अविट

Submitted by रंगिला on 13 May, 2022 - 19:58

अनवट आणि अविट हे दोन शब्द मला फार आवडतात. अनवट शब्दाचा अर्थ मला छान पैकी माहित नाही. पण अविट शब्दाचा अर्थ मीच काय कुणीही सांगु शकेल. अनवट ही मोहमयी सुरांची मैफिल. जी कधीच संपु नये असे वाटते. पण मी त्याचा अनुभव फारसा घेतला नाही.

अविट या शब्दाची उकल करताना त्याच्या शाब्दिक खटपटीत न पडता मला दुसरा शब्द आवडतो तो म्हणजे आंबा.

आंब्याचा सिझन सुरू झाल्यापासुन संपेपर्यंत त्यांच्या अविट चवीच्या, वासच्या , रंगाच्या , स्पर्शाच्या प्रेमात पडतो.

लोक देवगड हापुसला नावाजतात कारण त्याची चव वेगळी आहे म्हणतात. मला रत्नागिरी हापुस आणि देवगड हापुस मधली चव कधीच वेगळी करता आली नाही.

वेगळेपणा आहे तो रंगात. देवगड जरा जास्त केशरी असतो. त्याच्या स्पर्शात एक जीवंतपणा जास्त असतो.

हा फरक म्हणजे नवयौवना आणि एखादी प्रौढ स्त्री यांच्या स्पर्शामधे जाणवतो तितका.

दुर्देवाने एकच गोष्ट आंबा काय कुठल्याही फळाकडे कमी आहे. ती म्हणजे पंचइंद्रियांपैकी कानाला आनंद देण्याची क्षमता यात नाही.

हीच बाब चिजलर नावाच्या पदार्थात आहे असे वाटते. चिजलर जेंव्हा गरम गरम सर्व्ह करायला वेटर येतो तेंव्हा त्याचा वास, रंग, चव , स्पर्श आणि चर्र करणारा आवाज पंचेंद्रियांना मोहून टाकतात.

पण चिझलर मधे अविट म्हणावे असे काही नाही. चिझलर ची आणखी एक वाईट बाब म्हणजे हाॕटेल मधे एकट्याने गेलाय आणि चिझलर मागवला असे होत नाही. याचे कारण त्याची किंमत, आकारमान आणि एकट्याने खाऊन उरलेला टाकुन देणे ही वृत्ती किती पैसा असला तरी संस्कारात नाही.

आंब्याचे तसे नाही . एकट्याने जेवायला बसलो तरी तितकाच आनंद आणि आनंद देणाऱ्या अनेकांच्या सोबत जेवताना ही तितकाच आनंद.

आंब्याचा आणखी एक गुण मला आवडतो तो म्हणजे आंबा तृप्ती देतो. अट्टल दारूबाजाला कधी तृप्ती येत नसावी कारण ते रसायन अस काही आहे की काही वेळाने बेहोष होईपर्यंत पिण्याची इच्छा निर्माण करते.

आंब्याचा रस पोटात जागा नसताना खाल्ला म्हणुन कुणाला अपचन होऊन अॕडमिट केलय ? नाही ? कारण आंबा घेऊन येतो तृप्ती.

मी यासाठी आंबा हे फळ सात्विक या प्रकारात ओळखतो. हीच सात्विकता मला पती पत्नीचा समागमात आहे असे वाटते.

महर्षी वात्सायनाने दाखविलेल्या कला व क्रिडा प्रकारात तरबेज नसतानाही तृप्ती देण्याचे अजब रसायन जिच्यावर प्रेम आहे अश्या स्त्रीकडे खासच आहे. वपुं ची वहिदा , मला भावणारी कोणतीही हिरोईन काही काळ लाभली तरी फक्त अतृप्ती देईल असे वाटते.

सुगंधी कट्टा सिनेमात यशवंत दत्त म्हणतो तसे " नुसत्याच पायर्या कळस नाही "

पंचेंद्रियांना मोहून टाकणारा हा मोह या जन्मी तरी संपेल असे वाटत नाही. योगाभ्यास व तो करताना काही काळ मिळणारे दिव्य सुख इतर वेळी होणारी तगमग शांत करू शकत नाही.

हिम शिखरे मला कधी साद घालतील असे वाटत नाही. माझे जीवन दिव्याच्या वातीकडे आकृष्ट होऊन संपणार्या किटकाप्रमाणे सात्विक संस्कार आत्म्यावर न घडविता संपेल.

Group content visibility: 
Use group defaults