होतो तसाच आहे---

Submitted by निशिकांत on 15 March, 2022 - 08:33

( तरही) मतल्यातील सानी मिसरा गझलकार आदरणीय भूषण कटककर--"बेफिकीर" यांचा.

बदलायला न जमते, मी वेगळाच आहे
आहे तसाच होतो, होतो तसाच आहे

सारे निघून गेले मी एकटाच मागे
समजावतो मनाला मीही बराच आहे

दु:खास झाकण्याची शिकलो कला अशी की!
वाटे जगास सार्‍या मी हासराच आहे

का आजही मुजोरी चालूच कौरवांची?
अन् ब्रँड पांडवांचा भित्रा ससाच आहे

खातात ऊस कोल्हे, तो गप्प गप्प असतो
वरतून सभ्य पण तो त्यांच्यातलाच आहे

शिकलो जगावयाला पाहून भोवताली
झेलीत वादळांना कातळ उभाच आहे

ठेऊन अंधश्रध्दा बदनाम देव करता
हा तर्क आस्तिकांशी, माझा जुनाच आहे

दिसले किती अशिक्षित गर्दीत शिक्षितांच्या
मुलगी नकोनकोशी, मुलगा हवाच आहे

"निशिकांत" व्यक्त होण्या, नाही कुणीच तुजला
तू बोलतोस ज्याला, तो आरसाच आहे

निशिकांत देशपांडे, पुणे.
मो.क्र.९८९०७ ९९०२३
वृत्त--आनंदकंद
लगावली--( गागाल गाल गागा) X २

Group content visibility: 
Public - accessible to all site users