भूक कथा

Submitted by सतीशगजाननकुलकर्णी on 8 September, 2022 - 06:47

भूक....

घड्याळात रात्रीचे बारा वाजले होते. तरीही शशी सरांना झोप येत नव्हती. अलीकडे हे सारखे असेच होत होते. केव्हातरी मध्यरात्री त्यांना डुलका लागायचा आणि पहाटे पुन्हा दचकून जाग यायची. “ माणूस मोठा झाला कि त्याची झोप त्याच्यापासून पळून जाते” असे कुणीतरी त्यांना म्हणाले होते. शशी सरांना ते आठवले आणि गेल्या पंचवीस वर्षात आपण किती संघर्ष करून या ठिकाणी आलो याची त्यांना जाणीव झाली. शशी सर.! समाजातील एक प्रतिष्टीत व्यक्ती म्हणून त्याच्या नावाचा दबदबा होता. शहरातील सामाजिक संस्थां, शैक्षणिक संस्थाचे ते चेअरमन होते. पण त्यांची खरी ओळख होती समाजातील दिन दुबळ्या, पिडीत महिलांचा कैवारी, आश्रय दाता.गेली पंचवीस वर्षे ते एका ध्येयाने काम करीत होते आणि आज याच पंचवीस वर्षाच्या कार्याचा सत्कार म्हणून हजारो लोकांच्या साक्षीने त्यांचा मोठा सत्कार करण्यात आला.
आजचा कार्यक्रम खरच सुंदर झाला होता. कौतुकाचा वर्षाव शशी सरांच्या वर होत होता. आणि घरी आल्यावर सुद्धा पुन्हा पुन्हा त्या आठवणींनी मनातल्या मनात ते समाधानाने हसायचे. पण कार्यक्रम सुरु असताना एका दृश्याने मात्र ते काहीसे अस्वस्थ होत होते. हजारो माणसे पुढ होती पण प्रेक्षागृहात समोरच बसलेल्या एका स्त्री कडे त्यांचे वारंवार लक्ष जायचे. त्यांना वाटायचे या बाईला आपण कुठेतरी बघितले आहे. खर तर ती स्पष्टपणे त्यांना दिसत नव्हती पण तिने पुढे घेतलेला केसांचा शेपटा आणि तिचे बांधेसूद शरीर त्यांच्या नजरेतून सुटत नव्हते. एकीकडे कौतुकाचा वर्षाव होत असताना त्यांना मनातून समाधान वाटायचे आणि दुसरीकडे त्या स्त्रीकडे बघितलं कि ते अस्वथ व्हायचे.

घड्याळात साडेबारा वाजले होते. शेजारीच त्यांची पत्नी अनघा घोरत होती आणि भिंती कडेला तिच्या दोन कुबड्या टेकून उभ्या होत्या. शशी सर अधिकच अस्वस्थ झाले. आणि बेडरूमला लागून असणार्या टेरेस वर गेले. मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी ते असेच टेरेस वर यायचे. आज हवेत गारवा नव्हता. कोणत्याही क्षणी पाउस येईल असे वाटत होते.सहज म्हणून शशी सरांची नजर वर गेली. आकाशात ढगांची गर्दी झाली होती. त्यांना वाटले आपल्याही मनात आठवणींनी अशीच गर्दी केली आहे.

पंचवीस वर्ष ... किती पटकन निघून गेली ..... कॉलेजचे ते शिक्षण ...... त्या काळात अभ्यास सांभाळत केलेलं वाचन .. आणि काहीही झाले तरी नोकरी करायची नाही हा मनाशी केलेला निश्चय ...! उर्वरित आयुष्य आपण समाजसेवा करणार ...! कॉलेज चालू असतानाच आपण वडिलांना सांगितले होते. पण वडील ... कुणा दादा देशपांडे समाज सेवकाच्या नादाला पोरगा लागला आहे. उतरेल खूळ म्हणून सार हसण्यावारी नेत होते. डिग्री हातात आली आणि तोच निश्चय आपण वडिलांना बोलून दाखवला. शीघ्र कोपी वडील अजूनच संतापले. “ समाजसेवा करायची तर पोट कुणी भरायचे?”आणि आपणही रागाने दिलेले उत्तर “ माझ पोट भरायला मी समर्थ आहे” आणि दुसरे दिवशी आपण घर सोडलं. छोट्या मोठ्या नोकरया करून वर्तमानपत्रात स्तंभ लेखन करून आपण पोट भरलं. सुरवातीला कधी मित्राकडे तर कधी रेल्वे स्टेशनवर राहून दिवस काढले पण माघार घेतली नाही. घर तुटले पण खरा आधार दिला तो दादा देशपांडेनी. त्यांनी बांधलेल्या पिडीत महिलांच्यासाठी आश्रमात आपण साधे कार्यकते म्हणून काम बघायचो. समाजसेवेची आपली तळमळ बघून दादा देशपांडे समाधानी असायचे. हळूहळू आपण त्यांचे उजवे हात झालो. काही वर्षातच दादा गेले आणि आपण त्या आश्रमाचे सर्वेसर्वा झालो. दुप्पट तळमळीने आपण आश्रमाचे काम केले आणि थोड्याच दिवसात आपले नाव झाले शशीसर !
भूतकाळातील आठवणी आठवून त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला आणि त्यांची नजर सहज टेरेस मधून दिसणाऱ्या बेडरूम कडे गेली. अनघा शांतपणे झोपली होती. पत्नीकडे नजर गेली आणि ते अस्वस्थ झाले. खिशातील सिगरेट त्यांनी बाहेर काढली आणि धुरांच्या वलयाकडे बघत ते पुन्हा भूतकाळात हरवून गेले.

......अनघा अशीच एक दिवस आश्रमात आलेली होती.घरची गरिबी होती. अचानक तिच्या आईच निधन झाल. भाड्याच घर. भाड भरलं नाही म्हणून घरमालकान घराबाहेर काढल. आणि तीन आसरा शोधला आपल्या आश्रमात. दिसायला बरी पण विधात्याने तिचे दोन्ही पाय लहानपणीच एका अपघातात बळकावले. आपण तिला संभाळल. आधार दिला आणि ती आपल्याला देवमाणूस मानु लागली. तो पर्यत समाजात आपल्या नावाला वलय प्राप्त होत होत. आणि न कळत आपल्या नावाची, प्रतिष्ठेची भूक वाढत होती. एक दिवस आपण विचार केला “ आपण अनघाशी लग्न का करू नये ?” तिने विरोध केला. तुम्ही सर्वस्वाचा त्याग करताय म्हणाली पण आपल्याला आपल्या भूकेपुढ काहीच दिसत नव्हत. फक्त आपण आणि आपले नाव. दादा देशपांडेनी शिकवलेली निष्काम कर्मयोगाची शिकवण आता केव्हाच मागे पडलेली होती.
हातात जळत असलेली सिगरेट संपत आली होती. तिच्या चटक्याने शशी सर भानावर आले. अनघाने कूस बदलली आणि तिच्याकडे पाहताना शशी सरांच्या मनात विचार आला हिच्याशी लग्न करून आपण काय साध्य केल ? नाव मिळाल, समाजात आपल्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला, आदर वाढला. पण आपल्या मनात काय चालल होत ? घरी नेहमी तिच्याशी आपण प्रेमान वागलो पण खरच आपल्या मनात प्रेम होत ? खर तर मनातल्या मनात आपल्याला राग यायचा. परिस्थितीचा, अनघाचा आणि आपला स्वत:चा सुद्धा. आपण प्रेमान वागलो कारण तिच्याशी रागाने वागलो असतो तर तो चर्चेचा विषय झाला असता. शाशिसर या नावाला एक ओरखडा उठला असता. शाशिसर या नावाची भूक भागली पण शरीराची भूक?ती वाढत गेली पण भागली नाही. शरीराची, मनाची तडफड वाढतच गेली.
. मनातील तडफड विसरण्यासाठी आजचा दिमाखदार कार्यक्रम ते आठवू लागले. पण तडफड अधिकच वाढू लागली .. ते अधिकच अस्वस्थ होऊ लागली. समोरच्या रांगेत बसलेली ती बाई .... कोण होती ती ..पुढे घेतलेला केसांचा शेपटा .. बांधेसूद शरीर ... आकाशातील विरळ झालेल्या ढगांनी पुन्हा गर्दी केली...

......त्या दिवशी सकाळी शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला आपण गेलो होतो. खर तर कोणत्याही मैफलीला जाण्या इतपत वेळ कधी मिळालाच नाही आपल्यला. पण तरीही प्रायोजकांनी आग्रह केला म्हणून आपण गेलो. आणि प्रेक्षागृहात ती बसलेली होती. केसांचा पुढे असलेला शेपटा .. गौर वर्ण .. दिसायला आकर्षक .. आणि तसेच ते बांधेसूद शरीर.. आपले लक्ष कार्यक्रमात नव्हतेच. आपण बघत होतो तिच्याकडे ... कोण असावी ती? या कार्यक्रमाला कशी आली? किती तल्लीन होऊन ऐकते आहे कार्यक्रम. आपण बघोतोय तिच्याकडे हे तिच्या लक्षात आले असेल? ती सुद्धा नजरेच्या कोपर्यातून आपल्यकडे बघत असेल.? होय, बघतेच आहे ती आपल्याकडे. का आपल्याला भास होतो आहे? कार्यक्रम संपला आणि गर्दीतून वाट काढत ती पुढे जाऊ लागली आणि तिच्यामागे आपण. आपण काय बोलणार होतो तिच्याशी? खर तर बोलणार नव्हतोच. पण तरीही तिच्यामागे आपण खेचले जात होतो. बर्याच वेळानंतर आपल्या लक्षात आले होते कि कुणीतरी आपल्याला पाहिलं म्हणून आपण रिक्षात बसलो आणि घरी वळलो.
दुसरा दिवस पुन्हा त्याच रस्त्यावर आपण गेलो ती भेटेल या आशेने. एकाच रस्त्यावर ती थोडीच दिसणार होती?पण मनात वेडी आशा असायची. आणि ती खरच दिसली. एका दुकानातून बाहेर पडताना. आणि आपण रोज जायला लागलो त्याच रस्त्यावर.. त्याच वेळेला... आणि ती रोज दिसू लागली तशीच सुंदर .. आकर्षक .. केसांचा शेपटा पुढे घेतलेली...
अनघाने एक दिवस आपल्याला विचारले सुद्धा “ अलीकडे रोज नऊ वाजता सकाळी बाहेर पडता. आश्रमात तर तुम्ही अकरा वाजता जायचा ना ?” “ थोड काम चालू आहे” असे सांगून आपण वेळ मारून नेली होती.

धपकन करून बेडरूम मधून कोणतातरी आवाज आला म्हणून शशी सर भानावर आले. त्यांनी आत नजर टाकली. अनघाचा धक्का लागून भिंतीला टेकून ठेवलेल्या कुबड्या शेजारच्या छोट्या टेबलवर पडल्या आणि त्यावरील पुस्तक खाली पडले. शशी सर जवळ गेले आणि त्यांनी ते पुस्तक हातात घेतले. “गॉड ऑफ स्माल थिंग्स” पुस्तकावरून त्यांनी एक नजर फिरवली. त्यांच्या चेहऱ्यावर न कळत स्मित पसरले. त्या पुस्तकाशी सुद्धा त्यांची आठवण होती. नाजूक, हवीहवीशी वाटणारी. कालपरवा घडल्यासारखा तो प्रसंग त्यांच्या डोळ्यापुढे दिसू लागला. पुस्तक कुरवाळत कुरवाळत शशी सर आठवणीना सुद्धा कुरवाळू लागले.
......रोज त्या रस्त्यावर नुसते जायचे आणि तिला बघायचे हे आपल्यालाही कुठेतरी ऑकवर्ड होत होते. लोकांची भीती वाटत होती. पण तिच्याशी ओळख करून घ्यावी, तिचे नाव विचारावे आणि दोन शब्द तरी तिच्याशी बोलता यावेत असे मनोमन आपल्याला वाटत होते. आणि एक दिवस ती पुस्तकांच्या दुकानात शिरली आणि तिच्यामागून आपणही.... पुस्तके बघत असताना ती पुढे आणि आपण तिच्यामागे मागे... तिने पुस्तक बघत असताना न कळत विक्रेत्याला विचारले “ गॉड ऑफ स्मॉल थिंग्स” पुस्तक आहे ? पण मला लेखक माहित नाही” आणि आपण न कळत म्हणालो “ तो लेखक नाही लेखिका आहे अरुंधती रॉय” तिने थन्क्स म्हणून आपल्यकडे हसून बघितले. आणि तिच्याबरोबर आपणही ते पुस्तक विकत घेतले. आणि ओळखीला सुरवात झाली.
कांचन नाव होत तीच. एका संगीत शाळेत शिक्षेकेची नोकरी करत होती. वाचन आणि मनसोक्त भटकणे हे तिचे आवडते छंद होते. आपल्यासाठी इतक पुरेस होत. आपण आपली ओळख करून देऊ लागलो तर ती हसून म्हणाली “ असे कुणी आहे जे तुम्हाला ओळखत नाही?”आपण मनोमन सुखावलो आणि ओळख वाढत गेली.
पुढचे पंधरा दिवस आपण आश्रमाच्या कामानिमित परगावी गेलो होतो. पंधरा दिवस आपण तिला बघू शकणार नाही हि हुरहूर मनात दाटून आली होती. पण या गोष्टीला इलाज नव्हता. मनात उगीचच यायचे तिचे घर कुठे आहे आपल्याला माहित नाही, बाकी ठाव ठिकाणा माहित नाही आपण गावावरून परत आल्यावर ती पुन्हा भेटली नाही तर ? मनात हा विचार आला कि धस्स व्हायचे. कसे बसे आपण आश्रमाचे काम संपवले आणि पुन्हा त्याच रस्त्यावर गेलो ..सकाळी नउ वाजता.
आणि ती होती .. भेटली आपल्याला .. हसली आणि चक्क तिने विचारले “ पंधरा दिवस कुठे दिसला नाहीत?”. म्हणजे पंधरा दिवस आपण नाही आहोत याची दखल तिने घेतली होती.आपल्या आयुष्यात तरंगत एक नात येत आहे या सुखद आठवणीनी आपण सुखावलो.

एक दिवस कांचनन आपल्याला घरी बोलावलं. आणि आपणही आतुरतेने ते आमंत्रण स्वीकारलं. तिच्याशी ओळख वाढावी, मैत्री व्हावी हि सुप्त इच्छा मनात होतीच आपल्या. कांचनच घर नेटकच होत. पण घरी सगळीकडे सामसूम होती. नेहमी एखाद्या घरात असतो तशी कोणतीच चाहूल लागत नव्हती. बैठकीच्या खोलीत आपण आणि आत स्वयपाकघरात ती. आत बाहेर करत असताना तिच्या हालचाली आपल्यलाला मोहक वाटत होत्या. कशी कुणास ठाऊक वासनेची सूक्ष्म लहर आपल्या शरीरात चमकून गेली होती. पण या घरात फक्त हि एकटीच. मुले, नवरा कुणीच कसे नाही ?
“ मी एकटीच असते घरात. माझे आणि माझ्या नवऱ्याचे पटत नाही. आम्ही घटस्फोट घेणार आहोत. मला मुल बाळ कुणीच नाही. कदाचित त्याचमुळे माझा नवरा नाराज असेल” तिने एका दमात सगळे सांगून टाकले. आपलयाला आश्चर्य वाटले होते. इतक्या सुंदर बाई पासून घटस्फोट. आणि हिला मुल बाळ का नाही ? हिच्यात दोष आहे का हिचा नवरा? अशी बायको जर आपल्याला भेटली असती तर....
त्या दिवसापासून अनेकदा आपल्या मनात फक्त कांचनचेच विचार यायचे. आणि त्या विचारापासून बाजूला जाण्याच्या ऐवजी आपण त्यात बुडून जायचो

. अचानक हॉल मधील फोन वाजू लागला. आणि शशी सर दचकले. हि वेळ कुणी फोन करायची आहे? कोण असेल. अनघाची झोप मोडायला नको म्हणून त्यांनी फोन उचलला. तिकडून कोणताच आवाज आला नाही. कुणीतरी अस्पष्ट हसत आहे कि काय असा त्यांना भास झाला. शशी सरांच्या घशाला कोरड पडली. त्यांनी पाणी प्याले आणि पुन्हा ते टेरेसवर आराम खुर्चीत बसले. मध्यरात्र उलटून चालली होती. हवा अजुनी कुंद कुंदच होती. टेरेस गार्डन मधील फुलांची झाडे तशीच कोरडी , निस्तब्ध होती बाहेर कुठतरी कुत्र्याचे भुंकणे. रात्र अस्वस्थ होती. अगदी त्या दिवशी होती तशीच.
......त्या दिवशी कांचनने रात्री जेवायला बोलावले. रात्री? एका घटस्फोटीत बाईच्या घरी. आपण तयार नव्हतो. पण ती दिवसभर वेळ असत नाही असे म्हणाली. खरच होत ते. नोकरी करून घर सांभाळायच किती अवघड असेल न एकट्या बाईला. आपण नाईलाजाने तयार झालो.
रात्री घरी गेलो. तेव्हा पाठीवर केस मोकळे सोडून ती आपली वाट बघत होती. त्या दिवशी ती अधिक सुंदर दिसत होती... अधिक आकर्षक .. अधिक मादक .... मला माझ एक मन म्हणत होत इथूनच मागे फिर. मोहाच्या क्षणात अडकण तर सोड तुला मोह होण हे सुद्धा वाईटच आहे. पण दुसर मन तिच्या सहवासाला आतुर होत. मोह झाला तरी टाळू शकण्या इतपतआपण संयमी आहोत म्हणून आपण मनाची समजूत घातली होती.
ती आपल्या समोरच बसली आणि विचारल “ कसला विचार करताय?”
“ कोणताच नाही”
“ कोणताच नाही?” तिच्या डोळ्यातील आग आपल्याला दिसत होती. आपण काहीच बोललो नाही. बोलावे वाटलेच नाही. कदाचित मनातील भावना डोळ्यात दिसत असाव्यात.
“ माणसान फार विचार करू नये. मनात आलेली इच्छा पूर्ण करून टाकावी” तिने तिचा हात पुढे केला आणि काय होतय हे कळायच्या आधी माझा हात सुद्धा तिच्या हातात दिला. दोन शरीर एकमेकांना भिडली, तडफडली, आणि काही वेळातच शांत झाली.
घरी गेलो तेव्हा अनघाच्या नजरेला नजर आपण देऊ शकलो नाही. खर तर तिच्या बाबतीत आपल्या मनात प्रेम होत अस नव्हे. पण तरीही वाटत होत त्या निष्पाप जीवाला उगीच आपण फसवतोय म्हणून अपराधी वाटत होत. पण आत कुठेतरी मी तृप्त झालो होतो शरीरातील रोम आणि रोम शांत झाला होता.
मग तिच्या घरच जाण वाढत चालल. तिच्याकडे जाताना आपल्याला भीती वाटायची. कुणी आपल्याला बघत नाही न या विचाराने आपल्याला ग्रासलेले असायचे. पण तरीही आपण तिच्याकड ओढले जायचो तिने आपली वाट बघण आणि आपण आतुरतेन जाण हे नेहमीच झाल. आम्ही आमच्या नात्याला गोंडस नाव दिल प्रेम. पण ते खरच प्रेम होत? नक्कीच नाही. ती होती फक्त शरीराची भूक. ती एकटी असल्याने तिला लागलेली. आणि आपल काय?नावाच्या भुकेसाठी शरीराची दाबून ठेवलेली ती भूकच होती ना? दोघेजण भेटत होतो ते फक्त भूक शमविण्यासाठी.
आणि एक दिवस आपण भानावर आलो. “ हे तू काय करतो आहेस?” म्हणून दरडावून विचारल स्वत:ला. ज्या नावासाठी तू घरदार सोडलास ते नाव अशा रितीन धुळीला मिळवणार.! “ माग फिर माग फिर” शरीर आणि मन यांच्यात दंदव झाल आणि आपण तिचा नाद सोडला.
जवळ जवळ पंधरा दिवस आपण तिच्या घरी गेलो नाही. संस्थेच्या कामात स्वत:ला झोकून दिल. आणि एक दिवस कांचन स्वत:च घरी आली...घरामध्ये अनघा नव्हती तरीही आपण घाबरलो होतो. कांचन आणि अनघा समोरासमोर आल्या तर? अनघा आपल्याला देव मानते आणि आपण असे पापी ...
“ आला नाहीस तू ? मला “भेटायला”कांचनने घरी आल्या आल्या उपरोधिक स्वरात विचारले
“ नाही. कामात होतो.” चेहरा निर्विकार ठेवत आपण मोघम उत्तर दिले होते.
“ कामात होतो ? का भूक भागली तुझी? का अजुनी कुणी दुसरी .. ? कांचन संतापली होती.
“ . मुर्खासारख बोलू नकोस तू एका प्रतिष्ठित माणसाच्या घरी आली आहेस हे लक्षात ठेव.
“ प्रतिष्ठित म्हणे प्रतिष्ठित” ती तुच्छतेने हसली.
“ होय प्रतिष्ठित, हि प्रतिष्ठा, हे नाव मिळवण्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला आहे मी आणि मग हे मला मिळाल आहे. काही काळाकरता तुझ्याशी मैत्री केली. सुखाचे क्षण अनुभवले. ठीक आहे पण आता .. आता ते शक्य नाही. आपण थांबू या.
“थांबू या. मग ते सुरु का केलस? तेव्हा हि अक्कल तुला नव्हती? माझ्या मागे मागे हिंडत होतास तेव्हा तुला काही वाटलं नाही? स्वत:च्या शरीराची भूक भागवण्यासाठी तू माझा उपयोग करून घेतलास तेव्हा तुझी प्रतिष्ठा आड आली नाही.? गरज मलाहि होती शशी पण मी तुझ्यासारखी खोटी नाही. तू ढोंगी आहेस. तू मला फसवलसच पण त्याचबरोबर तू तुझ्या बायकोलाही फसवलस.” तिचा राग वाढला होता. कुणीतरी आपला उपयोग करून घेतला आहे याचे शल्य तिच्या मनात होते.
“ कांचन, जरा शांतपणे विचार कर ..”
“ विचार तू कर. समाजातील तुझी प्रतिष्ठा , तुझे नाव हे सार ढोंग आहे. खर तर, जेव्हा माझ्या बद्दल तुझ्या मनात वासना निर्माण झाली त्याचवेळी तुझी प्रतिष्ठा धुळीला मिळाली. तू त्यागी नाहीस, भोगी आहेस. तुझ्या सारखी नाटकी माणस हि समजाला लागलेला कीड आहे.” ती फडाफडा बोलत होती. आणि माझाही राग वाढत चालला होता.
“काय म्हणालीस भोगी?अनेक अनाथ बायकांचा उद्धार केला आहे आणि सर्वस्वाची होळी करून मी एका अपंग मुलीशी लग्न केल आहे. याला त्याग म्हणतात..
“ याला त्याग म्हणत नाहीत शशी. हा तुझा स्वार्थ होता. तू एका बाईशी लग्न केलस ते समाजातल तुझ स्थान वाढावं म्हणून. तू जर तिच्यावर प्रेम करत असला असतास तर माझ्याकडे आला नसतास. आणि जरी आला असतास तरी तू तिला सांगितल असतस सगळ. आहे हिम्मत तुझ्यात.. माझ्यादेखत सगळ सांगण्याची?” आपला चेहरा पडला होता. तिने पुन्हा विचारल,
“ बोल ना. आहे हिम्मत तुझ्यात तिला सांगण्याची? नाही ना? तू फक्त भुकेला आहेस. पोटाची भूक नावाची भूक, शरीराची भूक. मला वाटलं इतरांपेक्षा तू वेगळा असशील पण तू सुद्धा .. शी .. “ तिचा त्रागा वाढत चालला होता. काही क्षण ती थांबली.. ती अजुनी बोलली असती तरी आपण ऐकून घेणार होतो कारण एकदाच सोक्षमोक्ष लागून हि कायमची आपल्या आयुष्यातून निघून जाईल. पण आपल्या नशिबात ते नव्हते. काही क्षण ती थांबली. समोर असलेला पाण्याचा ग्लास तिने ओठाला लावला. आणि उठता उठता तिने ठामपणे सांगितले
“ आज रात्री घरी ये. मी तुझी वाट बघते आहे” आपल्याला तिने बोलण्याची संधीच दिली नाही. जाताना तिच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते. ते आपल्याला गूढ वाटले.
शशी सरांना ते सगळ अजुनी आठवत होत. त्या दिवशीचा तिचा राग, आपल्यावर भोगी म्हणून तिने केलेला आरोप. सार सार त्यांना आठवत होत. त्यांच्या प्रतिष्ठेला तिने धक्का लावला होता. क्षणभर त्यावेळी तिला पैसे देऊन आयुष्यातून हाकलून द्यावी हा विचारही त्यांच्या मनात आला होता. पण एक चूक लपवण्यासाठी दुसरी करण्याचे त्यांनी टाळले होते. त्या दिवशी कांचनने घरी बोलावल्यावर ती चूक पुन्हा आपण केली. आणि पुन्हा पुन्हा करत राहीलो जर कधी गेलो नाही तर तिचा फोन येत असे. न जाणो .. तो फोन चुकून अनघाने घेतला तर या भीतीने आपल्याला उचलायला लागत असे. त्या दिवसात आपण फोनचा धसकाच घेतला होता. आणि एक दिवस ..
आणि एक दिवस कांचनने आपल्याला सांगितले. “ मी माझ्या नवर्याकडे जात आहे. आमचे पुहा जमेल अस वाटतय.”
“ अरे वा. अभिनंदन” आपल्याला खरच आनंद झाला होता. त्याचं जमतय म्हणून नव्हे तर आपल्या मागची पिडा जाती आहे म्हणून. कदाचित आपला आनंद तिच्या लक्षात आला असावा
तिने पुन्हा त्याच निर्णायक स्वरात सांगिले,
“ पण लक्षात ठेव. मी तुला कधीही फोन करेन. तुझी आठवण आली कि. त्यावेळी मात्र तू भेटायला पाहिजेस” कांचन निघून गेली आणि मला हायस वाटलं होत. नंतर तिचा फोन येत होता आणि काही ना काही कारण काढून आपण टाळत होतो. आणि काय झाले कुणास ठाऊक नंतर तिचा फोन येणे आपोआप बंद झाले.
आणि आज पंचवीस वर्षांनंतर शशी सरांचा सत्कार झाला. त्यांनी केलेले कार्य, त्यांची त्यागी वृत्त्ती याचे भरभरून कौतुक झाले. पण आज घरी आल्यवर सत्काराचा तो प्रसंग आठवत असताना त्यांना ती बाई कोण होती हा प्रश्न त्यांना पडला होता.
पावसाचे तुषार शशी सरांच्या अंगावर पडत होते. बेडरूम मध्ये अनघा शांतपणे झोपली होती. भिंतीला टेकवून ठेवलेल्या कुबड्या तशाच निस्तब्ध उभ्या होत्या. हॉल मधील फोनची रिंग वाजत होती. पण शशी सरांना मात्र आत जायची इच्छा होत नव्हती.

Group content visibility: 
Use group defaults

<<आल्यवर सत्काराचा तो प्रसंग आठवत असताना त्यांना ती बाई कोण होती हा प्रश्न त्यांना पडला होता.>> ती बाई म्हणजे कांचनच असावी जिने पुन्हा सत्कारपाहून ह्या बुवाला कॉल केला...

ओके पाटील... मला पण तसेच वाटलेल आधी.

पण मग इतकं जवळच नात असताना २५ वर्षानंतरही ती कांचन आहे हे बुवाला ओळखू नाही का येणार??

माझा दुसरा तर्क, या बाईला पाहून बुवाला कांचन आठवली आणि पुन्हा ट्रिगर मिळाला Lol