कॉलेजचे ते मोरपिशी दिवस...!
संयोजकांनी मायबोलीच्या गणेशोत्सव २०२२ च्या स्पर्धा आणि उपक्रमांची घोषणा केली तेव्हा ' कॉलेजचे मोरपिशी
दिवस" हा लेखनाचा विषय पाहून बऱ्याच दिवसांपासून माझ्या काहीतरी लेखन करण्याच्या उत्साहाला लागलेल्या ओहोटीला अचानक आनंदाचं भरतं आलं होतं. मध्येच लेखनाच्या उत्साहाला भरती तर मध्येच ओहोटी ..शेवटी आज गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी लेख लिहायचाच् ह्या उमेदीने हा लेख पूर्ण केला.
तर कॉलेजच्या मोरपिशी दिवसांबद्दल काही लिहावं तर माझं कॉलेज जीवन तसं साधं , सरळ मार्गाने , सर्वसामान्यपणे व्यतित झालं. मित्र- मैत्रिणींची संगत आणि त्या संगतीतील रंगत अनुभवत असता , ते सोनपावलांनी आालेले दिवस आयुष्यातून चोरपावलांनी कधी लुप्त झाले ते कळलंच नाही.
मात्र मन एकदा का त्या मोरपिशी दिवसांच्या भूतकाळात शिरलं की, मनःपटलांवरून कॉलेज जीवनातल्या गतकालीन स्मृतींचा चित्रपट झरझर पुढे सरकू लागतो. त्या गतकालीन हळव्या, सोनेरी स्मृती कधी डोळ्यांत आसू , तर कधी वाढत्या वयाच्या गालांवर हासू आणतात.
आयुष्यभराची शिदोरी म्हणून गाठीला असलेल्या त्या स्मृतींना शब्दांत मांडणे खरंतर कुणालाही अशक्यच्..!.
घडीस या वळूनी मागे पाहता
नजरी तरळूनी जाती सोनेरी ते क्षण ....
निस्वार्थ मैत्रींच्या त्या क्षणांची
उरी राखिली मी साठवण....
शाळेचं शेवटचं वर्ष म्हणजे दहावीचं वर्ष ...!
दहावीनंतर पुढची पायरी म्हणजे कॉलेज जीवन..!
शालेय जीवन, त्या जीवनातली कोवळ्या वयातली निष्पाप मैत्री, आदरयुक्त धाक असणारे प्रेमळ शिक्षक ह्या सगळ्यांची साथ आता सुटणार म्हणून मनाला लागलेली हुरहुर तर, कॉलेज नामक सप्तरंगी जीवनात दाखल होण्याची एक अनामिक ओढ , उत्सुकता त्यावेळेस मनात दाटून येत असे.
दहावीला असताना बीजगणिताचे सर तर आम्हांला नेहमी टोकायचे.
" शाळेचं शेवटचं वर्ष ना तुमचं, आता काय कॉलेजला जाणार तुम्ही... त्याआधीच शिंग फुटायला लागलीयेत तुम्हांला.... नाही का..??"
सरांनी असं म्हटलं की, मी आपली उगाचच दोन रिबिनी बांधून घट्ट वेण्या घातलेल्या डोक्यांवरून हात फिरवी. सर म्हणतात तसं खरंच आपल्याला शिंग - बिंग फुटल्यात की काय... ??
बरं , ह्यातला गमतीचा भाग सोडला तर खरंच असं काय बरं वेगळेपणं असतं कॉलेज जीवनात.. की सरांनी असं म्हणावं..??
बऱ्याच वर्षांची शालेय जीवनातली कडक शिस्त संपल्याने, आपल्या अलवार उमलू पाहणाऱ्या तारुण्याच्या भावना मुक्तपणे , बेधुंदपणे व्यक्त करताना कधी अवचित येणारा उन्माद , तर कधी व्यक्त होण्याच्या जल्लोषात , आनंदात, निस्वार्थ मैत्रीच्या सहवासात, मित्र- मैत्रिणींशी भांडत, हसतखेळत, एकमेकांची यथेच्छ टिंगल टवाळी करत त्यासोबतच एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी होत , परिस्थितीचे भान राखत आयुष्यातला प्रत्येक क्षण मनमुरादपणे जगू पाहणाऱ्या आयुष्याला कॉलेजचे मोरपिशी दिवस नव्हे तर अजून काय बरं म्हणावं ..??
__ आणि ते तसं आयुष्य जगू पाहणं म्हणजे त्या प्रत्येक उमलत्या तारुण्याची गरज नसेल तर दुसरं काय असेल..?
__ आता थोडं माझ्या आठवणीतल्या माझ्या कॉलेजच्या दिवसांबद्दल लिहिते.
माझी दहावी झाली आणि मी अकरावीला ज्युनिअर कॉलेजला प्रवेश घेतला. आमचं कॉलेज आणि परिसर अतिशय निसर्गरम्य असाच आहे. विस्तीर्ण समुदकिनारा लाभलेल्या, सुंदर
केतकीच्या बनाच्या काठावर माझं कॉलेज जीवन सुरू झालं.
अकरावीचं वर्ष तसं मराठी, इंग्लिश, हिंदी, गुजराथी, ऊर्दू अश्या सर्व माध्यमातून आलेल्या नवीन मित्र-मैत्रिणींशी ओळख करून घेण्यात , जुळवून घेताना कसं गेलं ते समजलचं नाही. त्यात त्यावर्षी प्राध्यापकांचा दोन महिने संप चालला होता, त्यामुळे आम्हां विद्यार्थ्यांना सक्तीने दोन महिने घरी बसावं लागलं होतं.
बारावीचं वर्ष सुरु झालं आणि खऱ्या अर्थाने कॉलेज जीवनाला सुरुवात झाली. शाळेतल्या केसांच्या दोन वेण्या जाऊन त्या जागी माझ्या पाठीवर एकच वेणी रुळू लागली होती. केसांच्या बटा कपाळावर महिरप घालू पाहत होत्या. पावडरचा हलका हात पुन्हा-पुन्हा चेहर्यावरून फिरवल्याशिवाय घरातून पाय निघत नव्हता.. स्त्रीसुलभ नटण्याची ही उपजत आवड हळूहळू वृद्धींगत होऊ पाहत होती.
तसं आमच्या ज्युनिअर कॉलेजचं वातावरण बरंचस शिस्तीचंच होतं..
वर्गाच्या खिडकीतून समुद्राचं सौदर्यं न्याहाळत , गार हवेचा आस्वाद घेत आमचं तसं मस्त चाललं होतं. समुद्रकिनार्यावर हुंदडायला जाण्याची मात्र सर्व विद्यार्थांना सक्त मनाई होती. चुकून जरी कधी कोण समुद्रकिनार्यावर फिरताना दिसलं तर कॉलेजच्या पीटीच्या सरांनी आपला तिसरा डोळा उघडला म्हणून समजाच...त्यामुळे समुद्र किनार्यावर जायची हिंमत आम्ही ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी चुकूनही कधी केली नाही.
कधी येई अभ्यासाचा ताण
तर कधी चाले कुणाच्या हृदयावर बाण...
सोनेरी दिनांच्या त्या सोनेरी संगतीत
हरपून जाई अवघ्या तरुणाईचे भान...
कॉलेज जीवनातील अभ्यास, शिस्त, परिक्षा, मजा - मस्करी, कुणाला एखाद्याच्या नावाने चिडवणं या साऱ्या गोतावळ्यात चॉकलेट डे, रोझ डे, फिशपॉन्ड डे, ट्रॅडिशनल डे तसेचं स्नेहसंमलेन ह्या पाहुण्यांची हजेरी अगदी अनिवार्य असे. त्या चार-पाच दिवसांत तर कॉलेजातल्या अवघ्या तरुणाईची मनं थार्यावर नसत.
बारावीला असातानाचा असाच एक किस्सा फिशपॉन्ड डेच्या दिवशीचा. फिशपॉन्ड डे म्हणजे कॉलेज विश्वातली खरंच खूप धमाल...!!
आपली ओळख गुप्त ठेवून आपल्याला एखाद्याबद्दल वाटणारी भावना शब्दांत जाहिरपणे मांडण्याचा दिवस .. मग त्या फिशपॉन्डमध्ये एखाद्याची हृदयात दडवलेली हळूवार प्रेमभावना असे , तर कधी एखाद्याची टिंगल टवाळी..! पण ते काही असलं तरी त्यादिवशीचे सगळं वातावरण अगदी उत्साहाचं असे.
त्या फिशपॉन्ड डेच्या दिवशी व्यासपीठावर आमचे मराठीचे सर एक - एक फिशपॉन्ड वाचत होते. एकमेकांची चेष्टा करत सगळे त्या कार्यक्रमाची रंगत लुटत होते.
आमच्या ग्रुपमध्ये आमची एक लांब केशसांभार असणारी मैत्रिण होती. स्वभावाने थोडी खट्याळ तशीच फटकळसुद्धा होती. एखाद्याची टिंगलटवाळी करण्यात एक नंबर पटाईत.
सरांनी तिच्या नावाचा उच्चार केला आणि आम्ही सगळ्या मैत्रिणींनी फिशपॉन्ड ऐकण्यासाठी कान टवकारले.
" प्रचंड तुझा केशसांभार..
पेलवेना त्याचे वजन करतेस मग वाकडी मान...
जीभ तुझी पोरी ..जणू पाजळलेली तलवार
बोलताना जरा राखत जा थोडे जगाचे भान..."
आम्ही सगळ्या मैत्रिणी तिची मजा घेऊ लागल्या. ती मैत्रिण सुद्धा हसत- हसत विचारू लागली, कुणी टाकला असेल गं हा फिशपॉन्ड माझ्यावर..??
तिच्या ह्या प्रश्नावर माझी आणि माझ्या जिवलग मैत्रिणीची झालेली नेत्रपल्लवी तिच्या नजरेस पडली नाही म्हणून ठिक, नाही तर त्यादिवशी तिने आम्हां दोघींवर शब्दांची धारदार तलवार चालवली असती... त्यादिवशी फिशपॉन्ड डेच्या निमित्ताने तिची मजा घ्यायची संधी आम्ही बिल्कूल दडवली नव्हती.
तर... झाकली मूठ सव्वा लाखाची बरं..!!
थोड्या वेळाने माझं नाव सरांनी उच्चारले. मी जरासे बावरले. एखादा प्रेमभावनेने ओतप्रोत भरलेला फिशपॉन्ड असला की, वाचण्याच्या आधीच सरांच्या गालावर लाली चढत होती.. आणि आम्ही सरांची सुद्धा त्यादिवशी टिंगल करायला मागेपुढे पाहत नव्हतो.. त्यादिवशी सारं काही माफ असे..
पण हे काय..?? सरांनी फिशपॉन्डचा कागद उघडताच त्यांच्या चेहर्यावर लाली न चढता मिश्किल हसू फुटलं. मी कावरीबावरी झाले. चला, म्हणजे कुणीतरी फिशपॉन्डमधून माझी जाहीर टर उडवणार हे नक्की...!
' ए रूपाली ... ए रूपाली...
तू लगती है नानी..
ए रूपाली..... तू लगती है नानी ...
ताडी के दुकान में पीनेवाली पानी...
थोडी है तू पागल.. थोडीसीच क्यू तू शानी...?
ए .. ए.... रूपाली....
फिशपॉन्ड ऐकून सगळेच हसू लागले. मला तर इतकी लाज वाटली म्हणून सांगू तुम्हांला..??
त्याच वर्षी संजय दत्त आणि उर्मिला मातोंडकरचा 'खूबसूरत ' नावाचा चित्रपट आला होता. त्यातले ' ए शिवानी..' ह्या गाण्यावरून फिशपॉन्ड टाकत कुणीतरी माझी चांगलीच मज्जा घेतली होती. त्यानंतर सुद्धा खूप दिवस मला सगळेच त्या फिशपॉन्ड वरून चिडवत राहिले. माझे गाल गुलाबी करणारे काही फिशपॉन्ड सुद्धा त्यात होते, पण हा फिशपॉन्ड मात्र मला कधीच विसरता आलेला नाही.
तर हा असा माझी टर खेचणारा किस्सा फिशपॉन्ड डेचा.. ..!!
कॉलेजमधून दरवर्षी निघणार्या ' सागरमोती' नावाच्या वार्षिक अंकाने माझी लेखनाची आवड जोपासली. कॉलेज प्रशासन अध्यापनासोबतच विद्यार्थांचा सर्वांगीण विकास व्हावा यादृष्टीने विशेष लक्ष देत असे.
बारावीची बोर्डाची परिक्षा संपल्यावर त्याचवर्षी आलेला आणि गाजलेला ' कहो ना प्यार है' सिनेमा बघायला म्हणून दोन स्टेशन ओलांडून आमचा पूर्ण ग्रुप पालघरला गेला आणि तो चित्रपट थेटरमधून उतरून गेल्यामुळे माधुरी- अनिलचा ' पुकार' सिनेमा आम्ही पाहून आलो. दुधाची तहान ताकावर भागवली .. अजून काय..!
चला, ह्या लेखामुळे निदान भूतकाळात सैर तरी करता आली. जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. पुढे बारावी नंतरच्या कॉलेज जीवनातसुद्धा नवीन मित्र-मैत्रिणी मिळाले. त्यांच्या संगतीत ही रंगत आलीच. पुढे शिक्षणासोबत पार्टटाईम जॉब सुरू केला. पुढील आयुष्याकडे जबाबदारीच्या नजरने पाहण्यास सुरुवात केली आणि ते मोरपिशी दिवस चोरपावलांनी आयुष्यातून निघून गेले... पण ते मोरपिशी दिवस स्मृतीपटलांवरून कधीच खेचले जाऊ शकणार नाहीत कारण त्या दिवसांचे .ध्रृव ताऱ्यासारखे मनात अढळ , अबाधित स्थान आहे आणि ते कायमच् राहिल..!
लेख संपवताना फक्त एवढेच शब्द लिहिते..
गतकालीन मोरपंखी दिनांचा
जपला मी अनमोल एक ठेवा...!
भूतकाळाच्या वेशीवर वळता
मग वाटे मला.. माझाच हेवा...!
गणपती बाप्पा मोरया...!
धन्यवाद...!
रूपाली विशे - पाटील
खूप छान ! मस्त लिहीले आहे .
खूप छान ! मस्त लिहीले आहे .
अन समुद्र किनाऱ्यावर कॉलेज ! ... कसलं भारी !
मस्त अनुभव रुपाली....
मस्त अनुभव रुपाली.....fishpond तर मस्तच
छान लिहिलेय नेहमीसारखेच..
छान लिहिलेय नेहमीसारखेच..
ते गाल गुलाबी करणारे फिशपाँड वाचायलाही आवडले असते
बाई दवे,
आमचेही किर्ती कॉलेज समुद्रकिनारी होते
धन्यवाद बिपिनजी, लावण्या,
धन्यवाद बिपिनजी, लावण्या, ऋन्मेष..!!
ते गाल गुलाबी करणारे फिशपाँड वाचायलाही आवडले असते >> मनावर घेतले नाही म्हणून आता आठवतच नाहीत.
छान आठवणी. मला कधीतरी
छान आठवणी.
फिशपाँड सरांनी वाचले? आमच्या कॉलेजात वर्गाचा फिश पाँड ऑफ पिरियडला झाला होता.
मला कधीतरी तुमच्यासारखं अलंकारिक लिहून पाहायचं आहे.
धन्यवाद भरत..!!
धन्यवाद भरत..!!
हो, सरांनीच वाचले होते सगळे फिशपॉन्ड, ..!
आमच्या कॉलेजात फिशपॉन्ड डे कॉलेज आयोजित करत असे. बहुतेक ट्रेडीशनल डे च्या दिवशीच..!! त्यादिवशी कॉलेजच्या पटांगणावर मोठा मंडप घालायचे. फिशपॉन्ड लिहायचा कागद दोन रुपये की तीन रुपयाला कॉलेजतर्फे विकायचे. विकत घेतलेल्या कागदावरच फिशपॉन्ड लिहायचा. कॉलेज प्रशासनाने निवडलेले फिशपॉन्डच व्यासपीठावर वाचले जात. जिच्यावर/ ज्याच्यावर जास्त फिशपॉन्ड पडत ती/तो त्यावर्षीची/चा फिशपॉन्ड क्वीन किंवा फिशपॉन्ड किंग म्हणून अख्ख्या कॉलेजमध्ये ओळखली / ओळखला जात असे. मला वाटते मुलीच फिशपॉन्ड क्वीन होत.. मुलगा फिशपॉन्ड किंग झाला असं कधी ऐकलं नव्हतं.
मला कधीतरी तुमच्यासारखं अलंकारिक लिहून पाहायचं आहे>> तुम्ही छान लिहीता... उलट मला वाटते की, माझ्या लेखनात अलंकारिक भाषेची अधिकच मात्रा होतेयं... ओघवती भाषाशैली आत्मसात करायला हवी असं वाटते.
छ्न लिहिलंय.
छ्न लिहिलंय.
मलाही शिवानी नाव ठेवलं होतं काॅलेजमधे. दिसले की 'ए शिवानी' ओरडायचे.
टवाळ मेले
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहेस.
छान लिहिलं आहे!
छान लिहिलं आहे!
आमच्या कॉलेजमध्ये एक सर होते. ते कायम गंभीर चेहऱ्याने वावरायचे. त्यांच्यावर फिशपॉण्ड पडला होता..XXX सरांना हसवा आणि हजार रुपये मिळवा' हे ऐकून मात्र ते हसले होते (म्हणतात).
छान लिहलयं!
छान लिहलयं!
आवडले.
आवडले.
छान लिहिलं आहे.
छान लिहिलं आहे.
धन्यवाद सस्मित, वावे, हेमाताई
धन्यवाद सस्मित, वावे, हेमाताई, कृष्णा, सामो, शर्मिलाजी..!!
@ सस्मित, वावे- तुमच्या कॉलेज जीवनातल्या आठवणी वाचायला आवडल्या असत्या..!
छान लिहिलं आहे...
छान लिहिलं आहे...
धन्यवाद दिपक..!
धन्यवाद दिपक..!