टाळतात का असे?

Submitted by निशिकांत on 19 April, 2022 - 10:30

लोक प्रश्न नेहमीच टाळतात का असे?
आणि व्यर्थ संकटात गुंततात का असे?

भागवावया तहान चूक मार्ग शोधती
मृगजळास प्यावयास धावतात का असे?

द्यूत खेळणे कधी निषिध्द ना असे तरी
द्रौपदी पणास, पाच लावतात का असे?

कालचे न चालती रिवाज आज, पण तरी
संस्कृती जुनी म्हणून हिणवतात का असे?

व्यस्त नेहमीच मी असावयास पाहिजे
मोकळ्या मनी पिशाच्च नांदतात का असे?

ज्येष्ठ मी तरी हिमालयात योजिली सफर
धाडसास सर्व लोक हासतात का असे?

गुंतलाय जीव, आप्त ईष्ट वाटती हवे
वानप्रस्थ आश्रमात नांदतात का असे?

फेसबुक नि व्हाट्सअ‍ॅप वापरा जरूर पण
बोलणी घरातली थांबतात का असे?

व्यर्थ वाटते मनास आपुलीच लेकरे
मृगजळात सत्त्य लोक पाहतात का असे?

माय वेगळ्या घरात, पुत्र वेगळ्या घरी
श्राध्द ते करून पांग फेडतात का असे?

प्रश्न नेहमी मनात हे कसे? नि ते कसे?
उत्तरात खूप प्रश्न शोधतात का असे?

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो. क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--देवराज
लगावली--गाल X ७ + गा

Group content visibility: 
Public - accessible to all site users