
तेथे कर माझे जुळती
एखाद्या व्यक्तीच वय हा फक्त एक आकडा आहे , मनाने त्याला जे त्याच वय वाटेल ते त्याच खर वय अश्या अर्थाचे एक प्रसिद्ध वचन ज्या व्यक्तीला तंतोतंत लागू पडते अश्या एका स्त्रीची मी आज इथे ओळख करून देत आहे.
ही व्यक्ती म्हणजे माझ्या नणंद बाई आहेत , त्यांच्यात आणि माझ्यात वयाचं अंतर खूप असल्याने मला त्या माझ्या नणंद बाई न वाटता घरातील एक वडीलधारी व्यक्तीच वाटत आल्या आहेत. त्यांचं नाव जरी कुसुम असलं तरी आम्ही त्याना “ माई ” म्हणतो. लक्ख गोरा वर्ण, घारे डोळे, स्पष्ट वाणी, तल्लख बुद्धी आणि स्मरणशक्ती, साधारण पिकलेल्या केसांचं मागे एक पोनिटेल, बेताची उंची, आता वयामुळे थोड्या वाकल्या ही आहेत आणि तोंडात एक ही दात नाहीये तरी हसऱ्या प्रसन्न आणि तेजस्वी चेहऱ्याच्या माईंचं वय पंचाऐंशी आहे ह्यावर बघणाऱ्याचा विश्वासच बसणार नाही.
माहेरी काय किंवा सासरी काय त्यांचं आयुष्य फार काही आरामाचं गेलेलं नाहीये. लग्न झाल्यानंतर त्या आवड म्हणून टायपिंग आणि शॉर्टहॅन्ड शिकल्या. शॉर्टहॅन्ड परीक्षेत त्या महाराष्ट्र राज्यात पहिल्या आल्या होत्या. परंतु सरकारी खात्यात नोकरी न करता नंतरच पूर्ण आयुष्य टायपिंग क्लास मध्ये त्यांनी नोकरी केली. घरात एकत्र कुटुंबाच्या सगळ्या जबाबदाऱ्या पाडून दिवसभर नोकरी आणि नंतर चार पैसे गाठीशी असावेत म्हणून रात्री जागून टायपिंग च जॉब वर्क ह्यामुळे त्यांचा दिवस कधी उगवायचा आणि कधी मावळायचा हे त्यांना ही समजत नसेल.
त्या एवढ्या बिझी असल्या तरी त्यांचा जनसंपर्क अफाट मोठा आहे. त्यांचे असंख्य विद्यार्थी आज ही त्यांच्याशी संपर्क ठेवून आहेत. त्यातल्या काहींशी त्यांचे संबंध खूप जिव्हाळ्याचे आणि घरोब्याचे आहेत. त्यातले अनेक जण आज सरकारी कार्यालयात मानाच्या हुद्द्यावर ही आहेत. त्यामुळे आमची सरकार दरबारची अनेक कठीण कामं सुरळीतपणे (अर्थात कायद्याच्या चौकटीत राहूनच ) पार पडली आहेत.असो. आमच्या सगळ्यांचे वाढदिवस लक्षात ठेवून प्रत्येकाला त्या आठवणीने फोन करतात. रक्षाबंधनाला आठवणीने सर्व भावाना राखी पाठवतात. दर आठ पंधरा दिवसांनी खुशालीचा फोन ठरलेलाच असतो.
घरात काही कार्य आहे आणि माई हजर नाहीत असं होऊच शकत नाही. त्या आल्या की घर भरून जातं. तरुण पिढी बरोबर ही त्या मस्त गप्पा मारतात. त्या तश्या खूप गोष्टीवेल्हाळ आहेत. कोकणातल्या जुन्या जुन्या आठवणी त्यांच्याकडून ऐकायला खूप मजा येते. आम्ही दोघी रात्री उशिरापर्यंत गप्पा मारत असतो. मनुष्य स्वभावानुसार कधी तरी नाराज होतात, मूड ठीक नसतो त्यांचा.पण हे क्षणिक असतं. त्याना खुश करण्याचा सोपा उपाय म्हणजे दूध साखर जास्त घातलेली , जायफळ लावलेली गरम गरम कॉफी. कॉफी त्याना प्रचंड प्रिय आहे. कॉफीच्या कपात नाराजी चुटकीसरशी विरघळून जाते.
आर्ट आणि क्राफ्ट ची त्याना मनापासून आवड आहे. पिशव्या, दुपटी , झबली अस शिवणकाम, लोकरीच विणकाम आणि रुखवताचे प्रकार करण्यात त्या एक्सपर्ट आहेत. हलव्याचे दागिने ही अप्रतिम करतात त्या. त्यांनी केलेल्या ताटा भोवतीच्या महिरपी तर फारच सुंदर असतात. भाजणीच्या चकल्या, नारळाच्या वड्या, भरल्या तोंडल्याची भाजी, आणि कोकणात गेल्या की हमखास केली जाणारी सुंठीची कढी ह्या त्यांच्या सिग्नेचर डिश म्हणता येतील.
रिटायर झाल्यावर ही त्या स्वस्थ बसलेल्या नाहीत. त्यांच्या दोन छोट्या नातींची जबाबदारी सूनबाई नोकरी करत असल्याने त्यांनी आनंदाने सांभाळली आहे. त्या दोघी ही त्यांच्या जीवनाची प्रेरणा आहे म्हटलं तर ती अतिशयोक्ती होणार नाही. नातींचा ही आजीवर खूप जीव आहे. एक नात सध्या दुसऱ्या गावात आहे नोकरी निमित्ताने तर रोज माईंचा तिला वेक अप कॉल असतो. अलीकडे स्मार्ट फोन च तंत्र ही शिकून घेतल्याने wa ने ही त्या जोडलेल्या असतातच त्यांच्याशी.
मागच्या आठवड्यात त्यांच्या मोठ्या नातीचं लग्न होतं. माई उत्साहाने नुसत्या सळसळत होत्या. घरातली लगीन घाई सांभाळून त्यानी सात मोराच्या महिरपी स्वतः केल्या रुखवताच्या पानांसाठी. दागिने, नवीन साडी, हाताला मेंदी आणि प्रसन्न हसरा चेहरा ह्यामुळे हॉल मधील त्यांचा वावर बघणाऱ्याला ही सुखकारक आणि आनंददायी वाटत होता. एक प्रकारची प्रेरणा देत होता.
हा फोटो
प्रत्येकाच्या जीवनात चढ उतार असतातच. जास्त खोलात जात नाही पण माईंचं सगळं आयुष्य खूप खडतर गेलं आहे. सुखाचे क्षण त्यांच्या आयुष्यात फारच थोडे आलेत. पण ह्या प्रतिकूलतेचा परिणाम त्यानी स्वतःवर अजिबात होऊ दिलेला नाही. ह्या वयात ही “ आता माझं काय राहिलं आहे” ही भावना नाहीये त्यांची. उलट आज ही त्या आयुष्य समरसून जगत आहेत. कोणत्याही गोष्टीचा हव्यास नाहीये त्याना पण छोटे छोटे आनंदाचे क्षण त्या पूर्ण एन्जॉय करत असतात. मला वाटत त्यांच्या उत्तम तब्बेतीच हेच रहस्य असावं. आयुष्य उत्साहाने आणि समाधानाने जगायला शिकवणारी माझी सर्वात मोठी प्रेरणा आहेत त्या.
त्याना उदंड आयुरारोग्य लाभू दे आणि त्यांचा शंभरावा वाढदिवस ही उत्साहात साजरा करण्याच भाग्य आम्हाला लाभू दे हीच परमेश्वर चरणी प्रार्थना !
हेमा वेलणकर
वाह! डोळ्यासमोर माईंचं (आजी
वाह! डोळ्यासमोर माईंचं (आजी म्हटलं पाहिजे) व्यक्तिमत्त्व उभं राहिलं. त्यांना दीर्घ आयुरारोग्य लाभो ही सदिच्छा!
थॅंक्यु वावे पहिल्या वहिल्या
थॅंक्यु वावे पहिल्या वहिल्या प्रतिसादासाठी
मनस्वी लिहिले आहे. आवडल.
मनस्वी लिहिले आहे. आवडल. माईना पुढील आयुष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा
हेमा, तुझा माईंबद्दलचा आदर,
हेमा, तुझा माईंबद्दलचा आदर, आपुलकी, जिव्हाळा थेट पोचला. त्यांचा फोटो टाक ना. माईंना निरोगी दीर्घायुष्यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा!
खूप छान लिखाण.
खूप छान लिखाण. आवडले.
हेमाताई, खूप छान लिहिलंय.
हेमाताई, खूप छान लिहिलंय.
माईंना नमस्कार. त्यांची सकारात्मक दृष्टी आशिर्वाद म्हणून द्यायला सांगा!!
छान लिहिले आहे. माईंना निरोगी
छान लिहिले आहे. माईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!
छान.
छान.
छान लिहिलंय ममो! माई आजींना
छान लिहिलंय ममो! माई आजींना वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा! अशा प्रेमळ वडिलधाऱ्या व्यक्ती जिथे जातात तिथले वातावरण प्रसन्न करून टाकतात आणि सगळ्यांना हव्याहव्याश्या वाटतात.
सुंदर लिहिले आहे मनिमोहर !!
सुंदर लिहिले आहे मनिमोहर !! तुम्ही केलेले व्यक्ती चित्रण इतके detail ( मराठी शब्द सुचत नाही मला ) की ती व्यक्ती डोळ्यासमोर उभी राहते . माईंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! बऱ्याच दिवसांनी तुमचा लेख आला . लगेचच वाचून काढला.
ममो बरेच दिवसांनी तुझा लेख
ममो बरेच दिवसांनी तुझा लेख दिसला. तुझ्या माई डोळ्यासमोर उभ्या राहिल्या ह्या लेखातून. आयुष्य समरसून जगणारी लोकं आपल्याला नेहमीच उर्जा देतात. त्यांना नमस्कार _/\_.
माईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!>>>+११
मस्त लेख. माईंना निरोगी
मस्त लेख. माईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!>>>+११
वाह हेमाताई, माईंना
वाह हेमाताई, माईंना डोळ्यासमोर उभं केलंत, नेहेमीप्रमाणे चित्रदर्शी वर्णन. त्यांना नमस्कार सांगा.
माईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!! >>> अगदी अगदी.
छान परिचय. माईना पुढील
छान परिचय. माईना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा.
प्रसन्न आणि उर्जायुक्त माईंचे
प्रसन्न आणि उर्जायुक्त माईंचे दर्शन घडवलेत अगदी...
माईंना नमस्कार. त्यांची सकारात्मक दृष्टी आशिर्वाद म्हणून द्यायला सांगा!! >>>>> +९९९९
____/\____
मस्त लेख. माईंना निरोगी
मस्त लेख. माईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!
खूपच छान व्यक्ती परीचय.
खूपच छान व्यक्ती परीचय. माईंना दिर्घायुष्य लाभो नी त्या असेच हसत खेळत आनंदात राहोत.
ममो, बरेच दिवसांनी. छान
ममो, बरेच दिवसांनी. छान व्यक्तिचित्रण.
खुप छान लिहिलेस ग..
खुप छान लिहिलेस ग..
अशा उत्साही लोकान्बद्दल खुप आदर वाटतो. वाढत्या वयासोबत निगेटिवीटी वाढत जाते हा अनुभव. त्या पार्श्वभुमीवर अशी व्यक्तिमत्वे दिसली कि आधी साष्टान्ग नमस्कार आणि नन्तर एक गळाभेट घ्याविशी वाटते. अशान्ना उदन्ड आयुष्य लाभो!!
छान लेख ! माईंना दीर्घायुष्य
छान लेख ! माईंना दीर्घायुष्य लाभो ! _/\_
माईंकडून आणि माझ्याकडून
माईंकडून आणि माझ्याकडून सगळ्यांना खूप खूप धन्यवाद.
त्यांच्या फोटो बद्दल त्याना विचारते आणि इथे दाखवते.
पण हेडर मध्ये त्यानी केलेल्या मोराच्या महिरपींचा फोटो add करतेय.
काय सुंदर केल्या आहेत महिरपी!
काय सुंदर केल्या आहेत महिरपी! छानच!
छान लेख आणि सुंदर महिरपी!
छान लेख आणि सुंदर महिरपी! माईंना नमस्कार आणि शुभेच्छा!
माई छानच आहेत आणि अशा माई
माई छानच आहेत आणि अशा माई/आज्जी असतात प्रत्येकाच्या परिवारात/ओळखीत.. पण ते इतक्या ताकदीने कागदावर उतरवून एक्सप्रेस करणे कठीण.. तुम्ही खूप सुंदर लिहिले आहे...
वावे, स्वाती २, च्रप्स
वावे, स्वाती २, च्रप्स धन्यवाद , सांगते माईंना ही.
मस्त लेख. माईंना निरोगी
मस्त लेख. माईंना निरोगी दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा!!>>>+११111.
मोराची रांगोळी तर छानच.अशा सटसटीत माणसांचे कौतुक वाटते.
मोराची महीरप अप्रतिम.
मोराची महीरप अप्रतिम.
काय सुरेख आहेत महिरपी!!
काय सुरेख आहेत महिरपी!!
हेमाताई, माईंना निरोगी दीर्घायुष्य लाभावे यासाठी सदिच्छा_/\_
देवकी, अंजू, प्रज्ञा ...
देवकी, अंजू, प्रज्ञा ... आम्हा दोघींकडून मनापासून धन्यवाद.
मनः पूर्वक सादर वंदन
मनः पूर्वक सादर वंदन
त्यांच्या कष्टाची आणि गुणग्राहकतेची कदर करून दाद देणार्^या आपण देखील प्रशंसेस पात्र आहात मनी जी
Pages