तेव्हा आणि आता

Submitted by पाचपाटील on 31 May, 2022 - 13:18

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा;
देवळांतली घंटा ह्याला उडी मारून मारून
वाजवावी लागायची, कारण हात पोहचायचा नाही.
आणि 'घंटा वाजवल्याशिवाय देवबाप्पाला कळत
नाही की आपण त्याच्या दर्शनाला आलोय', ह्या
थापेवर त्याचा तेव्हा विश्वास बसला होता.
शिवाय लहानपणी ह्याला विठोबाच्या पायी ठेवलं
होतं, तेव्हा एक तुळशीचं पान अचूक ह्याच्या
डोक्यावर पडलं, असंही ह्याच्या आज्जीने
सांगितलेलं.
नंतर थोडा मोठा झाल्यावर कळलं की,
त्या भागात त्या पिढीत जन्मलेल्या बऱ्याच पोरांच्या
डोक्यावर विठोबाकडून तुळशीचं पान पडलं होतं.
सगळ्याच आज्ज्यांना तसा भास होणं शक्य
वाटत नाही.
त्यामुळे विठोबाची आम्हा सर्वच पोरांवर समान
कृपादृष्टी असावी, हेच सत्य म्हणावं लागेल.
बाकी, आताही समजा "ऐका सत्यनारायणाची कथा"
वगैरे दूरून ऐकू येत असतं कधीतरी..
आणि 'ऐका' म्हटल्यावर मग ऐकायलाच पाहिजे ना..!
म्हणून मग साधू वाण्यावर कोसळणारी संकटं,
त्याची समुद्रात बुडालेली नौका वगैरे
ऐकता ऐकता एखाद्या स्टॉलवर ह्याचे दोन पराठे
खाऊन होतात आता..!
आणि एरव्ही ह्या कलियुगात, एवढं मन लावून
ऐकणारा श्रोता कुठल्या गुरूजींना मिळणार..!

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा;
मला आणखी एक मुलगा असता, तर तोसुद्धा मी
देशावरून‌ ओवाळून टाकला असता, असं
म्हणण्याची पद्धत होती.
ह्याबाबतीत ह्याच्या वडीलांचं मत नक्कीच वेगळं
असलं असतं..
परंतु हा कुलदीपक अजूनही त्याच्या वडिलांच्या
बोकांडी बसूनच असल्यामुळे, त्यांना तसे काही
उद्गार काढण्याची संधी मिळाली नाहीये..
मिळण्याची शक्यताही फारच धूसर आहे.

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा;
जेव्हा हिंदी पिच्चरांमध्ये 'सैंयाने बईयां मरोडी'
वगैरे गाणी असायची..
असली गाणी पिच्चरांमधीच ठीक..!
बाकी हा काय कुणाचं‌ मनगट वगैरे पकडणार..!
एका चोरट्या किसच्या पुढे अजून ह्याची गाडी
सरकलेली नाही.
तोही समजा तिनेच बळजबरीने घेतलेला..!
आणि ह्याने नंतर फक्त एक लाजरा अभिप्राय व्यक्त
केलेला की थोडासा खारटच होता वगैरे..!

शिवाय ही तेव्हाचीही गोष्ट आहे जेव्हा;
सकाळी सकाळी मिसरी लावल्यामुळे डोकं
हलकं राहतं, हे अनुभवजन्य ज्ञान सगळ्यांना
आपसूकच मिळालेलं असायचं.
परंतु तरीही त्याकाळी 'तुमच्या टूथपेस्टमध्ये नमक
आहे का', असा बिनडोक प्रश्न एका जाहिरातीतून
विचारला जायचा..

बाकी नमक वरूनच सांगायचं झालं तर..
तुमच्या मिठात आयोडीन नसेल तर तुम्हास घेंगा
नामक रोग होईल, अशीही एक जाहिरात
दूरदर्शनवर असायची.
शिवाय प्रभाव ठसठशीत पडावा म्हणून एका
घेंगाग्रस्त मुलाचं चित्रही दाखवायचे आणि त्यातून
एक मूर्तिमंत भीती साकार व्हायची.
म्हणून एकदा ह्यानं आईला विचारलं की,
असं असं आहे. तर आपल्या मिठात आहे का
आयोडीन वगैरे ?

तर ती बोलली की काही माहिती नाय रे..!
मी मोठ्ठं मीठ आणते. आणि ते खलबत्त्यात
कुटून कुटून बारीक करते.
माझ्या दणदणीत कुटण्यामुळे घेंगा रोगनिर्मितीस
कारणीभूत असणारे सगळे घटक नष्ट होऊन
जातात.
त्यामुळे तू बिलकुल काळजी करू नकोस..!
तुझ्या शारीरिक, मानसिक किंवा बौद्धिक
विकासात काहीही अडथळा निर्माण होणार
नाही..! फसली बिचारी..!

त्यामुळे 'माझं व्यक्तिमत्त्व एवढं राजबिंडं असूनही
आरशात ते एकदम खप्पड दिसतं', अशी त्याची
लाडकी तक्रार आहे..!
आणि आईची तक्रार कुठे करणार..!
जगातलं कुठलं कोर्ट हा फाजीलपणा ऐकून
घेणार..!
म्हणून मग अधूनमधून आरसे बदलावे लागतात..!
एखादा आरसा ह्याच्यावर नाराज असू शकतो.
पण सगळेच आरसे कसे काय अप्रामाणिक
असतात, काही कळत नाही.

ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा;
एखाद्या आवडत्या मैत्रिणीचं लग्न झालं की हा
काही दिवस सुतकी चेहऱ्यानं वावरायचा..
आणि मग हळहळत, उसासे टाकत सगळे फेसबुक,
जीमेल वगैरेचे पासवर्ड्स बदलून टाकायचा.
उगीच पासवर्ड टाईप करताना दिल दुखायला
नको वगैरे म्हणून..!
पण वयाच्या एका टप्प्यावर पोचल्यावर, हा
सगळ्या गोष्टी भव्य कॅनव्हासवर बघायला शिकलाय
आता..
एक्स गर्लफ्रेंडच्या लग्नात जाऊन दणकावून जेवण
करण्यातही एक आनंद असतो, हे आता कळलेलं
आहे ह्याला..!
कारण शेवटी स्वातंत्र्य म्हणजे तरी दुसरं काय
असतं..!
आणि मानवाच्या मुक्तीचा मार्ग तरी दुसरा कोणता
असतो..!!

शिवाय ही तेव्हाचीही गोष्ट आहे जेव्हा;
बिलनशी नागीण निघाली चा अर्थ वगैरे शोधायचा हा..
विचारायचा की बाबा ही नागीण कुठे निघालीय?
विषारी वगैरे आहे का??
नागीणच आहे की धामण वगैरे??
तिचे डोळे श्रीदेवीसारखे घारे होते का?

आता त्याला कळतं की ह्या गाण्याचा उद्देश किती
उदात्त आहे ते..!
आता समजा एखादी क्वार्टर पोटात गेल्यानंतर,
सगळे नागोबा बिगोबा डुलायला लागल्यानंतर,
आणि सगळे घोडे बंधमुक्त वगैरे झाल्यानंतर,
किंवा समजा सगळ्यांचा भोंगा वगैरे वाजल्यानंतर,
नागीण कुठं निघालीय आणि कशाला निघालीय,
असल्या किरकोळ प्रश्नांचं औचित्य काय उरतं ??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचलं आणि छान Happy

जुने दिवस आठवतात नेहमीच तुमचे लेख वाचताना..