एका ग्रामीण पाटीचा अंत

Submitted by दत्तात्रय साळुंके on 12 September, 2022 - 06:31

टुकारवाडीचे सरपंच रामरावांना गावातल्या लोकांनी प्रगतीशील सरपंच अशी उपाधी बहाल केली होती. या कृतीत कुणी म्हणेल गावक-यांना त्यांचा आधुनिक दृष्टिकोन आवडला असेल पण तसं काही नाही. यासाठी त्यांची बायको लक्ष्मी हीचा मोठा वरदहस्त त्यांच्यावर होता.तिला रामराव लाडानं प्रगती म्हणतं. सरपंच शेतीवाडी अजिबात बघत नव्हते. शेतीकारण हे लक्ष्मीचं खातं. तिला शासनाने प्रगतीशील शेतकरी ही उपाधी देऊन गौरविले होते. म्हणून लोक रामरावला प्रगतीशील सरपंच म्हणत. म्हणजे मुख्यमंत्र्याच्या बायकोला मुख्यमंत्रीनबाई उपाधी आपोआप लागते तसं काहीसं.
त्यांचा कारभार पंचायतीतून कमी आणि घरातून जास्त चालायचा. कुठलीतरी रोगराई आली आणि रोगाचा फैलाव होऊ नये म्हणून माणसं घरुन कार्यालयीन कामकाज करु लागली तसंच काहीसं. पण झालं असं की रोगराई गेली आणि माणसं कार्यालयात जायला लागली तरी रामरावाच वर्क फ्रॉम होम चालू .
रामरावला ते एवढं अंगवळणी पडलं की कुणी सहज रामरावाला विचारावं…
काय चाललंय रामराम ?
"हेच की ते आपलं काय म्हणत्यात तेला तिच्या बाईलिला …
असं म्हणून रामराव टोपीखाली हात घालून डोकं खाजवत आणि एकदम काही तरी आठवल्यासारखं करुन म्हणत
हा आठावलं ते वरक फराम होम्म काय ते…घरुण काम आन हाय काय नाय काय… जे दुनियेत तेच आपल्या घरी."

यावर विचारणारा विरोधी पार्टीवाला असेल तर मनात म्हणायचा
निवडणूकीत लोकं तुला कायमचा घरी बसवतील मग कर किती घरुण काम करतो ते.

ब-याचदा हा प्रश्न सहज कोणी कोणाला विचारल्यावर येणारं सामान्य उत्तर अपेक्षित असायचं. जसं शेतात काय काम चाललंय वगैरे. पण रामराव तसं विचारलं की म्हणतं

"हे काय बाबा गरीबाची चेष्टा करताय व्हयं . माझा बा जातानी सांगून गेला काय बी झालं तरी चालंल पण घराण्याचं नाव काढ. आता बापाचा सबूद खाली कसा पडून देयाचा. घेतली सरपंचकीची पुढारी कापडं. झालो बारा गावचा मुंज्या. कसा टाइम गावणार. तवा शेती मारली परगतीच्या गळ्यात आन झालो मोकळा. तवा रानात काय व्हतय ते आपल्याला काय बी माहीत नाय. "

गावात आलेल्या रोगराईचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी गावात लसिकरण होणार होतं. रामरावांना वर्क फ्रॉम होम जाणार याचं दुःख होतं. तरीपण गावांसाठी हा त्याग करायलाच हवा असं त्यांना वाटलं. त्यासाठी दवंडी पिटायची होती. दवंडी द्यायला शिदू होता. त्याला सरपंच रामराव म्हणाले
“ उद्या गावात १० वाजता लसीकरणाचा कार्यक्रम चालू व्हईल तरी समद्यानी चावडी म्होरं हजर राहावं अशी दवंडी दे.”
“ व्हय जी देतो की “
आणि दुस-या दिवशी नवालाच चावडीवर हा गलका झाला. लोकांनी ऐकल वशिकरण हाय.

सगळा गाव चावडीवर लोटला. खचाखच गर्दी जत्रंतल्या सारखी. पोरंसोरं, बायाबाप्ये सारे झाडून हजर. कुणी स्वप्न रंगवत होता सावकाराच्या दुरपदीला कसं वश करायचं ते शिकायला मिळलं तर लय बरं व्हईल. कुणाला वाटलं सरपंचपद वश झाल तर. कुणाला वाटलं माणसं वश करता आली तर. जसं तलाठी पैकं न घेता सातबारा देईन. वाणसामान बीनपैशात मिळलं. सुतार, लोहार अवजारं फुकट करतील. कुंभार फुकट मडकं देईल. न्हावी फुकट केस कापील. पण या बलूतेदारांनाही असचं वाटलं की गावकरी वश झालं तर केलेल्या कामासाठी गावकरी डबल मोबदला देतील. शाळकरी पोराटोरांना वाटलं दिवसभर उंडारलं तरी मास्तरं पास करलं. सुनेला सासूला वश करायचं होतं. कुणी विचार करत होता एखादं जीन वश केलं तर मजाच मजा. कायपण क्षणात हजर. काम करायला नगं. आरामच आराम. पैकाच पैका. कुठलंही सुख कधीही उपभोगा.
तात्पर्य काय तर अशा हव्यासापोटी प्रत्येकाला वशिकरण शिकायचं होतं.

शिदूनं लसीकरण कार्यक्रमा ऐवजी वशीकरण कार्यक्रम अशी दवंडी दिली होती. कारण शिदूला कमी ऐकू यायचे. त्यामुळे सरपंच दवंडी देण्यापूर्वी काय दवंडी देणार हे दरवेळी त्याच्याकडून वदवून घेत पण या वेळी लगोलग तालुक्याला जायचे होते त्यामुळे त्यांना शिदू काय दवंडी पिटणार याची खातरजमा करता आली नाही.

काही लोकांनी दवंडी ऐकली त्यांना कांहीतरी गडबड वाटली कारण वशीकरण ही खाजगीत शिकण्याची गोष्ट आणि त्यात त्यावर कायद्यानं बंदी पण ब-याच लोकांना यावर कायद्यानं बंदी आहे हे माहीत नव्हतं. त्यामुळे त्यांना वाटलं प्रगतीशील सरपंचाला वाटलं आसल काही तरी करावं गावांसाठी. ज्यांना समजलं कायद्याची त्यांवर बंदी आहे त्यांनी त्याकडं कानाडोळा केला कारण ते सरपंचाच्या विरोधात होते. त्यांना मनातल्या मनात उकळ्या फुटत होत्या. सरपंच आयतचं कायद्याच्या कचाट्यात गावल आता. काही मंडळी सरपंचाच्या पार्टीची पण ते सरपंचाला कळवणार तोवर फार रात्र झाली होती. उद्या सकाळी सांगू म्हणून गप्प राहिले. सरपंच घरी नाहीत हे त्यांना माहीत नव्हतं.
तरीपण सरपंचाचा चेला गबरु पैलवानाला काय चैन पडनां. त्यानं रामरावाला मोबाईल वर फोन करुन हकिकत सांगितली.
गब्रू म्हणाला

“ शिद्याला सकाळी पुन्यांदा दवंडी पिटायला सांगतो.”
सरपंच म्हणालं
“ नको त्याला उद्या सकाळी लय कामं हायती आणि लस देणार म्हणल्याव काही लोकं गाव सोडतील. त्यापरीस झालं हे बेस झालं. उद्या वशीकरण पाहायला आन शिकायला ल‌ई गर्दी व्ह‌ईल. आपण त्याचा फायदा घ्यायचा. येतील तेवढ्यांना धरुन सुया टोचायच्या. तू तालमीतली पोरं आण पळणा-यांना आडवायला. उरलेल्यांना घरुन उचलून आणू नाही आले तर”.

नवाच्या ठोक्याला गावात धुळीनं माखलेली तालुक्याच्या प्राथमिक आरोग्य केंद्राची जीप येऊन ठेपली. तिच्यातून साध्या वेशात आरोग्य अधिकारी, परिचारिका, शिपाई खाली उतरले. पंचातीच्या कार्यालयात त्यांना बसवलं. लसीचे खोके कार्यालयात ठेवले.सरपंचानी शिदूला पाहुण्यांसाठी चहा आणायला सांगितला. त्यांनं चहा आणला. चहा बिस्कीट पाहुण्यांना दिलं . शिदूनं चावडीत दोन तीन टेबलं, खुर्च्या ठेवल्या. टेबलावर सफेद कापड टाकलं. त्यावर पाण्याचा तांब्या फुलपात्र ठेवलं. दोन-चार झेंडूच्या फुलांच हार बाजूला ठेवलं.

कुठल्याही कार्यक्रमा आधी घडणारं हे सगळं गांवकरी नेहमी पाहयचे. त्यांना त्यात काही विशेष वाटलं नाही.
कार्यक्रम जवळून बघायला मिळायला हवा त्यासाठी प्रत्येकाला पहिला नंबर हवा होता. लोकांची ढकलाढकल चालली होती. तेवढ्यात सरपंच बाहेर आलं आणि म्हणालं

“आरं का ढकलाया लागलासा. काय बाय नाचतीया व्हय. ते पाव्हणं काय म्हणत्याल. जरा दमानं घ्या. तुम्हाला हात जोडतो (आन नाय ऐकल त्याला तोडतो हे मनात म्हणाले). लायनीत थांबा.
सरपंच उखाडल्याचं बघून गर्दीतले काही म्हणाले

“बरोबर हाय लायनीत थांबा.”
त्या बरोबर सगळ्यांनी लाईन केली.
सरपंचांनी पाहुण्यांना बाहेर आणलं. त्यांच्या अंगावर अॅप्रन पाहून गर्दीतलं कोण तरी पुटपुटलं….
आयला वशीकरण वालं पांढरी कापडं घालाया कवापसून लागलयं.”
पण नर्सच्या कपड्यांवरुन लोकांना कायतरी वेगळं असावं असा संशय आला. नर्स बाईने इंजेक्शनची सुई बाहेर काढली . टेबलावर लस बर्फात ठेवलेले भांडे ठेवले. तेव्हा काही चाणाक्ष मंडळींच्या म्हणाली….

“आयला कायतरी यगळा परकार हाय आपण काढता पाय घेतलेला बरा.”
गर्दीत खुसुरफुसुर चालली….
“वशीकरण शिकायचं म्हंजी टेबलावं गंडंदोरं, सुया, टाचण्या, लिंबं, काळ्या बाहुल्या, कुकू,हळद, गुलाल, उदबत्ती आसलं कायतरी पायजे” ….
शिकविणारा मांत्रिक रापलेल्या तोंडाचा,केसं वाढलेला, काळी कापडं घातलेला असायला हवा. गळ्यात मोठ्या मोठ्या मण्यांच्या माळा हव्यात. मोरपिसाचा कुचा हवा. सुका भोपळा कापून बनावलेलं टोपलं आलं. त्यात एखादं हाडूक आसावं. काखंत झोळी पायजे. पण आसं काय बी नाय. आयला सरपंचच भंजाळलयं. काय करल पत्या लागायचा नाय.”

पण सरपंचाचा लसीकरणाचा जुना अनुभव दांडगा. त्यांनी गब्रू पैलवानाला आधीच तालमीतली पोरं मागच्या अंगाला उभी ठेवायला सांगितलेली. त्यामुळे कोणी पळून गेला नाही.
तरी देखील कोणाला लघवीला आली, कोणाचं पोट गडगडायला लागलं पण कुणालाच हालता आलं नाही.
जे घरी होते त्यांना तालमीतल्या पोरांनी उचलून आणलं.
अशा प्रकारे लसीकरणाला उदंड प्रतिसाद मिळाला.
दंवडी देतादेता शिदूनं केलेल्या गोंधळाची चर्चा गावभर रंगली. लसीकरणाचे वशीकरण झाले आणि लस घ्यायला अल्प प्रतिसाद मिळायचा तो उदंड झाला. शिदूची चूक गावाच्या आणि सरपंचाच्या पथ्थ्यावर पडली. गावात १०० टक्के लसीकरण झालं. गावाला शासनाकडून ईनाम मिळालं. सरपंचाचा राजकारणात खुटा बळकट झाला. त्यांनी शिदूला वैयक्तिक १०० रुपये बक्षीस दिलं.
पण दरवेळी दंवडी देताना झालेली चूक फायदेशीर ठरेल असं नव्हतं. म्हणून दवंडी ऐवजी फळा लिहावा याविषयी पंचायत सदस्यांचं एकमत झालं. गावात थोडी म्हातारीकोतारी लोकं सोडली तर बहुतेक लिहीता वाचता येणारे होते. ते म्हता-या अर्कांनां गावातल्या कार्यक्रमाविषयी सांगतीलच असे सार्वमत झाले.
शेतात जीन्स घालणारे शेतकरी राबत होते. बैलगाड्यांची जागा जीप, कार, मोटारसायकलनं‌ घेतली होती. नांगरणी पेरणी ट्रॅक्टरनं होत होती. सिंचनाला पंप आले‌ होते. थोडक्यात गावं ब-यापैकी सुधारलं होतं.
मग जुनी दवंडी देण्याची पध्दत सोडायला हवी असं लोकमत झालं.

सरपंचानं गावच्या शाळेतला एक फळा आणला. खडूचे दोन-चार तुकडे आणले. फळा ग्रामपंचायतीच्या कार्यालयाबाहेर वाचता येईल अशा ठिकाणी लावला. त्याचं रितसर उद्घाटन झालं. सरपंचांनी फीत कापली. शिदूनं नारळ फोडला. खोबरं सगळ्या गावक-यांत‌ आणि पंचायत सदस्यात वाटलं. मंडळींचा चहापाणाचा कार्यक्रम झाला.

शिदू शिपाई ४ थी नापास होता. त्याला गावात पहिली पाटी खडूने फळ्यावर लिहायला लागली. ती त्याने अशी लिहिली….

गरप मंचा यत पवजे : टुकारह वाआडी, ताळू आका : रमगड, जीहिला बार माती
फळविनेस आनंद होत आहे फी
यनदा भय रव नाथाचा उसव तारीफ १५-५-२०२१ रोजी
यवजळा हाय तरी घरटी पनास रुमय वर गन देणे
आ पला सर पनच
रंग राव

वाचकांच्या लक्षात आले असेल की शिदूचं लेखन ल‌ई सुद होतं. एक तर त्याचं हस्ताक्षर लवकर लागेल तर शपथ…भरीस भर त्याला क,फ,म, प, ल, ळ या व अशा अक्षरांची पडलेली निरक्षर कोडी. त्यामुळे तो म च्या ठिकाणी प लिहायचा, प च्या ठिकाणी म लिहियाचा क्वचित प च्या ठिकाणी प अणि म च्या ठिकाणी म. तिच गत ल,ळ,क,फ ची होती
शिदू जुना गरीब शिपाई त्यामुळं नोकरी टिकवून होता.
पण सरपंचाला कळून चुकलं की शिदू ऐवजी हे काम दुसरं कुणाला तरी द्यावं.

तेवढ्यात शिला गावात ग्रामसेवक म्हणून आली आणि सरपंच चावडीव्यतिरीक्त ग्रामसेवक बाईच्या घरी जास्त येरझारा मारु लागलं.
शिला शिकली सववरलेली . वर्ण गोरा, नाजूक उभार बांधा. तरतरीत नाक. बोलके डोळे, भरदार उरोज. पाहताच डोळ्यात भरावं असं रुपडं. त्यात शिकलेली त्यामुळ रामराव तिला भेटायला कधीही एका पायावर तयार.

त्यात त्यांना फळ्याचं आयतं निमित्त मिळालं कधीही तिच्या घरी जायला.
एक दिवशी सरपंचानं शिलाला शिदूच्या दवंडीची आणि फळा लिहिण्याची गोष्ट सांगितली आणि तिला गळ घातली

“ पाटी तुमीच लिव्हा बाय”
शिलाने शिदूने लिहिलेली अगम्य पाटी पुसून ‌सुवाच्य अक्षरात त्याच मजकुराची नवी पाटी लिहिली.
शिलालाही ग्रामसेवक म्हणून गावात नवेनवे प्रयोग जमतील तसे करायचे होते. ती या कामासाठी तयार झाली.
रामराव मनातल्या मनात म्हणालं
ह्या पाटीचा एवढा फायदा व्ह‌ईल असं वाटलं नव्हतं. आता रोज शिलाच्या मांडीला मांडी लावून पाटीचा मजकूर ठरवता येईल.
शाळेत एक कार्यक्रम होता त्याचा फळ्यावर लिहायचा मजकूर असा होता.

आज रात्री ८ वाजता शाळेत मुलांचा नाचगाण्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तरी गावक-यांनी त्याचा लाभ घ्यावा.
शिलाने मजकूर बरोबर लिहिला होता.

पण तो फळ्यावर पुढीलप्रमाणे झाला होता
आज रात्री १२ वाजता शाळेत भुतांचा नाचगाण्यांचा असांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे तरी गावक-यांनी त्याचा लाभ घ्यावा.

शिलाच्या आणि सरपंचाच्या ध्यानात आलं हा कोणाचा तरी वात्रटपणा आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा काढायला हवा. म्हणून फळा उंच ठिकाणी लावला. तर‌ तक्रार आली आम्हाला वाचायला दिसत नाही. त्यावर शिला म्हणाली पाटीऐवजी तालुक्याला जाऊन संगणकावर बॅनर बनवून घेऊ.
सरपंचानी लगेच याला मंजुरी दिली.
काही दिवस हे बरं वाटलं पण नंतर कटकट वाटली. खर्च वाढला. शिपायाचा दिवस जायचा एका कामासाठी. शिवाय प्रूफ रिडींग फोनवर ग्रामसेवकाला करावे लागे.
यावर पुन्हा उपाय शोधायला शिलाला सरपंचांनी सांगितल.
या खेपेला गावांसाठी बहुपर्यायी, बहुआयामी पाटी कायमस्वरूपी रंगात बनवून घ्यायची, मग फक्त त्या त्या पर्यावर टीक मारायची असे सगळ्यांनी ठरवलं.
सुरवातीला पाटी फक्त ग्रामपंचायतीच्या सरकारी कामासाठी करायचे ठरले पण नंतर खाजगी कार्यक्रम जसे जन्म, बारसं, मृत्यु,दहावं,बारावं, भजन, किर्तन, ऊरुस, तमाशा, जागरण, गोंधळ, सत्यनारायण, लग्न आदी सुचना पाटीवर असाव्यात असं ठरलं.
पाटील म्हणलं चोरी, मारामारी हे पण आलं पाहिजे.

यावर गावातले ८० ला टेकलेले म्हादूतात्या मान सावरत म्हणले
" चोरी, मारामारी काय भूषण हाय व्हय? गावची बदनामी हाय त्याच्यात.”

त्यांचं म्हणणं सगळ्यांना पटलं. चोरी, मारामारी विषयी मजकूर पाटीवर नको असा ठराव झाला. पण कोणतरी म्हणाले यांच्याव्यतिरिक्त चांगलं काम निघलं तर…
जसं की श्रमदान, इरजीक त्यासाठी कोणीतरी सुचवलं ह्या साठी “इतर” सदर ठेऊ. हयावर गणप्या ग्याणगेले म्हणाला …

“ह्यो कंचा आणि सदरा?”
“आरं बाबा सदरा न्हाय सदर…सदर”
“ बाबू ढमाल्या म्हणला सदरंवर तर कारकून बसत्यात.”
आता बबू मास्तरला कनात निघंना त्याला त्याच्या वासरात लंगडी असल्याचा सार्थ अभिमान होता. तो म्हणाला…

“ ये गैबाण्यांनो कळत नाय तर कशापायी आकाल पाजाळताय. आरं हे सदर म्हंजी पाटीवरली पेशल जागा आसती. आमानधपक्या काय बी लिवाया.”

त्याला बाकीच्यांनी नंदीबैलासारखी मान डोलवूनअनुमोदन दिले.
याचा परिणाम म्हणजे एक भिंत भरेल एवढी मोठी पाटी झाली.
पाटी काहीशी अशी होती…
IMG_20220912_154331.jpg

अशा त-हेवाइकपणान एका पाटीचा जन्म झाला. त्यासाठी त-हेवाइक टुकारवाडीला बरीच बौधीक कसरत करावी लागली. टुकार पाट्या टाकण्यात टुकारवाडीचा हात कोण धरणार ? तसं केलंच धारीष्ट एखाद्यान तर तीच पाटी त्याच्या डोक्यात पडायची.

पाटीचा गावाला चांगला उपयोग होऊ लागला. कोणी खाडाखोड करु नये म्हणून पाटी सरजू वाण्याच्या दुकानापुढं लावली. रात्री दुकान बंद झाल्यावर वाण्याच्या ओसरीवर जुगाराचा डाव पडायचा. त्यामुळे उत्तररात्री पर्यंत जाग असायची.
एक दिवशी सकाळी सकाळी सर्जू वाण्याचं दुकान उघडायच्या आधी चिमणराव पाटलाचं निधन झाल्याची बातमी पाटीवर लोकांना वाचायला मिळाली. लोकांची कुजबुज चालू झाली.

“ कशानं बरं एकाएकीं मेलं.”
“ आरं बरं झालं सुटीवाचून खोकला गेला.”
“ लय पीडलं लोकांना.”
“ रघ्याच्या बाप फास घेऊन मेला तवा रघ्याला म्हणला तूच मारला इस्टेटीसाठी. तूला खडी फोडायला लावतो. उकाळलं बक्कळ पैकं.”
“ गावात ह्याची चुघली कर त्याच चुघली कर. दे भांडणं लावून. होऊ दे मारामारी मग पोलीसाची भिती दावून उकळ पैकं. “
“आरं मढ्याच्या टाळूवरचं लोणी खायचं बेणं.”
“ मेलं आपल्या करणीनं”
“ आरं आसं आसलं तरी बी पाटील लय चांगलं व्हतं. आडीनडीला चार पैकं द्यायचं.”
“ आरं सुरवातीला आसंच करायचं मग पैकं देऊन वावार नावावर करुन दे म्हणायचं.”
“ आरं पणं काय कमी वाईट नाद व्हतं का ?”
“ दारु, बाई, बाटली, तमाशा, जुगार “
“ आरं खानदानी माणसं असीच असत्यात. नाद करणं बाईंचं काम न्हाय.”
“ चंद्राबयानी गावात दारुचा अड्डा चालू केला हाप्ता देऊन पाटलाला. “
“ चंद्री गावाला ठर्रा पाजती पण पाटलाला इंग्लिश बाटली देती.”
“ सर्जूवाणी गुटखा इकतो त्याचा बी हाप्ता असतोय.”
“आरं रासनाचा काळाबाजार करतो त्याचा बी हप्ता आसतो”

एवढ्यात सर्जूनं दुकान उघडलं . बघतो तर पाटी भोवती गारुड्याभोवती पडावा आसा गराडा पडला होता. आन समदी मंतरल्यावाणी पाटीकडं बघत होती. अडाणी काय लिवलयं, काय लिवलंय अशी खुसुडफुसुड करत होती.
सर्जू काय झालं बघायला पुढं झाला. बघितलं तरं पाटीवर दु:खद निधनासाठी केलेल्या रकाण्यात चिमणराव पाटलाचं नाव.
तसा त्यानं सुटकंचा सुस्कारा टाकला.

“ सुटलो एकदाचा हाप्तेखोराच्या तावडीतंनं. क्वानतरी भला माणूस पाटील व्ह‌व दे रे खंडूबा .”
“ जेजुरीत भंडारखोबरं उधळील.”

असं प्रत्येकजण आपापल्या परीने व्यक्त होत होतं.
एवढ्यात चिमणराव पाटलाच्या घरी सगळ्यात आधी ही बातमी निरप्यान पोचवली. ( पाटलीणबाय मनात म्हणाली
मुडदा गेला त्याचा. काल नको जाऊ म्हणलं तालुक्याला तरी त्या रांडकडं गेला. मला खोटं सांगितलं अर्जंट काम हाय म्हणून. बरा मेला.)
पण तिनं लोकांसमोर रडून रडून हैदोस मांडला.
“ आसं कसं वं झालं धनी. आता म्या कुणाकडं बघू.” वगैरे वगैरे…
तिला मनातल्या मनात वाटलं नक्की दारु ढोसली आसल आन कुठल्यातरी टरककखाली आला आसलं .
आता ब-यापैकी गावकरी चिमणराव पाटलाच्या घरा समोर जमा झालं.
इतक्यात बाज्यानी बातमी आणली.
“ आरं वस्याला वढयात चिमणराव पाटलाचं भूत दिसलं. तो चिनपाट तिथच सोडून पळत सुटला. धोतराचा सोगा बी बांधला नाय.”

त्याच असं झालं वस्याच घर सर्जूच्या दुकानाला लागून. त्याला कळ आली तेव्हा तो पाटी वाचूनच पुढं गेला. वढ्यात बसतो कुठं तर वाटंन चिमणराव पाटील येताना दिसलं. त्याचा डोळ्यावर विश्वास बसेना. तो घाबरला आन भूत भूत करत ओरडत घराकडं पळत सुटला.

एवढं सगळं होईतो चिमणराव पाटील येताना घराजवळ जमलेल्या गर्दीला दिसलं तसी समद्यांची बोबडी वळली. गपचीप पांगापांग झाली.

पाटीलीन बाईसह घरातली समदी तोंडाचा आ वासून पाटलाकडं बघू लागली. एवढ्यात पाटील कडाडलं

“ आ वासून काय बघताय, काय भूतबित बघितलं व्हय”.
भूत शब्द ऐकला अन सगळे थरथरु लागले…
पाटलीण कशीबशी बोलली
"आsssवं न्हाय जी, न्हाय जी.."
“शाणे मंग काय बघितलं आन समदं गाव कशापायी गोळा झालतं आपल्या घरी”
“ तुमाला शेवटचं भेटाय”
“ शेवटचं, म्या काय मेलो का काय”
पाटलीलीनं पाटलाचे पाय निरखले ते सरळ होते. तिला कोणी तरी सांगितलं होतं भुताचे पाय उलटे असतात. आता तिच्या जीवात जीव आला.
“खरचं तुमी जितं हा”
“तुझ्या आईला…तू बायकू हाईस का हाडळ…पार मारायलाच निघाली मला”
“आवं तसं न्हाय कोणी तरी खबर आणली पाटील गेलं”
“क्वाण भडवीचा माझ्या मरणावं टपलाय बघतोच. पण तू आदी च्या पाणी बघ”

पाटलानं हातापायावर पाणी घेतलं. तोवर पाटलीनबाईनं च्या केला. पाटलानं च्या बरुबर तालुक्यावनं आणलेली दोणचार बटरं खाल्ली. कोपभर च्या ढोसला. आन डोकं खाजवू लागला कसं घडलं आसल समदं. पाटलाचं डोकं भुगांट पळत होतं. तो पुटपुटला

“निरप्या कुछ तो गडबड हाय ?”
निरप्या म्हंजी गावाचं एकमेव न्यूज चॅनेल.
त्याला गावाचं समदं माहीत अगदी कुणाची बाईल किती महिन्याची गरवार? कुणाचं उठणंबसणं कुटं? तलाठ्याची वरकमाई किती हे पण त्याला बरुबर माहीत. त्याची आणि भिवा न्हाव्याची खाजगी गुप्तहेर कंपनी. ह्या कामाचा मोबदला त्यांना कुणीच कधी दिला नाही. फकस्त चरबाट लोकं त्यांना भाव द्यायची. विचारायची
“काय गुप्तहेर निरपं काय खबर”
आसं म्हणाणायचा अवकाश निरप्या बातम्यांचा खजिना खाली करायचा.
पाटलानी निरप्याला बोलावून घेतलं.
किरकोळ शरीरयष्टीचा निरप्या थरथरत पाटलापुढं अंगणात उभा होता. पायाच्या अंगठ्याने उभ्या उभ्या माती उकरत होता. नजर खाली गेली होती. तोंडातून शब्द फुटत नव्हता.
पाटालानं त्याला पायतान फेकून हाणलं. त्यानं वाकून ते चुकवलं.तसा पाटील पुढं झाला आणि ताडताड दोन चार थोबाडात हाणल्या. तसा निरप्या पाटलाच्या पायावर डोकं ठेवून म्हणाला…
“ पाटील एक डाव माफ करा. मला सर्जूच्या दुकानापुढं पाटी दिसली तितं लिवलं होतं पाटील मेलं.”
आता पाटलाच्या डोक्यात पारवं घुमाया लागलं त्याला वाटू लागलं ही काम चंद्रीचं, सर्जू वाण्याचं की आणि कुणाचं. शेवटी त्याला वाटलं हे काम सरपंचाचं आसलं. पण उपाय काय? पाटी लावायची टूम तर त्याचीच. आत्ता आपणच सरपंचाला सांगायच…

“ एक दीस तुझं बी नाव मयताच्या रकाण्यात पाटीव झळकल.”

हा विचार डोक्यात आला आणि पाटील सरपंचाच्या घरी हजर झाला.
सरपंचाला त्याचं म्हणणं पटलं. उगा आपलं नाव जितेपणी पाटीवर झळकून काट्याचा नायटा व्हायला नको म्हणत त्यानं पंचायतीत ठराव पास केला की….

“आजपासून पाटी काढणेत येईल आणि काही सभा, कार्यक्रम याची वर्दी दवंडी देऊन करण्यात येईल.”

आता दवंडी देण्याचं काम शिदूचं दहावी पास पोर करतया. शिदू वारला त्याच्या जागी त्याच्या मुलाला अनुकंपा तत्वावर नोकरी देण्यात आली. तो पंचायतीचा शिपाई कम सरपंचाचा स्वीय साह्यक, कारकून अशी हरहुन्नरी कामं करतोय. त्यालाही पुढं सरपंच व्हायचय. सगळं शिकायला मिळेल हा त्याचा उद्देश आहे.
अशा रितीने एका पाटीनं एक पाटील जिंवतपणी मारला आणि स्वतः मेली.
© दत्तात्रय साळुंके

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचायला थोडा वेळ लागला. मोठी असल्याने. द. सा., तुमच्या नेहमीच्या शैलीपेक्षा थोडी वेगळी पण चांगली वाटली कथा.

ही कथा बिलकुल आवडली नाही.तुमची मुळ श्रेणी च चांगली होती.
काही तरी वेगळे लीहण्याच्या नादात कथेची पूर्ण वाट लावली आहे