काश्मीर डायरीज - ५

Submitted by स्मिता श्रीपाद on 22 July, 2022 - 01:12

आधीचा भागः
काश्मीर डायरीज - ४ - https://www.maayboli.com/node/81943

१९ मे २०२२
"गुलमर्ग ला जायला पहाटे 6 वाजता निघा."
"सकाळी 8:30 च्या आत तिथे पोचा"
असे बरेच जणांनी आधीच सांगितले होते पण आमच्या इनायत भाईंना विचारलं तर ते म्हणाले,काही गरज नाही, तिथे आपला गाईड असतो, तो लाईन मध्ये नंबर लावून देतो. आपण 8.30 वाजता निघू.त्याच दिवशी हाऊसबोट वरून चेकआउट करून आम्हाला श्रीनगर मधेच दुसऱ्या एका हॉटेल मध्ये शिफ्ट व्हायचे होते. त्यामुळे आम्ही सकाळी 7.30 लाच निघायचे ठरवले.म्हणजे नवीन हॉटेल वर बॅग्स टाकून पुढे निघता येईल अशा अंदाजाने. पण आमचे वेळेच्या बाबतीतले जुने रेकॉर्ड लक्षात घेता आम्ही काही सकाळी 7.30 ला तयार होऊ शकणार नाही अशी इनायत भाईंना पक्की खात्री असावी.त्यामुळे ते नेमके त्या दिवशी उशीरा आले.पण बर्फ हा शब्दच जादुई असल्याने तमाम जनता खरोखरच 7.30 ला तय्यार होती.मग वाट बघण्यात 1 तास गेला. शेवटी सामान तसेच गाडीच्या टपावर घेऊन 8.30 ला आम्ही श्रीनगर सोडले.

वाटेत टंगमर्ग जवळ आमचा दुसरा गाईड (जो गुलमर्ग मध्ये आमच्या सोबत असणार होता) आम्हाला भेटला.त्याचे नाव मसरूफ भाई.त्याच्या सांगण्यानुसार तिथेच एका दुकानात बर्फात घालायचे गम बूट,जॅकेट ई घेतले. आणि गुलमर्ग ला 10 ला पोचलो.गुलमर्ग वाहनतळ ते केबल कार स्टेशन 2 km अंतर आहे. तिथे जायला घोड्याचा पर्याय होता. गेले दोन-तीन दिवस रोज भरपुर चालत होतो त्यामुळे आधीच पाय दुखत होते त्यामुळे आणि वरती बर्फात खेळायला उत्साह टिकून राहावा म्हणून आम्ही घोड्याने जायचे ठरवले. केबल कार स्टेशन जवळ जायला अजून अर्धा तास गेला. अखेर 10:45 ला लाईन मध्ये उभे राहिलो.
20220519_110708.jpg
जय जय शिवशंकर गाण्यात दिसणारं देउळ
284260162_10159173083309355_7260747315657859319_n.jpg
पूर्वी ही केबल कार ची तिकिटे तिकडे जाऊनच काढावी लागत आणि त्यासाठी हे लोकल गाईड कम agent असायचे पण आता ऑनलाइन तिकिटे मिळतात. ही तिकिटांची लाईन म्हणजे मारुतीची शेपटीच होती.गाईड च्या म्हणण्यानुसार ऑनलाइन पद्धतीत जास्त तिकिटे विकली जात आहेत आणि त्यामुळे जास्त गर्दी होते. थेट विक्री ला लिमिटेड तिकिटे असायची आणि त्यामुळे कमी गर्दी आणि कमी लाईन असायची. काय कोण जाणे पण भयंकर मोठी लाईन बघून आपला नंबर कधी येणार असे झाले पण आमच्या गाईड ने योग्य जागी आधीच नंबर लावून आम्हाला शक्य तितक्या पुढे पर्यंत नेले. तरीही 2 तास लागलेच. Sad
लांबच लांब लाईन, समोरच्या इमारती मधे २ मजले भरुन लाईन होती Wink
284237725_10159173083394355_5162923983838266034_n.jpg
गुलमर्ग केबल कार च्या दोन फेजेस आहेत.त्यातल्या दुसऱ्या फेज वर म्हणजे अफारवत पर्वतावर बर्फ आहे. पहिली फेज पण अतिशय सुंदर आहे. दूरवर पसरलेली हिरवी कुरणे आणि चाहुबाजूने बर्फ़ाचे डोंगर. आम्ही पहिल्या फेज साठीच्या च्या रांगेत उभे होतो. जवळजवळ 2 तासाने केबल कार जवळ पोचलो. आता ५ मिनिटात पहिल्या फेज च्या केबल कार मध्ये बसणार आणि मग वर जाऊन लगेच दुसऱ्या फेज ची केबल कार. की लगेच बर्फ..इतक्यात..
"महा"गोंधळ क्रमांक 4..
"कृपया ध्यान दिजीए, उपर मौसम खराब होने के कारण फेज २ केबल कार पुरे दिन के लिये बंद कर दिया है. असुविधा के लिये खेद है "
एका क्षणात सर्वांचे मूड बदलले.डोळे भरून आले.ज्यासाठी इतका अट्टाहास केला ती गोष्ट अशी समोर दिसत असताना निसटून चालली होती. आमचं एकवेळ जाऊदे पण आमच्या लेकीला बर्फ दाखवायचाच होता. ती तर किती नाराज होईल. खूप खूप वाईट वाटायला लागलं. आता पहिल्या फेज पर्यंत तरी कशाला जा.चला इथूनच जाऊ परत असे विचार मनात यायला लागले. मसरूफ भाई म्हणाले वर जाऊन तर बघू काही होतं का. मौसम ठीक झाला तर 1 तासाने सुरू होईल परत.आशा ही चिवट गोष्ट आहे. स्वामींचं नाव घेतलं.मनात म्हणलं,"महाराज, बाकी काही असो , आज माझ्या लेकीला बर्फ दिसलाच पाहिजे."

केबल कार ला इथे गंडोला म्हणतात. पहिल्या फेज च्या गंडोला मध्ये बसलो आणि आजूबाजूचा निसर्ग बघून मघाशी मनात आलेले सगळे विचार पळून गेले. निसर्गात किती ताकद असते ना.सगळ्या नकारात्मक भावना आपोआप निघून जातात.
गंडोला मधुन दिसणारी ही माती आणि कुडाची बसकी घरे. यांना काहितरी खास नाव आहे पण मी आता ते विसरले.
284438119_10159173083689355_8627737390288388758_n.jpg
गुलमर्ग बेस पासून 10 मिनिटात पहिल्या फेज वर पोचलो. समोरच वरती अफारवत पर्वत आणि बर्फ दिसत होता. तिथेच आम्हाला जायचे होते. पण डोंगरावर खरच खूप दाट काळे ढग आले होते आणि तिथे खूप जास्त वारा होता. फेज 2 गंडोला सुरू व्हायची शक्यता धूसर होती तरी पोचताक्षणी फेज 2 च्या स्टेशन कडे धाव घेतली. पण केबल कार आज सुरू होणार नव्हती हे पक्के होते.
आता काय ? कसा बघणार बर्फ ?
पण जेव्हा इच्छा प्रबळ असते तेव्हा मार्ग निघतोच.दूर डोंगरात ग्लेशियर सारखी जागा दिसत होती. तिथे भरपूर बर्फ दिसत होता.बरेच घोडावाले पर्यटकांना घेउन त्या दिशेला चालले होते.मसरूफ भाईंनी सांगितलं की तिथे बर्फ़ापर्यंत जाता येतं पण 30-40 मिनिटे घोड्यावरून जावे लागेल. त्या सेकंदात कुठलाही विचार न करता हो म्हणून मोकळे झालो.खरंतर पहलगाम ला सुमारे २-३ तास सलग घोड्यावर बसून आधीच मांड्या आणि पाय दुखत होते आणि त्यानंतर पुढचे 2 दिवस भरपूर चालून झाले होते त्यामुळे आता घोडा नको वाटत होता पण बर्फ बघण्यासाठी अजून थोडे कष्ट करायलाच हवे होते.पुढच्या पाचव्या मिनिटात आम्ही घोड्यावर बसून वरती जायला निघालो होतो.
पहलगाम चा चढ आणि डोंगर सोपा म्हणायची वेळ त्या रस्त्याने आणली.व्यावस्थित चढ आणि काही ठीकाणी एकदम इतका छोटा रस्ता की कसे बसे २ घोडे जाउ शकतील.समोरुन परत येणारे घोडे आणि जाणारे घोडे यांची टक्कर व्हायचे फुल चान्सेस.खुप वृद्ध आणि खुप लहान मुले असलेले आई बाबा असे बरेच परस्पर विरोधी लोक वाटते घोड्यावरुन जाताना दिसत होते त्यांची दया येत होती.( आणि मनात कुठेतरी असे पण वाटत होते की का अट्टाहास करत असतील हे लोक झेपत नसताना) एका म्हातार्‍या आणि बर्‍यापैकी जड शरीराच्या आजीना तर घोड्यावर बसवलेले आणि दोन्ही बाजुने दोन लोक आधार द्यायला आणि तिसरा माणुस घोडा सांभाळायला अशी कसरत चालु होती.त्या आजींचा चेहेरा बघवत नव्हता. असो.

तरसुमारे अर्धा-पाऊण तासात बर्फ़ाजवळ पोचलो. दोन डोंगरांच्या मध्ये वाहून आलेल्या बर्फ़ाचा तो एक लांब च्या लांब पट्टा होता. स्लेज गाड्या आणि स्कीइंग चे खेळ चालू होते.चहा मॅगी चे ठेले सजले होते.बऱ्यापैकी गर्दी होती.
284207012_10159173083434355_2237065810329857304_n.jpg
आम्हाला बर्फात पोचलो याचा अतिशय आनंद झाला.खरंतर हा पांढरा भुसभुशीत असा बर्फ नव्हता. उन्हामुळे वितळायला लागलेला असाच होता. गमबूट घालून पण चालत येत नव्हते. पाय घसरत होते.पण तरी आम्ही तिथे खुप खुप मज्जा केली. मसरूफ भाई आमच्या घोड्यांसोबत चालत चालत वरतीपर्यंत आले होते. त्यांनी तिथल्या स्लेज वाल्यांसोबत घासाघीस करून आमच्या साठी दर ठरवला. स्लेज च्या गाडीवर बसून वरपर्यंत जायचे, तिथे टाईमपास करून मग त्याच गाडीवर ते आम्हाला घसरत खाली आणणार होते.वरती पोचलो तिथे एक छोटासा धबधबा पण होता. वरवरचा बर्फ काळा दिसत असला तरी बुटाच्या टोकाने थोडासा उकरला की आत शुभ्र पांढरा भुसभुशीत बर्फ होता. मी आणि लेकीने स्नो मॅन बनवायची मज्जा पण केली. माझ्या लेकीने, मधुजा ने तर मनापासून धमाल केली तिथे.बर्फ़ाचे गोळे करून एकमेकांच्या अंगावर उडवून झाले.मनसोक्त फोटो, स्लो मो व्हिडीओ करून झाले,तिचं लाडकं मॅगी तिला बर्फात खायचं होतं ते खाऊन झालं. तिचा फुललेला चेहेरा बघून माझे डोळे वाहायला लागले.याचसाठी केला होता अट्टाहास.
मनातल्या मनात काश्मीर ला म्हणलं "आम्ही भरपुर बर्फ बघायला हिवाळ्यात परत यावं अशी तुझी इच्छा आहे ना, मग आम्ही नक्कीच येणार "

मसरूफ भाई गाईड कम फोटोग्राफर होते त्यांनी आमचे सुंदर फोटो काढले आणि स्लेज वरून घसरताना चे व्हिडीओ सुद्धा केले.माझ्या मुलीचे आणि बहिणीचे चे स्लेज राईड व्हिडीओ करायचे गडबड आणि गर्दी मुळे राहिले तर त्या भल्या माणसाने स्लेज वाल्याला परत एकदा वर अर्ध्या वाटेपर्यंत जायला लावले, स्लेज वाल्याने पण काहीही कटकट न करता त्यांना परत ओढत वरती नेले आणि परत स्लेज ची घसरगुंडी करून व्हिडीओ घेतला.आम्ही नको,जाऊदे म्हणत होतो तर तो म्हणाला,
"दिदी, बादमे गुडीया बोलेगी उसका व्हिडीओ क्यू नाही लिया? नाराज हो जायेगी.उसको बुरा लागेगा ना"
स्लेज वरून घसरत येणं सोपं असलं तरी त्या तसल्या थंडीत स्लेज वर बसवून एखाद्याला ओढत वर नेणं खूप अवघड आहे त्यामुळे मला या कृती चं जास्त कौतुक वाटलं.

आता तिथे पण वातावरण बदलायला लागलं होतं.पाऊस पडायची चिन्ह होती. आज लंच ला अपोआप बुट्टी मारली गेली होती पण आता पोटाने हाक द्यायला सुरू केले होते.अजून घोडा-गंडोला-घोडा-कार असा लांबलचक प्रवास बाकी होता. 3.30 - 4 च्या दरम्यान उतरायला सुरुवात केली.मग केबल कार फेज वन ते बेस आणि मग पार्किंग पर्यंत पोचलो. आता पोटात कावळे उड्या मारत होते. तिथल्या एका हॉटेल मध्ये "पावभाजी" असा शब्द दिसला आणि ताबडतोब ऑर्डर दिली. जगात कुठेही गेलं तरी पावभाजी खाल्लीच पाहिजे असं "माझं शास्त्र असतंय".
आणि आश्चर्य म्हणजे तिथे अप्रतिम पावभाजी आणि फार मस्त फ्रेश पाव मिळाले.आता पोट आणि मन दोन्ही भरलं होतं. हॉटेल मधून बाहेर आलो तर अजून एक सरप्राईज आमची वाट बघत होतं.आम्ही ज्यांच्यातर्फे टूर पॅकेज बुक केलं होतं त्या Kashmir Heavens चे शाहिद भाई खास आम्हाला भेटायला पोचले होते. त्यांना भेटून छान वाटलं. गेले 2 महिने विविध शंका विचारून फोन वर त्यांना भरपूर त्रास दिला होता. आज प्रत्यक्ष भेटत होतो. त्यांनी ट्रिप कशी चालू आहे वगैरे आपुलकीने चौकशी केली. आम्हाला फेज 2 ला जाता आलं नाही म्हणून त्यांना पण वाईट वाटलं. सोनमर्ग ला झिरो पॉईंट चालू झाला आहे,उद्या तिथे जा असे त्यांनी सुचवले. उद्या चं उद्या ठरवू असे म्हणून त्यांचा निरोप घेतला.

आज पाहिला त्यापेक्षा जास्त बर्फ आम्हाला फेज 2 ला नक्कीच दिसला असता पण "जे होतं ते चांगल्यासाठीच" यावर माझा गाढ विश्वास आहे.
(नंतर परत आल्यावर इथे मायबोली वरच वाचनात आलं की आम्ही गेलो त्याच्या आधीच्या आठवड्यातच अचानक हवा खराब झाल्यामुळे फेज २ ला चेंगराचेंगरी ची परिस्थिती निर्माण झाली होती) त्यामुळे आज जे काही मिळालं ते पण खूप होतं.आम्हाला फ्रीज पेक्षा नक्कीच जास्त बर्फ मिळाला त्यातच आम्ही खुश होतो. अजून काय पाहिजे Happy
284169331_10159173083569355_341267131889127355_n.jpg
गुलमर्ग ते श्रीनगर परतीचा प्रवास सगळा झोपेतच झाला. श्रीनगर ला पोचून नवीन हॉटेल मधे सकाळी राहिलेलं चेकइन केलं.हॉटेल मध्ये लिफ्ट नव्हती आणि आमच्या रूम तिसऱ्या मजल्यावर होत्या असा अजून एक किरकोळ गोंधळ तिथे झाला Wink
सकाळी हातातून निसटता निसटता आनंदाचं दान पदरात पडलं होतं त्यापुढे हा गोंधळ म्हणजे किस झाड की पत्ती.आजचा दिवस असा गेला होता की आता अशा लहान सहान गैरसोयी मन आपोआप स्वीकारत होतं.

रूम मध्ये पोचून मऊ बिछान्यावर अंग टाकताक्षणी गाढ झोप लागली.अजून एक सुंदर दिवस संपला होता.

-- क्रमशः

पुढचा भागः
काश्मीर डायरीज - ६: https://www.maayboli.com/node/81985

Group content visibility: 
Use group defaults

वाचतोय ही सिरीज, कश्मीर इज लभ !

गाईड चे नाव खरंच 'मसरुफ' होते का ? त्याचा अर्थ 'व्यस्त / बिझी' असा होतो Happy

पु ले शु

गाईड चे नाव खरंच 'मसरुफ' होते का ? त्याचा अर्थ 'व्यस्त / बिझी' असा होतो Happy >> हो खरच हे नाव होते Happy मशरुफ्/मसरुफ इतका फरक असु शकतो. पण यामुळे अर्थ बदलेले असे वाटत नाही. कामसु माणुस अशा अर्थाने ठेवले असेल Wink

छान हाही भाग.
असे ऐनवेळेस झालेले गोंधळ मूड ऑफ करतात खरे. पण खरोखरच निसर्ग असा असतो की आपण फार काळ उदास नाही रहात.

हा भागही मस्त!!

तुम्ही बरेच फोटो टाकताय खरंतर पण अजूनही जास्त टाकलेत तरी चालतील.

सगळे भाग वाचले. खूप छान चालू आहे मालिका. आम्ही सुद्धा गेलो होतो एप्रिल पहिल्या आठवड्यामध्ये काश्मीर ला तेव्हा फेज १ ला सुद्धा भरपूर बर्फ होता. गंडोला स्टेशन पर्यंत अंतर जास्त नाहीये आम्ही चालत गेलो होतो.

छान लिहलंय, स्मिता !
याचसाठी केला होता अट्टाहास.>>> हे असे क्षण खूप खास असतात. Happy
इनायत भाईंची संपर्क माहिती देशील का, प्लिज ? इमेल केलीस तरी चालेल.
नोव्हेंबरमध्ये (शेवटचा आठवडा) कसे असते तेथील वेदर? थँक्सगिविंग ब्रेकमध्ये जायचा विचार करतोय.