Submitted by निशिकांत on 20 March, 2022 - 10:57
( चिमणीदिनाचे औचित्य साधून केलेली रचना.)
भिरभिरत्या नजरेला कोणी दिसले नाही
घरट्या मधले सुन्न रितेपण रुचले नाही
जमवुन दाणे इवल्यांसाठी माय परतली
चिवचिव, किलबिल, भांडण कानी पडले नाही
सक्षम होता पंख उडाली उंच पिले अन्
कोणीही आईस बघाया वळले नाही
भार वहावा, उबवावे अन् खस्ता खाव्या
शापित अन् दु:खी का आई? कळले नाही
किती विरानी ! आत्मा गेला बाळांसंगे
दार घराचे रहदारीने नटले नाही
नोकर, चाकर दाया होत्या खूप परंतू
आई होवुन बाळा कोणी जपले नाही
घरट्यातुन का धूर निघे हा? माय दिसेना
दु:ख अजूनी धुमसत आहे जळले नाही
चिमणी सांगे चिमण्याला तू दूर रहा रे!
दु:ख पिलांच्या विरहाचे मज पचले नाही
आज वजावट आनंदाची झाली असता
श्वासांसाठी फक्त जगावे पटले नाही
असून वारस, बेवारस ती जगली मेली
दाह पचवणे "निशिकांता" तिज जमले नाही
निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र. ९८९०७ ९९०२३
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा