सूर्योदय

Submitted by केशवकूल on 1 August, 2022 - 01:44

सूर्योदय

उत्परिवर्तनशील करोना व्हायरसचा हल्ला नुकताच परतवण्यात आला होता आणि त्यांना त्यांच्या निवासस्थानी म्हणजे “ सी/२०१९क्यू४ ” धुमकेतू वर जाण्यास भाग पाडले गेले होते. खंडणीची त्यांची मागणी नाकारली गेली. सैतानाने त्यांना पृथ्वीवर हल्ला करण्यासाठी उचकवले होते. माणसे हा नेत्रदीपक पराक्रम अर्थातच क्लिंगनच्या सक्रिय मदतीने साध्य करू शकले. नाहीतर मागच्या वेळी म्हणजे २०२० साली लाखो लोकांचा बळी देऊन आणि १० टन सोन्याची खंडणी घेऊन त्यांची बोळवण करावी लागली होती. निदान ह्यावेळी आम्ही सैतानावर मात करण्यात यशस्वी झालो होतो.

सैतान आणि आम्ही ह्यांच्यातला संघर्ष हा अनादी अनंत काळापासून चालत आला आहे. सैतानाच्या कारवायांना मात देण्यासाठी आमच्या श्रेष्ठींनी आमचे हे खाते निर्माण केले. सैतानाला पण तुम्ही काही कमी समजू नका. त्याने जगातल्या हुशार, प्रतिभाशाली अश्या साफ्टवेअर इंजिनिअर्सना पैशाचे प्रलोभन दाखवून आपलेसे करून घेतले होते. अश्या लोकांच्या मदतीने सैतानाच्या कारवायांना उधाण आले होते. त्यामुळे आमची बाजू थोडी लंगडी पडली होती. सगळ्यांत चिंताजनक म्हणजे सैतानाला मदत करणाऱ्या ह्या लोकांना, आपण सैतानाचे पाइक आहोत ह्याची काडीमात्र जाणीव नव्हती. ते एकदुसाऱ्यांची पाठ थोपटण्यात मश्गुल होते. हां, आमच्यासाठी देखील काही निस्वार्थी लोक काम करत होते, नाही असे नाही.

गंमत म्हणजे काही वेळा अश्या काही गोष्टींचा उदय होत असे की त्या सैतानाने निर्माण केल्या की डार्विनच्या सिद्धांतानुसार उत्क्रांतीचा एक भाग होता हे ठरवणे अत्यंत कठीण पडत असे. उदाहरण द्यायचे झाले तर ‘ क्रिकेट ‘ किवा ‘ सास भी कभी बहू थी ’ ह्या ट्रोपचे देता येईल. ह्याचे काय करायचे ह्यासाठी आमच्या खात्याच्या कितीतरी बैठका झाल्या. निर्णय अजून झालेला नाही, हे सैतानाचे कृत्य आहे की नाही ह्यावर एकमत नाही. काही श्रेष्ठींचे असे मत पडले की आपण क्रिकेट हा खेळ फार पूर्वीपासून खेळत आहोत. तसेच ‘ सास भी कभी बहू थी ’ हे महाभारताचे एक रूप आहे इत्यादी इत्यादी. प्रश्न अजून रेंगाळत पडला आहे. आम्ही, सैतान आणि डार्विन हे असे एकमेकांत गुंतलेले धागे आहेत.

तेव्हा मी राजकारण ह्या विभागांत काम करत होतो. अमेरिका आणि चीन ह्यांच्यातला ताणतणाव कमी करणे हे माझ्या कामाचे मुख्य स्वरूप होते. सैतानाच्या लोकांनी एका अमेरिकन पाणबुडीचा ऑटो कंट्रोलर हॅक करून तिला चीनच्या सागरी हद्दीत वळवली. पाणबुडीच्या कमांडरला पत्ताच नाही. त्याची कल्पना होती की आपण चीनच्या सागर सरहद्दीच्या सीमेवर रेंगाळत आहोत. चीनी हे सर्व नाटक दुरून पहात होते. गोष्टी अगदी हातघाईवर आल्या तेव्हा मला मध्ये पडावे लागले. अमेरिकन पाणबुडीच्या कप्तानाला त्याची चूक लक्षांत आली तेव्हा तो माफी मागून मोकळा झाला व प्रकरण थोडक्यांत मिटले. स्वतःची प्रौढी मारू नये हे खरे आहेच तरीपण वरिष्ठांनी ह्याचे श्रेय माझ्या खात्यांत टाकले हे मला आवर्जून सांगावेसे वाटते. तसे प्रशस्तीपत्र ( आणि एक खास इन्क्रिमेंट ) मला मिळाले आहे.

माझ्या एका सहकाऱ्याची देवदूत ग्रेड-१ ह्या पदावर बढती मिळावी अशी इच्छा होती. पण त्याआघी त्याने स्वतःची योग्यता सिद्ध करावी अशी आमच्या वरिष्ठांची इच्छा होती. तशी संधी त्यांना लवकरच मिळाली. त्याला ऑन साईट म्हणजे पृथ्वीवर पाठवले गेले. ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा माणसे यांत्रिक मानवासारखी झाली होती आणि यांत्रिक मानव माणसासारखे होण्यासाठी धडपडत होते. ही सगळी सैतानाची ‘ कृपा. ’ तेथे जाऊन लोकांना सुधारून पुन्हा माणूस बनवणे असा त्याचा टास्क होता.

सकाळचे साडेसहा वाजले होते. भाऊच्या विश्वासू मोबाईलने अलार्म दिला होता. मोबाईल कधी वेळ चुकवत नाही. आणि चुकवेल कसा? दिवसांतून आठ वेळा तो आपली वेळ अचूक वेळ देण्याऱ्या उपग्रहाशी जुळवून घेत होता. त्याचे अलार्मचे संगीत इतके कर्णमधुर होते की त्याला ते ऐकत रहावसे वाटत असे.

नाही. आजच्या दिवस. फक्त आजच्या दिवस. नाही नाही. आज नाही. कधीच नाही. चल उठ. आज सोमवार आहे. शनिवार रविवार केला न आराम? त्याने निश्चय करून रजई बाजूला केली. सहा वाजून बत्तीस मिनिटे झाली होती.

विजेची किटली चालू कर. पाणी उकळले की साखर टाक. टाकली. बायकोची काळजी करू नकोस. नाही करत. मला माहीत आहे.तिचे वेळापत्रक निराळे आहे. तिचे ऑफिस इथेच जवळ आहे.त्यामुळे तिला जवळपास तीस मिनिटांचा फायदा मिळतो. भाऊ स्वतःशीच बोलत होता.

हा जो आपल्या कथेचा नायक आहे त्याचे नांव मी इथे सांगत नाही. तो निनांवी आहे असे नाही. त्याला नाव आहे आणि सरकारच्या डेटाबेस मध्ये त्या नावाची जोडणी त्याच्या क्रमांकाशी केलेली आहे. सरकारच्या लेखी क्रमांक महत्वाचा, नाव नाही, त्या देशातले सर्व लोक एकमेकांना भाऊ म्हणून संबोधतात.आपणही त्याला भाऊ म्हणूया. भाऊ, भाऊचे बाबा, आणि भाऊची बायको. असे हे एक छोटे कटुंब होते. हे कुटुंब वाढवायची भाऊची इच्छा होती. त्यासाठी त्या देशाच्या नियमाप्रमाणे त्याने परमिट घेणे जरुरी होते. त्यासाठी भाऊने सरकारदरबारी अर्ज ही केला होता. त्यावर “यथायोग्य कारवाई चालू आहे” असे उत्तर त्याला आले होते.

थोड्याच वेळांत इथे “भाऊ”गर्दी होणार आहे. जेव्हा केव्हा गोंधळ होईल असे वाटेल तेव्हा आपण ह्या आपल्या भाऊला “ भाऊ क्रमांक १” असे संबोधूया.

पण असल्या फालतू गोष्टींत घालवायला भाऊला वेळ नव्हता. चहा तयार झाला होता. चहा पिण्यासाठी तो सात मिनिटांपेक्षा जास्त वेळ देउ शकणार नव्हता. सात वाजेपर्यंत भाऊ बाथरूममध्ये असायला पाहिजे. बाथरूममध्ये पंधरा मिनिटे! सव्वा सातला कपडे चढवायला सुरवात. असे झाले तर सात अडतीसच्या सुपरफास्टसाठी तो वेळेवर प्लॅटफॉर्मवर हजर राहू शकणार होता. हे सर्व व्यवस्थित जमले तर त्याला पाच मिनिटांचा स्लॅक मिळाला असता.

भाऊचे रोजचे रुटिन हे असे होते. आपण हे असे घड्याळ्याप्रमाणे वागतो ह्याचा त्याला अभिमान होता. देशाच्या महान नेत्याने त्याला हे वळण लावले होते. तो बूटाची लेस बांधत होता इतक्यांत त्याचे बाबा त्याच्या समोर येऊन उभे राहिले. आता हे काहीतरी विषय काढणार आणि आपल्याला उशीर होणार ह्या कल्पनेने त्याच्या कपाळावर सूक्ष्म आठी पडली.

“ काय आहे ते पटकन बोला,” तो थोडा तुटकपणे बोलला. त्याला स्वतःला स्वतःचीच लाज वाटली. आपण अश्या टोनने बोलायला नको होते.

“ आज मला डॉक्टरकडे जायला पाहिजे. रुटिन चेक-अप साठी.” बाबा सुद्धा आताश्या त्याच्याशी कमीतकमी शब्दात बोलण्याचा प्रयत्न करतात.

भाऊला स्वतःची चूक उमगली. तो बाबांचे रुटिन चेक-अप विसरून गेला होता. नेहमी तो रुटिन चेक-अपच्या आदल्या रात्री बाबांच्या खोलीत चुपचाप त्यांना सहजपणे मिळतील अश्या ठिकाणी पैसे काढून ठेऊन देत असे. उगाच बाबांवर पैसे मागण्याची वेळ नको यायला.

तो पडलेल्या आवाजांत म्हाणाला, “ सॉरी.मी पूर्ण विसरूनच गेलो होतो.” पाकिटातून पैसे काढून त्याने टेबलावर ठेवले.

भाऊ स्टेशनवर पोहोचला तेव्हा सुपरफास्ट यायला तीन मिनिटे बाकी होती. वर्तमानपत्र विकत घेण्या इतका वेळ होता. ह्या गाडीत गर्दी जरा कमी असते. प्रवासाच्या थोड्या वेळांत देशाच्या महान नेत्याच्या वचनांचे वाचन करायला थोडी फुरसद मिळण्याची शक्यता होती. महान नेत्याच्या शिकवणीवर जर तो चांगला प्रतिसाद देउ शकला तर त्याच्या खात्यात त्याच्या नावावर शंभर गुण जमा होण्याची शक्यता होती. काल रात्री त्याने महान नेत्याच्या भाषणानंतर आपली प्रतिक्रिया अपलोड केली होती. त्याचे लगेच उत्तर आले होते. उत्तेजनार्थ त्याला महान नेत्याकडून त्याचे कौतुक करणारा संदेश आला होता. शिवाय दोनशे गुणही त्याच्या खात्यांत जमा झाले होते, त्याने आपले खाते अॅक्सेस करून बघितले तर एकूण गुणसंख्या अकरा हजार चारशे चार झाली होती. त्याच्या बायकोने बडा बझार मध्ये एक ड्रेस बघून ठेवला होता. ह्या गुणसंख्येवर आता त्याला बायकोसाठी तो ड्रेस खरेदी -------------

स्टेशन आले तसे त्याच्या विचारांची मालिका खंडित झाली.स्टेशनपासून ऑफिसमध्ये जायला त्याला अकरा मिनिटे लागली. लिफ्टच्या रांगेत तीन मिनिटे गेली. लिफ्टच्या प्रवासांत दोन मिनिटे लागली. लिफ्टने आज नेहमीपेक्षा सतरा सेकंद जास्त घेतले. अखेर तो जेव्हा ऑफिसमध्ये आपल्या खुर्चीवर बसला तेव्हा आठ पंचावन्न झाले होते. त्याने आपला संगणक चालू केला तेव्हा बरोबर नऊ वाजले होते.

एका जुनाट पडक्या इमारतीच्या एका मजल्यावर ते ऑफिस होते. आपल्या भाऊचे ऑफिस नव्हते हे. भाऊचे ऑफिस एकदम चकाचक होते. राष्ट्राच्या प्रगतीचे प्रतीक असणाऱ्या त्या ऑफिसमध्ये नेहमी मित्रराष्ट्राच्या प्रतिनिधींची येजा असे. हे जे मी म्हणतो आहे ते ऑफिस अगदी निराळे होते. मला स्वतःला त्या ऑफिसमध्ये जाण्याचा एकदोनदा प्रसंग आला होता. कुबट वास, पोपडे आलेल्या भिंती, साध्या फरश्या बसवलेली जमीन. खुद्द ऑफिसच्या आतल्या भागात मी जाऊ शकलो नाही. मला वाटते की बाहेर मुद्दामहून हा देखावा उभा करण्यात आला होता. ग्राउंड फ्लोअरला एक हलवाईचे दुकान होते. तेथे सामोसा तळायचे काम चालले होते. त्याच्या बाजूला दोन खुर्च्या असलेले केशकर्तनालय होते. आणि इतकी दुकाने (आणि लोक) एका जागी असल्यावर साहजिकच कटिंग चहाचा ठेला असायला पाहिजेच! होताही.

अश्या त्या बिल्डींगच्या तिसऱ्या (कदाचित दुसऱ्या, किंवा चौथ्या माळ्यावरही असेल) एका प्रशस्त हॉलमध्ये बरेच भाऊलोक टेबलांवरच्या संगणकांच्या पडद्यांवर सतत नजर ठेऊन काम करत होते. वातावरण अगदी शांत होते. मधेच एखादा भाऊ हलक्या आवाजांत बोलून शांततेचा भंग करत होता. पूर्ण हॉल वातानुकूलित होता. मध्यवर्ती जी केबिन होती ती मोठ्या भाऊसाहेबांची होती. बाहेर बसलेल्या अनेक भाऊंमधून एक भाऊ उठला आणि मोठ्या भाऊसाहेबांच्या केबिनमध्ये गेला.

“भाऊसाहेब, मला काही महत्वाचे बोलायचे आहे.”
“बोल, पण त्याआधी दरवाजा बंद करून घे. हा, आता सांग काय आहे?”

“माझ्या कंट्रोलखाली असलेल्या शहरांत मला असा एक विचित्र, गूढ माणूस दिसला आहे. तो काही दिवसापासून माझ्या निरीक्षणाखाली आहे. हा माणूस मला थोडा जोखमीचा वाटतो.”

भाऊसाहेबांना आश्चर्य वाटले. “आपल्याकडे जी धोकादायक व्यक्तींची यादी आहे,त्यात ह्या इसमाचे

नाव नाही?”

छोट्या भाऊने खाकरून घसा साफ केला. भाऊसाहेबांना हा इशारा समजला. आता हा जे काही सांगणार आहे ते खूप महत्वाचे आहे ह्याची ती पूर्वसूचना होती. त्यांच्या शरीरातून भीतीची एक लहर निघाली. “एक मिनिट, एक मिनिट थांब, आधी मला सांग ह्यांत आपल्या खात्यावर काही किटाळ येण्यासारखे आहे का काही?”

“ह्यात आपल्या डिपार्टमेंटचा काही संबंध नाही,” भाऊसाहेबांनी खिशातून रुमाल काढून कपाळावरचा घाम पुसला. त्यांना नेहमी तो थंड हवेच्या प्रदेशातील खुला तुरुंग नजरेसमोर आला की घाम फुटत असे. त्यांच्या आधीच्या ह्या डिपार्टमेंटच्या मुख्य अधिकाऱ्याला, त्याच्या हातून काही चूक झाल्यामुळे तेथे “हवा खाण्यासाठी” पाठवून देण्यात आले होते. छोट्या भाऊच्या वाक्याने त्यांना धीर आला. उसने अवसान आणून ते जोराने बोलले, “ तू काही घाबरू नकोस. सर्व काही सविस्तर सांग.”

काहीही न बोलता भाऊने साहेबाच्या हातातले माउस घेऊन त्यांच्या संगणकावर एक दृश्य साकार केले.

मुख्य स्टेशनापासून ऑफिस कडे जाण्याऱ्या रस्त्याचे दृश्य तिथे साकार झाले. त्याच रस्त्यावर आंबाबर्फीचे ते सुप्रसिद्ध दुकान होते. दुकानांत आंबाबर्फी घेणाऱ्यांची गर्दी होती. ह्या दुकानांत काय समस्या असणार? साहेबांच्या डोक्यांत काय विचार चालले असेल ह्याची भाऊला कल्पना होती. त्याने दूरवरून कॅमेऱ्याची नजर पादचारी मार्गाच्या बाजूला वळवली. “मी म्हणतो आहे तो हा माणूस.”
मोठ्या भाऊची नजर त्या माणसाकडे वळली. पस्तीस एक वर्षांचा एक तरुण रस्त्याच्या बाजूला फोल्डिंग स्टुलावर बसला होता. तश्याच एका स्टुलावर त्याच्याकडे तोंड करून दुसरा माणूस बसला होता. रस्त्याच्या कडेला बसलेला समोर बसलेल्याचे पेन्सिल स्केच बनवत होता.

मोठ्या भाऊसाहेबांच्या मनावरचे दडपण कमी झाले होते.

“अरे हा तर कलाकार आहे, तो कल्लाकार थोडाच आहे? हा काय कल्ला करणार? अरे तू मला किती घाबरवलेस.”

छोट्या भाऊच्या डोक्यात हा ‘ कल्ला ‘ काही घुसला नाही. त्याकडे दुर्लक्ष करून तो भाऊसाहेबांना म्हणाला, “ महान नेत्याची शिकवणूक आपण विसरताकामा नये. त्यांनी आपल्याला सांगितले आहे की “कलाकार, कवी, अभिनेते, संगीतकार, साहित्यिक, खेळाडू, जोकर, आणि अर्थशास्त्री इत्यादी रिकामटेकडे लोक हे देशाचे नंबर एकचे शत्रू आहेत.”

आपल्या हाताखालच्या भाऊने आपली चूक काढली ह्याचे मोठ्या भाऊसाहेबाला वैषम्य वाटले.आपले संभाषण जर कोणी मॉनीटर करत असेल तर त्याला नीट ऐकू जावे ह्या हेतूने त्यांनी स्वच्छ आणि मोठ्या आवाजांत घोषणा केली,” महान नेत्याचा जयजयकार! महान नेत्याला उदंड आयुष्य लाभो! ” छोटा भाऊ त्यांत सामील झाला. “भाऊ तू मला अजून ह्या माणसाचे नाव सुद्धा सांगितलेले नाहीस. कोण आहे हा? काय करतो? रहातो कुठे? ह्याला कोणी नातेवाईक नाहीत?” मोठ्या भाऊसाहेबांनी प्रश्नांची सरबत्ती करत विचारले, “आपल्या जवळ ह्याचे प्रोफाइलींग नाही झाले?”

छोट्या भाऊने निराशेने मान हरवली. “साहेब हा माणूस फेसबुकवर नाही,. ह्याचा चिवचिवाट कुठे ऐकू येत नाही. त्याचा इ-मेल अकौंट नाही. हा मोबाईल सुद्धा वापरत नाही, मग ह्याची प्रोफाईल बनणार तरी कशी?”

प्रश्न वाटतो तितका सोपा नाही. पण असा माणूस जगांत जिवंत कसा राहू शकेल? हा तर म्युझीयममध्ये ठेवण्याचा नमुना दिसतो आहे. विसाव्या शतकात असे बरेच लोक होते.पण आता ह्या युगात? असे तर नाही ना की विसाव्या शतकातून हा टाइम ट्रॅवल करून इकडे आला? भाऊसाहेब विचारांत पडले होते.

“भाऊ, तू आता त्या पोलीस मुख्य अधिकाऱ्याला संदेश दे. ह्या कलाकाराची माहिती काढून मला सुपूर्द करायला सांग. मेसेजवर “अति तात्काल” असे लिही.”

छोटा भाऊ आपल्या जागेवर परतला. त्याच्या संगणकावर आता महान नेत्याचे चित्र -- स्क्रीन सेवर-- दिसत होते. इकडे तिकडे बघून, आपल्याला कोणी बघत नाही ह्याची त्याने खात्री करून घेतली. मग महान नेत्याच्या चित्राकडे बघून त्याने एक गलिच्छ शिवी हसडली आणि उत्साहाने कामाला सुरुवात केली.

पोलीस चीफने आपला माणूस कामाला लावला. दिवसभर तो कलाकारावर नजर ठेऊन बसला. त्या कलाकाराने आपली काही चित्रे विक्रीसाठी मांडुन ठेवली होती. बसल्या बसल्या तो लोकांची व्यक्तिचित्रे बनवत होता फक्त १०० टिकल्यामध्ये! लोक गम्मत म्हणून स्वतःची स्केचेस बनवून घेत होते. स्वतःची चित्रे बघून काहींना खूप हसू येत होते तर काहीजण निराश होत होते. काही लोकांनी रागावून स्वतची चित्रे फाडून टाकली. माणसे तासन तास आरश्यासमोर उभे राहून वेळ वाया घालवतात, स्वतःचे स्वतः फोटो घेतात पण त्यावेळी त्यांना त्याचे काही विशेष वाटत नाही. पण चित्रकाराने काढलेले स्वतःचे चित्र पाहून मात्र त्यांच्या भावनांचा उद्रेक होत होता. ती चित्रे जणू तिसऱ्या व्यक्तीने त्यांच्या अंतरंगाचे केलेलं विश्लेषण होते. आणि हा अनुभव घ्या फक्त शंबर टिकल्यांमध्ये ! जिथे चमचाभर कटिंग चहासाठी पन्नास टिकल्या मोजाव्या लागत होत्या किंवा सिगारेटच्या काही खतरनाक झुरक्यांसाठी दीडशे टिकल्यानी पाकीट हलके करावे लागत होते तेथे शंभर टिकल्यात ही मजा काही वाईट नव्हती. त्या कलाकाराचा धंदा चांगला चालला होता. त्या पोलिसांच्या एजंटला क्षणभर वाटले की आपण पण त्याच्या समोर बसावे, चित्र काढून घ्यावे. तो चित्र काढत असताना त्याला गप्पांत रंगवून त्याची माहिती काढावी. पण स्वतःचा असा ठसठशीत पुरावा कुठे सोडून द्यावा हे त्याला प्रशस्त वाटले नाही. ट्रेनिंग मध्ये शिकवलेल्या सिद्धांतांच्या विरुद्ध आचरण करायला त्याचे मन धजावले नाही. मोठ्या चिकाटीने तो संध्याकाळ होईपर्यंत एजेंट तिथेच भिरभिरत होता. संध्याकाळी ऑफिस बंद व्हायची वेळ झाली. थकले भागले ऑफिस वर्कर घरी जायच्या घाईत होते. कलाकार भाऊने आपल्या चित्रांची हळुवारपणे आवराआवर केली. दोनी घडीची स्टुले बंद करून बॅकपॅकमध्ये टाकली. बाकी सामान एका पिशवीत टाकून ती खांद्यावर घेतली. रमत गमत निष्काळजीपणे त्याने चालायला सुरवातकेली. आजचा दिवस संपला होता. उद्या नवा दिवस नवीन सुरवात! त्याची काळजी आत्ता कशाला.

कलाकाराचा दिवस संपला असेल कदाचित. पण पोलिसाचा दिवस नुकताच सुरु झाला होता. त्याने कलाकाराचा पाठ पुरावा करायला सुरुवात केली. कलाकार जाता जाता चहाच्या ठेल्यापाशी थांबला. बाजूला बाकडी टाकली होती. त्यातल्या एका बाकड्यावर त्याने बसकण मारली. चहा बरोबर त्याने दोनचार खारी ऑर्डर केली. पोलिसांचा माणूस त्याची नजर चुकवून आजूबाजूला घोटाळत होता. एकदम त्या दोघांची नजरानजर झाली. एजेंट थोडा दचकला. ह्याने आपल्याला ओळखले तर नसेल. ओळखले असले तरी त्याने तसे चेहेऱ्यावर दाखवले नाही. तो आपला शांतपणे चहा पीत होता. हिशेब चुकता करून तो पुढे चालायला लागला. बघता बघता तो शहराच्या टोकापर्यंत आला होता. येथून पुढे माणसांची वस्ती कमी कमी होत होती. समोर जंगल, डोंगर दिसत होते. कलाकाराने मुख्य रस्ता सोडून डोंगराकडे जाणारी पायवाट पकडली. आतामात्र पोलिसाचा स्वतःवरचा विश्वास ढळायला लागला. आपण मूर्ख आहोत ह्याची त्याला प्रथमच जाणीव झाली. कुठल्यातरी मायाजाल मध्ये फसत आहोत हे त्याला समजून चुकले. अशी ड्युटी आपल्यावर लादणाऱ्या वरिष्ठाचा त्याला भयानक राग आला. असा विचार करत असताना त्याने समोर बघितले. कलाकार नाहीसा झाला होता.त्याला हा सर्व भुताटकीचा प्रकार वाटला, एव्हाना चंद्रोदय झाला होता. वातावरण गूढ रम्य झाले होते. त्याच्या नंतर काय झाले ते त्याला कधीच समजणार नव्हते.

तेथे केव्हढी झाडे होती. त्यांत एका नवीन झाडाची भर पडली असती तर त्या बिचाऱ्या पोलिसाला कसे समजणार? किंवा तेथे कितीतरी दगड विखुरले होते. त्यांत एका नवीन दगडाची भर पडली असती तरी कुणाला पत्ता लागणार होता? तळ्याच्या पाण्यावर एक तरंग उठला तर त्या पोलिसी खाक्याच्या शिपायाला कसे समजणार?

दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस जेव्हा जागा झाला तेव्हा तो आपल्या घरी, आपल्याच बिछान्यावर जागा झाला होता.

मोठे भाऊसाहेब आणि छोटा भाऊ दोघेही पोलिसांचा रिपोर्ट वाचत होते. रिपोर्ट वाचून झाल्यावर भाऊसाहेबांनी भाऊला विचारले, “ रिपोर्टवरून काही समजतेय? मी तर चक्रावून गेलो आहे. तुला काय वाटते. तुझे काय मत आहे? ”

छोट्या भाऊ विचारांत पडला होता. बोलावे की नको अश्या द्विधा मनस्थितीत होता. मोठे भाऊसाहेब पूर्वी पोलीस मध्ये काम करत होते,त्यामुळे त्यांना त्या डिपार्टमेंटबद्दल आपलेपणा होता. इथे बोलताना खूप सावध राहायला पाहिजे. “मला वाटते की उन्हाच्या तिरीपेने त्या पोलिसाच्या डोक्यावर परिणाम झाला असावा. बिचारा दिवसभर उन्हात बसून थकला असणार. त्यानंतर ती पायपीट. त्यामुळे डोक्यावर परिणाम झाला असेल. ह्या रिपोर्टकडे आपण दुर्लक्ष करणे योग्य ठरेल, असे आपले माझे प्रामाणिक मत आहे.”

प्रामाणिक मत व्यक्त करायचे दिवस केव्हाच मागे पडले होते.

भूतकाळांत जमा झाले होते. भाऊ साहेब विचार करत होते. “मला वाटते की ही केस आपण “काळा चष्मा”वाल्यांकडे सोपवली पाहिजे.तुला काय वाटते?” काळा चष्मा हे खास खाते होते.एलिअन्स आणि टाइम ट्रॅव्हलर्स यांचा सुळसुळाट झाल्यामुळे सरकारला काही उपाय शोधण्याची गरज पडली. त्यातून ह्या डिपार्टमेंट रचना झाली. ह्या डिपार्टमेंटचे सदस्य काळे कपडे आणि काळा चष्मा घालून एलिअन्सच्या शोधांत फिरत असतात. एलिअन्सनी पण मग काळे कपडे आणि काळा चष्मा वापरायला सुरवात केली. त्यामुळे धम्माल गोंधळ उडाला होता. ती ती गोष्ट पुहा केव्हातरी सांगेन!
छोट्या भाऊला ती कल्पना रुचली नाही.” काळा चष्मावाले खूप दांडगाईने वागतात. मला हा माणूस थोडा निराळा वाटतो. ह्याला कसा हाताळायचा ह्याबद्दल चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला पाहिजे. हा कलाकार अजाण बालकासारखा दिसतो. तो निश्चित एलिअन्स, टाइम ट्रॅव्हलर्स, शत्रू राष्ट्राचा हेर किंवा अतिरेकी असा दिसत नाही. काळा चष्मावाले त्यात पडले आणि जर तो निरपराध असेल तर बिचाऱ्याच्या आयुष्याचा विचका होईल.”

“मग आता काय करायचे, तूच ठरव. तू ही केस खोदून काढली आहेस, तूच त्याचा निकाल लाव.” सर्व वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांचा हात झाडून झटकून टाकण्याच्या खास अधिकाराचा त्याने वापर केला.

“ठीक आहे सर, मी बघतो काय करायचे ते.” एवढे बोलून भाऊ केबिनच्या बाहेर पडला. त्याने मनाशी विचार केला. आपल्या डेस्कवर येऊन त्याने “ट्रॅक्टर बीम उपग्रह ” हलवून भाऊ क्रमांक १ च्या ऑफिसजवळ आणून स्थिर केला. भाऊ क्रमांक १ हा त्याच्या मते सगळ्यांत विश्वासू नागरिक होता. त्याची आणि कलाकाराची गाठ भेट झाली तर तो कलाकाराची बित्तम बातमी काढून आणेल आणि जर महान नेत्याही इच्छा असेल तर या कलाकाराला सुसंस्कृत माणूस बनवू शकेल. त्याने ट्रॅक्टर बीम उपग्रहाला भाऊ क्रमांक १ ची फोटोसहित पूर्ण माहिती दिली.

संध्याकाळचे साडे पाच वाजले. भाऊ क्रमांक १ चे ऑफिस बंद होत होते. किल्लीच्या खेळण्यासारखे किल्ली दिलेले मानव ऑफिसच्या बाहेर पडत होते. आपला भाऊही त्यांत होता. ट्रॅक्टर बीमने त्याला ओळखले आणि त्याचा ताबा घेतला. किरणांच्या प्रभावाखाली भाऊ कलाकाराच्या दिशेने खेचला जाऊ लागला.

बऱ्याच लोकांना असे वाटत असते की अमुक अमुक गोष्ट माझ्यामुळे झाली. मी माझ्या हुशारीच्या जोरावर कष्ट करून पुढे आलो. मी होतो म्हणून सर्व निभावून गेले. मी यव केले आणि त्यव केले. बिच्चारे! कळसूत्री बाहुल्यांना कधी समजले आहे की कोणातरी कलाकाराची बोटे त्यांना खेळवत आहेत. अज्ञानात किती सुख असते ! राहू देत बिचाऱ्यांना सुखी.

भाउ क्रमांक १ च्या नजरेला रस्त्याच्या बाजूला जमल्रेली गर्दी दिसली. खर म्हणजे भाऊ रोज त्या रस्त्यावरून ये जा करत होता. पण आज एकाएकी त्याला जाणीव झाली. लोक काय बघत आहेत ह्याची उत्सुकता होती. म्हणून तो ही थोडा पुढे सरकला. घडीच्या स्टुलावर बसलेला माणूस समोर घडीच्या दुसऱ्या स्टुलावर बसलेल्या माणसाचे स्केच करत होता. बाजूला रंगीत चित्रे विकायला मांडली होती.

संगणकावर कंट्रोलर भाऊ हे सर्व बघत होता. हीच ती वेळ होती. त्याने ट्रॅक्टर बीमच्या मधून एक झटका भाऊच्या मेंदूला पाठवला. त्या झटक्याने ताबडतोब काम करायला सुरवात केली.

भाऊ क्रमांक १ला वाटले आपण पण आपले चित्र काढून घ्यायला पाहिजे. शंभर टिकल्याच तर लागतात. समोर बसलेल्या माणसाचे चित्र काढून झाले होते. कलाकाराने त्याला दिलेले चित्र पाहून त्या माणसाच्या चेहेऱ्यावर आश्चर्याचे भाव पसरले.जणू त्याला म्हणायचे होते “ मी हा असा दिसतो? कमाल आहे.” आजूबाजूच्या मजा बघत असलेल्या काही लोकांनी बघू ,बघू असे म्हणत कुतूहलाने ते चित्र पाहिले. भाऊने पण बघितले. तो समोर मोकळ्या झालेल्या स्टुलावर जाऊन बसला, “ माझे चित्र काढा.”

संगणकासमोर बसलेला कंट्रोलर भाऊ समाधानाने हसला. त्याचे काम झाले होते. त्या दोघांची भेट झाली होती..भाऊ क्रमांक १ च्या मनाला त्याने उद्युक्त केले होते. आता ट्रॅक्टर बीम उपग्रहाचे काम संपले होते. दुसऱ्या कंट्रोलरसाठी त्याने उपग्रह मोकळा केला.

ते काय बोलतात ह्याबद्दल कंट्रोलर भाऊला उत्सुकता होती.त्याने भाउ क्र १ च्या प्रोफाईल वर क्लिक केले. भाउ क्र १ वापरत असलेल्या स्मार्ट र्गॅजेटची यादी त्याला दिसू लागली. त्यात त्याचा टीवी होता. टेबलावर ठेवलेले आणि हुकुमाप्रमाणे गाणी ऐकवणारे, क्रिकेटचा स्कोर सांगणारे, ताजा खबर आणि हवामानाचा अंदाज सांगणारे ‘अरे ओ सुनो’ यंत्र होते, गीझर होता, मोबाईल होता, वाशिंग मशीन, ए.सी. होता. अजूनही काही होते. त्यातले कुठलेही यंत्र तो आपल्या संगणकाशी जोडू शकत होता. त्याने भाउ क्र १च्या मनगटी घड्याळाची निवड केली, आणि त्याची आपल्या संगणकाशी जोडणी करून टाकली. तो आता त्या दोघांचे संभाषण ऐकू लागला.

कलाकाराने भाऊकडे निरखून बघितले. जणू तो भाऊच्या अंतरंगांत डोकावून बघत होता.आपण जसे खोल विहिरीत डोकावतो तसे. भाऊ कलाकाराने काढलेली चित्र बघण्यात रंगून गेला होता. तेथे जंगलातून चालत जाणाऱ्या माणसाचे पाठमोरे चित्र रंगवले होते. त्यावर रॉबर्ट फ्रॉस्टची “ रोड नॉट टेकन” कविता लिहिली होती. एकेकाळी ती भाऊची आवडती कविता होती. सूर्यास्ताचा देखावा रंगवलेल्या चित्राखाली लिहिले होते, “ कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. ” खरच त्याच्याजवळ सुद्धा सोन्याचा गोळा होता. आता नाही ह्याची तीव्र जाणीव त्याला झाली. मन थोडे उदास झाले. पुढचे चित्र होकुसाईच्या खवळलेल्या समुद्राच्या लाटेच्या पेंटिंगची डिट्टो कॉपी होती.त्या तीन छोट्या बोटी पण दिसत होत्या. आणि खाली कोलंबसाचे गर्व गीत पूर्ण लिहीले होते. भाऊला कॉलेज आणि शाळेचे दिवस आठवले. मनात कुठेतरी हुरहूर दाटून आली. जाने कहा गये वो दिन ------- असाही काळ होता जेव्हा घड्याळयांचा शोध लागला नव्हता. कोंबडा आरवला की मोठी माणसे जागी होत. उठले की लगेच जगायला सुरवात करत असत. दिवस कासराइतका वर आला की मुले उठत असत. कोणीही आतासारखे घड्याळाचे गुलाम नव्हते. सूर्य डोक्यावर आला की जेवणे होत असत. उन्हे ओटीवर आली की दुपारची कामे सुरु करायची घाई सुरु होई. गाई म्हशी रानातून परतल्या की दिवेलागण होई.

भाऊची समाधि भंग पावली. कलाकारने त्याला बघून बोलायला सुरवात केली , “ अरे, अव्या अरे तू इतके दिवस कुठे गायब झाला होतास?” भाऊने दचकून मागे बघीतले. कोण हा अव्या?
“अरे अव्या, मागे काय बघतोस. मी तुझ्याशी बोलतोय. का विसरलास स्वतःच नाव?” कलाकार एखाद्या खळाळून वाहाणाऱ्या नदीच्या प्रवाहासाखा हसत होता.

“कोण? काय? मला बोलावता आहात? माझे नाव अवि आहे?” भाऊला आश्चर्याचा धक्का बसला. कित्येक दिवसांत त्याला कोणी अवि म्हणून हाक मारली नव्हती. सगळे भाऊ म्हणूनच त्याला बोलावत. सरकारी कामासाठी नावाची गरज नव्हती. स्वतःचा नंबर पुरेसा होता. तो स्वतः आपले नाव विसरला होता मग ह्या कलाकाराला आपले नाव कसे समजले? अवीने कलाकाराकडे निरखून पहिले. त्याच्या डोक्यांत लख्ख प्रकाश पडला. अरे हा तर आपला पक्या !

“आयला पक्या तू ? इतक्या दिवसांनी!” अवीचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही.

दोघेही उठून उभे राहिले. क्षणभर त्यांच्या नजरा भिडल्या आणि त्यांनी एकमेकांना मिठी मारली. दोघांच्याही डोळ्यांतून आनंदाश्रू उभे राहिले. जुन्या आठवणींनी ऊर दाटून आले.

संगणकावर कंट्रोलर भाऊ हे दृश्य बघत होता. त्याला सगळ्या प्रकाराचे हसू येत होते. ज्या दोघांनी उभ्या आयुष्यांत कधी एकमेकाची तोंडेही पहिली नव्हती ते एकमेकांचे जिगरी दोस्त बनले होते. हा कलाकार सोशालिस्ट, कम्युनिस्ट, जिहादी, अतिरेकी, अनार्किस्ट, मध्यममार्गी, गांधीवादी, क्रांतिकारी, कलाकार आणि जोकर अश्या सर्व लोकांपेक्षा जास्त डेंजरबाज होता. कारण एकतर तो साधा सीधा माणूस होता. वर तो प्रेमाचे धागे घेउन मायेची गोधडी विणू पहात होता.

त्याच्या मनात पहिला विचार आला तो हा की ही केस आपण वरिष्ठांच्या कडे न्यायला पाहिजे.पण त्याने तसे केले नाही. माझ्या मते त्या दृश्याची कंट्रोलर भाऊच्या मनावर मोहिनी पडली असावी. येथेच भावी क्रांतीची बीजे रोवली गेली असावी. आमच्या देशाच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांत “क्रांतीची कारण मीमांसा” ह्या चॅप्टरमध्ये तुम्हाला अनेक कारणांची सविस्तर माहिती वाचायला मिळेल.पण कोठेही ह्या गोष्टींचा संदर्भ मिळणार नाही. हे केवळ मला (आणि आता तुम्हाला) माहित असलेले गुपित आहे.

“अवि, तुला आठवतात शाळेतले दिवस? आपले कोल्हटकर मास्तर? शिकवताना काय विनोद करायचे. त्यांनीच आपल्याला मराठीची गोडी लावली. त्या पुस्तकातल्या कविता अजून माझ्या तोंडपाठ आहेत.”

“हो, हो. चांगले आठवतात. आणि ते पुरंदरे सर. त्यांनी सांगितलेली “अदृश्य माणूस” गोष्ट अजून मला जशीच्या तशी आठवते आहे.”

अशा गप्पा मारता मारता दिवस सरून गेला पण आठवणी संपल्या नाहीत..........

ह्या सर्व आठवणी खऱ्या होत्या का? अविनाश आणि मनोहर खरच एकमेकांचे शाळेतले मित्र होते का ? ते कधी काळी एकमेकांना भेटले होते का? मला विचारू नका कारण मला काही माहीत नाही.

एवढे मात्र मला माहीत आहे की क्रांतीची सुरुवात झाली होती.

सकाळी साडे सहाला घड्याळाचा गजर झाला. पहाटेच्या रम्य स्वप्नातून गजराने त्याची झोपमोड केली होती. आयुष्यांत प्रथमच त्याला घड्याळाचा राग आला. इतके दिवस घड्याळाचे आणि त्याचे अतूट मैत्रीचे नाते होते. पण आज-------. घड्याळावर रागवण्यात काही अर्थ नव्हता. त्याची बिचाऱ्याची काय चूक. त्याने मनोमन घड्याळाला क्षमा केली. त्याला एकदम बाबांची आठवण झाली. त्यांनी मेडिकल चेकअप करून आता पाच दिवस झाले होते.आपण त्यांना जाऊन विचारले पण नाही की बाबा काय झाले. डॉक्टर काय म्हणाले. त्याला स्वतःची लाज वाटली. इतका भावनाहीन केव्हा पासून झालो आपण? तो सरळ उठला आणि बाबांच्या खोलीत गेला. बाबा केव्हाच उठले होते आणि शांतपणे काहीतरी म्हणत होते. अविने

आठवण्याचा प्रयत्न केला.मेंदूच्या कुठल्यातरी कप्प्यात थोडीशी हालचाल झाली. अरे ही रामरक्षा आहे. लहानपणी बाबांनी त्याला शिकवली होती. तो बाबांची रामरक्षा संपेपर्यंत थांबला.

“बाबा. डॉक्टर काय म्हणाले,” अविने काळजीच्या स्वरांत विचारले. बाबांना आश्चर्य वाटले तसेच बरे पण वाटले.इतके दिवस ह्याने कधीही आपल्या प्रकृतीची काळजी केली नव्हती, आज अचानक ह्याला काय झाले? ते हसून म्हणाले, “ सगळे काही ठीक आहे,” मग दिलखुलास हसून ते म्हणाले, “डॉक्टरांनी सांगितले आहे, “ चहा थोडा कमी करा.” पण अवि, आज तू सकाळी सकाळी माझ्या तब्येतीबद्दल विचारतो आहेस?” अविला कशाची तरी आठवण झाली. त्यामुळे तो उत्तर द्यायचे विसरून गेला. त्याने आपल्या खोलीत जाऊन प्रकाशने काढलेले स्वतःचे चित्र घेतले. बाबांना दाखवायचे होते ना.

“बाबा, काल एक गंमत झाली, माझा शाळेतला मित्र प्रकाश भेटला. चित्रकार झाला आहे. आपल्याकडे शिकवणी साठी येत असे. आठवतो तुम्हाला? त्याला तुमची खूप आठवण येत होती. हे पहा त्याने काढलेले माझे चित्र! आले आहे ना हुबेहूब.” त्याने बाबांना चित्र दाखवले.

बाबांनी चित्र हातांत घेऊन निरखून बघितले. नीट दिसले नाही म्हणून चष्मा चढवून पुन्हा बघितले. सूर्योदयाचा नितांतसुंदर क्षण पकडून चित्रकाराने चित्रांत रंग भरले होते. चित्रांत अवि कुठेच दिसत नव्हता.

“आहे ना माझे खरेखुरे चित्र?” हा अर्थातच प्रश्न नव्हता तर उत्तर होते.

बाबांच्या डोक्यात एकदम प्रकाश पडला. अरे हा तर सूर्योदय!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

असामी
माफ करा. काही समजले नाही.