Translation is an art of critical interpretation. No two languages ever dovetail perfectly but they can be linked by translation.
भाषांतर करणे सोपे नाही. विशेषत:एका भाषेतील साहित्य कृतीचे दुसऱ्या भाषेत भाषांतर कठिण असते. लेखाच्या सुरवातीलाच भाषांतरा संबंधातील कोणा मोठ्याचे विचार आणि सुरवातीची प्रस्तावना पाहून आज मी असा भाषांतराकडे का वळलो असा प्रश्न पडला असणार.
शाळेच्या परीक्षा, प्रश्नपत्रिकेची आठवण झाली का ही शंका सुद्धा आली तर नवल नाही. कारण प्रारंभीच्या वर्गात हिंदीचे मराठीत आणि मराठीचे हिंदीत तर नंतर आठवीपासून संस्कृतचे मराठीत व त्याविरुद्ध मराठीचे संस्कृतात हे प्रश्न हमखास असत. संस्कृताचे हे दोन्ही प्रश्न नापास करण्यासाठीच असत असे आम्हा सर्वांचेच मत होते. गाईडमुळे संस्कृतचे मराठीत भाषांतराचा प्रश्न,पाठांतर केले असल्यामुळे, सोडवण्याचा प्रयत्न तरी करत असू. पण मराठीचे संस्कृत? अरे बापरे. तो प्रश्न कधी सोडवल्याचे आठवत नाही!
कारण सांगायचे तर शरदचंद्र चटर्जींच्या गाजलेल्या कादंबऱ्यांची प्रसिद्ध नाटककार भा.वि. उर्फ मामा वरेरकरांनी भाषांतरे केली नसती तर आपण वाचनाच्या किती मोठ्या आनंदाला मुकलो असतो ह्याची जाणीव आता होते. अमृता प्रितम, प्रेमचंद मुन्शी,किंवा सआदत हसन मंटो, पंजाबी उर्दू हिंदीतून लिहिणारे प्रख्यात लेखक राजेंद्रसिंह बेदी ह्यांच्या कथांचे कादंबरीचे भाषांतर जर कुणी केले नसते तर आपल्याला त्या परिणामकारक, विचार करायला लावणाऱ्या कथानकांचा अनुभव आनंद घेता आला असता का?
वर म्हटल्याप्रमाणे कोणत्याही भाषेतून आपल्या भाषेत भाषांतर करणे सोपे नाही. त्यासाठी साहित्यिक जाण व भाषांतरकार स्वत:ही जर लेखक असले तर ते जास्त चांगले होते. म्हणूनच मी, वरेरकरांनी केलेल्या शरदचंद्र चटर्जींची ‘श्रीकांत’ चे तिन्ही भाग किंवा सानेगुरुजींनी केलेले कृष्णा हाथिसिंग यांच्या With No Regrets चे केलेले ‘ना खंत ना खेद’, प्रसिद्ध कादंबरीकार व मराठीतील शैलीदार लेखक ना.सा. फडके ह्यांनी आर्मेनियन लेखक विल्यम सारोयान ह्यांच्या कादंबरीचे ‘ जीवन-संगीत’ ह्या नावाने उत्कृष्ट भाषांतर केले होते त्याचा उल्लेख केला .तसेच रामानंद सागर ह्यांच्या ‘ और इन्सान मर गया’ ह्या कादंबरीचे मनोहर तल्हार ह्यांनी केलेले ‘आणि माणसाचा मुडदा पडला’ हे सुरेख भाषांतर अथवा अलिकडे पुपुल जयकर ह्यांनी इंदिरा गांधींविषयी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचे अशोक जैन यांनी केलेले भाषांतर. तसेच वीणा गव्हाणकर ह्यांनी केलेले ‘एक होता कार्व्हर’ किवा गोडबोले ह्यांनी अनुवाद केलेले ‘लांडगा आला रे आला’ किंवा रविंद्र गुर्जरांचे ‘कॅान टिकी’ ही सर्व अप्रतिम पुस्तके वाचतांना ती भाषांतरे न वाटता स्वतंत्र कृति वाटतात.
अलिकडे चांगली भाषांतरे बरीच होत आहेत. लोकवाड.मय प्रकाशन आपल्या येथील निरनिराळ्या भाषांतील पुस्तकांची, काव्यसंग्रहांची भाषांतरे प्रसिद्ध करीत असते. तीही वाचनीय असतात.
हे सुद्धा आठवण्याचे कारण, दोन वर्षापूर्वी वारलेल्या प्रख्यात अनुवादक Gregory-Rabassa ह्यांच्या संबंधी, वाड.मयाचे नोबेल पारितोषिक विजेते मारियो गार्सिया ह्यांनी काढलेले उद्गार वाचनात आले. ते म्हणाले, “ उत्तम भाषांतर म्हणजे ती स्वतंत्र निर्मितीच असते. आणि तसे उत्कृष्ट व अनुरूप भाषांतर करणारे ग्रेगरी रेबासा होते!” ग्रेगरी रेबासांमुळे मारियो गार्शिया, ज्युलियो कॅार्र्टेझाच्या, मारिओ व्हर्गाझ लोसा अशा बऱ्याच नामवंत स्पॅनिश व पोर्च्युगीझ भाषेतील लेखकांच्या श्रेष्ठ कादंबऱ्या, कथांची ओळख जगातील इंग्रजी वाचकांना झाली!
लॅटिन अमेरिकेतील बऱ्याच प्रतिभावंत व दर्जेदार लेखकांना जगाच्या वाड.मयात स्थान मिळवून देण्यात ग्रेगरी रेबासाचा फार मोठा हातभार आहे. त्यामुळेच ते लेखक रेबासाला खूप मानतात.
ग्रेगरी रेबासा दोन वर्षापूर्वी वयाच्या ९४व्या वर्षी वारला. त्याचा जन्म अमेरिकेतील.र्न्युयॅार्कच्या ब्रॅान्कोस येथे १९२२ साली झाला. त्याचे शिक्षण न्यू हॅम्पशायर जवळच्या डार्टमाऊथ कॅालेजमध्ये झाले.त्याचे वडील क्युबन होते. आई न्यूयॅार्कच्या बारमध्ये काम करायची. त्याने पदवीसाठी Romance( ह्यातील प्रमुख भाषा आहेत इटालियन, फ्रेंच,स्पॅनिश, पोर्च्युगीझ आणि रुमानियन. ह्यांचा उगम,त्या काळी रोजच्या व्यवहारात सामान्य माणसे बोलत त्या गावठी- अनागरी लॅटिन भाषेत आहे.)भाषांचा अभ्यासक्रम घेतला होता. त्यामध्ये त्याने पहिली पदवी मिळवली होती. त्यामुळे त्याला फ्रेंच, स्पॅनिश,पोर्च्युगीझ व इटालियन भाषेत बरीच गति व ज्ञान होते. दुसऱ्या महायुद्धात त्याची शत्रूंचे सांकेतिक भाषेतील गूढ संदेश उलगडण्याच्या महत्वाच्या कामावर नेमणूक झाली. मुळातच त्याला भाषेची आवड होती. हे कामही त्याच्या आवडीचे झाले.
युद्ध संपल्यावर त्यामुळेच त्याने कोलंबिया विद्यापीठात स्पॅनिशमध्ये एम. ए. केले व पोर्च्युगीझ भाषा व वाड.मयात डॅाक्टरेट मिळवली! त्याच विद्यापीठात व नंतर काही वर्षे क्विन्स कॅालेजमध्ये अशी २२ वर्षे त्याने प्राध्यापक म्हणून काम केले.
भाषा हे ग्रेगरी रबासाचे खास ‘प्रेम प्रकरणच’ होते! विद्यापीठात असतानाच त्याने स्पॅनिश आणि पोर्च्युगीझ लेखांचे व कथांचे भाषांतर केले. ते ओडिसी रिव्ह्यू ह्या साहित्याला वाहिलेल्या त्रैमासिकात प्रसिद्ध होऊ लागले. वाचकांना तर ते आवडलेच पण Pantheon ह्या प्रसिद्ध प्रकाशकांचेही लक्ष वेधून घेतले. रबासाचे ह्या दोन्ही भाषांवरील त्याच बरोबर इंग्रजीवरील प्रभुत्व त्यांच्या पारखी नजरेत भरले. त्यांनी रबासावर एक मोठे काम सोपवले. ज्युलिओ कॅार्टेझाच्या स्पॅनिश Rayvuela कादंबरीचे भाषांतर रबासाने हाती घेतले. रबासाने भाषांतर केलेली ही कादंबरी Hopscotch नावाने प्रसिद्ध झाली. ह्या कादंबरीला त्या वर्षीचे नॅशनल बुक ॲवार्ड मिळाले. ह्याच सुमारास ज्याने साहित्यात अदभुत वास्तवता आणली; अद्भुततेच्या कोंदणात बसवलेल्या वास्तववादी लिखाणाचे युग सुरू केले त्या मारिओ गार्शियाने आपली One Hundred Years of Solitude ही कादंबरी लिहून संपवली होती.
भाषांतर करण्या अगोदर तो ते पुस्तक आधी वाचत नाही. वाचून बघेन मग भाषांतर करायचे ठरवेन असे म्हणत नाही. वाचायला घेतो.पण काही शब्दांवाक्यांवर मात्र रेबासा बराच चिकित्सापूर्वक विचार करतो. मूळ भाषेतील शब्दांच्या हव्या त्याच अर्थछटा इंग्रजीतही आल्या पाहिजेत अशा शब्दांची तो निवड करतो. वर सांगितलेल्या मारिओ गार्शियाच्या कादंबरीतील पहिल्याच वाक्यात स्पॅनिश मधील firing squad ह्या अर्थाच्या शब्दाचे भाषांतर इंग्रजीत firing partyअसेही करता आले असते. पण अमेरिकन वाचकांना जास्त सवयीची व जवळची वाटेल अशी firing squad शब्दयोजना त्याने केली. कादंबरीचे स्पॅनिश नाव Cien Anos de Soledad चे इंग्रजीत नामांतर करताना त्याने One Hundred Years Of Solitude असे केले. स्पॅनिश Cien चा अर्थ “ One hundred “ आणि “a hundred” असाही होतो. पण त्याने one hundred च पसंत केले. त्याचे कारण सांगताना तो म्हणतो कादंबरी वाचल्यावर लक्षात येते की गार्शियाच्या मनात एक विशिष्ट असाच काळ होता. त्यामुळे तितकी ती शंभरच वर्षे दर्शविण्यासाठी One hundred हे शब्द वापरले. कादंबरीच्या नावातील दुसरा महत्वाचा शब्द म्हणजे Soledad. त्याचेही भाषांतर Loneliness आणि Solitude ह्या दोन्ही शब्दांनी करता आले असते. पण त्याने वर्णिलेल्या काळातील महत्वाचा भाव येण्यासाठी त्याने तो शब्द का निवडला ह्याचा खुलासा केला,तो आपल्या मराठीतील ‘एकटेपणा’/ ‘एकटेपण’आणि ‘ ‘एकान्तवास’ ह्या शब्दांत जो फरक आहे त्यावरून कळेल.
गार्शिया,कॅार्टेझा, लोसा किंवा ॲागस्टो मॅान्टेरसो किंवा ॲाक्टेव्हिया पाझ् ह्या लेखकांच्या कादंबऱ्या कथांचे अनेक भाषांत भाषांतर झाले आहे. पण रबासा संबंधी बोलतांना गार्शिया म्हणतो , “ फक्त रबासाने मला कधीही एखाद्याही शब्दाचा किंवा वाक्यांच्या बाबतीत खुलासा,संदर्भ विचारला नाही!”
गार्शियाच्या काही पुस्तकांचे एडिथ ग्रॅासमन ह्या दुसऱ्या नामवंत भाषांतरकारानेही, इंग्रजीत भाषांतर केले आहे. तीही प्रसिद्ध आहेत. “स्पॅनिश पोर्च्युगीझ भाषांच्या बाबतीत रबासा हा आम्हा सर्वांचा पितामह आहे!” असे ग्रॅासमनने त्याच्याविषयी म्हटले आहे.एडिथ ग्रॅासमन ह्याने प्रख्यात स्पॅनिश लेखक सर्व्हॅन्टिसची तितकीच प्रख्यात सार्वकालीन अभिजात कादंबरी Don Quixote चे भाषांतर केले ते सगळ्यात जास्त वाचकप्रिय आहे. अशा लेखकांनी रबासाविषयी हे गौरवोद्गार काढले आहेत. पण रबासाचा खरा गौरव नोबेल विजेता मारियो गार्शियानेच केला. गार्शियाने वर उल्लेखलेली आपली कादंबरी लिहून पूर्ण केली. रबासानेच आपल्या कादंबरीचे इंग्रजीत भाषांतर करावे असे त्याला वाटत होते. पण रबासाच्या हातात दुसरे काम होते. ते संपायला तीन वर्षे लागणार होती.
गार्शिया तीन वर्षे थांबला. तो इतकी वर्षे रबासासाठी का थांबला ते सांगताना तो म्हणतो,” उत्तम भाषांतर म्हणजे दुसऱ्या भाषेतील ती स्वतंत्र निर्मितीच असते! माझ्या कादंबरीचीही इंग्रजीत अशीच साहित्यकृति व्हावी, म्हणूनच ग्रेगरी रबासाविषयी माझ्या मनात असलेल्या नितांत आदरापोटीच, मी तीन वर्षे थांबणे पसंत केले !”
भाषांतरकारांना साहित्यात मूळ लेखकाइतकेच मानाचे स्थान मिळवून देणाऱ्या या तालेवार भाषांतरकार रबासाचे १३ जून २०१६ साली वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.
चांगली माहिती !
चांगली माहिती !
छान.
छान.
उत्तम लेख / आढावा.
उत्तम लेख / आढावा.
यासंदर्भात आजच ऐकलेली बातमी :-
रबिन्द्रनाथ टागोरांच्या 'गीतांजली' ला मिळालेल्या साहित्याच्या नोबल नंतर आजच २०२२ चा बुकर पुरस्कार दुसऱ्या गीतांजलीला - 'गीतांजलीश्री' ह्या हिंदी लेखिकेला मिळालाय ! (त्यांच्या 'रेत समाधी' ह्या पुस्तकाच्या डेजी रॉकवेल यांनी केलेल्या इंग्रजी भाषांतरला)
भाषांतरित साहित्य पुन्हा एकदा लोकप्रिय साहित्यविधा म्हणून उदयास आले पाहिजे.
छान लेख आणि माहिती.
छान लेख आणि माहिती.
छान माहिती,
छान माहिती,
याच प्रमाणे " मराठी भाषांतर करताना घातलेले घोळ" असा धागा काढावासा वाटतोय
छान लेख !
छान लेख !
माहितीपूर्ण लेख
माहितीपूर्ण लेख
लेख धावता आणि रोचक केलात.
लेख धावता आणि रोचक केलात.
छान लेख! आपल्याकडे कोणी
छान लेख! आपल्याकडे कोणी स्पॅनिश पुस्तके मराठीत आणली आहेत का?
एक होता कार्व्हर भाषांतरीत पुस्तक नाही. तेवढा बदल करा ही विनंती.
@जिज्ञासा - तुम्ही माझा लेख
@जिज्ञासा - तुम्ही माझा लेख वाचला व आपला अभिप्राय दिला ह्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. ‘ एक होता कार्र्व्हर ‘ संबंधातील माझी चूक नजरेस आणून दिली त्यासाठीही तुमचा मी आभारी आहे. चूक दुरुस्त करीत आहे. स्पॅनिश लेखकांच्या पुस्तकांची मराठीत भाषांतरे झाली आहेत किंवा नाही ह्याची मला कल्पना नाही. पण अभिजात वाड•मयात गणले जाणारे , प्रख्यात स्पॅनिश लेखक सर्व्हॅन्टिसचे सार्वकालीन प्रसिद्ध पुस्तक ‘डॅान क्विझोट’ चे भाषांतर पूर्वी झाले असण्याची शक्यता आहे. आणि असले तर त्या पुस्तकाच्या इंग्रजी भाषांतरावरूनच ते केले असणार.
नुकत्याच अलिकडच्या काळातील नोबेल विजेता (१९९५) प्रख्यात पोर्च्युगीज लेखक Jose Saramago च्या Blindness ह्या कादंबरीचे ( इंग्रजी प्रतिवरून) त्याच नावाने माझे मित्र डॅा. भा. ल. भोळे ह्यांनी केलेले मराठी भाषांतर मला माहित आहे. ते पुस्तक वाचण्यासारखे आहे.
<< भाषांतर करणे सोपे नाही.
<< भाषांतर करणे सोपे नाही. विशेषत:एका भाषेतील साहित्य कृतीचे दुसऱ्या भाषेत भाषांतर कठिण असते. >>
लेखाची सुरुवातच अशी झाल्याने, भाषांतराबद्दल असणारा पूर्वग्रह (bias) दिसून येतो.
जर मी आयुष्यात कधीच स्पॅनिश भाषा शिकलो नसेन, तर माझा उद्देश काय असेल? एखादे पुस्तक अगदी तंतोतंत समजले पाहिजे की त्याचा मूळ गाभा समजला पाहिजे? One Hundred Years of Solitude ऐवजी Centenary of Solitude असे शीर्षक दिल्याने फरक पडला असता का? ज्याला स्पॅनिश ओ की ठो येत नाही, त्याच्यासाठी A hundred Years आणि One Hundred Years आणि Centenary याचा अर्थ एकच तो म्हणजे शंभर वर्षे.
एस्किमो भाषेत बर्फासाठी ४७ प्रकारचे शब्द आहेत म्हणे. मग त्याचे भाषांतर कसे करणार? केवळ हिम अथवा snow असे भाषांतर चालणार नाही का?
मुळात भाषेचा उद्देश म्हणजे संवाद साधणे. (Communication) आपले म्हणणे समोरच्याला तोडकेमोडके का होईना, पण समजणे जास्त महत्त्वाचे आहे. ही एक डॉक्युमेंटरी बघा. (विषण्ण करणारी आहे.) १९८७ मध्ये २ लोक अमेझॉनमध्ये सापडले, पण त्यांची भाषा कुणालाच कळत नाही. आता यात महत्त्वाचे काय आहे? संवाद साधणे की ती भाषा तंतोतंत समजवून घेणे? भाषांतराचेही तसेच आहे.
उपाशी बोका, ते वाक्य
उपाशी बोका, ते वाक्य साहित्यकृतीबद्दल आहे.
उपाशी बोका, मी एक अनुवादक आहे
उपाशी बोका, मी एक अनुवादक आहे व स्वतः १५ पेक्षा अधिक पुस्तके अनुवादित केली आहेत.
अनुवाद हा एक सुवर्ण मध्य आहे
१) मूळ आशय भावनिक आणि भाषिक पैलू ध्यानात ठेवून तसाच ठेवण्याचा प्रयत्न
२) ज्या भाषेत अनुवाद होत आहे त्या भाषेच्या वाचकांना नवीन संस्कृतीत नेणे
३) भाषा ओघवती आणि मूळ आशयानुरूप ठेवणे
एकदम वेगळा लेख. सुंदर.
एकदम वेगळा लेख. सुंदर.
१) मूळ आशय भावनिक आणि भाषिक
१) मूळ आशय भावनिक आणि भाषिक पैलू ध्यानात ठेवून तसाच ठेवण्याचा प्रयत्न
२) ज्या भाषेत अनुवाद होत आहे त्या भाषेच्या वाचकांना नवीन संस्कृतीत नेणे
३) भाषा ओघवती आणि मूळ आशयानुरूप ठेवणे
>> एकदम योग्य लिहिले आहे.