शेव टोमॅटो भाजी

Submitted by लंपन on 11 May, 2022 - 09:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रतलामी शेव - २ वाट्या
टोमॅटो - ४ मध्यम आकाराचे चिरून
काश्मिरी लाल तिखट - २ टे स्पून
हळद - १ टी स्पून
साखर - १ टे स्पून
कसूरी मेथी - १ टे स्पून
ओवा - १ टी स्पून
जिरे -१ टी स्पून
हिरवी मिरची लसूण पेस्ट - १ टे स्पून
गरम मसाला - १ टी स्पून
तेल - ४ ते ५ टे स्पून
मीठ, हिंग - चवीनुसार
पाणी - ३ ते ४ वाट्या

क्रमवार पाककृती: 

एका कढईत तेल तापत ठेवा. तेल तापलं की त्यात ओवा आणि जिरे घाला. नंतर हिरवी मिरची लसूण पेस्ट, हिंग,हळद, काश्मिरी लाल तिखट, टोमॅटो, मीठ, साखर घाला. टोमॅटो ५-७ मिनिटे शिजवुन घ्या. आता कसूरी मेथी घाला आणि पाणी घाला. पाण्याला चांगली उकळी आली कि गरम मसाला आणि शेव घाला. शेव अगदी आयत्या वेळी घालायची आहे. शेव घातल्यावर अजून २-३ मिनिट उकळी काढा.

Shev Tomato 1.jpg

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी
अधिक टिपा: 

रतलामी शेव मोडत नाही, पाणी जास्त शोषून घेत नाही, फार बुळबुळीत लागत नाही (भावनगरी एकदम गाळ होऊन जाते) आणि कुठेही सहज मिळते. पाणी आणि तिखटाचे प्रमाण कमी जास्त करू शकता.

माहितीचा स्रोत: 
गुजराती फूड चॅनेल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही!

छान. ह्या टाइप करते मी बरेचदा, कांदाही घालते. कसूरी मेथी घालून केली नाहीये मात्र कधी.

साखर - १ टे स्पून>>> नो Sad
खान्देशातली शेव भाजी आणि ही अगदीच वेगळ्या आहेत हे आज समजलं.

ही केली आहे अनेकदा. कांदा घालतो. पाणी एवढे नाही.

नवीन Submitted by भरत. on 12 May, 2022 - 00:17
>>>>>. बरोबर, भाजी कमी आमटी जास्त वाटत आहे. शेव टमाटे नि साक सुकी छान लागते। या भाजीमध्ये रतलामी टाका नाहीतर भावनगरी थोड्यावेळाने गळूनच जाईल।

मस्त आहे .
मी बरेचदा रात्रीच्या जेवणासाठी याचे झटपट वर्जन करते .
जिर्याची फोडणी , त्यावर कांदा-टोमॅटो परतायचा, लाल तिखट . थोडा गोडा किन्वा गरम मसाला आणि मीठ , एक कप पाणी घालून उकळवून ठेवायची .
जेवणासाठी ताटं घेतली की परत गरम करून यात मोरा शेव किन्वा कधीकधी सरळ बून्दी . गॅस बन्द. दोनदा चमचा फिरवून ताटात वाढायची .

भावनगरी गठियात खूप व्हरायटी असते खास भाजीचे एक गठिया असते, नाव विसरलो आता.

ह्या भाजीचे गुर्जर प्रदेशीचे नाव शेव टामेटा नू शाक असे होय, काठियावडी पद्धतीत थोडी तिखट आणि सुरती/ अहमदाबादी पद्धतीत थोडी गोडसर असे व्हेरियेशन असते तिच्यात. गुजराती मऊसूत पातळ फुलके आणि सोबत शेव/ सेव टामेटा आणि नंतर भरपूर पुदिना घातलेला गोडमिट्ट मसाला चहा (खास गुजराती) हे पावसाळ्यात कधीतरी भारी वाटते

ब्लॅककॅट , बेफिकीर (चक्क बेफि Happy ) , जाई, भाचा, अंजू, भरत, srd, स्वस्ति, जेम्स, किशोर, आशु, अजनबी धन्यवाद. कांदा घालून नाही केली कधी, ट्राय करेन पुढल्या वेळी. Srd अजिबात नाही होत तिखट, काश्मिरी लाल तिखट रंगासाठी वापरतात. पाणी आणि तिखट कमी जास्त करू शकता. गट्टे मला आवडतात पण घरी कोणाला नाही आवडत . स्वस्ति बुंदीने ट्राय करेन आता. जेम्स, भावनगरी इकडे पुण्यात जी मिळते त्याने एकदम गाळ झाला, रतलामी टिकून राहिली Happy नडियाडला खाल्ली तेव्हा गोड चव होती , अन अंकलेशवर जीआयडीसी मध्ये एकदा खाल्ली तिथे तिखट चवीची होती, गोड चवीची जास्त आवडली Happy

ही केली आहे अनेकदा. कांदा घालतो. पाणी एवढे नाही. >>> मीही अशीच करते.

अगदी कोरडी करते मी, सुटलेलं पाणी आटल्यावर, गॅस बंद करुन रतलामी शेव किंवा भावनगरी गाठया मिक्स करते आणि झाकण ठेवते. ह्याच भाजीच्या सारणाचे मोदक किंवा करंज्याही करते. आपण मटार करंज्या करतो त्याच प्रकारे.

भारी रेसिपि Happy

एवढ्या पाककृती करतोयस, कधी आमंत्रण पण दे Wink

ह्याच भाजीच्या सारणाचे मोदक किंवा करंज्याही करते. आपण मटार करंज्या करतो त्याच प्रकारे.>> अंजू हे भारी वाटत आहे करून बघायला हवे. वर्णिता , मृणाली धन्यवाद. आबा प्लॅन करूयात की , तुला सोसायटी माहीत आहे मागच्या वर्षी आंबे दिले होतेस तिथेच. Srd कोणता व्हिडीओ?

छान

धन्यवाद लंपन .मी आज केली तुमच्या कृतीने फक्त शेव नव्हती म्हणून मेथी गाठीया टाकले खूप छान चव आली होती. सगळ्यांना आवडली