पुन्हा एकदा जगावयाचे

Submitted by निशिकांत on 29 March, 2022 - 11:51

पहाट झाली पर्व संपले अंधाराचे
ऋतू बहरले पुन्हा एकदा जगावयाचे

बारा महिने तुझ्या भोवती वसंत असतो
पर्णफुटीचे स्वप्न नेहमी बघावयाचे
 
तुझी लागता चाहुल फुलतो मनी फुलोरा
भेटीपेक्षा स्वप्न आवडे अभासाचे

नैराश्याचे मळभ दाटले, पण तू येता
पुन्हा लागलो स्वप्न रंगवू संसाराचे

रंग गुलाबी जिकडे तिकडे दिसू लागले
वेड नव्याने मला गुलाबी सहवासाचे

तुझ्या सोबती बघेन आता स्वप्न मखमली
पुरे जाहले जीवन जगणे निवडुंगाचे

ओठी आता हास्य फुलू दे नको शुष्कता
थंड दवांनी सदा जीवनी भिजावयाचे

होकारने तुझ्या, अडचणी सरून गेल्या
दोघे लिलया पेलू ओझे आकाशाचे

"निशिकांता"च्या गजलातुन ती मुक्त वावरे
व्यसन लागले शब्दांनाही सौंदर्याचे.

निशिकांत देशपांडे, पुणे..
मो क्र ९८९०७ ९९०२३
वृत्त--अनलज्वाला
मात्रा--८+८+८=२४

Group content visibility: 
Public - accessible to all site users