लेखमालेचे आधी प्रकाशित केलेले भाग येथे वाचता येतील:
शेजाऱ्याचा डामाडुमा - संवाद चित्रे - मालदीव भाग १
https://www.maayboli.com/node/81160
शेजाऱ्याचा डामाडुमा - हायो धुआ सलाम - मालदीव भाग २
https://www.maayboli.com/node/81193
शेजाऱ्याचा डामाडुमा - मास, अहारू, गारुनु - मालदीव भाग ३
https://www.maayboli.com/node/81246
शेजाऱ्याचा डामाडुमा- 'जाहिलिया' इतिहास आणि इस्लामी सत्तावतरण - मालदीव भाग ४
https://www.maayboli.com/node/81295
शेजाऱ्याचा डामाडुमा- 'बिधेयसी' सत्ता आणि इस्लामची वाटचाल - मालदीव भाग ५
https://www.maayboli.com/node/81350
आजचे माले शहर
* * *
थोडा फ्लॅशबॅक
वर्ष १९८८ आणि स्थळ श्रीलंकेचा उत्तर किनारा.
उमामहेश्वरन उर्फ मुकुंदनला आता स्वतंत्र तामिळ इलमसाठी 'संघर्ष' सुरु करून दहा वर्षे होत आली होती. त्याच्या 'पीपल्स लिबरेशन ऑर्गनायझेशन ऑफ तामिळ इलम'(प्लॉट) ह्या संघटनेला श्रीलंकेत वेलुपल्ली प्रभाकरनच्या लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम (लिट्टे) आणि अन्य काही संघटनांनी केंव्हाच मागे टाकलं होतं. श्रीलंकेचे लष्कर त्याच्या मागावर होते, त्यांना आता भारतीय शांतीसेनेचे (IPKF) सत्तर हजार जवान येऊन मिळाले होते. त्यामुळे युद्ध तर सोडाच, त्याचे श्रीलंकेत लपून राहणे पण अवघड होत होते. शस्त्र खरेदी थांबली होती आणि त्याच्याकडचे पैसे संपत आले होते. प्रभावक्षेत्र आटले तरी त्याचे मित्रमंडळ मात्र भारदस्त होते - तामिळनाडूतील जहाल तामिळ अस्मिता असलेले विचारवंत-राजकारणी-धनिक, मालदीवमधले अंमली पदार्थांचे व्यापारी आणि गुंड, श्रीलंका आणि मालदीवमधले काही श्रीमंत व्यापारी, जाफना आणि अन्य श्रीलंकन शहरातील कॉलेजवयीन विद्यार्थी, श्रीलंकेतील कसिनोचे मालक... त्याची रेंज अफाट होती. त्यात एक श्रीमंत मालदीवकर होता अब्दुल्ला लुतफी. ह्या लुतफीचे राष्ट्रपती गय्यूम यांच्याशी वाकडे होते आणि गय्यूम यांना धडा शिकवणे हे त्याचे जीवनध्येय होते. त्यानी उमामहेश्वरनला मालदीव हा देशच ताब्यात घेण्याची योजना सुचवली. भारतीय शांती सेना आणि श्रीलंकेच्या सैन्याच्या पाठलागाला कंटाळलेल्या उमामहेश्वरनला ही योजना पसंत न पडती तरच नवल.
उमामहेश्वरनकडे असलेली एक विशेष योग्यता म्हणजे स्वतंत्र तामिळ इलमच्या भानगडीत पडण्यापूर्वी तो श्रीलंका लँड सर्वे ब्युरोमध्ये सर्वे इंजिनियर होता. त्याला नकाशे तयार करण्याचा आणि ते वाचण्याचा बराच सराव होता. भारत, लेबनॉन आणि सिरीयात त्याने सैनिकी-गोरिल्ला युद्धाचे रीतसर प्रशिक्षण घेतले होते. लंकेत बँका लुटणे, अंमली पदार्थांचा छुपा व्यापार, अपहरण- खंडणी वसूल करणे असा बराच ‘अनुभव’ त्याला होता. त्याने स्वतःच्या विश्वासू सहकाऱ्यांना सोबत घेऊन मालदीववर चढाई करण्याचा बेत नक्की केला. मोहीम फत्ते झाल्यानंतर लुतफी मालदीवचा राष्ट्रपती आणि उमामहेश्वरनला मालदीवमध्ये राहून श्रीलंकेविरुद्ध 'संघर्ष' करण्यासाठी सर्व सूट अशी विभागणी ठरली. मालदीवकडे ना सैन्य होते ना आरमार. सुरक्षेसाठी माले बेटावर काही पोलीस आणि अक्ख्या देशाच्या सुरक्षेसाठी नॅशनल सिक्युरिटी सर्व्हिसचे एकूण २००० सैनिक हीच काय ती सुरक्षा. उमामहेश्वरनचा प्रियकर वसंत उर्फ वासंथी ह्या मोहिमेचा नेता नियुक्त झाला. दिशादर्शन करण्यासाठी आणि मालदीवची आतल्या गोटातील सर्व खबरबात देण्यासाठी मालदीवकर अब्दुल्ला लुतफी आणि त्याचा मित्र सगर नासिर सोबत होतेच.
३ नोव्हेंबरच्या १९८८ च्या पहाटे ४.३० वाजता सुमारे १५० जणांच्या सशस्त्र टोळीने माले शहरात घुसून एकदोन ग्रेनेड आणि काही बंदुकीच्या फैरी एव्हढ्या भांडवलावर बेसावध सुरक्षारक्षकांना हुसकावून लावले आणि अवघ्या काही मिनिटातच राष्ट्रपतींचे कार्यालय, सचिवालय, मालदीव रेडिओ, टेलिव्हिजन स्टुडिओ, पोलीस मुख्यालय आणि राष्ट्रपतींचे निवासस्थान अशी सर्व सरकारी यंत्रणा ताब्यात घेऊन शांत-निवांत मालदीवमध्ये खळबळ माजवली.
मालदीव सरकारचे मुख्यालय - माले
झालेल्या गदारोळात राष्ट्रपती गय्यूम मात्र तेथून निसटले आणि त्यांनी अमेरिका, ब्रिटन, श्रीलंका, पाकिस्तान, मलेशिया आणि भारताच्या सरकारप्रमुखांना फोनवर संपर्क साधून तातडीची मदत मागितली. नवी दिल्लीत पंतप्रधान राजीव गांधींना त्यांनी फोन केला तेंव्हा पहाटेचे ५.३० वाजले होते. राजीव गांधींनी चपळाईने हालचाली करत भारतीय सैन्यप्रमुखांना पाचारण केले आणि त्यातून जन्मले ते 'ऑपरेशन कॅक्टस' - भारताच्या सैन्य इतिहासातील मानाचे पान !
* * *
भारतीय लष्कराची 50 इंडिपेंडंट पॅराशूट ब्रिगेड ही शांतीकालीन सैन्य तुकडी / 'पीस टाईम ऑपरेशन फोर्स' मानली जाते. लष्कराच्या आग्रा तळावर ह्या ब्रिगेडचे मुख्यालय आहे. पुरासारख्या नैसर्गिक आपत्तीत मदत पोहचवणे/अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर काढणे, अन्य तुकड्यांच्या सैनिकांना प्रशिक्षण देणे आणि लष्करी समारंभात चित्ताकर्षक प्रात्यक्षिके सादर करणे असे कामाचे साधारण स्वरूप असलेल्या ह्या ब्रिगेडला तातडीची लष्करी हालचाल थोडी नवीन होती. दिल्लीतून आदेश मिळाल्याच्या काही तासातच पॅराशूट ब्रिगेड, भूदल आणि वायुदलाच्या सैनिकांसह सर्व लष्करी तयारीनिशी ‘फ्रेंडली वन’ आणि ‘फ्रेंडली टू’ असे कोडवर्ड असलेल्या IL-76 जातीच्या दोन लढाऊ विमानांनी ‘'छत्री माता की जय' च्या जयघोषात आग्रा सोडले. त्यात असलेल्या जवानांना आपण श्रीलंकेत IPKF ह्या भारतीय शांतीसेनेला मदत करायला जात आहोत असे सांगण्यात आले होते.
अवाढव्य IL -७६ इलुशीन विमान - बाहेरून
अवाढव्य IL -७६ इलुशीन विमान - आतून
आर्मी टास्क फोर्स कमांडर ब्रिगेडियर फारोक 'बुल' बलसारा यांनी ह्या १८०० जवानांचे नेतृत्व केले. लष्करी गणवेशधारी हवाईदल आणि सैन्यदलाचे अधिकारी आणि सैनिक खच्चून भरलेल्या ह्या विमानात साध्या कपड्यातील एकच 'सिव्हिलिअन' व्यक्ती होती ती म्हणजे खुद्द श्री ए. के. बॅनर्जी, भारताचे मालदीवमधील उच्चायुक्त! २००० किलोमीटरचा सलग प्रवास करून ही विमाने मालेच्या पिटुकल्या विमानतळावर उतरली तोवर सूर्य मावळला होता. माले शहराची सर्व बाजूने नाकाबंदी करून भारतीय सैनिक बोटींनी माले बेटावर उतरले आणि काही तासात सर्व आस्थापनांवर ताबा मिळवून त्यांनी राष्ट्रपती गय्यूम यांची सुखरूप स्थळी रवानगी केली. श्रीलंका टोळीतील बहुतेक लोक ठार झाले, काहींना अटक झाली, काहींनी पळ काढला. उठावकर्त्या लुतफीसकट बोटींमधून पळ काढलेल्या श्रीलंका टोळीला भारतीय नौदलाच्या बोटींनी पाठलाग करून जिवंत पकडले. एकही भारतीय सैनिक न गमावता ऑपरेशन कॅक्टस पार पडले.
पहाटे ५.३० वाजता राष्ट्राध्यक्ष गय्यूम यांचा मदतीची विनंती करणारा फोन पंतप्रधान राजीव गांधींना आला आणि त्याच रात्री उशिरा सर्व आलबेल होऊन गय्यूम यांनी सूत्रे पुन्हा ताब्यात घेतल्याचा फोन राजीव यांना केला यातच भारतीय सैन्यदलाचे यश दिसून येते.
ऑपरेशन कॅक्टसला खूप आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी मिळाली. तत्कालीन अमेरिकन राष्ट्रपती रोनॉल्ड रीगन यांनी तर स्वतः पंतप्रधान राजीव गांधींना फोन करून भारतीय सैन्याची, त्याच्या चपळतेची आणि अचूक सैन्य-कारवाईची मुक्तकंठाने प्रशंसा केली आणि शेजारी देशांसाठी धावून जात हिंदमहासागरात सुरक्षा आणि शांतता कायम ठेवण्यासाठी करत असलेल्या नेतृत्वाबद्दल भारताची पाठ थोपटली.
श्रीलंकेत शांतीसेना म्हणून केलेल्या आणि यूनो इत्यादी आंतरराष्ट्रीय संस्थांसाठी केलेल्या सैन्य कारवाया वगळता भारतीय सैन्याच्या तीनही शाखांनी उत्कृष्ट समन्वय राखत परदेशी भूमीवर खुलेआम पार पाडलेले हे बहुधा एकमेव सैनिक अभियान. त्यात मालदीव शत्रूराष्ट्रही नव्हते, त्यामुळे हे अभियान विशेष ठरले.
ऑपरेशन कॅक्टसच्या सन्मानार्थ बांधलेले स्मारक, माले - मालदीव.
ऑपरेशन कॅक्टसच्या अंताला बहुतेक भारतीय सैनिक मालेमधून हटवण्यात आले पण सुमारे ५०० भारतीय सैनिक जवळपास १ वर्ष मालदीवमध्येच ठेवण्यात आले होते. हे स्थानिकांपैकी कोणालाच रुचले नाही, पण पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी धाक म्हणून हे करणे राष्ट्रपती गय्यूम आणि भारतीय धुरिणांना आवश्यक वाटले असावे.
भारतीय सैन्याचे भरपूर कौतुक झाले तरी मोहीम संपल्यानंतर त्यातील त्रुटींचे योग्य ते मंथनही झाले. जुलै १९८७ पासून श्रीलंकेत भारतीय शांती सेना - IPKF चे लाखभर सुसज्ज खडे सैन्य असूनही भारतीय सैन्याला आणि त्यांच्या गुप्तचरांना श्रीलंकेच्या तामिळ आतंकवाद्यांच्या ह्या मोठ्या कटाची चाहूलही लागू नये हे भूषणावह नव्हते. श्रीलंकेच्या उत्तर किनाऱ्याला भारतीय सैन्याचा खासा विळखा असतांना ह्या सशस्त्र टोळीच्या बोटी बिनबोभाट निसटणे ही शरमेची बाब होती. आग्र्यातून आणवलेल्या मोठ्या वजनी तोफा विमानतळ ते माले बेट असे समुद्रातून वाहून नेणे अशक्य असल्यामुळे कुचकामी ठरल्या. दाट मानवी वस्ती असलेल्या माले शहरात त्या वापरताही आल्या नसत्याच. नंतर मोहीम-प्रमुख ब्रिगेडियर 'बुल' बलसारा यांनी कबूल केल्याप्रमाणे 'इंटेलिजन्स वॉज व्हेरी स्कँटी' - आमच्याकडे मालदिवबद्दल फारशी माहिती नव्हती - ही अधू बाजूही समोर आली. आग्र्यावरून उडायला तयार असलेल्या लष्करी विमानांकडे माले विमानतळाचा अचूक नकाशा सुद्धा नव्हता ! मोहिमेच्या तयारीवर अंतिम हात फिरवण्यासाठी होत असलेल्या उच्चस्तरीय बैठकीला (त्यावेळी दिल्लीतच असल्यामुळे) मालदीवमध्ये भारताचे तत्कालीन राजदूत श्री. ए. के. बॅनर्जी उपस्थित होते. भारतीय सैन्य वापरत असलेला माले विमानतळाचा नकाशा ठार चुकीचा आहे हे श्री. बॅनर्जी यांनीच लक्षात आणून दिले. एवढेच नाही तर स्वतः कॉकपिटमध्ये बसून ह्या विमानांना माले विमानतळावर उतरण्यासाठी मार्गदर्शन केले. अन्यथा ही विमाने ब्रिटिश जमान्यातील जुन्या नकाश्याबरहुकूम मालेपासून शेकडो किलोमीटर दूर गान बेटावर उतरली असती आणि सगळे मुसळ केरात गेले असते !
स्वतःला शाबासकी मिळत असतानाच उठाव घडवून आणणाऱ्या टोळीने केलेल्या मूर्खपणाची जाणीव भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांना होती. जर त्या टोळीनी माले विमानतळ आणि संपर्क यंत्रणा आधी स्वतःच्या ताब्यात घेतल्या असत्या तर काय परिस्थिती ओढवली असती याचे भान होते.
ह्या प्रसंगाचा फायदा दोन्ही देशांना झाला. भारतीय सामरिक सज्जतेच्या तोकड्या बाजू समोर आल्यामुळे सुधारणा करण्यास सुरुवात झाली. ८६-८७ मध्ये भारतीय लष्करप्रमुख जनरल सुंदरजी आणि पंतप्रधान राजीव गांधी प्रणित 'ऑपरेशन ब्रासट्रॅक्स' मध्ये वायुदल, नौदल आणि भूदलाचे मिळून सहा -सात लाख सैन्यानी जय्यत सैन्य-अभ्यास केला होता. नौदलाने लढाऊ जहाजे अगदी कराची बंदराच्या / कोरांगी खाडीच्या मारक टप्प्यात नेली होती. लगोलग पुढच्याच वर्षी हे ऑपरेशन कॅक्टस यशस्वीरीत्या पार पडले. त्यामुळे भारतीय सैन्याचा आत्मविश्वास वाढला.
ऑपरेशन कॅक्टसने भारत आणि मालदीवच्या संबंधांना, विशेषतः सुरक्षा आणि सामरिक बंधांना घट्ट केले. ऑपरेशन कॅक्टस घडल्यानंतर मालदीवच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी (अर्थात अघोषित) स्वतःकडे घेत भारताने मालदीवमध्ये स्वतःचे स्थान बळकट केले. त्यानंतर आजवर कधीही तसा प्रसंग पुन्हा घडला नाही त्याअर्थी ही जबाबदारी योग्यरीत्या पार पाडली जात आहे असे म्हणता येते. मालदीवला भारताचे खात्रीशीर सुरक्षाकवच तर मिळालेच वर जगभर प्रसिद्धी मिळून पर्यटकांचा ओघ वाढला.
मरिना जेट्टी, माले.
ह्या मोहिमेमुळे छोट्या देशांच्या सुरक्षा आणि संप्रभुतेचा मुद्दाही ऐरणीवर आला. १००-१५० गुंड एकत्र येतात काय आणि एका स्वतंत्र देशाच्या सर्व यंत्रणा ताब्यात घेतात काय, सर्व लहान देशांसाठी हे प्रकरण म्हणजे सावधतेचा एक इशारा ठरले.
* * *
आज भारत-मालदीव सुरक्षा संबंध घनिष्ट आणि परस्परहिताचे आहेत. मालदीवला तटरक्षक दल स्थापन करायला योग्य ती मदत केल्यानंतर (हा मात्र संन्याश्याचे लग्न असा प्रकार होता) १९९१ पासून भारत-मालदीव तटरक्षक दलांची संयुक्त कवायत 'दोस्ती' दर दोन वर्षात एकदा अशी होऊ लागली आहे.
लवकरच 'दोस्ती'त श्रीलंकेलाही सामील करण्यात आले आणि ही कवायत त्रिपक्षीय झाली. ही पद्धत आजही सुरु आहे. ह्यामुळे हिंदमहासागरातील सागरी चाचेगिरी, लुटारू आणि गुन्हेगारांचे एकमेकांच्या देशात पलायन रोखणे, समुद्रात दुर्घटनाग्रस्त जहाजांसाठी मदत / आपत्तीनिवारण इत्यादी कामात सुसूत्रता येऊन परस्पर विश्वास वाढण्यास मदत झाली आहे.
भारतीय तटरक्षक / नौदलाच्या नौका
पुढे अस्तित्वात आलेल्या भारत-मालदीव सुरक्षा करारानुसार आता मालदीवच्या सर्व २६ अटॉलवर तीव्र क्षमतेची टेहळणी यंत्रे लावण्यात आली आहेत आणि ही यंत्रणा भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलाच्या मध्यवर्ती यंत्रणेशी जोडण्यात आलेली आहे. (काही वर्षांपूर्वी सेशेल्स, मॉरिशस, श्रीलंका आणि भारतीय किनाऱ्यांवरही असेच रडार लावण्यात आले आहेत आणि त्यांना दिल्लीतील भारतीय नियंत्रण संस्थेच्या यंत्रणेला जोडण्यात आले आहे.)
उमामहेश्वरन आणि अन्य कटकर्त्यांचे पुढे काय झाले याबद्दल काहींना उत्सुकता असेल, त्यांच्यासाठी हे अधिकचे पाल्हाळ :-
लुतफीला आणि त्याच्या साथीदारांना फाशीची शिक्षा ठोठवण्यात आली. भारताच्या आग्रहावरून राष्ट्रपती गय्यूम यांनी ही शिक्षा कमी करून जन्मठेप कायम केली. नंतर पुढे आलेल्या माहितीनुसार ह्या आक्रमणकर्त्यांपैकी बहुतेक लोक भारतात लष्करी प्रशिक्षण घेतले होते! हे म्हणजे 'तुम्ही ने दर्द दिया है तुम्ही ने दवा' असे झाले. उमामहेश्वरन १६ जुलै १९८९ रोजी श्रीलंकेतून अचानक गायब झाला. त्याच्या मित्रांनी त्याचे अपहरण झाले असल्याची तक्रार नोंदवली. काही दिवसानंतर एकेदिवशी पहाटे श्रीलंकेतील मालदीवच्या दूतावासासमोर त्याचा बंदुकीच्या गोळ्यांनी चाळणी झालेला मृतदेह सापडला. हत्या कोणी केली त्याबद्दल फारशी माहिती मिळू शकली नाही आणि कोलंबोच्या पोलिसांनी काही दिवसांनी सर्व तपास थांबवला.
* * *
थोडे अवांतर:
बेबे-कोक्को आणि भारत मालदीव संबंध - हे कसले शीर्षक ?
सांगतो.
मालदीवच्या धिवेही भाषेत ‘भाऊ’ असा शब्द नाही - बेबे म्हणजे मोठा भाऊ आणि कोक्को म्हणजे लहान भाऊ असे स्पष्ट वेगळे शब्द आहेत. आता मालदीव तर काही मोठा भाऊ होऊ शकत नाही. पण तीसेक वर्ष मालदीवच्या 'बेबे'पदावर सुस्थापित भारताला बाजूला सारून भारताच्या अन्य शेजाऱ्यांप्रमाणे मालदीवचा नवा बेबे होण्याची चीनची तीव्र इच्छा आहे. त्यासाठी ड्रॅगनचे प्रयत्नही जोरात आहेत. दोन-दोन 'बेबे' असले तर आपला जास्त फायदा होईल असा विचार लहान भाऊ करत असावा. त्याबद्दल पुढे.
* * *
क्रमश:
(मालिकेतील काही चित्रे / नकाशे जालावरून साभार)
मस्तच!
मस्तच!
हे इतिहासात का शिकवलं नाही, असं कोणी म्हणणार नाही.
मस्त माहिती. आधी वाचले-
मस्त माहिती. आधी वाचले- ऐकलेले नव्हते याबद्दल.
माहिती नव्हते हे ऑपरेशन
माहिती नव्हते हे ऑपरेशन कॅक्टस. तुमच्या मुळे नवनवीन माहिती मिळते आहे
हा पण भाग छान आहे. एक
हा पण भाग छान आहे. एक चॅनेल आहे लक्षरी ट्रावल एक्स्परट हा माणूस जागो जागीची फॅन्सी हॉटेले शोधून तिथे राहुन व्हिडीओ टाकतो. रविवारी दुपारी लंच नंतर झोपा काढून उठले की हे व्हिडीओ बघताना आपण अगदी त्या जागी गेलोच आहोत अशी अनुभूति येउन फार छान वा टते. तर ह्या चॅनेल वर माल दीव चे जे लक्षरी रिजॉर्ट आहेत त्याचे पाच साहा व्हिडीओ आहेत लै भारी आहेत. काय ते सुरेख पाणी व बीचेस.
प्लस फाइव स्टार राहणी. जरूर बघा व जा तिथे मला मेल आज काल पुण्याला पण जाय्ला जमत नाही आहे. यातील काही रिजॉर्ट चे मालक एक सिंधी जोडपे आहे.
@ सुनिती.
@ सुनिती.
.... हे इतिहासात का शिकवलं नाही, असं कोणी म्हणणार नाही. ....
मार्मिक शेरा !
ऑन सिरीयस नोट, आपल्या पाठ्यपुस्तकांत शेजारी देशांबद्दल सोप्या भाषेत लिहिलेले धडे हवेत असे वाटते. आपल्या शालेय विद्यार्थ्यांना शेजाऱ्यांबद्दल ठो माहित नसतांना अफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि अंटार्टिकाचा अभ्यास करायला लावणे म्हणजे घरोघरी रांधल्या जाणाऱ्या पिठल्याची कृती माहित नसलेल्या लोकांनी फ्रेंच उमरावांच्या घरी होणाऱ्या Boudin Noir Aux Pommes किंवा Lamprey à la Bordelaise सारख्या किचकट रेसेपीबद्दल चर्चा करण्या सारखे आहे.
@ maitreyee
@ maitreyee
@ आबा.
कॅक्टसला देशात फार नाही पण आंतरराष्ट्रीय प्रसिद्धी भरपूर मिळाली होती.
कॅक्टस घडल्यानंतर सुप्रसिद्ध TIME मॅगझिनने 'भारत, एक होऊ घातलेली महासत्ता' अशी काहीशी कव्हर स्टोरी केली होती.
@ अमा,
@ अमा,
आधीच्या भागांमध्ये लिहिल्याप्रमाणे मालदीवमध्ये आता साधारण १०० रिसॉर्ट्स आहेत, एकापेक्षा एक सरस.
दर भेटीत नवीन बुक करा
ह्या लेखमालिकेतील लेखही खूप
ह्या लेखमालिकेतील लेखही खूप आवडले.
नेपाळ लेखमालेच्या तुलनेत ही सगळीच माहिती नवीन, आधी कधीही न वाचलेली आहे.
मध्यंतरी मालदीव मध्ये जे राजकीय पेचप्रसंग निर्माण झाले होते, त्यावरून हा देश भारताच्या परराष्ट्र धोरणातील महत्त्वपूर्ण देश आहे एवढे फक्त जाणवले होते.
जर आपण या लेखमालिकांवर एखादे पुस्तक काढले तर नक्कीच संग्रही ठेवायला आवडेल.
@ विवेक.
@ विवेक.
पुस्तक ?
नाही हो, माझे लेखन स्वान्तसुखाय आहे.
तुम्हाला आवडते आणि तुम्ही तसे कळवता याचा आनंद वाटतो.
Surekh lekh.
Surekh lekh.
@ देवकी, आभार.
@ देवकी,
आभार.
ज्यांनी इथवर वाचलयं त्यांच्यासाठी लेखमालेचा पुढील भाग इथे आहे :-
https://www.maayboli.com/node/81412
मालदीवच्या भूमीवर भारतीय
मालदीवच्या भूमीवर भारतीय लष्कराने पार पाडलेल्या
‘ऑपरेशन कॅक्टस’ बद्दल दैनिक सकाळ च्या ई- आवृत्तीत लेख :
https://www.esakal.com/desh/operation-cactus-1988-indian-army-operation-...
भाषागत चुकांकडे दुर्लक्ष केले तरी तथ्यात्मक चुकांची रेलचेल आहे.