कैलासवासी पुस्तके

Submitted by shabdamitra on 26 March, 2022 - 00:35

स्टुअर्ट केली ( Book of The Lost Books ह्या पुस्तकाचा लेखक) लहान असताना एका नातेवाईकाने त्याला Mr. Men या पुस्तकांच्या मालिकेतील एक पुस्तक दिले. ते वाचून झाल्यावर त्याने त्या मालिकेतील सर्व पुस्तके घेऊन वाचली . Mr. Menचा संपूर्ण संच त्याने जमवला. त्या पाठोपाठ Dr. Whoचा संपूर्ण संच त्याने जमवला. आणि थोडा मोठा झाल्यावर अॅगाथा ख्रिस्तीची सर्व पुस्तके घेऊन त्याने ती वाचली. जमाही केली . ज्याचे एक पुस्तक वाचले त्या प्रत्येक लेखकाची सर्व पुस्तके आपल्याकडे पाहिजेत याचे त्याला जणू वेडच लागले!

स्टुअर्टच्या चौदाव्या वर्षी त्याच्या वडीलांनी त्याला Complete Works of Shakespeare आणि Selections of Wordsworth हे दोन संच आणून दिले. त्यानंतर त्याने पैसे साठवून ग्रीक साहित्याची पुस्तके घेण्यास सुरुवात केली . एकदा तो अरिस्टोफन Aristophanचे नाटक वाचत होता. त्याच्या प्रस्तावनेतील एका वाक्यापाशी तो थांबला . “हे नाटक जेव्हा प्रसिध्द झाले त्यावेळेस त्या काळचा दुसरा प्रख्यात नाटककार ॲगथोन Agathon हा एकेचाळीस वर्षांचा होता . त्याने लिहिलेली नाटके, लेख व्याख्याने यापैकी आज काहीही अस्तित्वात नाही!”

हे वाचणारा स्टुअर्ट केली केवळ पंधरा वर्षांचा होता ! तेव्हापासून त्याने आपण वाचलेल्या पुस्तकांच्या यादीबरोबरच ‘नष्ट, नाहीशी झालेली पुस्तके ‘ अशीही एक यादी करण्यास सुरुवात केली . दु:खाची गोष्ट अशी की कैलासवासी पुस्तकांची यादीच मोठी होत गेली !

हे ग्रीक वाङ्गमयाच्या बाबतीतच नाही, सर्व भाषेतील साहित्याच्या बाबतीत घडले आहे . शेकस्पिअरपासून ते अलीकडच्या एझरा पाउंड पर्यंत सगळ्यांच्या लिखाणातून काही न काही साहित्यसृष्टीने गमावले आहे .

बरेचसे वाड•मय लेखकाने स्वत:च जाळून टाकले किंवा नष्ट केले. एकोणिसाव्या शतकातील कवी जेरार्ड हॉपकिन्सने आपल्या सुरुवातीच्या सर्व कविता जाळून टाकल्या. कारण ? त्याचे चित्त देवाकडे, अध्यात्मात लागले होते. नामवंत लेखक जेम्स जॉयसने आपले Stephan Heroचे हस्तलिखित आणि Portrait of the Artistचे पहिले लिखाण सरळ जाळून टाकले. रशियन लेखक मिखाईल बाख्तिनला सायबेरियात हद्दपार केले होते . तेथे त्याने प्रख्यात रशियन कादंबरीकार डोस्तोयव्हस्कीवर स्वत: केलेल्या लिखाणाच्या कागदांत तंबाखू भरून त्या सिगारेटी ओढून थंडीची हुडहुडी कमी केली . त्या अगोदर त्याने बायबलची पाने जाळून केलेल्या सिगारेटी ओढून थंडीवर मात केली होती !

सॉक्रेटिस तुरुंगात आपल्या मृत्युची वाट बघत असताना त्याने इसापच्या कथांचे काव्यात रुपांतर केले. पण त्याने त्याही नष्ट केल्या . त्या काव्यातले आपल्यासाठी काहीही राहिले नाही . Aristotleचा दुसरा खंड नाहीसा झाला. ज्याला आपण पहिला खंड म्हणतो तोही Aristotleच्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या टीपणांवर आधारित आहे.

अगदी अलीकडे १९६२ साली घडलेली ही दुर्घटना . जॉन काल्डर हा बडा प्रकाशक. अचानक त्याला आपल्या कार्यालयाची जागा सोडावी लागली. घाईघाईने सामान हलविण्याच्या गडबडीत अनेक लेखकांची हस्तलिखिते सगळी त्या जुन्या इमारतीतच राहिली. आणि त्या मालकाने ती इमारत जमीनदोस्त केली. किती एक हस्तलिखितांचे त्यात दफन झाले त्याची कल्पना करवत नाही .

अनेक साहित्यकृती लेखकांच्या मृत्युमुळे अर्धवटच राहिल्या . त्या कधीही पुऱ्या होऊ शकल्या नाहीत .

सर फिलिप सिडनीने Arcadia एकदा लिहिले पण त्याला ते पूर्ण झाले असे वाटत नव्हते . त्याला अजून त्यात भर घालायची होती . पण Zutphenच्या रणांगणावर गोळी लागून तो मेला. पूर्वीचे गाजलेले लेखक आर. एल. स्टीव्हन्सनचे Weir of Hermiston , विल्यम Thackerayचे Denis Duval आहेत त्या स्वरूपातही उच्च दर्जाचे साहित्य आहे .

काही लेखकांच्या संकल्पित पुस्तकांच्या योजना कधीच पूर्ण झाल्या नाहीत. प्लेटो आणि अरिस्टोटल यांच्या विचारात, तत्वज्ञानात साम्य होते असे तत्वज्ञ बोथियसचे म्हणणे होते. पण त्यासंबंधीचा ग्रंथ त्याच्या हातून कधीच लिहून झाला नाही. त्यामुळे त्याचे हे प्रमेय तो कधीच सिद्ध करू शकला नाही . नाटककार शेरेडन सगळ्यांना सांगत असे, “मी School for Scandal चा (त्याचे हे गाजलेले नाटक आहे)पुढचा भाग Affectation लिहिणार आहे .” पण त्याच्या हातूनही ते कधी लिहून झाले नाही . नोव्हालीसाचा ज्ञानकोश , त्याची अनुक्रमणिका हिच सूचि म्हणूनही वापरता येईल अशी करावी का नको या द्वंद्वातच अडकून त्याचा तो ज्ञानकोश जन्माला आलाच नाही .

पुस्तके उदंड झाली, गवतासारखी वाढली असे काही वेळा वाटते . पण असलेल्या पुस्तकांपेक्षा काळाच्या उदरात गडप झालेली पुस्तकांची संख्या अफाट आहे. असंख्य पुस्तके नष्ट झाली. काही हरवली ती पुन्हा कधी सापडलीच नाहीत . आपल्या इथेही पानशेत सारख्या आणि मुंबईत तिथे नदी आहे हेसुद्धा लोक विसरून गेले होते , त्या मिठी नदीला मोठा पूर आला होता तेव्हा मुंबईतील किती पुस्तके वाहून गेली असतील कुणास माहित !

याला एक अपवाद आहे, तो सांगण्यासारखा आहे भास हा संस्कृत नाटककार. त्याच्याविषयी फार थोडी माहिती उपलब्ध आहे. त्याच्या काळाची निश्चिती नाही. ख्रिस्त पूर्व २ रे शतक ते इसवी सनाचे दुसरे शतक असावा असे मानले जाते . पण भास हा कालिदासाचा पूर्वकालीन आहे हे निश्चित .

कालिदासाच्या फार पूर्वीपासून भासाची श्रेष्ठ नाटककार म्हणून ख्याती होती. पण १३व्या -१४व्या शतकानंतर काय झाले ते कोणासही ज्ञात नाही. भासाची नाटकेच नव्हे त्याचे नावही लुप्त झाले. त्याची नाटके, भासाचे नावही कुठे आढळत नाही. भास आपल्या १३ नाटकांसह नाहीसा झाला!

आपले नशीब थोर म्हणून ७०० वर्षांनी १९१२ साली त्रिवेंद्रम येथील जुन्या पोथ्यांच्या संग्रहात विश्वस्तांना — म. म. गणपतीशास्त्री यांना भासाची नाटके सापडली! नाटककार भास हा ‘भास’ न राहाता सत्य ठरला. रसिक मोठे भाग्यवान . आज आपल्याला आवडणारी भासाची ‘स्वप्नवासवदत्त’आणि ‘प्रतिमा’ ही दोन सुंदर नाटके वाचायला मिळतात .

कित्येक पुस्तके आगगाडीत विसरली. हरवली,चोरीला गेली . कित्येक आगीत जळून खाक झाली. प्राचीन काळातील ग्रंथालये जशी तक्षशीला नालंदा येथील तर अलेक्झांड्रीयाची जेत्यांनी नष्ट केली किंवा काळात नाहीशी झाली . कोणत्याही कारणाने असो, अशी नष्ट झालेली मूळ स्वरूप बदलून नव्या अवतारात आलेल्या, केवळ संकल्पातच राहिलेल्या अशा काही पुस्तकांची त्यांच्या लेखकांसह आपण, शक्य झाल्यास, ओळख करून घेऊ या.

आश्चर्य वाटेल, पण त्या लेखकांत रोमन सम्राट ज्युलिअस सिझरही आहे !

[You can read this blog and additional blogs at: https://sadashiv.kamatkar.com/blog ]

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाहीसे झालेल्या पुस्तकांचा छोटेखानी आढावा उत्तम.

भारतीय भाषांमध्ये बरेचसे साहित्य 'मौखिक' आहे/असावे, ते नक्कीच नष्ट झाले असावे किंवा होणार.

छान आढावा! मला वाटतं गुणाढ्याच्या 'बृहत्कथा' या ग्रंथाचाही यात उल्लेख करता येईल.