एकेकाळी ती तशी होती.. एकेकाळी मी तसा होतो..
एकेकाळी काळ तसा होता..
आणि तेव्हा ती एकदा अचानक म्हणाली होती की,
इथे मी तुझ्याबरोबर फिरते हे माझ्या घरी कळलंय..!
तेव्हा मी आतली धाकधूक आतल्या आत जिरवत,
उसन्या खेळकर आवाजात म्हणालो होतो की,
कळ्ळं तर कळ्ळं..! त्यात काय??
ती : पप्पांनी तुला भेटायला बोलावलंय.
मी : ओह्..! म्हणजे कशाला? त्यांचा काय संबंध?
आपलं चाल्लंय की चांगलं..!
ती : त्यांचा काय संबंध म्हणजे? अरे त्यांचाच तर सगळा
संबंध आहे ना..! मी काय आभाळातनं पडलेय
की काय..!
मी : बरं.. भेटतो.. तशी काही अडचण नाही.. मी काही
घाबरत नाही तुझ्या बापाला..पण तरीही कशाला
उगाच घाई?
ती : हम्म.. घाईच आहे असं समज.. कारण आता त्यांच्या
कानावर गेलंय म्हटल्यावर, तू नाही भेटलास तर तेच
येतील तुला शोधत.. त्यांना काही ते अवघड जाणार
नाही.
मग तिच्या गावी गेलो. सोबत एक जण. त्याला
थाप मारून नेलं की असं असं या भागात एक काम
आहे, तर चल सोबत.
तर तेव्हा तिच्या पप्पांनी, म्हणजे समजा दादासाहेब
निंबाळकर यांनी बोलायला फारशी वाटच ठेवली
नाही.
ते बोल्ले की आमचं असं असं आहे. अशी अशी
कुळी आहे. फारा वर्षांपूर्वी आमच्यातली येक
म्हातारी ह्या भागात वतनावर आली.
हा वाडा बघताय तो तिनंच बांधलेला है..!
आमच्यात पोरी फक्त देशमुखांच्यातच द्यायची
रीत है..!
अपवाद असतेत..! पण तुमची माहिती काढलीय
आम्ही.. आणि तुमचा एकूण वकूब बघता तुमच्या
बाबतीत अपवाद करता येईल असं आम्हाला वाटत
नाही..!
मी : अच्छा.. पण काय माहिती काढलीय? म्हणजे त्यात
काही कमी जास्त आहे काय?
ते : जेवढी काढायची तेवढी काढलीय. हे जुळणार नाही.
मी : पण मी काय म्हणतो, तुम्ही जरा अमृताला विचारून
बघितलं तर...
ते : ह्याबाबतीत आमच्या शब्दापुढं जाणार नाही ती.
तशी खात्री आहे. तुम्ही पण याउप्पर तिला भेटला
नाहीत तर तुमच्यासाठी बरं राहील. नाहीतर
आमच्याकडं दुसरे मार्ग पण आहेत.
अजितराव, पाहुण्यांन्ला सोडून या चौकात.
मी : नाही.. ठीक आहे.. जातो आम्ही..
नंतर तो धागा तुटतो.. सगळेच धागे तुटतात समजा.
मग मध्यंतरी एक मित्र तहसीलदार झाल्याचं कळतं.
नंतर त्याचा लग्नासाठी फोन येतो.. आवर्जून दोघेही या वगैरे.. आणि तसे त्यासाठी आलोय.
तर म्हाताऱ्यानं बाकी शब्द खरा केलाय..!
चि. सौ. कां. अमृता निंबाळकरची
सौ. अमृता कोंडे-देशमुख होताना दिसतेय..!
आणि तशी ती होत असताना मी लांबून पहात
राहतोय.
बाकी आता ती काही पंचविशीतली ओळखीची
मुलगी राहिलेली नाहीये.. आता तिचं एका प्रौढ पुरंध्रीमध्ये
रूपांतर झालंय.. चेहऱ्यावर एक शांत समजूतदार डूब
असलेल्या स्त्रीला तसे म्हणतात, असे समजा..!
असो..! शुभेच्छा आहेतच दोघांनाही..!
ईश्वरी नियोजनात आडकाठी कशासाठी?
आणि आडकाठी घालणारे आपण कोण ?
"काय रे ? काय बघतोयस एवढं ? तुमच्या दोघांचं
काही होतं की काय आधी?" शेजारून कानांत एक
अत्यंत ओळखीचा आवाज येतोय.
'छे छे..! काहीतरीच बोलतेस अगं तू पण..!'
मी दचकून उत्तर देतोय.
सुरुवात मस्त. पण लवकर आटोपती
सुरुवात मस्त. पण लवकर आटोपती घेतली.
छान लिहिले आहे..
छान लिहिले आहे..
कथा नायकाचा जन्म नव्वदी वा नंतरच्या दशकातील आहे का? कारण ऐंशीच्या दशकात जन्मलेली आणि नव्वादीच्या दशकात पौगंडावस्थेत आलेली पोरं तेव्हा राडा घालायचे अश्या प्रकरणात. ईतक्या सहज विसरले जायचे नाही.. असे एक निरीक्षण
कन्फ्युज झाले मी. ती आता
कन्फ्युज झाले मी. ती आता प्रौढ झाली आहे म्हणजे बरीच वर्ष झाली आहेत ना या घटनेला. मित्राबरोबर लग्न झाल कधी? ती पंचवीशीत असताना कि आता ?
सीमा, बरोबर आहे. विशी
सीमा, बरोबर आहे. विशी म्हणायला हवं होतं बहुतेक. पंचविशी नाही. तिशीत लग्न झालं असेल.
नायकाने तर आधीच करून टाकलंय शुभमंगल!
ती आता प्रौढ झाली आहे >>
ती आता प्रौढ झाली आहे >> त्याच्याशी लग्न न झाल्याने अकाली आलेले प्रौढत्व असे काही असेल ?
म्हणजे देशमुखांच्या घरातील
म्हणजे देशमुखांच्या घरातील असून तिचं लग्न जरा आरामातच झालय..
छान आहे लघुकथा
छान आहे लघुकथा
सिरियसली! फारच बकवास असते ही
सिरियसली! फारच बकवास असते ही फेज.
बाकी, जुन्या काळाचा एखादा तुकडा चितारून ठेवावा तशा कथा असतात तुमच्या
आवडली!!!
आवडली!!!
नायकाने शुभमंगल केलंय असेच काही नसावे.. तो अत्यंत ओळखीचा आवाज आई किंवा बहिणीचा असू शकतो?
भारी
भारी
लघुकथा छान आहे.
लघुकथा छान आहे.
नायकाने शुभमंगल केलंय असेच काही नसावे.. तो अत्यंत ओळखीचा आवाज आई किंवा बहिणीचा असू शकतो? >> 'लग्नासाठी दोघांना आवर्जून बोलावले आहे.
देशमुख लवकर मिळाले नसतील.
देशमुख लवकर मिळाले नसतील.
पण लघुकथा जमली आहे. लिहीत रहा
'लग्नासाठी दोघांना आवर्जून
'लग्नासाठी दोघांना आवर्जून बोलावले आहे.
>>> हायला हो की .. हे मिसले होते मी... एक नंबर आहे...