निषेध व भावनिक स्फोट

Submitted by कुमार१ on 16 March, 2022 - 02:33

चित्रपट हे मुळात मनोरंजनाचे साधन आहे. परंतु काही मोजक्या चित्रपटांतून आपले शिक्षणही होऊ शकते. काही चित्रपटात एखाद्या विशिष्ट मध्यवर्ती कल्पनेभोवती काही प्रसंग छान गुंफलेले असतात. त्यातून आपल्याला त्या विषयाची जाणीव होते. पुढे त्याचे कुतूहल वाटू शकते आणि त्यासंबंधी अधिक वाचण्याची प्रेरणाही मिळू शकते. अशा प्रकारे मी घेतलेल्या एका अनुभवावर एक लेख यापूर्वी इथे लिहिलेला आहे:
पैशांवर डल्ला आणि स्टॉकहोम सिंड्रोम !(https://www.maayboli.com/node/68894)
नुकताच असा दुसरा अनुभव मला आला. तो विशद करण्यासाठी हा लेख.

एकदा प्राईम व्हिडिओवर ‘आज काय पहावे’ म्हणून शोध घेत होतो. तिथे उपलब्ध असलेल्या बहुतेक इंग्लीश व भारतीय भाषांमधील मला आवडतील असे चित्रपट पाहून झालेले होते. त्यामुळे बराच वेळ धुंडाळून काही उपयुक्त असे गवसत नव्हते. अचानक एका स्पॅनिश चित्रपटावर नजर खिळली. त्याचे नाव इंग्लिशमध्ये ‘Wild Tales’ असे लिहिलेले होते. त्यातला वाइल्ड शब्द मनापासून आवडला नसला तरी त्याबद्दल कुतूहल वाटले. मग चित्रपटाचा सारांश वाचल्यावर लक्षात आले की त्यात सहा लघुकथा एकत्र केलेल्या आहेत. अलीकडे मला हा प्रकार सलग चित्रपटाऐवजी आवडू लागला आहे. अशा चित्रपटातील 1-2 कथा पाहिल्यावर पुढे पाहायचा की नाही याचा निर्णय सहज घेता येतो.

अखेर तो चित्रपट पाहू लागलो. पहिल्याच कथेने पकड घेतली. मग दोन टप्प्यात मिळून सर्व चित्रपट पाहिला. नंतर त्याचा काही भाग पुन्हा पाहिला. मानसशास्त्रात ‘भावनांचे विरेचन (निचरा)’ अशी एक संकल्पना आहे. त्यावर आधारित या सहा कथा आहेत. अर्थात त्यातील पात्रांचे विरेचन स्फोटक प्रकारे झालेले असल्याने चित्रपट ‘वाईल्ड’ ठरतो.

आधी चित्रपटाचा सारांश लिहितो आणि मग विरेचन या संकल्पनेकडे वळतो. चित्रपट 2014 चा असल्याने त्याबद्दल लिहिताना रहस्यभेद क्षम्य मानतो.
.....
.....

चित्रपटातील सर्व कथा ‘माणूस विरुद्ध समाजयंत्रणा’ या सूत्राभोवती गुंफल्यात. जगात सत्ता व संपत्तीचे मूठभर लोकांकडे केंद्रीकरण झालेले आहे. सामान्य माणूस कायमच भिऊन व दडपून जगत असतो. मग कुठल्यातरी अन्यायाच्या किंवा क्षोभाच्या प्रसंगी असा माणूस ही सर्व लादलेली सामाजिक बंधने झुगारुन आपल्या आतल्या पशुत्वासह व्यक्त होतो. या भावनिक स्फोटातून त्याला तात्पुरते का होईना पण ‘मुक्ती’चे सुख मिळते. ही चित्रपटाची मध्यवर्ती कल्पना. यातील काही कथा सत्य घटनेवर आधारित आहेत.

Pasternak ही याच नावाच्या तरुणाची कथा आहे. त्याला आयुष्यात अगदी बालपणापासून ते तारुण्यापर्यंत अनेकांनी त्रास दिलेला होता. खुद्द त्याच्या आईवडिलांनी त्याला सतत अपेक्षांच्या ओझ्याखाली दडपून ठेवले होते. कथेतील प्रसंगात जे विमान चाललंय त्याचा तो वैमानिक आहे. त्या उड्डाणात प्रवाशांमध्ये त्याला त्रास दिलेल्या बऱ्याच व्यक्तींचा समावेश आहे. किंबहुना त्या सर्वांवर सूड उगवण्यासाठीच त्याने या योगायोगाच्या मोहिमेची जुळणी केली आहे. तो केबिनचे दार आतून लावून घेतो आणि त्याच्या रागाच्या परमोच्च क्षणी ते विमान खुद्द त्याच्या स्वतःच्याच घरावर आदळवतो.
दुसऱ्या कथेत एका दुष्ट सावकाराचा एका पीडित स्त्रीने त्याच्या पूर्वीच्या दुष्कृत्यांबद्दल सूड घेतलेला दाखवला आहे. इथे पीडित स्त्रीच्या मनात आधी खूप चलबिचल होते पण तिची मदतनीस तिचे मतपरिवर्तन करून तिला भरीस पाडते. शेवटी इच्छित कार्य पार पडते. इथे सूडाची भावना तीव्र झालेल्या दोन्ही स्त्रिया श्रमजीवी वर्गातील आहेत.

पुढच्या कथेत रस्त्याने कार चालवणाऱ्या दोन पुरुषांच्या मनोवृत्तीचे दर्शन घडते. मागील चालकाला पुढच्याने आपल्या पुढे जाऊ न दिल्यामुळे भांडण होते. पुढे त्याचे मारामारीत पर्यवसान होते. त्या दोघांपैकी एकाचे गलिच्छ व ओंगळवाणे कृत्य यादरम्यान दाखवले जाते. अखेरीस या मारामारीत दोघांचा अंत होतो. गलिच्छ कृत्य करणारा माणूस दबलेला व पीडित आहे. अशा प्रसंगात त्याच्यातील पशुत्व बाहेर आलेले प्रभावीपणे दाखवले आहे.

अन्य एका कथेत एका शहरातील नको इतका सक्रीय वाहतूक नियंत्रण कक्ष आणि त्याचा वाहनचालकांवर होत असलेला अन्याय हा विषय हाताळला आहे. रस्त्यावर योग्य ठिकाणी लावलेली एक कार सुद्धा त्या कक्षाकडून जप्त केली जाते. त्यावर दाद मागायला गेलेल्या वाहनचालकास न्याय देणे तर दूरच, उलट अरेरावीची उत्तरे मिळतात. असे जेव्हा त्याच्या बाबतीत पुन्हा घडते तेव्हा मात्र तो पेटून उठतो. त्याच्यातील सूडभावना जागृत झाल्याने तो कर संकलन कार्यालयच स्फोटाने उडवून देतो. सरकारी यंत्रणेकडून नागरिकांना पिडण्याचा अनुभव भारतात तर बर्‍याचदा येतो. किरकोळ गोष्टींवरून पांढरपेशांना सतावणारे वाहतूक पोलीस, टग्या व मस्तवाल मंडळींच्या बाबतीत मात्र सर्रास कानाडोळा करताना दिसतात हे आपण पाहतोच (यासंबंधीची एक प्रातिनिधिक बातमी नंतरच्या विश्लेषणात दाखवतो).

अखेरची कथा सर्वात लांब असून त्यात विवाहपूर्व लैंगिक संबंध हा विषय आक्रस्ताळेपणाने हाताळला आहे. भर लग्नाच्या मंडपात नवरीला लक्षात येते की आपल्या नवऱ्याचे तिथे मांडवात असलेल्याच एका अन्य स्त्री बरोबर संबंध होते. तिने त्याला तसे विचारताच तो कबुली देतो. त्याचा सूड म्हणून ही नवरी आक्रस्ताळेपणा करत तिथल्या गच्चीवर जाते आणि चक्क तिथे एका नोकराशी उघडपणे संभोग करते. अखेर दिलजमाई होऊन मूळ जोडप्याचे लग्न पार पडते. पण तिने त्याच्यावर सूड घेण्याचा हा प्रकार अतिशयोक्त व बटबटीत वाटला.

हा चित्रपट तिकीटबारीवर जोरदार राहिला आणि त्याला काही आंतरराष्ट्रीय पुरस्कारही मिळालेले आहेत.
अशा प्रकारे या चित्रपटातील प्रत्येक कथेमध्ये त्यातील मुख्य पात्राचा क्षोभ होऊन भावनिक स्फोट झालेला दिसतो. अशा प्रकारच्या विविध घटना कमी-अधिक प्रमाणात आपल्या अवतीभवती सुद्धा घडताना दिसतात. एखाद्या व्यक्तीच्या अशा वागण्यामागे जे मानसशास्त्र आहे त्याचा आता आढावा घेतो.

भावनिक विरेचन
या संकल्पनेचा मानसशास्त्रात खूप अभ्यास झालेला आहे. सामान्य माणूस दैनंदिन जीवनात कामाचे ताणतणाव, काळजी, भीती आणि दडपण यासारख्या गोष्टीनी पिडलेला असतो. त्यातून त्याच्या सुप्त मनात अनेक विचारांचे द्वंद्व चालू असते. समाजात आजूबाजूला घडणाऱ्या अनेक अप्रिय गोष्टींचा त्याला प्रचंड राग येत असतो. त्यातून सतत चिडचिडेपणा आणि कधीकधी नैराश्यही आलेले असते. अशाच एखाद्या प्रसंगी त्याच्या संयमाचा बांध फुटतो आणि तो लोकांमध्ये स्फोटक प्रकारे व्यक्त होतो. या कृतीतून त्याच्या दीर्घकाळ दबलेल्या भावना मोकळ्या होतात. हा झाला या व्यक्त होण्याचा त्याला झालेला क्षणिक फायदा. नंतर जेव्हा असा माणूस आपल्या त्या कृतीचे आत्मपरीक्षण करतो त्यातून त्याला आणीबाणीच्या प्रसंगात वागण्याचा एक नवा दृष्टिकोनही मिळू शकतो.

कारणमीमांसा
ही स्पष्ट करण्यासाठी उदाहरणार्थ वरील चित्रपटातील वाहतूक कार्यालय उडवून द्यायची घटना आपल्या संदर्भात पाहू. साधारणपणे वाहतूक पोलिसांचे सामान्य पांढरपेशा/पापभीरू लोकांशी कसे अरेरावीचे वर्तन असते ते आपण जाणतो. याउलट, वाहतुकीचे अनेक नियम डावलून चाललेल्या बेफाम वाहनचालकांकडे पोलीस बरेचदा कानाडोळा करतात. बऱ्याच गाड्या अशा असतात की त्यांची क्रमांकाची पाटी नियमाविरुद्ध मराठीत रंगवलेली असते. त्यावरील क्रमांक मुद्दाम लहान आकारात व अस्पष्ट असतात. पण नियमानुसार पाटीवर गरज नसलेल्या अवांतर गोष्टी आणि वर शेजारी फडकत्या झेंड्याचे चित्र मात्र ठळक असते. अशा मंडळींना वाहतूक पोलिसांनी कधी मान धरून पकडल्याचे दिसते का ? अगदी क्वचित.
नमुन्यादाखल ही बातमी पहा :

wahatuk news (2).jpg

कोविडकाळात एखाद्या दुचाकीचालकाची नाकावरील मुखपट्टी थोडी जरी खाली सरकली असेल तरी पोलिस त्याला अगदी बकऱ्यासारखे पकडत होते (वास्तविक सिग्नलला गाडी थांबल्यावर संपूर्ण नाकावर पट्टी असेल तर चष्म्याच्या आतील बाजूस धुके साठू लागते आणि दृष्टीला अडथळा होतो. त्यासाठी ती अल्पकाळ थोडी खाली सारणे आवश्यक असते). पण याच काळात बरीच टगी मंडळी विनाहेल्मेट दुचाकी चालवत होती. त्यांना मात्र पोलिसांनी चक्क माफ केलेले दिसले ! अशा प्रकारच्या पक्षपाती वागण्यातून सामान्य नागरिकांचा सात्विक संताप होत राहतो. पोलिसांना जर नियमांची कठोर अंमलबजावणी करायचीच असेल तर मग ती सर्वांसाठी समान का नाही ? अशा द्वंद्वातूनच मग एखाद्या वेळेस एखाद्याची सटकते अन तो सरळ पोलिसाचीच तिथल्या तिथे धुलाई करतो. हेच ते विरेचन.

अन्य एक स्वानुभव सांगतो. ३० वर्षांपूर्वी माझ्या पहिल्यावहिल्या घरासाठी एका सरकारी संस्थेचे कर्ज घेतले होते. घराची नोंदणी करताना मला फक्त नोंदणी पावती दिलेली होती; मूळ दस्त अजून तयार व्हायचा होता. सदर कर्जसंस्थेने ती मूळ पावती मागितली. मी त्यांना ती दिली. त्यांच्या आवक वहीत त्याची व्यवस्थित नोंद झालेली पाहिली. आता मी त्यांच्या मंजुरीची वाट पाहत होतो. दरम्यान त्यांनी मला एकदा भेटायला बोलावले आणि माझ्यासमोर कागदपत्रांची धारिका चाळून मला सांगितले की तुमची सरकारी नोंदणीची पावतीच यात नाही. मी त्यांना सांगितले की ती तर मी केव्हाच दिली आहे. त्यावर त्या माणसाने खांदे उडवून बेफिकीरी दाखवली. मग मी त्याला म्हटलं, तुम्ही नीट शोधा. बरीच शोधाशोध झाली. त्याने पुन्हा एकदा आवक नोंदवही पाहिली. त्यात माझ्या पावतीची नोंद होती. तरी तो माणूस उडवाउडवीची उत्तरे देत होता. या प्रकारात दोन तास गेले. नंतर तो म्हणाला, अवघड आहे पावती नाही सापडली तर कर्ज कसे देणार ?

आता माझी सटकली. आवाज चढवून म्हटलं, “तुमच्या वहीत नोंद आहे आणि जर पावती सापडत नसेल तर त्याचा अर्थ उघड आहे. ती तुम्ही हरवली आहे”. तरी तो काही सौजन्याने बोलेचना. मग शेवटी मी म्हणालो, “आज तुमच्या इथे ती पावती सापडेपर्यंत तुम्ही आणि मी दोघेही हे कार्यालय सोडायचे नाही. बघू कसे जाताय पाच वाजता निघून !“ हा जो माझ्यात संचार झाला तो माझ्या कल्पनेपलीकडचा होता. त्याचा परिणाम मात्र झालेला दिसला. पुढच्या अर्ध्या तासात अनेक जण शोधकार्याला लागले आणि ती पावती मिळाली. मलाही हुश्श झाले ! माझ्या घराची मालकी प्रस्थापित करणारा तो एकमेव महत्त्वाचा पुरावा होता. अशा वेळेस मी जर गुळमुळीत राहिलो असतो तर या असल्या हलगर्जी लोकांनी माझ्या डोक्यावर मिरे वाटले असते.

असे एक ना अनेक अनुभव आपल्यातील अनेकांना येत असतात. जर का त्यातून अन्यायाची पातळी वाढत गेली तर मग एका बिंदूवर तो विरेचनाचा क्षण येतो. श्रमजीवी वर्गाचे बारकाईने निरीक्षण केले असता काही गोष्टी जाणवतात. एकंदरीतच ही माणसे समाजव्यवस्थेपुढे दबलेली असतात. त्यातून त्यांच्या मनात राग खदखदत असतो. त्यांची कामेसुद्धा काहीशी रटाळ स्वरूपाची असतात. मग ती करता करता येता-जाता थुंकणे, शिव्या देणे हे जे काही होत असते ते एक प्रकारे विरेचनच असते.

विरेचनाचे प्रकार
वरील विवेचनात भडक वा स्फोटक पद्धतीने झालेल्या प्रकारांचा उल्लेख आहे. मात्र निव्वळ याच प्रकारे विरेचन होते असा गैरसमज होऊ नये. शांततेने विरेचन होण्याचे देखील काही मार्ग आहेत. त्यांचा आता आढावा घेऊ.
काही लोकांमध्ये, कितीही ताणतणावाचा किंवा अन्यायाचा प्रसंग आला तरी त्याप्रसंगी मानसिक समतोल ठेवून राग काबूत ठेवण्याची प्रवृत्ती असते. अशा लोकांना आपल्या भावना मोकळ्या करण्यासाठी खालील मार्गांचा अवलंब करता येईल :

१. आपल्या जवळच्या व्यक्तीशी आपल्याला होत असलेल्या त्रासासंबंधी अगदी मनमोकळेपणाने, कुठलाही आडपडदा न ठेवता बोलणे.

२. आवडते संगीत तल्लीन होऊन ऐकणे. शक्य असल्यास त्याच्या तालावर आपणच मोठ्याने गाणे म्हणणे. यावरून आपल्याला लहानपणापासून सांगितलेली एक युक्ती आठवते. एखाद्या गोष्टीचा प्रचंड राग आला असताना आपल्या हातून कुठलीही आततायी कृती होऊन नये, म्हणून मोठ्याने सरळ एक ते दहा अंक म्हणावेत आणि वेळ पुढे न्यावा.

३. जोरकस व्यायाम करणे. अशा वेळी चेव येऊन (आणि वाटल्यास मनात १-२ शिव्या हासडून) काही प्रकारचे व्यायाम करणे हे उपयुक्त.

४. लेखन : वरती बोलून मोकळे होण्याचा मुद्दा आला आहे. ज्या लोकांना लेखनाची थोडीफार सवय आहे अशांनी तणावाच्या प्रसंगी लेखनाचा मार्ग जरुर चोखाळावा. ज्या प्रसंगाने आपल्याला त्रास होत आहे त्याला अनुरूप असे काही लेखन केले तरी भावना मोकळ्या होतात. विख्यात इंग्लिश लेखक सॉमरसेट मॉम यांनी या मुद्द्यावर एक सुंदर परिच्छेद लिहिलेला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, अनेक वर्ष मनात साचून राहिलेल्या व खदखदणाऱ्या भावना त्यांनी लेखनाद्वारे मोकळ्या केल्यात.

असा एक माझा अनुभव सांगतो (यापूर्वी अन्य धाग्यावर लिहिला असू शकेल). माझ्या नात्यातील एका जवळच्या व्यक्तीला एका नातेवाईकाच्या वागण्यामुळे बराच मानसिक त्रास झाला होता. या व्यक्तीवर एक दुःखद प्रसंग गुदरला होता. त्या प्रसंगात संबंधित नातेवाईकाने त्यांच्या भेटीत त्याचा साधा उल्लेख करणे सुद्धा टाळले होते. वास्तविक त्या दोघांचे नाते बऱ्यापैकी जवळचे होते. त्या नातेवाईकाच्या अशा वागण्याने ही व्यक्ती खूप दुखावली गेली होती. तीन चार दिवस तिचे कामावरून लक्ष उडाले होते. मग मी यावर एक उपाय केला. त्या व्यक्तीला सांगितले की तुला जे काही दुःख त्या प्रसंगातून होत आहे ते तू मोकळेपणाने लिहून काढ. तिला तशी लेखनाची सवय नव्हती. तरीसुद्धा तिने काही लिहून मला दाखवले. मग मी त्यात थोडे फार बदल केले. त्या दरम्यान एका दैनिकात “मोकळे व्हा” या प्रकारचे सदर चालू होते. तिथे अनेक जण आपापल्या दुःखासंबंधी स्वानुभव लिहित. या व्यक्तीचा अशा प्रकारचा लेख तयार झाल्यावर मी तिला तो दैनिकाकडे पाठवायला सांगितले. योगायोगाने तो लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्याचे तिला काही जणांनी कळवले. या सगळ्या प्रकारातून तिला एक मानसिक समाधान मिळाले. विरेचनाचा हा अगदी विधायक प्रकार म्हणता येईल.

विरेचन आणि समाजविघातकता
जोपर्यंत एखाद्याचे विरेचन वर लिहिल्याप्रमाणे शांततामय मार्गांनी होत आहे तोपर्यंत इतरांना त्याचा त्रास नाही. परंतु स्फोटक प्रकारे झालेल्या विरेचनातून कित्येकदा संबंधित व्यक्ती समाजविघातक कृत्ये करून बसते (जसे की, या चित्रपटातील कार्यालय जाळण्याची घटना).

ज्या माणसांच्या बाबतीत विरेचन वारंवार स्फोटक पद्धतीने होऊ लागते ती माणसे अर्थातच समाजासाठी त्रासदायक ठरतात. अशा माणसांचा मानसशास्त्रीयदृष्ट्या अभ्यास केला असता काही माहिती मिळते. अशा लोकांची दोन गटांमध्ये वर्गवारी करता येईल :
१.समाजकंटक आणि
२. मनोविकारग्रस्त

त्यांच्यातील काही फरक लक्षणीय आहेत.
समाजकंटकाच्या बाबतीत त्याची सदसद्विवेकबुद्धी जागृत असते परंतु ती दुबळी झालेली असते. असा माणूस क्षोभाच्या प्रसंगी एखादे घातक कृत्य करून बसतो खरा, परंतु लवकरच त्याला त्याचा पश्चात्ताप होऊ शकतो. थोडक्यात, हा माणूस गरम डोक्याचा असतो. क्षणिक उद्रेकानंतर ते डोके व्यवस्थित शांत होते.
मनोविकारग्रस्त ही मात्र अधिक वाईट अवस्था आहे. ही माणसे सदसद्विवेकबुद्धी गमावून बसलेली असतात. त्यांच्या हातून एखादे घातक कृत्य घडले तर त्याचा त्यांना पश्‍चात्ताप होत नाही. उलट, आपण केले ते योग्यच केले अशी त्यांची धारणा असते. एरवी समाजात घडणाऱ्या किंवा दृश्य माध्यमांमधून दाखवल्या जाणाऱ्या हिंसक घटना पाहून अशा व्यक्तींना सुप्त आनंद होत असतो.

अखेर मनुष्य हाही एक प्राणीच आहे. निसर्गानुसार त्याच्यात सुद्धा पशुत्वभावना आहे. परंतु विविध सामाजिक बंधनांमुळे ती दाबलेली असते. किंबहुना माणसाचे सुसंस्कृत आणि असंस्कृत वर्तन यांच्या दरम्यानची सीमारेषा काहीशी धूसर असते. जेव्हा एखाद्या प्रसंगामुळे एखाद्याचा भावनिक स्फोट होतो तेव्हा ती सीमारेषा ओलांडली जाते. त्यातून वेळप्रसंगी माणूस समाजविघातक कृत्य करून बसतो. या सूत्रावर आधारित भावनिक विरेचन ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. तिच्याभोवती गुंफलेला हा चित्रपट पाहून मला हा लेख लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वाचकांना तो रोचक वाटेल अशी आशा आहे.
.................................................................................
चित्र सौजन्य : दैनिक सकाळ

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या दरम्यान एका दैनिकात “मोकळे व्हा” या प्रकारचे सदर चालू होते. तिथे अनेक जण आपापल्या दुःखासंबंधी स्वानुभव लिहित. या व्यक्तीचा अशा प्रकारचा लेख तयार झाल्यावर मी तिला तो दैनिकाकडे पाठवायला सांगितले. योगायोगाने तो लेख प्रसिद्ध झाला. तो वाचल्याचे तिला काही जणांनी कळवले. या सगळ्या प्रकारातून तिला एक मानसिक समाधान मिळाले. विरेचनाचा हा अगदी विधायक प्रकार म्हणता येईल. >>>>>>>>पुर्वी मोकळे व्हा, ताईचा सल्ला अशी सदरे नियतकालिकांमधे असायची. त्यात अनामिक असे नाव धारण करुन प्रश्न विचारले जात. जे प्रश्न सामाजिक अवरोधामुळे विचारण्यास संकोच वाटत असे अ्शा मनोलैंगिक विषयावर प्रश्न विचारले जात. त्याची उत्तरेही तिथे दिली जात. अशी सदरे चवीने वाचली जात. नियतकालिकाच्या खपावर पण त्याचा सुपरिणाम होत असे. मानवीनातेसंबंधात प्रायव्हसी वा गोपनीयता या मुळे अनेक व्यक्तिंच्या भावजीवनात प्रवेश करण्यास सामाजिक संकेत आड यायचे. संवेदनशील अवस्थेत कधी कधी अशा बाबी दु:खावर मीठ चोळल्यासारख्या व्हायच्या. हितचिंतक हळुवारपणे त्याच्या भावजीवनात प्रवेश करुन त्याची द्खल घेत असे. त्यावर फुंकर मारत असे. त्यातूनच लोकसाहित्य तयार झाले. आता या हितचिंतकांच्या जागा समुपदेशक व मानसतज्ञ घेउ लागले आहेत. शारिरिक स्वास्थ्यासाठी व फिटनेससाठी आपण डॉक्टर कडे जातो, जिम मधे जातो. योगा करतो डाएट करतो. प्रसंगी सेकंड ओपिनियन घेतो. पण मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही असे काही केले तर ते अजून आपल्या पचनी पडत नाही.
मानसिक स्वास्थ्यासाठी तुम्ही जर या क्षेत्रातील तज्ञांची मदत घेतली तर तुम्ही मानसिक दृष्ट्या दुर्बल आहात व अशी मदत घेउन तुम्ही स्वत:चे परावलंबित्व वाढवत आहात असा समज देखील काही लोकांमधे आहे.सुसंस्कृत वर्तुळात सुद्धा मूर्खासारखा खर्च अशी संभावना होते. करोना काळात मानसिक आरोग्याच महत्व अधोरेखित झाल आहे. मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या संस्था या काळात बर्‍याच समाजाभिमुख व कार्यान्वित झाल्या आहेत. मानसमैत्र अशा हेल्पलाईन चालू झाल्या आहेत.लोक आता व्यक्त होउ लागले आहेत. हळू हळू समाजात सकारात्मक बदल दिसू लागला आहे.

छान लेख आहे ..
मी वैयक्तिक आयुष्यात शॉर्ट टेंपर (शीघ्रकोपी) असल्याने हा ईंटरेस्टचा विषय. आवर्जून वाचला लेख.

अतिशय छान लेख आणी विवेचन. सिनेमा बघायला हवा.
बेशिस्त वाहतूक आणी कधीही शिक्षा नं होणारे तर माझ्या दृष्टीने नेहमीच प्रचंड संतापाचा विषय आहे. दुसऱ्याच्या चुकीमुळे गेल्या आठवड्यापासून सुजलेला पाय घेऊन मी घरात बसलेय.

वरील सर्वांना धन्यवाद !

*असे प्रसंग अनुभवलेले आहेत
* मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या संस्था या काळात बर्‍याच
* शीघ्रकोपीअसल्याने हा ईंटरेस्टचा विषय.
>>>> सहमत. पटेश

सुंदर विवेचन....
कोणाशी तरी बोलायचंय अर्थात कोतबो...माबोवर मोकळं होणं...पण याबाबतीत एक कुठेतरी वाचलेलं वाक्य नेहमी आठवतं.... मिळेल त्या कुंडात आपलं दुःख बुडवून त्याच श्राद्ध घालणं वगैरे .
काही तरी धिरोदात्य वाचलं की छान वाटतं. लिहिणं हाही छान पर्याय. वेदना चांगली बोलते.
काही वेळा असाही अनुभव येतो ... विरेचनासाठी आपण सांगायला गेलं तर समोरची व्यक्ती मनात म्हणते घरचं झालं थोडं....
माझ्या माहितीत एक व्यक्ती होती ती रांग आल्यावर समोर येईल त्यावर घसरायची. पाणी प्यायला ग्लास ४-५ वेळा तोंडाजवळ न्यायची पण पाणी प्यायची नाही. राग ओसरल्यावर जसं काही झालंच नाही. वर म्हणायची असं केलं की मी मोकळा होतो पण समोरची व्यक्ती जिचा यां सगळ्यांशी काही संबंध नाही तीनं कुठं विरेचन करावं ?

वरील सर्वांना धन्यवाद !
*दुसऱ्याच्या चुकीमुळे गेल्या आठवड्यापासून सुजलेला पाय >>>अरेरे ! शुभेच्छा

* समोरची व्यक्ती जिचा यां सगळ्यांशी काही संबंध नाही तीनं कुठं विरेचन करावं ?>>वा! रोचक मुद्दा Happy

*छान मांडले आहे >>आभार !

छान लेख आहे.
हा लेख वाचताना मला The Machinist हा चित्रपट आठवला.
राग जसे माणसातील पशुत्व जागे करू शकते तसे अपराधी भावना माणसाला आतून पोखरून काढते. जोपर्यंत त्या अपराधाचे प्रायश्चित्त घेतले जात नाही तोपर्यंत मनास शांती लाभत नाही. हे त्या चित्रपटात छान मांडले आहे.

छान लेख आहे.
>>>बेशिस्त वाहतूक आणी कधीही शिक्षा नं होणारे तर माझ्या दृष्टीने नेहमीच प्रचंड संतापाचा विषय>>>
+999

अभिप्राय व पूरक माहितीबद्दल वरील सर्वांना धन्यवाद !
....
हे पहा भन्नाट :

इंदोर शहरात एक "भडास कॅफे" आहे. तिथे जेवण तर मिळतेच. पण सोबत तिथे एक तोडफोड करण्याची खोली आहे. आपण त्यांना काही पैसे द्यायचे. मग ते आपल्याला हवी तशी कार्यालयीन रचना तयार करून देतात (भंगारातले कॉम्प्युटर, टेबलं इत्यादी).

मग आपण एका दांडक्याने त्या सगळ्या गोष्टींची आपली शांती होईपर्यंत जोरदार नासधूस करू शकतो !

https://www.google.com/amp/s/curlytales.com/break-things-and-take-your-f...

मला या भडास कॅफेचे फ्रँचायझी हवे आहे, तुफान चालेल Wink

लेख आवडला हे वेगळे सांगायला नको. विरेचन हा शब्द अगदी चपखल आणि अर्थवाही वाटला.

कधी कधी वाटतं स्फोट होत नाही. तो झाला तर निचरा होइल. आतल्या आत ठणकत रहातं. वीष मनात पसरुन तसच थिजलं रहातं, फरमेन्ट होतं, आंबत. Sad
विधायक मार्गाने स्फोट होणे - याकरता सुदैवच हवे.
औषधांनी माणूस बधीर होतो, रडता येत नाही, स्फोट होत नाही पण हे झाले डिओडरंट सारखे. वास लपविणे मूळात दुर्गंधी आहे तिच्यावर उपचार काय?

धन्यवाद.
*मला या भडास कॅफेचे फ्रँचायझी हवे आहे >>आहात खरे उद्योजक Happy
....
* मूळात दुर्गंधी आहे तिच्यावर उपचार काय?
>>>
अंतरंगात डोकवायला लावणारा प्रश्न !

सर्वांना धन्यवाद.
…..
* रडून विरेचन होते का?
>>>
मुद्दा चांगला आहे. रडण्यामुळे प्रत्येक वेळेस विरेचन होतेच का, हा काहीसा वादाचा मुद्दा आहे. या संदर्भात काही आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासही झालेले आहेत. त्यांचे निष्कर्ष संमिश्र आहेत.
……
अतीव दुःख झाले असता रडणे फायदेशीर आहे त्यातून शरीरात साचलेली सर्व तणावजन्य रसायने अश्रूंच्याद्वारा बाहेर पडतात.
यावर इथे चर्चा झालेली आहे.:
https://www.maayboli.com/node/77368.

चालू धाग्याचा विषय संतापाची प्रतिक्रिया हा आहे.

*मनमोहना बडे झूठे" हे गाणं आठवलं>>>

गाण्याचे शब्द वाचले पण इथे नक्की संदर्भ नाही समजला.

** खूप राग आला तरी डोळ्यातून पाणी येते.

>>> भावनिक चेतासंस्थेचे अनेक पैलू असतात. त्यातला हा प्रकार असावा

ओ हो!
चित्रफित प्रसंग पाहिल्यावर आता छान समजले.
नूतन अगदी समर्थ !
भडास व गाणे दोन्ही छान
धन्यवाद

हे एक परवाच वाचलं. Venting doesn't help.

मला व्यक्तिशः मित्रमैत्रिणींशी बोलणं आणि लेखन यांनी तारलं आहे अनेक प्रसंगांत. बोलणं म्हणजे व्हेन्टिंगच असतं असंही नाही - गौरी देशपांड्यांच्या या कवितेसारखंही होतं अनेकदा.

** हे एक परवाच वाचलं. Venting doesn't help>>>
होय, या विरोधी दृष्टिकोनाबद्दल मीही थोडेफार वाचले होते. एकंदरीत वादग्रस्त विषय आहे खरा.

माझ्या कारकिर्दीमध्ये घडलेला एक प्रसंग.
एका वरिष्ठ व्यक्तीमुळे मला त्रास होत होता. मनात खूप चिडचिड व्हायची. एकदा स्वप्नात मी त्या व्यक्तीला बदडून काढले, परंतु ते करीत असताना मला उजव्या हाताच्या चेतातंतूचा एक जबरदस्त त्रास झाला.

मग मी तातडीने माझ्या सहकारी डॉक्टरकडे गेलो. त्याने योग्य ते व्यायाम मला सांगितलेच. पण तेव्हा विश्लेषण करताना तो म्हणाला,
" हे असे प्रकार बुद्धिजीवी लोकांच्या बाबतीत बरेचदा घडतात; श्रमजीवी नाही, असा माझा अनुभव".

त्याच्या मते तो वर्ग भडाभडा बोलून आणि वेळप्रसंगी शिव्या देऊन मोकळा होत असतो; मनात साठवून ठेवत नाही.

एक बातमी:
"धक्कादायक! विद्यार्थ्याकडून शिक्षिकेची १०१ वेळा चाकूने भोसकून हत्या; ३० वर्षांपूर्वीचं कारण ठरलं निमित्त"
https://www.loksatta.com/desh-videsh/ex-student-stabs-teacher-101-times-...

>>>>
असे भयानक कृत्य करण्याऐवजी त्या माणसाने आधी अन्य मार्गाने भडास काढली असती तर बरे झाले असते, असे वाटून गेले.

छान आहे लेख.

"बोलणे" ह्या उपायाबद्दल बोलायचं झालं तर मला कोणी केलेली कुठली गोष्ट खटकली असेल (किंवा मी विचित्र वागलो आहे हे पुढे जाणवलं) तर इतर कोणाशी बोलण्यापेक्षा ते थेट त्या व्यक्तीला स्पष्ट सांगितल्याशिवाय चैन पडत नाही. नाहीतर ते मनात खूप काळ ठुसठुसत रहातं!
ते सांगणं हे प्रत्येक वेळी भांडण, ओरडणं, संतापणं ह्या प्रकारेच असेल असं नाही. "तुमचं हे अमुक वागणं / बोलणं मला तमूक कारणामुळे अजिबात आवडलेलं नाही आणि मला त्याचा राग आला / वाईट वाटलं / खटकलं" अश्या संयत स्वरूपात सांगून टाकलं तरी बरं वाटतं. कारण आपण त्रास करून घेतो पण त्या व्यक्तीच्या ते गावीही नसतं आणि ते मजेत असतात ही बाब मला आवडत नाही!
हा असा "फिडबॅक" मी शाळेत,कॉलेजमध्ये शिक्षकांना आणि पुढे मॅनेजरला वगैरेही दिलेला आहे. शाळेत अर्थातच अनेकदा त्यावरूनही ओरडा बसला, एकदा तर "स्वतःला लोकमान्य टिळक समजतोस का?" असं ऐकावं लागलं. Happy काही काही मॅनेजरना चाललं, काही अजून वाकड्यात शिरले.
इथे मायबोलीवरही दोन-तीन जणांशी माबोवरच्या किंवा बाहेरच्या खटकलेल्या चर्चांबद्दल स्पष्ट बोलून टाकल्यावर बरं वाटलं होतं.

Pages