'द कश्मिर फाईल्स' चित्रपटाच्या निमित्ताने

Submitted by राजधर्म on 18 March, 2022 - 09:33

नुकताच बहुचर्चित 'द कश्मिर फाईल्स' हा बहुचर्चित चित्रपट पाहिला. चित्रपटाच्या अनुषंगाने माध्यमांमधे उलट सुलट बातम्या दोन्ही बाजूंनी दोषारोप आपण अनुभवले. उत्तर प्रदेश निवडणूक आणि त्यानंतर हा चित्रपट यांच्या चर्चेमुळे युक्रेन युद्धाला भारतीय माध्यमांत मिळणारे महत्त्व कमी झाले.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच जे अस्वीकरण (डिस्क्लेमर) दाखविले त्यात हिंदी भाषांतराच्या अनेक चुका आढळल्याने पहिल्याच घासाला खडा लागावा असे झाले. चित्रपटाचा एकंदर कालावधी अंदाजे २ तास ५० मिनिटाचा आहे. मला स्वतःला चित्रपटाचे शेवटचे १५ मिनिट सोडले तर उर्वरीत चित्रपट अगदी संथ वाटला. कलाकारांबद्द्ल बोलायचे तर चिन्मय मांडलेकर आणि पल्लवी जोशींचे काम छान झाले आहे. पल्लवी जोशींनी डाव्या विचारसरणीची प्राध्यापिका सुरेख चितारली आहे मात्र याचा मुळ प्रश्नाशी थेट संबंध नाही. मात्र कशा पद्धतीने विचारपध्दती बदलायचे काम होते याचा धडा घेण्यासाठी याचा उपयोग होतो.
दर्शन कुमारचा 'कृष्णा पंडीत' अनुपम खेर आणि मिथून चक्रवर्ती, पुनीत इस्सर यांचे काम ठीकठाक वाटले. का कोण जाणे पण अनुपम खेर ला आयुष्यभर विनोदी भुमिकांमधे बघीतल्यामुळे अशा प्रकारच्या भुमिकेत बघणे मला अवघड गेले.

चित्रपटाच्या निमित्ताने जो गदारोळ उठत आहे त्याचे काहिही परिणाम मला चित्रपट गृहात आढळले नाहीत. दोन चार प्रेक्षक भ्रमणध्वनीवर संभाषण करण्यात मग्न होते. (चित्रपट गृहात जॅमर लावले पाहिजेत असे मला मनापासून वाटते. जर आपल्याकडे चित्रपट शांतपणे पाहण्यासाठी दोन तीन तास नसतील तर तिथे जाणेच अयोग्य.)
तिथे कोणत्याही घोषणा झाल्या नाहित, कोणीही रडताना दिसले नाही. चित्रपटात एका दृष्यात पुनित इस्सर त्याच्या पत्रकार मित्राला ढकलून देतो तिथे तर पब्लिक चक्क हसलं. चित्रपटात एका ठिकाणी अनुपम खेर ३७० कलम हटवावे अशा मागणीचा फलक घेऊन उभा आहे त्या दृष्याला टाळ्या पडल्या. यास्मिन मलिक आणि फारुख अहमद दार (बिट्टा कराटे) यांच्या प्रसंगांची सरमिसळ झाल्यासारखे वाटते. प्रत्यक्षात भारतीय वायुसेनेच्या चार जणांची हत्या केल्याच्या प्रकरणात यास्मिन मलिक कारागृहात आहे मात्र चित्रपटात बिट्टा त्यांच्यावर गोळ्या चालवताना दाखवतोय असे दाखविले आहे. माझी माहिती चुकीची असल्यास आणि ती दुरुस्त केल्यास मला आवडेल.

चित्रपट राजकीय भुमिका, दहशतवाद्यांची मानसिकता उलगडून दाखविण्यात कमी पडतो. काश्मिरी पंडीत गपगुमान गोळ्या खातात पण अजिबात विरोध करत नाही हे मला काही केल्या गळी उतरत नाही. इथे मुंबईत १९९२ सालचे दंगे झाले होते तेव्हा भितीपोटी अगदी मच्छर न मारणार्‍या माणसांच्या हातात लाठ्या काठ्या पाहिलेल्या आहेत. भले समोरच्याला मारता येणार नाही पण आपण कोणताही मार्ग चोखाळला तरी मृत्यु अटळ आहे अशा परिस्थितीत माणूस कमीतकमी समोरच्या दोन चार शिव्या घालतो तो भितीपोटीचा आवेश देखील कोणत्याही प्रसंगात दिसत नाही.

मी ज्या परिसरात चित्रपट पाहिला तो बर्‍यापैकी सुखवस्तू असल्यामुळे इथल्या प्रतिक्रिया वेगळ्या असू शकतील. चित्रपट पाहण्यासाठी येणार्‍यांत वयोवृद्धांचा टक्का लक्षणीय होता. टोपी, बुरखा अशा वेशातील व्यक्ती चित्रपट पाहायला आलेले दिसले नाही. कदाचित असा वेश धारण न केलेले मुस्लिम दर्शक चित्रपट पाहायला आलेले असूही शकतील मात्र बहुतांश माध्यमांतील गदारोळ पाहता त्यांनी हा चित्रपट पाहणे टाळले असण्याची शक्यता जास्त आहे. मात्र येथे जर कोणी मुस्लिम वाचक असतील तर त्यांनी हा चित्रपट अवश्य पहावा. मुस्लिम विरोधी असे काहीही नाही.

भारतातील बर्‍याच लोकांना कश्मिरी पंडीतांच्या १९९० मधील या प्रसंगाबद्दल माहिती नाही असे एकंदरीत मिडियात येणार्‍या वार्तांकनातून जाणवते. कदाचित अशा लोकांना चित्रपट पाहिल्यावर जास्त धक्का बसला असावा असा माझा अंदाज आहे.
अवांतर वाचनाची नावड, व्हाटसअ‍ॅप, फेसबुकीय लेखांच्या व्यतिरिक्त कोठूनही माहिती मिळविण्याचा कंटाळा किंवा एकंदरीतच हिंदूच्या प्रश्नाला तेव्हाच्या माध्यमांमधे मिळालेले गौण अशी अनेक कारणे यामागे असू शकतील.

मला चित्रपट फारसा भावला नाही याची काही कारणे देता येतील.
१. सरहद संस्थेचे काश्मिरी विस्थापितांबद्द्लचे काम , त्या त्या वेळी वर्तमान पत्रांमधे येणार्‍या बातम्या यातून प्रश्नाची थोडीफार माहिती होती. पण माझ्या लहानपणी बातम्या मिळविण्याचा प्रमु़ख स्त्रोत नवाकाळ हे वर्तमानपत्र होते कारण त्यावेळच्या परिस्थीतीत तेच परवडायचे. लोकसत्ता, म.टा., नवभारत टाईम्स वाचायचा तर मोफत वाचनालयांचा आसरा घ्यावा लागायचा. त्यामुळे एकच बातमी वेगवेगळ्या वर्तमानपत्रात कशा पद्धतीने छापून येते त्याचे विश्लेषण करणे यावर मर्यादा होत्या. त्या वयात ती कुवत देखील नव्हती. मात्र बर्‍याचशा बातम्या मुस्लिमांवर किती अत्याचार होताहेत, निरागस लहान मुले कशी रस्त्यावर आलीत हे सांगणार्‍या असत. त्यामुळे दुसरी बाजू माहित नव्हती.
२. कामानिमित्त काही दिवस दिल्लीत राहणे झाले असता तिथे दोन कश्मिरी पंडित युवक भेटले होते. मिठ्ठास वाणी, सफरचंदांसारखे गोबरे गाल हे माझे त्यांच्याविषयीचे प्राथमिक मत झाले. मात्र काश्मिरबद्द्ल ते बोलायला जास्त उत्सुक नसायचे असे त्यांच्याशी बोलताना जाणवले. माझ्या आयुष्यात मी काश्मिरी माणूस तेव्हा प्रथम पाहिला.
३. या घटनांच्या दुसर्‍या बाजूबद्दल सुशील पंडीत, पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांच्या युट्युबवरील चित्रफिती पाहून साधारण ३-४ वर्षांपुर्वी माहिती झाली होती. त्यांच्या चित्रफिती माहितीपुर्ण आहेत. कदाचित तिथे जे मिळाले ते चित्रपट पाहताना गवसले नाही यामुळे चित्रपट जास्त भावला नसावा.

मिसळपाव वरील 'द काश्मिर फाईल्स' या चर्चाप्रस्तावात श्री. तर्कवादी यांनी चित्रपट प्रेक्षकांची काय प्रतिक्रिया असते याचे काही पर्याय दिले होते. ते खालीलप्रमाणे आहेत. खरे तर तिथेच उत्तर दिले असते तर जास्त योग्य ठरले असते पण असो.

१) काश्मीरमध्ये १९९० साली काश्मीरपंडितांवर झालेले अत्याचार मला व्यथित करत आहेत
२) क्र १ + त्यामुळे काश्मिरी अ तिरेक्यांबद्दल माझ्या मनात अतिशय राग निर्माण झाला आहे
३) क्र १ + क्र २ + असे घडण्यास प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष कारणीभूत सर्व राजकारण्यांबद्दल मनात अतिशय राग निर्माण झाला आहे
४) क्र १+ क्र२ + क्र ३ + सर्वच मुस्लिम व्यक्तिंबद्दल माझ्या मनात राग व संशय निर्माण झाला आहे
५) क्र १+ क्र२ + क्र ३ + क्र ४ + या घटनेबद्दल मी व इतरांनी जमेल तेव्हा जमेल तसा सूड घ्यायला हवा असे मला वाटते.

मी पर्याय क्र. ४ निवडतो - चित्रपट पाहताना कोणत्याही मुस्लिमांविरोधात राग निर्माण झाला नाही. चित्रपटाचा तो उद्देश नसावा. त्यामुळे पर्याय क्रमांक ५ बाद ठरतो.
पर्याय क्रमांक २ चा विचार करण्यास हरकत नाही. एकंदरीत चुकीच्या पद्धतीचे राजकारण केल्यामुळे काट्याचा नायटा झाला हे मानण्यास वाव आहे.
यात मी एक ६ वा पर्याय डकवू इच्छितो.

कश्मिरी पंडित आणि जगभरातील ज्यू हे एकाच प्रकारच्या परिस्थितीतून गेले आहेत. मात्र ज्यूंवरील अन्यायाला ज्या प्रकारे वाचा फुटली / फोडली गेली ते भाग्य कश्मिरी पंडीतांच्या प्रश्नाच्या वाट्याला आले नाही. बहुतांश कश्मिरी पंडित समाज शिकलेला सवरलेला होता, सरकारी नोकर्‍यांमधे, क्षिक्षण क्ष्रेत्रात स्थिरस्थावर होता मात्र त्यांनी आपल्यावर होणारा अन्याय तेवढ्या तीव्रतेने जगासमोर आणला नाही असे वाटते.

याउलट जगभरातील पिडीत मुस्लीम आणि ज्यूं नी आपल्या भळभळत्या जखमांच्या जाणिवा तेवत ठेवल्या आणि त्यायोगे आपले नंतरच्या आयुष्याला कलाटणी कशी देता येईल याचा विचार केल्याचे जाणवते. अर्थात ज्युंनी कितीही सवलती मिळविल्या, स्वतःचा देश मिळविला तरी युरोपियनांनी त्यांना फसवले आहे या मुद्यावर माझे मत ठाम आहे. युरोपियनांना ज्युंवरील अत्याचारांविषयी पापमार्जन करायचेच होते तर आपल्या देशातला एखादा हिस्सा तोडून देऊन तिथे त्यांचे स्वतंत्र राज्य स्थापन करु द्यायचे होते. याउलट देवाची भुमी या गोंडस नावाखाली त्यांना एक नापिक जमिन देऊन आणि अरब / मुसलमान नावाचा नविन आणि कायमस्वरुपी शत्रू देऊन आपली परस्पर सुटका करुन घेतली. आज आपल्या परिश्रमांच्या जोरावर इस्त्रायलने कितीही चांगली प्रगती केली असली तरी कायम युद्धाच्या छायेत राहून जगणे अवघड आहे. ज्यूंच्या संहार झालेल्या पिढीने आणि कश्मिरी पंडीतांनी देखील अत्याचारांचा पुरेसा प्रतिकार केलेला दिसत नाही. काही तुरळक अपवाद असतील देखील पण ते अगदी बोटावर मोजण्याइतकेच.

इथे मराठी, बंगाली, उत्तर भारतीय पंडीतांचे तेज उठून दिसते. गरज पडली तेव्हा त्यांनी शस्त्र हाती धरले, क्षत्रीयांच्या बरोबरीने क्षात्रतेज दाखविले, माध्यमे, राजकारण अशा अनेक ठिकाणी आपला प्रभाव दाखवला. कश्मिरी पंडीत या सगळ्यात कमी पडला हे सत्य नाकारुन चालणार नाही. आपल्या वाईट परिस्थितीला इतर बाह्य कारणे असतील हे नाकारण्याचा प्रश्न नाही पण आपण देखील कोठेतरी कमी पडत असू हे स्वीकारायला हवे. ५ लाख लोकांनी पळून जाण्याचा पर्याय निवडला त्यापैकी ५०० जणांनी जरी प्रतिकार केला असता तर या प्रश्नाला माध्यमांमधे वाचा फुटण्यास जास्त मदत झाली असती.

चित्रपट १९०० साली झालेल्या प्रसंगांवर भाष्य करतो मात्र त्यांनतर देखील
१९९८ मधे गंदरबाल, छपनारी,प्राणकोट मधे पंडितांची हत्याकांडे घडली.
सन २००० साली छत्तीससिंगपुरा येथे शिखांचे हत्याकांड
सन २००१ साली अमरनाथे यात्रेकरुंवरील हल्ला, किश्तवार हल्ला
सन २००२ साली कासिम नगर हत्याकांड
सन २००३ साली नदीमर्ग मधील हत्याकांड
सन २००६ साली डोडा येथील हत्याकांड
अशी अनेक प्रकरणे कश्मिर मधे सतत झालेली आहे. त्या विषयावरील लेख, चित्रफिती आंतरजालावर उपलब्ध आहेत मात्र आपल्यापैकी अनेकांना हे ठाऊक देखील नसते.

आज माध्यमांमधे चर्चा होते की कश्मिरी पंडित विस्थापित झाले तेव्हा कॉंग्रेसचे सरकार नव्हते. मग विश्वनाथ प्रताप सिंह यांचे सरकार, भाजपाचा पाठींबा वगैरे गोष्टींवर चर्चा होतात. मात्र भाजपा ने ३७० वे कलम रद्द करुन त्यांच्या चु़कीचे / पापाचे काही प्रमाणात परिमार्जन केले आहे. बाकी पक्षांनी पण आपापला वाटा उचलावा.

एका ठिकाणी कश्मिर मधे हिंदूंपेक्षा मुस्लिम जास्त मरण पावले असे माहितीच्य अधिकारात मिळालेले पत्र पाहिले. पण हे पत्र डकविणार्‍याने यात हिंदू पंडीतांचा यात काय दोष यावर काय भाष्य केलेले दिसत नाही. केवळ पिल्लू सोडून गंमत बघायची अशीच मानसिकता असावी.

आता ३०-३२ वर्षांनंतर कश्मिरी पंडीतांची एक विस्थापित पिढी जवळपास संपत आलेली आहे. उरलेल्यांना जर आपल्या घरी परतायचे असेल तर त्यासाठी सरकारने जास्तीत जास्त प्रयत्न करणे गरजेचे आहे. शिवाय विस्थापितांच्या पुढच्या पिढीला परत आपल्या मातृभुमीत परतायचे काही सबळ कारण मिळावयास हवे. तिथे जाऊन पुढील जीवनात प्रगतीचे मार्ग दिसणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रयत्न सरकार आणि जनता दोघांकडून व्हायला हवे. तरच ही जखम काही प्रमाणात भरली जाईल.

नाहितर चित्रपट सिनेमागृहातून पायउतार होईल, जनता उद्या नव्या प्रश्नाची चर्चा करेल आणि मुळ प्रश्न आहे तिथेच राहिल. त्यामुळे ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांनी जास्त सजग आणि सक्रिय होण्याची गरज आहे. आज तुमच्या दिमतीस विविध समाजमाध्यमे आहेत, देशातील बहुसंख्य जनतेत तुमच्याबद्ल कणव आहे, सरकारचा दृष्टीकोण तुम्हाला अनुकूल आहे. हीच ती योग्य वेळ आहे.

तळटीप : चित्रपट आवडला नाही याचा अर्थ ज्यांनी हे भोगले आहे त्यांच्याबद्द्ल सहवेदना नाही असा अर्थ कोणी काढत असेल तर नाईलाज आहे.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

ज्यूंच्या संहार झालेल्या पिढीने आणि कश्मिरी पंडीतांनी देखील अत्याचारांचा पुरेसा प्रतिकार केलेला दिसत नाही. ......... पटले नाही.बंदुकाच्यापुढे निःशस्त्र लोक काय करतील?
Mob सायकॉलॉजी वेगळी असते.
1993 सालाच्या bombsfotaanantarchya दंगलीत आमच्या गल्लीतला एकजण, मुसलमानां बरोबर इतर हिंदूंच्या घराना आगी लावायला निघाला होता.त्या माणसाने मुसलमान मुलीशी लग्न केले होते आणि तिच्या आई शेजारी ते राहत होते. आसपासच्या लोकांनी सांगितले जर तू आला नाहीस तर तू घर पेटवून देऊ .मग याचा नाईलाज झाला.
.

एकंदरीतच हिंदूच्या प्रश्नाला तेव्हाच्या माध्यमांमधे मिळालेले गौण अशी अनेक कारणे यामागे असू शकतील.>>
हे काही पटलं नाही. ह्या सर्व अत्याचाराच्या बातम्या तेव्हा सर्व प्रकारच्या माध्यमात येत होत्या अगदी सविस्तर पणे. जनता त्यावेळी उदासीन असेल कदाचित.
आताही हे कदाचित 2024 पर्यंत चालत राहील अस वाटतंय.

चित्रपटाचा आढावा आणि विश्लेषण छान घेतलं आहे. माबोचा एकंदरीत घसरलेला दर्जा वर उचलण्याचं काम या लेखाने केलेलं आहे, हे आवर्जुन मांडतो.

लेखात आलेली ज्यु आणि कश्मिरी हिंदूंची तुलना स्वाभाविक आहे. परंतु दोघांतला मेजर फरक नेतृत्वाचा आहे. ज्युंना झायनिझम चळवळी द्वारे डेविड बेन-गुरियन सारखा नेता लाभला. कश्मिरी हिंदू नेतृत्वाच्या बाबतीत उपेक्षितच राहिले...

चांगला लेख. काही स्पेसिफिक पॉईण्ट्स बद्दलः
- युरोपियनांनी तेथीलच एखादा जमिनीचा तुकडा देण्याबद्दल - लॅण्ड ऑफ इस्त्राएल्/झायॉन हा मूळचा भाग सध्याचे इस्त्राएल जेथे आहे तेथेच होता असा ज्यू लोकांचा जनरल समज आहे. त्यामुळे त्यांनाही तो तेथेच हवा होता. आपल्या भूमीत आपण परत जावे ही शतकानुशतके ज्यू लोकांची इच्छा होती. त्यामुळे ते तेथेच असू शकणार होते. तेथे अनेक ठिकाणी त्याकाळच्या ज्यू लोकांच्या इतर लोकांशी झालेल्या युद्धाच्या जागा वगैरे आहेत.
- कलम ३७० चा उल्लेख या घटनेच्या संदर्भात होतो. पण तो अस्थानी आहे. कलम ३७० हे इतर भारतीयांना तेथे जाउन सेटल होण्याबद्दल होते. पंडित व इतर काश्मिरी विस्थापित मूळचे तेथीलच असल्याने त्यांच्या परत जाण्यात या कलमाचा काही अडथळा असायचे कारण नाही.
- प्रतिकाराबद्दल - त्याचे चित्रीकरण चुकीचे झाले असावे. प्रत्यक्षात जेथे शक्य आहे तेथे प्रतिकार नक्कीच झाला असेल. तो इंस्टिंक्ट असतोच. त्यामुळे त्याबद्दल जर ठाम माहिती असेल तर ठीक आहे - नाहीतर उगाच कशाला त्यांना कमी लेखायचे?
- हे आवर्जून कोणी दाबले असावे असे वाटत नाही. सरकार व माध्यमे उदासीन होती. पण विशेषतः महाराष्ट्रात्/पुण्यात यातले खूप लोक तेव्हा आले होते. त्यामुळे अनेकांचा त्यांच्याशी थेट संपर्क आल्याने मराठी लोकांनातरी कल्पना होती.
- मी जे काश्मिरी विस्थापित गेल्या काही वर्षात बघितले आहेत ते बहुतांश उच्चशिक्षित व आर्थिकरीत्याही उच्च मध्यमवर्गात आहेत. पण हा डेटा बराचसा अमेरिकेते भेटलेल्या लोकांबद्दल आहे. भारतातील माहीत नाही. सध्याच्या आर्थिक सहकार्यापेक्षा त्यांची जुनी घरे/जमिनी परत मिळवण्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असेल.

युरोपियनांनी तेथीलच एखादा जमिनीचा तुकडा देण्याबद्दल - लॅण्ड ऑफ इस्त्राएल्/झायॉन हा मूळचा भाग सध्याचे इस्त्राएल जेथे आहे तेथेच होता असा ज्यू लोकांचा जनरल समज आहे. त्यामुळे त्यांनाही तो तेथेच हवा होता. आपल्या भूमीत आपण परत जावे ही शतकानुशतके ज्यू लोकांची इच्छा होती. त्यामुळे ते तेथेच असू शकणार होते. तेथे अनेक ठिकाणी त्याकाळच्या ज्यू लोकांच्या इतर लोकांशी झालेल्या युद्धाच्या जागा वगैरे आहेत.>>अनुमोदन हेच लिहायचे होते. काल फोन वरुन लेख वाचला. येशु ख्रिस्ताच्या आधी पासून ज्युडीआ प्रांत तिथेच आहे.

युरोपियनांनी तेथीलच एखादा जमिनीचा तुकडा देण्याबद्दल - लॅण्ड ऑफ इस्त्राएल्/झायॉन हा मूळचा भाग सध्याचे इस्त्राएल जेथे आहे तेथेच होता असा ज्यू लोकांचा जनरल समज आहे. त्यामुळे त्यांनाही तो तेथेच हवा होता. आपल्या भूमीत आपण परत जावे ही शतकानुशतके ज्यू लोकांची इच्छा होती. त्यामुळे ते तेथेच असू शकणार होते. तेथे अनेक ठिकाणी त्याकाळच्या ज्यू लोकांच्या इतर लोकांशी झालेल्या युद्धाच्या जागा वगैरे आहेत.>>अनुमोदन हेच लिहायचे होते. काल फोन वरुन लेख वाचला. येशु ख्रिस्ताच्या आधी पासून ज्युडीआ प्रांत तिथेच आहे.

युरोपियनांनी तेथीलच एखादा जमिनीचा तुकडा देण्याबद्दल - लॅण्ड ऑफ इस्त्राएल्/झायॉन हा मूळचा भाग सध्याचे इस्त्राएल जेथे आहे तेथेच होता असा ज्यू लोकांचा जनरल समज आहे. त्यामुळे त्यांनाही तो तेथेच हवा होता.
ज्यू लोक व्यापार उदीमात हुशार होते असा माझा एक गैरसमज होता. पुर्ण जग ज्यूंवर केलेल्या अन्यायाच्या जाणिवेखाली इतका दबलेले होते की व्हॅटीकन सिटी प्रमाणे केवळ स्वतःच्या धार्मिक मान्यता जपण्यासाठी जेरुसलेम हे शहर ताब्यात घेतले पाहिजे होते. आणी त्याचबरोबर जर्मनीचा एखादा तुकडा स्वतंत्र ज्यूंचे राष्ट्र म्हणूण मागीतला असता तरी त्यांना ना म्हणायची कोणाची हिंमत झाली नसती. एवढे अन्वनित अत्याचार करणार्‍यांना रिपरेशन्स घेऊन माफ केले आणि फुकटात नवीन शत्रू विकत घेतले हे कितपत व्यावहारिक आहे याची मला शंका येते.