Submitted by निशिकांत on 3 April, 2022 - 09:20
वेळ पाहुनी खोटे नाटे, हसावयाचा बनाव केला
सत्त्य विकेना बाजारी, मी जरी तयाचा लिलाव केला
उपेक्षिताचे जीवन जगलो, मोजदाद ना झाली माझी
मीच शेवटी असून जगती, नसावयाचा ठराव केला
लख्ख प्रकाशी काळे धंदे, डोळ्यांना हे बघवत नाही
ओंगळ दिसता जरा कुठेही, विझावयाचा सराव केला
हार, फुले अन् नवीन कपडे, थाट पाहुनी कलेवरांचा
मीच मला मग पुन्हा एकदा, मरावयाचा सुझाव केला
पालन पोषण केले ज्यांचे, मावळतीला उडून गेले
आज उलटले माझ्यावरती, कधी जयांचा बचाव केला
दिवाभितासम दडून जगणे, अथवा जगण्या विराम देणे
दोन्ही पर्यायामधुनी मी, मरावयाचा चुनाव केला
मनातले ते स्पष्ट बोलणे, कधी न जमले "निशिकांता"ला
मनास मुरडुन कलाकलाने, जगावयाचा स्वभाव केला
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
वृत्त--वनहरिणी
मात्रा--८+८+८+८=३२
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा