वांगी भात

Submitted by लंपन on 25 May, 2022 - 09:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दीड वाटी आंबेमोहोर किंवा कोणताही वासाचा तांदूळ
वांगी 3 ते ४ मध्यम आकाराची फोडी करून
लवंग (2), नागकेशर (एक टी स्पून), जिरे (1 टे स्पून) , धणे (१ १/२ टे स्पून), सुके खोबरे किस (३-४ टे स्पून), चक्रीफुल (१). हे जिन्नस मंद आचेवर भाजून ह्याचा बारीक कोरडा मसाला करावा.
गोड दही  - १ टे स्पून
काश्मिरी लाल तिखट -१ टे स्पून  
चिंच गूळ पातळ कोळ- पाव वाटी
आधणाच पाणी -४ वाट्या
तूप - १ टे स्पून
मीठ चवीनुसार
फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग, कढीपत्ता, 2 हिरवी वेलची, दालचिनीचे 2 तुकडे.

क्रमवार पाककृती: 

प्रथम तांदूळ धुवून घ्या, पूर्ण पाणी निथळून घ्या. आता तांदळाला १ टे स्पून तूप लावा आणि १० मिनिट तसेच ठेवा. कुकरमध्ये फोडणीच्या साहित्याची फोडणी करा, त्यात वर केलेला कोरडा मसाला, लाल तिखट घाला आणि त्यात वांग्याच्या फोडी घाला. थोडे परतून घ्या आणि त्यात चिंचेचा कोळ घाला. आता त्यात तांदूळ घाला आणि मीठ घाला. 2 मिनिट परतले की त्यात गोड दही घाला. अजून एक मिनिट परतून त्यात पाणी ओता. आधण असल्याने लगेच उकळी येईल, उकळी आली की कुकरचे झाकण लावा (पाणी थोडे कमी पण चालेल जर भात फडफडीत हवा असेल तर). ३ शिट्ट्या काढा, वांगी भात तयार.

Vangi Bhat 2.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणांसाठी
अधिक टिपा: 

लाल तिखटा ऐवजी एक / दोन हिरवी मिरची आणि थोडी कोथिंबीर ह्याचं वाटण घालू शकता. दह्याची चव भातात आवडत नसेल तर दही स्कीप करू शकता.

डाळ वांगी भाजी करताना वरचाच कोरडा मसाला वापरतात (लवंग, चक्रीफुल, नागकेशर, वेलदोडे आणि दालचिनी वगळून), नेहेमीच्या फोडणीत वांग्याच्या फोडी घालायच्या, कोळ घालायचा, कोरडा मसाला, लाल तिखट, मीठ घालायचं, वांगी जरा शिजली की त्यात शिजलेली तूर डाळ घालायची. आठ- दहा मिनिट वांगी शिजून घ्यायची. डाळ वांगी भाजी फार छान लागते चवीला.

माहितीचा स्रोत: 
पारंपारीक
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

वांगीभात सहीच ! लिंबू पिळून अजून चव येईल.
जिलेबी मठ्ठा काढून घ्यावा असं वाटतंय.

मस्त दिसतेय ताट !!! मठ्ठा पण भारीच . असे वाटतेय ' पार्वती पते हर .......' ऐकू येईल आणि पंगत चालू होईल . एक शंका , कुकरमध्ये भात केल्यावर वांग्याच्या फोडी एकदम मऊ होत नाही ना ? ताटाची निवड पण एकदम अचूक केलीय त्यामुळे मेनू अजूनच प्रेक्षणीय झालाय .

१ नं. लागेल, फ्रेश मसाल्यात. मिर्ची-कोथिंबीर वाटणाचा पण छानच लागेल. डाळ वांगी पण मस्त. वांगी भाताचे सोबती भारी निवडलेत.

मनिम्याऊ, धनि, सायो, अमित, srd, VB, जाई, म्हाळसा, मैत्रेयी, अश्विनी, मृणाली, शामली, हीरा, आरती, रानभूली, वावे खूपच धन्यवाद. अश्विनी, हो हा मेन्यू होता, म्हणून ते ताट वापरलं आहे Happy म्हाळसा, हो ते ताट वाटी चांदीचे आहे Proud VB नागकेशर खडा मसाला आहे एक प्रकारचा, कुठेही सहज मिळतो, फोटो टाकतो नंतर. हीरा, हो पूर्ण घेतले आहे ते फूल, लवंग सोडली तर इतर तिखट खडा मसाला नाही ह्यात (काळीमिरी नाहिये ह्यात). अश्विनी, हो वांगी बरीच शिजतात कुकरमध्ये, बरोबर आहे तुमचे म्हणणे. शामली, हो थोडा विचार करूनच सोबती निवडलेत Happy वावे, काकडी को आहे ती Happy मृणाली, हे पदार्थ मीच करतो, मला प्रचंड आणि अशक्य आवड आहे कुकिंगची.. ह्यातली जिलबी विकतची आहे (घरी केली आहे एक दोनदा पण ही विकतची आहे). आजोळचं पुण्यात दारुवाला पुलापाशी हाटेल होतं छोटं 60 च्या दशकात. आजी अफाट सुगरण होती, ती जे काही पदार्थ करत असे ते अफलातून चवीचे असत (साधी कांद्याची भाजीपण). तीच आवड बहुदा आली असावी.

खुप छान रेसीपी आणि फोटो पण. करुन बघणार.
हा वांगी भात , साउथ इंडिअन वांगी भातापेक्षा वेगळा आहे. तो ही छान लागतो. मी त्याचा मसाला भारतातून आणते. यावेळी संपला म्हणुन इथला घेतला. छान झालेला भात. हिरवी लांबडी वांगी वापरायची खर त्या भातात.

भारी दिसतेय ताट!
वांगी आवडत नाही खरे तर. पण दिसतही नाहीये म्हणा फोटोत Happy

छानच रेसीपी. काल फोन वरून वाचली होती. ताट ही सुरेख. ह्यात थोडीशी नारळाची मिरची कोथिंबीर घातलेली हिरवी चटणी पण छान शोभेल.

पुण्यात नवीन मराठी शाळेच्या वाढदिवशी जेवायला विद्यार्थ्यांना हा मेन्यू असे. हा भात तोंडली काप, काजू भोपळी मिरची घालूनही छान होतो. ह्या वीकेंडला जमल्यास करेनच.

आगायाया
लंपन तर सुगरण मोड एकदम.
धाड टाकावी काय तुझ्याकडे

वाहवा ! काय पण बेटा बेत जमवलाय हुजूर ! लैच खास बहुत शानदार.

पान तर असं सजवलं आहे का कौतुक करावे तितके कमी वाटते आहे लंपनजी.

बाकी डाळवांगे करताना ते बाय डिफॉल्ट झणझणीतच असावे असे वाटते, मसाला कुठलाही वापरा डाळवांग्याला, लाल तिखटाची पूड वापरण्याच्या जागी कोल्हापुरी कांदालसूण मसाला वापरला जावा, सोबत कळण्याची भाकरी असावी जाडसर, भाकरी मुरगळुन त्यात पातळ डाळवांगे करावे उपडे अन वरतून थोडे शुद्ध लाकडी घाण्याचे गोड चवीचे शेंगदाणा तेल.

बाहेरून पावसात भिजून यावे, अंग कोरडे करून कोरडे कपडे घालून चुलीपुढे जेवायला बसावे अन तेव्हाच बाहेर धो धो झड सुरू व्हावी

मग वांडो म्हणत असे हमीअस्तू हमीअस्तू हमीअस्तू

डाळवांगे रेफरन्स वरून लिहिले आहे हो मी, मूळ रेसिपी वांगीभात अशी आहे. कदाचित माझा प्रतिसाद प्रचंड बायपास रोडनं गेलाय पण राहवलं नाही तसं लिहीत सुटलो झालं लॉल

कसलं सुरेख दिसतंय ताट, सही रेसिपी.

फार मेहेनत घेऊन करता तुम्ही, हॅटस ऑफ.

वांगी भात, डाळींब्या भात, तोंडली भात वगैरे तमालपत्र असलं तर ते घालते नाहीतर नाही, एरवी फोडणी, मिरी किंवा मिरपुड थोडी, लवंगा दोन आणि गोडा मसाला एवढं घालून करते, तिखटसर करते त्यासाठी लाल तिखट.

तूरडाळ घातली की कानडी पदार्थ 'बिसीबेळीअन्ना' ?>> नाही. नाही. स्ट्र्क्चर बिसीबेळी अन्नाच वेगळ असत. मऊ एकदम . गरगट्या भातासारख. मसाला पण वेगळा असतो. तयार MTR चा मसाला छान आहे एकदम.
जेम्स बाँड कळण्याची भाकरी नाही खाल्ली. पण तुम्ही वर्णन खुप भारी केले आहे.

Pages