पॉपी फुलं ...स्मरण सैनिकांच्या बलिदानाचे
थंडीच्या दिवसात झाडांवर फुलं तर सोडाच पण एखादं पान ही न दिसणारं लंडन सध्या भरपूर सूर्यप्रकाश, मध्ये मध्ये पडणारा हलका पाऊस ह्यामुळे अक्षरशः बहरलं आहे. नजर जाईल तिथे दिसणारी हिरवळ मनाला सुखावते आहे. त्यावर फुललेल्या डेझी हिरवळीवर जणू कुणी मोती उधळून टाकावेत अश्या दिसतात आणि हिरवळीची शोभा द्विगुणित करतायत. डॅफोडिल्स किंवा ट्युलिप ह्यांचा बहर जरी गेला असला तरी विविध प्रकारचे गुलाब, झेंडू, लवेंडर, पॉपी, हनिसकल आणि आपल्याला नावं ही माहीत नसलेल्या अनेक फुलांनी रस्ते, ट्रेन स्टेशन, घरांपुढच्या बागाच नाही तर घरांच्या खिडक्या ही सजल्या आहेत.
पहिल्यांदा जेव्हा मी ही पॉपीची फुलं बघितली तेव्हा लगेच मला आपली खसखस आठवली. ती सुद्धा ह्या फुलांची जी बोन्ड असतात त्यातल्या बियांपासूनच तयार करतात पण त्याची वेगळी शेती करावी लागते. इथे जी पॉपी फुलं दिसतात ती फक्त फुलंच असतात त्यापासून खसखस वैगेरे नाही मिळणार. तरी ही आमच्या अंगणातील रोपांवर जी बोंडं धरली होती त्यातलं एक कुतूहलाने फोडून बघितलं तर आत खसखशी सारख्या असंख्य बिया होत्या. पण रंग काळा होता.
पॉपीची फुलं एकदम लालभडक रंगाची असतात. झाडाला मोठा दांडा फुटून त्याच्या टोकावर पाच सहा पाकळ्यांच पूर्ण उमललेलं फुल फुलतं. आत काळाभोर पुष्पकोश असतो. लांब दांड्याच्या टोकावर फुलं उमलत असल्याने लांबून बघितलं तर ट्युलिपचा भास होतो. ट्युलिपचे कळे असतात ही पूर्ण उमललेली असतात एवढाच फरक.
ह्यांचा रंग थोडा मॉडीफाईड आहे आणि त्यामुळे पराग कोष ही पिवळे आहेत. ही अंगणात मुद्दाम लावलेली आहेत.
ही एका माळरानावर उगवलेली.
आपल्या कडच्या तेरड्या सारखं हे झाड ही तसं रानटीच आहे. रस्त्याच्या कडेला, गवतात कुठे ही उगवतं आणि फुलतं ही. पण फुलं छान दिसतात म्हणून मुद्दाम बागेत, अंगणात , पार्कमध्ये वैगेरे लावलं जात.
मात्र पॉपी ची गोष्ट एक फुल म्हणून इथेच संपत नाही. इथल्या लोकांचं तिच्याशी भावनिक नातं जुळलं आहे. पॉपी फुलं हा त्यांच्या मनाचा हळवा कोपरा आहे. युरोपातल्या ज्या भूमीवर पहिलं महायद्ध लढलं गेलं ती भूमी सैनिकांच्या धावण्या, पळण्यामुळे, घोड्यांच्या टापांमुळे रणगाड्यांमुळे वैगेरे अगदी निकामी, नापीक होऊन गेली होती. आता तिथे काही ही उगवणार नाही इतकी उजाड झाली होती. पण युद्ध संपलं आणि नंतरच्या समर मध्ये ती जागा असंख्य पॉपी फुलांनी बहरून गेली. असं मानलं जातं की सैनिकांच्या सांडलेल्या लाल रक्ताचा रंगच ह्या फुलांना प्राप्त झाला होता. तेव्हा पासून पॉपी फुलं पहिल्या महायद्धत जीवाचं बलिदान दिलेल्या सैनिकांचं प्रतीक बनली आहेत.
जॉन मॅक्री हा कॅनडेनीयन मेजर पहिल्या महायुद्धा काळात युद्धभूमीवरील हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून सेवारत होता. सर्वत्र युद्धाचं वातावरण होतं. बंदुकीच्या गोळ्यांच्या आवाजात पक्ष्याचं कूजन जणू विरून गेलं होतं. सामान्य लोकांचं जगणं मुश्किल झालं होतं. गावच्या गावं बेचिराख झाली होती. जिकडे तिकडे मृत्यूचं तांडव सुरू होतं. युध्दामुळे सर्वत्र एक प्रकारची विष्षणता , निराशा दाटून राहिली होती. जीवनाची नश्वरता क्षणोक्षणी प्रत्ययास येत होती.
अनेक सैनिकांचे प्राण ह्या मेजर डॉक्टरने योग्य उपचाराने वाचवले होते तरी अनेक जण त्याच्या देखत हे जग सोडून ही गेलेले तो रोज बघत होता. आपण काही करू शकत नाही म्हणून हतबल ही होत होता. तशातच त्याच्या एका मित्राच्या मृत्यमुळे आलेल्या विमनस्क अवस्थेत फिरत असताना गावात जागोजागी उभारलेली थडगी आणि त्यातच मध्ये मध्ये फुललेली पॉपी फुलं पाहून त्याला in flanders field (flander हे युरोप मधल्या युद्धभूमीच नाव आहे ) ही गुढगर्भित अर्थ असलेली भावनाप्रधान कविता स्फुरली. तेव्हा पासून पॉपी फुलं हुतात्म्यांच्या बलिदानाचं, त्यांना वाहिलेल्या भावपूर्ण श्रध्दांजलीचं तसेच विश्वशांतीचं आणि विश्वसमृध्दीचं ही प्रतीक मानली जातात.
2014 च्या जुलै ते नोव्हेंबरह्या काळात ह्या घटनेच्या शतकपूर्तीप्रीत्यर्थ लंडनच्या टॉवर ऑफ लंडन किल्ल्याच्या प्रांगणात ( आपला कोहिनूर ह्याच किल्ल्यात आहे ) पहिल्या महायुद्धात कामी आलेल्या ब्रिटिश सैनिकांच्या संख्येएवढी म्हणजे साधारण 9 लाख सिरॅमिकची पॉपी फुलं खोवण्यात आली होती. हुतात्मा सैनिकांना भावांजली वाहण्याची किती ही सुंदर कल्पना ! त्याचं उदघाटन राणीच्या हस्ते झालं होतं. अनायसे आम्ही त्यावेळी लंडनमध्येच होतो त्यामुळे आम्ही ही ते क्षण अनुभवू शकलो. ते दृश्य प्रत्यक्ष बघताना सगळेच जण भावनिक होत होते. अक्षरशः लाल रंगाचा सागर समोर आहे असं वाटत होतं आणि ते पाहण्यासाठी बाहेर जनसागर उसळला होता.
हा जनसागर
गेली अनेक वर्षे सॅटिन, कागद किंवा प्लॅस्टिक ची कृत्रिम पॉपी फुल (मला वाटत नोव्हेंबर महिन्यात ) इकडे विक्रीसाठी उपलब्ध असतात. सामान्य जनताच नव्हे तर म्हणे राणी ही लावते आपल्या ड्रेसवर एखाद दिवस ते फुल. सगळं जिथल्या तिथे लागणाऱ्या मॅनर्स वाल्या इंग्रज लोकांनी हे फुलं ड्रेस वर कसं कुठे लावायचं ह्याबद्दल मात्र काही ही संकेत दिलेले नाहीत. ज्याला जसं आवडेल तसं लावावं. जनरली पंडित नेहरू कोटावर जिथे गुलाब लावत असत त्या ठिकाणी लावलं जात हे फुल ड्रेसवर. सैनिकांना श्रद्धांजली म्हणून अबाल , वृद्ध, गरीब , श्रीमंत सगळेच जण विकत घेतात फुलं आणि लावतात ड्रेसवर. अर्थात त्यातून मिळणारा निधी हा सैनिकांच्या कल्याणकारी योजनांवरच खर्च केला जातो म्हणून ह्यांची विक्री ही खूप होते. असो.
आता जेव्हा माझी नजर पॉपी फुलावर जाते तेव्हा नकळतच पहिल्या महायुद्धातील हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली जाते आणि जगातील सर्व हेवे दावे नष्ट होऊन, लढाया बंद होऊन सर्वत्र सलोखा आणि शांती वास करू दे अशी मनोमन प्रार्थना ही केली जाते.
छान लिहिलंय, माहीतीपूर्ण.
छान लिहिलंय, माहीतीपूर्ण.
स्वयंपाक घर व फोरेन्सिक चे लैक्चर्स मुळे पाॅपी सीड्स् खसखस बद्दल माहिती होती. फुलांविषयी या लेखामुळे कळलं. आणि घराजवळच्या स्टेशन बाहेर ही फुलं पाहिली तेव्हा साहजिकच हा लेख आठवला. पुन्हा काही दिवसांनी मुलांच्या शाळेबाहेर पाहिली- आत्ता सीझन गेला वाटतोय.
Meghask थॅंक्यु ..छान लिहिलं
MeghaSK थॅंक्यु ..छान लिहिलं आहेस.
छान लेख व माहिती.
छान लेख व माहिती.
फार जुन्या काळी अलका चित्रपट गृहात कोणतातरी इंग्रजी चित्रपट बघायला गेलो होतो. तेव्हा तिथे एक ट्रेलर बघितले होते त्यात ही फुललेली लाल पॉपीची शेते व मागे उड णारे हेलिकॉप्टर निळे आकाश हा एक सीन आहे तो आठवला. इंग्रजी येत नव्हते त्यामुळे नाव समजले नाही आजिबात.
परवा ट्विटर वर एका अनोळखी व्यक्तीने एक ट्विट केले होते खालील प्रमाणे:
माझ्या आईने जाण्या पूर्वी बागेत पॉपी पेरल्या होत्या.... .. आता माझ्या लक्षात आले की त्या तिने माझ्यासाठी लावल्या होत्या. हे वाचून रडू आले व ह्या लेखाची पण आठवण झाली. कोणाच्या भावना कुठे गुंतल्या असतात समजत नाही.
अमा छान लिहिलं आहे.
अमा छान लिहिलं आहे.
माझ्या आईने जाण्या पूर्वी बागेत पॉपी पेरल्या होत्या.... .. आता माझ्या लक्षात आले की त्या तिने माझ्यासाठी लावल्या होत्या. हे वाचून रडू आले व ह्या लेखाची पण आठवण झाली. कोणाच्या भावना कुठे गुंतल्या असतात समजत नाही. >> अगदी खरं आहे. सोनटक्क्याचं फुलं नुसतं आठवलं तरी मला माझ्या आईची आठवण येते.
Pages