BATA --समांतर विश्वात बबड्या्चा उंदीर

Submitted by केशवकूल on 20 July, 2022 - 01:34

B A T A

बबड्या बाबांच्या कुशीत शिरला. बबड्या दिवसभर न्यूटन, आईनस्टाईन, हायझेनबर्ग, स्क्रोडींजर, नील्स भोर, झेलींजर वा फाईनमन ह्यांच्या बरोबर गप्पा मारण्यात गुंग असला तरी रात्र झाली की त्याला बाबांची कुशी आठवत असे.

“बाबा, गोष्ट सांगा ना.”

“ठीक आहे. ऐक, एक होता राजा-------“ गोष्ट ऐकता ऐकता बबड्या केव्हाच झोपी गेला.

“समोरच्या फ्लॅटमध्ये कोणीतरी रहायला येणार आहे.” रामभाउंनी बोलता बोलता बायकोला म्हणजे पुष्पाला सांगितले.

“फॅमिलीवाले असतील तर बरं. मला मेलीला तेवढीच कंपनी होईल. कोणी रहायला आले तर बिचाऱ्या फ्लॅटला फ्लॅटपणा येईल.”

“पहा काय होतं ते.”.

सात आठ दिवसांनी----

सकाळी रामभाऊ चहा पीत होते. समोरच्या फ्लॅटमधून आवाज येणे चालू झाले. हमाल एक एक करून ब्यागा आणि सुटकेसेस आणून ठेवत होते. बहुधा त्याचेच आवाज असावेत.

“मंडळी आलेली दिसतात.” रामभाऊंनी पुष्पाला सांगितले.

“हम्म, ऐकते आहे मी,”

उत्सुकतेमुळे रामभाऊंना राहवेना, “पाहुण्यांची विचारपूस करून यावे म्हणतो.” उठले, गेले आणि समोरच्या फ्लॅटची घंटी दाबली. पाच एक मिनिटांनी दरवाजा उघडला. आतून धडकी भरवणारा भडकाऊ नारिंगी रंगाचा सदरा घातलेला, त्यावर हाथकडीचे डिझाईन, पोट किंचित सुटलेले, खाली बर्म्युडा ह्या वेशातली व्यक्ति डोकावून पहात होती. डोळ्यावर काळा चश्मा!

ह्या माणसाला कुठेतरी पाहिले आहे.

“नमस्कार! मी रामभाऊ हातवळणे, ह्या समोरच्या फ्लॅट मध्ये रहातो. विचार केला आपलं स्वागत करावं, ओळख करून घ्यावी.” इकडे तिकडे नजर फिरवत विचारले, “मिसेस कुठे दिसत नाहीत?”

“मी एकटाच असतो.”

“व्वा, छानच की. सामान लावताय का?

“हो, म्हणजे नाही. नाही म्हणजे जवळ जवळ झालेच आहे. आपल्याकडे हातोडी आणि खिळे असतील का हो?”

“आपण असं करा----- काय बर आपले नाव?” हळू हळू संभाषणाला पालवी फुटत होती.

“मी मधुकर बारटक्के.” बारटक्केने आपली ओळख करून दिली.

रामभाउंना थोडं बरं वाटलं.

माणूस साधा वाटला. बाहेरच्या गाठीचा. गाठ घट्ट आहे की निरगाठ आहे. कळेल लवकरच .

ह्या माणसाला कुठेतरी पाहिले आहे. पण कुठे?

“बारटक्के साहेब, चला माझ्या घरी. चहा घेऊया. माझी बायको फक्कड चहा बनवते. मग हातोडा, खिळे घेऊन जा. कस काय?” रामभाऊंनी आमंत्रण दिले.

मधुकरराव झब्बा लेंगा घालुन चहाला आले. “हा बबन. चौथीत आहे. बबन, काकांना हलो कर.” बबनने काकाना हलो केले!

पुष्पाने कांदे पोहे केले होते. पोहे खाता खाता बारटक्केने टेबलावरची फुलदाणी उचलली. बाजूला ठेवली. रामभाऊंच्या सराईत नजरेतून ती गोष्ट सुटली नाही.

हा माझ्या घरात ढवळा ढवळ करू पहात आहे.

कुठल्याशा विज्ञान कथेतल्या साधूंची रामभाऊंना आठवण झाली. दोन साधू देशभर हिंडत असतात आणि मधेच कुठेतरी एखादा दगड उचलून दुसऱ्या जागी ठेवत असत. त्यांच्या मते असं केल्याने विश्वाचा तोल साधला जातो. त्यांना दैवी शक्ती प्राप्त झाल्या असल्यामुळे कुठला दगड चुकीच्या जागी आहे हे त्यांना समजत असे. त्याची कुठे स्थापना केली की विश्वाचा समतोल साधेल ह्याची पण त्याना कल्पना यायची. हे कार्य त्यांना अविरत करायचे आहे ह्याची त्याना जाणीव होती. माझ्या घरात शांतता, सुख, समाधान आहे. हा बारटक्के येऊन त्यात विष कालवायचा प्रयत्न करत आहे. रामभाऊंनी बारटक्केच्या नकळत फ्लॉवरपॉट मूळ जागी सरकवला.

मन ताळ्यावर आणण्यासाठी रामाभाउंनी बबड्याकडे मोहरा वळवला. “बबन खाताना कॉमिक्स वाचायची नाहीत. किती वेळा सांगायचे तुला?”

“बाबा, हे कॉमिक्स नाही. हे ------“

“ते काही नाही. वाचू नकोस म्हणजे नकोस. आपलाकडे पाहुणे आले आहेत त्यांच्याशी काही बोलायचे ते सोडून तू फिजिक्सचं पुस्तक वाचतो आहेस?”

“वा, हा फिजिक्स वाचतो? कमाल आहे!” बारटक्के कौतुकाने म्हणाले.

“अहो, कसले फिजिक्स घेऊन बसला आहात. वार्षिक परीक्षेत पास होऊन पुढे गेला म्हणजे मिळवली.”

रामभाऊ पुन्हा बारटक्केकडे वळाले. “तुम्ही काय करता? म्हणजे नोकरी, धंदा---“

“करत होतो. नोकरी. आता नाही. तुम्हाला “टॉकिंग अॅप” नावाची कंपनी माहीत आहे का? मी त्या कंपनीचा सेल्समन होतो. सगळ्या देशात हिंडलो. खूप काय काय बघितले. अनुभवले. पुस्तक लिहीलं तर बेस्टसेलर होईल. कुणा एका(सेल्समन)ची भ्रमणगाथा!”

त्याच्या काळ्या चष्म्यावर विषण्णतेची रेंगाळती झलक तरळून गेली.

“काय काम करते हे तुमचे अॅप?” रामभाऊंनी विचारले.

बारटक्केने टेबलावरची फुलदाणी उचलली आणि तिच्याशीच बोलायला सुरुवात केली. “माणसे मोठी झाली---मोठी म्हणजे वयाने­---बरका हातवळणे साहेब, त्यांचे विचार ताठर बनतात, भावना कठोर बनतात. दया, विनय ह्यांची जागा क्रौर्य, गर्व असे दुर्गुण घेतात. तर त्यांना त्यांचे हरवलेले बालपण परत मिळवून द्यावे ह्या उदात्त हेतूने आमच्या कंपनीने हे अॅप बनवले. हे अॅप माणसांच्या मेंदूच्या विविक्षित भागाला उद्दिपित करते जिथे बालपणीच्या आठवणी संचयित केलेल्या असतात. तुम्हाला तुमचे बालपण चित्रपटासारखे दिसू लागते. काय सांगू, हातवळणे नाही चाललं हो. मी बघितलं कुणालाही त्यांचं बालपण पुन्हा जगायची इच्छा नव्हती. आय टेल यू काही महाभाग असे भेटले की दे अॅक्चुअलि हेट देअर चाईल्डहूड. इट वॉज रिविलिंग अॅंड शॉकिंग! यू वोंट बिलीव बट इट इज ट्रू! सॅड नं.”

हातवळणेना हसू येत होते. कोणी सिरिअस होऊन बोलायला लागला की त्यांना हमखास हसू यायचे.

“हे बाकी चांगले आहे.”

“काय म्हणालात? काय चांगले आहे?”

“आपल्यासारखा माणूस हे काम करतो हे. नाहीतर एक काळ असा येणार आहे की ही सॉफ्टवेअरच स्वतः नवीन प्रॉग्राम बनवतील, तीच त्याचे मार्केटिंग करतील आणि ती दुसऱ्या सॉफ्टवेअरला विकतील. म्हणजे माणसांचा कुठेही सहभाग नाही. म्हणजे म्हणतात ना सॉफ्टवेअर बाय द सॉफ्टवेअर, फॉर द सॉफ्टवेअर, ऑफ द सॉफ्टवेअर!!! ”

माझी ही निरर्थक बडबड त्याला आवडली नसावी. “शक्य आहे.” एवढेच मोघम बोलून त्याने विषय बंद केला.

हसूं आतल्या आत दाबून रामभाऊंनी विचारले, “बर मग पुढे?”

“पुढे काय. आमच्या कंपनीने ती लाईन बंद केली. माझा पण मूड गेला. दिली सोडून नोकरी. शोधतोय नवीन नोकरी. चालली आहे खटपट. माझे राहू दे. आपण काय करता?” बारटक्केने विचारणा केली.

मधेच बायको येऊन बघून गेली. पुन्हा एकदा पोह्यांचा राउंड झाला. बबन दिसत नव्हता. बाहुतेक कंटाळून गेला असावा.

“मी “डेली टाईमपास पुणे” पेपर मध्ये उपसंपादक आहे.” रामभाउंनी आपली माहिती पुरवली.

“ओ हो, म्हणजे ज्यात “सरला वाहिनीचा सल्ला” असतो तो पेपर?”

आता ते सदर रामभाऊच चालवतात, तेच सल्ला विचारतात, तेच सल्ला देतात. तेच त्यांच्या सल्ल्यावर बऱ्या वाईट कॉमेंट करतात हे एक गुपित होते.

रामभाऊ मधून मधून संपादकीय लिहितात. हल्ली हल्ली त्यांनी अमेरिकेचे अध्यक्ष श्री ट्रम्प यांची परखड शब्दात कान उघाडणी केली. ते वाचून ट्रम्प ह्यांच्यावर इतका परिणाम झाला की त्यांनी निवडणुकीचा निकाल मान्य करून ताबडतोब व्हाईट हाउस खाली करण्याचा निर्णय घेतला. अशा रीतीने अमेरिकेवरील मोठे गंडांतर टळले. असो. हे सगळे आजच ओळख झालेल्या बारटक्केला सांगण्यात रामाभाउंना रस नव्हता.

पोहे खाऊन झाले होते, पुष्पा चहा घेऊन आली.

बारटक्के बोलता बोलता मधेच थांबला. त्याने पुष्पाकडं बघितलं.

“साधना ताई तुम्ही? तुम्ही फेसबुकवर आहात ना? कविता लिहिता ना? मला कल्पना नव्हती की महान कवयित्री साधना माझ्या समोरच्या फ्लॅटमध्ये रहातात! महादाश्चर्यम्! केवढे माझे अहो भाग्य!”

हे म्हणजे फारच झाले. माझी बायको फेसबुक वर. कविता करते? ते ह्या त्रयस्थ बारटक्क्याला माहीत. मला त्याचा गंध नाही. अरे काय चालले आहे काय?

पुष्पा ऊर्फ साधना आधी गोंधळली, नंतर चक्क लाजली. “अहो वेळ जाता जात नाही मग लिहिते र ला ट लावून काही तरी.”

“नाही, नाही, वहिनी हा तुमचा विनय आहे. हे म्हणजे तुम्ही तुमच्या कवितेत लिहिले आहे तसे.” बारटक्के पाघळायला लागला होता.

रामभाऊ गप्प बसून हा तमाशा बघत होते. कळत नकळत त्यांना असूया वाटत असावी.

“वहिनी, आंपण असं करुया, माझ्या ओळखीचा एक प्रकाशक आहे. त्याला तुमच्या कवितांचा संग्रह प्रकाशित करायला सांगू या. आताच बोलून घेतो त्याच्याशी.” बारटक्केने मोबाईल काढून कुणाला तरी कॉल लावला.

“भावजी, उगाच कोणाला भरीस घालू नका. त्याला काही इंटरेस्ट नसेल तर कशाला उगीचच आपलं.”

“वहिनी, अहो तुम्ही तुमच्या कवितांचा संग्रह त्याला प्रकाशनासाठी देता आहात म्हाणजे हे त्याच्यावर उपकार आहेत, उपकार!” हरभऱ्याचे झाड किती उंच असते? रामभाऊ थोडे अपसेट झाले होते.

“वहिनी, मग ठरलं तर आपलं. तो उद्या इलस्ट्रेटरला घेऊन इथे येईल. तोवर मी निवडक कविता बाजूला करतो. संग्रह फक्कड झाला पाहिजे. चला रामभाऊ, येतो मी. पोहे बाकी छान झाले होते. तो आपला छोटा आईन्स्टाइन कुठे पळाला? रामभाऊ, एक सांगू कां, तुम्ही फार लकी आहात. असा गुणी मुलगा, अशी महान---“

“बर या आता,” रामभाउंनी बारटक्केला मधेच कटवून दाराकडे वळवले.

बारटक्के गेला. मात्र जाताना त्याने फ्लॉवरपॉट हलवून दुसऱ्या जागी ठेवला हे रामभाऊंच्या लक्षात आले नाही,

“तू मला कधी पत्ता लागू दिला नाहीस की तू कविता करतेस, तुझं फेसबुक वर खाते आहे.” रामभाऊंनी विचारले. त्यांच्या विचारण्यात नाराजगीचा सूर होता.

“त्यांत काय एवढे आहे? दुपारी वेळ जात नसतो. कविता करते. तुम्ही बारटक्केचे बोलणे सिरीअसली घेऊ नका. बारटक्केला काव्य कशाशी खातात ते तरी माहीत आहे की नाही. आय डाउबट.” पुष्पाने विषय तेथेच संपवण्याचा पवित्रा घेतला.

आय डाउबट!

चार पाच दिवसात बारटक्केचा पल्ला दिसायला लागला. गोष्टी वेगाने घडू लागल्या. पुष्पाचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. टीकाकारांनी डोक्यावर घेतला. रामभाऊ काय टीकाकारांना ओळखत नव्हते? बारटक्केला किती पैसे सोडावे लागले असतील ह्याची कल्पना ते करू शकत होते.

बारटक्के हे सगळे नक्की कशासाठी करत असावा?

त्याच्या वागण्यात खरं पाहिलं तर तसे काही वेडे वाकडे दिसत नव्हते. हे प्रकरण इथेच थांबणार नव्हते. संग्रहाची पहिली आवृत्ती हातोहात खपली. प्रकाशक दुसऱ्या संग्रहाच्या आशेने घरी चकरा टाकू लागला. पुष्पा ऊर्फ साधना वहिनी तहान भूक विसरून कविता करण्यात दंग झाल्या. रामभाऊच्या आणि बबड्याच्या जेवण्याचे हाल होऊ लागले. पुष्पाताईनी उपाय शोधून काढला. घरात पोळीण बाईंची एन्ट्री झाली. त्या भल्या सकाळी येत, पुष्पा त्यांना पीठ काढून देत असे मग अर्ध्या तासात त्या पोळ्या करून बाहेर पडत. गल्लीच्या तोंडाशी पोळी भाजी केंद्र होते, तिथून भाजीचा रतीब सुरु झाला. संध्याकाळी बाईंचा कुठेना कुठे कार्यक्रम असे. पुष्पाची आता दोन तीन सरकारी कमिट्यावर नेमणूक झाली होती. रामभाउंना बायकोचे दर्शन दुर्लभ झाले. रामभाऊंना फोन घेणे, निरोप देणे हेच काम झाले. फोन करणारे त्यांना मॅडमचे पी ए समजत. सगळ्यात जास्त राग त्याचा होता. रामभाऊना बायकोचा हेवा, मत्सर, द्वेष वाटायला लागला. सांगणार कोणाला? सगळे म्हणणार पहा ह्याचा नवरेपणा! बायकोचा उत्कर्ष ह्याला सहन होत नाही. असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार. अवघड जागी दुखणे. बारटक्के कधी दिसला की त्यांच्या तोंडात गलिच्छ शब्दांची लाखोली येत होती. पण तेवढेच.

ह्या बारटक्क्याने माझ्या संसाराला आग लावली. विष कालवले.

बबडयाकडे ना बाबांचे ना आईचे लक्ष होते. बबड्याला त्याची काळजी नव्हती. त्याला विज्ञानात प्रचंड रुची होती. तो आणि त्याचे वैज्ञानिक प्रयोग ह्याच्यात तो रंगून गेला होता. शोभादर्शक यंत्रापासून सुरवात करून तो आता कुठल्याकुठे पोहोचला होता. नवीन नवीन गॅजेट बनवणे त्याचा डाव्या हातचा मळ झाला होता. तो काय बोलतो आहे हे आईला समजत नव्हते आणि ते समजून घ्यायला बाबांना वेळ नव्हता. त्याला आता बाबांच्या कुशीची क्वचितच आठवण होत होती. घरात कुणी नसेल तेव्हा अधून अधून बारटक्केकाका येऊन त्याच्याशी गप्पा मारत. बबनच्या अनोख्या प्रयोगात त्यांना स्वारस्य वाटत असावे. बबन देखील त्यांना उत्साहाने स्वतःच्या प्रयोगांबद्दल रंगून रंगून माहिती देत होता.

“काका, हा पहा माझा पांढरा उंदीर! ह्याला मी ह्या बॉक्समध्ये सोडला.” बबनने बाटा बुटाच्या खोक्यात उंदीर सोडला. खोक्याला दोन विजेच्या तारा जोडल्या होत्या. आणि एक स्विच! बबनने स्विच ऑन केला, खोक्यांचे झाकण उघडले. आतला उंदीर अदृश्य झाला होता.

“अरेच्च्या, कुठे गेला उंदीर?” काकांना आश्चर्याचा धक्का बसला, “बबनराव, व्वा जादू-ई-कमाल. त्या डब्ब्याच्या चोरकप्प्यात उंदराला पाठवलस ना! माझा पंगा घेणे इतके सोपे काम नाही. आख्या इंडियाचे पाणी प्यालो आहे मी.”

बबन मनमुराद हसत होता, “काका तुम्हाला असेच वाटणार. विज्ञान हे अशीच जादू करते, उंदीर तुमच्या विजारीच्या खिशात आहे. हो हो हो.”

बारटक्के काकांनी घाबरून उंच उडी मारली. “काका घाबरू नका,” बबनने स्विच फिरवला, “आता उंदीर खोक्यात परतला आहे. ह्याला आम्ही दूरवहन म्हणतो.”

“मी जातो कसा इथून, हो नाहीतर मला तू कुठे तरी पोहोचवशील. तुझा काय नेम नाही रे बाबा.”

==========================================================================

रामभाऊ केव्हापासून गोष्ट लिहायचा प्रयत्न करत होते.

“विमल मेमरीत जा. गाय आणि गवत घेऊन ये. त्यांना गणित आणि तर्कशास्त्राच्या एकक मधे टाक. गोपाल तू गायीला गवत खायला दे. ऑं, गाय गवत खात नाही? तू “तो गाय” आणलास. मी “ती गाय” आणायला सांगितले होते. आता त्याला पिझ्झा खायला घाल.......”

हे असे पाचव्यांदा झाले होते. त्यांच्या मनात नव्हते तरी असलीच भयानक वाक्यं पुन्हा पुन्हा येत होती! निराशेने त्यांनी आपले डोके हलवले. जणू काय त्यांना आपल्या डोक्यातल्या अडगळीतून ते वाक्य झटकून टाकायचे होते. त्यांनी ती फाईल फेकून दिली. नवीन डॉक्युमेंट उघडले. टायपिंगला सुरवात केली.

काहीतरी अज्ञात अमानवीय त्यांना गोष्ट लिहू देत नव्हते. रामभाउंच्या आयुष्यात हा पहिला अनुभव होता. त्यांना आव्हान दिले जात होते. लिहावे की न लिहावे हा नेमका प्रश्न होता. रामभाउंनी पुन्हा लिहायला सुरवात केली.

“पेरूची फोड फारच गोड.......”

आता मात्र रामभाउंची सहनशक्ति संपली.

“अहो, ऐकतायना. मला १०:३५ फ्लाईट पकडून दिल्लीला जायचे आहे. आज ज्ञानपीठ पुरस्कार निवड सामितीची बैठक आहे.”

माझ्यावर भाव खाते आहे. काय समजते काय स्वतःला ही. जायचे तर जा ना. गावभर डांगोरा पिटणे जरुरी आहे?

“बरं मग?” रामाभाउंनी तिरसटपणे विचारले.

“फ्रीजमधे पोळीण बाईने पोळ्या करून ठेवल्या आहेत. पोळी भाजी गरम करून घ्या आणि जेवा. मला घाई आहे खाली बारटक्के भावजी टॅक्सी घेऊन वाट पहात आहेत.”

स्टडी रूमचा दरवाजा उघडून बबड्या धावत आला. “आई ग, बघ मी काय गंमत केली आहे. तो पांढरा उंदीर----“

“बबड्या, मी दिल्लीहून परत आले की रात्री मला दाखव हं. मी आता घाईत आहे,” पुष्पांचा मोबाईल वाजला. “हो हो. निघालेच मी.” बॅग उचलून ती बाहेर पडली होती.

बबड्याचा हिरेमोड झाला असणार हे त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. त्याने आपला मोहरा रामभाऊंकडे वळवला. “बाबा, तुम्ही तरी बघाना माझी गंमत! मी किनई पांढरा उंदीर------“

“बबड्या बघतो आहेस ना. मी गोष्ट लिहायचा प्रयत्न करतो आहे. त्यांत तू नको कटकट करून मोडता घालूस. जा, पळ आपला अभ्यास करत बस बघू.” रामाभाउंनी बबड्याला पालवून लावले.

निराश बबड्या हळू हळू पावले टाकत स्टडी रूम कडे वळला.

स्टडी रूमचा दरवाजा उघडून बारटक्के काका आत आले. “हॅलो, लिटल आईन्स्टाइन! काय चाललाय उद्योग? झाले की नाही तुमचे टाइम मशीन रेडी? केव्हा जायचे डायनासोर बघायला?”

काकांना पाहून बबड्या खुश झाला, “टाईम मशीन नाही पण हे पहा मी काय केले आहे ते.”

काकांनी बघितले तर बाटा शूच्या रिकाम्या खोक्याला तारा जोडल्या होत्या. तारा एका पीसीबीतून बॅटरीकडे जात होत्या. “हा काय प्रकार आहे?”

“काका, तुम्ही फक्त गंमत पहा.” बबड्याने पिंजऱ्यातून एक खाऊन पिऊन गब्दुल झालेला पांढरा उंदीर बाटाच्या खोक्यांत सोडला. झाकण लावले. स्वीच ऑन केला. खोक्यातून चित्र विचित्र आवाज आले. थोडी खरखर, थोडी घरघर, थोडे ची ची. आवाज थांबले. बबड्याने झाकण उघडले. उंदीर गायब झाला होता.

“बबड्या, उंदीर कुठे गेला रे? त्या दिवसासारखा माझ्या पॅंटच्या खिशांत पाठवला नाहीस ना.” काका खिसे चाचपत म्हणाले.

“नाही नाही काका. तो गेला समांतर विश्वांच्या प्रवासाला!”

“बबड्या, ही असली जादू रस्त्यावरचे चवलीपावलीचे जादुगार करतात. त्यात काय मोठेसे?”

बबड्या हसला, “ही हात चलाखी नाही काका. मी स्थळ-काळाला खिंडार पाडून त्यात हा उंदीर सोडला आहे. ह्याला फिजिक्स म्हणतात काका.”

“ह्याला परत कसा आणायचा?”

“अगदी सोप्प आहे. हा स्वीच इकडे टाकायचा.” बबड्याने खोक्याचे झाकण उघडले. आत उंदीर महाशय आपण त्या गावचेच नाही अशा आविर्भावात बसले होते.

“इतके सोपं आहे? मला बघू दे जरा.” बारटक्के काकांनी बॉक्स उचलली. “हे कसे शक्य आहे?”

बबड्याने कागदाच्या चतकोर तुकड्यावर एक समीकरण मांडले. “हे तुम्हाला जर समजले ----“

काकांनी कागद चुपचाप खिशात टाकला.

क्षणात निःशब्द उलथापालथ झाली. आणि काका बॉक्ससह नाहीसे झाले.

डिसेंबर सन २३२१

विश्वाच्या आणि मानवाच्या रोजच्या घडामोडींवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी असलेल्या सगळ्या प्रमुख शास्त्रज्ञांची बैठक चालू होती. गेल्या महिन्यातल्या महत्वाच्या घटनांचा आढावा घेण्यासाठी ही मासिक बैठक होती.

“झिरोझिरोझिरो कडून काही समाचार?” वयोवृद्ध शास्त्रज्ञ श्री. बेगुस रॉय ह्यांनी विचारले.

निराशेने मान नकारार्थी हलवत प्रमुख शास्त्रज्ञ धाबा म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे. झिरोझिरोझिरो एकदा कामगिरीवर गेला की काम करून परत येईपर्यंत त्याचा थांगपत्ता नसतो.”

“आपण सुद्धा काही वेळा मूर्खपणा करतो. आपण सतराव्या शतकात हुशार न्यूटनला पाठवल्रं, त्यानंतर तब्बल दोनशे वर्षांनी म्हणजे एकोणीसाव्या शतकात मॅक्स्वेल तिकडे गेला. ही गॅप ठीक होती. पण नंतरच्या विसाव्या शतकात आपण एकसे एक शास्त्रज्ञ पाठवले, मॅक्सी आणि आल्बर्टला वर निळूभाउ! मग काय अण्वस्त्र बनवायाला वेळ लागतो काय? बघा काय झाले त्याचे भीषण परिणाम.” कुणीतरी तक्रारीचा सूर लावला.

“वरून ऑर्डर आली, मला करावं लागलं.”

“आता समांतर विश्वाची कल्पना कुणी दिली? एक बरं झालं की तो सिद्धांत मांडणाऱ्या एवरेटची लोकांनी एवढी म्हणजे एवढी थट्टामस्करी केली की बिचारा पुन्हा क्वांटम फिजिक्सच्या वाटेला गेला नाही.”

“हो. तुम्ही म्हणता ते सत्य आहे. जर मानवाला समांतर विश्वात प्रवास करण्याचे तंत्रज्ञान प्रोप्त झाले तर मोठा अनर्थ होईल. सध्या बॅंकचोर एका देशातून दुसऱ्या देशात पळून जातात. हेच बॅंकचोर मग एका विश्वातून दुसऱ्या विश्वात पसार झाले असते. मग बसा त्यांचा शोध घेत. आत्ता फक्त आपाल्या विश्वातल्या स्विस बॅंकेत खाती उघडतात. एकदा का आंतर विश्वीय संचार प्रणाली सुरु झाली की कुठल्या विश्वाच्या कुठल्या स्विस बॅंकेत खाती उघडतील त्याला धरबंध रहाणार नाही.”

अश्या विरंगुळाच्या गोष्टी चालल्या असताना चमत्कार झाला.(सन २३२१ साली देखील चमत्कार होत होते!!) समोरच्या कॉन्फरन्स टेबलावर पांढरा उंदीर प्रकटला. सगळे महामहीम अवाक झाले. अतिसुरक्षित फोर्ट शिवनेरीच्या सुरक्षायंत्रणेचा भेद करून उंदीर भर सभेत अध्यक्षस्थानी? डॉक्टर धाबांनी सुरक्षा यंत्रणेच्या प्रमुखाला फोन करून पाचारण केले.

“जनरल रोबो, हे मी काय बघतो आहे!” डॉक्टर धाबांनी उद्विग्नपणे विचारले, “हा उंदीर आमच्या सभेत?”“उंदीर? यु मीन टू से रॅट, डॉक्टर?” जनरल रोबोच्या डोक्यात बत्ती पेटेना.

“हा, आय से व्हाट आय मीन. आय मीन व्हाट आय से! आर ए टी रॅट माने उंदीर! हा उंदीर म्हणतो आहे मी, हा ऑ हा आता इथे होता. गेला कुठे चोर? मंडळी हो, इथे जो उंदीर आला होता तो कुठं गेला?”सगळे शास्त्रज्ञ अवाक् झाले होते. कोणीही उत्तर देण्याच्या मनस्थितीत नव्हते.
“सर मी चौकशी करून छडा लावतो आणि आपल्याला रिपोर्ट करतो.”

टेबलावरचा उंदीर नाहीसा झाला होता. पण चमत्कारांची मालिका संपली नव्हती. समोरच्या भिंतीतून झिरोझिरोझिरो कार्डबोर्डचा खोका घेऊन अवतीर्ण झाला.

“झिरोझिरोझिरो, आपले स्वागत आहे. पाचशे वर्षे आयुष्य आहे तुला. आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. आज बरी आमची आठवण झाली. काय बातमी आहे?”झिरोझिरोझिरो ने डॉक्टारांच्या कुत्सित बोलण्याकडे दुर्लक्ष केले. त्याने शांतपणे काळा चश्मा दूर केला. आणि तो आपले सुपरहिप्नॉटीक विजन डोळ्यातून अन्स्क्रू करायला लागला. त्याच्या त्या मख्ख शांतपणाने सगळ्यांची उत्सुकता ताणली गेली होती. सगळे वैतागले होते.

“झिरोझिरोझिरो, हया खोक्यात काय आहे?” न रहावून डॉक्टरांनी विचारले, “ह्या खोक्यावर बी ए टी ए असे मोठ्या अक्षरात लिहिले आहे. ह्याचा अर्थ काय?”
“अ हं हं,” झिरोझिरोझिरो शाहरुखखानची बतावणी करत बोलला, “त्यात उंदीर असेल किंवा नसेल. फिफ्टी फिफ्टी चान्स! हा “बबडयाचा उंदीर” आहे. त्या स्क्रोजिन्डरच्या मांजरासारखा. तेव्हा सांभाळून.” आत्तापर्यंत झिरोझिरोझिरोने दुसरा डोळा अन्स्क्रू केला होता आणि तो डोक्याचे स्क्रू ढिले करायला लागला, “बी ए टी ए म्हणजे बाटा. बबड्या अॅटम्स ट्रान्स्फर अॅपरेटस!”

“हा कागद बघा. बबड्याने ह्यावर खरडले आहे. कदाचित तुम्हा लोकांना समजेल. माझ्या समजण्यापलीकडचे आहे हे.” झिरोझिरोझिरोने तो कागद पुढे केला. सगळे शास्त्रज्ञ त्या कागदावर झपटून पडले.

“कुणाला काही समजते आहे का?” डॉक्टरांनी विचारले.

“आता आले लक्षात,” प्रसिध्द अमेरिकन शास्त्रज्ञ उद्गारले, “आपण हा मॅक्सी कॉन्स्टंट एच बार विसरलो. त्यामुळे आपले गणित चुकत होते. आता सुटेल हे समीकरण. ओ माय गॉड! एकविसाव्या शतकातील बालकाने चोविसाव्या शतकातील थोर शास्त्रज्ञांना शिकवले. मानवी इतिहासांत हे प्रथम घडलं असावं. शेम ओंन ऑल ऑफ अस! हे आपल्याला आधी सुचायला पाहिजे होते. एनीवे आता आपण स्थळ-काळाला खिंडार पाडू शकू.”

“बबड्या नावाच्या दहा वर्षाच्या मुलाने २०२० साली हे साध्य केले.” शास्त्रज्ञांच्या जखमेवर मीठ चोळायची ही संधी झिरोझिरोझिरो कशी सोडेल.

“बॉब डी?” कोणीतरी मध्ये बोलले.

“बॉब डी नाही, ब ब ड्या,” एकेक अक्षर स्पष्ट उच्चारत झिरोझिरोझिरो बोलला. “हा पुण्याचा मराठी मुलगा आहे. हे पुण्याचे लोक लई भारी असतात. बबड्या हे एक त्याचे सॅंपल! त्याने अवकाश-काळाला भोक पाडून त्यातून पांढरा उंदीर इथे पाठवला. मी सगळा रिपोर्ट सावकाश देईनच. पण आधी हा माझा रजेचा अर्ज घ्या. मी चाललो सुट्टीवर.”

“मी आशा करतो की त्या बब्बडने हा शोध अजून कुणालाही दाखवला/सांगितला नसावा.” डॉक्टरांनी सचिंत मुद्रेने विचारले.

“अर्थात नाही. त्या साठीच तर मी कालप्रवास करून २०२१ सालात पोहोचलो. त्या मुलाने जवळ जवळ समांतर विश्वात प्रवास करण्याचे गणित शोधून काढलेच होते. मी वेळेवर पोचलो म्हणून बरं झालं नाहीतर. पण हे साध्य करण्यासाठी मला केव्हढा आटापिटा करावा लागला.” ते ऐकून सगळ्या महान शास्त्रज्ञांनी सुटकेचा निश्वास टाकला. अजून कितीतरी वर्षे मानवाला स्थळ-काळ भेदण्याचे तंत्र अवगत होणार नव्हतं ही मोठी दिलासा देणारी बातमी होती.

“मी आता आपली रजा घेतो, बाय, एवरीबडी. सी यु इन न्यू इअर.”
“एक मिनिट ००० , इतकी घाई करायची नाही. पुण्याच्या पुणेकर कॉलनीत डॉक्टर ननवरे आहेत. तसा हा आपलाच माणूस आहे. तो तिथे अचाट प्रयोग करत आहे. त्याला थांबवला पाहिजे. मी विचार करतो आहे की ही जबाबदारी तू घ्यावीस.”
“काळजी करू नका डॉक्टर. त्या ननवऱ्याचा एकही प्रयोग सफल होणे शक्य नाही. कारण ह्या कॉलनीचा विद्युत पुरवठा दर एक दोन तासांनी खंडित होत असतो. चतुःशृंगी कडून ह्या वसाहतीला विद्युत पुरवठा होतो. त्या तारा अशा डिझाईन केल्या आहेत की त्यावर एक माशी जरी बसली तरी लाईन ट्रिप होते.”
“तरी देखील आपण काळजी घेतली पाहिजे. तेव्हा तू माशीचे रूप घेऊन चतुरशिंगीच्या ...”
“चतुरशिंगी नाही. चतुःशृंगी. हे पहा डॉक्टर मी स्त्री रूप घेणार नाही असे वचन मी माझ्या मैत्रिणीला दिले आहे. माशी तर नाहीच नाही. समजलं? मला सांगा तुमच्याकडे ००१ पासून ००९ पर्यंत एजंट-एजंटी पडले आहेत. त्यांना सांगा ना हे काम करायला.”
एवढे बोलून ००० जसा आला तसा कुणाच्या राग लोभाची पर्वा न करता भिंतीपार पसार होऊन निघून गेला. त्याला लवकर जाऊन प्रियेबरोबर “अंक” गणित, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्गमूळ, घनमूळ इत्यादी इत्यादी काही बाही करायचे होते ना!
Nature’s great book is written in mathematical symbols.
“Mathematics is a dangerous profession; an appreciable proportion of us go mad.”
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
“बाबा, गोष्ट सांगा ना.”
रात्रीचे दहा वाजले होते. “बबड्या, झोप आता. उशीर झाला आहे. उद्या उठून शाळेत जायचे आहे की नाही?”
बबड्या थोडेच ऐकणार होता. “बाबा तुम्ही गोष्ट सांगा. ऐकता ऐकता मी सर सर झोपेन.”
“ठीक आहे. ऐक, एक होता राजा-------“ गोष्ट ऐकता ऐकता बबड्या केव्हाच झोपी गेला.
आज रामभाऊ खुशीत होते. त्यांनी दुपारी लबाड नवरा आणि बेरकी बायको यांची एक गुलु गुलु गोष्ट लिहून संपवली होती. कथा अगदी मनासारखी उतरली होती. संपादकाला ती कथा संध्याकाळी इ-मेल केली होती. संपादकाचे खुशीचे उत्तर सुद्धा आले होते.
बबड्या झोपल्यावर रामभाऊ थोडे रोमॅन्टिक झाले होते. ‘तो’ कार्यक्रम आटोपल्यवर ते सहजच रिलॅक्स मूड मध्ये बायकोला म्हणाले, “आज का कुणास ठाऊक असे वाटायला लागले आहे की समोरच्या फ्लॅट मध्ये कुणीतरी रहायला यायला पाहिजे. ह्या मजल्यावर आपण एकटे एकटे आहोत. तुला पण सोबत मिळेल. तुला काय वाटतं?”
“मला काय वाटणार? कुणी कुटुंबवत्सल आला तर बरच होईल.”
“पुष्पे, ए तू कविता लिहितेस का ग?”
“इश्श्य काहीतरीच काय बोलता. कविता? मी आणि कविता? तुम्हीच माझे कवि---“
“आणि तू माझी कविता!”
अशा गप्पा टप्पा करत तृप्त मनाने दोघे निद्रादेवीच्या कुशीत सामावून गेले.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बबड्याचे पुढे काय झाले? सांगतो. त्याने आयआयटीतून संगणकशास्त्राची पदवी घेतली. सध्या यूएसमध्ये असतो. यूएसएचे नागरिकत्व मिळवण्याची खटपट चालू आहे. होऊन जाईल. कुलस्वामिनीच्या कृपेने सगळे सुरळीत पार पडेल अशी आशा आहे. बबड्या एकूण मजेत आहे.
दुर्दैव आपलं. आणखी काय बोलणार?

==========================================================================

(समाप्त).

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आबा.
थोडे मॅॅटर नवीन टाकले आहे.
अप्रिय आठवणींपासून सुटका मिळावी म्हणून!
मनःशांति साठी.