सर्वांना नमस्कार. नेताजी सुभाषचंद्र बोस! लहानपणापासून त्यांच्याबद्दल अतिशय आत्मीयता वाटते. "महानायक" आणि "नेताजी" अशी मोठी पुस्तकं व इतर अनेक पुस्तकांमधून त्यांचा परिचय झाला. नव्हे त्यांच्या आयुष्यातला प्रत्येक प्रसंग, प्रत्येक घटना मनावर बिंबली होती. लहानपणापासून त्यांचं वेगळेपण, त्यांचे विचार, त्यांची बंडखोर वृत्ती, शाळा- महाविद्यालयातील पराक्रम, नंतर ब्रिटनमधील शिक्षण, गांधीजींना विरोध, दुस-या महायुद्धामध्ये केलेला अभूतपूर्व प्रवास, परकीय देशांमध्ये जपलेला स्वाभिमान, देश प्रेम, पुन: एकदा रोमांचक पाणबुडी प्रवास, पूर्व आशियातील रोमहर्षक महाभारत आणि... असे सर्व प्रसंग मनावर कोरले गेले होते. पुढे २००५ मध्ये आलेला 'नेताजी द फरगॉटन हिरो' हा चित्रपटही हा अनुभव परत देऊन गेला. नेताजींचा शेवट नक्की काय झाला, ह्याबद्दल मनामध्ये नेहमी प्रश्न होता. आता ह्या प्रश्नाचं सुस्पष्ट असं उत्तर नाही, पण एक निश्चित दिशा मिळते आहे असं वाटतंय. निमित्त झालं नेताजींच्या रहस्यांवर गेल्या २० वर्षांपासून अभ्यास करणा-या अनुज धर ह्यांच्या विविध पोडकास्टसचं आणि 'India's biggest cover up' ह्या त्यांच्या पुस्तकाचं. त्यांचे दोन- तीन तासांचे पोडकास्टस अक्षरश: न थांबता ऐकले आणि मग त्यांचं पुस्तकही सलग वाचून काढलं. नंतर मुखर्जी आयोगाच्या कामकाजावर आधारित असलेला गुमनामी चित्रपटही बघितला. हे ऐकणं- बघणं आणि वाचणंही थरारक होतं. आणि त्यानिमित्ताने नेताजींबद्दल खूप काही कळालं. निश्चित उत्तरांची दिशा कळाली. भारतीय राजकारणाची एक नवीन आणि खोलवर ओळख झाली. हा छोटा लेख म्हणजे हे पोडकास्टस, हे पुस्तक आणि ह्या विषयावर समोर आलेल्या सद्यस्थितीला थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न.
(शब्द संख्या- २६३९ वाचन अवधी १० मिनिटे. हा लेख इंग्लिशमध्ये http://niranjan-vichar.blogspot.com/2022/08/indias-biggest-cover-up-infe... इथे वाचता येईल)
✈ नेताजींना जाऊन तर इतकी वर्षं झाली. आता त्याचं काय? "मेरे पिताजी हैं, उनका सच मुझे जानना है|"
✈ २० वर्षांचे परिश्रम आणि अथक अभ्यास- अनुज धर!!
✈ १९४५ नंतर रशियामध्ये नेताजींच्या उपस्थितीची साक्ष देणारे अनेक पुरावे
✈ आपला भारत देश असा- इतका उदासीन, इतका अंधारात आणि इतका भ्रष्ट?
✈ देशप्रेम आणि स्वाभिमानापुढे सगळ्या अडथळ्यांची शरणागती
✈ Your dead man- गुमनामी बाबा!
✈ नेताजींच्या केवळ १% हिंमत, साहस, शौर्य, बुद्धीमत्ता आपल्याला कशी मिळेल?
✈ जोदी तोर डाक सुने केउ ना आसे तोबे एकला चोलो रे एकला चोलो एकला चोलो रे
नेताजी! स्वातंत्र्याचे एक शिल्पकार! डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि ब्रिटीश पंतप्रधान एटली ह्यांनी म्हंटलंय की, भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यामागे मुख्य कारण आझाद हिंद सेनेमुळे प्रेरित झालेली व ब्रिटीशांची चाकरी सोडून देण्यास सज्ज झालेली भारतीय सेना हे होतं. आता भारतीय सैनिकांचा भरवसा आपण धरू शकत नाही, ही खात्री ब्रिटीशांना झाली. आणि त्यातून देश सोडून जाण्याची भुमिका ब्रिटीशांना घ्यावी लागली. नेताजींनी वस्तुत: अशा शेकडो गोष्टी केल्या आहेत, ज्यापैकी एक गोष्टही कोणी करू शकला तरी तो स्वत:ला धन्य समजेल. मग ते तत्कालीन आयसीएस उत्तीर्ण होणं असेल, गांधीजींना थेट विरोध करणं असेल, मणिपूरपासून पेशावरपर्यंतच्या लोकांसोबत नातं जोडणं असेल, उद्दाम विदेशी सत्तेच्या गुहेमध्येही स्वाभिमान आणि देशप्रेमाने कार्यरत राहणं असेल! किंवा अतिशय भयंकर असा अंधारात उडी मारून केवळ स्वत:च्या हिमतीवर केलेला कोलकाता- काबूल- मॉस्को- जर्मनी असा प्रवास असेल किंवा १% पेक्षाही कमी शाश्वती असलेला अर्ध्या जगाला समुद्राखालून प्रदक्षिणा घालून केलेला पाणबुडीचा प्रवास असेल! किंवा पूर्व आशियामध्ये थायलंड- म्यानमार ते मणिपूर- इंफाळ परिसरामध्ये दिलेली अफाट झुंज- संपूर्ण भारतातील विविधतेचं केलेलं नेतृत्व! तेही असं की, शेकडो सैनिकांनी युद्धात आहुती द्यावी आणि लाखो भारतीयांनी त्यांना सर्वस्व द्यावं! ह्या शेकडो गोष्टींपैकी जो एकही करू शकत असेल तो स्वत:ला धन्य समजेल. असे नेताजी! देशगौरव नेताजी! आत्ताच्या लेखाचा विषय त्यांच्या रहस्यावर अलीकडे पडलेला प्रकाश हा आहे, त्यामुळे त्यासंदर्भात बोलतो.
१८ ऑगस्ट १९४५ ला तैपेई येथे झालेला त्यांचा अपघात हा तेव्हाही जाणकारांनी स्वीकारला नाही आणि तो ब्रिटीश- अमेरिकन अशा विरोधकांनीही मान्य केला नाही. प्रत्यक्षदर्शींच्या साक्षीमध्ये असंख्य विसंगती होत्या, पुरावे उपलब्ध नव्हते. अनेक गोष्टी संशयास्पद होत्या. परंतु काही जणांना नेताजी गतप्राण झाले, हे सांगणं सोयीस्कर होतं, त्यामुळे ती बाजूच खरी आहे, असं रेटून सांगितलं गेलं. तुटक तुटक ठिकाणी नेताजी रशियात असल्याचे पुरावे लोकांना माहिती होते, कालांतराने भारतातही त्यांना काही जणांनी बघितलं होतं. पण ही गोष्ट कधीही "सरकारी सत्य" बनली नाही. का? हे जाणण्यासाठी अनुज धरचे काही पोडकास्टस ऐकावे लागतील. अनुज धर ह्यांचं कौतुक करावं तितकं कमी आहे! ज्या काळी हा विषय जवळ जवळ मागे पडलेला होता, तेव्हा 'एकला चोलो रे' हा मंत्र घेऊन ह्यांनी नेताजींच्या रहस्याच्या उत्खननाला स्वत:ला वाहून घेतलं. आज हे त्यांचं जीवन झालं आहे. २००४- ०५ च्या सुमारास 'Enigma of Netaji Subhas Bose' अशी हिंदुस्तान टाईम्सची लेखमालिका नेटवर वाचल्याचं आठवतं. ती त्यांनीच केलेली होती. हिंदुस्तान टाईम्समधली कव्हर स्टोरी म्हणून त्यांचा हा प्रवास सुरू झाला आणि पुढे पुढे तर हेच त्यांचं मिशन बनलं. कालांतराने इतर नेताजीप्रेमी व संशोधक असे चंद्रचुड घोष व इतर लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. सरकार दरबारी असंख्य अडथळ्यांमधून आणि विरोधाच्या अनेक स्तरांवर सतत संघर्ष करून त्यांनी वाट काढली. सरकारी लोकांकडून एक एक गोष्ट करून घेणं ही अशक्य बाब असते! हळु हळु काही सरकारी अधिकारी, नेताजीप्रेमी, माजी अधिकारी अशांच्या मदतीने काही तथ्य समोर आणली. पारदर्शकतेला मानणा-या विदेशांमधील माहितीचा छडा घेतला. कालांतराने आलेल्या माहितीचा अधिकारासारख्या शस्त्राचा व इंटरनेटवर होणा-या जागतिक संपर्काचा उपयोग करून घेतला. त्याच काळात म्हणजे १९९९ मध्ये नेताजींच्या रहस्यासाठी तिसरा आयोग- मुखर्जी आयोग स्थापन झाला होता. मुखर्जी आयोगाने खूप उत्तम काम केलं आणि १८ ऑगस्ट १९४५ रोजी तैपेई येथे अपघात झालाच नव्हता, हे सिद्ध केलं. नेताजींचं रशियातलं आणि भारतातलं वास्तव्य जवळ जवळ उघड होईल, अशा स्वरूपाचे इतर पुरावे समोर आणले. पण २००५ मधल्या केंद्र सरकारने ह्या आयोगाचा अहवालच फेटाळला. परंतु तरीही सत्य प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष प्रकारे समोर येतच आहे. अप्रत्यक्ष प्रकारे हे अनेकांना तुटक तुटक माहिती होतंच, पण आता अनेक धागे दोरे एकत्र येत आहेत. नवीन युगामध्ये नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने अनेक डॉटस जोडले जात आहेत. २०१६ मध्ये मोदी सरकारने नेताजींच्या अनेक फाईल्स डिक्लासिफाय केल्या. सरकारने मान्य केलेलं सत्य नसलं तरी आज अनेक गोष्टी उजेडात आलेल्या आहेत. देश म्हणून आपल्यामध्ये देशप्रेम आणि देशासाठी काम केलेल्यांसाठी प्रेम असेल तर इतर लपलेल्या गोष्टीही समोर येतील.
मांचुरियामार्गे रशिया!
ह्या सर्व संशोधनातून समोर आलेले धागे मांडतो. ज्यांना अधिक रस असेल त्यांनी अनुज धरचे पोडकास्टस वाचावेत आणि २० वर्षांच्या अभ्यासासह व शेकडो कागदपत्रांचा पुरावा देऊन त्याने लिहीलेलं 'India's biggest cover up' पुस्तक वाचावं. त्यातून समोर आलेले निष्कर्ष- धागे इथे मांडतोय. ह्या गोष्टींना अप्रत्यक्ष प्रकारे दुजोरा मिळालेला आहे, पुरावे मिळालेले आहेत. १८ ऑगस्ट १९४५ चा अपघात हा केवळ बनाव होता. ज्याप्रमाणे कोलकत्यावरून नेताजी जर्मनीला जाण्यासाठी निसटले होते व ते प्रत्यक्षात काबूलजवळ पोहचल्यानंतर ते घरात नसल्याची 'बातमी' सांगण्यात आली होती, त्याप्रमाणे १८ ऑगस्टच्या कथित अपघाताची बातमी टोकिओवरून २२ ऑगस्टला देण्यात आली होती व तेव्हा ते मांचुरियाजवळ पोहचले असावेत. पुढे मांचुरियामार्गे सोव्हिएट रशियात ते गेले. आल्फ्रेड वेग ह्या अमेरिकन पत्रकाराने १८ ऑगस्टनंतर त्यांना एकदा बघितल्याचं नेहरूंच्या पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. स्वातंत्र्यानंतर एक भारतीय इंजिनिअर एका ऑटोमोबाईल प्रोजेक्टसाठी सोव्हिएट रशियात गेला होता. त्या विशिष्ट प्रकल्पावर त्याचा प्रमुख एक जर्मन होता. तो जर्मन रशियामध्ये अनेक वर्षांपासून काम करत होता. त्याने त्या भारतीय इंजिनिअरला विश्वासात घेऊन सांगितलं की, तो नेताजींना भेटला होता. आणि १९४१ मध्ये त्याने जर्मनीमध्ये नेताजींना समोरून बघितलं होतं. व्यावसायिक व राजकीय नेत्यांच्या एका कँपवर तो असताना त्याने तिथे नेताजींना ओळखलं व जर्मनमधून संवादही साधला होता. त्यांना राजदुताचा दर्जा दिलेला होता. जेव्हा त्या इंजिनिअरने मॉस्कोच्या भारतीय राजदुताला ही बातमी सांगितली, तेव्हा त्या राजदुताने त्याला धमजीवजा सूचना केली की, तुझ्या कामाकडेच लक्ष दे. पुढे भारतात आल्यावर आणि निवृत्त झाल्यावर त्याने ही आठवण सांगितली व मुखर्जी आयोगापुढे तशी साक्षही दिली. तथाकथित तैपेई अपघातानंतर एक वर्षाने म्हणजे जुलै १९४६ मध्ये गांधीजींची सेक्रेटरी व दादाभाऊ नवरोजींची नात खुर्शीद नवरोजीने अमेरिकन पत्रकार लुई फिशरला लिहीलेल्या पत्रात म्हंटलं होतं की, जर रशियन सेनेच्या मदतीने नेताजी भारतात आले तर गांधी- नेहरू काही करू शकणार नाहीत. सगळा देश त्यांच्यासोबत जाईल.
मेरा भारत महान
एक प्रश्न इथे पडतो की, नेताजी रशियात होते तर भारतात का आले नाहीत? किंवा नंतरही आले तेव्हा लपून का राहिले? त्याचं एक कारण हे आहे की, भारतीय स्वातंत्र्याच्या करारात (Transfer of powers) मध्ये कदाचित एक गोपनीय अट ही होती की, जर नेताजी भारतात आले असते तर युद्ध गुन्हेगार म्हणून सरकारला त्यांना ब्रिटीशांच्या स्वाधीन करावं लागलं असतं. किंबहुना आतील धागे असंही सांगतात की, हे स्वातंत्र्य खरं स्वातंत्र्य नव्हतंच, Dominion status होता हा. आणि वस्तुत: अगदी १९५५ पर्यंत भारतीय सेनेचं नेतृत्व ब्रिटीशच करत होते. स्वत: नेहरूंनी १९५६ मध्ये ब्रिटनच्या दौ-यात राणीच्या एकनिष्ठेची प्रतिज्ञा घेतलीही होती. आणि ह्यासंदर्भात धक्कादायक पण कोणाला माहिती नसलेली वस्तुस्थिती ही आहे की, जालियांवाला बागेमध्ये गोळ्या झाडणारे जे पोलिस होते- ते भारतीय पोलिस होते- त्यांना स्वतंत्र भारतामध्ये सरकारी नोकर म्हणून पेंशन मिळत होती आणि आझाद हिंद सेनेमध्ये लढलेल्या सैनिकांना व अधिका-यांना स्वातंत्र्यसैनिकसुद्धा मानलं जात नव्हतं. त्याबरोबर स्वतंत्र भारतात असे अनेक कायदे होते जे कोणी स्वाभिमानी व देशप्रेमी मान्य करणार नाही. अस्पृश्यता ही कायद्याने समाप्त होण्यासाठी १९५५ वर्षं यावं लागलं. गुन्हेगार जमाती अधिनियमासारखा काळा कायदा १९५२ पर्यंत होता. तेव्हा हे स्वातंत्र्य खरोखर स्वातंत्र्य होतं का केवळ dominion status होतं, हाही मुद्दा समोर येतो. ब्रिटीश नेताजींना युद्ध गुन्हेगार मानत होतेच, पण एकाही भारतीय नेत्याने पारतंत्र्याच्या काळात केलेल्या अत्याचारांमुळे ब्रिटीशांना गुन्हेगार म्हंटलं नाही.
सरकारची भुमिका काहीही असो, नेताजींचे जवळचे सहकारी, त्यांचे दोन्ही भाऊ, पत्नी एमिली अशा जवळच्यांना जाणीव होती की, नेताजी रशियात आहेत. त्याचं आणखी एक कारण म्हणजे १९६८ पर्यंत नेताजींच्या कुटुंबावर सरकार पाळत ठेवून होतं. मृत व्यक्तीच्या कुटुंबावर पाळत ठेवण्याची काय गरज? त्यामुळे हे एक प्रकारे ज्यांना आतल्या गोष्टी माहिती आहेत, त्यांच्यासाठी उघड सत्य होतं. त्यामुळेच तर हे रहस्य सोडवण्यासाठी पहिला आयोग १९५६ च्या सुमारास व दुसरा आयोग १९७० साली स्थापन केला गेला. अनेकदा सरकारने प्रयत्न केला की, टोकिओच्या रेनकोजी मंदिरात नेताजींच्या तथाकथित अस्थी भारतात आणून हा विषयच संपवावा. पण नेताजींच्या कुटुंबियांच्या विरोधामुळे हे करता आलं नाही.
सरकारची भुमिका जास्त करून सत्य समोर येण्यापासून टाळण्याची होती. तत्कालीन तैवानसोबत भारताचे राजकीय संबंध नाहीत, म्हणून सरकारने पहिल्या दोन आयोगांना तैवानला जाऊ दिलं नाही. किंवा कदाचित प्रत्यक्ष तिथे गेल्यावर तिथे असलेल्या "पुराव्यांचा" फोलपणा उघड होण्याची भिती असेल. त्यावेळी नेताजी मात्र केवळ स्वत:च्या हिमतीच्या बळावर आणि त्यांना ओळखणा-या देश- विदेशातील जीवाभावाच्या सहका-यांच्या मदतीने मांचुरिया- चीन- रशिया अशा अज्ञात देशात झेप घेत होते. किती वेगवेगळे देश- प्रदेश! अफघनिस्तान- रशिया- इटाली- जर्मनी नंतर म्यानमार- थायलंड- इंडोनेशिया- सिंगापूर- जपान! हे काही त्यांच्या मित्रांचे देश नव्हते. इथेही उर्मट राज्यकर्ते आणि अधिकारी होतेच. पण त्या सर्वांना नेताजींनी आपल्या देशप्रेमाच्या शक्तीपुढे झुकवलं. उर्मट राज्यकर्त्यांनी त्यांनाही दाबण्याचा प्रयत्न केल, पण ते कुठे झुकले नाहीत आणि आपल्या उद्दिष्टावर ठाम राहिले. अगदी हिटरलरलाही त्यांनी आपल्या स्वाभिमानाची चुणूक दिली. भारतीय लोक म्हणजे शेळ्या- मेंढ्या आहेत असं मानणारा हिटलर वरमला. डोळ्याला डोळे भिडवून आणि प्रचंड आत्मविश्वासाने शेक हँड करून त्यांनी हिटलरची भेट घेतली. आणि विदेशी शक्तींची मदत ही एका स्वतंत्र देशाला केलेली मदत आहे जी स्वातंत्र्यानंतर हा देश कृतज्ञतेने परत करेल ही त्यांची भुमिका होती. पण तेव्हाचे भारतातले मुख्य नेते हिटलरला भेटणं म्हणजे नरकात बुडाल्यासारखी गोष्ट करत होते. "हिटलरने सैतानावर जरी स्वारी केली तरी माझा सैतानाला पाठिंबा आहे" असं म्हणणारा भारतद्वेष्टा चर्चिल त्यांना चालत होता. कृत्रिम दुष्काळामुळे ३० लाख बंगाली लोकांचा बळी घेणारा व भारताला गुलाम ठेवू इच्छिणारा चर्चिल त्यांना चालत होता.
Your dead man- गुमनामी बाबा!
रशियामध्ये काही काळ अज्ञातवासात राहून आणि देशामधील राज्यकर्ते आपल्याला अनुकूल होतील अशी वाट अनेक वर्षं बघून नेताजी गुमनामी बाबांच्या रूपात भारतात आले, असं आज म्हणता येऊ शकतं. अर्थात् ते रशियात असतानाही भारतीय जनतेच्या हिताच्या दृष्टीने कम्युनिस्ट देशांमध्ये प्रवास करायचे, अनेक नेत्यांसोबत संपर्क ठेवायचे, असेही तुटक धागे दिसतात. १९५५ नंतरच्या काळात उत्तर प्रदेशमध्ये नेपाळ सीमेपासून जवळ बस्ती, फैजाबाद व तशा इतर साध्या गावांमध्ये गुमनामी बाबांचं वास्तव्य होतं. पूर्णपणे पडद्याआड ते राहायचे, एकांतात असायचे, सतत चेहरा झाकून ठेवायचे आणि कोणालाही भेटायचे नाहीत. पण त्यांच्या साहित्यात मात्र इंग्लिश- बंगाली- जर्मन पुस्तकं, युद्ध, गुप्तहेर क्षेत्र, आंतरराष्ट्रीय घडामोडी ह्यावरची पुस्तकं होती. कालांतराने त्यांचा आझाद हिंद सेनेचे वरिष्ठ सेवक व नेताजींचे म्हणजे त्यांचेच जुने मित्र- सहकारी ह्यांच्यासोबत संपर्क झाला. आणि हळु हळु नेताजींच्या 'इनर सर्कलला' त्यांच्या आगमनाची जाणीव होते. त्यांचे लहानपणीचे मित्र, तरुणपणीचे सहकारी, कार्यकर्ते व आझाद हिंदचे लोक अशा अनेक मंडळींनी गुमनामी बाबा किंवा भगवनजी किंवा पर्देवाले बाबा ह्यांच्या भेटी घेतल्याचे व दीर्घ काळ त्यांचा संपर्क असल्याचे अनेक पुरावे उपलब्ध आहेत. गुमनामी बाबांनी लिहीलेली पत्र उपलब्ध आहेत. ह्या सगळ्या लोकांचं एकच विचारणं असायचं की, तुम्ही समोर का येत नाही? त्यावर ते म्हणायचे की, माझं समोर येणं देशहिताचं नाही. कदाचित देशांतर्गत सत्ता संघर्ष, अहिंसावाद्यांचा विरोध, अन्न- धान्य व मदतीसाठी भारताचं अनेक देशांवर अवलंबून असणं व देश ख-या अर्थाने स्वतंत्र नसणं अशी कारणं असतील. असो.
अनेकांना प्रश्न पडतो की, मग नेताजी अशा अज्ञातवासात व लपून राहताना करत काय होते? ह्याची दोन- तीन उत्तरं स्पष्ट मिळतात. एक तर ते साधना करत होते. श्री अरविंदही क्रांतिकारक होते, पण ते पुढे साधनेत गेले आणि ती साधनाही देशासाठी होती. नेताजी १७ व्या वर्षी ७ महिने हिमालयात निघूनही गेले होते. ती त्यांची एकांत साधना आता पुढे जात होती. त्याबरोबर ते कम्युनिस्ट फोल्डसह अनेक आशियातल्या नेत्यांच्या गुप्त संपर्कात होते आणि वेगवेगळे प्रश्न, व्हिएतनामसारखं युद्ध ह्याबद्दल त्यांना मदतही करत होते, असंही गुमनामी बाबांच्या पत्रातून व बोलण्यातून दिसतं. अगदी भारत- चीन युद्ध आणि बांग्लादेश मुक्तीसंग्राम ह्यामध्येही त्यांनी गुप्त प्रकारे मध्यस्थी/ हस्तक्षेप केलेला आहे, असं ते सांगतात. एका बाजूला हे अविश्वसनीय वाटेल. पण हा माणूस कसा होता, हे आपल्याला परत एकदा आठवायला पाहिजे. आयसीएस राजीनाम्यानंतर म्हणजे १९२१ पासून १९४१ पर्यंत ते भारतात सक्रिय होते (त्यातही काही वर्षं तब्येतीमुळे विदेशामध्ये सक्तीची विश्रांती घेत होते व राज्यकर्त्यांच्या भेटीही घेत होते), ह्या २० वर्षांच्या सक्रिय आयुष्यात तुरुंगवास, स्थानबद्धता, मंडालेचा विजनवास अशा गोष्टी धरल्या तर जेमतेम तीन- साडेतीन वर्षं ते मुक्त होते आणि तरीही इतका मोठा प्रभाव त्यांचा होता. संपूर्ण देशभर त्यांचे लोक होते. गांधीजींविरुद्ध निवडणूक लढून ती ते जिंकू शकले व अगदी मद्राससारख्या राज्यांमधून त्यांना समर्थक मिळाले होते. अशी त्यांची योग्यता असेल तर त्यांना पारख असलेले विदेशी राज्यकर्तेसुद्धा कधीच दूर करणार नाहीत. ब्रिटीशांच्या पोलादी पकडीमधून जो अगदी शिवाजी महाराजांच्या हुशारीने पसार झाला होता, ज्याच्याकडे गुप्त संपर्काचं इतकं प्रभूत्व होतं जो नाझींमधील हिटलरविरोधी गटही लगेच ओळखू शकला, त्याला कोणत्या सीमा अडवू शकतील? आणि मग तो माणूस गुप्त प्रकारे अनेक देशाच्या नेत्यांच्या संपर्कात असणं ह्यात आश्चर्य ते काय? आणि मग अशा माणसाला काम करण्यासाठी समोर येऊनच केलं पाहिजे अशीही गरज उरत नाही. असो. ह्याबद्दल असंख्य अप्रत्यक्ष पुरावे दिसतात, अनेक डॉटस दिसतात, जे आपण आपल्या बुद्धीने कनेक्ट करू शकतो. शास्त्रीजींच्या मृत्युचं गूढ, स्वतंत्र भारतातील अनेक राज्यकर्त्यांचा कार्यकाळ, अगदी इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, व्ही पी सिंह, नरसिंह राव, अटलजी, मनमोहन सिंह अशा पंतप्रधानांचे कार्यकाळ असे अनेक संदर्भ ह्यात येतात. प्रत्येक बिगर काँग्रेस सरकारने हे गूढ उलगडण्यासाठी केलेली मदत त्यात दिसते. आणि १९९५ च्या सरकारमधले विदेश मंत्री व नंतर राष्ट्रपती झालेले नेते एमिली शेंकलना टोक्योच्या अस्थी आणण्याच्या प्रस्तावावर सही करण्याची सक्ती करताना दिसतात (त्यांना त्या घराबाहेर जायला सांगतात). अशा अनेक गोष्टीचे पुरावे सरकारी कागदपत्रांत आहेत. आता डिक्लासिफाय केलेल्या कागदपत्रांत दिसतात. असो.
मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांच्या हस्ताक्षराची व डिएनएची चाचणी केली होती. एका तज्ज्ञाने हस्ताक्षर जुळतं हा निष्कर्ष दिला. सरकारी तज्ज्ञांनी नकारात्मक निष्कर्ष दिला. आणि नेताजींच्या कुटुंबियांसोबतच्या डिएनए चाचण्यांचे परिणाम नकारात्मक आले. पण सरकारी प्रयोगशाळा ह्या चाचण्यांचे खोटे अहवाल देत होत्या, हे आयोगाच्या कामकाजावेळी तिथे असलेल्या नेताजी प्रेमींना माहिती आहे. त्यामुळे मुखर्जी आयोगाने गुमनामी बाबांबद्दल हे नेताजीच होते, असं निर्विवाद प्रकारे म्हणता येत नाही, असा निष्कर्ष काढला. कारण पुरावे आहेत, पण ते कागदोपत्री सबळ ठरले नाहीत. कारण आपल्या देशाची उदासीनता, अनास्था आणि भ्रष्टाचार! पण खाजगीमध्ये बोलताना न्यायमूर्ती मुखर्जींनी गुमनामी बाबा हे तेच होते, असं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि योगायोगाने त्यांचं हे सांगणं एका कॅमेरामध्ये शूट झालं आहे व तो व्हिडिओ इंटरनेटवर आज उपलब्धही आहे. गूगल करू शकता. गुमनामी बाबा हे तेच हे त्यांनाही माहिती होतं, पण चाचण्यांमध्ये भ्रष्टाचार झाल्यामुळे आणि सरकारने असहकार केल्यामुळे ते तसं सिद्ध करू शकले नाहीत. पण अप्रत्यक्ष पुरावे आहेतच. अनेक बंगाली क्रांतीकारक आणि राजनेते लीला रॉय, समर गुहा, आझाद हिंद सेनेतील दिग्गज, तत्कालीन युपीचे मुख्यमंत्री संपूर्णानंद अशा अनेकांनी त्यांनाच नेताजी म्हणून दुजोरा दिला होता. फक्त वर दिलेल्या कारणांमुळे हे उघड सत्य होऊ शकलं नाही. असो.
आजच्या काळात नेताजी आणि त्यांचं सत्य आणि योगदान हे सगळं आठवण्याचे दोन उद्देश निश्चित आहेत. एक तर माझ्या बाबांचं पुढे काय झालं, हे जाणणं माझा अधिकार आहे. किंबहुना जो मुलगा- मुलगी असेल त्याला/ तिला त्याशिवाय चैन पडणार नाही. आणि त्याबरोबर हेही महत्त्वाचं आहे की, ही प्रेरणा, ही ऊर्जा आजच्या पिढीला व पुढच्या पिढीला मिळाली पाहिजे. असंही अविश्वसनीय व्यक्तिमत्व होतं, आपण त्यांच्या निदान १% होण्याचा प्रयत्न करावा, इतका विश्वास मिळाला पाहिजे. असंख्य अडथळे असले तरी त्यावर मात करण्याचा दुर्दम्य आत्मविश्वास आपल्यालाही मिळाला पाहिजे. आणि आपण आज जे स्वातंत्र्य- मर्यादितच पण तरीही स्वातंत्र्य उपभोगतोय, जे सुख अनुभवतोय, त्याची किंमत किती मोठी होती, ह्याची जाणीव आपल्याला व्हायला पाहिजे. ही जाणीव झाली, ही आठवण राहिली तर आपण निदान १% तरी त्यांना आत्मसात करू शकू. हे करण्याचे अनेक मार्ग असतील. आपल्या आपल्या क्षेत्रात हिंमतीने, स्वाभिमानाने आणि स्वयंप्रेरणेने काम करणं असेल. नवीन पिढीला पथनाट्य, निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा अशा माध्यमातून हे सांगणं असं असेल. आपल्या ठिकाणी सत्याचा शोध घेत राहणं असेल. आपण १% जरी हे करू शकलो तरी आपलं आयुष्य कृतार्थ ठरेल.
'नेताजी द फरगॉटन हिरो' चित्रपटात एकला चोलो रे गाण्यात एक ओळ आहे. जर आपण देश म्हणून आणि नेताजींचे वारस म्हणून त्यांना १% आत्मसात करू शकलो तर त्याच गाण्याची पुढची ओळही सार्थक ठरेल-
मज़िलें कभी क्या मिलेगी हमें
होगी क्या सहल कभी जो राह है कड़ी
आज हर जवाब हमको मिल जाएगा
आ गई है आज फैसले की घड़ी
(निरंजन वेलणकर 09422108376, niranjanwelankar@gmail.com)
लेख पटला नाही, हे प्रांजळपणे
लेख पटला नाही, हे प्रांजळपणे सांगतो.
वरती जपानच्या क्रौर्याबद्दल (आजकालचा हिंदीतून उचललेला शब्द क्रूरता) चर्चा चालू आहे. जपानने चीनमध्ये केलेले अनन्वित function at() { [native code] }याचार (ते अ आणि त एकत्र लिहायला गेलं की असं होतं - काहीतरी बघा बुवा. मी नाही दरवेळी दुरुस्त करणार.) माहीत होते. दगडापेक्षा वीट मऊ असा न्याय अनेकजण जपान-ब्रिटिश तुलनेत लावत आहेत. पण हे सुभाषबाबुंना माहीत नव्हतं का? की त्यांना ब्रितिश दगड आणि जपानी वीट वाटत होते?
हो मी अ स्पेस त असं लिहून
हो मी अ स्पेस त असं लिहून शब्द पूर्ण झाला की मागे येऊन स्पेस उडवतो.
<१८ ऑगस्ट १९४५ ला तैपेई येथे
<१८ ऑगस्ट १९४५ ला तैपेई येथे झालेला त्यांचा अपघात >
आज १८ ऑगस्ट. सुभाषबाबूंचा स्मृतिदिन. आदरांजली!
मोदी,फडणवीस ,शाह सारखे नेते
मोदी,फडणवीस ,शाह सारखे नेते आणि
रिपब्लिक भारत,आज तक ,गोदी न्यूज सारखी मीडिया तेव्हा असती तर भारताला स्वतंत्र कधीच मिळाले नसते.
हिंसाचार मध्ये देश जळत राहिला असता.
नशीब गांधी नेहरू सारखे नेते होते
हो मी अ स्पेस त असं लिहून
हो मी अ स्पेस त असं लिहून शब्द पूर्ण झाला की मागे येऊन स्पेस उडवतो. >> मी पण. पण आता वैताग आला आहे.
कोणत्याच स्वतंत्र युद्धातील
कोणत्याच स्वतंत्र युद्धातील नेत्यांविषयी खरे तर चर्चा च नको.
सर्वांचे हेतू साफ होते.
सर्वांनी सर्वोच्च बलिदान दिले आहे
पण जपान विट की दगड असे कोणी विचारले तर चर्चा होतेच
स्वतंत्र कसे मिळवायचे ह्याचा आराखडा तयार होता.हिंसाचार हा मार्ग वर्ज केला होता.
कारण भारतीय लोकांनी १,% हिंसाचार केला असता तर ब्रिटिश सरकार नी 100% हिंसाचार करून तो मोडून काढला असता.
ते देशाचे मालक होते.जगात त्यांची ताकत होती.
त्या मुळे तो मार्ग नाही.
धार्मिक,जातीय उन्माद वाढून न देणे ही दुसरी मोठी जबाबदारी होती.
तेव्हा असे उन्माद वाढले असते तर भारतीय विभागले गेले असते.
कसे ही असू पण ब्रिटिश प्रगत विचाराचे होते..
भारतात त्यांनी सुधारणा केल्या होत्या.
Railway, रस्ते,बंदरे,शहर वसवले होते.
कायद्याचे राज्य होते.
सती प्रथा पासून अनेक प्रथा त्यांनी बंद केल्या .
म्हणजे सामाजिक सुधारणा पण ते करत होते.
त्या मुळे च अनेक नेत्यांची मागणी होती पूर्ण समाज सुधारणा आणि नंतर स्वतंत्र.
काँग्रेस ची मागणी पाहिले स्वतंत्र नंतर आपण समाज सुधारणा करू.
पण हा निर्णय चुकीचा ठरला.
बोस ह्यांची विकिपीडिया बघितली.
त्या वर कॉमेंट करत नाही
पूर्ण समाज सुधारणा म्हणजे काय
पूर्ण समाज सुधारणा म्हणजे काय ?
सुधारणा अमुक एक केली की आता 100 % झाले असे असते का ?
काही ना काही बाकी काम उरणारच असते
नेहरूंनी काश्मीर प्रश्न सोडवायला हवा होता
पटेलांनी बेळगाव प्रश्न सोडवायला हवा होता
गांधींनी मुस्लिमांना 1 लग्नासाठी विनवायला हवे होते
आंबेडकरांनी आरक्षण प्रश्न सोडवायला हवा होता
मग वाजपेयी फक्त कविता करायला आणि मोदी फक्त गावभर फिरायला उपजणार होते का ?
कारण भारतीय लोकांनी १,%
कारण भारतीय लोकांनी १,% हिंसाचार केला असता तर ब्रिटिश सरकार नी 100% हिंसाचार करून तो मोडून काढला असता.>>>
केला असता नाही केलाच आहे
1857 चे बँड मोडतांना जनरल नील आणि बाकी ब्रिटिश अधिकाऱ्यांनी जे नृशंस कृत्य केलं आहे ते वाचतानाही शहारे येतात
गावे च्या गावे जाळून टाकणे, त्या आगीतून बाहेर पडणाऱ्या लहान मुले बायका वृद्धांना भोसकून मारणे आणि परत आगीत टाकणे, झाडांवर पाने कमी आणि मृतदेह जास्त लटकवलेली, पुजार्यांना रक्ताने माखलेली फारशी चाटायला लावणे
Atrocities मध्ये ब्रिटिश मुळीच कमी नव्हते
स्पॅनिश पोर्तुगीज हेही त्याच माळेचे मणी
नशिबाने पोर्तुगीज जास्त जागा व्यापून नव्हते पण गोव्यात त्यांनी हैदोस घातला होताच
१)नेताजी सुभाषचंद्र बोस,
१)नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडीत जवाहरलाल नेहरू आणि महात्मा गांधी या तिनी नेत्यांमध्ये एकमेकांविषयी कमालीचा आदरसन्मान होता. राजकीय दिशा वेगवेगळ्या असल्या तरीही.सुभाषचंद्र बोस यांनीच महात्मा गांधीना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले
२)जर्मनीमध्ये नाझींकडून बोस यांच्या राहण्याची अत्यत दिमाखदर अशी व्यवस्था केली गेली होती. अलिशान बंगला, दिमतीला नाझींचा बट्लर, चेफ आणि ड्रायवर.
३)जर्मनीने एकूण तीन हजार भारतीय युद्धकैद्यांना बोस यांच्या नेतृत्वाखाली फ्री इंडिया लीजनसाठी साइन अप केले. “मी देवाची शपथ घेतो की, भारतासाठीच्या सशस्त्र लढ्यात ज्याचे नेते सुभाषचंद्र बोस आहेत, मी जर्मन वंश व राज्याचा नेता आणि जर्मनचा सेनापती अॅडॉल्फ हिटलरच्या आदेशांचे मी पालन करीन." अशी शपथ त्यांना दिली गेली होती. यामध्ये हिटलर च्या माध्यमातून भारतात हुकुमशाही आणणे हा त्यांचा उद्देश स्पष्टच' दिसतो.
४)दरम्यानच्या काळात जर्मनीमध्ये हाताखाली स्टेनो म्हणून काम पाहणाऱ्या एमिली शेंकल या जर्मन तरुणीसोबत बोस यांचे प्रेमप्रकरण सुरु झाले. ती दोघे लग्नाशिवायच एकत्र राहत. तत्कालीन जर्मनीमध्ये त्यांना तसे एकत्र राहताना पाहून भुवया उंचावल्या जात. बोभाटा होईल व कायदेशीर अडचणी येतील म्हणून त्यांनी पुढे छुप्या पद्धतीने लग्न केले. पण सुभाषबाबूंनी जवळच्या नातलगांनासुद्धा याची भणग लागू दिली नव्हती. त्यामुळे बोस यांच्या अपघाती मृत्युनंतर त्यांच्या भारतातील नातलगांनी एमिली शेंकलना स्वीकारले नाही. एमिली यांना त्यासाठी प्रचंड झगडावे लागले होते.
५)१९४२ मध्ये एक दिवस अचानकपणे पत्नी आणि छोट्या मुलीला सोडून सुभाषबाबू जर्मन पाणबुडीतून जपानला गेले. जर्मन सैन्याची रशियन सीमेवर होणारी पीछेहाट पाहून त्यांना जर्मनी कडून फार आशा राहिल्या नव्हत्या, म्हणून ते तीन हजार सैनिकांना वाऱ्यावर सोडून जपानला गेले कि हिटलरनेच त्यांना जपानची मदत घ्यायला सांगून तिकडे पाठवले याबाबत मतांतरे आहेत. जपानचे नागरिकत्व असलेल्या राशबिहारी बोस यांनीच त्यांना जपानला बोलवून घेतले असेही उल्लेख आहेत. ते काहीहि असले तरी आता जर्मनी ऐवजी जपानच त्यांना मदत करणार होता.
६)इंग्रजांचा पराभव करून जर्मनी अथवा जपानद्वारे आणली गेलेली हुकुमशाही भारतातातील तमाम बहुजनांच्या दृष्टीने भयावह ठरली असती. पाकिस्तान, बांगलादेश, नॉर्थ कोरिया, कंबोडिया... महासत्तांच्या आधाराने अस्तित्वात आलेल्या भीषण हुकुमशाहीची हि उदाहरणे आहेत जिथे निरपराध नागरिकांच्या कत्तली झाल्या.
७)"सुभाष सच्चा देशभक्त होता पण तो चुकीच्या वाटेला गेला होता".......... महात्मा गांधीनी मोजक्या शब्दात त्यांना श्रद्धांजली वाहिली होती ती खूप काही सांगून जाते.
अनुज धर वै लोक कुणासाठी काम करतात सगळ्यांना माहिती आहे
आत्याबाईला मिशा असत्या तर....
आत्याबाईला मिशा असत्या तर....
नेताजी सुभाष बाबू अपघातात मृत्यू पावले नसते तर...
ते स्वतंत्र भारताचे पंतप्रधान अथवा गृहमंत्री झाले असते तर..
त्यांची पत्नी, जी धर्माने एक कॅथलिक आणि एका पादत्राणकाराची नात होती आणि अभ्यासात मागे पडत असल्याकारणाने चार वर्षे जिला ननरीमध्ये ठेवले गेले होते, ती भारताची प्रथम अथवा द्वितीय मानाची महिला बनली असती तर...
फॉरवर्ड ब्लॉक हा प्रथम क्रमांकाचा पक्ष बनला असता तर...
पुढे पंच्याहत्तर वर्षांनी पत्नीचे आणि सुभाष बाबूंचे पुनर्मूल्यांकन झाले असते तर...
त्यांचा आणि पत्नीचा प्रथम नागरिक हा मान हिरावला गेला असता तर....
त्यांच्यावर भयानक चिखलफेक केली गेली असती तर....
त्यांचे फेक आणि morphed फोटो आणि व्हिडिओ प्रसारित करण्यात आले असते तर...
देशद्रोही कम्युनिस्ट मुक्त भारत असे ऐलान केलेले असते तर..
इतिहासातून त्यांचे नाव पुसून टाकले गेले असते तर....
वगैरे.
देशाची आज ची स्थिती खूप
देशाची आज ची स्थिती खूप केविलवाणी आहे.
संस्कृती,वृत्ती,,कृती ,वागणूक, सामाजिक जीवनात त्यांचे वर्तन .
खूप मागास आहे.
शिस्त तर नावाला पण नाही.
उज्ज्वल इतिहास किंवा इतिहासातील प्रसंग ह्या वर चर्चा करणे व्यर्थ आहे
हिरा, समर्पक पोस्ट
हिरा, समर्पक पोस्ट
दिल्लीकडचे, दिल्लीचे लोकं
दिल्लीकडचे, दिल्लीचे लोकं फ्रॉड असतातच. ठगवाली दिल्ली, दिल्ली के ठग म्हणतात ते उगीच नाही.
अनुज धर दिल्लीचा आहे हा केवळ योगायोग आहे.
Pages