आत्या

Submitted by सामो on 14 July, 2022 - 01:49

अप्पा काका, सुधाक्का आणि बेबी आत्या तिघा भावंडात ४-४ वर्षाचे अंतर पैकी बेबी आत्या शेंडेफळ. सगळ्यात लहान व सर्वांची लाडकी. लहानपणी मी म्हणे बेबीआत्यासारखी दिसायचे. तिचा फोटो आहे आमच्याकडे. तेल लावून चोपचोपून बसवलेले केस व २ वेण्या, काळ्या रिबीनी लावलेल्या. लहानपणी वाटे माझे केस इतके चप्प कुठे आहेत. मी थोडीच आत्यासारखी दिसते? पण पुढे मात्र आपण तिच्यासारखे दिसतो याचे अप्रुप वाटू लागले. आत्याबद्दल प्रचंड जिव्हाळा वाटू लागला.

काही महीन्यांपूर्वी, आत्या येणार म्हणुन केवढी लगबग चालली होती माझी. ती येणार होती जेमतेम १ महीना रहायला. १ महीना फारच कमी होता, इतक्या तिच्याशी गप्पा मारायच्या होत्या मला. मला तिला विचारायचे होते ते माझ्या पणजी-पणजोबांची नावे, ते कसे होते, बाबा, काका व आत्या लहानपणी मस्ती करत का? काय खोड्या काढत? बाबांचे आईशी, आंतरजातिय लग्न ठरल्यानंतर घरात काय बोलणी झाली, कोणी विरोध केला का? आईबद्दल त्यांचे काय मत पडले पश्चात ते तसेच राहीले की बदलले? आत्याच्या मैत्रिणी कशा होत्या? लाडकी कोण होती, तिच्याशी कसे पटे?अथवा न पटे?

- थोडक्यात मला माझ्या रुजलेल्या मूळांचा मागोवा घ्यायचा होता. ब्लड इज थिकर दॅन वॉटर म्हणतात ते खोटे नाही. आपला स्वतःचा शोध हा आपली मूळे शोधल्याशिवाय अपूर्णच असतो. मारे तुमच्या बळकट पंखांनी तुम्ही आकाशात भरार्‍या घ्याल पण दिवस मावळला की आपण आपल्या घरट्यातच, आपल्या कोटिरातच परततो. मनःशाम्ती शोधतो. आत्याचा प्रेमविवाह होता. आतोबा गुजराथी ब्राह्मण होते. त्यांच्या पश्चात , ती कॅनडाला मुलाकडे रहात असे. मुलगा व सून पडले अट्ट्ल गुजराथी ब्राह्मण. ना लसूण खात ना कांदा ना आलं मग आत्याला अन्न काही पचत नसे. कडधान्ये पचायला जड जात बिचारीला.तरी ती सुंठ पावडर घालून चहा पित असे. पण तेवढ्याने काय होते! तिच्या पोटात वरचेवर दुखत असे. संधीवातानेही जोर धरला होता. डाव्या गुडघ्याचे ऑपरेशन झाल्यापासून, वॉकर घेउनच बिचारी चाले.

माझ्याकडे ती येणार त्याची जोरदार तयारी सुरु होती. तिच्याकरता, मी गेस्ट रुम अगदी सुसज्ज केलेली होती. नवी चादर, अभ्रे, आत्याला, अति थंड पाणतिबाधू नये पण माफक थंड पाणी मिळावं म्हणुन एक लहान मातीची सुरई काय आणुन ठेवली होती. कपाट रिकामे करुन, स्वच्छ करुन, सुगंधी डांबरगोळ्या घालून ठेवलेल्या होत्या. कोपर्‍यात मेजावरती मोगर्‍याची कुंडी ठेवलेली होती. प्लॅन्स तर काही विचारु नका,
तिला कारने बागेत न्यायचे, बोटॅनिकल गार्डन दाखवायचे, गच्चीवरती दोघींनी मिळून चांदण्यात मसाला दूध प्यायचे. होय चांदीच्या पेल्यातच. एक ना दोन.

फोनवरती, आत्याचा आणि माझा गप्पांचा कॉमन विषय असे - अध्यात्म. ती माझ्यासारखीच .... अर्र नाही नाही. मी तिच्यासारखीच होते - डोळे मिटुन देवावरती विश्वास टाकणारी. श्रद्धा हा डोक्याने विचार करण्याचा विषय नाहीच असे मानणारी. अर्थात मी स्तोत्रांत गुंतलेले तर ती भगवदगीतेत. भगवदगीतगवमाझ्याकरता फारच हायफाय होती पण आत्या तिला माहीत असलेले, तिच्या चिंतनातून तिला कळलेले विचार मला सांगे. विभूतीयोग, कर्मयोग. फार मजा वाटे. व्हॉटसअ‍ॅपवरती मी आत्याला सुंदर सुंदर चित्रे पाठवत असे ज्यात देवीची खूप चित्रे असत. आत्या म्हणत असे - कालीमातेची व गाढव वहान असलेल्या, हातात सूप घेतलेल्या कालरात्रीची म्हणजे महामारी देवीची चित्रे नको पाठवत जाऊ बाई. मला भिती वाटते, व मी हसून म्हणे, ठिक आहे . आता बघ मी तुला गजलक्ष्मीचेच सुंदर चित्रच पाठवते. मग तर खूष? Happy

आमच्या बोलण्यात, दुसरा विषय असे सिंधू आज्जी व नानांचा. आज्जीविषयी ती भरभरुन बोलत असे. आईच ना तिची. मला खूप आनंद होइ. नवनवीन गोष्टी कळत. खरे तर स्वतःचे प्रतिबिंब माझ्या पूर्वजांत म्हणजे आज्जी आजोबांत सापडले की मला निखळ आनंद मिळे. काय कमाल आहे नाही निसर्गाची. काय सुपर-इन्टेलिजन्स कोडेड आहे आपल्या सर्वांच्या गुणसूत्रांत. युगानु युगांपासून आलेले शहाणपण, मिळालेले अक्कलेचे धडे, आपण पुढच्या पिढीला वारसाहक्काने पास करत असतो. हे मिरॅकल आहे. हा चमत्कार आहे आणि तो चमत्कार आपल्याला आपल्याच सग्यांच्या माध्यमांतून कळून येउ शकतो. त्यांच्यावर विनाकारणच प्रेम दाटून येतं - हे सग्गळ नवं होतं माझ्याकरता, अद्भुतच. 'सिक्रेट गार्डन' पुस्तकात लहानशी मुलगी मागोवा घेत घेत अचानक कोणत्याशा सुंदर वनश्रीने नटलेल्या बागेमध्ये जाउन पोचते आणि तिला सुखद धक्का बसतो तसे काहीसे. मला जणू नविन डोळे फुटले आहेत असे वाटत होते. स्वतःचे नवीनच रुप मला माझ्या नात्यांत सापडत होते. केवढा उत्साह, सकारात्मकता घेउन आत्या आली होती माझ्या आयुष्यात. तिला ते माहीतही नव्हते. तिचे लाड व्हॉटसअ‍ॅप मधून माझ्यापर्यंत पोचत होते.

आत्या खूप स्वाभिमानी होती. तिला कोणाची सेवा घेउ नये असे वाटत असे. अगदी मुला-सूनेचीही. मग मी तिला नाना तर्हेने पटवून देण्याचा प्रयत्न करे - अगं आत्या तू आयुष्यभर केलस आता तू रिसिव्हिंग एन्ड ला आहेस. तू आता आराम करायचास. शिवाय त्यांनाही आनंदच आहे तुझे करण्यात. त्यावर ती म्हणायची 'ते खरे आहे गं पण ...." हा 'पण' मात्र नेहमीचा. तिला कोणावरही अवलंबून रहाणे अगदी पसंत नसे. आणि मला तर वाटे तिने माझ्याकडे यावे व मी तिचे पाय चेपावे, तेलाने मालिश करुन द्यावेत.
हे सर्व विचार मनात आले की मला अचानक माझ्या सासूबाईंची आठवण येई. अरे हे असे इतके प्रेम , मला त्यांना का देता आले नाही. तेव्हा का मी हिशेबी व कोत्या वृत्तीने, मनाने वागले व माझ्या मनात प्रचंड, विलक्षण, खूप खंत दाटुन येइ. आत्या वरील प्रेमात व सासूबाईंवरील प्रेमातले अंतर मला प्रकर्षाने खटके. असो. हे माझ्या लक्षात येऊ शकले, हेही नसे थोडके.

- बहुतेक क्रमशः-

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लेख आहे सामो आवडला. आत्या हे नात नाही मला आणि माझ्या बाबांना. आजी रडायची म्हणे प्रत्येक सणाला की मला मुलगी नाही म्हणून. आणि आम्ही ११ नाती झालो तीला ५ मुलां पासून. खुप माया करायची. पण ऊणीव आहे सगळयांना की आत्या नाही. हे नात राहील.

देवकी, हीरा -पुढे काहीतरी सुचावे अशी माझीही आशा आहे. पण आत्ता काहीच नाहीये. पण ओपन एन्डेड ठेवते आहे. ८०% सुचेलसे वाटते आहे.
शर्मिला धन्यवाद.

छान लिहीले आहे सामो तुम्ही.मन खूप गुंतले वाचताना आणी लगेच संपविलेत.
मलाही आत्या आणी आज्जी ही नाती नाहीत.वडीलांची आत्या जास्त येत नसे आमच्याकडे .खूप वर्षानी यायची पण ती दुसर्या आजोबांकडे दोन-तीन दिवस राहायची आणी आमच्याकडे आज्जी आणी आजोबा नसल्यामुळे फक्त चहा पिऊन पाच दहा मिनिटे आईजवळ बसून जायची.ती गेली तेंव्हाही मी लहान होते.आईही खूप लवकर गेली त्यामुळे मीही गावी गेले की वडील आणी काका यांच्याकडून जुन्या आठवणी काढून नवीन काही समजते का याचा शोध घेत असते कायम.त्यामुळे खूपच रिलेट केले वाचताना.माझे वडील मला काही सांगत असताना माझे आणी आणी काय चालूच असते कायम.वडीलांची आईही वडील खूपच लहान असताना गेली.
पुढे जरुर लिहा.

सोना पाटील आपल्या प्रतिक्रियेबद्दल, आपले धन्यवाद. रक्ताचे नाते खूप ओढ लावणारे असते, हेच खरे. मी, दुसरा भाग लिहीण्याचा प्रयत्न नक्की करेन.

अग काय सुंदर लिहिले आहेस सामो! अगदी रिलेट झाले.
आम्हाला सुदैवाने ४ आत्या. चुलत बहिणी वै. मिळुन आम्ही सहा जणी. चारही आत्या आमच्याशी अगदी मैत्रीणीसारख्या रहाय्च्या.
मी ही माझ्या मोठी आत्यासारखी दिसते असे म्हणतात. Happy एक अप्रुप असते ते ही.
माझ्या आत्याच्या आठवणीवर मी पण एक लेख लिहिला होता. https://www.maayboli.com/node/25414

छान लेख सामो. माझीही आत्या बेबी आत्या आहे पण ती सगळ्यात मोठी Happy . आणि मी सगळ्यात लहान आत्यासारखी आहे असे मलाही लहानपणापासून सगळे सांगतात. आणि ती माझी आत्या माझ्या बाबांना सगळ्यात धाकटी बहीण म्हणून अतिप्रिय होती... सो तिच्याशी माझं असलेल्या बॉंडिंग खुप स्पेशल आहे माझ्यासाठी. त्यात माझे बाबा शोधते मी नेहमी.

खूप सुंदर लेखन आहे .

उगाच ओळी आठवल्या !
अताशा असे हे मला काय होते?
कुण्या काळचे पाणी डोळ्यात येते

आर्या तुझा लेख वाचला फार सुंदर आहे. कमेंट दिलेली आहे.
अंजू, पशुपत, प्राचीन व भाग्यश्री धन्यवाद.

आपला स्वतःचा शोध हा आपली मूळे शोधल्याशिवाय अपूर्णच असतो>>> अगदी बरोबर. छान लिहिलं आहे. आवडलं
मी आमच्या कुटुंबात पहिलं अपत्य. मीसुद्धा लहानपणापासून अगदी आत्यासारखी आहे हे ऐकत मोठी झाले. दिसायलाच नव्हे तर वागण्यातही. पण मी तिला कधी पहिलं नाही. ती दहा वर्षाची असताना सर्पदंशाने गेली होती. पण माझे बाबा आणि दोन्ही काका प्रेमाने मला ताई म्हणायचे.
मला मुलगी नाही पण माझ्या भावाची दुसरी लेक जन्माला आली आणि एक वर्तुळ पूर्ण झालं. मला ऐकताना खूप छान वाटतं की ही सेम आत्यासारखी आहे. तिला काय वाटतं ते कळायला काही वर्ष लागतील.