आवडतो मज अफाट सागर , अथांग पाणी निळे
निळ्याजांभळ्या जळात केशर , सायंकाळी मिळे
फेसफुलांचे सफेत शिंपीत वाटेवरती सडे
हजार लाटा नाचत येती गात किनार्याकडे
हि कविता असो किंवा
रंगरंगुल्या सानसानुल्या गवतफुला रे गवत फुला
असा कसा रे मला लागला सांग तुझा रे तुझा लळा
मला कळायच्या नकळत मी या कविता गुणगुणायला लागलो. आणि त्या केंव्हा पाठ झाल्या ते कळलेही नाही. त्यामुळे शाळेत जेंव्हा वर्गात या कविता मराठीच्या तासाला शिकवल्या जायच्या तेंव्हा शिक्षकांकडून , मी सातवीला असलेल्या कविता, चौथीत पाठ म्हणतो म्हणून पाठ थोपटून घ्यायचो. पण हे नेहमीचेच झाल्यावर त्यातली मजा गेली. मग मी लाडात येऊन आणखी एक कविता म्हणू का अशी परवानगी घायचो. आणि सुरु करायचो ..
धगधगणारे तप्त धातुरस
वैर तयांचे असे भयंकर
हवे शिंपण्या पवित्र ऐसे
कुमारिकेचे रक्तच त्यावर
ही कविता ऐकल्यावर त्याच चौथीतल्या बाई आणि वर्गातल्या मुली माझ्याकडे एकदम हे भूत एकदम इतके मोठे कधी झाले आणि कुमारिकेचे रक्त काय मागायला लागले अशा बघायच्या ते पाहून खूप मजा यायची. ( चाणाक्ष वाचकांसाठी : "को आईचा बूट" या मूळ चिनी कथेच्या मराठी भाषांतरात ही कविता आहे)
एकदा नववीत संस्कृतच्या तासाला भोजराजाच्या एका श्लोकावर खाडकन वृत्तबद्ध मराठीत भाषांतर सुरु केले, आणि सरांना गार केले.
अनंत सैतुकाचा धनी
त्यासी कशास केले भांडण
उंबरफळ गळाले पिकुन
घेऊन येता नारी हरण
त्यांना कुठे माहिती होते मला ती भोजराजाची गोष्ट सहावीत मराठीतून माहिती होती अणि ते भाषांतर मला तेंव्हाच पाठ होते.
वसंत शब्दाला समानार्थी शब्द पाहिजे? नुसते शब्द कशाला कविताच घ्या
आम्रवृक्ष बघ कसा बहरला
वसंत, माधव, मधुऋतू आला !
मग कधीतरी माझ्या वात्रटपणात सगळा वर्गही सामील व्हायचा
हे गुलाब कलीके
रुजुते कोवळीके
तुझ्या पाकळ्या पाकळ्यांचा
गुलकंद करून खावा !
आणि बाई/सरांसकट सगळे हसायचे.
पण एकदा खूप वाहावलो
एक दिवस विता विता
मला झाली एक कविता
हे पाचवीतल्या मुलाकडून ऐकून घेण्याची मॅच्यूरीटी आमच्या मराठीच्या बाईंना अजून आली नव्हती. त्यात त्या गरोदर होत्या. त्यामुळे "ही माझी कविता नाही" हे मी कितीही आक्रंदून सांगितले तरी त्यांना ते पटले नाही आणि फटके खावे लागले. हुकुमशहांकडून अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर कशी गदा येते याचे हे बाळकडू मला इतिहासाच्या किंवा नागरिकशास्त्रात शिकायच्या अगोदर मराठीच्या वर्गात मिळाले
देवाशप्पथ खरं सांगतो . यातली एकही कविता माझी नाही. यातली प्रत्येक कविता अधिकृत प्रकाशित होऊन छापून आली आहे. माझ्या मराठीच्या शिक्षकांने मला ती नुसती दाखवली काय आणि मला ती पाठ झाली , अजूनही ती पाठ आहे.
(आता मागे वळून पाहतांना , इतक्या राखीव श्रोतृवर्गासमोर स्वतःच्या कविता दुसर्याच्या नावाने खपवायची संधी मी का सोडली याची खंत वाटते ! आणि सध्याची पोरं दुसर्याच्या कविता स्वतःच्या नावाने फॉरवर्ड करतात )
माझं भाग्य म्हणजे जरा मोठी वाक्यं वाचायला लागल्या लागल्या, म्हणजे दुसरीपासून मला एक अफलातून शिक्षक मिळाला. त्याने फक्त मराठीच नाही पण मराठी , विज्ञान, भूगोल, कला अशा इतर विषयांशीही माझी ओळख करून दिली. त्याचं नाव होतं "किशोर मासिक" !
वर लिहिलेल्या या सगळ्या कविता या किशोर मासिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. अनेक कविता या आथी किशोरमधे प्रकाशित झाल्या आणि नंतर पाठ्यपुस्तकात घेतल्या. आता त्या "को आईचा बुट " या कथेतल्या कवितेचा संदर्भ लागला असेल.
१९७२ च्या जुलै पासून दर महिन्याच्या १०-११ तारखेची मी या माझ्या मराठीच्या शिक्षकाची चातकासारखी वाट पहात असे. त्या अगोदर काही महिने किशोर सुरु झाला होता पण त्या बद्दल मला माहिती नव्हती. बस करून अरण्येश्वराहून शनिपारावर जायचे. तिथे खाऊवाल्या पाटणकरांकडून "किशोर" चा ताजा अंक आणि कधी कधी सुके अंजीर घ्यायचे. आई बरोबर मंडईत किंवा तुळशीबागेत खरेदी. त्यात आई जर साडीच्या दुकानात शिरली तर माझी चंगळ . कारण मग अंक वाचायला सुरुवात करण्यासाठी बसची वाट पाहण्याची गरज नसायची. बहुतेक त्याच दिवशी माझा अर्ध्याच्यावर अंक वाचून झालेला असायचा.
सुरुवातीला मुलांचे मासिक म्हणून आईबाबांचे लक्ष नव्हते. पण मी किशोर वाचायला लागल्यापासून ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, उपग्रह , अणु उर्जा झालंस्तर भारतात आलेल्या इंग्लंडच्या क्रिकेट चमुच्या आवडीनिवडींबद्दल अधिकारवाणीने बोलायला लागल्यापासून आईबाबाही किशोर आवडीने वाचू लागले. शुद्धलेखनाचे प्रमाण म्हणून वर्तमानपत्रापेक्षा माझा किशोर वर जास्त भरोसा होता. पण कितीतरी शास्त्रीय लेख वर्तमानपत्रात येण्याअगोदर किशोर मधे अधिक तपशीलात येत. महाराष्ट्र टाईम्स मधल्या "धावत्या जगा" पेक्षा मला किशोरमधले "असे हे विलक्षण जग" आपलेसे वाटे.
मग कधीतरी एकदम संध्याकाळचा परवचा म्हणताना त्या महिन्यातल्या किशोरमधल्या कविता, मला जमेल त्या चालीत , सुरात म्हणू लागलो आणि आईला "किती कौतुक कौतुक होई हो" असे सुरु झाले.
दिवस सुगीचे सुरु जाहले
ओला चारा बैल माजले
शेतकरी मन प्रफुल्ल झाले
छन खळ खळ छ्न
ढूम ढूम पट ढूम
लेझीम चाले जोरात.
आपलं एकुलंतं एक पोरगं , काही नं सांगता कविता पाठ करून खडा खडा म्हणतंय , कुठल्या आईला आनंद होणार नाही हो? आणि त्यात ती स्वत: मराठीची भक्त असेल तर !
पण हे कौतुक फार दिवस टिकलं नाही.
शुभंकरोती कल्याणम ..
आरोग्यम धनसंपदा
......
.......
वंदे विष्णूम, भवभयहरणम
सर्वलोकैकनाथम !
किर्र रात्री सुन्न रानी
झर्र वारा भुर्र पानी;
शार वाडा गार भिंती,
दार त्याचे हस्तिदंती.
कोण आले? कोण आले?
दार आपो-आप खोले!
आली आली भुताबाई;
तीन माणसे रोज खाई
स्मशानामध्ये घालते फेरी
पहाटेपूर्वी करते न्हेरी
न्हेरीसाठी होतात चट्टर
दोन पोरे लठ्ठत मठ्ठ
"हे काय अभद्रासारखं बोलतोय !" आई एकदम किंचाळत आत आली. "कुठे शिकलास हे घाणेरडं ! आणि अशा तिन्ही सांजेला?"
इथे माझ्या मराठीच्या शिक्षकाचं आणि माझ्या पहिल्या मराठी शिक्षकेचं द्वंद्व झालं !
"अग आई किशोरमधली कविता आहे. "
तिने माझ्या हातातून अंक हिसकावून घेतला. आणि तिचे डोळे टण्ण फुगले. "कुणि लिहिलीये? विंदा करंदीकर !!!". तेंव्हा मला विंदा करंदीकर या नावाचं महत्व माहिती नव्हतं. पण तिला होतं. तिने ती वाचून काढली आणि तिच्या तोंडावर हसू फुटलं.
माझ्या मराठीच्या शिक्षकानं, माझ्या पहिल्या मराठी शिक्षकेला तिच्या नकळत काहितरी शिकवलं होत.
"पण हीच का तू म्हणायला पाहिजेस?"
"अग तूच सांगितलंस , देवाचं म्हटलं तर देव शक्ती देतो आपल्याला. मी भूताचं म्हटलं , तर भूत शक्ती देईल आणि मला परत कधीच कुठल्याच अंधारात भुतांची भिती वाटणार नाही "
किशोर आणि विंदा एकीकडे, तिच्या आईकडून आलेले मराठी मध्यमवर्गीय संस्कार दुसरीकडे आणि माझं निर्व्याज तर्कशास्त्र तिसरीकडे याच्या तिढ्यात त्या माऊलीला काय बोलावे ते सुचेना ! पण शेवटी "नको रे ती कविता म्हणत जाऊ , मला भिती वाटते म्हणून संध्याकाळी देवासमोर म्हणू नको . इतर वेळा काय करायचे तर कर " असे माझ्याकडून पटवून घेतले.
नंतर अनेक वर्षे , अगदी १२ वी पूर्ण होईपर्यंत दर महिन्याला हा शिक्षक मला भेटायचा. आणि कुणाकुणाला भेटवायचा. कुसुमाग्रज, पुल, गदीमा, वसंत बापट यासारख्या दिग्गजांपासून नवीन पिढीतल्या लेखकांची ओळख पहिल्यादा किशोरमुळेच झाली. पहिलं मराठी शब्दकोडं खेळलो किशोरमधेच. अमरचित्रकथा वाचायच्या अगोदर किशोरमधल्या चित्रकथा वाचल्या. जागतिक साहित्यातले रथमहारथीच नाही तर भारतीय्/संस्कृत साहित्यातली सौंदर्स्थळं किशोरमुळेच कळाली.
अभियांत्रिकी शिक्षणासाठी , जवळ जवळ १० वर्षांनी एकटाच पुण्यात आलो होतो. एक दिवस मुद्दाम सायकलवरून शिवाजीनगरहून सेनापती बापट रस्त्यावरचे पाठ्यपुस्तक मंडळाचे (जिथून किशोर प्रसिद्ध होतो /व्हायचा) कार्यालय बाहेरून पाहून आलो. अमिताभ बच्चनच्या चाहत्याला दुरुनच त्याचे घर पाहिल्यावर जो आनंद होत असेल तो काय हे मी त्या दिवशी अनुभवलं !
शिक्षण कस असावं ? तर जो देतो त्याला आपण देतोय आणि जो घेतोय त्याला आपण शिकतोय याची जाणीव न होता ते समजल पाहिजे. ही शिक्षणाची व्याख्या पाहिली तर किशोर माझा अद्भूत शिक्षक होता. या शिक्षकाने मला कधिही शिकवण्याचा आव आणला नाही पण मला खूप शिकवलं. शिक्षा केली नाही तरी मला माझ्या चुका समजावून दिल्या. आणि इतकंच नाही तर शिक्षण कसं शिकवावं हेही शिकवलं.
ये उदयाला नवी पिढी, किशोर धरतो उंच गुढी !
मस्तच !!! खुसखुशीत आणि सुंदर
मस्तच !!! खुसखुशीत आणि सुंदर लिखाण. कविता पाठ असणे चांगल्या कवीचे लक्षण आहे.
वेमांकडून कधी कधी असे वेगळे काही आले तर खासच वाटते.
मस्त!
मस्त!
छान लेख. मी पण किशोर मासिकाची
छान लेख. मी पण किशोर मासिकाची फॅन आहे.
किती सुंदर लिहीले आहे.
किती सुंदर लिहीले आहे. लहानपणीचे तुम्ही डोळ्यासमोर साकार झालात. आपल्या आई तीन्ही सांजेला ती भूताची कविता ऐकून दचकल्या - हे अगदी पटते. त्यावरचे 'देव शक्ती देतो. भूत देइल' हे वाक्य आणि निरागसपणा तर इतका छान आहे.
छानच लिहिलंय
छानच लिहिलंय
पण 'कवितेचे मास्तर / बाई' वाटावा असा कवितेकडे झुकणारा झालाय लेख.
अजय, लेख आवडला.
अजय, लेख आवडला.
किशोर मासिकाचे हेच परिणाम माझ्यावरही झाले. म्हणजे खरं तर वाचनाची आवड असलेल्या तेव्हाच्या सर्वच किशोरच्या वाचकांवर झाले असणार.
आवडतो मज अफाट सागर आवडतेच आणि आठवतेही, आणि ती ही किशोर मासिकामुळेच.
पिशी मावशी भजीच खाते
तिला न लागे कधीच झारा..
ही आणि..
आला मामाचा सांगावा
अक्कू बक्कूला पाठवा
ही 'अक्कू बक्कूची दिवाळी' अशा कविता चित्रांसकट लक्षात आहेत.
माझा मामा मला दिवाळीमधे किशोरचा दिवाळी अंक माझ्यासाठी आणायचा आणि वर्षभराची वर्गणी भरायचा.
हे जुने किशोरचे अंक आजही माझ्या घरी आहेत.
तुमच्या लेखामुळे पुन्हा एकदा ते किशोर दिवस आठवले.. त्याबद्दल धन्यवाद..
सुरेख ! खूपच छान लिहीलयं.
सुरेख ! खूपच छान लिहीलयं. किशोर आणी चांदोबा देवासमान. अधाश्यासारखी पारायणे केलीत.
तुमच्या लेखामुळे पुन्हा एकदा ते किशोर दिवस आठवले.. त्याबद्दल धन्यवाद..>>>>>+१२३४५६७८९१०
वेमा मस्त !
वेमा मस्त !
अमिताभ बच्चनच्या चाहत्याला दुरुनच त्याचे घर पाहिल्यावर जो आनंद होत असेल तो काय हे मी त्या दिवशी अनुभवलं ! >>> हे भारीच!
मस्त लिहिलेय. एकदम
मस्त लिहिलेय. एकदम चित्रदर्शी वर्णन
भार्री लिहिलंय!
भार्री लिहिलंय!
>>> शिक्षण कस असावं ? तर जो देतो त्याला आपण देतोय आणि जो घेतोय त्याला आपण शिकतोय याची जाणीव न होता ते समजल पाहिजे.
वा!!
>>> मग मी लाडात येऊन आणखी एक कविता म्हणू का अशी परवानगी घायचो. आणि सुरु करायचो ..
त्या 'म्हणू का'च्या जागी 'ऐकवू का' घातलं की अर्धे कवी तिथेच व्हाल!मस्त! किशोरचे दिवाळी अंक
मस्त! किशोरचे दिवाळी अंक लक्षात आहेत, खूप छान असायचे.
शिक्षक म्हणजे तो शाळेत शिकवणारा व्यक्तीच असेल असं नाही. मासिकं, पुस्तकं, एखादा लेखक(ज्याला/जिला प्रत्यक्ष कधीच भेटणे होत नाही) सुद्धा शिक्षक असतो हा concept च भारी आहे. आता यात सोशल मीडियावरील शिक्षकांची भर पडत आहे!
मस्त!
मस्त!
फार सुंदर, जाईला मम.
फार सुंदर, जाईला मम.
मस्त आहे. तेव्हा पाठ केल्या
मस्त आहे. तेव्हा पाठ केल्या ते ठीक पण अशा कविता अजून लक्षात आहेत हे जास्त डेंजर आहे
सुंदर!
सुंदर!
>>तुमच्या लेखामुळे पुन्हा एकदा ते किशोर दिवस आठवले.. त्याबद्दल धन्यवाद..>> +१
छान लिहिलेय.. एक वेगळाच
छान लिहिलेय.. एक वेगळाच शिक्षक.. एक वेगळीच दुनियादारी.. आवडली.. बालवयात किशोर मी सुद्धा वाचलेत. पण आठवत नाही फारसे .. कवितांशी नेहमीच वाकडे असल्याने कधी कुठल्या अंकातील वाचल्याच नाहीत.. पण आचरट विडंबनाचा छंद होता तेव्हा तेवढीच पद्याशी जोडलेली नाळ..
मस्त लिहिलं आहे अजय.
मस्त लिहिलं आहे अजय.
छान लेख !
छान लेख !
किशोर ! अप्रतिम !
काही गोष्टी अजूनही आठवतात .. !
छान लिहीलाय लेख. किशोर मासिकं
छान लिहीलाय लेख. किशोर मासिकं आमच्या घरीही अतिशय आवडती होती. मी सगळ्यात जास्त पुस्तकांत डोकं खुपसून बसणारी. मे महिन्यात, दिवाळीच्या सुट्टीत आमच्या घरी बाकीचे भावंडं रहायला यायची तेव्हा माझी चुलत बहीण किशोर मासिक लपवून ठेवायची. माझ्या हातात पडलं की झालं, मग मी कुठच्याही खेळामध्ये जात नसे.
मला पण किशोर मधल्या कविता गोष्टी अजून लक्षात आहेत.
इंदिरा संतांची " बाबा तेवढे गावाला जाणार, " ही किशोर मध्ये च वाचली.
"आल बट्टी बाल बट्टी शोन्याशी गट्टी फू" ही पण कविता किशोर मध्ये वाचली.
क कसा क कसा , कमरेवर हात विठोबा जसा
अजून एक चित्रासहीत आठवतेय
"आई मला वाघ खेळायला घेत नाही कारण मला मिशा नाहीत"
असो, प्रतिसाद लांबला, थांबते.
धनुडी, 'क कसा क कसा , कमरेवर
धनुडी, 'क कसा क कसा , कमरेवर हात विठोबा जसा' - बडबडगीतांच्या धाग्यामध्ये तू ही कविता आठवेल तेवढी दिली आहेस.
कसली मस्त आहे गं.
सामो
सामो
खूप सुंदर लेख...
खूप सुंदर लेख...
मस्तच ! आता प्रकाशित होत नाही
मस्तच ! आता प्रकाशित होत नाही का किशोर?
छान लेख
छान लेख
फारच मस्त लिहीलेय. आवडला लेख
फारच मस्त लिहीलेय. आवडला लेख
किशोरच्या एका दिवाळी अंकातली
किशोरच्या एका दिवाळी अंकातली 'श्रीखंडाचे बोट' कथा कुणाकुणाला आठवते? मी नाइंटीजमध्ये किशोर वाचणार्या अनेकांना भेटून 'क्या आप भी श्रीखंडाचे बोट के शौकीन हैं?' ला 'हो' उत्तर ऐकलं आहे.
ता क - माबोवरच शोध घेतल्यावर कळलं की ही कथा मुळात ऑगस्ट १९७५ च्या अंकातली आहे.
https://kishor.ebalbharati.in
https://kishor.ebalbharati.in/Archive/Index.aspx
मस्त लेख आणि एकदम योग्य
मस्त लेख आणि एकदम योग्य शिक्षकाबद्दल लिहिलंय. किशोरनं खरंच आपल्या पिढीला संपन्न केलंय. दर महिन्याला किशोरची व्याकूळ होऊन वाट बघणे आणि हातात पडल्यावर आधाश्यासारखा वाचून काढणे यात परमानंद मिळत असे. आमच्या घरात मी आणि बहीण यांत किशोरवरून भांडणं, मासिकाची लपवालपवी असे प्रकारही असत.
मायबोलीवरील किशोरविषयक लिंका वाचकांच्या सोईसाठी इथे देत आहे :
किशोर चे जुने अंक आणि त्यातील निवडक लेखांची सूची : https://www.maayboli.com/node/64612
किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं : https://www.maayboli.com/node/50319
लेख उत्कृष्ठ आहे. विषय,लेखन व
लेख उत्कृष्ठ आहे. विषय,लेखन व त्यातील कवितांच्या खुसखुशीत संदर्भासह आठवणी, सर्व भट्टी उत्तम जमली आहे.
त्यांच्या समकालीन वाचकांना हा कवितेवरचा लेख पुन्हा कवितेच्या आणि किशोर मासिकाच्या आठवणींच्या दिवसांत नेईल.
“ शिक्षण कसे असावे? तर जो देतो त्याला आपण ते देतोय…… .. त्याला जाणीव न होता ते समजले पाहिजे.”- शिक्षणाची ही मूळ व्याख्याच होय. आई बाप आपल्या मुलांना अस् शिक्षण देत असतात.
किशोर मासिक हे सर्वांशाने फुलणाऱ्या वयाच्या मुलांनाच नव्हे तर त्यांच्या पालकांनाही सकस वाचनाचा अनुभव देणारे होते. १९७१-७२ साली सुरु झालेले हे मासिक आजही प्रकाशात असेल असे वाटते. वसंत शिरवाडकर, वसंत सबनीस ह्या सारखे प्रसिद्ध लेखक संपादक म्हणू लाभले. तसेच आचरेकर, मारिओ मिरांडा, प्रभाशंकर कवडी असे नामांकित चित्रकार लाभले. अंकात विंदा करंदीकरांबरोबर , वसंत बापट, कुसुमाग्रजही कधी असायचे.
किशोर मासिकाचा यथार्थ गौरव करणारा लेख वाचल्याचे समाधान मिळाले.
सुरेख लेख.
सुरेख लेख.
सर्वप्रथम इतके सगळे तुम्हाला आठवते याचे असूया मिश्रित कौतुक!
किशोर, चांदोबा, चंपक, ठकठक, आनंद, गंमतजंमत - आपलं भावविश्व व्यापून टाकलेली मासिकं :.....,+१.
Pages