✪ मैत्री संस्थेतल्या मित्रांसोबत भेट
✪ मैत्री = सामाजिक कामासाठी काही करणा-या मित्रांचा गट
✪ मैत्रीच्या उत्तराखंड पूराच्या वेळेच्या कामाच्या आठवणी
✪ मैत्री एक इनोव्हेटीव्ह मॉडेल
✪ दोन करामती आजींचं इनोव्हेशन
✪ सामाजिक कार्य म्हणजे त्याग- परिश्रम असंच असलं पाहिजे असं नाही
✪ आपण काय करू शकतो?
सर्वांना नमस्कार. पुण्यामध्ये केंद्र असलेल्या "मैत्री" संस्थेच्या कामाला २५ वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने झालेल्या एका मेळाव्याला जाण्याचा योग आला. मैत्रीमधल्या जुन्या मित्रांना भेटता आलं. मैत्रीचं काम आणखी थोडं समजून घेता आलं. मैत्रीचं जे काम करते ते काम, ते विषय व ते विचार इतरांनाही कळले पाहिजेत म्हणून त्याबद्दल लिहावसं वाटलं. सुरुवातीला थोडसं कालच्या मेळाव्याबद्दल बोलतो. गेले दोन वर्षं कोरोनामुळे वार्षिक मेळावा झाला नव्हता. हा २५ वर्षपूर्तीचा मोठा मेळावा असल्यामुळे मोठा घेण्यात आला. मैत्रीशी संबंधित अनेक कार्यकर्ते, मित्र, मैत्रीचे सहकारी, सदस्य आणि इतरही काही वेगळ्या क्षेत्रांमधले दिग्गज ह्यामध्ये सहभागी होते. दीड तासांचा कार्यक्रम व त्यानंतर भेटीगाठी असा हा सुंदर कार्यक्रम पुण्यात न्यु इंग्लिश स्कूलमध्ये झाला.
ठरलेल्या वेळेच्या थोडं आधी पोहचलो. पुण्यातल्या ट्रॅफिकमध्ये सायकलिंगचा तसा आनंद घेता येत नाही, पण वाहतुकीचं साधन म्हणून निश्चित आनंद घेता येतो. मनामध्ये खूप उत्सुकता आहे कोण कोण भेटतील. नवीन कोणते अपडेटस मिळतील. आणि पोहचल्या पोहचल्या भेटायला लागले एक एक जण. उत्तराखंडमध्ये २०१३ मध्ये आलेल्या पूराच्या वेळी अनेक टीम्सचा भाग असलेले, नंतरही काही वर्षं गरज होती तेव्हा तिथे reconstruction कामासाठी जाणारे व कोंकण पूर व मैत्रीच्या अन्य कामामध्ये नेहमी सहभाग घेणारे दत्ताभाऊ शिनगारे लगेच भेटले. ते मैत्रीच्या मेळघाटमधील कामातही अनेक वर्षं सहभागी आहेत. पण ते व्यवस्थेमध्ये असल्यामुळे भेट अशी नंतर झाली. नंतर कार्यक्रम सुरू होण्याआधी मैत्रीतले अतिशय जवळचे मित्र व सायकलिस्ट- अल्ट्रा रनर म्हणूनही मैत्री असलेले हर्षदजी पेंडसे भेटले. अर्थात् आपले लाडके मायबोलीकर हर्पेनजी! त्यांनी खारदुंगला ७२ किमी अल्ट्रा रनिंग केलं होतं आणि तेव्हा ते करताना मैत्री संस्थेसाठी ७२ डोनर्स मिळवायचे, असा उपक्रम हाती घेतला. आणि तेव्हा त्यांच्या पुढाकाराने ७२ नव्हे तर ९० डोनर्स मैत्रीला मिळाले होते. मी रनिंगला सुरुवात केली तेव्हा त्यांनी मार्गदर्शन केलं होतं. त्यांना भेटून विशेष आनंद झाला.
हे वाचल्यावर मैत्री किती वेगळ्या प्रकारे काम करते, ह्याचा थोडा अंदाज आला असेल. मैत्री ही ख-या अर्थाने ऑल राउंडर संस्था आहे. संस्था पेक्षाही एक चळवळ व नेटवर्क आहे. कार्यक्रमामध्ये मैत्रीची वाटचाल सांगताना श्री. अनील शिदोरे ह्यांनी सांगितलं १९९७ मध्ये काही कार्यकर्त्यांनी मेळघाटमधील बाल मृत्यु व कुपोषणाच्या परिस्थितीच्या संदर्भात तिथे भेट दिली व तिथल्या समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर साप्ताहिक सकाळमध्ये त्यावर एक लेख त्यांनी लिहीला आणि बाल मृत्यु रोखण्यासाठी आपण काय करू शकतो असं सांगून लोकांना आवाहन केलं. महाराष्ट्रातल्या २० जिल्ह्यांमधून अनेक व्हॉलंटीअर्स आले आणि त्यांनी मेळघाटमध्ये बाल मृत्यु होण्याचा सर्वाधिक कालखंड असलेल्या पावसाळ्यात काही गावांमध्ये वास्तव्य केलं आणि अशक्त मुलांकडे लक्ष ठेवून ते बाल मृत्यु रोखले. त्यावेळी तिथे व्हॉलंटीअर्स म्हणून येणा-यांमध्ये सगळ्या क्षेत्रांमधले लोक, तज्ज्ञ, गृहिणी, विद्यार्थी होते आणि चक्क नगरसेवकही होते! त्या कामातून हळु हळु कार्यकर्त्यांचा गट म्हणून मैत्री पुढे जात राहिली. आणि आता २५ वर्षांनंतर शेतीपासून शिक्षणापर्यंत अनेक विषयांना हजारो कार्यकर्ते व डोनर्ससह मैत्रीने स्पर्श केला आहे. शिदोरे सरांनी अतिशय सुंदर शैलीमध्ये मैत्रीच्या कामाचे अनेक पैलू विशद केले. सरांना ऐकताना आमच्या कर्वे समाज सेवा संस्थेमध्ये सरांनी 'मॅनेजमेंट' विषयावर दिलेलं अफलातून असं सत्र आठवलं. सर आमच्याच कर्वेचे खूप आधीचे पास आउट आहेत. असो. सरांचं निवेदन आणि मैत्रीच्या भेटीचा संपूर्ण कार्यक्रम त्यांच्या फेसबूक पेजवर https://www.facebook.com/Maitripune/ इथे बघता येईल. त्याशिवाय मैत्री संस्थेचे विविध उपक्रम, कामाचं स्वरूप आणि आवाका ह्याची माहिती त्यांच्या वेबसाईटवर http://www.maitripune.net/ बघता येईल.
आपत्ती व्यवस्थापन
मैत्रीची ओळख मला ज्या कामामुळे झाली ते काम म्हणजे आपत्ती व्यवस्थापन. पूर, भूकंप, त्सुनामी अशा अनेक वेळेस मैत्री सक्रिय राहिली आहे. किमान २०- २२ वर्षांपासून अशा आपत्ती येते तेव्हा मैत्रीने काम केलं आहे. भूजचा भूकंप २००१ असेल किंवा मागच्या वर्षीचा चिपळूणचा पूर. मैत्री सदैव तत्पर असते. २०१३ मध्ये उत्तराखंड पूराच्या वेळेस मदतकार्यामध्ये मैत्रीने खूप मोठा सहभाग घेतला. कार्यकर्त्यांच्या अनेक टीम्स अनेक महिने तिथे जात राहिल्या. स्थानिक संस्थांसोबत भागीदारी करून मैत्री काम करत राहिली. त्यामध्ये अनेक घटक होते. सर्व्हे करून गरज जाणून घेणं, मैत्रीच्या आवाहनामधून रिसोर्सेस मोबिलाईज करणं, सरकारसोबत भागीदारी, लँडस्लाईड होणा-या भागात भूशास्त्रीय सर्वेक्षण, लोकांना पुन: जगण्यासाठी आवश्यक मदत गोळा करणं इ. इ. त्यातल्या एका टीमचा मला भाग होता आला. श्री. शिरीष जोशी सरांच्या नेतृत्वात एका बॅचच्या टीममध्ये मला काम करता आलं. अक्षरश: अफाट आणि थरारक अनुभव होता हा. फुगलेल्या नद्यांनी रस्ते गिळले होते. त्यामुळे अक्षरश: जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करून एक एक गावाला जावं लागत होतं. नदीच्या लगत तुटलेल्या रस्त्यांमधून किमान पायी जाण्याची वाट बनवणारी अशी एक तारसुद्धा मैत्रीच्या टीमने गिरीप्रेमी विशेषज्ञांसोबत बांधली होती. तो सगळाच अनुभव अतिशय थरारक. अंगावर येणारा मोठा धबधबा केवळ एका फळीसदृश पुलियावरून ओलांडण्याचा अनुभव तर अक्षरश: जीवन- मरणाचा वाटला होता. माझे त्यावेळचे अनुभव http://niranjan-vichar.blogspot.com/2013/08/blog-post_21.htmlइथे वाचता येतील. कार्यक्रमात सुरुवातीला राहुल दादा म्हणाले ते खरंच वाटतं की, व्हॉलंटीअर जे देतो त्यापेक्षा खूप काही जास्त मिळवतो. इतकं काही मैत्रीच्या टीमकडून शिकायला मिळालं. शिरीष जोशी सर, दत्ताभाऊ आणि तन्मय कानिटकरला भेटताना त्या आठवणी व ते टीम वर्क सगळं आठवलं. कार्यक्रमात उल्लेख झाला की, त्सुनामीनंतर काही काळाने जेव्हा मच्छीमारांनी बोटी परत समुद्रात सोडल्या तेव्हा त्यांनी केलेला जल्लोष मैत्रीचे कार्यकर्ते विसरू शकले नाहीत. वस्तु किंवा संसाधन स्वरूपातील मदतीसोबतचं हे नातंसुद्धा तितकंच मोठं काम आहे.
समाजातला प्रत्येक जण सामाजिक काम करू शकतो
मैत्री आज एक इनोव्हेटेव्ह मॉडेल सगळ्यांपुढे ठेवते. सामाजिक काम करण्यासाठी खूप कठीण असंच काही करायची गरज नसते असं मैत्रीचं काम सांगतं. कोणीही- प्रत्येक जण समाजासाठी काही ना काही निश्चितच करू शकतो आणि करावं, असं मैत्री सांगते. प्रत्येक वेळी पूर्ण वेळ काम करणं, त्याग बिग अशा गोष्टींची गरज नसते. मैत्रीची एकूण कार्य संस्कृती तर हेच सांगते की, आम्ही आम्हांला जे जमलं ते सहजपणे करत गेलो. त्यामुळेच मैत्रीचे सदस्य सांगतात की, पूर्ण वेळ सामाजिक काम करण्याची गरज नसते. पण पूर्ण वेळ सामाजिक असण्याची गरज नक्की असते. आणि असं काम सहजपणे कसं करता येऊ शकतं, ह्याचे अनेक मॉडेल्स मैत्रीने समोर ठेवले आहेत. त्यापैकी काही पद्धती तर आता इतरही अनेक संस्था वापरत आहेत आणि मैत्री संस्थेला त्याचा आनंद वाटतो. असं एक सोपं मॉडेल म्हणजे रद्दीतून सद्दी. दृष्टी असेल तर कसा गेश्टाल्ट बदलतो ह्याचं एक उदाहरण! रद्दी म्हणजे बिनकामाची गोष्ट असं आपल्याला वाटतं. पण रद्दीचाही रिसोर्स म्हणून वापर करता येतो. मैत्रीने रद्दी विकून त्यामधून निधी उभा करण्याची सुरुवात काही वर्षांपूर्वी केली. वेगवेगळी घरं, सोसायटीज मधून रद्दी गोळा करायला सुरुवात केली. आणि चक्क आज मैत्रीला दर वर्षी रद्दीमधून लाख- दोन लाख रूपयांचा निधी मिळतो. मैत्री कोणत्याही सरकारी फंडींगशिवाय केवळ कार्यकर्त्यांच्या व डोनर्सच्या मदतीने काम करते. आणि मैत्री जे काम करते ते प्रत्येक जण करू शकतो.
मेळघाट मित्र
मैत्रीचं सुरुवातीचं खूप मोठं काम मेळघाट मित्र ह्या नावाने मेळघाट परिसरात झालं. अमरावती जिल्ह्यातला हा दुर्गम असा भाग. इथे कुपोषण- बाल मृत्यु अशा समस्यांवर मैत्रीने दीर्घ काळ काम केलं. त्यासह इतर समोर येणारे मुद्दे, जागरूकता, शिक्षण, रोजगार, शेती अशा विषयांवरही काम करत आहे. दर वर्षी मैत्री मेळघाटासाठी धडक मोहीम काढली जाते. नवीन कार्यकर्त्यांना तिथे नेलं जातं. शाळेमधून गळालेली मुलं शिक्षणाच्या प्रवाहात येण्यासाठी प्रयत्न केले जातात. स्थानिक कोरकू आदिवासी मित्रांना सक्षम करण्यासाठी मदत केली जाते. एके काळी अतिशय वंचित आणि अतिशय हलाखीच्या स्थितीमध्ये असलेला हा परिसर आता संपन्नतेकडे वाटचाल करतो आहे. तिथले युवक आता शिक्षित आहेत, विशेष कौशल्य असलेले आहेत. त्यातील अनेकांनी बाहेर शिक्षण घेतलं आणि ते आता मेळघाटात सेवा करत आहेत. काही जण तर वेगवेगळ्या बाबतीत एक्स्पर्ट झाले आहेत. कार्यक्रमात एकाने सांगितलं की, एक जण तर सोलार योजना मिळवून देण्यामध्ये तरबेज झाला आहे. सरकारची सोलार दिव्यांची योजना त्याने गावात अनेकांना मिळवून दिली आहे. त्यासह इथल्या युवकांची मानसिकता किती संवेदनशील आहे ह्याचं एक उदाहरण केरळ पूराच्या वेळी बघायला मिळालं. केरळमध्ये पूर आला होता तेव्हा मेळघाटच्या युवकांना वाटलं, इतके बाहेरचे लोक येऊन आम्हांला मदत करतात, मग आम्हीही केली पाहिजे. आणि मग काही जणांनी १० रू. असं डोनेशन आणि काही धान्य केरळला पाठवलं. प्रत्येकाला सहभागी करून आणि प्रत्येकाशी मैत्री करून असा ताळमेळ करणं, ही मैत्रीची ओळखच बनली आहे!
दोन करामती आजींचं इनोव्हेशन
सामाजिक कामासाठी खूप काही योग्यता, कटिबद्धता, त्याग करावा लागतो आणि 'मला ते कसं शक्य नाही,' अशा समजुती खोडून काढणारी दोन उदाहरणं! मैत्रीच्या कामात अनेक जण जोडले गेले. एकदा एक आजी जोडल्या गेल्या. त्यांना इच्छा तर खूप होती, पण काय करू कळत नव्हतं. त्या म्हणायच्या, मी घराच्या बाहेरही जाऊ शकत नाही, मला काही येतही नाही, मी काय करू. तेव्हा मैत्रीतून एकाने त्यांना सुचवलं की, तुम्हांला बाळंतविडे बनवता येतात ना? त्या हो म्हणाल्या. आणि त्यांनी मग बाळंतविडे बनवायला सुरू केलं. मैत्रीने ते मेळघाटमध्ये पोहचवण्याची व्यवस्था केली. कुपोषणाची सुरुवात बाळाच्याही आधी आईपासून होते, तिथे ते बाळंतविडे खूप मोठी मदत बनले. आजी बाळंतविडे बनवतच गेल्या. पुढे त्यांची मुलगी आणि नंतर त्यांची नातही बाळंतविडे बनवायला शिकली. अशाच दुस-या पनवेलच्या आजी. त्यांचीही तशीच स्थिती. बाहेर पडू शकत नाही, गुडघे दुखतात इ. इ. तेव्हा त्यांना कार्यकर्त्यांनी सुचवलं की, तुम्ही रोज एक पोस्ट कार्ड लिहा. रोज एक पोस्ट कार्ड लिहून मैत्रीच्या कामाची माहिती लोकांना कळवा. रोज एक पोस्ट कार्ड. त्या तयार झाल्या. रोज त्यांनी पत्र पाठवायला सुरू केलं! मैत्री ज्या ज्या विषयांवर काम करते, त्याची माहिती द्यायच्या. लवकरच त्यांच्या माहितीत असलेले पत्ते संपले! मग त्यांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरातींमध्ये पत्ते येतात त्या पत्त्यांवर कार्ड पाठवायला सुरुवात केली! त्यातूनच एकदा मैत्रीला गोव्याच्या एका कंपनीने एक चेक पाठवला! त्याचा शोध घेतला तेव्हा ह्या आजींनी पाठवलेल्या पत्रामुळे त्या कंपनीला मैत्रीच्या कामाची माहिती झाली, असं समोर आलं! असंही इनोव्हेशन असू शकतं! मैत्रीकडून अशा अनेक गोष्टी शिकायला मिळतात. मैत्रीच्या गोळे काकांनी आणलेलं असंच एक फंड रेझिंगचं मॉडेल. लोकांना आवाहन करायचं की, रोज फक्त १ रूपया द्या. फक्त १ रूपया. म्हणजे वर्षभराचे ३६५ रूपये. ही अशी रक्कम आहे जी लोकांना कठीण वाटत नाही. लोक तयार होतात. अशा प्रकारेही अनेक डोनर्स मिळाले. छोट्या छोट्या गोष्टींची मोठी सांगड घातली की, मोठं आउटपुट मिळतं. पोस्टकार्डवरून आठवलं. पोस्टकार्डच जर योग्य प्रकारे कात्रीने कापलं, तर त्यातूनही अख्खा माणूस जाऊ शकतो!
भूतां परस्परे पडो । मैत्र जीवाचें ॥
मैत्रीचं काम आणि हजारो कार्यकर्त्यांचं नेटवर्क असूनही समस्याही वाढत आहेत. मेळघाटमध्येही वृक्षतोडीसारख्या समस्या उद्भवत आहेत. नवीन काळात व्हॉलंटीअर्स तितके मिळत नाहीत. कोव्हिडसारख्या किंवा तणावाच्या समस्या आहेत. शिवाय प्रत्येक ठिकाणी मैत्री कशी पूरी पडेल? त्यामुळे ह्या सगळ्या विषयाच्या बाबतीत आपण काय करू शकतो हा विचार आपण केला पाहिजे. मैत्री ज्या पद्धतीने- ज्या मॉडेलनुसार काम करतं, तसं काम आपण आपल्या ठिकाणीही करू शकतो. आपल्याकडे जे कौशल्य असतील, जे रिसोर्सेस असतील, ते समाजासाठी देऊ शकतो. आणि हे कठीण अजिबात नाहीय. आपल्याला जे आवडेल, जे ठीक वाटेल, त्या प्रकारे आपण योगदान देऊ शकतो. आणि आज तर ऑनलाईन प्रकारेही योगदान देता येऊ शकतं. आर्थिक योगदान देता येऊ शकतं. तेव्हा ही दृष्टी नक्कीच घेण्यासारखी आहे.
आणि त्याबरोबर ह्या विषयाचा व विचारांचा प्रसारही करणं गरजेचं आहे. नैसर्गिक आपत्ती हा विषय घेतला तरी त्या पुढील काळात येणारच आहेत. त्यासाठी एकटी मैत्री व तिचे कार्यकर्ते कुठे कुठे जातील? पण ह्या विषयाबद्दल जागरूकता वाढली तर असे छोटे गट अन्य ठिकाणीही तयार होऊ शकतात. रद्दीतून सद्दी सारखं मैत्रीचं आपत्ती व्यवस्थापनाचं मॉडेल आणि कंपीटन्स सुद्धा अनुकरणीय आहेत. तसे गट इतरही ठिकाणी निर्माण होणं, ही काळाची गरज आहे. तेव्हा ह्या विषयाचा व विचारांचा प्रसार होणं गरजेचं आहे.
इथपर्यंत वाचलं त्याबद्दल सर्वांना खूप खूप धन्यवाद. कदाचित आपल्यापैकी काही जण मैत्रीच्या कामामध्ये सहभागी झालेलेही असू शकतील. नसतील, तरी आपणही मैत्रीचे मित्र व मैत्रीण होऊ शकता. मैत्रीशी मैत्री करण्याची आपल्याला आवर्जून विनंती करेन. आणि ही मैत्री सर्वांशी आणि स्वत:सोबतही आहे. मैत्रीमध्ये कोणामध्येच आम्ही काही उदात्त बिदात्त करतोय असा भाव जाणवत नाही. जे करतोय ते सहज आणि आनंदासाठी, हाच भाव असतो. त्यामुळे आपण आपल्या आनंदासाठी असं एखादं कोणतं तरी काम नक्की करू शकतो. आणि मैत्रीचा अनुभव हाच सांगतो की जो देतो, तो खूप काही मिळवतोसुद्धा. तेव्हा त्यासाठी आपण सर्वांना खूप खूप शुभेच्छा. मैत्री संस्थेची वेबसाईट व फेसबूक पेजची लिंक वर दिली आहेच. खूप खूप धन्यवाद.
ता. क.
ह्या मेळाव्यात हर्पेन जींसोबत ब-यापैकी निवांत गप्पा टप्पा झाल्या. खूप वर्षांनी त्यांना इतकं निवांत भेटता आलं. अशा व्यक्तिमत्वाला भेटण्याचं आणि इतक्या दिग्गज माबोकराला भेटून समाधान वाटलं. खूपच मोठा बॅकलॉग होता, पण तो दूर झाला. त्यांच्या नवीन मोहीमेची माहितीही मिळाली. ते आता सप्टेंबरमध्ये इटालीमध्ये फुल आयरनमॅन करणार आहेत. ते तसे लोहपुरुष आहेतच, पण तरी. त्यासाठी त्यांचं खूप खडतर प्रशिक्षण सध्या सुरू आहे. त्याबरोबर त्यांनी पूर्वी मैत्रीसाठी घेतलेला विविध प्रकारचा सहभाग, त्यांचं खार्दुंगला चॅलेंजच्या वेळेसचं मैत्रीसाठी ७२ दाते उभे करण्याचं अपील अशाही त्यांच्या विविध अनुभवांवर चर्चा झाली. मैत्रीच्या निमित्ताने ही ग्रेट भेट छान झाली. शिवाय तिथेच माबोकर तेजोही भेटल्या. हर्पेनजींच्या इटालीच्या नवीन मोहीमेची माहिती इथे समस्त माबोकरांना द्यावीशी वाटली आणि त्यांच्या वतीने हर्पेनजींना शुभेच्छाही द्याव्याशा वाटल्या (अर्थात् शुभेच्छांची त्यांना गरज नाहीय, तरी पण).
- निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com
छान लेख. आपल्या कामाला
छान लेख. आपल्या कामाला शुभेच्छा!
छान ओळख! खूप शुभेच्छा!
छान ओळख! खूप शुभेच्छा!
मुद्दाम वेळ काढून आलास छान
मुद्दाम वेळ काढून आलास छान वाटलं
लिहिलंयस देखील मस्त
वा, खूप सुरेख ,ओघवत्या भाषेत
वा, खूप सुरेख ,ओघवत्या भाषेत लिहिलंय
शुभेच्छा
छान लिहिलंय.
छान लिहिलंय.
वाचल्याबद्दल व मैत्रीच्या
वाचल्याबद्दल व मैत्रीच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्याबद्दल सर्वांना धन्यवाद आणि नमस्कार!
छान लेख. तुमच्या कामासाठी खूप
छान लेख. तुमच्या कामासाठी खूप शुभेच्छा!!
मैत्री संस्थेचा सुंदर परिचय.
मैत्री संस्थेचा सुंदर परिचय. मैत्री सोबत मैत्री करायला नक्कीच आवडेल. ईमेल द्वारे संपर्क करतो तुम्हाला.
धन्यवाद सुमुक्ता जी आणि किशोर
धन्यवाद सुमुक्ता जी आणि किशोर मुंढे जी! आपल्याला मेलवर रिप्लाय केला आहे.
खूप छान लेख ! शुभेच्छा !
खूप छान लेख ! शुभेच्छा !
मैत्रीच्या कार्याची माहिती
मैत्रीच्या कार्याची माहिती आहेच. पण आज जवळून ओळख झाल्यासारखे वाटले. छान लेख. मैत्रीला शुभेच्छा.
धन्यवाद हिरा जी आणि मनीमोहोर
धन्यवाद हिरा जी आणि मनीमोहोर जी!
लेख खूप आवडला. संस्थेला खूप
लेख खूप आवडला. संस्थेला खूप शुभेच्छा.