आधीच्या भागाची लिंकः
काश्मीर डायरीज -२ : https://www.maayboli.com/node/81916
17 मे 2022
रात्रभर अरु, बेताब, बैसरन व्हॅली ची स्वप्नं बघत बघत मस्त झोप झाली. सकाळी 5.30 लाच बाहेर लख्ख उजाडलं होतं. पटकन आवरून परत एकदा बाहेर नदीवर जाऊन आले. पहलगाम ला आज निरोप द्यायचा होता. परत एकदा लीडर नदी चा खळखळाट कानात साठवून घेतला. भरपूर शुद्ध हवा छातीत भरून घेतली. रूम वर येऊन पटापट आवरून चेकआउट करून निघालो.
आजचा मुक्काम होता.. दल लेक, श्रीनगर.
पहालगाम ते श्रीनगर चा सुंदर रस्ता परत सुरू झाला. परत एकदा सगळं चित्र डोळ्यात साठवून घेतलं.वाटेत ओळीने सफरचंदाच्या बागा लागायला सुरुवात झाली होती.सध्या सिझन नाही पण तरी छोटी छोटी हिरवी सफरचंद लागली होती झाडांना.एका बागेपाशी गाडी थांबवली.
बाहेर सफरचंदाचा ताजा ज्यूस आणि इतर बरेच प्रॉडक्ट्स विक्री चालू होती.आत बागेत एक फेरफटका मारला..
पहिल्याच झाडाला 3-4 छोटीशी थोडी लालसर सफरचंदे लटकली होती. पुढे जाऊन सगळी बाग पहिली. सगळ्या झाडांना लहान लहान हिरवी सफरचंद लागली होती. अगदी आपल्या पेरू सारखी दिसत होती.पहिल्याच झाडाला लाल सफरचंद कशी काय बुवा म्हणून मागे येऊन बघतो तर तारेने बेमालूम पणे झाडाला बांधलेली ती सफरचंदे बघून हासू आवरेना.मार्केटिंग गिमिक्स साठी काय काय करतील लोक. धन्यवादच.आम्ही आपले त्या सफरचंदासोबत मस्त फोटो बिटो काढून घेतले होते.
पण काही का असेना.निदान झाडाला आलेली सफरचंदे कशी दिसत असतील याचा अंदाज आला.
बाहेर चवीला म्हणून 1 ग्लास सफारचंदांचा ताजा ज्यूस घेतला तर मस्त गोड होता.तिथे मग मनसोक्त ताजा ज्यूस प्यायला. सोबत सफरचंदाचे लोणचे, चटणी, जॅम, सॉस अशा अनेक गोष्टी चव घेऊन पाहिल्या.सर्व वस्तू अप्रतिम चवदार. Apple cyder vinegar पण मस्तच होते. भरपूर खरेदी करून तिथून निघालो.
पुढचे ठिकाण होते "मार्तंड सूर्य मंदिर"
आमच्या itinerary मध्ये नसलेले हे ठिकाण, पण इनायत भाईंनी आग्रह करून आम्हाला इथे नेले. तुम्हाला खूप आवडेल असे म्हणत वाटेतले हे एक अनवट ,टुरिस्ट लोकांना फारसे नाहीत नसलेले हे एक सुंदर मंदिर आहे.शेजारी एक गुरुद्वारा सुद्धा आहे.
शंकर पार्वती, गणपती अशी छोटी छोटी मंदिरे आणि पूर्वी कधीच ना बघितलेले असे सूर्याचे मंदिर इथे आहे. समोर मोठा चौकोनी तलाव आणि त्यात भरपूर मासे. शांत स्वच्छ असा परिसर आहे हा.खुप प्रसन्न वाटले तिथे.
तिथून पुढचे ठिकाण होते "अवंतीपुरा मंदिर"
अनंतनाग जिल्ह्यातील अतिशय सुंदर असे हे ठिकाण.
अवंतीवर्मन राजा ने 9 व्या शतकात झेलम नदीच्या काठी बांधलेल्या विष्णु मंदिराचे हे अवशेष आहेत. संपूर्ण दगडातील हे मंदिर वास्तुकलेचा सुंदर नमुना आहे. आम्ही पोचलो तेव्हा भर दुपार होती पण तरी मंदिराच्या आवरातली बाग, आजूबाजूचे डोंगर आणि झाडांमुळे मस्त गार वारा येत होता.
काश्मीर ची हीच मजा आहे. वर डोक्यावर कितीही उन्ह असुदेत, अजिबात गरमी होत नाही. हवा सतत थंड, आल्हाददायक असते.
या ठिकाणी सुप्रसिद्ध आंधी चित्रपटातील "तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नाही" या गाण्याचे शूटिंग झाले होते.मग आमच्या "संजीव कुमार" सोबत तिथे जोरदार फोटोसेशन आणि व्हिडीओ शूटिंग करून घेतले. सोडते का काय
या मन्दिराच्या आवारात मोठे मोठी चिनार वृक्ष होते. चिनार ची झाडे आणि पाने सुद्धा खुप सुन्दर दिसतात. त्या झाडाच्या खाली मोठे मोठे पार बांधलेले आहेत.एकंदरीत मंदिर छान राखलेले आहे.
पुढचा सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे "केशर खरेदी".पहालगाम ला जाताना केशराची शेते पाहिली होती तिथेच पम्पोर गावाजवळ केशराची दुकाने आहेत.केशर, अक्रोड, मामरा बदाम, केशरचे क्रीम, केशर चा स्क्रब, अत्तर, कहावा असे अनेक उत्तम प्रकार तिथे होते. खास काश्मिरी लाल मिरची आणि आपल्या कोल्हापुरी कांदा लसुण मसाल्यासारखा काश्मिरी मसाला सुद्धा होता तिथे. अनेक प्रकारचे सुके मेवे असेच चवीसाठी म्हणून तिथे ठेवले होते आणि आम्हाला उत्तम असा कहावा तिथे प्यायला मिळाला.तिथे मनसोक्त खरेदी केली. त्या दुकानातून घेतलेले क्रीम आणि स्क्रब खरच खूप अप्रतिम आहे. आणि केशर सुद्धा उत्तम निघाले. इथे खिसा फारच हलका झाला. काश्मीर मध्ये कितीही ठरवलं तरी खरेदीचा मोह टाळूच शकत नाही.
आता मात्र मंडळी दमली आणि गाडी थेट श्रीनगर च्या दिशेने धावू लागली.
आज चे लंच जरा खास होते. प्रसिद्ध "काश्मिरी वाझवान" चाखायला जायचे होते आज.
श्रीनगर मधील त्यासाठी खास असलेल्या "मुघल दरबार" या हॉटेल बद्दल नेट वर वाचले होते आणि इनायत भाईंनी पण तेच हॉटेल सुचवले.तिथे दुपारी पोचलो.वाझवान म्हणजे काश्मिरी मेजवानी. काश्मीर मध्ये लग्न समारंभात खास आचारी बोलावून हे बनवले जाते.
तिथले लोक पक्के भातखाऊ.त्यामुळे भात आणि वेगवेगळे मांसाचे प्रकार म्हणजेच रोगनजोश, तबकमाझ, रीस्ता,गुश्टाबा, कबाब अशा भारीपैकी नावांचे वेगवेगळे रस्से म्हणजे वाझवान.
मटन मी फारसे कधी खात नाही पण बाहेर पडले की लोकल डिश खाऊन बघायला हवी असे आम्हाला वाटते म्हणून चवीसाठी खाऊन पाहिले. ठीकच होते. मला विशेष आवडले नाही. कदाचित टेस्ट डेव्हलप व्हायला हवी.आजूबाजूचे लोक ज्या उत्साहाने खात होते त्यानुसार ते चांगलेच असणार.
भरपेट खाऊन आता डोळ्यावर झोप यायला लागली होती.. 3.30 वाजून गेले होते..थोडी पावसाची भुरभुर सुरू झाली होती.. हवा जरा अजूनच गार झाली होती.आता थेट हाऊसबोट वर जाऊन जरा आराम करू म्हणून थेट दल गेट No 8 ला पोचलो.
समोर दिसत होती आमची हाऊसबोट.....The Royal Sovereign...
दल लेक जवळ पोचलो आणि एकदम वेगळ्याच जगात पोचल्यासारखं वाटलं..
आमच्यासाठी शिकारा तयार होता.. त्यात बॅग्स चढवल्या, आम्ही पण चढलो आणि आमच्या हाऊसबोट कडे निघालो.. मस्त गार वारा येत होता. ढग आल्यामुळे उन्ह गायब झालं होतं. 5 मिनिटात आमच्या हाऊसबोट मध्ये पोचलो सुद्धा. तिथल्या गुलजार भाईंनी छानपैकी हसून स्वागत केलं..
आमच्या तरंगत्या राजेशाही घरात आम्ही प्रवेश केला.किती सुंदर सजवली होती ती हाऊसबोट.संपूर्ण लाकडात बनवलेली, उंची पडदे, गालिचे, झुंबर, शिसवी मोठे नक्षीदार डायनिंग टेबल आणि 4 बेडरूम्स. तरंगता महालच.
बाहेर डेक वरच बसून राहवेसे वाटत होते. शिकारे येत जात होते.. हलका पाऊस सुरू झालेला.
झोपायचा बेत रजईत गुंडाळला आणि पुढच्या एक तासात आमच्या शिकारा राईड साठी आम्ही बाहेर पडलो सुदधा.
पाऊस आता थांबला होता पण अजून हवा ढगाळ होती. दल लेक ची आणि तिथल्या तरंगत्या मार्केट ची सफर करायला आम्ही शिकारा मध्ये स्थानापन्न झालो.गाद्या, उशा, पडदे असलेल्या त्या शिकारामध्ये मस्त पाय पसरून बसलो.शिकारावाला अखंड बडबड करत लेक बद्दल सांगत होता.थोडं पुढे गेलो तर परत मस्त पाऊस सुरू झाला आणि आता चांगलीच थंडी वाजायला लागली. दल च्या मध्यभागी एक तरंगते हॉटेल होते. तिथे स्टॉप घेऊन गरम मॅगी आणि भजी चहा ऑर्डर केली. शिकारा मध्ये बसून बाहेर चा पाऊस बघत भजी खाणं म्हणजे सुख.
पुढे जाऊन तरंगणारी शेती बघितली, मीनाबाजार म्हणून दल मध्ये मार्केट आहे.तिथे एक चक्कर मारून आलो. पण मुलखाचा महाग. वाटेत शिकारा चे ट्रॅफिक जॅम पण पाहिले. हा हा हा.
परत येता येता पाऊस थांबला, जोरदार वारा सुटला आणि समोरचे सगळे ढग बाजूला सरले. आता समोर थेट दिसत होते गुलमर्ग चे बर्फ़ाचे डोंगर.
आत्ता लिहिता लिहिता सुद्धा ते दृश्य आठवून काटा आला अंगावर. काश्मीर ला किती प्रकारचं सौंदर्य लाभलंय.पहलगाम मधून दिसणारे बर्फ़ाचे डोंगर आणि आत्ता दल लेक मधून दिसणारे डोंगर यात किती तरी वेगळेपण होतं.दोन्ही तितकंच सुंदर. तुलनाच करता येणार नाही.
शरीर आणि मन दोन्ही तरंगतच परत बोट वर आलो.
घरगुती गरम जेवण जेऊन दुलई मध्ये कधी झोप लागली कळलेच नाही.
-- क्रमशः
पुढच्या भागाची लिंकः
काश्मीर डायरीज -४: https://www.maayboli.com/node/81943
सुंदर. लेख, वर्णन आणि दृश्य
सुंदर. लेख, वर्णन आणि दृश्य सारेच सुंदर.
सुंदर. लेख, वर्णन आणि दृश्य
सुंदर. लेख, वर्णन आणि दृश्य सारेच सुंदर.
खूपच छान प्रवास वर्णन. आमच्या
खूपच छान प्रवास वर्णन. आमच्या मागच्या वर्षीच्या काश्मिर सहलीच्या आठवणी जाग्या झाल्या .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुंदर भाग हाही! जायला हवं
सुंदर भाग हाही! जायला हवं काश्मीरला.
छान चालू आहे मालिका.
छान चालू आहे मालिका.
हाऊसबोटचं वर्णन इतकं भारी केलंय की अब काश्मीर की ट्रिप तो बनती हैं
सुंदर. लेख, वर्णन आणि दृश्य
सुंदर. लेख, वर्णन आणि दृश्य सारेच सुंदर.+१११ तुम्ही एकूण किती जण होतात व किती खर्च आला.
मस्त वर्णन , छान ट्रिप चालू
मस्त वर्णन , छान ट्रिप चालू आहे तुमची !! आणि तुमच्याबरोबर आमची .
किती भारी आहे काश्मीर.. लेख
किती भारी आहे काश्मीर.. लेख छानच
मस्तच.. मी देखिल १०
मस्तच.. मी देखिल १० वर्षांपूर्वी गेलेले काश्मिरला.. वर दिलेल्या काही ठिकाणांचा विसर पडलेला.. हा मी तेव्हा काढलेला दाल लेकच फोटो .. सगळ्यात जास्त आवडलेली जागा
![6A1F1BC6-09D5-4ED2-A4D0-832CF77732B6.jpeg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u76274/6A1F1BC6-09D5-4ED2-A4D0-832CF77732B6.jpeg)
सुंदर प्रवास वर्णन. फोटो ही
सुंदर प्रवास वर्णन. फोटो ही छान. एकदम तीन ही भाग वाचले.
प्रतिसादांसाठी धन्यवाद.
प्रतिसादांसाठी धन्यवाद.
म्हाळसा, सुन्दर फोटो आहे तुम्ही टाकलेला.
सुंदर. लेख, वर्णन आणि दृश्य सारेच सुंदर.+१११ तुम्ही एकूण किती जण होतात व किती खर्च आला. >> शेवटच्या भागात सगळे डिटेल्स द्यायचा प्रयत्न करते.