कथाशंभरी२ - स्वातंत्र्यदिन - whitehat

Submitted by WHITEHAT on 5 September, 2022 - 22:19

अंगणात येऊन रघूने गेले सहा महिने बंद असलेल्या शेजारच्या घराकडे सवयीने पाहिले आणि अपराधीपणा, अपयशाच्या भावनेने थरथरला.
दहा वर्षापुर्वीपर्यंत विद्यार्थीदशेत सशस्त्र स्वातंत्र्यलढयात लढणारा तो- त्याच्या प्रिय जानकीला त्या म्हाताऱ्या, नपुंसक, विकृत नवऱ्यापासून वाचवू शकला नव्हता. शोधणार तरी कुठे- थेरडा बदली करवून जानकीसह कुठे गेला गावात कोणालाच माहीत नव्हते.

त्याच्या आजारी आईला बघायला जानकी घरी येऊ लागली आणि अव्यक्त प्रेमाचे रेशीमबंध जुळले. पण सामाजिक बंधनाचे साखळदंड होतेच. तो आजही येणारी स्थळं नाकारत जानकीसाठी तळमळत होता.

तेव्हाच वळणावर एसटीतून जानकी?- होय जानकीच उतरली. हातातलं वर्तमानपत्र दाखवत म्हणाली-"रघुनाथ, बाबासाहेब-नेहरूंनी हिंदू कोड बिल आणलंय. आता मी घटस्फोट घेऊ शकते." त्यांच्या प्रेमाला स्वातंत्र्य मिळालं होतं.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults