भयंकर आहे हे सगळं! कोकण ट्रीपला जाताय? सावधान, आधी नीट चौकशी करा.
*येवा कोकण आपलाच (अ)नसा*
आणि कोकण अजिबात सुरक्षित नसा
(हा गेल्या आठवड्यातील AdvDr Suchitra Ghogare-katkar यांचा अनुभव आहे, गेल्या सोमवारचा)
नजर जाईल तिथपर्यंत पाणीच पाणी, फेसाळणाऱ्या लाटा आणि लाटांची गुंज... निसर्गाचं वरदान लाभलेल्या कोकण किनारपट्टीचे पर्यटकांना खूपच आकर्षण आहे. त्यामुळे अलिकडच्या काळात बाराही महिने पर्यटक कोकणात येत असतात. पर्याटकांसाठी किणारपट्टीवर अनेक नवनवीन बीच साईट्स समोर येत आहेत. बीच रिसॉर्ट्स, होम स्टे या माध्यमातून कोकणवासीयांना उत्पन्नाचे नवीन साधन मिळाले आहे. ही खूपच चांगली गोष्ट आहे. पण याची दुसरी बाजू म्हणजे कोकण पर्यटन अजिबात सुरक्षित नाही. त्यावर प्रशासन, पोलिस आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचे नियंत्रण हा संशोधनाचा विषय आहे.
पर्याटकांसाठी सोयीसुविधांचा अभाव आहेच पण यापेक्षा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे पर्याटकांची सुरक्षितता होय. पण या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था, स्थानिक नागरिक आणि प्रशासकीय पातळीवर काहीच काम केले जात नसल्याचे वारंवार लक्षात येते. पर्यटक बुडाल्याच्या बातम्या आल्या की प्रशासन जागे होते पण यावर कोणत्याही उपाययोजना आखल्याचे, त्या अंमलात आणल्याचे वर्तमानपत्रात वाचायला मिळत नाही आणि प्रत्यक्ष गेल्यावर तर दिसतही नाही. एकूणच कोकणात येणाऱ्या पर्यटकांची सुरक्षितता वाऱ्यावर आहे हे नक्की. याचा काल आम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतला.
विस्तिर्ण अशा कोकण किनारपट्टीवर छोट्या छोट्या गावालगतच्या किनाऱ्यावरील सुरक्षेसाठी उपाय योजना करणे तसे अवघडच. पण प्रसिद्ध पर्यटन स्थळे असलेल्या ठिकाणी सुरक्षिततेविषयी आनंदच दिसून येतो.
देवबाग तारकर्ली येथे वॉटर स्पोर्टस् विकसित होऊन बरेच वर्ष झाली आहेत. त्याठिकाणी स्थानिक प्रशासन आणि पोलीस यांचे काहीच तिथे काहीच नियंत्रण नाही. भरती ओहोटी च्या वेळा आणि त्या अनुषंगाने पर्यटकांसाठी नियमावली, सुरक्षा व धोक्याच्या सुचना याच्या पाट्या कुठेच आढळल्या नाहीत. एकूणच इथे प्रशासन कुठेच दिसत नाही. दिसतो तो फक्त स्थानिक व्यवसायिकच.
काल सकाळी त्सुनामी आयलंड पहाणे आणि तिथे वॉटर स्पोर्टस् राईड्स घेणे या उद्देशाने गेलो. बोट ठरवताना लाईफ जॅकेट्स आहेत ना असे विचारले होते तेव्हा 'हो' असे उत्तर दिले होते. मात्र बोटीत बसल्यावर तिथे लाईफ जॅकेट्स नव्हतीच. याचे कारण विचारल्यावर इथे जवळच जायचं आहे जॅकेट्स ची गरज नाही असे उत्तर मिळाले. समोरच त्सुनामी आयलंड दिसत होते त्यामुळे इट्स ओके म्हणत तो विषय सोडून दिला.
त्सुनामी आयलंड, पुढे खाडी व समुद्र संगम आणि क्रोकोडाईल बीच अशी राईड आम्ही घेतली होती. त्याप्रमाणे
त्सुनामी आयलंड वर बोटीतील इतर पर्यटक उतरले. आम्ही दोन मिनिटे पुढे गेलो तिथेच बोट थांबवून त्या मुलाने पाण्याच्या रंगातील फरक दाखवला व परत लगेच फिरला. आम्ही म्हटलं हे ठिकाण आपण खूप लांबून दाखवताय पैसे मात्र भरपूर घेतलेत. तर त्याने कांगावा केला. शुध्द फसवणूक आहे हे कळत असूनही हा विषय सोडून दिला.
परत येऊन स्कूटर राईड बनाना राईड घेत होतो तेव्हढ्यात पॅरासेलिंग बुक झाल्याने बोट न्यायला आली. त्यातून थोडे पुढे गेलो व परत त्यातून पॅरासेलिंग च्या बोट मध्ये बसलो. तिथेच फक्त लाईफ जॅकेट्स होती व तो बोटमन वारंवार सुरक्षिततेच्या सुचना देत होता. एवढीच एक सकारात्मक बाजू तीन दिवसांच्या कोकण प्रवासातील.
पॅरा सेलिंग करुन परत आलो व त्सुनामी बेटावर जायला दुसऱ्या बोटीत बसलो. बेटाजवळ आलो तर सर्व बेट पाण्याखाली गेले होते. लाटांचा जोर वाढला होता. एकूण परिस्थिती पाहून आम्ही तिथे न जाण्याचा निर्णय घेतला व आम्ही यातून उतरणार नाही असे सांगितले. तसेच आम्ही पैसे देतो पण आम्हाला इथे न सोडता पुढे जाऊन धक्क्यावर सोडा अशी विनंती केली. पण तुम्हाला ज्याने सोडलंय तोच घेऊन जाईल तुम्ही बोटीतून उतरा असे सांगून त्याने आम्हाला अक्षरशः बोटीतून बाहेर पडायला भाग पाडले.
बोटीतून उतरणे भयंकर होते. एकतर खांद्यापर्यंत पाणी होते. लाटांचा जोर वाढला होता. बोट पूर्ण एका बाजूला कलत होती. यात छोट्या अमोघच्या डोळ्याखाली बोटीचा जोरदार मार लागला तर त्याच्या डॅडीच्या म्हणजे मेहूण्यांना पायाला मार लागला. बहिण आणि तिचा छोटा मुलगा उतरत असताना जोराची लाट आली आणि बोट नेमकी त्याच बाजूला पूर्णतः झुकली आणि ती दोघीही बोटीच्या खाली अडकता अडकता वाचली. बोटीतून उतरल्यावर पुढे सुरू झाली तो जीवघेणा थरार.
(त्याविषयी लिहायचं म्हटलं तरी अंगावर शहारे येतात मन अस्वस्थ बनतं आणि म्हणूनच ही पोस्ट लिहायची अर्धवट सोडून दिली होती.
पण आजची दुर्घटना वाचली आणि पुन्हा यावर लिहिण्याची गरज लक्षात आली.)
अंगावर येणारी प्रत्येक लाट काळजाचा ठोका चुकवत होती. आमच्या खंद्या एवढी पाण्याची पातळी वाढली होती आणि त्यात लाटांवर लाटा येत होत्या. साडेसात वर्षांच्या अरुष दाक्षिणी दोघांना तिथल्या एका छोट्या माचणावर बसवले होते. मोबाईल पैसे पर्स वगैरे महत्वाचे साहित्य बरोबर नेहलेल्या मोठ्या वॉटरप्रुफ बॅग मध्ये ठेवले होते. आणि माचणाचे एक एक खांब पकडून आम्ही लाटांना सामोरे जात होतो. लाटेच्या तडाख्यात माझा चष्मा वाहून गेला. अनेकांचे साहित्य वाहून जात होते. लहान मुलांसाठी भयंकर स्थिती होती. पण स्थानिकांना या परिस्थितीशी काहीही देणंघेणं नव्हते. ते निर्ढावलेपणाने या परिस्थितीकडे बघत होते. एका माचणावर बसलेल्या स्थानिक लोकांना मदतीसाठी विनंती करत होतो. आमच्या बोटीच्या माणसाला फोन लावा म्हणून ओरडुन सांगत होतो. पण ते अक्षरशः दुर्लक्ष करत होते.
त्सुनामी बेटावर माचणे तयार करुन त्यावर खाद्यपदार्थ वेगवेगळ्या वस्तूंची दुकानदारी लावलेले स्थानिक लोक तिथले त्यांची दुकाने गुंडाळून गायब झाली होती.
बेटावर पर्यटकांशिवाय कोणीही नव्हते आणि प्रत्येकजण लाटांचा सामना करत मदतीसाठी ओरडत होते. एक बोट आली पण तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता. कारण तेच... तुम्ही ज्या बोटीतून आलात त्याच बोटीतून परत जा असे सांगितले जात होते. पण यावेळी आम्ही त्याचे ऐकले नाही व एकमेकांना हात देत त्या बोटीपर्यंत पोहचलो आणि बोटीत बसलो. आम्ही त्याला वेगळे पैसे देण्याची तयारी दाखवूनही तो आम्हाला घेऊन जायला नकार देत होता.
आम्ही आठजण बोटीत चढलो. पर्यटकांची दुसरा ग्रुप चढला. त्यांची तर अत्यंत वाईट अवस्था होती. मोबाईल पैसे साहित्य भिजले होते पण याहीपेक्षा सहा महिने ते चार पाच वर्षे वयोगटातील त्यांची मुले होती. एक मूल तर अक्षरशः लाटेवर हातातून निसटून गेलेले दोन गटांगळ्या खाऊन परत पकडले होते. बहुतेक डॉक्टरांचा तो ग्रुप असावा कारण डॉक्टर नावाने ते एकमेकांना संबोधित होते. मुलांची सुरक्षितता धोक्यात आल्यामुळे त्यातील आया घाबरल्या होत्या आणि चिडलेल्या होत्या.
आम्ही धक्क्यावर परत आलो व पार्किंग कडे जायला निघालो तर समोर आम्हाला बोट ठरवून दिलेला व्यक्ती भेटला. त्याला घडलेला प्रकार सांगितला तर तो हसत हसत म्हणाला "तुमचा फक्त चष्माच गेला लोकांचे फोन, पाकीटे अजून काय काय नेहमीच जात असतं."
त्याचं हे वाक्य ऐकून एक महत्वाची बाब लक्षात आली ती म्हणजे अशा घटना त्यांच्यासाठी नेहमीच्याच आहेत.
हा सर्व प्रकार अनुभवल्यानंतर काही महत्वाचे प्रश्न मनात उपस्थित झाले आहेत. ते म्हणजे...
१. तीन दिवसांच्या अख्या पर्यटनामध्ये मालवण परिसरात एकही पोलिस आम्हाला दिसला नाही.
२. देवबाग जवळच्या धक्क्यावर कुठेही सूचना फलक नव्हते. सुरक्षितता उपाययोजना याविषयी माहिती फलक नव्हते.
३. बोटींमध्ये सुरक्षितता जॅकेट्स नव्हतीच. इतरही सुरक्षित बाबी नव्हत्या.
४. बहुतांश बोटी जुन्या आढळल्या.
५. बोटींचे कसलेचं नियोजन नव्हते.
६. स्थानिक प्रशासन पोलिस कोस्टल गार्ड यापैकी कोणीही तिथे उपस्थित नव्हते की यावर प्रशासनाचे नियंत्रण आहे असे कुठेच दिसून आले नाही.
७. जाताना आवर्जून आधार कार्ड घेऊन गेलो होतो. MTDC मान्यताप्राप्त होम स्टे ला थांबलो होतो पण त्याने फक्त नाव विचारले. तिथे कोणतेही रजिस्टर नव्हते. ओळखपत्र मागणे ही दूरची गोष्ट.
सर्व अनागोंदी कारभार. फक्त आणि फक्त व्यवसायिक लोकांचं साम्राज्य.
एकूणच स्थानिक प्रशासन, पोलिस, जिल्हा प्रशासन, पर्यटन विभाग, कोस्टल गार्ड इ. कोणीच तिथे दिसून आले नाही.
एकूणच सगळा व्यवसायिकांचा बाजार. पर्यटकांची सुरक्षितता हा महत्त्वाचा मुद्दा आहे. याचबरोबर पर्यटकांची आर्थिक लूट हाही वेगळा विषय आहे.
हे सगळं अनुभवल्यावर मनात विचार येतो 'यावा कोकण आपलाच असा' नव्हे तर "यावा कोकण आपलाच नसा" आणि "कोकण अजिबात सुरक्षित नसा" हे खरं आहे.
यावर शासनाच्या सर्व संबंधित विभागाने त्वरित दखल घेणे अत्यंत गरजेचे आहे. आज घडलेली दुर्घटनेतून शासनाला जाग येईल ही अपेक्षा.
- अॅड. डॉ. सुचित्रा घोगरे-काटकर सातारा
कोकणातून परत आल्यावर या घटनेविषयी लिहून वॉट्सऍपवर पोस्ट केले होते. ते तेव्हाच फेसबुक वर पोस्ट करायला हवे होते. कदाचित प्रशासनाने दखल घेतली असती असे वाटतंय.
#Namrata Desai
भयंकर अनुभव आहे....
भयंकर अनुभव आहे....
हा अनुभव देवबाग तारकरली चा आहे असे असुनही "कोकण ट्रीप ला जाताय? सावधान" असे शीर्षक असल्याने जरा जनरलाय्जेशन झाले आहे असे वाटते.
त्यामुळे शीर्षक देवबाग्/तारकरली च्या वॉटर स्पोर्ट्स शी संबंधित असे केले तर बरे होईल...
कोकणात वॉटर स्पोर्ट्स सोडुन अनेक सुन्दर गोष्टी सुद्धा आहेत
भयंकर अनुभव आहे.... _= +१
भयंकर अनुभव आहे.... _= +१
असे कसे नुस्तेच बेटावर सोडून देतात म्हणजे परत लगेच नेत नाहीत तसेच, भरती ओहोटीच्या वेळा असे पाहीन पाहून नाही का नेत ? की त्सुनामी बेट म्हणजेच हा थरार अनुभवायचा असतो ?
अर्थात कोकण नितांत सुंदर आहे.. वॉटर स्पोर्टसचा अनुभव नाही.
छान
छान
हॉरीबल आहे हे .. वाचताना जे
हॉरीबल आहे हे .. वाचताना जे डोळ्यासमोर येत होते त्याने काटा आला अंगावर.
त्या दिवशीच बोट उलटल्याची बातमी वाचलेली.. आणि आता हा धागा बघून तेच आठवले.
बाकी स्मिता यांच्याशी सहमत >>> त्यामुळे शीर्षक देवबाग्/तारकरली च्या वॉटर स्पोर्ट्स शी संबंधित असे केले तर बरे होईल...
कोकणात वॉटर स्पोर्ट्स सोडुन अनेक सुन्दर गोष्टी सुद्धा आहेत >> +१
हॉरीबल अनुभव आहे.
हॉरीबल अनुभव आहे.
काही वर्षांपूर्वी आम्ही देवबागला गेलो होतो स्कुबा डायव्हिंग ला तेव्हाचा अनुभव चांगला आणि सुरक्षित होता. आमची चांगली काळजी घेतल्याचे आवर्जून लक्षात आहे.
आम्हाला त्सुनामी बेटापाशी उतरवले होते. पण ते डायरेक्ट डाईव्ह साठी खाली न्यायला. तिथे भरपूर खोल आहे पाणी म्हणून.
कोकणात आत्तापर्यंत कायम चांगल्या प्रकारचे आदरातिथ्य अनुभवल्यामुळे (as a पर्यटक), जनरली उत्तर भारताततल्या पर्यटन स्थळी तिथल्या लोकल लोकांकडून जशी माजुर्डी उत्तरे ऐकली आहेत तशी कोकणातील लोकांकडून ऐकायला मिळाली यावर विश्वास बसत नाही. पण ज्यांनी अनुभव लिहिलाय त्यांनी मनापासून आणि प्रामाणिकपणे लिहिलंय हेही जाणवतंय.
कोकणातले ९०%किनारे। धोकादायक
कोकणातले ९०%किनारे। धोकादायक आहेत. डु़ंबण्यासाठी नाहीत फक्त पाहण्यासाठी आहेत.
अरे अरे फारच वाईट परिस्थिती.
अरे अरे फारच वाईट परिस्थिती. सावधान केल्याबद्दल आभार..
शीर्षक बदलल्याबद्दल धन्यवाद.
शीर्षक बदलल्याबद्दल धन्यवाद. लहानपणापासून कोकण फिरतोय ते नातेवाईकांच्याच घरी मुक्काम ठोकून. तिथली हिरवळ, झरे, ओढे, वहाळ, तलाव, विहीरी यानंतर मग समुद्राचा नंबर लागतो, कारण तो ईथे मुंबई जवळपासही दिसतो त्यामुळे तितकी ओढ नसावी. हे वॉटरस्पोर्ट संस्कृती फोफावलेले कोकण तर मला आपले कधीच वाटले नाही. तिथल्या व्यावसायिकांचे अनुभव म्हणजे कोकणाचे आणि कोकणी माणसांचे अनुभव असे नको कोणाला वाटायला...
जेवढे कोकणचे सौंदर्य आवर्जून शेअर करतो. तितकेच हे देखील शेअर करावे.
त्या दिवशीची बातमी पुन्हा वाचली. एक डॉक्टर आणि आमदाराचा भाचा त्यात गेला. किंबहुना बोट उलटून बरेच जण बुडाले होते. एकतर ती राईड अधिकृत नव्हती. दुसरे म्हणजे क्षमतेपेक्षा जास्त लोकं बोटीत बसवलेले. तिसरे म्हणजे हवामानखात्याची सूचना फाट्यावर मारून बोट समुद्रात घातली होती. चौथे म्हणजे लाईफ जॅकेटही नव्हते सर्वांसाठी.. पैश्यासाठी मनुष्यवधच झाला हा.
मजा मारणे म्हणून गडकिल्ले फिर
मजा मारणे म्हणून गडकिल्ले फिर , जंगलात शेकोटी पेटव , समुद्रात घुस
हे सगळे प्रकार बंद पडले पाहिजेत.
तो काल म्हणून एक सिनेमा होता, अजय देवगण भूत व इतर लोक जंगलात कचरा करणारे, आठवते का ?
असा अपघात झाला की मला तोच सिनेमा आठवतो
इस काल काल मे हम तुम करे धमाल.
https://youtu.be/J5MGaHLPfeI
आम्ही तारकरली देवबाग ला 2014
आम्ही तारकरली देवबाग ला 2014 ला गेलो होतो.सुनामी बेटावर व्यवस्था ओके होती.
देवबाग किल्ला ला नेताना बोटीत क्षमतेच्या खूप जास्त माणसं होती.त्याच्या आधी पेपरात वेगळ्या राज्याच्या घटना वाचल्याने खूप घाबरले होते.लाईफ जॅकेट होती.पण एका बाजूला ढिगाने ठेवली होती.(म्हणजे बोट उलटली तर त्या ढिगातून काढून जॅकेट चढवणार कशी ?कोणी जॅकेट चढवून बोटीत बसा म्हणून सांगत नव्हते.)
मुळात सध्या टूरिझम वाल्यांचे आधीच गेली 2 वर्षं 12 वाजल्याने सुरक्षिततेत थोड्या तडजोडी करून जास्त पैसे कमावणे होत असेल.
इथे कोणी कोकणात रेझोर्ट चालवणारे असेल तर अनुभव सांगा.
लाईफ जाकेटसबद्दल -
लाईफ जाकेटसबद्दल - कन्याकुमारी - विवेकानंद स्मारक जाण्यासाठी जाकेट्स घालावीच लागतात . पण बोटीतून अगोदर येणारे प्रवासी जाकेट्स खाली टाकून मळवतात तीच उचलून घालणे नको वाटले. ती कुठे अडकवली/टांगली गेली पाहिजेत.
कोची फोर्ट ते एर्नाकुलम जेटी असे तिकडे कामावर जाणाऱ्या नोकरदारांसाठी लॉन्चेस असतात त्यातून आलो तेव्हा जाकिटेफिकेटे काही नसते. ( २०१४ साली तिकीट अडीच रुपये होते.)
भंडारदरा ( शेंडी गाव,mtdc jetty) ते रतनवाडी एकच लॉन्च जाते. एक तास लागतो. जाकिटे नसतात. पण बोटीसाठी त्या माणसास केरळमधून शिकून लायसन घ्यावं लागलं.
वापी दादरा गार्डन येथे आणि सापुतारा तलावातल्या नौकांसाठी केरळवालेच आहेत. लायसन आणि जाकिट्स असतात.
म्हणजे कोकणात काही ठिकाणी स्थानिक लोकं नियम डावलून धंधा करतात असं दिसतंय.
Visa2explore चानेलच्या हरीश बालीने 'कोकणी रानमाणूस'ला गाईड म्हणून घेऊन दक्षिण कोकणचे विडिओ केले आहेत. त्यात देवबाग, तारकर्ली,इतर ठिकाणी धोका समजावला आहे. ते विडिओ पाहूनच पर्यटनाचा आनंद घ्यावा अशी विनंती.
मी शक्यतो पाणी जल पर्यटन टाळतोच.
गेटवे वरून एलिफंटा केव्हसला
गेटवे वरून एलिफंटा केव्हसला लाँचने फिरायलो जातो वा त्यासारखेच काही पर्यटन तेव्हा हे जॅकेट प्रकरण नसते. लोकंही स्वस्थ बसलेली नसतात तर मस्त टपावर बसून समुद्रपक्ष्यांना कुरकुरे खाऊ घालत असतात.
लाईफ जॅकेट कुठे कंपलसरी कुठे नाही याचे काय नियम आहेत?
मी मालदीवला 6 महिने काढलेत ,
मी मालदीवला 6 महिने काढलेत , तिथेही लाईफ जाकीट बोटीत शेल्फवर कपडे रचतात तसे रचलेले असायचे
कुणी घालत नव्हते
काय भयंकर अनुभव आहे! जर बेट
काय भयंकर अनुभव आहे! जर बेट पाण्याखाली असेल तर तिथे जबरदस्ती उतरवतात कसे पर्यटकांना?!! बरं साहस म्हणून किंवा माहिती नसल्यामुळे कुणी तरी ही जायचेच म्हटले तरीसुद्धा प्रत्यक्ष तिथे गेल्यावर भिती वाटल्यामुळे कॅन्सल करायचा ऑप्शन असायला पाहिजे! फारच केअरलेस कारभार दिसतोय.
तिथे जाऊन कसे कँसल करणार ?
तिथे जाऊन कसे कँसल करणार ? हेलिकॉप्टरने येणार का ?
डेंजर आहे!
डेंजर आहे!
अहो बोटीतून न उतरुन कँसल करायचं. फार साउथचे पिक्चर बघाता बा तुम्ही!
भयानक अनुभव आहे,
भयानक अनुभव आहे,
पण पाणी खांद्यापर्यंत आहे हे दिसत असताना हे पर्यटक उतरलेच कसे?
म्हणजे त्यांनी उतरत नाही जा संगीतावर असते तर बोटवल्याने काय ढकलून दिले असते का त्यांना?
कोकणात रेझोर्ट चालवणारे असेल
कोकणात रेझोर्ट चालवणारे असेल तर . . . .
'Konkanhearted girl 'चानेलची अंकिता वालावलकर देवबागचीच आहे. तिचे इतरही मालवणी (झणझणीत )गजालीसुद्धा आहेत. सुनामी आइलंड हे सुनामीनंतर झालेलं सांगतात पण ते खरं नाही, ते पूर्वीपासूनच आहे. फक्त ते थोडं मोठं झालंय हे अंकितानेच सांगितलं म्हणून स्थानिक रागावले.
असो.
पण एक भेट देऊन पाहता येईल.
मला वाटतं स्कूबा डाइविंगही आहे.
(केरळच्या पूवारमधले स्कूबाही पर्याय आहे.)
आवड आपलीआपली.
___________________________________
केरळमधे टेक्कडीला एक बोट बुडाल्यावरच लाईफजाकेटसची आठवण झाली. दुर्घटना घडेपर्यंत हे ओपरेटर्स सरकारला दाबून ठेवतात.
-------------
अहो बोटीतून न उतरुन कँसल
अहो बोटीतून न उतरुन कँसल करायचं.
>> बरोबर.
स्कुबा म्हणून बोटीतून आलेल्या पण नंतर विचार बदललेल्या सगळ्यांना आम्ही वर येईपर्यंत तिथेच बोटीत बसवून ठेवले होते.
फार साउथचे पिक्चर बघाता बा
फार साउथचे पिक्चर बघाता बा तुम्ही! Proud >>> आपल्याकडेही हेलिकॉप्टरने एंट्री मारणारे हिरो आहेतच.
असो विषयांतर नको.
पण खरेच प्लान कॅन्सल करायचा पर्याय हवा. बोट पर्यटकांना पुन्हा रिटर्न घेऊन जाऊ शकते ना. कि दुसरीकडे जातात? कि त्यांना वाटते पब्लिक पैसे परत मागेल..
बाकी बेट बुडालेले होते म्हणजे किनाऱ्यावरचे मचाण बुडालेले होते का? बोट पुढे जात नाही म्हणून तिथेच उतरा की पुर्णच बेट बुडालेले. किनाराच नव्हता वा तिथवर जाणे शक्यच नव्हते. मग पब्लिकने नक्की करायचे काय तिथे? आणि पाण्याची पातळी आणखी वाढली वा जबरदस्त लाटेचा तडाखा बसला तर शंभरेक जणांना डायरेक्ट जलसमाधी का.. पुन्हा वाचली मी पोस्ट. विचार करू तितके भयंकर वाटतेय.
आता दुसऱ्या बाजूचा विडिओ आलाय
आता दुसऱ्या बाजूचा विडिओ आलाय.
https://youtu.be/xP-TZDAjFoc
पण दोन चार टूअर आयोजक, हॉटेलवाल्यांनी ढिलाई केली ,फसवेगिरी केली तर सर्वांचाच धंधा बसेल. नाव जाईल. पर्यटक कोकण पर्यटन थांबवतील.
रेल्वे- बस करत माझ्यासारखे जातात त्यांना खूप अडचणी येतात. कुडाळ बस डेपो हे एक महा प्रकरण आहे. तिथून मालवणला जाणे मग तिथून तारकर्ली. थेट बस नाही.
कुडाळ ते धामापूर आणि वालावल गेलो होतो. धामापूरचा तलाव आणि भगवती मंदिर. ( याची माहिती हल्लीच सुनीता देशपांडे लिखीत 'आहे मनोहर तरी' पुस्तकात वाचली. सुनीताबाईंच्या आजोबांचे गाव धामापूर.)
वालावलचा तलाव, दोन देवळे, भक्तनिवास, कर्ली किनारा, (एक चांगले रिझॉटही आहे यू ट्यूबवर विडिओ)आणि देवळाजवळ करंबेळकरांची खानावळ अशी छान अर्धा दिवसाची सहल केली होती. कुडाळचा आठवडी बाजार बुधवारी. ते पाहून सातची तुतारी एक्सप्रेस मिळते.
यतिथून मालवणला जाणे मग तिथून
यतिथून मालवणला जाणे मग तिथून तारकर्ली. थेट बस नाही. >> आहे. कुडाळ - तरकर्ली एस टी आहे. किंवा परुळ्यापर्यंत जाऊन तिथुन पण जाता येते
फारशा बसेस नाहीत. आणि डेपो
फारशा बसेस नाहीत. आणि डेपो अरे रामा. म्हणजे गावचा म्हटल्यास ठीक पण पर्यटन तालुका म्हटल्यास नाही.
आता डेपो नवीन बांधण्यात आला
आता डेपो नवीन बांधण्यात आला आहे.
खांद्या एवढे पाणी.? किती हि
खांद्या एवढे पाणी.? किती हि अतिशोयोक्ती......काही खरे वाटेल असे लिहा.......वाहत्या पाण्यात हात धुण्याचा हा प्रकार आहे.......दुर्दैवी घटना घडली की द्यायचे आपले पण चिटकवून..खांद्या एवढ्या पाण्यात लाटा आल्या असे पण म्ह्टले आहे......कल्पना करा खांद्या एवढ्या पाण्यात लाटा आल्या तर माणूस वाहून नाही का जाणार.....त्यात 6 महिन्याचे बाळ......
आधी लिहितात...
एका माचणावर बसलेल्या स्थानिक लोकांना मदतीसाठी विनंती करत होतो. आमच्या बोटीच्या माणसाला फोन लावा म्हणून ओरडुन सांगत होतो. पण ते अक्षरशः दुर्लक्ष करत होते.
लगेच् लिहितात.....
त्सुनामी बेटावर माचणे तयार करुन त्यावर खाद्यपदार्थ वेगवेगळ्या वस्तूंची दुकानदारी लावलेले स्थानिक लोक तिथले त्यांची दुकाने गुंडाळून गायब झाली होती.
काय खरे आणि काय खोटे? समजून जा......
थोडे लेखात पाणी जास्ती घातले
थोडे लेखात पाणी जास्ती घातले आहे. फेसबुकी लेख पोस्टी. पण इथूनच भीती पसरते. किंवा गर्दी वाढते. उदाहरणार्थ कासपठार आणि काजवे महोत्सव.
ह्या फॉरवर्डने दक्षिण कोंकणात
ह्या फॉरवर्डने दक्षिण कोंकणात छापील आणि प्रिंटेड माध्यमांमध्ये बरीच खळबळ माजवली होती. ज्या घटनेत दोन माणसे बुडाली त्यात बाकीच्या सर्वांना स्थानिकांनीच वाचवले हेही लक्षात आणून दिले जात आहे. अंकिता आणि प्रसाद ( कोंकणी रान माणूस) ह्यांची एक मुलाखत पाहिली. त्यात त्यांनी पर्यटकांचेही गैरवर्तन नजरेस आणले आहे.
जिथे समुद्र नाही अशा प्रदेशातल्या लोकांना समुद्राचा धोका कळत नाही. कुठल्याही राईडच्या दरांसाठी घासाघीस करतात. दरांच्या स्पर्धेमुळे बोट मालकांना ३००-४०० रुपयांना राईड देणे भाग पडते. मग बोटीसाठी प्रशिक्षित माणसे नेमणे परवडत नाही. एखादा मोठा गट आला की त्यातल्या सर्व लोकांना एकाच बोटीत जागा हवी असते. मग रांग मोडून तडजोड करावी लागते. मग पर्यटक रागावून स्थानिकांशी भांडू लागतात. सरकारनेही हंगामात किनाऱ्यावर निरीक्षक ठेवून सुरक्षिततेच्या आणि पर्यावरण रक्षणाच्या नियमांचे पालन होते की नाही ते पाहिले पाहिजे.
कुडाळ स्थानकावरून बसचे म्हणाल तर पर्यटकांचा लोंढा बहुधा सीझन मध्ये आणि संध्याकाळीच जास्त असतो. अधल्यामधल्या तुरळक पर्यटकांसाठी नियमित बस सेवा देणे कदाचित तोट्याचे ठरत असावे.
जिथे समुद्र नाही अशा
जिथे समुद्र नाही अशा प्रदेशातल्या लोकांना समुद्राचा धोका कळत नाही. कुठल्याही राईडच्या दरांसाठी घासाघीस करतात. दरांच्या स्पर्धेमुळे बोट मालकांना ३००-४०० रुपयांना राईड देणे भाग पडते. मग बोटीसाठी प्रशिक्षित माणसे नेमणे परवडत नाही.>> काय पण excuse आहे. सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी झालीच पाहिजे. हे सगळ वाचुन भारतात कुठल्याही adventure sports, water parks etc. च्या वाट्याला न जाण्याचा माझा निर्णय योग्य वाटतोय.
mandard +1. बेजबाबदारपणाला ही
mandard +1. बेजबाबदारपणाला ही कारणं असतात आणि तो (बेजबाबदारपणा) गुळगुळीत करुन वर एक साळसूद टीप लिहुन विकता येतो हेच खरं!
Operators संघटना करून
Operators संघटना करून सर्वांनी एकच नियमावली पाळायला हवी.
Pages