मंदसौर ते जयपूर दिनांक १३-०८-२०२२ अंतर ४३० किमी
काल रात्री लवकर झोपलो होतो आणि ठरवल्या प्रमाणे पहाटे लवकर उठून तयारी चालू केली होती. साधारण आम्ही सहा पर्यंत आंघोळ करून तयार झालो होतो. मंदसौर येथे माझ्या महिती प्रमाणे भारतातील एकमेव अष्टमुखी पशुपति नाथ मंदिर आहे. मात्र त्या साठी गावात प्रवेश करावा लागतो. मंदीर खरंच खूप छान आहे आणि भाविकांसाठी दर्शन वगैरे सोय पण छान होती. मंदिर तस बरच मोठं आणि स्वच्छ होत. श्रावण शनिवार असल्याने थोडी गर्दी होती पण दर्शन मात्र निवांत झालं. थोडा वेळ फोटो ग्राफी करून आम्ही पुढे निघालो. दर्शन आणि फोटो मध्ये वेळ गेला होता आणि सकाळी काही नाष्टा पण केला नाही कारण दर्शन करू आणि जवळपास नाश्ता करू पण आजबाजूला काही छान हॉटेल दिसत नव्हत मग आम्ही सरळ हायवे ला लागलो. तोपर्यंत आम्ही सोबत आणलेला खाऊ बाहेर काढला. थोड्या वेळात एक छान हॉटेल पाहून गाडी उभी केली नी मस्त आलू पराठा, पूरी भाजी आणि चहा ची ऑर्डर दिली. तस पण या रोड वर खूप हॉटेल नाहीत. नाष्टा येईपर्यंत घरी सर्वांनी फोन करून सांगितलं, तो पर्यंत मला मामांनी फोन केला, ज्यांनी मला वडोदरा मार्गे न जाता हा मार्ग सांगितला होता. त्यांनी सांगितलं की, अस पण आज तुम्ही जयपूर च्या पुढे मुक्काम करणार आहात मग चित्तोडगड ला का जात नाही, गडावर वर पर्यंत गाडी जाते. मी यांना विचारलं तर बोलले तू ठरव कारण गाडी तुलाच चालवायची आहे. बोललो चला जावू मग गाडी आम्ही सरळ चित्तोडगडावर घेतली. जवळ जवळ तीन तास मनसोक्त फिरून आणि फोटोग्राफि करत बसलो. संपूर्ण गड सुंदर आहेच पण तेथील मंदीर, महाल पाहून मन प्रसन्न झालं होतं. कदाचीत नसतो आलो तर नंतर वाईट वाटलं असतं नक्की. गड पाहण्यात आणि शहरातून बाहेर येईपर्यंत बराच वेळ निघून गेला होता पण नंतर NH 48 रस्ता लागतो हे माहीत होत आणि त्या मुळे मी निश्चिंत होतो. हायवे ला आल्यावर एक छान हॉटेल पाहून जेवायला थांबलो मस्त राजस्थानी थाळी मागवली. मनसोक्त जेवून आता मुक्काम येईपर्यंत सलग चालायचं ठरवलं पण......
आम्ही जो रस्ता पकडला होता तो जयपूर शहरात जातो आणि मग बायपास होतो त्यामूळे थोडी ट्रॅफिक होतीच आणि तेवढ्या ट्रॅफिक मध्ये पण जयपूर पोलिसांनी आम्हाला गाडी साईड ला घे म्हणून सांगितलं मी साईड ला घेतली तर आधी एक टेम्पो ट्रवलर ती पण पुणे महाराष्ट्राची ऊभी होती. आमच्या कडून आरसी आणि लायसेन्स मागून घेतलं आणि ६०००/- रुपये द्या नाहीतर मग हे कागदपत्र जमा करून घेतो. कोर्टात येवून घेवुन जा. आम्ही विचारलं तर म्हणे की, सिग्नल तोडला ? ईथे कुठे सिग्नल, तर म्हणे सीट बेल्ट नाही, वेग जास्त होता. मी बोललो बाबा, फोटो दाखव आम्ही दंड भरतो तर लगेच ३०००/- दो निकल जावो. आम्ही नाही बोलत होतो तर सरळ सरळ दम देत बोलायला लागला की पैसे दे नाहीतर निघा. काय करावं हेच कळत नव्हत एक तर लडाख मध्ये स्वतःच वाहन असावं असा नियम आहे आणि आरसी हा बाबा देत नाही. तो पर्यंत इकडे बुरहान आणि समीर च डोक आऊट झाल होत. आज जयपूर मधे मुक्काम करू पण तक्रार करू हे ते... बोललो बाबा, आज शनिवार संध्याकाळ झाली आहे आणि पुढे तीन दिवस सलग सुट्टी आहे आता जर गेलो तर अडकून जावू मग या दोघांना दूर ठेवून मी आणि गणेश गेलो सरळ विचारलं की, कीती पैसे पाहिजे पण लास्ट सांग कारण आम्ही इतके तर देणार नाही म्हणजे नाही मग कसाबसा १५००/- वर तयार झाला. तशी आम्ही ऑनलाईन पद्धतीने तक्रार दाखल केली आहेच जयपूर पोलिस मध्ये कारण फक्त बाहेरील गाडी अडवून पैसे उकळत होते. शेवटी तिथे इतका मूड ऑफ झाला की, जयपूर शहरात येताना पण थांबण्याची इच्छा झाली नाही... असो.
इथे झालेला उशीर नी पुढे परत थोडी ट्रॅफिक या मध्ये वेळ जात होता. जयपूर पासुन थोड पुढे आलो तर जोरात पाऊस चालू होता नी एकदम अंधारून आलं होतं. अंधार पडायला वेळ होता पण मग उशीर झाला तर हॉटेल मिळेल की नाही ही शंका होती म्हणून लगेच एका ठिकाणी विचारलं तर म्हणे की, ३०००/- तर कोणी ४५००/- पर्यंत... मग विचार केला जावू थोड पुढे साधारण दहा बारा किमी चाललो तर एका रांगेत चार सहा हॉटेल दिसले जावून विचारलं तर १०००/- AC रूम होती आणि हॉटेल बाहेर गर्दी पाहून अंदाज आला होता की, जेवण नक्की छान मिळेल. बुरहाननेच पूर्ण ट्रिप मध्ये हॉटेल मध्ये जावून ठरवून यायचा आणि ते पण नेहमी आमच्या अंदाज पेक्षा कमी किमतीत. आम्ही हॉटेल मध्ये जावून पहिले आंघोळ केली नी जेवायला खाली गेलो. जेवण खुप छान मिळालं आणि सर्वांचं आवडीच मसाला पान पण... जेवण जरा जास्त झालं चुकून मग शतपावली करून झोपायला गेलो पण झोपण्यापूर्वी मात्र उद्या कसं आणि कुठ पर्यंत जायचं हे ठरवून झोपी गेलो...
* राजस्थान व्यतिरिक्त पूर्ण प्रवासात आम्हाला कुठे ही पोलिसांनी त्रास दिला नाही हो गाडी चार पाच ठिकाणी उभी करून विचारलं, कुठून आले कुठे चालले वगैरे.
छान चालू आहे प्रवास वर्णन.
छान चालू आहे प्रवास वर्णन.
धन्यवाद
धन्यवाद