श्रावणाच्या चाहुलीने
मी जरा रेंगाळले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले
वाट बघणे श्रावणाची
छंद मी जोपासला
आर्ततेला तुजमुळे रे
अर्थ नवखा लाभला
चित्र फुलणार्या कळीचे
आज मी रेखाटले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले
धडधडीचे काय सांगू !
चैन का पडते जिवा?
दार उघडे, सांज झाली
लावला लामण दिवा
नेमका ढळला पदर अन्
आत तू ! भांबावले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले
आणतो श्रावण तुला का
श्रावणा तू आणसी?
तू सख्या येताच होते
कंच हिरवी मानसी
श्रावणाच्या अन् सख्याच्या
सोबती गंधाळले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले
रात्र अंधारात लपली
वाट काटेरी तरी
मी तुझ्या बाहूत आले
झेलल्या श्रावण सरी
मेघमल्हारास ठावे
मी किती रोमांचले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले
फक्त तू दरसाल येशी
एकदा का श्रावणा?
का असा सोडून जाशी?
सांग ना तू साजना !
मी तुझ्या विरहात जखमी
रे! किती रक्ताळले
घेत कानोसा सख्याचा
अंतरी झंकारले
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३