने सरळ सांगितलं की, सीझन मध्ये इतका भाव नसतो मी जानेवारी मध्ये येवून गेलो आहे. ४५००/- प्रत्येकी खुप जास्त होतात. मग हो नाही करत आम्ही सरळ अटल टनेल कडे निघालो. आज गर्दी पण कमी होती मग मस्त फोटो घेतले आणि व्हिडिओ पण. भूक पण खूप लागली होती. खरंतर आज आम्हाला केलोंग् ला मुक्काम करायचा होता पण अपेक्षेपेक्षा लवकर आम्ही अटल टनेल पार केला होता.
आम्ही मग टंडी ला पण न थांबता सरळ केलोंग ला गेलो नी एक मस्त हॉटेल पाहून जेवणाची ऑर्डर दिली. तो पर्यंत बुरहान ने स्वतः साठी चिकन सूप मागवलं. आम्ही जेवण करताना विचार करत होतो की, आता मुक्काम करायचा की पुढे जायचं कारण आम्ही आधी पासूनच ठरवलं होतं की सर्चु, पांग अशा समुद्र सपाटी पासून उंच जागेवर मुक्काम करायचा नाही. बराच वेळ चर्चा केल्यावर असं ठरवलं की, पुढे जावूया आणि समजा पुढे रस्ता बंद किंवा खराब असेल तर मागे परत फिरू किंवा जिस्पा किंवा दारचा ला मुक्काम करू. तो पर्यंत गाडी ला पण विरळ हवेचा त्रास होत आहे असं जाणवत होतं काही वेळा. दारचा चेक पोस्ट वर फक्त विचारपुस करून हळू हळू जा आणि अंधार पडायला सुरुवात झाली तर थांबून घ्या असा सल्ला मिळाला. भारतीय सैनिकाना तुम्ही कधी ही मदतीसाठी विचारा ते नेहमीच मदत करतात. दारचा नंतर लगेच दिपक ताल म्हणून एक तळं आहे आणि नंतर पुढे सूरज ताल दोन्ही ठिकाणी आम्ही थांबलो नाही. पुढील आव्हान होत ते झिंग झिंग बार आणि तेथील वॉटर क्रॉसिंग दोन्ही पण चांगलाच घाम काढतील असं वाटलं होतं पण खर तर कोणत्याही वॉटर क्रॉसिंग मध्ये गाडी ने त्रास दिला नाही. झिंग झिंग बार मध्ये गाडी ने विरळ हवे मुळे थोडा त्रास दिला. पहिल्या गियर मध्ये गाडी थोडी त्रास देत होती पण एकदा का RPM 1+ झालं की गाडी दणादण चढत होती. झिंग झिंग बार उतरताना मात्र आम्ही एक दोन ठिकाणी मस्त शॉर्टकट घेतला नी पुढे भरतपूर चा नाला पाहून मी तर विचार करत होतो की यांना खाली उतरवून देतो पण तोच एक भारतीय सैनिक येवून बोलला अरे बिंदास घाला गाडी आरामात निघेल आणि झालं पण तसच पण व्हिडिओ काढता नाही आला. पुढे थोडा रस्ता खराब होता नी आता आम्हाला बारा लाच ला पार करायचा होता. समीर आणि बुरहान ला अस्वस्थ वाटू लागल्याने आम्ही न थांबता निघालो. बारा लाच ला ची चढाई करताना रस्ता काही ठिकाणी खुप खराब होता. आम्ही काळजी घेत घेत पुढे जात होतो. तो पर्यंत समिर आणि बुरहान ला त्रास होत होता पण हे होणार याचा अंदाज होता तर आम्ही पुढे निघालो. बारा लाच ला वर काही फोटो घेतले नी लगेच निघालो एक तर थंडी वाढली होती नी जास्त उंचावर थांबलो तर त्रास अजून वाढला असता. आम्ही खाली उतरत असताना पुन्हा एक मोठी वॉटर क्रॉसिंग आली आणि रस्ता खुप खराब होता पण उतार असल्याने मी निश्चिंत होतो. समोरून येणाऱ्या सर्व गाड्यांना वाट दिली नी मी माझी गाडी घातली तर समोरून एकाने ट्रक मध्ये घातला जे की मी सर्वांना वाट दिली होती. मी अर्धी वॉटर क्रॉसिंग पार केली होती, मधोमध पोहचल्यावर तो आला, दोन गाड्या मी येत आहे म्हणूनच थांबल्या होत्या, पण हा त्यांना डावलून पुढे आला नी मला बोलतो गाडी मागे घे आणि विनाकारण शिवीगाळ करू लागला. माझ्या गाडीत दोघांची प्रकृती बिघडली होती नी गाडी पाण्यात ऊभी, जी मागे घेणं मला कसं पण शक्यच नव्हत. कमीत कमी एक फूट पाणी असेल. मी त्याला विनंती करतोय की बाबा गोल दगड आहेत आणि माझी गाडी रिव्हर्स मध्ये मागे जावू शकत नाही. कदाचित त्याच गडबडीत माझ्या खिशा मध्ये असलेली कार ची चावी पडली आणि मला लक्ष नाही. दुसरी चावी समीर कडे होतीच. तो पर्यंत काही बाईक रायडर ज्यांनी बघितलं होत की विनाकारण ट्रक वाला त्रास देतोय त्यांनी पण त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो ऐकायला तयार नव्हता. मग पाणी वाहताना एक बराच मोठा ओहोळ तयार झालेला होता. वळण असल्याने तो परत रस्त्याला मिळत होता. पण दगड जास्त होते नी पाणी पण जोरात. गणेश आधीच खाली उतरला होता. ट्रक ड्रायव्हर सोबत बोलत होता. मग त्याला आवाज दिला बघ गाडी जाईल का या शॉर्टकट ने, तो बोलला जाईल पण तू बघ. तुला लगेच अंदाज येईल. मी बोललो चल ट्राय करू कारण भांडणं करायची ती वेळ नव्हती. मग काय गाडी घातली तर एक चाक जास्त वर होवून तरंगल होत मग बुरहान, समीर आणि गणेश यांनी थोडा धक्का द्यायला सांगितलं जेणे करून चाक जमिनी वर टेकल तर गाडी पुढे जाईल. थोडा धक्का दिला आणि गाडी एकदम मस्त शॉर्ट कट ने बाहेर निघाली. बाकी लोक पण शॉक झाले. ट्रक ड्रायव्हर चा चेहरा पाहण्यजोगा झाला होता. गाडी बाजूला घेतली यांना गाडीत बसवून लगेच आम्ही सरळ दारचा कडे निघालो. रस्ता थोडा खराब होता, काम चालू होत. पण नंतर मात्र एकदम मस्त होता. साधारण सहा पर्यंत आम्ही पोहचलो दारचा ला. एका ठिकाणी राहण्याची सोय केली मात्र तो पर्यंत दोघांना त्रास वाढत चालला होता नी आता आम्ही ना पुढे जावू शकत होतो ना मागे... जिस्पा नंतर आम्हाला कुठे मुक्कामाची सोय झाली नाही. त्यामूळे आम्हाला सरचू शिवाय दुसरा पर्याय नव्हता.
आम्ही जो होम स्टे घेतला होता तो रोड पासून दहा ते पंधरा मिटर अंतरावर असेल पण खूप दम लागत होता. हॉटेल मालक बोलतो की त्रास होईल त्यांना, पण पाणी सतत घेत रहा त्यामुळे त्रास कमी होईल. गाडी मधून सामान काढयला गेलो तेव्हा समजलं की खिशात तर चावी नाही. इतकं टेन्शन आलं की आता काय करायचं. सुरवातीलाच जर चावी हरवली मग पुढे काय ? चावी नक्कीच त्या वॉटर क्रॉसिंग मध्ये पडली असेल हेच वाटलं. थोडा वेळ शांतपने विचार केला, मी खिश्या ची चैन खोलली नव्हती म्हणजे मी ती बंदच केली नसेल, म्हणजे खिशातून चावी पडली असेल तर ती गाडीतच, मग थोडी शोधली तर सीट खाली चावी मिळाली तेव्हा कुठे जीवात जीव आला. हिमाचल मधील ट्रक, बस चालक खरच त्रास देतात. आम्हाला कुठे पण भांडणं करायची नव्हती आणि मी सरळ माघार घेत होतो नी बाकी तिघांना पण याचं अजून पण आश्चर्य वाटत.... असो.
तर इकडे या दोघांची हालत खुप खराब होत चालली होती. गणेश ला पण थोड डोकं जड वाटत होत. थंडी वाढत चालली होती, मी जावून जेवण विचारलं तर राजमा, भात, आणि मॅगी मिळेल असे सांगितलं. ईकडे हे तिघे पण आम्ही काही खाणार नाही म्हणून बोलत होते. मी जेवणाची ऑर्डर दिली खरी पण एक घास पण खाल्ला नाही. फक्त चहा घेतला नी बाहेर आलो. अजून तर केवळ साडे सात झाले होते आणि सकाळ पर्यंत आम्ही कसं राहणार, त्रास वाढला तर काय आणि सर्वात महत्वाच की थंडी वाढत होती मग सकाळी गाडी चालु होईल का ? यामुळे काळजी वाढत चालली होती. समीर आणि बुरहान ला सतत पाणी देत होतो. पाणी पिले की लगेच उलटी होत होती. पण पाणी सतत पित राहिले तर शरीरात ऑक्सीजन ची कमतरता होत नाही. एक एक मिनिट तासा पेक्षा मोठा वाटत होता. मला थोडा वेळ झोप लागली नी जाग आली तर अकरा वाजले होते आणि त्या नंतर झोप पण येत नव्हती. बुरहान तर फक्त बसून होता आणि समीर झोपून. गणेश त्यांना हवं तेव्हा पाणी देत होता नी उलटी करावी वाटली तर बाहेर घेवुन जात होता. एक मिनिट अक्षरश: तासा प्रमाणे वाटत होता...
आमच्या चौघांच्या आयुष्यातील कदाचीत सर्वात खडतर रात्र सुरू झाली होती आणि तिचे परिणाम.... ते तर उद्या समजणार होते.
#खरंतर मी आधी पासून केलाँग ला मुक्काम करायचा असं ठरवलं होत पण बाकी सर्वांची इच्छा आणि प्रवासात सर्व मिळून निर्णय घेतला जाणार होता आणि वेळ पण होता हातात त्यामूळे ती चूक झाली.
# माझी गाडी सेल्फ स्टार्ट आहे नी दारचा मध्ये पोहचलो तेव्हा डिकी खोलताना समजलं की खिशात चावी नाही.
NO ROAD RAGE
NO ROAD RAGE
This policy really worth and works
वाद टाळून पुढे जाणे